अता सावळे सांग व्हावे कुठे

Submitted by छाया देसाई on 29 August, 2011 - 05:04

तुला साठवीते तुला आठवीते रित्या या मनाला भरावे कुठे
नको छीद्र आता कुठेही मनाला हरी अमृता साठवावे कुठे

करी चिंब ओली तुझी आर्त भक्ती असा वाहतो हा अनंता झरा
तुझ्या भिजवण्याच्या अशा द्वाड छंदात मी कोरड्याने रहावे कुठे

हरी सप्तरंगी अशा वासनांच्या जडत्वातली ही पिसे कौतुके
तुझ्यावीण घ्यावी कुणी ही शिरी हे असे भारमुक्ता जगावे कुठे

जरी मी न राधा ,जरी मी न मीरा तरी तूच तू सर्वकाही कळे
तुझा हा पसारा ,मनाचा पिसारा कसा सांग तू आवरावे कुठे

तुझे तेज भारी निरोधी न रोधी कशी सांग होउ मी छाया तुझी
प्रकाशात या नाहताना सुखाने अता सावळे सांग व्हावे कुठे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान गजल. आवडली. "कशी सांग होउ मी छाया तुझी" येथे वृत्तभंग झालाय असे वाटते. तीन दीर्घ मात्रा एकापाठोपाठ आल्या आहेत. विचार व्हावा.

तुझे तेज भारी निरोधी न रोधी कशी सांग होउ मी छाया तुझी
प्रकाशात या नाहताना सुखाने अता सावळे सांग व्हावे कुठे

लई भारी मक्ता.
आवडली गझल. Happy