प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - स्वप्ना_राज

Submitted by स्वप्ना_राज on 5 September, 2011 - 05:53

The professor turned back and started down the gray, gritty alley toward the water.

गुलाबजाम. ३. खव्याचे. टप्पोरे. खुसखुशीत.

gulabjamun.jpg

बिच्चारा Jeffery Deaver! त्याला जर कळलं की त्याच्या पुस्तकाच्या climaxच्या वेळेस professor Boling जगतोय का मरतोय अशी स्थिती असताना कोणा वाचकाला गुलाबजाम आठवलेत तर तो जीव देईल. त्याची चूक नाही, त्याच्या जागी मी असते तर मीही दिला असता. पण तूर्तास तो जीव त्या ३ गुलाबजामांत अडकला होता.

तसं रात्री नेहमीसारखं, खरं तर नेहमीपेक्षा जास्तच, जेवले होते मी. जेवणानंतर गुलाबजामांचं आगमन झालं तेव्हा सगळ्यांनी खूप आग्रह केला होता आणि मी एकही खायला साफ़ नकार दिला होता. त्याला कारणही तसंच झालं होतं. सकाळी नेहरू सायन्स सेन्टरमध्ये गेलो होतो. तिथे वरच्या मजल्यावर एक आदिमानवाच्या गुहेची प्रतिकृती आहे त्याच्या समोर एके ठिकाणी पुढे जायला थोडी चिंचोळी जागा आहे. त्यातून मी सहीसलामत गेले खरी पण त्याआधी भावाने ’अग, तिथून नको जाऊस. त्या आदिमानवाच्या बायकोचा साईज पाहिलास का? तुझ्या मानाने ती साईझ झिरो आहे. उगाच तिथे अडकशील आणि अग्निशामक दलाला पाचारण करून तुला सोडवावं लागेल’ अशी कॉमेन्ट करून दात काढले होते. ही मानहानी सहन न झाल्यामुळे मी तिथल्या तिथे वजन कमी होईतो काहीही गोड न खाण्याची (घोर!) शपथ घेतली होती. आता सकाळची शपथ रात्री मोडली असती तर माझ्या इज्जतीचा फ़ालुदा नसता झाला? आई ग फ़ालुदा! जाऊ देत. तात्पर्य काय तर, गुलाबजाम माझ्या पोटात न जाता प्लेटमधून फ़्रीजच्या पोटात गेले होते.

आणि आता रात्री पुस्तक वाचत बसले असताना पुन्हा आठवले होते. इंग्रजीत गोडाची आवड असणार्‍याला ’having a sweet tooth' का म्हणतात माहित नाही. माझ्यासारख्या लोकांचा एकच दात नाही तर सगळी बत्तिशी sweet असते. तीच बत्तिशी आता ’गुलाबजाम, गुलाबजाम’ असा पुकारा करत होती. मी डोळे मिटले आणि ऋजुता दिवेकरचं स्मरण केलं. म्हटलं, बाई ग, ह्या मोहातून बाहेर पडायची शक्ति दे. तुझं दुसरं पुस्तक आणून वाचेन. रात्री जेवताना एक चपाती आणि भाजी ह्याशिवाय दुसरं काहीही खाणार नाही. लेजचे वेफ़र्स समोर दिसले तर डोळे मिटून घेईन. सकाळी उठल्या उठल्या चहाचा वाफ़ाळता कप समोर दिसत असला तरी सफ़रचंद खाईन. शक्ति दे, ऋजुताआई, ह्या अजाण लेकराला शक्ति दे.

मी डोळे उघडले. आता शांत वाटत होतं. जय हो ऋजुताआई! पुन्हा पुस्तक वाचायला सुरुवात केली.

He wondered when he would see Kathryn again. Soon, he hoped.

गुलाबजाम. फ़्रीजमधल्या मधल्या शेल्फ़वर मटारची उसळ, काकडीची कोशिंबीर आणि सांबाराच्या भांड्यांच्या मागे ठेवलेत.

नको, नको ती आठवण. मी का गेले होते स्वयंपाकघरात आई गुलाबजाम फ़्रीजमध्ये ठेवत असताना? नाहीतर आवराआवरीची वेळ आली की मी लॅपटॉप उघडून बसते. तेव्हा नसते गेले तर गुलाबजाम नक्की कुठे ठेवलेत ते कळलं नसतं. आणि मग गच्च भरलेल्या फ़्रीजमध्ये ते शोधावे लागतील ह्या एकाच विचाराने ते खायची इच्छा आपसूक मेली असती. कोलंबसाने भले शोधली असेल अमेरिका पण सकाळच्या घाईच्या वेळी आमच्या फ़्रीजमधून नेमकी आलं-लसूण पेस्ट शोधून दाखवली तर तो नावाचा कोलंबस.

मन नको नको म्हणत असताना मागच्या आठ्वड्यात पॅन्टेलून्स मध्ये पाहिलेला टॉप आठवला. कित्ती छान डिझाईन होतं आणि रंग पण नेमका माझ्याकडे नसलेला. पण सगळा शेल्फ़ उसकून करून पाहिला तर नुस्ते small आणि XL साईजेस. medium पण नाही आणि large पण नाहीत. त्यातून त्या मागेमागे फ़िरणार्‍या अटेन्डन्टला मी आधीच मदत नकोय म्हणून टेचात सांगितलं होतं. आता तिला कुठल्या तोंडाने परत बोलवणार? पण नशीबाने ती आसपासच उभी राहून मी केलेली उलथापालथ शांतपणे पहात होती. पुढे येऊन तिने मला काही मदत पाहिजे का विचारलं. मी सांगितल्यावर आधी सगळा शेल्फ़ पाहिला आणि मग कुठेतरी गेली. परत आल्यावर medium आणि large साईजेस नसल्याचं शुभवर्तमान तिने माझ्या कानी घातलं. मग त्या ढिगातून एक XL काढला आणि मला एकवार न्याहाळलं. ’ये ट्राय करके देखिये मॅडम, फ़िट हो जायेगा’. XL आणि मला फ़िट्ट होणार काय? माझ्या तोंडाला रागाने फ़ेस आला असणारच बहुतेक कारण ती घाईघाईने म्हणाली ’मॅडम, वो क्या है ना के हर ब्रॆन्डका अपना अपना साईजका डेफ़िनेशन होता है." हे मात्र बरीक खरं हो. मला काहींचे medium बरोबर होतात तर काहींचे large. (कोणाचेच small मात्र होत नाहीत!). पण म्हणून XL? करते काय? रंग आणि डिजाईन भारी आवडले होते. मी निमूटपणे चेंजिंग रूमची वाट धरली. पण त्या XL मध्ये माझ्याबरोबर आणखी एक व्यक्ती मावली असती एव्हढी जागा उरत होती. मला आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या. बाहेर येऊन तो टॉप तिच्या हवाली करून ’लूज है बहोत’ असं विजयी मुद्रेने सांगितलं खरं पण ते ’फ़िट हो जायेगा’ डोक्यात फ़िट झालं होतं. ते काही नाही, पुढल्या वेळेला असं काही म्हणायची तिची हिंमत होता कामा नये एव्हढं वजन कमी करायचं म्हणजे करायचं.

नव्या निश्चयाने मी पुस्तक वाचायला घेतलं.

It was in fact the image of her green eyes that was prominently in his mind when the boy leapt from behind the Dumpster three feet away and got Bowing in a neck lock......

गुलाबजाम. पाकात चिंब भिजलेले. केशराच्या काड्या घातलेले.

देवा रे! आता उठण्यावाचून पर्याय नाही. फ़क्त अर्धा गुलाबजाम खाते म्हणजे खाल्ल्यासारखं पण होईल आणि तेव्हढ्या कॅलरीज पण जायच्या नाहीत पोटात. मग लगेच परत दात घासून टाकेन म्हणजे पुन्हा मोह होणार नाही. झोपायच्या आधी फ्लॉस केलं आणि दात घासले की एखादं युध्द जिंकल्याचा आनंद होतो. आईशपथ! पुन्हा पुन्हा कोण दात घासणार?

nightsnacking.jpg

स्वत:शीच खूश होत मी खोलीच्या बाहेर आले. दिवाणखाना तर पार झाला आता किचन असं म्हणेस्तोवर....

"काय ग, ह्या वेळेला काय करतेयस इथे?" हे वाक्य भावाशिवाय आणखी कोणाचं असूच शकत नाही.
"पाणी संपलंय, ते प्यायला आले होते" आयत्या वेळी हे सुचल्याबद्दल मी स्वत:ची पाठ थोपटली.
"कैच्या कै. गुलाबजाम खायला चालली होतीस ना?" भावाने संशयाने विचारलं. त्याच्या चेहेर्‍यावर प्रेम चोप्राचा खुनशीपणा, डोळ्यात गुलशन ग्रोव्हरची मक्कारी आणि आवाजात ’तिजोरीसे पैसा निकालने चली थी ना?’ टाईप्स जरब "कूटकूटके" भरली होती. त्यातल्या त्यात खर्जातला आवाज लावायचा त्याने त्याच्या परीने प्रयत्न केला होता. मी ह्याचं बारसं जेवलेय का हा माझं ते मला कळेना.

"तुला काय करायचंय? नसता चोंबडेपणा करू नको हा"
"हे बघा काय ते" एखाद्या भरगच्च सभेला उद्देशून भाषण करताना नेतेमंडळी करतात तसे हातवारे करत तो म्हणाला "ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं". तरी बरंय शाळेत असताना मराठीत नेहमी कमी मार्क्स पडायचे ह्या ठोंब्याला. आणि आता मध्यरात्री मला म्हणी ऐकवत होता शहाणा.
"माझं काय भलं? हे म्हणजे ’राजा देतो आणि कोठावळ्याचं पोट दुखतं’ तशातली गत झाली." मी पण म्हणी तोंडावर फ़ेकण्यात कमी नाहिये.
"दुखेलच तुझं पोट उद्या एव्हढ्या रात्री गुलाबजाम खाल्लेस तर."
"दुखू देत. तुझं तर नाही ना दुखणार? मग झालं तर"
"सकाळी कशाला सांगितलं होतंस मग टेचात की मी गोड खाणार नाही म्हणून?"
"अ‍ॅहे, मी काय बेलभांडारा उचलला होता का? एव्हढे दात काढायचा तुला पण हक्क नाहिये. आजपासून चॉकलेट बंद म्हणून सांगितलं होतंस त्याच दिवशी केव्हढं मोठं कॅडबरी फ़स्त केलं होतंस. मग मीच काय राजा हरिश्चंद्र लागून गेलेय काय?" मी तावातावाने ओरडले.
"राजा हरिश्चंद्राचा गुलाबजाम खाण्याशी काय संबंध?"
"मग तुझा आहे?"

"रात्रीचा एक वाजलाय रे. उद्या सकाळी भांडा की"
आम्ही वळून पाहिलं तेव्हा स्वयंपाकघरातून बाबा बाहेर येत होता.
"बाबा, तू एव्हढ्या रात्री स्वयंपाकघरात काय करत होता्स?" आता आम्हा दोघांच्या आवाजात संशय होता.
"पाणी संपलं, ते घ्यायला आलो होतो"
"तु्झं पण पाणी संपलं का? हिचं पण संपलं होतं" छद्मी हसण्यात भावाचा हात कोणी धरणार नाही. त्याने त्याचं पेटन्ट घ्यायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे.
बाबा आम्हा दोघांचं बारसं जे्वलेला. त्याने हातातली भरलेली बाटली दाखवली.

"आता तर मी गुलाबजाम खाणार म्हणजे खाणार. मग तू काय वाटेल ते म्हण. गेलास उडत!" मी भावाकडे बघत जाहिर केलं.
"तुझ्या वाटणीचे दोनच आहेत. तिसरा मी खाणार" त्यानेही रणशिंग फ़ुंकलं.
"हे काय चाललंय?" बाबाने ’निरागस’ प्रश्न विचारला.
"अरे, मगाशी जेवताना गुलाबजाम खा म्हटलं तर हिने नखरे केलेन. काय तर म्हणे वजन कमी होईपर्यंत गोड खाणार नाही. आणि आता रात्री बसून खाणार होती. रात्री गुलाबजाम खाल्ल्याने वजन कमी होतं वाटतं. मी पकडलं बरोबर तर आता माझ्यावर आवाज करतेय. ’चोर तो चोर आणि वर शिरजोर’". पुन्हा एक म्हण! ’चुगली करणे’ हा अंगभूत गुणधर्म असल्याखेरीज ’धाकटा भाऊ’ म्हणून देव जन्माला घालत नसावा.
"मला काय तुझी भीती आहे का?" ’तुझ्या बापाची भीती आहे का?’ असा शब्दप्रयोग आहे हे मला माहित आहे. पण आमचा ’बाप’ तिथे सदेह हजर असल्यामुळे ते शब्द मी गाळले, किंवा गिळले.

ह्यापुढचे सगळे संवाद देत नाही. तर आमची वरात स्वयंपाकघरात आली. दर एपिसोडच्या शेवटी फ़्रिज उघडून आतलं उरलंसुरलं खाणार्‍या Nigella Lawson बाईंना मनोमन वंदन करून मी फ़्रीज उघडला. मटारची उसळ, काकडीची कोशिंबीर, सांबाराची भांडी बाजूला सरकवली आणि....

बघते तो काय? हिंदी पिक्चरमध्ये मोक्याच्या क्षणी कपाट उघडल्यावर ’लाश गायब’ असते तशी गुलाबजामची अख्खीच्या अख्खी प्लेट आतल्या गुलाबजामांसकट गायब झाली होती.

"बाबा?" आम्ही बाबाकडे वळून पाहिलं.
"अरे काय? काहीही झालं की २ अक्षरी नाव बरं मिळालंय तुम्हाला - बा बा. मै गीतापे हाथ रखकर कसम खाता हू के मैने गुलाबजाम नही खाये"
"मराठी गुलाबजाम हिंदीत गेले की 'गुलाबजामुन' होतात". इति मी.
"ए गप ए, गेले कुठे गुलाबजाम? शोध, कुठेतरी मागे सरकावून ठेवले असतील आईने आणखी जागा करायला." भाऊ म्हणाला.

मग मधल्या शेल्फ़वर असलेल्या पुदिन्याच्या आणि चिंचेच्या चटणीच्या वाट्या, चिरलेली फ़रसबी, चिरलेली कांद्याची पात, त्यातच अंग चोरून बसलेला एक ’अकेला’ चिक्कू अश्या अनेक गोष्टी सरकावून झाल्या. पण गुलाबजाम गायबच.

"वरच्या शेल्फ़वर असेल बघ" भावाची पुन्हा सूचना.
"शहाणाच आहेस. दुधाचं पातेलं आहे तिथे. सांडलं ना तर आई जीव घेईल माझा." मी सपशेल माघार घेतली.
"बरं मग, खालच्या शेल्फ़वर बघ"
"सगळी कामं मीच का म्हणून करायची? तू काही केलंस तर झिजशील का? तूच शोध आता."
"एव्हढं शोधून कोहिनूर हिरासुध्दा मिळाला असता" असं काहीतरी पुटपुटत भाऊ पुढे सरसावला. त्याने दह्याचा डबा सरकावला एव्हढ्यात मागून आईचा आवाज आला.

"रात्री दीड वाजता कसली गोलमेज परिषद भरलीय इथे?"
"गुलाबजाम शोधत होतो, आय मीन, हे दोघं शोधत होते" बाबाला ऐनवेळी थाप सुचली नाही का थाप मारायचं सुचलं नाही हे तोच जाणे. तरी बरंय लग्नाला एव्हढी वर्षं झालीत.
"ते शोधत होते आणि तू काय त्यांच्यावर पहारा ठेवून बसला आहेस?"

"तू कशी काय इथे?" 'काट्याने काटा काढावा' तसं प्रश्नाला प्रश्नाने उत्तर देणं उत्तम हे मात्र बाबाला इतक्या वर्षांच्या वैवाहिक अनुभवानंतर चांगलंच माहित झालेलं दिसतंय.
"छोले भिजत घालायला विसरले होते. जाग आली तेव्हा लक्षात आलं. म्हणून आले. सगळा फ़्रीज उसकून ठेवलात ना? आता उद्या एक गोष्ट जागेवर नाही मिळायची मला सकाळी."
"गुलाबजाम तरी कुठे मिळाले आम्हाला जागेवर?" भाऊ पुटपुटला. हे पुटपुटणं ऐकायची खास सोय देवाने तमाम आयांच्या कानात केलेली असते. त्यामुळे आईला ते ऐकायला आलं.
"ठेवले होते तिथे शोधले असते तर मिळाले असते." एकाच वाक्यात माहिती, उपहास आणि उपदेश ह्यांचं बेमालूम मिश्रण फक्त आयाच करू शकतात.

"मधल्या शेल्फ़ावर ठेवले होतेस ना? मी बघितलं होतं मगाशी"
"तिथे ठेवले होते आधी. पण मग तिथे काहीतरी ठेवायचं होतं म्हणून खालच्या शेल्फ़ावर ठेवले ते. स्वयंपाकघरात थोडी मदत केली असतीस तर कळलं असतं. हे घ्या." म्हणून तिने खालच्या शेल्फ़वर मागे ठेवलेली प्लेट काढली.

"साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरात सुफ़ळ, संपूर्ण करायची" तर बाबाला एक, भावाला एक, मी आणि आई अर्धा अर्धा अशी गुलाबजामची वाटणी होऊन रात्री पावणेदोन वाजता आमची ’गुलाबजाम परिषद’ संपली. तेव्हा सर्व प्रतिनिधींच्या मुखकमलांवर कार्यपूर्तीचं समाधान झळकत होतं हे काय सांगायला हवं?

वि.सू. ही घटना पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यामुळे ही घटना, त्यातली माणसं वगैरेचं वास्तविक जीवनातल्या घटना, त्यातली माणसं वगैरेशी साम्य आढळल्यास तो (एक विलक्षण) योगायोग समजावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

आयला, मला अशी रात्रीअपरात्री उठून जेवायची सवय आहे. रात्री दीड किंवा अडीच वाजता मी टीव्हीसमोर बसून जेवतेय हे आमच्या घरातलं कायमचं दृश्य आहे. Happy

Happy मस्त !

छानच! Happy

सर्वांना मनापासून धन्यवाद Happy

>>असं कुणी रात्री गुलाबजाम खातं का ? आणि खाल्ल्यावर कबूल करतात का ?
मला खाता आले असते तर नक्की खाल्ले असते दिनेशदा Happy

मस्त Happy

Pages