रसग्रहण स्पर्धा - 'जनांसाठी जेनेटिक्स - वैद्यकीय अनुवंशशास्त्राची ओळख' - ले. डॉ. कौमुदी गोडबोले

Submitted by dhaaraa on 30 August, 2011 - 09:42

पुस्तकः जनांसाठी जेनेटिक्स - वैद्यकीय अनुवंशशास्त्राची ओळख
लेखिका: डॉ. कौमुदी गोडबोले
प्रकाशनः राजहंस प्रकाशन, पुणे.
पहिली आवृत्ती: ऑगस्ट २००८
किंमतः १२० रुपये
पृष्ठसंख्या: १२४

जेनेटिक्स किंवा उत्पत्तीशास्त्र/अनुवंशशास्त्राविषयी पहिल्यांदा कानावर आलं ते १०-१५ वर्षांपूर्वी डॉली नावाच्या मेंढीच्या क्लोनिंगच्या प्रयोगाच्या निमित्ताने! तेव्हा बराच चघळला गेला होता तो विषय. त्याआधी मला वाटतं, या विषयाची आपल्याकडे प्रसार माध्यमांतूनही एवढी सर्रास लेख, चर्चा वगैरे कधीच होत नसे. आम्हांला शाळेच्या 'शाप की वरदान' मधल्या निबंधासाठी पण हा विषय होताच.

खरं तर आपण सगळेच जेनेटिक्सशी निगडीत असतोच असतो. आपल्याकडे मुख्यत: लग्न ठरवताना हा विषय ऐरणीवर येतो. कधी घराण्यात कुणी मतिमंद/वेडं असणं, कुणाला कोड असणं, आमचं घराणंच किती महान, तर कधी निव्वळ 'आमची पुढची पिढी हुशार निघालीच पाहिजे, म्हणून आमच्या हुशार मुलाला नेहेमी पहिला नंबर असलेलीच मुलगी पाहिजे' असल्या कारणांनी 'जीन्स' किंवा शुद्ध मराठीत 'गुणसूत्रे', 'रंगसुत्रे' सारखे शब्द तोंडावर फेकले जातात. त्याशिवाय 'नात्यांतील लग्ने: चांगली की वाईट', हा पूर्वापार चालत आलेला कायमचा वादाचा मुद्दा आहेच. आताशा स्क्रिझोफेनिया, स्टेमसेल्स यांच्या निमित्तानेही चर्चा घडताना दिसतात. तरी अशा चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या फार कमी लोकांना या विषयाची - 'जेनेटिक्स'ची माहिती असते. कारण मुळात त्याविषयी ठोस अशी माहिती देणारं कुठलंच विश्वासार्ह साधन/माध्यम सामान्य माणसाच्या कक्षेत उपलब्ध नसतं. इथेच डॉ. कौमुदी गोडबोलेंचं 'जनांसाठी जेनेटिक्स - वैद्यकीय अनुवंशशास्त्राची ओळख' हे पुस्तक महत्वाचं ठरतं.

वरवर ओळखीचा वाटणारा पण खरं तर बराच अनोळखी असणारा हा विषय; तरी लेखिका मनोगतातच त्याला आत्मसात करण्यासाठी तिने केलेल्या प्रवासातून त्याबद्दलची ओढ निर्माण करते. 'अनुवंशशास्त्र' कितीही क्लिष्ट/अवघड वाटणारा शब्द असला तरी समजायला मात्र सोपाच आहे, असं वाटावं इतकी लेखिकेची शैली साधी आणि सरळ आहे. एकूण सात प्रकरणांत हे पुस्तक विभागलं आहे. पहिल्या अनुवंशशास्त्राच्या इतिहासाच्या प्रकरणातून 'ह्युमन जीनोम प्रोजेक्ट' आणि 'जेनेटिक इंजिनियरिंग' सारख्या महत्वाच्या संज्ञांशी आपला परिचय होतो, तर दुसऱ्या 'आनुवंशिकतेची ओळख' मधून या शास्त्राच्या आधारभूत घटकांचा आणि त्यांचा आपल्या शरीरातील अनन्यसाधारण दुव्याचा परिचय होतो. हे प्रकरण थोडे मोठे आहे, पण आकृत्यांच्या सहाय्याने समजण्यास अतीसुलभ होते. वाचताना तसं जाणवत नाही, पण इथूनच वाचकाच्या सगळ्या लहान-सहान समजुती किंवा शंकांचं निरसन लेखिकेने सुरू केलेलं असतं. माहिती देतानाच पडू शकणारे प्रश्न आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या उपप्रश्नांना ओळखून केलेली विषयाची मुद्देसूद मांडणी, मला खूपच आवडली. त्यामुळे एक तर वाचकाचा रस टिकून रहातोच, शिवाय आता सगळीच माहिती कळली आहे, तर मग पुढल्या प्रकरणांमध्ये नवीन काय असणार, याविषयी उत्सुकता वाढते.

तिसरे प्रकरण कोड, कर्करोग, स्क्रिझोफेनिया, डाउन सिंड्रोम यासारख्या आजारांवर आणि सध्या त्यांवर होऊ शकणाऱ्या उपचारांवर आहे. त्यात लेखिकेने स्वत:च्या पेशंट्सच्या अनुभवातून लिहिले असल्याने त्या आजारांची तीव्रता आणि महत्वाचे म्हणजे त्यांतली असाध्यताही समजते. वाचकाचे त्याविषयीचे (असले तर) गैरसमजही सहज गळून पडतात आणि त्याचबरोबर या प्रत्येक वेगळ्या आजारासोबत येणारे नैतिक/सामाजिक प्रश्न आपल्यासमोर येतात. चौथे प्रकरण या सर्व आजारांच्या 'चाचण्या आणि चाळण्या' यासंदर्भात आहेत. त्यांत सध्या उपलब्ध असलेल्या जवळ जवळ सर्व चाचण्यांची माहिती मिळते. जेनेटिक्सची समाजाला नुकतीच झालेली ओळख, प्रजोत्पादन शास्त्रातील जेनेटिक्सचं महत्व, स्टेमसेल्स / क्लोनिंग / जीन थेरपी अथवा जनुकोपचार म्हणजे काय, त्यात काय काय बदल होऊ शकतात, याची थोडक्यात ओळख लेखिका पाचव्या प्रकरणात करून देते. या सगळ्या बदलांचा परिणाम म्हणूनच की काय हे शास्त्र समाजासाठी कसे दुधारी शस्त्र बनू शकते, याची चुणूकही या प्रकरणात येते.

शेवटची २ प्रकरणं तर माझ्या मते 'सोने पे सुहागा' प्रकारात मोडतात. तसंही वैद्यकीय शास्त्रात चूक-बरोबर याची सीमारेषा आखणं किती अवघड असतं, हे आपण बऱ्याचदा अनुभवलेलं असतं. त्यात जेनेटिक्स संशोधनाच्याबाबतीत भारतात स्थिती सध्या तरी अगदीच बाल्यावस्थेत आहे, त्यामुळे त्याची बाजू 'माणुसकी'च्या दृष्टीने अजूनच बिकट होते. डॉक्टर आणि माणूस म्हणून त्याचा आढावा, ही प्रकरणे घेतात. सहाव्या 'जेनेटिक्स आणि नीतिशास्त्र' प्रकरणात लेखिका जेनेटिक्सचा नैतिक-कायदेशीर-सामाजिक अंगांवर उहापोह करते. त्यानिमित्ताने जेनेटिक तपासण्यांची गरज, आणि वापर-गैरवापर यावर प्रकाश पडतो. गर्भनिदान चाचण्या, दत्तकपूर्व जेनेटिक तपासण्या, जीवनविम्याशी निगडीत अडचणी, किंवा अगदी 'जेनेटिक्स आणि प्रसारमाध्यमे' यांचाही विचार करण्यास लेखिका वाचकास भाग पाडते. सातव्या 'जेनेटिक्स - निदान आणि समुपदेशन' या प्रकरणात खूप कधी तरी ऐकलेला 'जेनेटीसिस्ट' म्हणजे काय, त्याची विश्वासार्हता, त्याच्याकडे जातानाची अपेक्षा आणि गेल्यानंतर मिळणारं उत्तर/उपाय यावरची माहिती आहे.

ही झाली प्रकरणांतून पुस्तकाची ओळख, पण मला हे पुस्तक वाचण्याचे आणि या रसग्रहणासाठी निवडण्याचे महत्व वाटते ते त्याच्या उपयुक्तततेकडे बघून! काही पुस्तके नुसती माहितीपर असतात, तर काही प्रश्न/मुद्दा मांडून विचारात पाडणारी; हे पुस्तक नक्कीच या दोघांचा योग्य मिलाप आहे. व्यक्तिश: कुठलीही माहिती जोपर्यंत माझ्या कामाची नाही, तोपर्यंत मला त्यात रस येत नाही, अशा स्वभावाची वाचक मी आहे. 'या पुस्तकातून मला काय मिळालं?' हा प्रश्न मी नेहेमीच पुस्तक वाचून झाल्यावर स्वत:ला विचारते. या पुस्तकाने मला अनुवंशशास्त्राची ओळख तर करून दिलीच, पण 'माणूस' म्हणून माझ्या स्वत:कडून असलेल्या अपेक्षांची आणि जबाबदारीची जाणीव करून दिली. लेखिका परंपरेने कळत-नकळत तयार झालेल्या चुकीच्या कल्पनांना दूर सारून, आपल्या मनात नवीन प्रश्न तयार करते, आणि पुस्तक संपता संपता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपली आपल्याला मिळाली असतात.

पुस्तकाची 'साधी भाषा' हे एक ठळक वैशिष्ट्य आहे. मला वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र किंवा तत्सम जीवशास्त्रासंबधीत वगैरे शब्द जरी ऐकले तरी, इयत्ता आठवी ते दहावीतील ती वेगवेगळ्या वनस्पतींची, प्राण्यांची किंवा आजारांची यादी/माहिती परिक्षेत कशी फजिती करायची, याची कटू आठवण येतेच येते. त्यामुळेच ११वीत गेल्यावर जेव्हा त्या सगळ्या विषयांना मी राम-राम म्हटले तेव्हा जीव भांड्यात पडला होता. आजही कुठल्याही डॉक्टरकडे पाहिल्यावर मला या व्यक्तीने डॉक्टरकीचा अभ्यास केला असणार, या विचारानेच त्या माणसाविषयी आदर दाटून येतो. पण अशा माझ्यासारख्या अ-वैद्यकीय व्यक्तीलाही सहज कळेल, अशा शब्दांत लिहीणं, लेखिकेला जमलंय यातच सगळं आलं की. मला स्वत: समुपदेशनाचा थोडा फार अनुभव आहे. त्या आधारावर वाटते की लेखिका फार उत्तम समुपदेशक असाव्यात. कारण असला क्लिष्ट विषय असूनही त्यांनी या पुस्तकाला कुठेही रटाळ होऊ न देता अतिशय माहितीपूर्ण, तरीही छोटेखानी स्वरूपाचंच ठेवलं आहे - जे खरंच वाखाणण्याजोगं आहे.

सारांश: या पुस्तकामुळे जेनेटिक्सचं माणसाच्या जीवनातील स्थान कळालंच, शिवाय त्यानिमित्ताने माझीच याविषयी माझ्याच मनात तयार होत असलेल्या, किंवा जवळ-जवळ तयार झालेल्या मतांची तावून-सुलाखून उजळणी होवून डोक्यात फिट्ट बसलेली 'पक्की' मते तयार झाली, असं वाटलं. छान अनुभव होता. जमलं तर तुम्हीही नक्कीच घ्या. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख पुस्तकाची ओळ्ख करून दिलीत. शाळा / कॉलेज संपल्यावर या विषयाची ओळ्ख टीव्हीवरचे कार्यक्रम किंवा मासिक/ वर्तमान पत्रातले लेख यापुरतीच मर्यादित राहिलीय. त्यातूनही जीनोम प्रॉजेक्ट, क्लोनिंग , जेनेटिक एंजी हे सगळे अलिकडले विषय. अशांवर मराठीतून अन शास्त्रसुद्ध माहिती असलेलं पुस्तक आता मिळवून वाचलं पाहिजे.

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. Happy

खरंच 'मिळवून वाचलं पाहिजे' असं पुस्तक आहे. माझ्या वाचक मित्र-मैत्रिणींच्या या वर्षीच्या वाढदिवसांची भेट - हे पुस्तकच असणार आहे. Happy