प्रकाश भालेराव

Submitted by storvi on 22 March, 2007 - 15:42

'प्रकाश भालेराव' हे नाव आता सर्वांना परिचयाचे झाले आहे. 'मराठी माणसाला व्यवसायाचे गणित जमत नाही' ही समजूत खोटी करुन दाखवत 'एक यशस्वी उद्योजक' म्हणून त्यांनी नाव कमावले.

ते मूळचे इन्दोरचे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तिथेच झाल्यावर १९७२ मध्ये ते US ला आले आणि आपली कारकीर्द सुरु केली. DEC मध्ये त्यांनी पंधरा वर्षे नोकरी केली, व आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर ते DEC च्या semiconductor branch चे General Manager झाले.

prakash_bhalerao.jpg
गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक companies सुरु केल्या Amber networks, Ishoni Networks, Alopa Networks, Optim Networks, ECTone या त्यापैकी काही. त्यांची angel investment carreer ची कारकीर्द Ambit Inc. पासून सुरु झाली. आता ते Verismo Networks नावाच्या IPTV Tecchnology based company चे CEO आहेत.

एक उद्योजक म्हणून त्यांची कारकीर्द, अनुभव, दृष्टीकोन याबद्दल जाणून घेण्यासाठी तसंच एक कला-रसिक आणि व्यासंगी म्हणूनही त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली.

मायबोलीच्या यशस्वी अशा 'संवाद' या उपक्रमाच्या दुसर्‍या वर्षाची सुरुवात म्हणून ही मुलाखत प्रसिद्ध करताना विशेष आनंद होत आहे.

शिल्पा : तुमच्या बद्दल रिसर्च करताना लक्षात आले की MBA झाल्यापासूनची बरीच माहीती उपलब्ध आहे...

भालेराव : इन्टरनेटची कृपा! कधी कधी मलाही आश्चर्य वाटतं केवढी माहिती उपलब्ध आहे याचं. एकदा एक रिपोर्टर सांगत होता मी एका आर्टिकल मध्ये काही म्हटल्याचं. पण मला काही आठवेना. तेव्हा त्याने मला इन्टरनेट वर दाखवले. Internet is Chitragupta!

शिल्पा : Internet वर तुमच्या बद्दल बरीच आर्टिकल्स आहेत. मी एका आर्टिकल मध्ये वाचलं की IIT चे माजी विद्यर्थी नस्ताना देखील तुम्ही IIT alumni gathering मध्ये पहुणे म्हणून होतात, हे कसं काय घडलं?

भालेराव : त्याची इन्टरेस्टिन्ग गोष्ट आहे. सिलिकॉन व्हलीमध्ये 'बबल' सुरु होण्यापूर्वी, १९९० ला माझे हायटेक इन्डस्ट्री मधले करीअर बे एरियामधे सुरु झाले. १९९० पासून जवळजवळ १५ वर्षं. मी Ambit Design नावाची कंपनी टेकओव्हर केली. सुरवातीला तिथे सुमारे १४० इन्व्हेस्टर्स होते. फाउंडर वर कोणाचा भरवसा नव्हता त्यामुळे सगळे २५,०००-३०,००० चे चेक द्यायचे. पण कोणी मोठी रक्कम दिली नाही. कन्वल रेखी हे त्यापैकीच एक इन्व्हेस्टर होते. त्यांनी सुमारे १००,००० दिले होते. VCs नी फाउंडर ला काढले आणि मला घेतले. मी टेकओव्हर केल्यानंतर ती कंपनी Cadence ला विकली. या व्यवहारात बराच फायदा झाला. कंवल रेखी यांना ३,४ मिलियन मिळाले. Kanwal was in philanthropic mood. त्यांना यातली मोठी रक्कम IIT मुम्बई- के. रेखी मॅनेजमेन्ट स्कूल साठी द्यायची होती. आय. आय. टी मुम्बई चे संमेलन होते, त्यात त्यांनी मला बोलायचे आमंत्रण दिले.


शिल्पा : १९९० च्या आधी तुम्ही काय करत होतात?

भालेराव : मी इन्दोरमध्ये जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो. पूर्वज जळगांव जवळच्या खिरोडा गावचे. माझे काका इन्दोरात होळकरांबरोबर काम करायचे. माझे प्राथमिक, माध्यमिक आणि मग कॉलेजचे शिक्षण इन्दोरलाच झाले. १९७२ मध्ये मी US ला आलो. Wooster Polytech मधून ग्रॅज्युएट झालो आणि DEC जॉइन केली. लोकांच्या हे लक्षात येत नाही की तुम्ही मॅनेजमेन्ट ची पोझिशन घेतली की तिथे फक्त 'घिसाई' ची गरज असते. नशिबाने मी DEC मध्ये होतो तिथे 'घिसाई' चीच गरज होती. १५०० लोकांची छोटी कंपनी होती. मी Designer म्हणून सुरुवात केली. मग मॅनेजमेन्ट मध्ये मोठा होत गेलो. इन्जिनीयरिन्ग सुपरवायझर,इन्जिनीयरिन्ग मॅनेजर, इन्जिनीयरिन्ग डायरेक्टर... एकेकाळी जगभरातून हजारो लोक मला रिपोर्ट करायचे. त्यामुळे मला आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे डील करावे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, तयार केलेल्या relationships मध्ये काय करावे, काय करु नये इत्यादी गोष्टींची कल्पना आली. कामात एक वेगळ्या प्रकारची चमक, सहजता आली, आत्मविश्वास आला. ट्रेनिन्गचाही खूप उपयोग झाला. बरेच उद्योजक हे माझ्यासारखे इन्जिनीयरिन्ग फील्ड मधून आले. But they became founder of their own ideas. founder आणि entrepreneur मध्ये फरक आहे. Founder is the person who has an idea, but entrepreneur is the person who creates direction from confusion. entrepreneur हा व्यापारात नवीन कल्पना आणतो. तीच गोष्ट, जेव्हा तुम्ही मोठ्या कंपनीत जाता, एखादी कल्पना मॅनेजमेन्ट समोर मांडता and get permission to build that business. तर हे ट्रेनिन्ग फार आवश्यक आहे. तुम्ही जर मूळचे VCs पाहिलेत, John Deere, Valentine हे आता रिटायर्ड झाले आहेत. पण ते मूळचे VP Marketing, VP Sales, COOs होते. तरुण founders ना गाईड करायला, त्यांच्या कल्पना businees मध्ये आणायला ते अगदी योग्य होते. १९९६-९७ पर्यन्त हे चालू राहिले. ९७ मध्ये बबल ओपन झाला. ज्याच्याकडे कल्पना होती असा प्रत्येक जणच founder झाला. अशी काही उदाहरणे आहेत जिथे एखादा फक्त एकाच कंपनीत राहून यशस्वी झाला. बाकीचे जे कष्ट करुन 'घिसाई' मधून आले ते सतत एका कंपनीतून दुसर्‍या मग तिसर्‍या असे जात राहिले आणि खूप यशस्वी झाले.

शिल्पा : मी तो प्रश्न विचारणारच होते. तो मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद. यशस्वी उद्योजकाला आवश्यक अशा गोष्टी कोणत्या?

भालेराव : मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलीच, 'घिसाई', बरोबर? दुसरी गोष्ट अशी की उद्योजकता ही एक वृत्ती आहे. It is an attitude. जरी हा शिकावू वृत्तीचा भाग असला तरीही. मी एक उदाहरण देतो, एकदा बिरजू महाराजांशी बोलत होतो. त्यांना विचारले, 'आप इतने अच्छे भाव दिखाते हो, आपको कैसे सूझता है?' थोडा वेळ थांबून ते म्हणाले, ' जब मेरे सामने कोई सवाल आता है तो मैं उसमे कृष्ण के जरिये जाता हूं', म्हणजे कृष्ण करेल तसा विचार करतो कृष्णाच्या माध्यमातून गेल्याने तो भाव आपोआपच येतो. ही त्यांची एक वृत्ती झाली. त्यांनी त्यांच्या मनाला असा विचार करायची सवय लावली. उद्योजकता बरीचशी अशीच आहे. you have to kind of think through the problem. हे करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीव असावी लागते. व्यापक नजरेने पहावे लागते, वेगळा दृष्टीकोन असावा लागतो. उदाहरणार्थ, US मध्ये १९५० मध्ये डायपर्स चा खप जास्त व्हायचा, १९५५ मध्ये tricycles चा तर १९६० मध्ये टेनिस रॅकेटस आणि सायकलींचा खप वाढला. यावरुन दिसतं की दुसर्‍या महायुद्धानंतरचा baby boomers बबल पुढे सरकत होता, आता ही पिढी retirement मधून जात आहे. याच दृष्टीने भारताकडे पाहिले तर.. आज अचानक सर्वजण भारताकडे का वळले आहेत? भारताची तरुण पिढी is living in 40-40 म्हणजे ४०% लोकांचे वय ४० च्या खाली आहे. याचा अर्थ असा की आपण pre-industrial युगातून निघून knowledge based economy कडे जात आहोत.

यामध्ये अर्थव्यवस्था ही लोकांच्या knowledge वर आधारित असते. तर knowledge चा प्रभाव अर्थव्यवस्थेवर २०५० सालापर्यंत राहील. या लोकांचा जन्म योग्य वेळी योग्य ठिकाणी झालेला नसेल, पण ते योग्य वयाचे असतील. मी आता वयस्क झालो आहे, पण विशीतल्या तरुण मुलांकडे पहा.. they are going to be the consumers of the society. तेव्हा प्रभावशाली consumers हे भारतातले असणार आहेत, जपान किंवा US मधले नाही. म्हणूनच वॉलमार्ट आता भारतात येण्याचा प्रयत्न करत आहे. टाटा १ लाखात कार बनवण्याचे बोलत आहेत. या सगळ्या समाजाला, ज्यामध्ये मोठा मध्यमवर्ग आहे त्याला नजरेसमोर ठेवून चाललेल्या गोष्टी आहेत. आता हे लक्षात घेतल्यानंतर की या लोकांना कशाची गरज आहे, मला एका मोठ्या मार्केट बद्दल कल्पना येऊ लागेल. ती कल्पना पुढे नेऊन मी कंपनी उभारु शकतो.

आता ही टाटा ची १ लाखाची कारच पहा. एक तरुण कॉलेजमधून बाहेर पडतो. नोकरी, लग्न होतं. कार ही महत्वाची गोष्ट! आमच्या काळी जेव्हा आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि लग्न केलं तेव्हा स्कुटर महत्वाची होती. त्यात बदल होऊन आता कार आली आहे. जर तुम्ही आधी ५,६ वर्षं काम केलं नसेल तर ५,६,७,८ लाख रुपयांची कार काही परवडण्यासारखी नाही. अर्थातच मी IT बद्दल बोलत नाही आहे. तो पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. मी सर्वसाधारण ग्राहकाबद्दल बोलत आहे. तेव्हा ही नवीन कार अचानक मोठ्या लोकसंख्येला परवडणारी होणार. म्हणून या कारची ज्यांनी कल्पना मांडली त्यांनी खरंच विचार केला आहे. एका उद्योजकासाठी वेळेच्या आधी विचार करुन बाजारात कशाला मागणी येईल हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

एक उदाहरण सांगतो. एक चांगला दिग्दर्शक, ह्या 'हम आपके है कौन' चित्रपटाचा. याने विचार केला की एका कौटुंबिक चित्रपटाची त्यावेळी गरज आहे. आता जर कोणी तसे ५, ६ चित्रपट घेऊन आलं तर ते चालणार नाहीत फारसे. पण जेव्हा ते सगळे 'angry young man and woman' चालू होते, तेव्हा हा कौटुंबिक चित्रपट हिट झाला. sombody, consciously or subconsciously, spotted the trend of what kind of changes were happening and what was required, and -boom! It happened. हे सगळे चांगले दिग्दर्शक आणि उद्योजक सारखाच विचार करतात!

शिल्पा : पण मग आता जे भारतात चालले आहे, इतका जो बूम आहे त्याकडे बघून इकडे जसा 'डॉट कॉम' बबल burst झाला, तसं काही होण्याची भीती तुम्हाला वाटत नाही का?

भालेराव : नाही. त्याचं असं आहे, Economy always goes through corrections and markets always go through corrections तेव्हा correction हे घडणारच. त्याबद्दल शंका नाही. पण त्याचा आवाका, वेळ आणि तीव्रता हे त्यावर किती रचलेलं आहे त्यावर अवलंबून आहे. त्याचे दुष्परिणामही यावरच ठरतात. डॉट कॉम मध्ये काय झालं? People put in lots of money just on speculation and anticipation. There was no real business there.

भारतात software service industry मध्ये जे घडते आहे ते IT मध्ये घडते आहे ही चुकीची समजूत आहे. तो IT चा फक्त एक भाग झाला. संपूर्ण IT नव्हे. तिथे product economy नाही, सगळी sevices economy based on 'brick and mortar' आहे. ही सर्व्हिस जगात दुसरीकडे कुठेतरी होत होती आणि भारतात ती स्वस्तात उपलब्ध झाली. आता जगात दुसरीकडे कुठेतरी ती अजून स्वस्तात उपलब्ध होईल आणि ही इन्डस्ट्री भारतातून निघून जाईल. इथे जसा burst झाला १८ महिन्यात, तसा १८ महिन्यात न होता ३ वर्षात होईल, पण हे होईल.
तेव्हा करेक्शन हे नक्की होणारच. आणि जेव्हा होईल तेव्हा it is going to be an unpleasant surprise to indian buisinesses. कारण त्यांना अशा प्रकारे एकदम उंचीवर जाण्याची सवय नाही, त्यामुळे एकदम होणार्‍या घसरणीशी adjust करणं खूप कठीण जाणार आहे.

आता मुंबई, इन्दोर, अहमदाबाद मधल्या मिल्स मध्ये industrial war नंतर भारतात झालेले करेक्शनच पहा. लोक दत्ता सामंत आणि आणखी कोणाला दोष देतात की त्यांनी हा संप केला. पण गोष्ट तशी नाही. गोष्ट अशी, की तिथे बरेच पर्याय उपलब्ध झाले होते. Polyester revolution त्याच वेळी घडत होती, बरोबर? म्हणून हे करेक्शन जरुरीचे होते कारण the economy was based on the set of equipment and productivity that was no longer applicable. मग तुम्हाला नवीन यंत्रणा आणावी लागली आणि त्याचबरोबर मग नवी गुन्तवणूक आणि workforce आला. याला बराच वेळ लागला, ८ ते १० वर्षं लागली असतील. पण ते करेक्शन झालं. इथे तेच करेक्शन १८ महिन्यांत झालं!

शिल्पा : तर मग या करेक्शन साठी उद्योजकांनी कशी तयारी ठेवावी?

भालेराव : असं पहा, you can always play Sunday night Cricket on Monday night. I can always say that wait and see. काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. certain desciplines you can put in place. उदाहरणार्थ, मन्युफॅक्चरिन्ग मध्ये नेहमीच inventory returns वर लक्ष ठेवावे. The inventory returns starts going down किंवा बुक टू बिल ratio , पॉझिटिव्ह असतो आणि मग खाली येऊ लागतो. ही काही चिन्हे आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे keep your organization nimble enough so you can adjust the shocks नाहीतर अवघड आहे.

मी तुम्हाला एक क्लासिक उदाहरण सांगतो DEC चं. DEC अयशस्वी का झाली? तर त्यांची कधीच layoff करायचा नाही अशी पॉलिसी होती...पॉलिसी म्हणण्यापेक्षा 'अलिखित परंपरा' म्हणू. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा इकॉनॉमी ची घसरण सुरु झाली, कंपनीतल्या टेक्निशियनना कार पार्ट्स पेंट करायला सांगितले! काहीही करुन त्यांना नोकरीवर ठेवणं आवश्यक होतं. कंपनी लहान होती, त्यामुळे हे परवडले. करेक्शन होत आहे हे सर्वांनाच माहित होतं. सगळ्या कॉम्प्युटर इन्डस्ट्री मध्ये करेक्शन झालं. आता ह्या १४०,००० लोकांचं काय करणार? कंपनीचं नामोनिशाण राहिलं नाही. याचं कारण असं की हे धक्के पचवण्यासाठी आवश्यक गोष्टीच नव्हत्या. मोठ्या कंपन्यांना करेक्शन मुळे बसलेले धक्के जास्त तीव्र होते. ते त्या कंपन्या पचवू शकल्या नाहीत.

शिल्पा : भारतात इतके लोक केवळ मागणी आहे म्हणून त्या क्षेत्रात जातायत, मग असं काही करेक्शन जर झालं, तर त्या करेक्शन चा परिणाम खूप जास्त लोकांवर होईल आणि भारताला यातून सावरणं कठीण जाईल...

भालेराव : ते सगळं करेक्शन व्हायला किती वेळ लागतो त्यावर अवलंबून आहे. शेवटी ती knowledge based economy असणार. तर समजा अजून ५ वर्षांनी IT मध्ये करेक्शन झालं, (अर्थात एक चुकीचा समज आहेच, कॉल सेंटर पासून अगदी 19complex technology development 19 ही IT समजतात.) तर जे लोक इन्जिनीयरिन्ग मधले पदवीधर आहेत आणि खरोखर core competency work करतायत अशा लोकांची कायमच गरज भासणार आहे याबद्दल शंका नको.

आव्हान अश्या लोकांपुढे आहे जे फक्त इतर आजूबाजूची कामे करतात, म्हणजे कॉल सेन्टर्स इत्यादी. माझ्या मते असं होईल, की हे सगळे स्किल्स retailing कडे जातील आणि retailing will take off big time. आता पुन्हा हे वॉलमार्टचं पहा, हे सगळे भारतात जात आहेत. भारत एक मोठा consumer झाला आहे. हा स्किल सेट तिकडे वळेल. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की IT ला धक्का बसल्यामुळे लोक रस्त्यावर येतील. काही काळाकरता ते रस्तावर येतीलही पण ते दुसर्‍या इकॉनॉमी मध्ये absorb होतील. कारण इथून पुढे भारताची इकॉनॉमी ही फक्त IT वर आधारित असणार नाही. What has happened is, internet 1, that brought the text as a packet together, that opened up a whole set of buisinesses and made geography a history, The internet 2 is going to give opportunity for yet another set of buisinesses that will elliminate the barriers between the world. इन्टरनेट च्या आधीचा काळ, १९७० च्या काळाकडे जर पाहिलं तर तिथे तुमच्याशी स्पर्धा करणार्‍या कंपन्या, कंपन्या ज्यांचे तुम्ही ग्राहक आहात, तुमच्या पार्टनर कंपन्या, आणि कंपन्या ज्या तुमच्या ग्राहक आहेत, अशी विभागणी होती. इन्टरनेट आल्यानंतर सगळं समीकरण बदललं. आता काय होतं, या सगळ्या कंपनीज साधारण सारख्याच दिसतात, वाटतात. २०२० मध्ये इन्टरनेट २ बूम नंतर तुम्हाला या कंपन्यांमध्ये फरकच सांगता येणार नाही. ज्या डिव्हिजनशी तुम्ही स्पर्धा करता ती, विकत घेता किंवा पार्टनर असता या त्याच दोन कंपन्या असू शकतात. याला Globalization म्हणायचं. खरं Globalization हे इन्टरनेट २ बूम मध्ये होणार आहे.

शिल्पा : मी एका पुस्तकात वाचलं की पृथ्वी मध्ये अनेक feedback loops असतात. आणि ती Cybernetics system सारखी असते. कुठलाही असमतोल झाला की एखाद्या नैसर्गिक घटनेतून त्याचे करेक्शन होते...

भालेराव : There is a parallel. आपण जे करतो त्यातलं काहीही नवीन नाही आहे. आता मी दोन उदाहरणं देतो. आपण रामायण, महाभारत, दासबोध वाचतो. त्या त्या काळात ते लोक ज्या अर्थव्यवस्थेतून गेले, त्या वेळचे नेते ज्यातून गेले...पुन्हा आपण सगळे त्यातूनच जात आहोत. मी एक उद्योजक आहे, त्या दृष्टीने मी रामायणाकडे पाहतो... आपण म्हणतो व्यापार म्हणजे युद्ध! तसं म्हटलं तर मग उलट 'युद्ध म्हणजे व्यापार!' Then General becomes the CEO. मग असं बघू की CEO चे, नेतृत्वाचे गुण कोणते? त्यातला प्रत्येक गुण लक्षात घेऊन राम आणि रावणाची तुलना करायची.

आता पुढची पायरी, आयडिया असते त्याला बिझनेसचे रुप देणे. पहिल्यांदा तुम्ही एक दृष्टीकोन आणि ध्येय ठरवता. रामाचे ध्येय काय होते? रामायणात, 'रामाने सीतेला सोडवणे' हे ध्येय नव्हते. ध्येय अगदी स्पष्ट होते, 'आर्य धर्माचा प्रसार'. यासाठी राम अगदी योग्य नेता होता. वसिष्ठांनी रामाला विश्वामित्रांच्या आश्रमात का पाठवले? विश्वामित्र हे शस्त्रातले जाणकार होते. वसिस्ठांनी त्याला धर्म शिकवला आणि विश्वामित्रांनी शस्त्रास्त्रविद्या. आता पुढे बघू, रावणाने सीतेला पळवले. तेव्हा राम आपल्या वडिलांकडे किंवा सीतेच्या वडिलांकडे गेला नाही, 'मला सैन्य द्या लढायला' म्हणून. त्याने आपला मार्ग स्वतः शोधला. त्याने आपली स्वतःची टीम तयार केली. हे महत्वाचे आहे. एखाद्या उद्योजकाने आपली कल्पना प्रत्यक्षात आणताना अशा लोकांना आपल्या सोबत घेतले पाहिजे ज्यांचा त्या कल्पनेबद्दल त्या उद्योजकासारखाच दृष्टीकोन आहे. म्हणून नील, अंगद, जांबुवंत, हनुमान हे एकत्र आले. सीतेला पळवल्यामुळं रावणाशी रामाचं वैर झालं पण आर्य धर्माच्या प्रसाराला रावण बाधक होता हे मोठं कारण होतं.

आता एका CEO च्या प्रवासाचा विचार करु. स्वतःची टीम तयार करणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजवणे आणि ध्येय गाठण्यासाठी त्यांच्यात उत्साह निर्माण करणे. now every CEO goes through ethical, non-ethical decision कधी ना कधी त्यातून जावेच लागते, आमची नेहमी कसरत चालू असते. रामालाही यातून जावं लागलं. झाडाच्या मागे उभं राहून त्याने वालीला मारलं. वालीचा काय दोष होता? बाकी सगळे या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने पहातात माहित नाही, पण हे नैतिक अनैतिकतेच्या सीमारेषेवरच आहे. पण त्यानं हे केलं ते दुसरंच एक मोठं, चांगलं ध्येय मनाशी बाळगून. मी रामायणाकडे असा एका उद्योजकाच्या नजरेतून पाहतो.

महाभारताचेही तेच. मथुरा ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ होती. वृंदावनला डेअरी फार्म चा उद्योग होता. हे डेअरी प्रॉडक्ट्स मथुरेत विकून नंद श्रीमंत होत चालला होता. आणि श्रीमंत असलं की ते सैन्य गोळा करु शकत. मथुरेचा राजा कंस, त्याला काळजी वाटायला लागली की हा श्रीमंत झाला तर आपल्यावरच आक्रमण करेल. तर जे वैर होतं ते कंस आणि नंदामध्ये होतं. आणि कंसाने तेच केलं जे अमेरिका इराकला करते आहे आज. Economic barricade . तेच ते, "तुझ्या गवळणीने येऊन इथं दूध विकायचं नाही." खरा प्रश्न हा आर्थिक आहे. ...लोकांनी मध्ये बर्‍याच गोष्टी घुसडल्यात पण खरं कारण आर्थिकच आहे.

हजार वर्षांनी बुश आणि सद्दामची कथा. नंतर लोक याच्या बर्‍याच वेगवेगळ्या आवृत्त्या लिहीतील. त्यात काय काय असेल कोण जाणे!कृष्णाने कंसाला मारलं हे खरं, सिंहासनावरुन ओढून आणलं वगैरे हे कथाकारांनी घुसडलेलं. हे दोन मुद्दे का सांगतोय तर तरुण उद्योजकांनी हे लक्षात घेतले पाहिजे. या गोष्टींकडे तरुण पिढी पुराणातल्या गोष्टी म्हणून पहाते. तुम्हाला या गोष्टींतून काही शिकायचे असेल, निष्कर्ष काढायचे असतील तर learn to interpret them with your own perspective. अशी दृष्टी ठेवली ना तुम्ही, तर तुमची उद्योजक म्हणून वाटचाल सुरु होईल.

शिल्पा : तुमच्या बोलण्यात इतके सगळे संदर्भ येत आहेत. रामायण, महाभारत, बिरजू महाराज... तुम्हाला कलेमध्येही बरंच स्वारस्य आहे. तुमच्या घरी बरेच कार्यक्रम वगैरे होतात. तर तुमचा हा कलेचा छंद कुठून निर्माण झाला?

भालेराव : तो निर्माण झाला इन्दोरहून. इन्दोर हे संस्थान होतं. त्यावेळी इन्दोर असो की पुणे की बडोदा, माझ्या आणि माझ्या वडिलांच्या पिढीचे लोक हे 'संस्थानी माहौल' मध्ये वाढले. आता हा 'माहौल' चांगलाही असतो आणि वाईटही. चांगला असा की जीवनाच्या वेगळ्या पैलूंचा आदर करायला शिकवतो. फक्त काम नव्हे, दुसर्‍या वेगळ्या पैलूंचा. म्हणजे, "खाना पीना और मौज करना". हा 'मजा' संस्थानांमधून मिळायचा. इतर कुठे नाही मिळणार असा. आम्ही ज्या भागात रहात होतो, मी ७,८ वर्षांचा असताना. तेव्हा मी घरापासून राजवाड्यापर्यंत चालायचो. तेच मुख्य मार्केट होतं. तर या रामबाग भागात, मला आठवतंय, संध्याकाळ झाली की असा एक भाग सापडायचा नाही जिथे गाणं चालू नाही. प्रत्येक घरात काही ना काही कलेशी संबंधित चालू असायचं. रेडिओ त्यावेळी नव्हते. नुकतेच येत होते. मी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलो. साधारण वस्तीही मध्यमवर्गीय होती. मग तुम्ही चालत असताना कोणी गातंय, पेटी वाजवतंय, क्लास चाललाय कोणी तबला शिकतंय अस नेहमी दिसायचं. मग वेगवेगळे सण यायचे...पतंगाचा सण. संस्थानांमध्ये तुम्ही या गोष्टींशी समरस होता.


शिल्पा : मग तुम्ही कलेत काही प्रशिक्षण घेतलंत की फक्त आवड म्हणून जोपासली?

भालेराव : Just लुत्फ़! प्रशिक्षण वगैरे काही नाही. आता मला खंत वाटते की प्रशिक्षण घ्यायला हवं होतं, सुवर्णसंधी होती. माझे मित्र तबला वाजवायचे. त्यामुळे मलाही इन्टरेस्ट निर्माण झालां. दर रंगपंचमीला वेदिकाश्रमात एक मैफिल व्हायची. very interesting.. सगळे रंग खेळायचे आणि रंगलेले बसायचे. त्याची सांगता कुमारांच्या गाण्याने व्हायची. सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यन्त रंगलेले...! सकाळपासून सुरु व्हायचे ते संध्याकाळपर्यंत. तर असं सगळं शिक्षण मैफिलीतून मिळालं. काय म्हणतात ना ते... "Baptism by fire!"

शिल्पा : तुम्ही मघाशी साहित्य संमेलनाबद्दल सांगितलंत, तिथले काही अनुभव किंवा आठवणी..?

भालेराव : २००० मध्ये जागतिक मराठी संमेलन इन्दोर ला झालं. माझ्यासाठी धक्कादायक होत्या अशा काही आठवणी सांगतो. मी कधी एकही साहित्याची ओळ लिहिलेली नाही. मी खूप वाचन करतो. मराठी, हिन्दी साहित्याचा भोक्ता आहे मी. हे संमेलन जेव्हा इन्दोरला करायचं ठरलं तेव्हा त्यांना कळेना कोणाला बोलवावं. कारण प्रसिद्ध असे जे होऊन गेले, भा. रा ताम्बे वगैरे त्यांची पिढी केव्हाच गेली होती. इन्दोर मध्ये त्यावेळी साहित्यातलं कोणीच नव्हतं, मग कोणीतरी माझं नाव सुचवलं. त्यांनी मला येण्याबद्दल विचारलं, पण मला काहीच कल्पना नव्हती काय असणार याची. मी येईन म्हणालो. ५ मिनिटे भाषण द्यायला काहीच अडचण नाही. मग इथे आल्यावर चिन्मय भागवत ला सांगितल्यावर कळलं की किती मोठं असतं ते. मग मी तयारी केली, भाषण दिले. इन्दोर साठी ही मोठी घटना होती. मराठी लोक तिथे कमी असले तरी १५ संस्था! पण सगळ्यांनी एकत्र येऊन साहित्य संमेलन केलं. त्यांच्यापैकी कोणाला महत्वाचं पद नव्हतं. ते माझ्याकडे होतं. दुसरी अविस्मरणीय गोष्ट म्हणजे मी भाषण झाल्यावर खाली येऊन बसलो आणि माझ्या शेजारी एक गृहस्थ काठी टेकत टेकत येऊन बसले, म्हणाले 'भाषण छान झालं.' मला कळत नव्हते की यांना कुठे पाहिलंय...तर ते म्हणाले, "माझं नाव दाजी भाटवडेकर".. मग मी म्हणालो, तुम्हीच भाषण द्यायला हवं होतं...मी कशाला दिलं!

दुसरा अनुभव कवी संमेलनाचा. हे संमेलन मंगला खाडिलकरांनी कंडक्ट केलं होतं. संमेलन सुरु व्हायच्या अगोदर असच कोणी पुन्हा शेजारी येऊन बसलं. मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं. नमस्कार वगैरे झाल्यावर त्यांनी शबनम बॅगेतून एक पुस्तक काढलं, त्यावर काहीतरी लिहिलं आणि मला देत म्हणाले, 'सकाळचं भाषण आवडलं, मी ना. धो. महानोर'!! तर अश्या या दोन टचिंग घटना आहेत.

शिल्पा : मी असंही ऐकलंय की तुम्ही कोकणचा दौरा करता आणि त्याच्या गंमतीदार आठवणी आहेत तुमच्याकडे..

भालेराव : (हसतात) दौरा असं नाही... पण मी २१ वर्षांचा होईपर्यंत एक-दोन वेळाच मुंबईला आणि इकडे तिकडे गेलो असेन. फारसा फिरलो नाही काकांच्या धाकामुळे. त्यांचे व्यक्तिमत्व एकदम प्रभावी होते आणि इन्दोर सोडून दुसरीकडे शिक्षणासाठी जायचे नाही असे त्यांचे म्हणणे. So I might have seen the world 100 times over when i came here..But still i missed India! म्हणून २००१ नंतर activities जरा कमी केल्यावर मला भारत पहायचा होता. 'गारंबीचा बापू' मला आवडलेलं पुस्तक! त्या व्यक्तीत मला एक बंडखोर पण उद्योजक माणूस दिसतो. 'शितू' touched me. तसंच 'तुंबाडचे खोत'. त्यामुळे मला कोकणाबद्दल एक वेगळा दृष्टीकोन होता. मला त्याचा अनुभव घ्यायचा होता. मला 'ताज' मध्ये राहून हे करायचं नव्हतं!

मी काही लोकांशी बोलताना समजले की एकाच्या परिचयाचे कोणीतरी कुठेतरी आहे. मी म्हटले, चला ओळख करुन द्या. मला कोकणांत जाऊन रहायचे आहे.मग मी जाऊन आंबवली नावाच्या २०० लोकांच्या गावात राहिलो. तिथे एक चिंचोळं जेटी आहे. अंदाजे ३ मैल. दोन्ही बाजूना समुद्र आणि एकच रस्ता आहे गावामधून आणि त्याच्या दोन्ही बाजूला घरं आहेत.१५-२० फूट पुढची जागा मग अंगण, मग २ खोल्या, थोडं परस त्यात फुलझाडं, मग नारळाची झाडं, मग भात, पुन्हा नारळाची झाडं. सगळी घरं तशीच आहेत. नंतर कळलं की या गावाजवळच वसंत बापटांचं गाव आहे.

ज्यांच्याकडे राहिलो होतो ते आप्पासाहेब परांजपे. त्यांनी बरंच काही झाडं वगैरे दाखवलं. चालताना माझा पाय लागून एक हिरवं फळ घरंगळत गेलं तर ते उचलून लगेच म्हणाले, "रुपया वाया चालला होता". सुपारीचे फळ होते ना म्हणून रुपया म्हणाले! so you know..it throws off your perspective . पुढे छोट्या थैल्यांमध्ये ४०० रोपं ठेवली होती. ती जायफळाची होती, पण विकायची नाहीत म्हणाले आप्पासाहेब. त्यांची वर्षाची मिळकत फक्त १२०० रुपये होती, बाकी सगळं घरुन निघायचं. तांदूळ वगैरे. लोक रोपं मागायचे तर हे त्यांना घेऊन जाऊ द्यायचे. म्हणायचे, "सहा महिन्यांनी बघायला येईन. मेलं असेल तर ५ रुपये, जगवलं असेल तर पैसे नाही".

एकदा एकाने बांबू मागितला. त्यांनी फक्त बोट दाखवलं. त्याने जाऊन आणला, चार आणे दिले आणि गेला. नन्तर एक मुस्लिम आला. त्याला कसलीतरी पानं हवी होती. दिसायला गावठी चहा सारखी ती पाने घेऊन, ४-८ आणे देऊन तो गेला. कसली पाने म्हणून मी विचारले तर ते म्हणाले 'वास घेऊन बघा.' वास ओळखीचा वाटला पण लक्षात येईना. तर म्हणाले, "हे आम्बे मोहोर! मुसलमान लोकांच्या बिर्याणीला आम्बे मोहोराचा वास लागतो. ही पाने भातात ठेवायची मग वास लागतो." तर हे जे अनुभव आहेत ना, ते तुम्हाला जागे करतात!

मग मला दापोली दाखवायला घेऊन गेले. 'गारंबीचा बापू' इथलाच. गारंबीचा बापू मधले देऊळ वगैरे अगदी तसेच आहे! श्री. ना. पेंडसेंनी सगळं तिथलं घेतलं आहे. फरक इतकाच की बापूबद्दल विचारलं की तिथले लोक बोलत नाहीत. पेड़सेंनी त्या
गोष्टीला twist दिला असं त्यांना वाटतं. त्या गावाला आणि त्या लोकांना perspective दिला पेंडसेंनी. ते त्यांना आवडलं नाही. मी प्रश्न विचारला तेव्हा ते बोलले नाहीत. पण बाकी सगळं तस्सं आहे मात्र!

शिल्पा : आता जरा वेगळा प्रश्न विचारते. तुम्ही Web Duniya मध्ये early investor होतात. तर अश्या 'मायबोली' सारख्या प्रादेशिक भाषेत असणार्‍या पोर्टल ला यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल?

भालेराव : मी त्यांना कंपनी सुरु करायला मदत केली. It came from a very well established place of Nayee duniya. जो एक मोठा हिंदी न्यूजपेपर आहे. त्यांना Print Media चे चांगले ज्ञान होते. web duniya चा उद्देश web portal म्हणून नव्हता तर असे एक तंत्रज्ञान ज्यात सगळे नेटस्केप आणि गूगल चे फिचर्स, फंक्शन्स आहेत. उदाहरणार्थ ' Search' . हिंदीमध्ये ' search ' असे काही उपलब्ध नाही. The aspect of that company was technology based. असे तंत्रज्ञान विकसित करुन ते गूगल किंवा मायक्रोसॉफ्ट ला विकायचे, हा उद्देश होता. पण तिथे गेल्यावर ते म्हणाले, Show us how it works. मग ते दाखवण्यासाठी त्यांना पोर्टल मध्ये जावं लागलं. काही काळाकरता ही पोर्टल म्हणजे एक गळफासच होता. कारण सगळे resourse आणि पैसा तिकडे जात होता. आणि ज्या VCs नी पैसे गुंतवले त्यांचा मूळ हेतू याच्या नेट वरच्या local language adaptation मध्ये होता. आर्थिकदृष्ट्या ही पोर्टल फारशी आकर्षक नव्हती. नंतर Reliance ने कंपनी चा काही भाग घेतला.

पोर्टल साठी काय केले पाहिजे..! मला वाटते हे थेट content शी संबंधित आहे. It is content business . Content काय आहे ही महत्वाची गोष्ट आहे. याचा विचार तुम्ही केला पाहिजे. western world मध्ये काय मिळत नाही..झी आणि अल्फा टीव्ही चे उदाहरण घ्या. त्यावरचे content लोकांना हवेहवेसे वाटते. त्यामुळे लोकांना जे हवे आहे, आणि ज्यासाठी त्यांची पैसे मोजायची तयारी आहे ते जर तुम्ही multi media मध्ये उपलब्ध करुन दिले तर तुम्ही एक यशस्वीपणे, commercially एक पोर्टल तयार केली आहे. Text portal टिकणे अवघड आहे. text portal चे प्रयत्न झाले आहेत हिंदीमध्ये वगैरे, पण चालू राहिले नाहीत. तुम्ही मराठी लोक जर म्हणत असाल, तर ३०-४० वयोगटातले लोक तुम्ही target करत आहात. तुम्ही लहान मुलांना attract करु शकत नाही. तुम्ही साईट वर किती लोक हिट करतात हे पाहता का? किती लोक ४० च्या वरचे आहेत? तुम्ही एक informal survey घेऊ शकता, की मायबोलीने काय केले पाहिजे जे सध्या केले जात नाही? आणि जे लोक येत नाहीत ते का येत नाहीत? keeping the same content with lot of advertisement you will take few hundred to a thousand but you cant take few hundred to few thousand. तेव्हा content तेच ठेवून जाहिरात वाढवली तर १० ते २० टक्के वाढ होईल. पण मोठी वाढ होण्यासाठी तुम्हाला असे काही उपलब्ध करुन दिले पाहिजे जे मोठ्या subscription base ला हवे आहे!

शिल्पा : म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जे सांगितलेत तेच, की मार्केट बद्दल माहिती मिळवली पाहिजे...

प्रकाश : बरोबर! तुम्ही गूगल वर जाता कारण तिथे Search आहे. बाकी काही नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पोर्टल मध्ये युनिक काय आहे ते शोधलं पाहिजे. नाहीतर लोक येत नाहीत. Get the content which people need. ७० टक्के target हे भारताबाहेरचे लोक असतील तर या लोकांच्या गरजा पूर्ण करयचा प्रयत्न करा. ते किती काळ येत रहातात ते शोधा. त्यांना टिकवण्याचे प्रयत्न करा. There are two dimentions you have to go at and you have to do very specific analysis. आणि हे तुम्ही Users कडूनच मिळवू शकता. त्यांना १० options न देता दोनच द्या आणि top 2 गोष्टी विचारा. If you give them lot of options you will get 6 things and won't know what to make of it!

शिल्पा : सध्या मायबोली वर अधूनमधून अशी खूप चर्चा होत असते की मराठी जगत नाहीये, किंवा लोक पुरेसं मराठी बोलत नाहीयेत, तर तुमच्या अनुभवात, तुम्ही महाराष्ट्रातही प्रवास करता आणि व्यवसाय करता, आणि इथेही इतर महाराष्ट्रीयन लोकांना भेटता तर तुम्हाला असं वाटतं का की मराठी चा र्‍हास होतोय? तुमचा काय अनुभव आहे?

भालेराव : त्याचं असं आहे की तुम्ही त्यात बदल आणत नाही तोपर्यंत हे बदलू शकणार नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण इंग्रजी का शिकलो? कारण ती जेत्यांची भाषा, बरोबर? माझ्या मुलाला हिंदी का शिकायचंय? कारण त्याला हे लक्षात येतयं की त्याच्या पुढच्या आयुष्यात, त्याचा भारताशी संबंध येईल, त्याला तिथे जाऊन काम करावं लागेल. आणि इंदोर ला मराठी का आलं? कारण इंदोरचे राजे होते ते मराठी होते. भारत आत्ता का महत्वाचा आहे? २५ वर्षांपूर्वी योगा वेगळा होता, की भारतीय फूड वेगळं होतं, का Indian models कमी hot होते? का ताजमहाल वेगळा दिसत होता? लोकांना भारताचा नव्याने शोध लागला आहे कारण India has become an economical power to reckon with .

मराठीचा र्‍हास व्हायचं कारण हे की, Marathi has lost it's influence and power to economical and political will. तुम्ही स्वत जोपर्यंत "जेता" होत नाही, मला नाही वाटत तुम्ही मराठीचं रक्षण करु शकाल. भाषा का बदलते? जी राज्यकर्त्यांची भाषा असते ती टिकते... राज्यकर्त्यांची जर ती भाषा नसेल तर काही होणार नाही. आपणच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो. का? त्यांची आर्थिक परिस्ठिती चांगली व्हावी म्हणून. जगाच्या स्पर्धेत त्याचीच गरज आहे. ते टाळता येणं अशक्य आहे, तुम्ही काही गोष्टी करु शकता ज्यांचा या internet च्या जगामध्ये उपयोग होईल अश्या. असं मी म्हणू नये पण in the age of internet roman scripting has become a dominant factor. जर तुम्ही कुठल्या vietnamese किंवार chinese वेबसाईट वर गेला तर ते त्यांचं स्क्रिप्ट रोमन मध्ये लिहितात. Maybe we should think out of the box. काही मराठी लोक मला जोडे मारतील असं म्हणल्याबद्दल.. maybe we should think of generating a roman script that is easy . काही रिसर्च स्कॉलर्स त्याचा आज वापर करतात्त. Dr. Linda Hess, Stanford's South Asia studies च्या डिपार्टमेंटच्या प्रमुख. She has developed a roman script in describing संस्कृत,हिंदी आणि अवधी, because she is a 18hasthi 19 in kabir, she writes her scripts in roman scripts. म्हणून तुम्ही आता रोमन लिपीमध्ये लिहिलत "kuThe" आणि जर मी जाऊन गूगल वर "kuThe" ह शब्द शोधला, तर मला तो मिळू शकतो. I am using the infrastructure that is already developed.I can fight it, or I could use it. म्हणजेच कुठेतरी आपल्याला आपली परंपरा सोडावी लागणार... नाहीतर मग तुम्हीच प्रभावशाली व्हा... तुम्ही राज्यकर्ते बना.. then you will dictate the terms and the world will follow.

we are going through a transitionary phase, जिथे भविष्य अंधूक दिसते आहे म्हणून याला काही सोपे उत्तर सध्या तरी नाही. तुम्हाला प्रभावा प्रमाणे वहायला हवे... आता संगीतातच काय झालं पहा.. 78RPMS became dominant players , मग ते गेले आणि LPs आले, मग कॅसेटस आल्या नंतर CDs आल्या, आणि आता इतिहासात पहिल्यांदाच CDs ची विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, कोसळलीच आहे. लोक चिंतेत आहेत इ कारण internet वरुन download करण्याचे प्रमाण वाढले आहे. Is the internet going to go away? No, Internet is here to stay. म्हणून असा मार्ग शोधा ज्यात तंत्रज्ञान हे तुमच्या जीवनाचा एक भाग होऊ शकेल आणि तुम्ही त्याचा उपयोग कराल.

शिल्पा : आणि खास आमच्या सभासदांसाठी माहिती: तुमच्या आवडी निवडी काय आहेत? खाण्यात वगैरे?

भालेराव : मला सगळ्या प्रकारचं फूड आवडतं. इतकी वर्षं इथे राहिल्यामुळे, माझी भारतीय चव पार बदलून गेली आहे, इतकी की, मला जर का सकाळ संध्याकाळ वरण भात भाजी पोळी दिलीत तर पाचव्या दिवशी मला कुठेतरी इटालियन किंवा चायनीज किंवा काहितरी खावसं वाटतं. मला यातलं सगळंच आवडतं...

शिल्पा : पण त्यातल्या त्यात काही खास असे?

भालेराव : खास असे सगळेच! दाल्-बाटी, रबडी, तुम्ही म्हणाल ते..इंदोरी फरसाण. आता मी म्हातारा होत चालल्यामुळं कॅलरीज किती खाल्ल्या जातात या बाबतीत जागरुक आहे. मग मी इन्दोरला जातो आणि all that goes out the window. बाकी ठिकाणी असे होत नाही. मी जर Cheesecake factory मध्ये गेलो, तर मी कदाचित cheesecake खाणार नाही, पण मी इंदोरला गेलो की मला रबडी खावीशीच वाटते. माझ्या खाण्याच्या सवयी अगदी इंदोरी आहेत, माझी विचारसरणी एकदम इंदोरी आहे. मी जरी इंदोरपासून दूर असलो तरीदेखील इंदोर माझ्यामधेच आहे.

शिल्पा : आणि कुठले विशेष प्रिय कलाकार वगैरे?

भालेराव : आवडते कलाकर... असं होतं पहा, in music I am very partial to vocal. vocals मधे दोन spectrums आहेत. एकच जास्त आवडता असं नाही म्हणता येणार. कुमारांची निर्गुणी भजनं मला तितकीच आवडतात जितकी अजय पोहनकरांच्या ठुमर्‍या आवडतात. मला आमिरखाँ साहेबांचं शैबीदचं जे गाणं आहे ते तितकच आवडतं, जितकं बेगम अख्तर साहेबांच्या गझल आवडतात, आणि सुदैवाने इंदोरमध्ये राहिल्यामुळे हिंदी, मराठी, उर्दू, आणि इंग्रजी मध्ये तेवढीच गती आहे. त्यामुळे, असं एक नाही सांगता येणार की अमुक कलाकार आवडतात.. एक खंत आहे मला.. की जे 1c बन चुके 1d कलाकार आहेत आणि US चा दौरा करतात (हे गेल्या पाच सहा वर्षातलं आहे) आणि इथे येऊन पाट्या टाकतात, ते मला अजिबात आवडत नाही.. आणि मी आजकाल सगळे प्रसिद्ध कलाकार आहेत, त्यांच्या concerts ना जाणं बंद केलय. मला त्यांचे जुने ७०, ८०, ९० च्या दशकामधले live concerts होते ते ऐकण्यातच समाधान आहे. म्हणून आम्ही घरी जेव्हा concerts आयोजित करतो तेव्हा त्या नेहमी उदयोन्मुख कलाकारांच्या करतो. ज्यांची नावं झालेली नाहीत, जे जीव तोडून गातात, आणि तेच फक्त आहेत की जे खरच कलेची जोपासना करत आहेत. आता मी नावं नाही घेत, पण तुम्ही पेपर उघडून पाहिलात तर VVIP तिकिट 150 डॉलर्स ला विकत असतात.. हे वाईट आहे. मी सर्व प्रकारच साहित्य वाचतो... आणि माझं perspective open आहे.. लोकांचं विजय तेंडुलकरांच्या नाटकाबद्दल काय वाट्टेल ते मत असो, माझं मत वेगळं आहे...

शिल्पा : तुम्ही एक ठराविक genre वाचता की....?

भालेराव : माझं काय होतं की ठराविक genre नाही, पण मी कश्यात गुंतलो की त्याच्या मागे इतका लागतो...एकदा मला जपानी लेखकांबदाल interest निर्माण झाला. म्हणून मी सगळं जपानी साहित्य जमवलं. मग नंतर सत्यजित रेंच्या सिनेमाचे वेड लागले मग सगळे त्यांचे सिनेमे जमवले. तुम्ही जर मला असा प्रश्न विचारलात की 'यशस्वी' होणं म्हणजे काय तर त्याचं उत्तर असं, मी आता मला जे हवं ते, हवं तेव्हा करु शकतो. हीच माझी 'सक्सेस' ची व्याख्या आहे. म्हणून मला मी यशस्वी आहे हे वाटतं कारण, मला अकिरा कुरासावाच्या सगळे सिनेमे हवे असतील तर I can just go and get them. मला कोकणात जाऊन राहायचंय, असा नाही की मला तिथे जाऊन 5 star हॉटेल मध्ये रहायचंय. पण मला जे शौक आहेत ते मला पूर्ण करायचेत. काहीही त्याच्या आड येत नाही. पैश्यानं मला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे.

शिल्पा : तुम्हाला सध्या कश्यात रस आहे?

भालेराव : सध्या म्हणजे, माझं एक स्वप्न आहे की भारतात माझ्या मालकीचा एक जमिनीचा तुकडा असावा. मला एक दीडशे दोनशे ते अडीचशे एकर जमीन घेऊन अगदी natural ठेवायची आहे. मागच्या वेळी गेलो तेव्हा काही जागा पाहिल्या आणि एक मला वाटलं की I should buy the buffer zone around national forrests, म्हणजे कान्हा-किसलीच्या बाजूचा bufferzone घेऊन, जी जनावरं जंगल पार करुन पलीकडे पुढे जातात ते तसं न होता buffer zone मध्ये राहतील. It has it's own challenge. That didn't work out. काय होतय की त्या bufferzone च्या आजूबाजूची जे लोक आहेत, ते झाडं कापून नेतात. दुसरी कल्पना अशी होती की नर्मदेच्यामुळे काही जो भाग आहे जिथे वस्ती होणं शक्य नाही कारण पाणी तुम्हाला तिथे जाऊ देत नाही, तर अशी काही प्रॉपर्टी घेणे आणि पूर्णपणे निसर्गावर सोडून देणे, हे माझं स्वप्न आहे.

शिल्पा : वाह! हा एक उदात्त विचार आहे.

भालेराव : म्हणजे मला असं वाटलं आपल्याला देवाने दिलंय तर आपणही काहीतरी देणं लागतो ना. मुलांसाठी तुम्ही नेहमीच काही राखून ठेवता, पण त्यांनी स्वतःच्या क्षमतेनुसार काही केले पाहिजे. त्याना मोठं करायचं, शिक्षण द्यायचं, योग्य मार्ग, दृष्टी, विचारसरणी द्यायची. मग बाकीचं पुढचं त्यांच्या नशिबाने जे होईल ते.

शिल्पा : तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणा बद्दल थोडेसे.. तुमची हरकत नसेल तर...

भालेराव : My son is majoring in Medical cell Biology.

शिल्पा : म्हणजे तुमच्या क्षेत्रापेक्षा खूपच निराळे..

भालेराव : हो, अगदी वेगळे फील्ड. त्यांच्यापैकी कोणीच माझ्या पावलावर पाऊल टाकत नाही आहे. लहान असताना त्यांना नेहमीच वाटायचं की आपले वडील काय करतात, पण आता मोठं झाल्यावर आणि कॉलेजमध्ये जायला लागल्यावर, मला बोलताना ऐकलं किंवा लोकांना माझ्याबद्दल बोलताना ऐकलं की त्यांना आशा वाटते की एवढे सगळे लोक म्हणतायत आपले वडील काही चांगलं करतायत असं, तेव्हा खरंच तसं काहीतरी असावं. That has helped him think, that he will become an entrepreneur and do somehting different. मी आग्रह करुन नव्हे तर ते त्याला स्वतःलाच समजलं आहे. माझी मुलगीही अगदी वेगळ्या क्षेत्रात आहे. ती समाजसेवा करते. Social work in the sense she is working for a non-profit and she is thinking of going to India. तिला गडचिरोलीला जाऊन तिथे काही दिवस काम करायचं आहे.

शिल्पा : तुम्ही आमच्या साठी वेळ काढलात आणि तुमच्या carreer बद्दल, तुमच्या वैयक्तिक जीवना बद्दल, आमच्याशी इतक्या मोकळेपणाने बोललात, याबद्दल मी आपली आभारी आहे.

============================================
टीप : बहुतांश मुलाखत english मधुन झाली असल्याने, श्री भालेराव यांच्या संमतीने भाषांतर केलेले आहे.

आभार : संवाद या उपक्रमात सहभागी केल्याबद्दल Admin यांचे आभार. मुलाखत edit करण्यासाठी, देवनागरीकरणासाठी आणि इतर मदतीसाठी Lalu, svsameer, supriyaj, hems, Admin आणि श्रीपाद तोरवी यांचे आभार.

Taxonomy upgrade extras: 

Karadkar

Thursday, March 22, 2007 - 6:14 pm:

शिल्पा, छान झालीय ग मुलाखत. जरा वेगळे काहीतरी. रामायण / महाभारताचा संदर्भ वाचुन एकदम ट्युब पेटल्यासारखे झाले.

Good Work!!!

त्यांचे उगवत्या कलाकारांबद्दलचे उद्गार पटले!!

Mahaguru

Thursday, March 22, 2007 - 10:06 pm:

अतिशय सुंदर मुलाखत !
वेगळ्या व्यक्तीमत्वाचे अभ्यासपुर्ण मुलाखत घेवुन त्यांचे विचार मायबोलीकरांपर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद !

Bee

Thursday, March 22, 2007 - 11:45 pm:

काहीतरी वेगळ वाचायला मिळालं. शिल्पासहीत इतर साह्यकर्त्यांचेही आभार!

पण ते २६ २६ काय दिसत आहे काही प्रश्नांनंतर?

Giriraj

Friday, March 23, 2007 - 1:54 am:

आहा! मुलाखत संपूच नये असे वाटत राहीले.... नन्तर थोडी गुन्डाळ्यासारखी वाटली ती याचमुळे!काय पण माणसं असतात ना एकेक!!

शिल्पा,तुझे शतशः आभार इतकी सुंदर मुलाखत समोर आणल्याबद्दल! खूपच मस्त खुलवत नेलेय.. मुळातच व्यक्ति बोलघेवडी असवीशी वाटते!

Badbadi

Friday, March 23, 2007 - 2:46 am:

शिल्पा, जबरदस्त मुलाखत. आत्तापर्यंत "संवाद" मध्ये सगळ्यात जास्त आवडलेली आणि शब्दनशब्द वाचलेली हि मुलाखत..

तुम्ही जर मला असा प्रश्न विचारलात की 'यशस्वी' होणं म्हणजे काय तर त्याचं उत्तर असं, मी आता मला जे हवं ते, हवं तेव्हा करु शकतो. हीच माझी 'सक्सेस' ची व्याख्या आहे. >> अगदी खरं आहे हे.

Admin पासून मदत करणारे सगळे, प्रत्यक्ष मुलाखत घेणारी शिल्पा सगळ्यांनाच धन्यवाद. इतक्या मोठ्या आणि वास्तववादि माणसाची मुलाखतरूपी ओळख करून दिल्याबद्दल!!!

Asami

Friday, March 23, 2007 - 10:56 am:

first class एकदम. buffer zone chaa concept कसला अप्रतिम आहे.

Lalu

Friday, March 23, 2007 - 12:01 pm:

मला पण खूपच आवडली ही मुलाखत! तशी मोठी आहे तरी संपू नये असं वाटलं. त्यांनीही अगदी मोकळेपणाने उत्तरं दिली आहेत.
उद्योजक म्हणून वेगळ्या नजरेतून पाहिलेल्या गोष्टी, कला / साहित्याची आवड, जमिनीचं स्वप्न... सगळंच एकदम interesting!
शिल्पा, मस्त गं.

Maitreyee

Friday, March 23, 2007 - 12:36 pm:

कसलं जबरदस्त व्यक्तिमत्त्व!! त्यांची इतकी दिलखुलास मुलाखत सादर केल्याबद्दल शिल्पा आणि संवाद टीम चे अभिनन्दन!!

Hems

Friday, March 23, 2007 - 2:00 pm:

शिल्पा , खूपच छान झाली आहे मुलाखत.
तुझे प्रश्न आणि त्यांची उत्तरं दोन्ही अत्यंत यथोचित वाटताहेत.

Maitreyee

Friday, March 23, 2007 - 2:19 pm:

शिल्पा, फ़ोटू टाक की त्यंचा! नाहिये का?

Mahaguru

Friday, March 23, 2007 - 3:39 pm:

photo
more info

Sunidhee

Friday, March 23, 2007 - 6:40 pm:

वा.. छानच.. खुप चांगली माहिती मिळाली.

Kmayuresh2002

Friday, March 23, 2007 - 10:00 pm:

शिल्पा,मस्त झालीये गं मुलाखत.. आधीच्या संवादमधील मुलाखतींपेक्षा वेगळी आहे.. त्यामुळे वाचायला छान वाटले.. बरेच काही शिकण्यासारखे आहे यातुन.

Dineshvs

Friday, March 23, 2007 - 11:57 pm:

किती मनमोकळी मुलाखत आहे हि !!! काहिही हातचे राखुन न ठेवता बोलले आहेत ते.
आभार शिल्पा.

Gs1

Saturday, March 24, 2007 - 2:44 am:

मुलाखत खूप आवडली, भालेरावांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होतीच...

Chingutai

Saturday, March 24, 2007 - 1:07 pm:

शील्पा, अतिशय सुंदर संवाद! तुझे आणि टीमचे आभार. खूप वेगळा आशय बर्याच दिवसानी वाचायला मिळाला.

-चिन्गी

Peshawa

Saturday, March 24, 2007 - 9:59 pm:

sto chaanach jhaaliye mulaakhat...

Arch

Sunday, March 25, 2007 - 12:04 am:

शिल्पा छानच घेतली आहेस मुलाखत. मुलाखतीतून young generation ला छान मार्गदर्शनपण होत आहे.

त्यांना San Jose च्या अधिवेशनाच्यावेळी बघितल होत. त्यांनी आणि पाटील यांनी मिळून अधिवेशनासाठी भरपूर आर्थिक सहाय्यपण केल होत अस ऐकून होतो.

Mahesh

Sunday, March 25, 2007 - 12:56 am:

अज्ञानाबद्दल माफ करा, पण कोण आहेत हे प्रकाश भालेराव ?

Saavat

Sunday, March 25, 2007 - 2:00 am:

मुलाखत छान आहे!

रामायण,महाभारत,दासबोध हे Business point of view ने पहाणारे भालेराव, निर्सगाच देण काही अंशी फ़ेडण्याचा स्तुत्य विचार करणारे भालेराव, …..

मुलांचा विषय आल्यावर असे म्हणतात की, “म्हणजे मला असं वाटलं आपल्याला देवाने दिलंय तर आपणही काहीतरी देणं लागतो ना. मुलांसाठी तुम्ही नेहमीच काही राखून ठेवता, पण त्यांनी स्वतःच्या क्षमतेनुसार काही केले पाहिजे. त्याना मोठं करायचं, शिक्षण द्यायचं, योग्य मार्ग, दृष्टी, विचारसरणी द्यायची. मग बाकीचं पुढचं त्यांच्या नशिबाने जे होईल ते.”

म्हणजे ते देव,दैव,नशिबाला पण मानतात तर! विचार करण्यासारखा point आहे नाही!!

Maitreyee

Sunday, March 25, 2007 - 9:58 am:

महेश, शिल्पाने सुरुवातीलाच परिचय करून दिला आहे की! इथे महागुरु ने पण माहितीसाठी लिन्क दिली आहे ती पहा

Vhj

Sunday, March 25, 2007 - 11:12 pm:

शिल्पा खूपच छान मुलाखत घेतलीय. त्यांनीही अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत. तुझे आणि संवाद टिमचे अभिनंदन.

Mi_anandyatri

Monday, March 26, 2007 - 2:04 am:

शिल्पा, झकास मुलाखत..
मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे राम-कृष्ण यांना देवत्व बहाल न करता त्यांनी त्या कथांचा मानवी व्यावहारिक दृष्टीने केलेला विचार..
ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे..
रामायण आणि महाभारत यांत जगातले सर्व मानवी-स्वभावविशेष हाताळले गेले आहेत, पण आपण त्यांना देव बनवल्यामुळे अंधभक्ती करतो.. मला स्वत:ला राम आणि कृष्ण (त्यातही कृष्ण जास्त)हे देव न वाटता उत्तम "मॅनेजर्स" वाटतात...
कृष्णाच्या कालियामर्दन, गोवर्धन पर्वत, तसंच रामाच्या सेतू बांधणं, वनवासाचा स्वीकार, इ. कथाघटना खूप काही मानवी गुणांबद्दलच बोलतात, दैवी गुणांबद्दल नव्हे!
चुभूद्याघ्या.

Paragb

Monday, March 26, 2007 - 4:35 am:

Ms Shilpa, khoop chhan mulakhat ! Tyana punha ekvar bhetlyas 'Kanhach..'buffer zone ka vicharal.. Karan Maharashtrat Tadoba-Pench-Melghat ha purna zone kelyas kiti tari jyasta phark padnarey ! Ek natural...

Milindaa

Tuesday, March 27, 2007 - 9:24 am:

यात माझं काहीही कौतुक नाहिये.<<< ते तोंडदेखलं कौतुक आहे

चांगली झाली आहे मुलाखत. अगदी मोकळी.

Swaatee_ambole

Wednesday, March 28, 2007 - 2:05 pm:

मस्त झाली आहे मुलाखत. शिल्पा आणि सगळ्याच टीमचं अभिनंदन.

Svsameer

Thursday, March 29, 2007 - 5:51 pm:

शिल्पा छानच झाली आहे मुलाखत. भालेराव जरी मोकळेपणी बोलत असले तरी त्याना बोलतं केल्याबद्दल तुझं कौतुक.

लालुनेही खुपच मेहेनत घेतली देवनागरि मध्ये translate करायला त्याबद्दल तिचेही कौतुक.

Itsme

Friday, March 30, 2007 - 1:24 am:

व्वा, काय भारदस्त व्यक्तीमत्व आहे !! ... इतक्या सुरेख व्यक्तीची , इतकी छान ओळख करुन दिल्या बद्दल शिल्पाचे आभार.

खुपच छान झाली आहे मुलाखत.

Arvee

Saturday, March 31, 2007 - 4:07 pm:

ख़ुपच छान संवाद.............
मुलाख़त मुळात मोठी आहे तरीही संपु नये असेच वाटत होते. सतत असं वाटतय कि या माणसाकडे अजुनही बरचं काहि आहे सांगण्यासारख़ं...... आपल्याला जाणुन घेण्यासारखं........

रामायण, महाभारता संदर्भातले त्यांचे विचार भिडले.

शिल्पा, मुलाखतीची लय खुपच छान सांभाळुन ठेवलीत..... आभार.
आपल्याला सहकार्य करणार्‍या इतर सर्वाचे आभार.

राहुल

Saee

Wednesday, April 04, 2007 - 5:35 am:

अक्षर आणि अक्षर वाचनीय आहे या मुलाखतीतलं. शिल्पा आणि टीम, अभिनंदन. मस्त व्यक्तिमत्व आणि मस्त बातचीत.

Robeenhood

Monday, April 09, 2007 - 12:10 pm:

बापरे काय सुन्दर मुलाखत आहे.! जब्बरद्स्त...
घेणायाचे आणि देणा-याचे आभार आणि कौतुक...

फार दिवसातून अत्यन्त सकस लेखन वाचनात आले.जमल्यास भालेरावाना आमच्या भावना कळवा. शिल्पा तर घरचीच आहे. तिचे विषेश कौतुक. मायबोलीच्या शिरपेचातील ही मुलाखत म्हनजे एक नवीन तुरा.

(शेवटी श्रीपाद)तोरवी यान्च्या मदतीबद्दल आभार व्यक्त केलेत.त्यान्च्या मदतीचे स्वरूप काय? वेळी अवेळी डिस्टर्ब न करता मुलाखतीचे काम करू देणे हे तर नव्हे? ए. भा. प्र.)

Rahulphatak

Tuesday, April 10, 2007 - 3:30 am:

शिल्पा, खूपच छान !
मुलाखत सुरेख झाली आहे !
अश्या 'गप्पा' मला खूपच आवडतात ज्या बोली भाषेत सांगायच तर intellectually stimulating असतात..

perspective गोठू नये म्हणून प्रयत्नशील रहाणे आवडते त्यामुळे असे विचार नेहमीच वाचायला / ऐकायला छान वाटतात.
एक असेही की कलावंत म्हणवणार्‍यांतले छुपे 'business'man/woman नावडतात त्याउलट अतिशय यशस्वी उद्योजकांमधली कलासक्ती मोहित करते

तुझे आणि टीमचे मन्:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !

Badbadi

Monday, May 07, 2007 - 1:25 pm:

स्टो, ते देशात येतील तेव्हा पुणे- मुंबई मध्ये येणार असतील तर त्यांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल. त्यांना ते जमू शकेल का? इछा आहे का?

यात माझं काहीही कौतुक नाहिये... ते इतक्या मोकळेपणाने बोलले आहेत, कि आपोआपच चांगली झाली मुलाखत...

तरी म्हटले अजुन कोणी त्याबद्दल कसे नाही विचारले? नाही श्रीपाद ने audio convert करण्यात बरीच मदत केली. सगळे MP3 player वर record केले होते, ते नंतर मि आणि श्रीपाद ने text मध्ये convert केले... म्हणुन त्याचे आभार

मंडळी, प्रतिक्रियांबद्दल आभार.
श्री. प्रकाश भालेराव यांनी आणखी काही प्रश्न वगैरे असल्यास उत्तरे देण्याची इच्छा दर्शवली आहे. तेंव्हा या संधी चा फायदा घेऊन तुम्हाला त्यांना काही विचारायचे असेल तर जरूर कळवा.. प्रश्न इथेच post केलेत तरी चालेल..