सिद्धगड : दोघांची भ्रमणगाथा !

Submitted by Yo.Rocks on 29 August, 2011 - 17:25

मनात कितीही ठरवले तरी प्रत्यक्षात ते उतरणे बरेचदा कठीण होउन बसते.. सिद्धगडाबद्दलही तेच झाले.. पावसाळ्यात अनेक छोटे-मोठे धबधबे पोटाशी बारगळणारा हा गड यंदाच्या पावसात तरी सर करण्याचे ठरवले होते.. पण काही जमत नव्हते..शेवटी जायच्या आदल्यादिवशी ठरले एकदाचे.. मी आणि जो (गिरीश जोशी).. पण दुकट्याने ट्रेक करणे धोक्याचे त्यात हा जंगलाने वेढलेला गड असे ऐकून होतो सो पुन्हा संध्याकाळी हा ट्रेक रद्द करण्याचे मनात आले.. तीला सांगितले तर तीसुद्धा 'नाही जायचे' करू लागली.. म्हटले जाउदे नको करूया ट्रेक !! तोच पुन्हा जो चा फोन आला.. " यो, चल रे जाउ.. रिस्क न घेता जिथपर्यंत जमेल तितके जाउ. नि परत येऊ.. पण जाउया नक्की.. मजा करुन येऊ".. झाले.. तो एवढे बोलला नि म्हटले निघूया रात्रीच !

घरी सांगितले.. तीला सांगितले.. दोन्हीकडून राग:.. पण बरेच महिने म्हणावी तशी गड-भेट झाली नव्हती.. शिवाय ट्रेकलादेखिल मोठा ब्रेक मिळाला होता.. तेव्हा आता थांबणे अटळ होते.. !! तीने तर बोलणार नाही असे ब्लॅकमेलिंग चालू केले..नुकतेच आमचे जमलेय सो हे सहन करावे लागणारच.. Wink म्हटले ठिक्केय !! येउन बघतो काय बोलणार नाही ते.. ! पाठीवर सॅक घेउनच तिला बाय करायला गेलो ! Proud

नेहमीप्रमाणे करतो तसे नेटवरून ना सविस्तर माहिती काढली ना नकाशे घेतले.. फक्त रोहित एक मावळा ने लिहीलेल्या वृत्तांतामधील फोटो बघून ठेवले नि काही खुणा मनात करून ठेवल्या.. कसे जायचे याबद्दल थोडीफार माहिती वाचून घेतली, घाईगडबडीत चालू पडलो ! बोरिवलीहून कल्याण गाठायचे तर अडीच तीन तासाचा प्रवास.. मग घाई होणार नाहीतर काय..

तरीसुद्धा कल्याणला ठरल्यावेळेत रात्री ११ वाजता एसटी स्टँडवर पोहोचलो.. ऐनवेळी निघालो त्यामुळे पुढे मिळेल तिथे काहितरी खायला घेउ असा विचार करत दोघांनी पण आपल्याबरोबर काहीच घेतले नव्हते.. मुरबाडला जाण्यासाठी रात्री साडे अकराची शेवटची एसटी आहे असे कळताच आम्ही लगेच इथे- तिथे शोधाशोध करत शेवटी एक क्रिम बिस्कीटचा पुडा, चार सफरचंद नि एक ब्रेडचे पाकीट इतकाच खुराक मिळवला.. बाकीचा शोध पुढे मुरबाड एसटी स्टँडवर पोहोचल्यावर..!

सिद्धगडला जायचे तर.. कल्याण ते मुरबाड नि मुरबाड ते नारिवली(पायथ्याचे गाव) असा मार्ग आहे.. दुसराही मार्ग आहे जो बोरिघाटातून जातो.. संपूर्ण सिद्धगड धुंडाळायचा तर दोन दिवस हवेत.. पण आम्हाला जमेल तितके करायचे होते म्हणून रात्रीच निघालो.. कुठे थांबायचे-कसे जायचे असला कसलाही प्लॅन न आखता.. आतापर्यंत केलेल्या ट्रेक्सचा अनुभव पणाला लागणार असे एकूण चित्र दिसत होते !

कल्याणहून रात्री साडे अकरा वाजता एसटी सुटली (भाडे प्रत्येकी २४ रु.) नि बारा-सव्वाबारा च्या सुमारास मुरबाड स्टँडमध्ये दाखल झाली.. या प्रवासाताच नारिवली या अनोळखी गावात राहण्यापेक्षा मुरबाडलाच रात्र काढूया असा आम्ही विचार केला.. मुरबाडला पोहोचलो.. तिथून सुटणार्‍या शेवटच्या एसटी प्रस्थानासाठी तयार होत्या.. त्यातलीच एक एसटी नारिवली गावातून जाणार होती !! त्यातून जायचे की नाही जायचे असे करता करता तेथील एका उभ्या असलेल्या कंडक्टरलाच विचारून घेतले.. ! 'तिकडे भररात्री पावसात निवारा शोधत भटकण्यापेक्षा इथेच थांबा नि पहाटेच्या डायरेक्ट नारिवली या एसटीने(जे आम्हाला माहित नव्हते) निघा' असा मौलिक सल्ला त्याने दिला.. सो संभ्रमाच्या संकटातून बाहेर पडून आम्ही आधी केलेल्या विचारावरच शिक्का मारला.. नि पाठीवरच्या सॅक उतरवल्या..! Happy

पाचेक मिनीटांतच सगळ्या एसटी निघून गेल्या नि परिसरात शांततेचे कोर्ट सुरु झाले ! शांतताभंग करण्यासाठी स्टँडवरचे पंखेदेखिल फिरत नव्हते.. मात्र उपस्थित असलेले दोन तीन कुत्रे भूंकण्याचे काम चोख करत होते... त्या छोटया स्टँडमध्ये कोणतर फक्त आम्ही दोघेच प्रवासी, एक गर्दुल्ला, एक-दोन भिकारी नि दोन तीन कुत्रे ! अर्थातच आम्हाला दोघांना झोपून चालणार नव्हते.. आलटून पालटून झोपायचे ठरवले पण तिकडच्या मच्छरांच्या मनात आमची झोप उडवण्याचा प्लॅन शिजला होता.. शेवटी स्वतःच्याच अंगावर चापटया मारत डुलक्या काढल्या ..

पाच वाजता अगदी न राहवून उभा राहीलो.. 'मरुदे ती झोप'' म्हणत उठलो तर स्टँडबाहेरच गुरढोरांनी बसकण मारली होती.. स्टँड वगळता बाकी सगळीकडे काळोखच होता.. चहाची टपरी दिसेल या आशेने आम्ही दोघे बाहेर पडलो पण मुरबाड अजून अंधारातच होते.. सकाळच्या सात शिवाय इथे टपरी-स्टॉल्स उघडत नाही असे कळले..! म्हटले पुढे गावात खाण्यासाठी अजुन काही मिळाले नाही तर लागली बोंब ! सहा वाजत आले तश्या एसटी आपल्या डयुटीवर रुजू होउ लागल्या..सहाच्या टोल्याला आमची नारिवलीला जाणारी एसटी पण येउन उभी ठाकली..

नारिवलीला जाणारी ही पहीली एसटी (भाडे प्रत्येकी १७ रु.)जेमतेम पाच-सहा प्रवाशांना घेउन धडधडत वार्‍याच्या वेगाने सुसाट पळत होती..चौकशी केली असता प्रवास अंदाजे अर्ध्यातासाचा असल्याचे कळले.. बाहेर बघितले तर पावसाने प्रहारीचे आपले टिपटिप गायन सुरु केले होते.. त्या पावसाळी मंदधुंद प्रकाशात झाडांच्या आकृत्यांची रेलचेल अधिक ठळक दिसू लागली.. पहाटेच्या गारव्यात भातशेतीचे हिरवे किनारे खुलू लागले होते..
मनात आले एसटी कोकणात वळाली की काय.. पण काहि वेळेतच मच्छिंद्रगड व गोरखगड या सुळक्यांची जोडी ढगांच्या पल्ल्याड दिसली..नि आपला टप्पा जवळ आल्याचे लक्षात आले..

जवळपास अर्ध्या तासातच आम्हाला एसटीने नारिवलीच्या स्टॉपवर आणून सोडले.. पावसात उजाडायला हवे तसे मंद प्रकाशात उजाडले होते.. परिसर साखरझोपेतच होता.. इथेच बाजूला एक शाळा नि एक मंदीर आहे.. येथूनच पुढे रस्ता देहरी गावाकडे(गोरखगडासाठी) जातो.. पाउस शिवार पाडत होताच सो आम्ही लगेच एका बंद दुकानाच्या छपराचा आश्रय घेतला..बाजूलाच असलेल्या घरातील एक माणूस नुकताच डोळे चोळत बाहेर आला होता नि मी लगेच प्रश्ण केला.. "चहाची सोय होईल का ?" Proud ट्रेकमध्ये असा बेशरमपणा करावा लागतोच.. 'दोनच कप लागतील' असे सांगितल्यावर तो बघतो म्हणून घरात शिरला.. तोवर आम्ही ट्रेकची तयारी सुरु केली.. विंडचिटर्स, कॅमेरा सगळे नीट करुन ठेवले..
प्रचि १:

म्हटले चहा झालाच आहे तर नाश्त्याचे पण विचारु.. पण त्यांच्याकडे साहित्य नसल्याने आम्हाला चहावरच भागवावे लागले.. चहा पण नंतर फक्त एकच कप जास्त मिळाला नि मग एकाच कपात दो दोस्त चाय पिने लगे !

चहा आटपून आम्ही कूच केले.. गडाकडे जाणारी वाट पकडण्यासाठी त्या गावातील घराघरांच्या गल्लीतून जावे लागते... पाउस आपला नावाला पाणी शिंतोडण्याचे काम करत होता.. तर गावाच्या पलिकडे भव्यदिव्य डोंगररांग ढगांमध्ये गुंफलेली दिसत होती...
प्रचि २:

ह्यातील उजव्या बाजूचा जो डोंगर तो सिद्धगड असा अंदाज बांधला.. (मागे गोरखगडावरून पाहिले होते..)

चालताना गाव नुकतेच जागे होताना दिसले.. कोणी भेटले की आम्ही वाट विचारत होतो.. "कुठे सिद्धगड की गोरखगड.. दोघेच का..??' अशी आमची विचारपूस चालू होती.. "दोघेच का ?" हा प्रश्णावर विचारणार्‍यांचा जोर जास्त होता ! पण आम्ही निर्धास्त होतो.. इथून गोरखगड पण तसा जवळच..

प्रचि३: एक घर मच्छिंद्रगडाचे (डावीकडचा ) नि एक घर गोरखगडाचे(उजवीकडचा)

आम्ही जवळपास गावच्या एका टोकाला पोहोचलो.. तिथे तर एकाने 'दोघेच चाललात.. जाम जंगल आहे तिथं' असे सांगितले.. तेव्हा जो पुटपुटलाच..'च्यायला.. ह्या गावकर्‍याला ते जंगल जाम वाटतय.. म्हणजे आपल्यासाठी खूपच जाम असेल.." Lol गाव संपते तिथे एक पूल नि बाजुलाच स्मशानभूमी आहे.. इथूनच गडाकडे जाणारी मुख्य वाट सुरु होते..

वाट म्हणजे सुरेखच.. लाल मातीची.. दोन्ही बाजूने दाट झाडी.. नि त्या झाडीपलिकडे दुतर्फा असलेली भातशेती नि त्या शेतमळ्यांच्या कडेने खळखळाट करत जाणारे पाण्याचे ओढे.. पावसाचे दिवस तेव्हा अर्थातच ते पाणी या मुख्य वाटेवर आलेले.. इतके की पायातील बुट पुर्णपणे बुडतील... आहाहा.. ते थंडगार पाणी बुटातून आत शिरले नि आम्ही निसर्गाशी एकरुप होउ लागलो.. Happy

प्रचि ४:

ट्रेकची सुरवातच इतकी सुंदर होती सो उडी मारुन आनंद व्यक्त करणे मस्ट होते.. Proud

प्रचि ५:

(हुर्रे.. !!)

इथूनच मग वाहते पाणी व सभोवताली नटलेला निसर्ग यांच्यातर्फे सादर होत असलेल्या साग्रसंगीताचा आस्वाद घेत पुढे चालत राहीलो.. पदोपदी भोवतालचे दृश्य नजरेला थांबवत होते..

प्रचि ६ : अग्निशिखा, कळलावी, Flame Lily, Gloriosa इत्यादी नावे धारण केलेले हे एक सुंदर फुल !

पावसाचे झेपतील असे टपोरी थेंब नि त्यांना चमचमत्या मोती चे रुप पांघरणारी पाने तर दिसतच होती.. त्यातलेच एक..
प्रचि ७:

एकीकडे झाडीच्या दाटीत असे काही दिसत होते.. तर त्या झाडीपलिकडे भातशेतीचे हिरवाईने खुललेले मळे गावची आठवण करून देत होते..

प्रचि ८: हिरवे किनारे.. हिरव्या नदीचे... !

शेतापलिकडच्या जंगलात उभी असणारी डोंगररांग अजुनही ढगांमध्येच गुरफटलेली होती.. यातला सिद्धगड कुठलाही का असेना.. सारे भारी वाटत होते !! अंदाज होता उजवीकडचा सिद्धगड पण एकदा कोणाकडून शिक्कामोर्तब झाले की आम्ही सुटणार होतो.. ! अगदी सकाळची वेळ त्यामुळे कोणाचीच वाटेवर चाहूल नव्हती.. आवाज होता तो फक्त ओढयांचा खळखळाट नि पक्ष्यांचे गुंजनगान..

प्रचि ९: गारठलेल्या पक्ष्यांची जोडी.. Happy

तर वाटेच्या डावीकडे दूरवर मच्छिंद्रगड व गोरखगड हे दोन सुळके आणि खेटून उभा असलेला दमदम्या डोंगर हे सगळे मिळून ढगांशी तुंबळ युद्ध लढताना दिसत होते..

प्रचि १०: दमदम्या डोंगररांग !!

प्रचि ११: ढगांच्या धुक्यामध्ये धुरकट झालेले मच्छिंद्रगड (डावीकडचा) नि गोरखगड (उजवीकडचा).. !

आम्ही दोघेही सभोवतलाचा परिसर कॅमेर्‍यात टिपण्यात गुंग झालो होतो.. एकमेकांशी बोलणेही जास्त होत नव्हते.. त्यात 'जो' ने हल्लीच घेतलेला नविन कॅम.. मग तर काय ह्यांना एका फोटोसाठी पाच मिनीटे लागत होती.. नंतर भानावर आलो तेव्हा लक्षात आले की पुढे कायच्या काय पल्ला गाठायचाय.. त्यात ही वाट नक्की सिद्धगडावर जाते का हे सिद्ध व्हायचे होते.. Proud

आम्ही जसजशे पुढे जाउ लागलो तसतसा कानावर पाण्याचा मोठाला आवाज येऊ लागला..नि पावले आमची झपाझप पडू लागली... आतापर्यंत दोन तीनदा वाटेला फाटे फुटले होते.. परंतु मुख्य वाट आम्ही सोडली नव्हती...त्या वाटा पण पुन्हा याच वाटेला येउन मिळत होत्या.. सो आम्ही निश्चिंत होतो.. तसेपण आम्ही ठरवले होते.. 'जो होयेगा वो देखा जायेगा.. जिथपर्यंत जमेल तितके जायचे..नि परत यायचे..' कारण या रम्य वातावरणात मिळणारा आस्वाद खरच अनोखा असतो.. सारे काही आलबेल होते.. प्रॉब्लेम एकच होता.. मुळात मी नाश्ताप्रिय असल्याने पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता.. खायचे तर मग ऐनवेळेला पंचाईत होती.. 'जो' चे उलटे होते.. त्याला जेवणाची सोय झाली की टेंशन नाही म्हणे.. शेवटी भूकेला मारत पुढे वाटचाल करण्याचे ठरवले..

लवकरच वाटेत पुढे तो सिमेंटचा मोठा पूल लागला.. नि त्याखालून वाहणारे पाणी पुढे छोटया धबधब्याच्या रुपात पुढे एका खोल खडड्यात कानठळ्या बसवणारा आवाज करत कोसळत होते .. हा पूल म्हणजे तुम्ही योग्य वाटेवर असल्याची खूण जे मी वाचले होते.. मग इथे पुन्हा क्लिकींग सुरु झाले..

प्रचि १२: हाच तो पूल नि पलिकडे दिसणारी गोरखगड नि दमदम्याची डोंगररांग..

प्रचि १३: कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी..

प्रचि १४: जादू मेरी नजर... Wink Proud

या ओढयाच्या परिसरात फिरताना आमचे ट्रेकींग शुज सपासप घसरत होते.. तेव्हाच इकडच्या दगडांवरचा बुळबुळीतपणा खत्री आहे याची जाणीव झाली.. ओढयाला फारतर गुडघाभर पाणी असल्याने आम्ही पूलाचा वापर न करताच तो पार केला.. इथवर आम्हाला अजुन कोणीच वाटकरी वा गावकरी भेटले नव्हते.. पण आम्ही जिथे पोहोचू तो सिद्धगड असे म्हणत मार्गाक्रमण केले.. पुढे वाट जास्तच डावीकडे (गोरखडाच्या दिशेने) वळली तेव्हा किंचीतसे बुचकळ्यात पडलो.. पण दुरवर शेताडीमध्ये काम करताना एक मामा दिसले.. त्यांनाच विचारुन मग पुढे गेलो.. अर्थात वाट वळसा मारून आमच्या अंदाजपंचे दिशेला जात होती.. इथवर पावसाची अधुनमधून उघडझाप चालू होती.. पण नभ इतके भरुन आले होते की सूर्याला डोकवायला चान्सच नव्हता..

लवकरच पंधरा वीस मिनीटांत पाच सहा घरांची वाडी लागली.. हा परिसर म्हणजे सिद्धगड पाडा ! म्हणाल तर इथूनच खरा ट्रेक सुरु होतो.. इथेच मग गडाची वाट, दरवाजा, लागणारा वेळ इत्यादी चौकशी केली.. नि मग त्या पाडयाला मागे टाकत उजव्या बाजूने सुरु होणार्‍या चढणीला हात घातला.. पुन्हा निर्मनुष्य परिसर.. आताची वाट थोडी खडकाळ नि बर्‍यापैंकी चढणीची..नि सोबतीला पाण्याचा खळखळाट.. हो ! हा खळखळाट अगदी वर जाईपर्यंत साथ देणार होता.. वाटेत लागणारे छोटेमोठे धबधबे हेच तर या गडाचे पावसातील खास आकर्षण ..!

थोडे चढून आलो नि मग सिद्धगडाचे संपुर्ण दर्शन झाले.. अर्थात बालेकिल्ला (डोंगराच्या माथ्याकडील भाग) ढगांमध्येच लपलेला.. इथून वाट पुढच्या जंगलात शिरत होती..

प्रचि १५: हटके फोटोसाठी जो नि यो नेहमीचे फॉर्ममध्ये असतात.. त्यातले 'जो' चे एक उदाहरण..

प्रचि १६: याच वाटेत दिसलेले हे कोमल नि मोहक फूल.

काही अंतर चालून गेलो नि एकुलते एक घर वाटेत लागले.. बाजुला हिरवी भातशेती नि पाठीला भव्य डोंगररांग.. वाह काय जागा आहे.. पण रात्री हीच जागा किती भयाण असेल.. !

प्रचि १७: एकुलते घर

याच वाटेत दमदम्याची डोंगररांग डावीकडे राहते.. नि त्या रांगेच्या कडयावरून धबधब्यांच्या तीन चार पांढर्‍या रेघा उमटलेल्या दिसत होत्या.. त्यातलीच एक..

प्रचि १८:

आम्ही आतापर्यंत बराच पल्ला पार केला होता.. पण सिद्धगडाच्या डोंगराला अजून शिवता पण आले नव्हते.. इथूनच पुन्हा जंगलातील वाट सुरु होते.. आतापर्यंत अनेक पक्षी नजरेस पडले होते.. फुलपाखरांचे म्हणाल तर मोठया आकारातली Blue Mormon ची फुलपाखरे बहुसंख्येने इकडुन तिकडे बागडत होती.. नि हे सगळे बघत चालताना अचानक कोळ्याचे जाळे आमच्या तोंडाला अडकवत होते.. !! (खासकरून स्पायडरमॅन चा फॅन म्हणून मिरवणार्‍या 'जो' ला :D) वाटेत दिसणारे हे कोळी एकाच जातीचे रंगाचे दिसत होते..

प्रचि १९: स्मार्ट कोळी !!

प्रचि २० : उन्माळून वाटेत आडवे आलेले झाड जंगलात दिसतेच..

नि रान म्हटले तर 'सुंदर मी' म्हणणारी रानहळद दिसायलाच हवी..
प्रचि २१:

काही अंतरावरच पुन्हा एक धबधबारुपी मार्ग आडवा येतो.. पाउस तुरळक होता त्यामुळे अगदी मंजुळ संगीत चालू होते.. येताना इथेच डुबकी मारु म्हणत आम्ही पुढे गेलो.. !! वाटेत लागणार्‍या अश्याच झर्‍यांचे पाणी पीत खडकाळ वाट चढू लागलो.. इथे अधुनमधून भूक चाळवायला मोठमोठाले खेकडे दर्शन देत होते.. वाट अधिक चढणदार झाली.. वीसएक मिनीटांतच आम्हाला दरवाजा लागला.. आणि सिद्धगडावर प्रवेश !!

प्रचि २२:

ह्या गडाच्या इतिहासाबद्दल विशेष माहिती नाही.. पण नेटवर मिळालेल्या माहितीनुसार १६९० पर्यंत सिद्धगड स्वराज्यात होता.. जो १८१८ मध्ये ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.. या गडाला स्वातंत्र्यकाळात महत्त्व लाभले गेले ते विठ्ठल लक्ष्मण कोतवाल (भाई कोतवाल) आणि हिराजी गोमा पाटील या स्वातंत्र्यसेनांनीमुळे.. स्थानिक लोकांना हाताशी घेउन इंग्रजांना या प्रदेशातून हुसकावून लावले होते.. १९४३ पर्यंत इंग्रजांचे पुन्हा इथे येण्याचे धाडस झाले नाही.. पण याच दोघांना २ जाने.१९४३ रोजी इंग्रजांकडून गोळ्या घालून मारण्यात आले.. ही घटना जिथे घडली तिथे आज हुतात्मा चौक उभारण्यात आला आहे.. सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेल्या म्हासा गावापासून सुमारे ९ किमी अंतरावरती हे ठिकाण (सिद्धगडाच्या दक्षिणेला) आहे.. याच घटनेबद्दल प्रहार दैनिकात इथे माहिती देण्यात आली आहे..

सिद्धगडाच्या या दरवाजाच्या आधी एक वाट डावीकडे वळते.. जी साखरमाचीवर जाते.. तिथूनच भीमाशंकरला व्हाया दमदम्याचा डोंगर जाणारी वाट आहे असे म्हणतात.. आम्ही आधी वरतीच जायचे ठरवले.. या ठिकाणाहून साखरमाचीच्या दिशेला (दरवाज्यापर्यंत चढताना वाटेच्या डाव्या बाजूस)असलेला सिद्धगडलिंगीचा सुळका छान दिसत होता..

प्रचि २३:

इथवर पोहोचलो खरे पण आतापर्यंत दाबून ठेवलेली भूक मात्र अनावर झाली.. शेवटी त्या दरवाज्यातून आत शिरलो की काही अंतरावर एक वाट डावीकडे वळसा घालून पुन्हा मागे येते.. जिथे नुतनीकरण केलेले छान असे मंदीर आहे..

गाभार्‍यात एक सिंदूरलेपन केलेला मोठा पाषाण आहे (देवीचे असावे बहुतेक.. पण गाभार्‍याच्या दरवाज्यावरती 'गणपती बाप्पा मोरया' असे लिहिलेय.. तेव्हा नक्की कोणते ते जाणकरांनी सांगावे) तर एका बाजूस असेच सिंदुरलेपन केलेल्या चार पाषाणातील मुर्ती आहेत.. आम्ही दर्शन घेउन बाहेर शांतपणे पडून राहिलो.. नि आमचा जपुन ठेवलेला खुराक काढला.. अगदी सफरचंद सँडविच बनवून खाल्ले मग.. दुसरे काहीच नव्हते म्हणून दोन सफरचंद नि एक बिस्कीटचा पुडा रिसर्वमध्ये ठेवला.... बाकी परिसराचे वर्णन करायचे तर चोहोबाजूंनी वेढलेले दाट जंगल, गाभार्‍याभोवती बसण्यासाठी मस्तपैंकी बांधून काढलेला वर्‍हंडा, मंदीराच्या आजुबाजूस असलेले शिवलिंग, नंदी नि गणेशमुर्तीचे भग्नावशेष नि मंदीराच्या समोरच अगदी जवळ भासणारी दमदम्या डोंगर नि सिद्धगडामधली खिंड..

प्रचि२४: सिद्धगडावरचे मंदीर

सारे काही आम्ही दोघे त्या शांततामय परिसरात नजर खिळवून बघत होतो.. असा आस्वाद ग्रुपमध्ये ट्रेक केला तर मिळत नाही.. खरच सुख असते हे सारे अनुभवण्यात..

आमची क्षणभर विश्रांती चालू असतानाच समोरच एक ढगाचा भलामोठा कापूस कुठलाही आवाज न करता येउन उभा राहीला. नि एका क्षणात समोरच्या पहाडाला गिळंकृत करायला सुरवात केली..!

प्रचि २५ :

मघाशीच थांबलेला पाउस पुन्हा सुरु होणार असे लक्षण दिसताच आम्ही मंदीराचा निरोप घेतला नि पुन्हा मुळ वाटेवर येउन पुढे जाउ लागलो.. पाच दहा मिनिटांतच कुडाची कौलारु घरे दिसू लागली...इतक्या उंचीवर विसावलेली ही छोटी वस्ती म्हणजेच सिद्धगडवाडी ! जिथे भातशेती होते.. गुरे-कोंबडया आहेत.. एक आंगणेवाडीची शाळा आहे.. आणि इथे आधी ह्यात नसलेली वीजही आहे...!! खरच कमाल आहे..! आम्ही लगेच आधी खाण्याचा कुठे बंदोबस्त होतो का ते बघू लागलो.. तिथेच मग पाण्याचे हंडे भरुन नेणार्‍या एका ताईंना गुहेकडे जाणारी वाट विचारली.. !

याच वाडीला लागून खडा पहाड आहे.. जो सिद्धगडाचा वरचा ५०% भाग व्यापतो.. नि याच पहाडाच्या माथ्यावरती बालेकिल्ला आहे.. जो ढगांमध्येच रुतुन बसला होता.. साहाजिकच पावसात तिथे जाणे का धोक्याचे म्हणतात ते दिसत होते.... माथा बघण्यासाठी मान वरती करुन बघावी लागत होती..याच पहाडाच्या मध्यभागी एक गुहा आहे जिथे आधी एक कुणी बाबा राहत होता.. सो म्हटले बालेकिल्ला होइल असे दिसत नाही तर गुहा तरी बघून येउ.. ताईन वाट दाखवली नि आम्ही लगेच जेवणाची सोय होईल का असे विचारले.. विचारले कसले.. 'आम्हाला ताटात काहीही वाढा आम्ही निमुटपणे खाउ' असे सांगून मोकळे झालो.. तिने 'भाकरी नि पिठल देते करुन देते' असे म्हटले नि आमच्या जीवात जीव आला.. Happy

तिन जंगलातले एका आंब्याचे झाड दाखवत सांगितले.. 'इकडून सरळ वरती चढत जा.. पंधरा मिनीटांत पोहोचाल.. या जाउन.. तोपर्यंत धुण आटपून घेते'.. झाले. आमच्यात उत्साह संचारला नि आम्ही त्या पहाडाला हात घातला.. तत्पुर्वी त्या गुहेचा फोटो खालून झूम करुन घेतलाच..

प्रचि २६: दिसतेय का गुहा !

म्हटले वीस मिनीटांत गुहा गाठू नि मग झेपेबल तितका बालेकिल्ला पण करू.. या शक्तीचे, उत्साहाचे बळ आम्हाला नंतर जेवणाला भाकरी- पिठले हा मेनू ऐकूनच मिळाले होते.. Proud

आम्ही आंब्याच्या झाडाला मागे टाकलो नि थेट चढाई सुरु केली.. काटेरी झुडुपांतून मार्ग काढत मिळेल त्या वाटेने कूच करु लागलो.. पण जंगलच इतके वाढले होते की काहीच कळत नव्हते कुठून वर सरकायचे.. पुन्हा मागे येउन पुन्हा नव्याने शोध सुरु केला.. लवकरच लक्षात आले 'ये पंधरा मिनीटका खेल नही है..!'
भुसभुशीत मातीचा चढ, काटेरी झुडुपांचे ओरबडे तर दोन ठिकाणी किंचीतसा रॉकी पॅच असे अनेक अडथळे पार करत आम्ही वरती सरकलो.. आता खरी कसोटी चालू झाली.. जातोय ते बरोबर का हे सांगायला पण कोणाची जाग नव्हती.. आम्हा दोघांमध्ये 'जो' लिड करत होता.. जंगल कापत शक्य तितके वर जायचा प्रयत्न करत होता...तर दुसरीकडे मला 'आपण उगीच त्या गुहेपायी फसत चाललोय' अशी भिती वाटत होती.. जल्ला आता गुहा नाही पण भाकरी-पिठले डोळ्यासमोर दिसू लागले... Lol

आम्ही नाही म्हटले तरी बरेच अंतर चढून गेलो.. जे आम्हाला मागे वळून पाहिले तेव्हा कळाले.. ! गोरखगडापासून सुरु झालेली डोंगररांग मस्तच वाटत होती..तर पार करुन आलेले अडथळे उतरायचे तरी कसे हा प्रश्णही उभा राहिलाच..इथून पुढे वाट काही दिसेना.. वाटले ८०% काम फत्ते झालेय.. पण मी लगेच कॅम चालू केला नि खालून घेतलेला फोटो पाहीला... तेव्हा कळले जल्ला ५०% च सर केलेय.. दोघांचे एकमत झाले 'चला, केले धाडस पुरे.. खाली उतरुया. तसे पण गुहेत बघण्यासारखे काही नाही.. इथून बघितले तेच तिथूनपण दिसणार.. ' इति स्वतःची समजूत घालत आम्ही पुन्हा वाडीत आलो.. Proud Lol

वाडीपर्यंत येइपर्यंत दम लागला नव्हता जो ह्या गुहेच्या शोधात व्यर्थ गेला.. नंतर वाटू लागले कुणाला घेउन गेलो असतो तर बरे झाले असते... पण पुरुषमाणूस वा कोणी चिल्लर पार्टी भेटली नव्हती.. शेवटी तो विचार काढून टाकून आम्ही त्या ताईचे घर गाठले.. तिचा मुलगा (चेतन कोकाटे) तर आमच्या पाहुणचाराला लागला.. त्याचे आदरातिथ्य बोलणे-पाहुणचार बघून मला तोरणा-राजगड मार्गावर भेटलेल्या एका धनगर कुटूंबाची आठवण झाली.. फरक एवढाच की त्या धनगराची मुले शाळेत शिकत होती तर हा नुकताच बारावी झाला होता.. कॉलेज कुठे तर मुरबाड सोडून चक्क कर्जतला !!! ऐकून आम्ही दोघे चाट पडलो !! आम्ही बाहेरच बसून खातो म्हटले तर बाहेर पाउस येइल सांगत आग्रहाने आम्हाला त्या घरामध्येच घेतले..

एका पिवळ्या बल्बच्या लाइटमध्ये त्या कुडाच्या घराच्या लाल मातीमिश्रीत काठयांची भिंत उजाळली होती.. बाहेरुन वाटत नव्हते तितके घर नीटनेटके ठेवले होते.. चक्क एक रेडीओ होता.. नि रेंजवाला मोबाईल पण होता.. जल्ला तिथे आमचा मोबाईल मात्र नेटवर्क शोधत दमला होता.. पाचेक मिनीटातच आमचे जेवण समोर आले..

प्रचि २७: तांदळाची भाकरी नि पिठला.. मस्त मस्त

जेवता जेवता गप्पा मारल्या.. तेव्हा त्यांचे हाल नि तितकाच जिद्दीपणा कळला. हा परिसर पावसात म्हणे खूप धोक्याचे.. अगदी पहाडाला खेटून असल्याने कधी दरड कोसळेल याचा नेम नाही.. मागे २००५ साली एक मोठी दुर्घटना घडली होती.. भली मोठी दरड कोसळली होती..तेव्हा बरेच नुकसान झाले पण नशिबाने आंब्याची नि इतर झाडांमुळे ही वाडी त्यातल्या त्यात बचावली होती...आता सरकारने पुर्नवासन म्हणून खाली कुठेतरी 'ऐनाची वाडी'त जागा उपलब्ध करून दिलीय.. काही कुटूंबे स्थलांतरित झाली तर ह्यांच्यासारखे 'फक्त जागा दिली पण बांधणार कोण' म्हणत इथेच मृत्युची टांगती तलवार डोक्यावर ठेवून राहत आहेत..!! त्या दरडीची एक खूण त्यांनी घराच्या अंगणातच आलेला एक हत्तीच्या आकाराएवढा भलामोठा खडक दाखवला..! राशनसाठी खाली नारिवली गावात वा सिद्धगडावर बोरिघाटाने येणार्‍या मार्गाने जाउन म्हासा गावात जावे लागते.. तरीपण पाहुणचारात्/बोलण्यात इतकी मृदुलता..!

आम्ही चहा पण सांगितला होता.. दूध नव्हते तरीपण.. बाहेर अपेक्षेप्रमाणे पावसाने तूफान वर्षाव सुरू केला.. दहा फूटा पलिकडचे ढगांच्या धुक्यामुळे अदृश्य वाटू लागले.. हे बघत असतानाच कोरी चहा भरून पेला समोर आला..एकदम कडक..! अजुन काय हवे.. आम्हाला सगळे अनपेक्षित होते हे.. अगदी मोक्यचा क्षणी अन्न व क्षणभर का होईना निवारा या दोन गोष्टींची सोय झाली होती..

प्रचि २८: ढगांच्या काळोखात लखलखणारा (!!!) असा हा वीजेचा दिवा. !!.

प्रचि २९:

एव्हाना दुपारचे अडीच वाजून गेले होते.. पण वातावरण संध्याकाळ दाटून आल्यासारखे.. सायंकाळी पाचपर्यंत नारिवली गाठण्याचे लक्ष्य होते सो आवरते घेतले.. खरेतर हातात एक दिवस असता तर ह्यांच्याबरोबर एक रात्र घालवायला नक्कीच आवडले असते.. ते आमच्याकडून स्विकारत नव्हते पण पाच भाकर्‍या, दोन वाटी पिठले नि दोन कप चहा यांचे मिळून होणार्‍या पैशाच्या दुप्पट पैसे घ्यायलाच लावले नि निरोप घेतला.. आठवण म्हणून त्यांनी शेतातातली सात आठ लिंब दिली..त्यांचा मोबाईल नं. पण देउन ठेवला.. जेणेकरुन कोणाला जायचे झाल्यास ते सोय करतील...

त्या वाडीतून आम्ही आनंदाने बाहेर पडलो.. 'मनात कुठेही गुहा राहिली वा बालेकिल्ला हुकला अशी हुरहुर नव्हती..' !! उलट ' पुन्हा कधीतरी त्या बोरीघाटतून चढून येउ.. एक रात्र राहू नि बालेकिल्ला करू' असा निर्धार केला.. आम्ही भर पावसात पटापट उतरु लागलो..

त्या दरवाज्यातून बाहेर पडलो नि समोर माचीवर जाणार्‍या वाटेने गेलोच बघायला.. इथून ते मंदीर छानच दिसत होते..

प्रचि ३०:

तर माचीवर चांगलीच हिरवळ उमटली होती... इथेच काही भग्नावशेष दिसुन येतात..
प्रचि ३१:

नुकताच जोरदार पाउस पडून गेल्याने दरीत धबधब्यांचा आवाज दुमदुमत होता..आमच्याकडे इथे रमायला वेळ फार कमी होताच. तरी पण उडीबाबा मस्टच की... Proud

प्रचि ३२:माझी ट्रेकमार्क उडी ! Wink

(वरील फोटो 'जो' ने टिपलाय)

उडीबाबा आटपले नि आम्ही पटापट खाली उतरु लागलो.. खरे तर पडुन गेलेल्या पावसाने बोंब करुन ठेवली होती.. कधी पाय घसरेल नि बुड आपटेल ह्याचा नेम नव्हता..

प्रचि ३४:

पण आम्हाला घाई होती.. डुंबायचा कार्यक्रम जो बाकी होता.. Proud आम्हाला जिथे डुंबायचे होते तिथे येउन पोहोचलो तर धबधबा ज्याम खुषीत दिसत होता.. संगीत म्हणाला तर डिजेमिक्स म्युझिक चालू होते !! त्या जंगलात मग आम्ही दोघांनी त्या खळखळत्या पाण्यात दहा मिनीटे मस्तपैंकी लोळून घेतले..

प्रचि३३:

अंग गार करुन घेतले नि त्या जंगलयमय प्रदेशातून लेटस गो केले.. चार साडेचार वाजत होते पण अंधारले होते त्यामुळे आम्ही लवकर कलटी मारल्याबद्दल बरे झाले.. आता फोटोसेशन बंद होते त्यामुळे तासभरातच आम्ही डोंगर उतरला.. मागे पाहिले तर सकाळचेच रुप सिद्धगडाने धारण केले होते.. आम्ही त्या पुलाजवळ आलो तेव्हा नशिबाने पाण्याच्या पातळीत विशेष अशी वाढ झाली नव्हती.. पण यावेळी उगीच म्हणून पुलाचा वापर केला नि पुन्हा त्या पाणीमय वाटेत येउन दाखल झालो.. आता मात्र एखाद दुसरा गावकरी अधुनमधून भेटत होता.. पण आमचे काम आता फत्ते झाले होते..

आताचे वातावरण सकाळसारखेच पुर्वतत झाले होते.. पाउसही अगदीच तसाच शिंतोडे पाडत होता.. फरक एव्हढाच की आम्ही मनात काही न ठेवता गेलो होतो पण येताना मात्र मन भरभरून गेले होते...

लवकरच आम्ही गावात येउन वेळेत दाखल झालो.. कारण गोरखगडाहून एसटी यायची वेळ झाली होती.. तिकडेच स्टॉपवर एकाशी गप्पा मारताना कळले की त्या सिद्धगडपाड्याजवळच एक सुभेदार नावाचा मोठा धबधबा आहे..म्हटले जाउदे.. इतके भिजलो, फिरलो ते कमी नव्हते !! ते पण आम्ही फक्त दोघेच.. हाती फारशी माहिती नसताना वाटेत कुठेही भरकटलो नव्हतो.. सो एकंदर पुर्ण समाधान होते.. बाकी इथे कोणताही ट्रेकग्रुप न दिसल्याचे आश्चर्यच वाटले..( आम्हाला हेच पाहीजे होते सो बरे पण वाटले.. Wink ) नशिबाने गोरखगडाकडून येणारी एसटी चक्क एकाही ट्रेकरला न घेता आली.. ट्रेकरलोक संपावर तर नाही ना गेले असे वाटून गेले.. पण इथे गर्दी कोणाला हवीय.. धन्यवादच म्हणायला हवे..

एसटीत चढलो.. कंडक्टकरने टिंग टिंग केले.. धाडदिशी दरवाजा बंद झाला.. नि आपला खु़ळखूळा वाजवत एसटी मुरबाडच्या दिशेने सुसाट पळू लागली..!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय छान आणी ओघवतं लिखाण. कुठे ही कुठ्ला ही शब्द/वाक्य्/विचार रीपीट होत नाहीत म्हणून खूप इंटरेस्टिंग वाटतं वाचायला. " सो" हा मराठी शब्द पाहून गम्मत वाटली :).

कौलारू फोटो खूप आवडला. मागे डोंगर, मधेच ते झाड आणी कौला वरचे गवत. फारच सुंदर दिसतयं.

प्रचि १० फारच सुंदर.

गारठलेली पक्ष्यांची जोडी अगदी "QT petutie":)

भाकरी पिठ्ल्याचा फोटो अगदी मस्ट होता. किती अगत्यशील माणसं.

प्रचि १७ मधे जाऊन कधीतरी रहायला आवडेल.:) छान व्हेकेशन स्पॉट आहे.

<<<आमची क्षणभर विश्रांती चालू असतानाच समोरच एक ढगाचा भलामोठा कापूस कुठलाही आवाज न करता येउन उभा राहीला. नि एका क्षणात समोरच्या पहाडाला गिळंकृत करायला सुरवात केली..!>>> छानच वर्णन आणी साजेसा फोटो पण.

दोन्ही फुलांचे रंग पण सुंदर.

"ती" का नाही आली ट्रेक ला? Happy

मस्त वर्णन योग्या आणि सगळेच प्रचि अफलातुन Happy

'दोघांची भ्रमणगाथा' असं शीर्षक बघितल्यावर म्हटलं चला 'ती' पण आता सुरुची बनं सोडून तुझ्यासोबत गड पालथे घालायला निघाली की काय असं वाटलं. Proud

(नेहमीप्रमाणेच) अप्रतिम लिखाण आणि फोटो Happy

'दोघांची भ्रमणगाथा' असं शीर्षक बघितल्यावर म्हटलं चला 'ती' पण आता सुरुची बनं सोडून तुझ्यासोबत गड पालथे घालायला निघाली की काय असं वाटलं.>>>>>:फिदी:

लई भारी रे!! कुणीही ग्रुप भेटला नाही हे ब्येस्टच झाले!

बादवे, आत्ता मला कळलं माझ्या त्याच दिवशीच्या चोरवाटेने सरसगडाच्या ट्रेकवर मला "अरे चोरा" का म्हणालास ते! शेवटी चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक... Wink

बाकी इथे बसल्या बसल्या तुझ्याबरोबर ट्रेककरून आलो. आणि न सांगता गेल्याबद्दल पुढच्या ट्रेकला ("धाडस" दाखवून आलास तर :P) त्याची भरपाई केली जाईल! Happy

अफलातून ! त्रिवार सलाम !!
<< तीने तर बोलणार नाही असे ब्लॅकमेलिंग चालू केले.. >> ट्रेकमुळे जर ह्याचीही पर्वा न करण्याचं असलं डेअरींग येत असेल, तर आपण ट्रेकींग न केल्याचं जाम पस्तावणं भोगतोय आतां !! Wink

मस्तच वर्णन.......रॉक्स
सिध्दगडाचा बालेकिल्ला उन्हाळ्यात चढायलाही महामुष्कील, आणि तो पावसाळ्यात चढायचा नाद तुम्ही सोडलात हे फार बरे झाले.
धन्यवाद आम्हालाही सफर घडवून आणल्याबद्दल Happy
प्र.चि. ३ तर अप्रतिम

सही...
सिध्दगडा कडे जाताना मध्येच वाट गोरखगडाकडे जाते की काय अशी शंका येते खरी...

गुहेकडची उजवीकडची वाट वरती बालेकिल्ल्याकडे जाते... पावसाळ्यात घसरडे असले पाहीजे....वरती चढला असतात कसेही...पण उतरताना लागली असती....तसेही वरती जाऊन काही दिसले नसते..
वरून जर आकाश मोकळे असते तर काय काय दिसते हे खालच्या फोटोत कळेल..
https://picasaweb.google.com/111054447152362679829/TrekGorakhgadSiddhagad#

मस्त रे यो...
फोटु सुंदर ...आमच्या ट्रेकची आठवण झाली.
पावसाळ्यात तिथला निसर्ग खरच वेड लावणारा असतो.

'मनात कुठेही गुहा राहिली वा बालेकिल्ला हुकला अशी हुरहुर नव्हती..' !! उलट ' पुन्हा कधीतरी त्या बोरीघाटतून चढून येउ.. एक रात्र राहू नि बालेकिल्ला करू' असा निर्धार केला.. >> आमचसुद्धा अगदी असच झाल. नक्कीच परत जाऊया Happy

पुन्हा कधीतरी त्या बोरीघाटतून चढून येउ.. एक रात्र राहू नि बालेकिल्ला करू' >>> अधिक एक Happy

अश्याच भर पावसात GS सोबत गुहे पर्यंतचा सिद्धगड़ ट्रेक केला होता त्याची आठवण झाली.

नेहमीप्रमाणेच छान.
१६ नंबरवाली, भारंगी. त्या फुलांची भाजी करतात. कोवळ्या पानाम्चीही करतात. कडसर लागते पण पोटासाठी चांगली असते.

सही रे!
इन्द्रा,मला विसरलास काय?

गुहेत पोहे केले होते... आठव्तेय का?

तुफान पावसामुळी बालेकिल्ल्यावर चढाई केली नव्हती आपण!

यो,तुझ्यामुळे आणि फोटूंमुळे नीट आठवताहेत तेव्हाचे ट्रेक! धन्स!

जबराट...केवळ खल्लास...कसला भारी ट्रेक झालाय रे तुमचा....
च्यायला आणि एवढे डेरिंग....मानले तुला....:)

प्रचि आणि वर्णनाबद्दल तर काय बोलणार बाबा....
गुरू आहात...लाजबाव....
आता नेक्स्ट ट्रेक गोरख-सिद्धगडच...बास ठरलेच आता

मस्तच.....यो आणि जो नामक शोले ....पुन्हा एकदा आमच्या या जय आणि विरु या दोघांनीच रामगडाच्या....चुकलं....सिद्धगड नामक गब्बरला सर केलात....

अशा पावसाळी दिवसात सह्याद्रीतला ट्रेक म्हणजे काय मस्त मजा आहे ? फोटोतून सुद्धा तो ओला हिरवा वारा जाणवतोय. मजा केलेली दिसतेय. कधी कधी फार प्लॅनिंग नसताना काही योग जमून येतात, त्यातलाच दिसतोय हा ट्रेक

दिनेशदा.. खूप धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल.. मस्तच दिसत होते ते फूल..

इंद्रा,गिरीराज.. तुमचा वृत्तांत जेव्हा वाचला होता तेव्हापासूनच मनात होते जायचे कधीतरी..

बस क्या चँप.. Happy नि हो गोरख-सिद्धगड करच..

त्यातलाच दिसतोय हा ट्रेक >> अगदी.. Happy

गिरी कसा विसरेन तुम्हाला... ती मंदिरातील रात्र, ती भेळ, बंद गुहेच्या बाहेरील अरुंद जागेत आरतीने बनविलेले गरमागरम कांदेपोहे, ती पावसाची रिपरिप आणि सगळ्यात कळस म्हंजे माची वरिल मंदिरात उकळणार्‍या तांबड्या रस्साचा सुगंध... अगदीच अविस्मरणिय!!!

तेव्हापासूनच मनात होते जायचे >>> यो... आम्हालाही पावसामुळे बाले किल्ल्यात जाता आले नव्हते... इथे बहुतेकांचा बालेकिल्ला करायचा राहुनच गेलाय... आशुचँप नोव्हेंबर नंतरचा मुहुर्त ठरवं... काय गिरी येणार का परत?

या अशा पावसाळ्यात हे "सिद्धगड", गोरक्षगड चढून जाणरी तुम्ही सर्व मंडळी "अडबंगनाथ" (अर्वाच्य किंवा काहीच्या काही) संप्रदायीच आहात की..
फारच ओघवतं वर्णन - सुंदर / अप्रतिम / सुरेख शब्दही अपुरे पडतील असे फोटो....
दिवस सार्थकी......सो.

!!!
(शब्द संपले)
धन्यवाद शेअर केल्याबद्दल. इथे मी पुढच्या सात जन्मातही जाऊ शकणार नाही, त्यामुळे तुझ्या वर्णनावरच भूक भागवेन Happy

एकदम टोपीफेक रापचिक ट्रेक्+वर्णन+फोटोझ.. आम्हीही जवळपास ११ वर्षांपूर्वी हा ट्रेक दोघांनीच केलेला आहे. सुरुवात सगळी तुमच्याप्रमाणे. फक्त आम्ही शेवटची बस पकडली व स्टँडावरच ओळख झालेल्या एका मुलाकडे उचले गांवात मुक्काम ठोकला. पहाटे उठून सिद्धगड व नंतर गोरखगड एक्का दिवसात पुर्णपणे हाणून दुसर्‍या सकाळी नासिकला परत. ..
पण आम्ही जिथे पोहोचू तो सिद्धगड.. Happy
सिद्धाचा माथा गाठायलाच हवा असा आहे. वाटेतल्या गुहेतील पाणी चवदार आहे. या ट्रेकनंतर ३ महिन्यांत लगेच आम्ही अहुपे घाट- कोंढवळ- भीमाशंकर हा एक मस्त पावसाळी ट्रेक केला होता.

ट्रेकचा वृत्तांत आणि त्याचे फोटो हा आता तुझा हातखंडा झालाय. त्या हातखंड्याला जागणाराच अप्रतिम लेख.
तुझ्या आणि जो च्या जिगरबाजीला सलाम.

Pages