वाटण लावून फ्लॉवरची भाजी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 September, 2011 - 05:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ह्या भाजीची पूर्वतयारी आधीच करून ठेवली तर ती फक्त ५ मिनिटांत होऊ शकते. परंतु जर मुळातून सुरूवात करायची असेल तर किमान अर्धा तास लागतो.

फ्लॉवर - पाव किलो
लोणी - १ चमचा
मीठ, मिरपूड, किसलेले आले - चवीनुसार

वाटणासाठी :

कांदा बारीक चिरून - अर्धी वाटी
दोन मध्यम आकारांच्या टोमॅटोंची उकडून केलेली प्यूरी
सुके खोबरे - किसून - १ वाटी (कांद्याच्या दुप्पट)
लाल तिखट - चवीनुसार

वरून पेरायला :

बारीक चिरलेली कोथिंबीर (हवी असल्यास)

क्रमवार पाककृती: 

कांदा व खोबरे वेगवेगळे परंतु कोरडेच भाजून घ्यावे. व्यवस्थित भाजले गेल्यावर गार करावे. टोमॅटोची प्यूरी काढून घ्यावी. मिक्सरमध्ये भाजलेला कांदा, खोबरे, टोमॅटो प्यूरी व चवीनुसार तिखट घालून मऊ वाटून घ्यावे. हे झाले वाटण तयार.

फ्लॉवरचे तुरे काढून तो किसलेल्या आल्यासोबत प्रेशर कुकरमध्ये उकडावा. दोन शिट्ट्या पुरतात. उकडलेला फ्लॉवर मीठ, मिरपूड चोळून ठेवावा.

पॅनमध्ये लोणी गरम करावे. त्यात तयार वाटण घालून झटझट परतावे. फार परतू नये. त्यात फ्लॉवरचे मीठ-मिरपूड चोळलेले तुरे घालून ते व्यवस्थित मिसळावेत. तुर्‍यांना वाटण व्यवस्थित लागले आहे असे दिसले की गॅस बंद करावा. हवी असल्यास वरून चिरलेली कोथिंबीर पेरावी.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी
अधिक टिपा: 

ही भाजी अंगासरशी, कोरडीच होते व चवीला सौम्य लागते.

** वाटणाचे घटक बदलून, परंतु ह्याच पध्दतीने वेगळ्या रंगाची/ चवीची भाजी करता येईल. फ्लॉवर ऐवजी बटाटाही वापरू शकता. फक्त तो उकडताना किसलेल्या आल्यासोबत उकडायची गरज नाही.

*** हिरवे वाटण करायचे झाल्यास त्यात कोथिंबीर, मिरच्या, आले, कढीपत्ता (हवा असल्यास) भाजलेल्या खोबर्‍यासह बारीक करता येईल. लाल वाटणात टोमॅटो प्यूरी, भाजलेला कांदा, भाजलेले खोबरे व लाल तिखट घालता येईल. दोन्ही वाटणे वेगवेगळी लोण्यावर परतून त्यात मीठ-मिरपूड चोळलेले फ्लॉवरचे उकडलेले तुरे / बटाट्याचे तुकडे घालता येतील. पानात वाढताना दोन्ही रंगांच्या भाज्या एकत्रित करता येतील.
तसेच कांदा न घालता देखील फक्त टोमॅटो प्यूरी, भाजलेले सुके खोबरे व तिखट घालून हे लाल वाटण बनविता येईल.

माहितीचा स्रोत: 
आई व किचनमधील प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकु, फ्लॉवरच्या कूकरमधे दोन शिट्या घेतल्या तर त्याला लगदा होईल की.

फ्लॉवर कूकरमधे (प्रेशर आल्यानंतर) अवघ्या पाच मिनिटात शिजतो.

मी फ्लॉवरची भाजी वाटण वगैरे लावून करत नाही, अख्खा फ्लॉवर करायचा झाला तर मात्र टोमॅटो-कांदा-काजू अशी ग्रेव्ही करून घेते.

हो का, नंदिनी.... मग आमच्याकडचा फ्लॉवर टण्णोजीराव होता म्हणायचं! Biggrin
त्याचे दांडे शिजायला वेळ लागतो जास्त. बाकी वरचे तुरे लवकर शिजतात.
बाकी आज ही 'काहीतरी वेगळं करायचा' मूड असल्याने अवतरलेली भाजी आहे!

धन्स दिनेशदा. (असे वाटण आई एरवी मटकीच्या उसळीला तेलात परतून वापरते.... आज म्हटलं ते भाजीला वापरून बघावं!)

अकु, मी प्रत्येक भाजी/कडधान्य कूकरलाच शिजवून घेते. त्यामुळे प्रत्येक भाजी शिजायचा स्टँडर्ड टाईम पाठ आहे मला Proud

फ्लॉवरचे दांडे शिजायला पण एवढा वेळ घ्यायला नको खरंतर. कारण मी जेव्हा अख्खा गड्डा शिजवून घेते तेव्हाही इतका वेळ लागत नाही.

दिनेशदा याबाबतीत जास्त माहिती देऊ शकतील. Happy