जगावेगळे मागणे मागतो मी..

Submitted by निवडुंग on 25 August, 2011 - 06:34

समांतर जिणे सांधण्या पाहतो मी,
जगावेगळे मागणे मागतो मी.

बरसता तुफानी सरी श्रावणाच्या,
फुले दोन, केशी तुझ्या, माळतो मी.

निरोपास आतच अडे पापण्यांच्या,
तुझी आसवे दोन, सांभाळतो मी.

धुसर होत जाता खुणा भाळण्याच्या,
गुरफटून अंधार कवटाळतो मी.

तुझ्या अंगणी पारिजाता पखरण्या,
धुमारे तटी आज जोपासतो मी.

उणे अधिक की अधिक होते उणे, हेच,
गणित रोज सोडायला टाळतो मी.

अताशा पडूनी किती पीळ जीवा,
सुतासारखा का सरळ वागतो मी?

खुणा सोबतीच्या हरवल्या कधीच्या,
पुरावे निरर्थकच धुंडाळतो मी..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझ्या अंगणी पारिजाता पखरण्या,
धुमारे तटी आज जोपासतो मी.........व्वा !!

अताशा पडूनी किती पीळ जीवा,
सुतासारखा का सरळ वागतो मी?..हा सुद्धा आवडला.

उणे अधिक की अधिक होते उणे, हेच,
गणित रोज सोडायला टाळतो मी..............ह्या शेरात वृत्तभंग झाला आहे.

हर्षे, Happy
उदयवन,
खूप आभार.

डॉक,
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद! Happy
"उणे अधिक की अधिक होते उणे, हेच,"
या ओळीबद्दल म्हणत असाल, तर शेवट "गा" असेल तर "गाल" ची सूट घेतली जावू शकते म्हणून तसं लिहिलंय. नुसतं "गा" लिहायला जमत नव्हतं.
अर्थात मी अजून शिकतोच आहे, त्यामुळे काही चूक असेल तर मार्गदर्शन करावे. Happy

शेवट "गा" असेल तर "गाल" ची सूट घेतली जावू शकते >>>

असं कोणी म्हटलंय??? प्रामाणिक शंका आहे. गैरसमज नसावा.

मुटेसाहेब,
खूप धन्यवाद.. आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय! Happy

आनंदयात्री,
बेफिकीर यांच्या गझलतंत्र लेखातच या सुटीबद्दल लिहिलं आहे - तांत्रिक सुटी या विभागात -

२. ओळीचे शेवटचे अक्षर जर वृत्ताप्रमाणे गुरू असेल व कवीला असा एखादा शब्द योजायचा असेल ज्यात त्या गुरू अक्षरानंतरही एक लघू अक्षर येते, ते लघू अक्षर तो वृत्तात बसत नसतानाही काही ठिकाणी घेऊ शकतो. मात्र, अशा सुटी प्रचंड प्रमाणात वापरणे हास्यास्पद असून त्यांचा वापर अपरिहार्य असल्याचे निदान प्रकाशित गजलेतून तरी दिसलेच पाहिजे.

म्हणून "हेच" असं लिहिलं, अर्थात दुसरा शब्द मला सुचत नव्हता तेव्हा हे ही खरं.. Happy

तुझ्या अंगणी पारिजाता पखरण्या,
धुमारे तटी आज जोपासतो मी.... वाह वाह!

खुणा सोबतीच्या हरवल्या कधीच्या,
पुरावे निरर्थकच धुंडाळतो मी..>. हा ही बढिय्या..

मतलाही आवडली, निवडुंग Happy

गझल ठीकठाक वाटली.

'बेफिकीर यांचे गझलतंत्र'>> Proud

नेहा, गझलतंत्र माझे नव्हे. मी ते फक्त सुलभ करून दिले आहे. Happy

मुखपृष्ठावर तो धागा आहे खाली, मला आत्ता नंबर आठवत नाही आहे. बघा एकदा वाचून, कसा वाटतो ते! Happy

निवडुंग - खयाल प्रॉमिसिंग वाटले. Happy

-'बेफिकीर'!