प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - शाम

Submitted by -शाम on 11 September, 2011 - 13:04

लग्नाच्या दिवशी : खोलीपासून बोहल्यापर्यंत

=========================================================================
संज्याच्या लग्नाचा दिवस येऊन ठेपला आणि हळद पोचवायची जबाबदारी मित्र या नात्याने माझ्यावर येऊन पडली. मी,गण्या,संद्या आणि संज्याचा मामा असे आम्ही चौघे जण हळदीच्या सामानाच गचूंडं घेऊन निघालो, फार फार तर ५ कि.मी चा रस्ता....
गण्याची राजदूत म्हणजे आमच्या गावाचं नाक, तिला गावातले सारेच फटफटी या नावाने ओळखत, अगदी नावाप्रमानेच 'फटफटी' होती ती, गाडी मैलभर गेली तरी हवेत धुराची रेघ दिसायची आणि आवाज तर चार मैलांवरून यायचा..पण हक्काचं साधन म्हणून घेतलेली, मामांकडे एम.एटी होती ती ही कमालच. तिचा आणि चालकाचा काही संबंध नसल्या सारखं ती स्वतःच्याच गतीने चालायची. मामांच्या मागे संद्या आणि गण्याच्या मागे मी... गावाला धुरात सोडून आम्ही वेस ओलांडली तेंव्हा सकाळचे ८ वाजले होते, लग्नसमारंभ एक-दिडला होता..

दोन्ही वाहने समांतर आल्यावर मी मामांना प्रश्न केला...

"काय मामा, पोरगी पाहण्याचा कार्यक्रम आठवतोय का?"

"व्हय तर ते काय इसराया सारकं हाये?"

महिनाभरापुर्वी याच वाटेने आम्ही संज्याला घेऊन पोरगी पहायला आलो होतो. भडकेगुर्जी (मध्यस्त),संज्या (होऊ घातलेला नवरदेव), रामा (संज्याचा मेव्हणा) आणि मी. तसा एक्स्ट्राच होतो, तिघांनी जाऊ नये असा कोणीतरी सल्ला दिल्याने माझी (भारूड)भरती झाली होती.

दुपारी जायचे ठरलेले असताना चार वाजेपर्यंत रामाचा तपास नव्हता, शेवटी एका माल ट्रकला लटकून पाच वाजेतो स्वारी स्टँडवर उतरली. काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्याच्या तापट स्वभावाची सगळ्यांना कल्पना होती.

"पोरी पावणं आलं बघ." असं काहीसं मनात असताना, "आयला पाव्हणे आत्ता टपकले का काय?" अशी भावमुद्रा करून वधूपक्षानं आमचं स्वागत केलं, इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या, चहा,पोहे,सगळं होऊनही मुलगी मात्र कुठे दिसेना..हे पाहून गुर्जींनी खिशातील तंबाखू आणि मुख्य विषय यांना एकदमच हात घातला...

"मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून घ्यावं म्हंतो? परत निघायलाही उशीर होतोय."
मास्तरांच्या या प्रश्नाने यजमानद्वयी एकमेकांकडे पाहू लागली,

"त्याssssचं आसहे आमी दुपारीच तयारी केली व्हती पर sssss" ...टकलावरचा घाम पुसतं संज्याचे भावी सासरे बोलले...

" आहो जशी आसंल तशी दाखवा "...म्हणून गुर्जी लेंगा सावरत एक आवर्तन थुंकून आले.

"नाई तसं नाई, पर पोरगी जरा बायेर गेलीया, येईल, प्वार धाडलंय बोलवाया"

"कॉय? या वेळी बाहेर?...अहो आठ वाजतायेत घरी बघायला पाहुणे आलेत नि पोर बाहेर?" रामाचा पारा चढला...

इतक्यात गेलेला मुर्‍हाळी धावत आला आणि दारातूनच बोंबलला

"दादा,ती काय गावत नाय बगा, मला वाटतं गावात तमाशा आलाय,तिकडं त् नसंल ना?"....

"त्याचं काये पाव्हणं, पोरीला तमाशा लई आवडतो बघा, तिकडच असलं आत्ता बोलवतो." यजमान निर्वीकार बोलले.

'तमाशा'शब्द ऐकूनच मास्तरांचा पिंजरा झाला,
"मी पण येतो" असं म्हणेस्तोवर चप्पल चढवून अंगणात गेले सुद्धा....
हे सगळं अत्यंत हलकं घेतलं जात होतं याचं कारण संज्याला पोरी दाखवून दाखवून संज्यासह्..मास्तर नि रामा सुध्दा कंटाळले होते, काहीही करून जमवायचंच असा निर्धार त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता.
यजमान, मास्तर आणि मी तिघे तमाशाकडे निघालो,तर रामा नि संज्या "आम्ही जरा येतो" म्हणून कुठेतरी कल्टी झाले.

आनंद लोकनाट्य मंडळाच्या भव्य तंबूत आम्ही, भावी सौ.संजय यांना शोधू लागलो. तमाशा सुरू व्हायलाच होता.बराच वेळ शोधूनही बाई काही सापडेना, शेवटी कोणाची तरी परवानगी घेऊन मास्तर थेट स्टेजवर पोहचले.

हॅलो-हॅलो करून दोन वेळा माईकला दणका दिल्यावर
"ओ चालूये बॉला" असा खालून दम-दार आवाज आला तसं मास्तर बोलू लागले..
"इथे बसलेल्या प्रेक्षकांमध्ये मिनाताई शिंदे कुठे असतील तर त्यांनी ताबडतोप घरी जावे,,,पाहूने आले आहेत"

आम्ही घरी पोहचल्यावर जरा वेळाने वधूवर एकामागे एकच दाखल झाले.
"काही विचारायचं असेल तर विचारा"
सगळ्या सरंजामासह समोर बसलेल्या वधूकडे इशारा करत यजमान म्हणाले.
नाव,गाव,मामा,काका, स्वयंपाक सगळं विचारून झाल्यावर गुर्जींनी
तमाशा फार आवडतो का? विचारताच वधूने तोंड वर करून ना़जूक हासत "होssssss"असं सुरात म्हंटलं.

...शंभर रूपये नारळावर टेकवून गुरुजी बाजूला झाले...आणि पाया पडण्याचा कार्यक्रम चालू होताचं रामभाऊ खाडकन उठले.
"मला हा प्रकार अजिबात आवडत नाही, मी माझ्या आईबापाला सुद्धा माझ्या पाया पडू देत नाही" त्यांचं ते बोलणं, तो डौल आणि सुवासावरून ते मघाशी कुठून जाऊन आले ते कळालं...संज्याची तर मानही वरती होत नव्हती...आता आणखी काही घोळ होण्याआधी मी निघण्याची घाई केली...

हे सगळं चित्र डोळ्यासमोर येत असतानाच कर्रर्रर्रर्र र्र र्र र्र करून गण्याने फटफटीचा कासरा ओढला आणि मी भानावर आलो.
रस्त्यावरचे दोन्ही बैल थोडक्यात बचावले होते...मालकं मुक्ताफळं उधळीत होता...आम्ही धावत होतो, पण एका बैलाच्या काय मनात आले कोण जाणे... तो मामांच्या एटी मागे लागला, मामा जाम मूठ पिळू लागले पण गाडी काही पळेना..बैलाने मागच्या पायावर भार घेत पुढचे पाय एटीच्या कॅरेजवर लँड केले.
तसे एटीनेही पुढचे पाय वर केले नि मामासह संद्या..

धडाम्म्म्म्म,.....

आवाजाने बैल पळाले ..
आम्हीही थांबलो..
जाम खरचटलं होतं..वधूला चालवलेली हळद त्या दोघांना लावून .....
यात्रा पुढे निघाली.....

आदरातिथ्य आटोपून पुन्हा पाया पडण्याचा प्रसंग आला..आणि नवरीबाई समोर आली.
दुकानातल्या लाईटच्या भपक्यात सामान घेताना फसगत व्हावी तसं मला झालं...त्या दिवशी दिव्यांच्या उजेडात पाहिलेली वधू नि आज सूर्याच्या उजेडात झालेले तिचं दर्शन यातलं अंतर कशानेच न मोजता येण्यासारखं होतं. याच विचारात तास लोटले....

वर्‍हाडाच्या गाड्या बाजारतळावर आल्याची बातमी येताच आम्ही धावलो...
"अरे दाढी करायची होती या लोकांनी खूप घाई केली.."..संज्या कळवळून सांगत होता
"आपण मेकपच सलून मधे करू, वेळ आहे अजून, चलं " म्हणून मी त्याला घेऊन सलून गाठलं.
नवरदेवाची दाढी, केस, करण्याच्या प्रकाराला आमच्याकडे 'चूच' म्हणतात.
हे नाव का पडले असावे कोण जाणे,पण '...त्या चमन' अशी एक शीवी इकडे प्रचलीत आहे हा त्याचा शॉर्टफॉम आहे की काय असे उगाच वाटून गेले.

"मागे जास्त रेलू नका"

अशी तीन वेळा सुचना आल्याने मला न्हाव्याच्या खुर्चीचा संशय आला...
आणि तो खराही ठरला दाढी उरकल्यावर पाण्याचा फवारा मारताच संज्या खुर्चीवर रेलला आणि खुर्चीसह

धडाम्म्म्म्म,.........

खुर्चीच्याच कुशनवर डोकं आदळल्याने पुढील अनुचीत प्रकार टळला होता....आजचा हा पडझडीचा दुसरा प्रसंग होता...ईजा,बिजा आणि तिजा ...असं होऊ नये यासाठी मी देवाला आळवू लागलो....

बँडबाजा..गाजावाजा..धडामधूम...या सगळ्यांसह वरात मंडपाच्या प्रवेशदारात आली.
वधूवर पाचारण झाले..बहारो फूल बरसाओ म्हणनार्‍या ट्रांपेटच्या शिंतोड्यांनी विधीमार्ग पावन होऊ लागला.
जोडी पुढे निघाली. इतक्यात खालून संज्याच्या नवीन मेव्हण्यांमधून कोणीतरी संज्याच्या पायात हात घातला आणि काही कळायच्या आत....

धडाम्म्म्म्म,.........

संज्या रापकन ट्रांपेटवाल्याच्या अंगावर कोसळला. मंडपाने संज्याचा हा दंडवत हसत हसत स्विकारला. एकाने धावत जाऊन त्याच्या पायातले बूट पळवले तर दुसर्‍याने त्याला खांद्यावर उचलून स्टेजवर नेले.
तो काही बोलणार इतक्यात त्याच्या तोंडात विडा कोंबण्यात आला आणि मंगलाष्टके सूरू झाली....
विविध आवाजांनी आणि लयींनी सजलेली ती अष्टके काही मंगल करतील असं मुळीच वाटतं नव्हतं....
एका क्षणात सरळ ओळीत धरल्या जाणार्‍या पंगती ही कोणत्याही लग्नातली सामा़जिक शिस्त, या ही लग्नात पहावयाला मिळाली,
सप्तपदी, सूनमुख, भांडे टेंपोत भरणे आदी कार्यक्रम बिना पडझडीचे पार पडले....
रडारडी नंतर संज्याला 'दुल्हन हम ले जायेंगे' जीपमधे कोंबून.

त्याच ऐतिहासीक फटफटीवर मी आणि गण्या परतलो.......

=========================================================================
................शाम.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

तिथे का नै दिलं?>>>
संयोजकांनी आधीच वेळ द्यायला हवी होती, मला वाटलं ११ तारखेच्या रात्री १२ पर्यंत स्विकारतील, पण ९:३० लाच बंद केलं.

आणी मग लेट झालं ...:(

Lol

चला तुम्हाला आवडलं भरून पावलो......

स्पर्धेत नाही स्विकारलं गेलं याची आता खंत नाही.

खूप खूप धन्यवाद!!!!