"सारे प्रवासी घडीचे" - सुमेनिष

Submitted by सुमेधा आदवडे on 6 September, 2011 - 01:29

फेब्रुवारी २०११ च्या २३ तारखेला सकाळी ८ वाजता निघालो. अहो कुठे काय? माझ्या लग्नाला. प्रवासवर्णन लिहायचं तर तारीख-वेळ लिहायला हवीच ना. आणि ही तारीख तर कधीच विसरु नाही शकणार. लग्नाचा वाढदिवस येईल ना दरवर्षी..नवर्‍याकडुन गिफ्ट उकळण्याच्या हक्काच्या दिवसांपैकी एक! असो. त्याला वेळ आहे अजुन. मला भरकटवु नका! मला लग्नाच्या दिवशीचं प्रवासवर्णन लिहायचं आहे.

लग्नाचा हॉल दादरला. मुहूर्त दुपारी १२.१२चा. लग्नाअधीच्या काही विधींसाठी नवरी मुलगी आणि तिच्या आई-वडीलांनी १० च्या आधी हॉल वर हजर राहणे अशी सुचना भटजीबुवांनी आधीच दिल्यामुळे पनवेलहुन आम्हाला सकाळी ८ वाजता तरी घरातुन..सॉरी लग्नघरातुन बाहेर पडायला हवं होतं. पण लग्नघरातल्या गडबडीशी वेळेची लढाई चालु होती. सुरूवात सकाळच्या अंघोळीपासुन झाली. सकाळी ६ वाजता मांडवात चार घागरं चौकोनी आकारात मांडली होती. त्यांना एकमेकांशी दोर्‍याने बांधलं होतं. आता मी एका बाजुचा दोरा पायाने तोडुन आत प्रवेश करायचा आणि मधोमध माझ्या ’ओपन बाथरुम’ मध्ये बसायचं. मग सगळ्या सुवाशिनी मला आदल्या दिवशीची हळद लावुन आरती करणार आणि माझ्या भोवती..म्हणजे माझ्या बाथरुम भोवती फिरुन एकेका घागरातलं थंडगार पाणी माझ्यावर ओतणार अशी प्रथा होती. तुम्हाला वाचायला मजा येत असेल, पण थंडीने माझी कुडकुड कोंबडी झाली होती. ह्यानंतर बायकांना काय लहर आली कुणास ठाऊक..उरलेल्या हळदीला पाण्यात मिसळुन त्या तिथेच हळदीची होळी खेळु लागल्या.ज्या अंघोळी करुन खाली आल्या होत्या त्यांची एकच धावाधाव सुरू झाली. बाकीच्यांच्या मस्तीने सगळ्या पिवळ्या पिवळ्या झाल्यावर मामाने मला पाच पायर्‍या उचलुन वर नेलं Happy आणि मग माझ्या खर्‍या बाथरुममध्ये अंघोळ झाली.

गडबड विरुद्ध वेळ या लढाईत वेळ अर्धा तास हरुन आम्ही ८.३० वाजता खाली उतरलो आणि सोसायटीच्या बाहेर उभ्या असलेल्या गुलाबांनी छान सजवलेल्या कारमध्ये बसलो. नारळ फुटला, गाडीच्या पुढच्या चाकाखाली लिंबु ठेवलं गेलं आणि गाडी सुरू झाली. घरातुन साधीच साडी नेसुन निघाले होते. विधी झाल्यावर मग लग्नाची नऊवारी नेसायची होती. आणि मग पुढची तयारी. हे सगळं करणार असणार्‍या पार्लरवालीला वाटेत सी.बी.डी बेलापुर ला पिकप करायचं होतं. तिनं असा उशीर केला की बेलापुरच्या बसस्टॉपवर आमची गाडी २० मिन. थांबलेलीच. तिथेच नऊ वाजत आले. आदल्या रात्री हळदीला नाचुन केलेलं जागरण, दिवसभराची गडबड आणि थकव्यामुळे गाडीत सगळे पेंगु लागले. डॅडी खाली उतरुन थांबले होते. तेवढ्यात माझ्या जीवलग मैत्रीणीचा फोन "अगं मी निघालीये हं आता, १५ मिनीटात हॉलवर पोहोचेन. तुम्ही कुठे आहात?" आता हिला काय सांगणार? ती कुर्ल्यावरुन जाणार म्हणजे पोहोचेलच लवकर. नवर्‍याला बायकोच्या आधी मेहुणीचं दर्शन होणार तर.. सगळ्या पेंगुळलेल्या नजरा गाडीच्या मागच्या बाजुच्या काचेवर खिळल्या होत्या. अखेर एका बसच्या मागुन धावत धावत पार्लरवाल्या मॅडम आल्या आणि गाडी पुन्हा मार्गावर लागली. पावसातुन भिजुन घरी आल्यावर दारातच कोणीतरी बादलीभर पाण्याने अभिषेक करावा तसा इथे झालेला उशीर कमी की काय म्हणुन चेंबुरपासुन ट्राफिकने आमच्या गाडीला ग्रासले ते थेट दादरपर्यंत! हे अपेक्षीतच होतं. कारण मधला दिवस होता आणि त्यात ही ऑफिसची वेळ.

दहा मधुन आठ वेळा तरी उशीर ही अटळ बाब आहे...तरी मला उशीर ह्या शब्दाचीच खुप चीड आहे. मला कोणाला उशीर झालेला किंवा स्वत: उशीर करायला अजीबात आवडत नाही...मग ते रोजचं ऑफिस असो किंवा आईने बाजारातुन काही आणायला सांगितलेले असो. कुठे पोहोचायचं असेल तर ती वेळ पाळायला जीवाचं रान केलंय मी बर्‍याचदा. वेळ जवळ येत आली आणि उशीर होऊ लागला की मला ड्रम वर काठीची थाप पडावी त्याप्रमाणे हृदयावर कोणीतरी थापा मारुन मारुन हार्ट बीट वाढवतंय असं वाटु लागतं. अर्थात हे कुठे पोहोचायचं आहे ह्यावरही अवलंबुन आहे. आणि आता मला लग्नाला पोहोचायचं होतं..माझ्याच! आधीच सगळं व्यवस्थित होऊदे याचं आणि नव्या आयुष्याचं मनात टेंशन , सगळं कसं असेल याची हुरहुर,आनंद आणि उत्सुकता आणि थोडंसं दु:ख..आई-डॅडींपासुन,माझ्या स्वत: सजवलेल्या मस्त खोलीपासुन...आणि हो घरापासुन सुद्धा! लांब जायचं याचं.
ह्या सर्व भावदैत्यांचा (कसा सुचला हा शब्द ठाऊक नाही!) एकत्रीत परीणाम म्हणुन माझं हार्ट मोठं मोठं होऊन उचंबळुन तोंडातुन बाहेरच पडेल की काय असं वाटु लागलं होतं.

दादर मध्ये पोहोचल्यावर ड्रायव्हरने म्हटलं मला हॉलवर जायला शॉर्टकट माहित आहे. तिथे ट्राफिक पण कमी असेल. आणि त्या अती हुशार माणसाने इतर मार्ग असताना गाडी स्टेशन जवळच्या रोडने काढली. आमचा हॉल स्टेशनच्या समोरच होता. पण त्या गर्दीतुन गाडी हॉलला पोहोचायला १५ मिनीटे लागली. अखेर पावणे दहा च्या सुमारास गाडी हॉलच्या बिल्डींगखाली लागली. माझी खोली दुसर्‍या मजल्यावर आणि लग्नाचा स्टेज पहिल्या मजल्यावर होता. गाडीतुन उतरल्यावर माझे चुलत दीर प्रथम दिसले आणि माझ्याशी हसुन डॅडींशी बोलु लागले. (म्हणजे स्वारी आली वाटतं कधीच..मी मनात म्हटलं.) आम्ही बायका सरळ दुसर्‍या मजल्यावर गेलो. शेजारीच नवर्‍याची खोली. दार उघडं होतं. त्यांची काही पुजेची मांडामांड चालु होती. आमचे साहेब दाराकडे पाठ करुन उभे होते. कोणीतरी बोललं मला.."हं..आता बघायचं नाही हं तिकडे लग्न लागेपर्यंत!" आवाज ऐकुन नवरदेवांचं लक्ष गेलं असावं. त्यांनी आमच्याकडे पाहिलं बहुदा.माय हार्ट स्कीप्ड अ बीट अगेन Happy

आम्ही खोलीत आलो. पार्लरवाल्या मॅडम टिकल्या आणायला विसरल्या होत्या. त्या खाली पळाल्या. माझी मैत्रीण खोलीजवळच होती. आमच्या मागोमाग तीही आत आली. पहिले दोघींनी एकमेकींना मिठी मारली आणि मग बाईसाहेब रडु लागल्या.."सॉरी गं मला हळदींना यायचं होतं काल..पर मेरा बॉस !@!@#" जाने ही नहीं दिया जल्दी" तिचा त्रागा होणं रास्त होतं. पण मी मनात म्हटलं पुण्यवचनां आधी हिची पापवचनं कानावर नको पडायला. मी तिला शांत करत होते. तेवढ्यात आमच्या मातोश्रींच्या डोळ्यांतल्या सकाळी निघाल्यापासुन खळाळणार्‍या आणि गाडीत असे तोवर थांबलेल्या पाण्याचा बांध फुटू लागला. रडत रडत ती पण तिला समजावु लागली " जाने दे बेटा..मत रो" अर्थात मीही त्यांना दोन मिनीटं जॉईन केलं. आता आठवलं की हसु येतं..पण ती वेळच तशी होती.

आम्हा तिघींचा एकता कपुर फेम सीन बघाणार्‍या आजु-बाजुच्यांना, मला दीडेक तास सगळे विधी आणि नंतर साडेतीन-चार तास रिसेप्शन साठी उभं रहायला ताकत मिळवायला हवी होती हे लक्षात आलं. सगळे त्यासाठी धावु लागले. कुणीतरी ज्युस आणुन दिला. कुणी पाण्याचे पॅक्ड ग्लासेस आणुन ठेवले. कुणी शहाळ्याचे पाणी आणुन दिले. म्हटलं एवढं लिक्वीड पोटात गेल्यावर निसर्ग आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं रिसेप्शन चालु आहे हे काही त्याला कळणार नाही. कपडे बदलायच्या आधी ’तिकडे’ जाऊन आलेलंच बरं!

पुण्यवचनासाठी बोलवायला भटजी आले. आई-डॅडी, मी आणि एक करवली खाली स्टेजवर गेलो. माझ्या बहिणींचं एका कोपर्‍यात टेबलावर रुखवत मांडणं चालु होतं. आमचा वीस मिनीटांचा हा विधी झाला आणि भटजी बुवांनी सुचनांना सुरूवात केली. १२.१२ चा मुहूर्त आहे. म्हणजे १२.१२ वाजता मंगलाष्टके संपली पाहिजेत. त्यासाठी मला तू सगळी तयारी करुन ११.४० ला अगदी रूमच्या बाहेर पडलेली दिसली पाहिजेस. अजीबात उशीर करायचा नाही. आणि मग दार ठोठवायला लोक आली की बाकीच्यांनी हे राहिलंय,ते राहिलंय, फक्त २ मिनीट, ५ मिनीट ओरडायचं नाही! कळलं? मी मानेनंच होकार दिला. पण हार्ट स्वतःचं अस्तित्व आणखी प्रखरपणे दाखवु लागलं. साडेदहा वाजले होते. एक तास आणि दहा मिनीटांत मला तयार करतील ह्या बाई? माधुरी-अनिलचं गाणं परफेक्ट सुट होतं अशा प्रसंगी. कोणतं माहित असेलच!

वर येऊन आईने तिला भटजींच्या शब्दांत स्ट्रीक्टली सांगितलं. माझी मैत्रीण आणि मावस बहीण तिच्या असिस्टंट बनल्या. आणि माझी सजावट चालु झाली. नऊवारी नेसुन झाली. आता हेअरस्टाईल आणि मेकप. ह्या दोघी तिला हव्या त्या वस्तु पुरवत होत्या. केस बांधुन झाले आणि ११.२० ला मेकप करायला घेतला. तोच दारावर पहिली थाप पडली. "झालं का? आवरा लवकर!" मी म्हटलं अजुन वीस मिनीटं आहेत तरी कशाला ओरडताहेत? मला सगळे म्हटले " तू अजीबात तिकडे लक्ष देऊ नकोस. आपलं वेळेत आवरुन होणार आहे. अजीबात टेंशन नको घेऊ!" ११.३० ला दुसरी थाप! अखेर दरवाजा उघडावा लागला. नवर्‍यामुलाकडुन रिसेप्शनचा शालु आणि दागीने घेऊन माझी नऊवारीतली नणंद आली. खुप गोड दिसत होत्या त्या.

माझा एक मित्र आणि त्याची बायको तेवढ्यात भेटुन गेले. पार्लरवालीचं शेवटचं टचप चाललं होतं. तेवढ्यात फोटोग्राफर आला. "सुमेधा, एक दोन क्लिक्स करतो". सगळे नको म्हणु लागले.
मी म्हटलं," अरे आधीच ओरडताहेत,उशीर झालाय. नंतर काढ ना."
" अगं तुझे इंडिवीज्युअल हवेत. आताच छान दिसतेस. नंतर दमशील ना. नंतर पण काढतो. आता एक-दोन पोज दे ना. प्लीज..पटकन होईल" नाईलाज होता. त्याच्या छत्र्या वगरे धरलेला माणुस पटकन आत आला. १-२ म्हणता म्हणता ७-८ क्लीक्स झाले. ११.३५ झाले. आता मात्र भटजीबुवांची आरोळी ऐकु आली. " अहो चला आता!"

आई-डॅडी आणि सासुबाई तर आधीच आपापल्या खोल्यात जाऊन बसले. आपलं लग्न वैदिक पद्धतीनं होतंय याचं मला एका बाजुला समाधान वाटत होतं. पण दुसर्‍या बाजुला दिवस रात्र धावपळ करुन आपल्याच पोटच्या गोळ्याचा एवढा महत्वाचा सोहळा आपल्या डोळ्यांनी बघु न देणार्‍या ह्या रीतीची चीडही येत होती. पण काय करणार?
दोन मंगलाष्टके संपेपर्यंत मला स्टेजवर जाता येणार नव्हतं. मी करवल्या आणि इतर माणसांसोबत पहिल्या मजल्यावर हॉलच्या दारातच थांबले. माझ्या तोंडात पानाचा वीडा दिला गेला. लग्न होई पर्यंत तो तसाच तोंडात न चावता, रस न गिळता ठेवायचा होता. ह्या आवेषात पण फोटोग्राफरने मला सोडलं नाही. त्या फोटोत हनुमानासारखं गाल फुगलेले आले आहेत!

दोन मंगलाष्टके झाली. मामाने मला धरुन आत नेलं आणि बोहल्यावर उभं केलं. हार्ट पुन्हा "मी पण! मी पण" म्हणु लागलं. हातातली सुरी-सुपारी,अंतरपाटाच्या पलिकडे असणार्‍या नवर्‍या मुलाच्या हातातल्या कट्यारीला टेकली गेली. मंगलाष्कटे चालुच होती ती म्हणायला कोणी कोणी माईक हाती घेतलेला ही गंमत नंतर सी.डी पाहुन कळली.

मंगलाष्कटे संपली. नवर्‍याने मला हार घातला. त्याला मी घालणार तोच त्याला पाठुन कोणीतरी वर उचललं. मला पण कोणीतरी वर उचललं आणि हवेतच मी त्याला हार घातला. माझी नजर अजुनही खाली होती. फोटोग्राफरने आणि इतर सगळ्यांनी खुप चिडवलं.."वर बघ..त्याच्याकडे बघ" म्हणुन. पण नेहमी एवढी मनमोकळेपणाने नवर्‍याशी बोलणारी मी..त्यादिवशी नजर वर करायचं धाडसच झालं नाही.

नंतर ब्रह्मसूत,होम,सप्तपदी, कन्यादान आणि साडेतीन तास यथोत्चीत रिसेप्शन..सगळं व्यवस्थित झालं. पाठवणी करताना होणारं दु:ख आणि ताणलेलं वातावरण गाडीत बसल्यावर नवर्‍याला आलेल्या एका फोन कॉलने माझ्यपुरतं तरी सैल केलं. त्याला कुठल्याश्या मुलीचं स्थळ आलं होतं.."अ‍ॅक्च्युली माझं लग्न झालं आज!" ह्या त्याच्या वाक्यावर आमच्या कारमध्ये एकच हशा पिकला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंतर ब्रह्मसूत,होम,सप्तपदी, कन्यादान आणि साडेतीन तास यथोत्चीत रिसेप्शन..सगळं व्यवस्थित झालं. पाठवणी करताना होणारं दु:ख आणि ताणलेलं वातावरण गाडीत बसल्यावर नवर्‍याला आलेल्या एका फोन कॉलने माझ्यपुरतं तरी सैल केलं. त्याला कुठल्याश्या मुलीचं स्थळ आलं होतं.."अ‍ॅक्च्युली माझं लग्न झालं आज!" ह्या त्याच्या वाक्यावर आमच्या कारमध्ये एकच हशा पिकला.>>>>>>>>>>>>>>>>. हे मस्त....नशिब त्याला आला फोन..

लग्नसमारंभातील धावपळ, थोडासा गोंधळ, उत्सुकता इ. गोष्टींचं छान वर्णन केलंय.

"अ‍ॅक्च्युली माझं लग्न झालं आज!" .... हा ट्विस्ट तर मस्तच.

छान लिहिलयं ,
<<< आपलं लग्न वैदिक पद्धतीनं होतंय याचं मला एका बाजुला समाधान वाटत होतं. पण दुसर्‍या बाजुला दिवस रात्र धावपळ करुन आपल्याच पोटच्या गोळ्याचा एवढा महत्वाचा सोहळा आपल्या डोळ्यांनी बघु न देणार्‍या ह्या रीतीची चीडही येत होती. पण काय करणार?
दोन मंगलाष्टके संपेपर्यंत मला स्टेजवर जाता येणार नव्हतं. मी करवल्या आणि इतर माणसांसोबत पहिल्या मजल्यावर हॉलच्या दारातच थांबले.>>> हसु नका, पण हे काही कळलं नाही , कोणी समजाऊन सांगेल का ? मला खरच माहीत नाही.

श्री...काही महाराष्टीयन जातींमध्ये आई-वडीलांनी स्वतःच्या मुलाचं/मुलीचं लग्न म्हणजे..मंगलाष्टके पहायची नसतात अशी प्रथा आहे. तसंच पहिली दोन मंगालष्टके अंतरपटाच्या एका बाजुला फक्त नवर्‍या मुलाला उभं करुन म्हटली जातात. मग नवरी मुलगी अंतरपाटाच्या दुसर्‍या बाजुला जाऊन उभी राहते अशी प्रथा आहे Happy