कान्हा, कान्हा आन पडी मै तेरे द्वार

Submitted by स्वप्ना_राज on 18 August, 2011 - 01:41

"आजी ग, तुझ्या घरातला तो कृष्णाचा फ़ोटो कुठे आहे? ह्या घरात लावला नाहीयेस का?" आजोबा गेल्यानंतर आजी मुंबईला स्थायिक झाली त्यालाही १-२ वर्षं झाली होती. तिच्या घरात मी आणि आई गप्पा मारत बसलो होतो.
"कुठला ग?"
"नाही का मधल्या खोलीतून किचनकडे जाणार्‍या दरवाजाच्या वर लावला होता तो?"
"तो होय. अग सामानाच्या हलवाहलवीत कुठे गेला काय माहित. इथे मुंबईत आल्यावर सापडला नाही."
"शुअर आहेस तू? सगळं सामान पाहिलंस?" मी पुन्हा खोदून विचारलं.
"हो, पाहिलं ना. नाहीये कुठेच. पण तू का विचारतेयस?" आजीने थोडंसं आश्चर्याने विचारलं.
"मला हवा होता तो. फ़ार आवडायचा मला. सगळं सामान आलं आणि तो फ़ोटोच नेमका हरवला?" मी खट्टू होत म्हटलं.
"नशीबवान हो तू आई. स्वप्नाबाईंनी आज चक्क तुझ्याकडे काहीतरी मागितलं. नाहीतर स्वत:च्या वाढदिवसालासुध्दा आमच्याकडून काही गिफ़्ट घेत नाही तुझी नात." आई आजीला म्हणाली आणि दोघी हसल्या.

मला मात्र राहूनराहून कृष्णाचा तो फ़ोटो डोळ्यांसमोर येत राहिला. त्याच्या सावळ्या रुपाची मोहिनीच अशी जबरदस्त. आम्हा पामरांची ही स्थिती तर मग हिंदी चित्रपटसृष्टीला सदाबहार गाण्यांनी सजवणार्‍या गीतकार, संगीतकार आणि गायक-गायिकांना त्याची भुरळ पडली नसती तरच नवल होतं. ’सात सुरोंका संगम है जीवन गीतोंकी माला’ हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य. मग ’मुरलीधर’ हीच ओळख असलेल्या ह्या देवाची आठवण सुखाच्या, दु:खाच्या, कसोटीच्या अनेक क्षणी गाण्यांतून होत राहिली.

३३ कोटी देवांचा आपला हिंदू धर्म. पण आपल्या प्रत्येकाचेच काही खास देव लाडके असतात. ते का ह्याचं उत्तर काहींना देता येईल, तर काहींना नाही. ते देव नेमके कधीपासून आवडायला सुरुवात झाली ते विचारलं तर मात्र आपण बहुतेक सगळेच बुचकळ्यात पडू. नाही का? अगदी तसंच माझं आहे. कृष्णाच्या ठकड्या रुपाची मोहिनी आधीची का त्याच्या जन्मकथेचं गारूड आधीचं हे मला नेमकं नाही सांगता येणार. गारुड? हो, गारुडच. कारण ती कितीदा ऐकली तरी मनाचं समाधान होत नाहीच. अष्टमीची काळीकुट्ट रात्र. मध्यरात्रीची वेळ. पावसाने संततधार धरलेली, विजांचा चकचकाट, आकाशात ढग गडगडताहेत. सगळ्या पंचमहाभूतांना कृष्णजन्माची अधिरता. मथुरेच्या कारागृहात देवाचं आगमन झालं आणि दरवाज्यावरचे पहारेकरी गाढ झोपी गेले. कमनशिबी बिचारे! देव प्रथम त्यांच्या दारी आला पण त्या्च्या दर्शनाचं भाग्य़ त्यांच्या भाळी लिहायला सटवाई विसरली. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले. तान्ह्या बाळाला घेऊन वसुदेव बाहेर पड्ला ते थेट गोकुळाच्या दिशेने. देव झाला तरी मनुष्यरुपात आल्यावर त्यालाही विधीलिखीत चुकलं नाही. वाटेत आडवी आली यमुना - पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहणारी. बाळाला घेऊन वसुदेव त्या पाण्यात शिरला तरी पाणी हटायचं नाव काढेना. वाढत वाढत ते बाळाच्या पायांशी आलं. बाळकृष्णाच्या पायांना अभिषेक केला तेव्हाच यमुनेचं जळ शांत झालं. गोकुळातल्या यशोदेच्या शेजारी झोपलेल्या मुलीला उचलून वसुदेवाने तिथे कृष्णाला ठेवलं आणि तो आल्या पावली परत फ़िरला. जन्म दिला देवकीने पण त्याच्या बाळलीला पहायचं, साक्षात देवाला मोठं करायचं भाग्य मात्र नंदाच्या यशोदेच्या नशिबी होतं. आपल्या ह्या लाडक्या मोहनाला गाणं म्हणून उठवणारी माता यशोदा आपल्याला भेटते ते ’जागते रहो’ चित्रपटातल्या गाण्यात - जागो मोहन प्यारे.

’भाव तसा देव’ म्हणतात. जगाला आनंदच वाटायला आलेल्या यशोदेच्या कान्ह्याचं रुप मोठं लोभसवाणं - गोबरे गाल, भाळावर रुळणारे कुरळे केस, मोठाले काळेभोर डोळे, मुकुटात खोवलेलं मोरपीस, एक हात वाकून लोण्याने भरलेल्या मडक्यात घातलेला आणि चेहेर्‍यावर तरीही ’मैय्या मोरी मै नही माखन खायो’ असं यशोदेला बेलाशक सांगणारे खट्याळ भाव. जोडीला दु:ख विसरायला लावणारं मोहक हास्य आणि कमरेला खोचलेली बासरी. हां, आता तो यशोदा-नंदासारखा गोरा नाही. पण आषाढातल्या मेघांसारख्या त्याच्या या सावळ्या रुपाचंही ’सावरे’ म्हणू्न कौतुकच झालं. तरी कधीकधी त्याच रंगावरून सवंगड्यांनी चिडवल्यावर तो यशोदेला विचारतोच - यशोमती मैय्यासे बोले नंदलाला, राधा क्यॊ गोरी मै क्यो काला. *

तरी ह्या बदमाशाला पक्कं ठाऊक होतं की ’माखनचोर’, ’छलिया’ असा त्याचा कितीही उध्दार झाला तरी समस्त गोकुळवासीयांच्या गळ्यातला ताईत असल्यामुळे त्याला सगळे गुन्हे माफ़ आहेत. मग त्याच्या खोड्यांना उत यायचा - आपल्या मित्रांना घेऊन उंचावर टांगलेल्या मडक्यातलं लोणी फ़स्त करणं, स्नानाला गेलेल्या गोपींचे कपडे लपवून ठेवणे, बासरी वाजवून त्यांना आपल्या कामांचा विसर पाडणे असे उद्योग तो करायचा आणि मग लोक रोज यशोदेकडे तक्रार घेऊन यायचे. ती बिचारी काय करणार? त्याला शिक्षा केली नाही तर लोक म्हणणार यशोदेने कृष्णाला फ़ार डोक्यावर चढवून ठेवलंय. बरं, शिक्षा करावी तर हेच गोकुळवासी तिला रागवणार आणि त्यांच्या लाडक्या कान्ह्याची रदबदली करायला येणार. देवाची आई होणं काही खायचं काम नाही कारण त्याच्या डोक्याला सार्‍या जगाचा ताप. त्याच्यापासून त्याला वाचवायचं तर तिच्या मायेच्या पदराची सावली तितकीच विशाल हवी. यशोदेची हीच स्थिती सांगतंय ’अमर प्रेम’ मधलं ’बडा नटखट है रे’.

डोळ्यांसमोर त्याचं सावळं रूप आणि कानात त्याच्या बासरीचे सूर. नंदाच्या प्रजेला आणखी हवं होतं काय? ’बन्सी-बजय्या’ची हा पावा त्यांना त्यांची सगळी दु:खं विसरायला लावायचा पण त्याच्या नादात त्यांच्या गोपिका सडासंमार्जन करायला विसरायच्या, गाईंचं दूध काढायला विसरायच्या, कामधाम घरदार विसरायच्या. ’नको वाजवू श्रीहरी मुरली" म्हणणार्‍या, नदीवर पाणी आणायला गेलेल्या, मथुरेच्या बाजारात दुधदुभतं विकायला गेलेल्या गोपी कधी मुरलीचे मधुर सूर काढणार्‍या ह्या जादुगाराभोवती कोंडाळं करून बसतील ह्याचा काही नेम नसायचा. एक राधाच बावरी झाली नव्हती तर तिच्या सगळ्या सख्याच कदंबाच्या सावलीत कृष्णप्रेमाने वेड्या झाल्या होत्या. नंदकिशोराभोवती फ़ेर धरून नाचणार्‍या ह्या ब्रिजबाला पूर्ण जाणून होत्या की हा देव फ़क्त प्रेमाचा भुकेला आहे. हे प्रेम मिळालं की तो आपला आणि फ़क्त आपलाच. म्हणून तर त्या पूर्वेकडून वहात येणार्‍या वार्‍यालासुध्दा प्रेमाने दटावताहेत - चुपके चुपके चल री पूर्वेया. हळूच ये हं कारण आमचा लाडका किसना अलगूज वाजवतोय.

एक राधा, एक मीरा, दोनोने शामको चाहा
अंतर क्या दोनोकी चाहमे बोलो
एक प्रेम दिवानी, एक दरसदिवानी

कृष्णाच्या बायका सोळा सहस्त्र एकशे आठ. पण त्याच्या नावाबरोबर जोडीने दोन नावं येतात ती राधा आणि मीरा ह्यांची. राधेचं प्रेम गोकुळात फ़ुललं. विवाहिता असलेली, कृष्णावर जीवापाड प्रेम असलेली, त्यासाठी लोकांच्या टीकेची धनी झालेली आणि तरी त्याच्या बासरीचे सूर आसमंतात घुमायला लागले की सगळं काही विसरून धावत निघालेली राधा युगानुयुगं भक्तीचं आणि प्रेमाचं प्रतीक बनून राहिली आहे. मीरा राजघराण्याची सून पण तिच्या कृष्णभक्तीने तिला विषाच्या प्याल्यापर्यंत नेलं आणि त्यातून तारलंसुध्दा. ह्या दोघींत श्रेष्ठ कोण असं विचारलं तर साक्षात कृष्णालासुध्दा सांगता यायचं नाही. कारण त्याच्या लीला सर्वांसाठी, त्याचं प्रेम सर्वांसाठी आणि त्याच्या बासरीचे सूरही सर्वांसाठीच. सगळे भक्त त्याच्यासाठी सारखेच महत्त्वाचे. ’गीत गाता चल’ मधल्या गाण्याचे शब्द नेमकं हेच सुचवतात - श्याम तेरी बंसी पुकारे.

पण त्याच्या भक्तीत, प्रेमात आकंठ बुडालेल्यांना हे कसं मान्य व्हावं? किती झालं तरी ती माणसंच. आणि माणसांना आपली आवडती व्यक्ती फ़क्त आपलीच असावी असं वाटत असतं. कृष्णाचा सहवास फ़क्त आपल्यालाच मिळावा, त्याचं बोलणं फ़क्त आपणच ऐकावं, त्याची प्रेमळ नजर फ़क्त आपल्याकडेच वळलेली असावी आणि त्याने आपली लाडकी बासरी फ़क्त आपल्यासाठीच वाजवावी असं त्यांना सगळ्यांनाच वाटत असतं. आता देव झाला म्हणून मनुष्यरुपात तो एकाच वेळी सगळ्यांसोबत थोडाच राहू शकणार? मग सुरू होतात तक्रारी. "कुठे गेला होतास तू?" अशी खुद्द देवाची झाडाझडती घेतली जाते. त्याच्यावर ’चितचोर’ असल्याचा आरोप होतो आणि त्याच्या बिचार्‍या बासरीला कट्यारीची उपमा मिळते. ह्यावर कृष्ण काय म्हणतो? काहीच नाही. तो आपल्या मुकुटातल्या मोरपीसाला मंदपणे झुलवीत हसतो आणि पुन्हा बासरी ओठांना लावतो. कारण त्याला माहित असतं की तिचं संगीत सुरु झालं की कोणाला काहीच लक्षात रहात नाही - अगदी त्याच्याबद्दलच्या तक्रारीसुध्दा. ’बुढ्ढा मिल गया’ ह्या चित्रपटातलं हे गाणं ऐका म्हणजे ह्या तक्रारीत काही दम आहे की नाही ते तुम्हालाच कळेल - आयो कहासे घनश्याम.

एक गोष्ट तुम्ही वाचली असेल. समुद्रकिनार्‍यावर एक व्यक्ती बसलेली असते. आकाशात तिच्या जीवनातले सुख-दु:खाचे क्षण चमकून जात असतात. आणि त्याच वेळी किनार्‍यावरच्या वाळूत पावलांच्या २ खुणा असतात - एक त्या व्यक्तीच्या आणि दुसया साक्षात ईश्वराच्या. ती व्यक्ती अगदी लक्षपूर्वक त्या खुणा न्याहाळत असते. तिच्या लक्षात येतं की जेव्हा तिच्या आयुष्यात कसोटीचे, दु:खाचे, पराभवाचे क्षण आले तेव्हा वाळूत फ़क्त एकाच पावलांचे ठसे होते. न रहावून ती देवाला विचारते की जेव्हा मला तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तू कुठे होतास? तुझ्या पाऊलखुणा माझ्याजवळपासही दिसत नाहीत मला. देव हसतो आणि म्हणतो ’कश्या दिसणार? तेव्हा मी तुला उचलून घेऊन चालत होतो. तुला दिसताहेत त्या पाऊलखुणा माझ्या आहेत’. माणसाची ही तक्रार फ़ार पुरातन आहे. आपण आनंदी असतो तेव्हा देव आसपास नसला तरी चालतं आपल्याला. खरं तर तो नसेल तर आपल्या लक्षातही येत नाही. पण दु:खाची नुस्ती चाहूल लागली की कावरेबावरे होऊन आपण त्याला शोधायला लागतो. हाडामासांच्या डोळ्यांना तो दिसत नाही आणि मनाच्या डोळ्यांना दिसण्याइतके आपण पुण्यवान नसतो. ही आपलीच चूक खरी पण तरी आपण त्यासाठी त्यालाच दोषी धरतो. तो नाहीच असं समजून त्याला दूषणं द्यायला लागतो. जवळपास सगळ्यांचीच ही कथा. पण लाखांत, करोडोंत एखादीच अशी असते जी सुख असो वा दु:ख, कृष्णाकडे येते आणि म्हणते की तुझ्या राधेसारखी नाही बाबा मी, तिच्याइतकी भक्ती कदाचित माझ्याकडे नाही. तिच्याइतकं वेडं प्रेमही नसेल पण जशी आहे तशी माझ्या गुणदोषांसकट आलेय. माझे भाव मातीमोल ठरव किंवा माझ्या आयुष्याचं सोनं कर, मला पर्वा नाही. कारण मला फ़क्त तुझ्या पायांशी जागा हवी आहे - कान्हा, कान्हा आन पडी मै तेरे द्वार.

माझा एक मित्र खूप वैतागला की नेहमी ऐकवतो "जन्माला आल्यावर मरेपर्यंतचा वेळ कसा घालवायचा म्हणून आपण हे शिक्षण, नोकरी, लग्न वगैरे भानगडीत पडतो आणि मग त्याच्यात अडकतो. उगाचच त्रास". आणि मग काही दिवसांनी हाच मित्र आपलं हे तत्त्वज्ञान विसरून जातो. हाच शाप आपल्या सगळ्यांना आहे. आपण भवसागर तारून ने म्हणून प्रार्थना करतो पण आपण भवसागरात आहोत हेच आपल्याला बर्‍याचदा कळत नाही, किंवा कळून वळत नाही. सुखाची गादी असली तर नाहीच नाही. दु:खाचे काटे बोचायला लागले की उपरती होते, पण ती तेव्हढ्यापुरतीच. शाश्वत सत्य डोळ्यांसमोर ठेवून जगता येईल का? कोणास ठाऊक. पण ते जमलंच तर सुख आणि दु:खाचं पारडं आपल्या नजरेत सारखंच राहील. मग त्यांच्याकडे लक्षही जाणार नाही. कारण नजर लागलेली असेल ती हरीच्या सावळ्या चरणांकडे. मग आपणही म्हणू - मनमोहन कृष्ण मुरारी, तेरे चरणॊंकी बलिहारी, वारी वारी जाऊ मै बनवारी.

पापपुण्याचा हिशोब चित्रगुप्ताच्या वहीत असतो म्हणतात. खरंखोटं देव जाणे. पण तसाच हिशोब आपल्या प्रत्येकाच्या मनात असतोच असतो. ’मी काही चुकीचं केलेलं नाहिये’ असं कितीही वरकरणी म्हटलं, कितीही कारणं दिली तरी आत कुठेतरी आपल्याला पक्कं ठाऊक असतं आपण वागतोय ते बरोबर की चूक ते. कधीकधी तर बरोबर काय ते कळूनसुध्दा आपला नाईलाज असतो. मग आपण स्वत:शीच खूप चडफ़डतो, वैतागतो. आणि शेवटी ह्या जगात रहायचं तर जगरहाटीप्रमाणे वागलंच पाहिजे असं म्हणून मोकळे होतो. कारण त्याच्याविरुध्द जायला बळ लागतं. ते नेहमी नेहमी कुठून आणायचं हा प्रश्न असतो. त्यामुळे कितीही त्रास झाला, कितीही ठेचा लागल्या, कितीही धक्के बसले तरी दुनियेशी, त्यातल्या माणसांशी जमवून घ्यायलाच लागतं. म्हणूनच काही लोकांचं कौतुक वाटतं कारण त्यांनी मुळी ठरवूनच टाकलेलं असतं की त्यांच्या आयुष्याचा आधार फ़क्त त्यांचा कालीकमलीवाला आहे. बाकीच्या लोकांशी त्यांचं काही देणंघेणं नाही - बनवारी रे, जीनेका सहारा तेरा नाम रे.

आता पुन्हा जन्माष्टमी येतेय. मध्यरात्रीला कृष्णजन्माचा गजर होईल. सकाळी "गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा’ चा पुकारा करत गल्लीगल्लीतून गोविंदांचे थवे निघतील. उंच टांगलेल्या हंड्या थर लावून फ़ोडण्याची स्पर्धा लागेल. "हाथी, घोडा, पालखी, जय कन्हैय्यालालकी" च्या घोषात फ़ुटलेल्या हंडीतलं दही-लोणी गोविंदांना भिजवेल. पण ह्या सार्‍या गदारोळात बासरीचे सूर कुठेच नसतील.

आणि मग एके दिवशी ध्यानीमनी नसताना गर्दी भरून वाहणार्‍या रस्त्यावरून एखादा बासरीवाला बासरी वाजवत जाईल. रस्त्यावरच्या सगळ्या आवाजांना छेद देत ते सूर आसमंतात भरून राहतील. यमुनेच्या काळ्या डोहाची, गर्दहिरव्या मोरपिसाची, धुंवाधार पावसात एका करंगळीवर तोललेल्या गोवर्धनाची, कदंबवृक्षाच्या दाट छायेची, कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या गीतेची आणि हजार हत्तीचं बळ देणाया पांचजन्याची आठवण करून देतील.

जब होगा अंधेरा तब पायेगा दर मेरा
उस दरपे फ़िर होगी तेरी सुबह
तू ना जाने आसपास है खुदा.

तो आहे, माझ्या आसपासच आहे. म्हणूनच माझं फ़क्त शेवटचं नाही तर प्रत्येक घरटं त्याच्याच अंगणात असावं असं मला मनापासून वाटतं.

-----

* - ह्याच चित्रपटातलं 'भोर भये पनघटपे' सुध्दा गोड आहे. कधी ऐकलं नसल्यास जरूर ऐका.

वि.सू. १ - 'गोविंदा आला रे आला' आणि 'शोर मच गया शोर' ही दर जन्माष्टमीला लाऊडस्पीकरवरून ठणाणणारी गाणी वाजण्यापूर्वी कृष्णावरची आणखी काही जुनी हिंदी गाणी सर्वांनी ऐकावी ह्या 'महान' उद्देशातून हा लेख लिहिला आहे :फिदी:. लेख आवडला नाही तरी गाणी निराश करणार नाहीत ह्याची खात्री बाळगा.

वि.सू. २ - गोल्डन इरातल्या गाण्यांवरच्या आधीच्या लेखांची लिंक माझ्या विपूत आहे. आपल्या जबाबदारीवर ते वाचावेत. Happy

- - - - - - - - -

वाचकांच्या प्रतिसादात आलेली गाणी (सावली, तुझ्या सूचनेबद्दल शतशः आभार!):

हिंदी
१. आन मिलो आन मिलो शाम सावरे - देवदास
२.इक राधा इक मीरा दोनो ने शाम को चाहा (राम तेरी गंगा मैली)
३. एरी मै तो प्रेमदिवानी - नैबहार
४. ऐसी लागी लगन (अनुप जलोटा)
५. ओ नटखट कान्हा चुरायी चोली चुनरी रे काहे
६. ओ पालनहारे.. (लगान)

७. कान्हा जा रे, तेरी मुरलीकी धुन सुन सपनोंमे गुमसुम (तेल मालिश बूट पालिश)
८. कान्हा रे कान्हा तूने लाखो रास रचाये
९. कान्हा बजाए बन्सरी - नास्तिक
१०. काहे कान्हा करत बरजोरी (बावर्ची)

११. राधाची लाडिक तक्रार असलेलं गाणं "क्या है इस बासुरीयामें जो मुझमे नही है सावरीया कभी होठोंसे मुझे भी लगाले बासुरी बनायके रे बासुरी बनायके" (गीत).
१२. गोकुल कि गलियोंका ग्वाला, नटखट बडा नंदलाला (रास्ते प्यार के)
१३. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो

१४. जा तोसे नही बोलू कन्हैया, राह चलत पकडी मोरी बैंया (परिवार)
१५. जोगिया से प्रीत किये दुख होय (गर्म कोट)
१६. जो तुम तोडो पिया - झनक झनक पायल बाजे
१७. जो तुम तोडो पिया - सिलसिला

१८. तेरे भरोसे हे नंदलाला
१९. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे
२०. निंद चुराये, चैन चुराये डाका डाले तेरी बन्सी
२१. नटखट बन्सीवाले गोकुल के राजा... (सौदागर)

२२. पनघटपे कन्हैया आता है (विद्यापती)
२३. पांव पडूं तोरे श्याम ब्रिजमें लौट चलो
२४. पियाते कहा गयो (तूफान और दिया )
२५. बन्सी बाजेगी राधा नाचेगी (सौदागर)
२६. बन्सी क्यू गाये (परख)
२७.बिसरत जाये मोसे कान्हा रे (बेगम परवीन सुलताना )
२८. बिरजमे होली खेलत नंदलाल (गोदान)

२९. मनमोहना, मनमोहना (जोधा अकबर)
३०. मनमोहना बडे झूठे, हार के भी हार नही माने बडे झूठे (सीमा)
३१. मनमोहन मन मे हो तुम्ही (कैसे कहू)
३२. मुरली मनोहर कृष्ण कन्हैया, जमुना के तट पे विराजे है(झनक झनक पायल बाजे)
३३. म्हाणे चाकर राखो ( तूफान और दिया )
३४. मुरलीया बाजेगी ( तूफान और दिया )
३५. मधुबन मे राधिका नाचे रे (कोहीनूर)
३६. मोहे पनघट पे (मुगले आझम)
३७. मोहे छेडो ना नंद के लाला (लम्हे)
३८. माई म्हारो सुपणामां परण्या रे दिनानाथ (लता - चला वाही देस)
३९. मोरे कान्हा जो देखे पलटके (सरदारी बेगम)
४०. मेरे तो गिरधर गोपाल (मीरा)
४१. मेरे श्याम तेरा नाम बोले मन सुबह-शाम

४२. राधिके तूने बन्सरी चुरायी (बेटीबेटे)
४३. राधा प्यारी, दे डारो ना बन्सी मोरी (लता - चला वाही देस)
४४. राधा ना बोले ना बोले ना बोले रे(आझाद)
४५. राधा राधा प्यारी राधा (कंगन)
४६. राधा कैसे ना जले (लगान)
४७. रैना बिती जाये, शाम ना आये...
४८. वृंदावन का कृष्ण कन्हैय्या सबकी आँखोंका तारा (मिस मेरी)
४९. शाम ढले जमुना किनारे, आजा राधे आजा तोहे शाम पुकारे (पुष्पांजली)
५०. शाम, घनशाम बरसो (लता - राम शाम गुनगान)
५१. शाम बिना नही चैन (उपशास्त्रीय)
५२. श्याम रंग रंगा रे हर पल मेरा रे (चित्रपट: अपने पराये, गायक येसुदास)
५३. श्याम से नेहा लगाये राधे नीर बहाये
५४. सावरा रे, म्हारी प्रीत निभाजो जी (लता - चला वाही देस)
५५. साँवरे, साँवरे, काहे मोसे करे जोराजोरी (अनुराधा. लताबाई)
५६. मालिनी राजूरकर यांनी गायलेली, देस ठुमरी... होली खेलनको चले कन्हैया..

५७. मोरे श्याम मोरे श्याम

मराठी:

१. अग नाच नाच नाच राधे उडवूया रंग
२. अजन्मा जन्मासी आला
३. अजून नाही जागी राधा
४. अरे मन मोहना रे - आशा भोसले (बाळा गाऊ कशी अंगाई)

५. असा कसा देवांचा देव बाई ठकडा
६. आज गोकुळात रंग खेळतो हरी
७. उधळीत येरे गुलाल, तू शाम मी राधिका (गंमत जंमत)

८. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
९. घननीळा लडीवाळा (माणिक वर्मा)
१०. गेला मोहन कुणी कडे (आशा भोसले)
११. गोपगड्यांसह कृष्णकन्हैया आज खेळतो होळी ग, आज नको यमुनेचे पाणी चल जाऊ माघारी ग.
१२. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. (अमर भूपाळी)

१३. चरणी तुझीया मज देई वास हरी (माणिक वर्मा)

१४. तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा - लता मंगेशकर
१५. तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे
१६. त्या सावळ्या तनूचे मज लागले पीसे ग (माणिक वर्मा)
१७. थोरांहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर.
१८. दे रे कान्हा चोळी अन लुगडी ( पिंजरा)
१९. नको वाजवू श्रीहरी मुरली
२०. नको रे कृष्णा रंग फेकू चुनडी भिजते, मध्यरात्री चांदण्यात थंडी वाजते.
२१. नाच नाचुनी अति मी दमले - आशा भोसले (जगाच्या पाठीवर)
२२. नाही खर्चली कवडी दमडी - सुधिर फडके आशा भोसले (जगाच्या पाठीवर)
२३. नंदाचा पोर आला आडवा
२३अ. नीज माझ्या नंदलाला - कवी मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे, गायिका लता मंगेशकर

२४. डसला मजला निळा भ्रमर सखी (माधुरी करमरकर - कुसुमाग्रज व बोरकर)

२५. प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
२६. बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी - माणिक वर्मा
२७. बांधा उखळीला याला बांधा उखळीला
२८. ब्रिजलाला गडे
२९. भरजरी ग पितांबर दिला फाडून - आशा भोसले (शामची आई)
३०. मी मज हरपून बसले ग (आशा भोसले)
३१. माना मानव वा परमेश्वर (सुधीर फडके)

३२. मज वरी रुसली मनिनी राधा
३३. मी राधिका मी प्रेमिका (आरती अंकलीकर)
३३अ. मुरलीधर घनश्याम सुलोचन - कवी शांताराम नांदगावकर, संगीत दशरथ पुजारी, गायिका कुमुद भागवत
३३ब. या मीरेचे भाग्य उजळले गिरीधर माझ्या स्वप्नी आले - कवी आत्माराम सावंत, संगीत दशरथ पुजारी, गायिका सुमन कल्याणपूर

३४. याचे हातीचा वेणू कुणी घ्या गं
३५. राधा कृष्णावरी भाळली - आशा भोसले
३६. राधा गौळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन - आशा भोसले
३७. रात्र काळी घागर काळी,यमुनाजळे ही काळी गे माय
३८. वसुदेव निघाले नंदघरी
३९. विमोह त्यागुनी कर्मफलांचा (सुधीर फडके)
४०. सखी गं मुरली मोहन मोही मना
४१. सावळाच रंग तुझा (माणिकताई)
४२. सांज ये गोकुळी सावळी सावळी (वजीर)
४३. श्याम मी भ्याले घन बघुनी (इंदुमती किलपाडी-पैंगणकर ऊर्फ कानन कौशल.)

४४. हले हा नंदाघरी पाळणा
४५. हासत नाचत जाऊ, जाऊ चला गोकुळाला
४६. हे शामसुंदर राजसा मनमोहना - किशोरी आमोणकर
४७.हरिनाम मुखी रंगते - कवी शांताराम नांदगावकर, संगीत अनिल अरुण, गायिका आशा भोसले
४८. दर्पणी बघते मी गोपाळा

कृष्णगीतांच्या ओळींसाठी जिप्सीने दिलेली लिंक - हे श्यामसुंदर

ही आणखी काही गाणी. लिंक्स शोधून नंतर अपडेट करेन.

मेरे लाल मेरे नंदलाला, सगरे जगत का तूही रखवाला
जय गोबिन्दा गोपाला
मेरे मनमे बसे नंदलाला
जाओ जाओ नंदके लाला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुरेख आणि समयोचित लेख !!!!
आवडला Happy

एक राधा, एक मीरा, दोनोने शामको चाहा
अंतर क्या दोनोकी चाहमे बोलो
एक प्रेम दिवानी, एक दरसदिवानी>>>>अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक Happy

अजुन काही (माझ्याकडुन :-)):
१. राधाची लाडिक तक्रार असलेलं गाणं "क्या है इस बासुरीयामें जो मुझमे नही है सावरीया कभी होठोंसे मुझे भी लगाले बासुरी बनायके रे बासुरी बनायके" (गीत).

२. गोकुल कि गलियोंका ग्वाला, नटखट बडा नंदलाला (रास्ते प्यार के)

३. मनमोहना, मनमोहना (जोधा अकबर)

४. बन्सी बाजेगी राधा नाचेगी (सौदागर)

५. मोहे छेडो ना नंद के लाला (लम्हे)

धन्स अनघा_मीरा, साधना, जिप्सी. सगळ्याच गाण्यांचे व्हिडीओज त्या लिंकवर असतील असं नाही पण गाणी नक्की ऐका. फार सुरेख आहेत.

मला वाटतं रफीचं 'बडी देर भई नंदलाला' असंही एक भजन आहे. पण मी ते ऐकलं नाही म्हणून ह्या लेखात घातलं नाही.

एक माझ्याकडून पण,
निंद चुराये, चैन चुराये डाका डाले तेरी बन्सी
या गाण्यात मौसमी अंध असते आणि अ‍ॅक्शन करून गाते.

स्वप्ना, छानच आहे.
पण मन खट्टू पण झाले कारण माझ्या आवडीची अनेक गाणी यात नाहीत. या गाण्यांवर असे लिहिलेले वाचायला खुपच आवडेल

१) जा तोसे नही बोलू कन्हैया, राह चलत पकडी मोरी बैंया
२) कान्हा जा रे, तेरी मुरलीकी धुन सुन सपनोंमे गुमसुम, बैठी है राधा जिया हारे, हारे
३) मुरली मनोहर कृष्ण कन्हैया, जमुना के तट पे विराजे है (झनक झनक पायल बाजे)
४) बन्सी क्यू गाये (परख)
५) म्हाणे चाकर राखो / पियाते कहा गयो / मुरलीया बाजेगी ( तिन्ही, तूफान और दिया )
६) जोगिया से प्रीत किये दुख होय
७) कान्हा रे कान्हा तूने लाखो रास रचाये
८) मधुबन मे राधिका नाचे रे (कोहीनूर)
९) मोहे पनघट पे (मुगले आझम-- यावर आधी लिहिलेय )
१०) राधिके तूने बन्सरी चुरायी (बेटीबेटे)
११) शाम ढले जमुना किनारे, आजा राधे आजा तोहे शाम पुकारे
१२) बिसरत जाये मोसे कान्हा रे (बेगम परवीन सुलताना )

यातली बहुतेक गाणी यू ट्यूब वर आहेत. शेवटचे मात्र कुठेच सापडत नाही.

महेश, हो, हे गाणं राहिलंच. Sad

दिनेशदा, मी १,३, ५(२), ८ आणि ९ सोडून बाकीची गाणी ऐकलेली नाहीत Sad ८ आणि ९ मिस केली हा मात्र माझा अक्षम्य गुन्हा आहे. Sad

स्वप्ना, आहेत यु ट्यूबवर.

आणि गोदान मधले,

बिरजमे होली खेलत नंदलाल
ग्वाल ग्वाल संग रास रचाये,
उडत अबीर गुलाल..

आणि शास्त्रीय संगीतात तर अशी अनेक रत्ने आहेत, पण इझी लिसनिंग म्हणून, मालिनी राजूरकर यांनी
गायलेली, देस ठुमरी... होली खेलनको चले कन्हैया... अवश्य ऐकण्याजोगी. हि रचना पण नेटवर आहे.

नाही सापडली, तर संध्याकाळी लिंका देईन.

आणखी काही गाणी:

१) राधा प्यारी, दे डारो ना बन्सी मोरी (लता - चला वाही देस)
२) शाम, घनशाम बरसो (लता - राम शाम गुनगान)
३) डसला मजला निळा भ्रमर सखी (माधुरी करमरकर - कुसुमाग्रज व बोरकर)
४) सावरा रे, म्हारी प्रीत निभाजो जी (लता - चला वाही देस)
५) त्या सावळ्या तनूचे मज लागले पीसे ग (माणिक वर्मा)
६) चरणी तुझीया मज देई वास हरी (माणिक वर्मा)
७) गेला मोहन कुणी कडे (आशा भोसले)
८) मी मज हरपून बसले ग (आशा भोसले)
९) माई म्हारो सुपणामां परण्या रे दिनानाथ (लता - चला वाही देस)
१०) माना मानव वा परमेश्वर (सुधीर फडके)
११) विमोह त्यागुनी कर्मफलांचा (सुधीर फडके)
१२) घननीळा लडीवाळा (माणिक वर्मा)

स्वप्ना मस्त झालाय लेख. मला आवडणारी आणखी काही -

एरी मै तो प्रेमदिवानी - नैबहार
कान्हा बजाए बन्सरी - नास्तिक
जो तुम तोडो पिया - झनक झनक पायल बाजे आणि सिलसिला
आन मिलो आन मिलो शाम सावरे - देवदास

उधळीत येरे गुलाल, तू शाम मी राधिका
आज गोकुळात रंग खेळतो हरी
अग नाच नाच नाच राधे उडवूया रंग
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
आणि हिंदीतले सर्वात भारी की जे अजुन कोणालाच सुचले नाहीये,
रैना बिती जाये, शाम ना आये...

सर्वांना प्रतिसादाबद्दल आणि गाण्यांबद्दल खूप खूप धन्यवाद! Happy

दिनेशदा, यूट्यूबवर शोधून नक्की ऐकेन मी.

>>रैना बिती जाये, शाम ना आये.

हो, हेही राहिलंच Sad

दर जन्माष्टमीला तीच तीच गाणी ऐकून वैताग येतो. ह्यानिमित्ताने अनेक चांगल्या गाण्यांबद्दल कळलं हे छान झालं. लेख लिहिण्याचा उद्देश सफल झाला Happy

काहे कान्हा करत बरजोरी (बावरची)
शाम बिना नही चैन (उपशास्त्रीय)
मी राधिका मी प्रेमिका (आरती अंकलीकर)
राधा ना बोले ना बोले ना बोले रे
साँवरे, साँवरे, काहे मोसे करे जोराजोरी (अनुराधा. लताबाई)
ऐसी लागी लगन (अनुप जलोटा)
सावळाच रंग तुझा (माणिकताई)
मोरे कान्हा जो देखे पलटके (सरदारी बेगम)
दे रे कान्हा चोळी अन लुगडी ( पिंजरा)

छान लिहिलयस Happy
लेखाच्या निमित्ताने पुन्हा सुरेख गाण्यांच्या आठवणी चाळवल्या गेल्या.

वा मस्तच. गाणी ऐकणार घरी जाऊन.

खाली सगळ्यांच्या प्रतिसादात आलेली गाणी ( आणि शक्य असल्यास लिंक Proud ) मुळ लेखात शेवटी टाकणार का प्लिज ? Happy

स्वप्ना, नेहमीप्रमाणेच हा लेखही मेजवानीच Happy सध्या आई इथे आली आहे तिला तुझा हा लेख आणि आधीचे लेख दाखवलेत. तिला तुझे खूप कौतुक वाटले.

कुणी मला मराठी "बांधा उखळीला याला बांधा उखळीला" असे काहीसे शब्द असणारे कृष्णाचे गाणे/ शब्द / लिंक देऊ शकेल काय? प्लीज... खूप वर्षांपासून शोधतेय.

दर जन्माष्टमीला तीच तीच गाणी ऐकून वैताग येतो. ह्यानिमित्ताने अनेक चांगल्या गाण्यांबद्दल कळलं हे छान झालं. लेख लिहिण्याचा उद्देश सफल झाला>>>>>अगदी अगदी. धन्स स्वप्ना Happy

माझ्या लहानपणी आमच्या घराशेजारी असलेल्या देवळात कृष्णजन्माष्टमीच्या आधी भजनी मंडळे येऊन भजने सादर करत असत. त्यातली काही भजने तर गेली अनेक वर्षे ऐकायलाच मिळाली नाहीयेत.
आता ही दोनच आठवत आहेत...
१. याचे हातीचा वेणू कुणी घ्या गं
२. असा कसा देवांचा देव बाई ठकडा

>>. असा कसा देवांचा देव बाई ठकडा

हे माझ्या आज्जीला यायचे. ती म्हणायची ते आठवले एकदम. Happy आता हीच एक ओळ आठवते आहे पण Sad
कोणाकडे असल्यास इथे पोस्ट कराल का प्लीज?

पुन्हा एकदा सर्वांचे आभार! प्रिंसेस, तुमच्या आईला माझ्यातर्फे नमस्कार आणि धन्यवाद सांगा प्लीज.

>>खाली सगळ्यांच्या प्रतिसादात आलेली गाणी ( आणि शक्य असल्यास लिंक फिदीफिदी ) मुळ लेखात शेवटी टाकणार का प्लिज

हो तर, कृष्णासाठी एव्हढं नाही करणार का मी? Happy लिंका मात्र विकांताला शोधून टाकेन. आता नुसती लिस्ट टाकते.

अजुन काही
१. वृंदावन का कृष्ण कन्हैय्या सबकी आँखोंका तारा,
मन ही मन क्यूँ जले राधिका, मोहन तो है सब का प्यारा
२. मनमोहना बडे झूठे, हार के भी हार नही माने बडे झूठे

Pages