प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - कविता नवरे

Submitted by कविन on 1 September, 2011 - 05:18

धक्का मारणार्‍या पब्लीकला चुकवण्यासाठी बॅगेची ढाल करत, दुर्बुद्धी होऊन नेसलेल्या साडीमुळे होऊ घातलेलं लोटांगण टाळत, नी पावसाच्या मार्‍याने दशा झालेली छत्री सांभाळत आणि पुन्हा पुन्हा बॅगेतून बोंबलणार्‍या मोबाईलकडे दुर्लक्ष करत... प्लॅटफॉर्म वरच्या घड्याळाचा काटा १८.२३.५४ असा दाखवत असताना, मी पिटी उषागिरी दाखवत प्लॅटफॉर्म नंबर १ ते ७ चा पल्ला यशस्वीपणे पणे पार करत ६.२४ च्या कर्जत लोकल मधे पहिला दरवाजा गाठून हुश्श झाले.

मी येव्हढीSS कसरत करुन गाडी गाठली खरी, पण दरवाजा अडवून उभ्या असलेल्या कजाग बायका मेSल्याS... जळकट कुठच्या, एक जण प्रेमाचा हात पुढे करुन सॉरी सॉरी प्रेमाने जागा देऊ करुन "ये येऽ ह्या बाजूला उभी रहा" म्हणत साईड देईल तर शप्पथ! उग्गाच आपलं जर्रासा धक्का काय लागला माझा चढताना आणि छत्री काय इलुशी टोचली तर त्यावरुनच भांडायला निघाल्या माझ्याशी.

काय तर म्हणे "आँख फुट गया है क्या तेरा!"

"अरे गर्दी है तर धक्का लागणारच ना!. दारात उभं रहाणार आणि शहाणपणा शिकवणार दुसर्‍याला" म्हणत हम किसीसे कम नहीऽऽ कम नही.. बाणा जपत तिला म्हंटलं तोपर्यंत पुन्हा एकदा बॅगेतून फोन कुरकुरला.

पहिले त्या छत्री भोवती तिचा तो बंद आवळला. मग गर्दीला सरावत आणि साडी सावरत बॅगेत प्लॅस्टिक बॅग शोधायला हात घातला. त्या लाकुडतोड्याच्या गोष्टीसारखं आधी भाजीची पिशवी हाताला लागली, ती ठेवली तर लायब्ररीच्या पुस्तकाची पिशवी हातात आली. पुन्हा एकदा हाताने बॅगेत डुबकी मारली तेव्हा कुठे नेमकी हवी ती पिशवी हातात आली. तोपर्यंत मी दोन तीन वेळा धक्के खाऊन गोल गोल घुमले. पण एकदाची छत्री त्या हाताला लागलेल्या पिशवीत आणि मग पिशवी बॅगेत कोंबण्यात यशस्वी झाले.

तोपर्यंत फोनने ४ मिस्ड कॉल नोंदवलेले कळले. मग काय प्रायश्चित्त म्हणून मला माझा बंदा रुपया खर्च करुन फोन लावणं भाग होतं.

फोन लागल्या लागल्या पलिकडून "क्कॉऽऽय हे, चढलीस का नाही गाडीत? लवकर ये समोसे आणलेत, किचन मधे वाट बघतेय. आणि टिशर्ट...." पुढचं बोलणं फोनमधून भांडी पडल्यासारखा आवाज येत होता त्यात विरुन गेलं.

हज्जारदा सांगितलं तिला डॉल्फिनच्या नेटवर्कला असा मधेच भांडी पडल्याचा आवाज येतो, बदऽल बदऽल ते नेटवर्क पण ऐकेल तर ना! मी मनाशीच वैताग व्यक्त केला.

मी परत फोन लावायला गेले तर माझ्या डोकोमोच्या नेटवर्कने "हे राम" म्हंटलेलं. त्यावरुनच गाडीने मस्जीद पार केल्याचं मला कळलं. आता भायखळा येईपर्यंत नेटवर्क खो खो खेळत रहाणार हे ठरलेलच होतं.

त्यातल्या त्यात "ती" किचन मधेच आहे हे ऐकून खासा आनंद झालेला. म्हणजे फार कसरत न करता फक्त आतमधे जाऊन तिच्या पर्यंत पोहोचायचय तर...

हसूऽ नकाऽ किचन शब्दाला. "सारे समय केवल महिलाओंके लिये" असं लिहिलेल्या, गार्डच्या आधीच्या डब्याला तीन दरवाजे असतात. त्यातल्या पहिल्या आणि शेवटच्या दरवाजाच्या एका बाजूला असलेली छोटेखानी जागा म्हणजे ज्यात जास्तीत जास्त समोरच्या लांब लचक बाकड्यावर ८ जणी (माझ्यासारख्या सडपातळ बाया असतील तर आरामात ९ जणी) आणि आत शिरता शिरता दोन्ही हाताला असणार्‍या बाकड्यावर प्रत्येकी ४ जणी बसतात अशी जागा. (तीन आरामात आणि चवथी सीट म्हणजे काळापाण्याची सजा. हे ही वर लिहिल्या प्रमाणे माझ्यासारख्या सडपातळ.... आरामात ४ जणी असं वाचावं) तर अशा ह्या जागेला बायकांच्यात पडलेलं नाव आहे किचन. ते का पडलं? त्याची नोंद माझ्याकडे तरी नाही पण इथे पण मेली किचनपासून मुक्ती काय ती नाहीच. स्त्री मुक्तीवाल्यापण काही बोलत नाहीत ह्यावर. तो एक वेगळाच विषय आहे तर असो.. आता ट्रेनच्या डिक्शनरी मधलं किचन हे नीट समजलय असं मानून मी पुढे पाऊल टाकते.

टाकते म्हंटलं, पण पाऊल नुसतच वर उचललं. टाकू कुठे? त्या जागेवर एका बाईने तिची पाटी पसरुन ठेवलेय.

"ओ मावशीऽ... ओऽ ओऽऽ बाईऽऽ" मी तिच्या ढिम्मपणाने वैतागून माझा राग "मावशी ते बाई" ह्या बदलातून व्यक्त करायचा फालतू आणि निष्फळ प्रयत्न करत तिला हाक मारली. ती हु नाही की चु नाही, काडीने दात कोरत तशीच बसून.

इकडे पुन्हा रिंग टोनने मला धमकावलं तसं मी पुन्हा एकदा टिपेचा आवाज देत "ओऽऽऽ ओऽऽ ओऽऽ बाईऽऽ ही तुमची पाटी बाजूला घ्या, बाकिच्यांनी आत कसं जायचं? लगेजच्या डब्यात जायचं ना येव्हढी मोठ्ठी पाटी पसरुन बसायचं होतं तर." असं चक्क सुनावलं आणि तिने थोडी काचकूच करत का होईना पण माझं म्हणणं चक्क पैकी ऐकलं. मलाही धक्काच बसला माझा हा झाशीची राणी अवतार बघून. एरव्ही असं कोणीच ऐकत नाही कधी येव्हढ्या पटकन. म्हणजे एकतर मी ट्रेनमधलं मुरलेलं लोणचं झालेय नाहीतर ती तरी नवखी आहे. पण आत जाता जाता थोडुश्शी अडचण झाली. तिच्या पाटी बाजुला घेण्याच्या आणि माझ्या आत जाण्याच्या वेळेने थोऽडक्या करता एकमेकिंना छेडल्याने माझ्या साडीच्या फॉलचं टोक जऽरासं उसवलं. त्या जऽराश्या उसवलेल्या टोकावर माझाच मेलीचा पाय पडल्याने त्याने प्रताप दाखवत मला उजव्या हाताच्या चवथ्या सीटवालीवर आपटवलं. मग तिने ती कित्ती मुरलेय हे दाखवत माझ्यावर तोफ डागली. तिच्या कडे बघुनच मी "समजत नाही काय? गर्दी आहे, कोण काय मुद्दाम करतं काय?" ही सगळीच्या सगळी वाक्य पटकन गिळून टाकली आणि "सॉरी हऽ" असं नवखेपणाचा आव आणत पुट्पुटले.

येव्हढसं तर किचन त्यात आणि फोन लावून काय विचारायचं "कुठे बसल्येस म्हणून!" असं स्वत:शीच म्हणत मी "तिला" शोधायला सुरुवात केली. समोरची ८ आणि दोन्ही बाजुची प्रत्येकी ४ डोकी बघून झाली पण "तिचा" काही पत्ता लागला नाही. म्हंटलं "कायापालट झाला की काय इतक्यातल्या इतक्यात?"

नशीब तेव्हढ्यात "तिचाच" फोन खणाणला. बरोब्बर भायखळा जवळ आलय म्हणून फोनवा लागलाय तिला.

"अगं कुठे आहेस? समोसा पाऽर गाऽर झाला आता. किचन मधे ये म्हंटलं तर कुठे गायबलीस?"

"अगं मी किचन मधेच आहे? तू दिसत नाहीयेस पण" मी शोधक नजरेने इकडे तिकडे बघत म्हंटलं

"मी नीळा ड्रेस घातलाय बघ" इती "ती"

कप्पाळ इथे ४ टाळकी तरी होती निळ्या शेडस मधली. आणि त्यातली एकही "ती" नव्हती.

"अगं निळ्या ड्रेसवाल्या आहेत इथे पण त्यात तू नाहियेस. तू नक्की ६.२४ कर्जतलाच सीट पकडल्येस ना?" मी बेसिक मधेच लोचा नाही ना झाला हे चाचपत विचारलं.

"हो ग, कर्जतलाच आहे मी. किचन मधे. किचन लेफ़्ट टर्न रॉन्ग साईड सेकंड सीट" तिने तिच्या परीने मला व्यवस्थित दिशा समजावली.

फोन ठेवला आणि....आणि.... युरेका... होऽ होऽऽ युरेका मी मनातल्या मनात टिचकी वाजवत गिरकी घेत म्हंटलं. होS होS मनातल्या मनातच कारण इथे पाय ठेवायला नाही जागा. माझा पदर पुढे खोचायला म्हणून घेतला तर दुसरीचीच ओढणी हातात येते अशी अवस्था इथली. म्हणून टिचक्या... गिरक्या सगळं मनातल्या मनातच. आता युरेका काय? तर लोकहो मगाशी नाही का सांगितलं गार्डच्या आधीच्या सारे समय केवल महिलाओंके लीये वाल्या डब्याला तीन दरवाजे असतात. त्यातल्या पहिल्या आणि शेवटच्या दरवाजाच्या एका बाजूच्या छोटेखानी जागेला किचन म्हणतात. म्हणजेच किचन पण दोन असतात. आता जागा १ बी एच के अशी असताना एक किचन तर एक बेडरुम का नाही ते नका विचारु मला. दोन्ही किचनच असतात.

पण आता महा संकट कारण ही युरेका मोमेंट फार तापदायक प्रकार. आता मला पुन्हा एकदा चवथ्या सीट वाल्यांना धक्के देत, ओऽऽ बाईऽऽ वाल्या मावशींना पाटी हलवायला सांगून आणि "काय आत बाहेर खो खो खेळताय काय? पहिल्यांदाच आलायत का? एकदा काय ते ठरवा ना कुठे जायचं ते" हे असले सारे शेलके शेरे कानाआड करत पहिल्या किचन मधून बाहेर पडावं लागणार होतं. मग परत इकडे दादर साईड आणि तिकडे कुर्ला साईड ब्लॉक करुन ठेवलेल्या बायांना "मला जाऊद्याना पुढे..." च तुणतुण वाजवत मधला दरवाजा गाठावा लागणार होता.

पहिलं दिव्य पार पाडे पर्यंत दादर जवळ आलं.

आता घाई नाही केली तर "ती" ठाण्याला उतरे पर्यंत मी मधल्याच कंपार्टमेंट मधे रहाणार हे त्रिकाला बाधीत सत्य होतं.

त्यातून माझा सिक्स्थ सेन्स मला सांगत होताच "सावधान! वाट वैर्‍याची आहे..." आधी दारात "अंधी है क्या?" ऐकून "इजा" झाला मग चवथ्या सीट वालीच्या शिव्या झेलून "बीजा" झाला आता तीजा नक्की होणार.

होणार होणार काय! समोर चाल्लाच आहे तीजाचा फेरा. चवथ्या सीट वालीचं प्रेशर तिसर्‍या सीट वाली वर येतय. चवथी म्हणतेय बाकीच्या जागा सोडून बसल्यात... हे ह्यांचं नेहमीचच आहे चवथ्या सीटला गृपवाली असेल तर बरोबर जागा होते.

आता ह्या वाक्याने तिसर्‍या सीटवालीच्या जोडीने सेकंड आणि विंडोवाली पण युद्धात उतरल्यात.

कचाकचा शिव्या देऊन झाल्यात. सगळ्यांच्या लोकोत्तर घराण्याचा उद्धार करुन झालाय, काचेच्या बांगड्या फुटल्यात. नखाने ओरखाडायचं काम पार पाडलय. झिंज्या ओढल्या जाऊन सगळ्यांच्या झिपर्‍या सुटल्यात.

आजूबाजूच्या काही बाया ह्या बायांना आवरतायत, काही त्याची मजा लुटतायत. तर उरलेल्यांचं ह्याकडे लक्षच नाहीये. त्या त्यांच्या अंताक्षरीत गुंतल्यात आणि ह्या सगळ्यात मी साडी सावरत पलिकडच्या कीचन कडे निघालेय.

परिस्थिती आणिबाणीची असताना, समोर युद्ध धगधगत असताना शहाण्या बाईने त्यांना "एस्क्युज मी प्लीज" असं म्हणणं पण फुकट असतं हे असा प्रवास अनुभवलेली कोणीही सांगेल.

पण उपेग नाही. काहीतरी करायलाच हवं इथे फोन वर समस, मिस्ड कॉल जमा होतायत. समोसा केव्हाचाच गार झालाय. आता समोसा जाऊदे पण निदान ज्या कामासाठी तिला ह्या गाडीला यायचं कबूल केलं ते मायबोलीचे टिशर्ट ताब्यात घेण्यासाठी तरी तिथपर्यंत जायलाच हवं.

एकवेळ कठीणातला कठीण ट्रेक पण पुर्ण होईल आरामात पण हे दोन डबे पार करणं म्हणजे....

"अरे आत जा ना, काय मधे उभी राहील्येस. च्यायला कधी तरी येतात आणि कुठेही उभे रहातात लोकं?" इती एक दादरकरीण हिरकणी मला म्हणतेय.

"तुम्हाला जागा दिलेय ना जायला. मग बोलायचं काम नाही उगाचच. मला त्या किचनला जायचय म्हणुन उभी आहे. काही हौस नाहीये मलाही धक्के खायची" मी बाण परतवत आणि पुन्हा एकदा बॅगेची ढाल करत म्हंटलं खरं पण त्या कुर्ला घाटकोपरच्या गर्दीत अशी काही चेपून निघाले की क्या बताऊ..

तिकडे ती फोन करुन थकली. शेवटी उतरायच्या आधी भेटूयात असा तोडगा काढून फोन ठेवला.

आता मिशन ए किचन चा जोर लावायलाच लागणार.

"इथे कुठे जागा दिसतेय सरकायला?"
"ठाणा गेल्यावर जा"
"फेरीवाले आणि हे असे इथून तिथे खो खो खेळणारे लोकं, सगळ्यांवर बंदी घातली पाहिजे"

ही सगळी मुक्ताफळं एरव्ही मी उधळते पण आज माझ्यावर उधळून घेत घेत इंच इंच नव्हे सेंटी मिटर सेंटीमिटर लढवत मी गड सर करायला निघाले.

घाटकोपर जाईपर्यंत मी दुसर्‍या दरवाज्यातून तिसर्‍या दरवाजा पर्यंत पोहोचले.

किचन... लेफ़्ट टर्न.. रॉन्ग साईड सेकंड सीट... मी रोबो सारखी तिथपर्यंत पोहोचले तोपर्यंत माझ्या साडीच्या इस्त्रीचे पार बारा वाजले होते. समोसा खायची इच्छा अजिबात राहिली नव्हती. फक्त ते टिशर्ट ताब्यात घ्यायचे आणि पुन्हा ठाण्याची गर्दी झेलत डोंबिवलीसाठी डटके उभं रहायचं येव्हढच एक मिशन राहिलं होतं.

तिने तरिही समोश्यांची कागदी पिशवी हातात देत "क्कॉऽय हेऽ मला वाटलं किचन म्हंटल्यावर तू येशील बरोबर इथेच" असं म्हंटलं आणि पटकन पॅसेज मधून बाहेर पडत ठाण्याची साईड गाठली.

पण आता मझ्यात "अग बयेऽ दोन किचन असताऽऽत नाऽऽ!" असं म्हणत बचाव करावा इतकाही त्राण नव्हता.

मी फक्त "ती टि शर्टची पिशवी दे पटकन, म्हणजे मी ठाणा यायच्या आधी डोंबिवलीची साईड गाठते" असं म्हंटलं तिला.

"अगं अशी काय तू?" तिने मलाच प्रतिप्रश्न केला.

"अगंऽ आडो, सायो, आणि मंडळींचे टिशर्ट देत्येस ना माझ्याकडे? सायो आलेय इथे तर माझ्याकडून कलेक्ट करणार आहे ना ती?" मी माझा होमवर्क पुरेसा असल्याचा पुरावा देत म्हंटलं

"नाऽही. मगाशीच नाही का मी तुला फोनवर सांगितलं मी टिशर्ट आणले नाहीयेत आज म्हणुन?"

"तुझं डॉल्फीन खरच बदलून टाक. भांडी पडल्याच्या आवाजात कळलच नाही मला तू टिशर्ट बद्दल काय म्हणालीस ते" मी थोडसं चिडून, थोडसं रडकुंडीला येत म्हंटलं.

"तुझा डोकोमो बदल आधी. कधीच लागत नाही पटकन" तिने आता बॉल माझ्या कोर्टात टाकला.

"तुझी नगर ट्रिप कशी झाली?" मला असा प्रश्न करुन पुढच्यांना "ठाणा?" "ठाणा?" असा विचारत ती पुढच्या गर्दीशी एकरुप पण झाली.

फार पुर्वी मला गोव्याला जाताना ट्रेन मधे भेटलेल्या कॉफी विक्रेत्याची आठवण झाली. तो असाच "कॉफीऽ कॉफी? कॉऽफी" ह्या एकाच शब्दात समोरच्याला "ही कॉफी आहे, कॉफी देऊ? किती? " हे येव्हढं सगळं विचारायचा फक्त शब्दांचे हेल बदलून. तसच ट्रेन मधल्या बायका समोरच्या गर्दीला विचारतात "ठाणा?" म्हणजे "मी ठाण्याला उतरणारे, तुम्ही ठाण्याला उतरणार आहात का? सगळी लाईन ठाणावाली आहे का?" आणि हे सगळ्या स्टेशनांबाबत सेम असतं फक्त स्टेशनाचं नाव बदलतं इतकच.

"नगर ट्रिप ना? चांगली झाली. शनिवारी सकाळच्या एस्टीने गेलो नी रविवारी एस्टीनेच परत आलो" एका वाक्यात वृत्तांत संपला सुद्धा.

"ओके! ठीक मग उद्या भेटू. टिशर्ट घेऊन मी उद्या येते ह्या गाडीला." गर्दी पुढे ढकलत होती तरी मान मागे वळवून ती म्हणाली

मी "उद्या पुन्हाऽऽ? नहीऽऽऽऽऽऽऽऽऽ" असं म्हणावसं वाटून सुद्धा माबोके खातीर म्हंटलं "व्हय महाराजाऽऽ!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol भारीच एकदम डोळ्यापुढे आलं सगळं.
चवथ्या सीटला गृपवाली असेल तर बरोबर जागा होते.>> Lol
"ठाणा?" "ठाणा?" >> बद्दल अगदी अगदी Lol

मस्त Happy

Lol सगळंच अगदी अगदी. हे "ठाणा ..ठाणा" आणि पुढे गच्च धरलेली पर्स कॉमन असतं सगळ्याजणींचं. मागे पर्स राहिली तर तुटलीच समजा. बरं, 'ती' कोण ते कळ्ळं बरं का.

अरे बापरे, डब्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यन्त जाईस्तोवर ट्रेनने ठाणा गाठल होत? अवघड आहे. (म्हणूनच मला मुम्बै आवडत नाही अन तिकडच्या वाटेला गेलोही नाही) [बाकी लेडीज डब्यातील बहुतान्श बायका केवळ "कलकलाटच" करत अस्तात की काय? मला तर चक्क गाडीच्या खडखडाटातील त्यान्चा कलकलाट ऐकू येऊ लागला - बाकी मराठी अन नॉन्-मराठी स्त्रीया असा काही वागण्याबोलण्यातील भेद भाण्डणाच्या विषयात जाणवतो का कधी? ]

काही नाही हं लिंबू, मज्जा असते यात पण. बिकट परिस्थितीत कसा मार्ग काढायचा ह्याचं ट्रेनिंग स्कूल असतं ट्रेन पकडण्यापासून उतरण्यापर्यंत म्हणजे.

धन्स लोक्स Happy

काही नाही हं लिंबू, मज्जा असते यात पण. बिकट परिस्थितीत कसा मार्ग काढायचा ह्याचं ट्रेनिंग स्कूल असतं ट्रेन पकडण्यापासून उतरण्यापर्यंत म्हणजे>>>अश्वे Happy

नाही ग नी, विरार लोकल पेक्षा कर्जत वाले बरे. विरार लोकल मधे बोरिवली वाल्यांना आना मना है आणि चढलच कोणी तर उतरना मना करतात. त्यापेक्षा कर्जत कसारावाले बरे. त्या लोकल्सना चढून कुर्ला घाटकोपरला उतरणारे पण दिसतात. लोकं शिव्या देतात पण चढू उतरु देतात. फक्त जमलं पाहिजे उतरायला Proud

हा प्रवास काल्पनिक आहे ग. म्हणजे अशी गर्दी, भांडणं, राडे, शिव्या सगळं खरं आहे काल्पनिक नाही पण ते एकाच दिवशी एकाच्याच बाबतीत झालय असं नाही. आणि आता आम्ही दोघीही म्हणजे मी आणि ह्यात वर्णन केलेली "ती" अशा दोघीही ट्रेन मधलं मुरलेलं लोणचं झालोय. कोणत्या ट्रेनला काय वेडेपणा करायचा ते बरोबर माहितेय आम्हाला Proud

ह्म्म मी बोरीवली पलिकडची कधी पकडत नाही त्यामुळे विरारचा प्रकार माहित नाही.
पण एकदा सेन्ट्रल ने ठाणा ते डोंबिवली दरम्यान रविवार सकाळी महाप्रसाद मिळाला होता तेव्हापासून भितीच बसलीये Happy

१९९५ मधे मी एकदाच चर्चगेट ते बोरीवली प्रवास करु पाहिला होता, एकुण तिन वेळा ट्रेन बदलली गेली, एकदा १स्ट क्लासच्या डब्यात घुसलो म्हणून, एकदा घुसलो त्या डब्यात अचाट गर्दी होती म्हणून अन एकदा लोण्ढ्याबरोबर खाली ढकललो गेलो म्हणुन! Sad त्यानन्तर आजवर दोन्तिन वेळेसच लोकलचा संबन्ध आला पण निभावुन नेले कसेतरी!
(तसा १९९४ पर्यन्त इकडच्या लोकलचा प्रवास होतच होता. त्याचे एकेक किस्से आहेत. अन मी तर म्हणेन की मुम्बैपेक्षा अत्यन्त मोजक्या असलेल्या लोकल्स मधे तळेगाव नन्तर पुण्याकडे जाताना जी अचाट खच्चून भरलेली गर्दी अस्ते ती पहाता मुम्बै परवडली असे म्हणता येते, एक सुटली तर मागाहुन लगेच दुसरी तरी येते. इकडे एक सुटली तर पुढे दीडदोन तास रखडणे वा दूरवरील हायवे ला जाऊन बसची तजवीज करणे हेच दोन पर्याय.
बाकी प्रवास वर्णन अगदी चोख जमलय हां Happy

मेगाब्लॉक सुरु व्हायच्या आधी तर रोजच्या पेक्षा पण जास्ती गर्दी असते राव लोकलला...

पण वेस्टर्न पेक्षा सेंट्रल बरीच चांगली... सगळ्यात वाईट हार्बर... गोवंडी आणि चेंबूर... पार चेंबवून टाकतात..

प्रवास जबरीच झालाय...

Pages