शम्मी कपूर

Submitted by ट्युलिप on 14 August, 2011 - 10:31

शम्मी कपूरवर या आधीच का बीबी काढला गेला नाही माहीत नाही. आता तो गेल्यावर काढण्याची बुद्धी व्हाही हे दुर्दैव. पण निदान त्यानिमित्ताने का होईना आपल्याला शम्मीबद्दल सतत बोलत रहाण्याची संधी घेता येऊ शकेल. त्याला श्रद्धांजली म्हणून हा बीबी.
शम्मी कपूर का आवडतो याची कारणे अनलिमिटेड. त्याच्यावर चित्रित झालेलं प्रत्येक गाणं, प्रत्येक सीन केवळ सुंदर! माझ्या दृष्टीने सर्वात रोमॅन्टिक, सर्वात देखणा, व्हर्सटाईल अभिनेता म्हणजे शम्मी कपूर.
शम्मी आपल्यात आता नाही, एक युग समाप्त झालं असं काही होऊच शकत नाही त्याच्या बाबतीत. लिजन्ड्स लाईक हिम आर फॉरेव्हर.

माझं सर्वात आवडतं गाणं -
तुमने मुझे देखा होकर मेहेरबां
दिवाना मुझसा नही
हम और तुम और ये समां
जवानियां ये मस्त मस्त बिन पिये
दिवाना हुवा बादल
दिल तेरा दिवाना है सनम
एहसान तेरा होगा मुझपर
दिल के झरोके में
ओ हसिना
ओ मेरे सोना रे
कही ना कही पे
येह दुनिया उसीकी

हा अन्याय आहे. मला सगळीच गाणी आवडतात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> पराग दुव्याबद्दल धन्यवाद. छानच आहे डॉक्युमेंटरी.
अनुमोदन ! मी कालच पाहिली ती फिल्म. इंटरव्ह्यु /डॉक्युमेंटरी कशी असावी याचा उत्तम नमुना! धन्यवाद पराग!

'मनोरंजन' च्या दुनियेत सर्वार्थाने 'प्रोफेसर' असलेल्या शम्मी कपूरबद्दल एकच म्हणता येईल ~ "तुमसा नही देखा".

आज कल तेर मेरे प्यार के चर्चे हर जबान पर..
अयय्या करु मै क्या?? सुकु सुकु.
बदन पे सितारे लपेटे हूये
तारीफ करू क्या उसकी? आणिक पण खुप आहेत..

तुम मुझे यूं भुला ना पाओगे’ असे अजरामर बोल मागे ठेवून जाणार्‍या शम्मी कपूर यांना सिनेरसिक कसे विसरू शकतील!

>>>प्रोफेसरमधेच ऐ गुलबदन गाण्यात ती केशरी एम्ब्रॉयडर्ड टोपी, तसाच शर्ट जॅकेटच्या आत घालून एका फ्रेममधे डोक्याच्या बाजूला केशरी फुलं डोकावत असतात त्यात इतका इतका कमाल देखणा दिसलाय तो

अगदी अगदी.. 'दिवाना मुझसा नही' गाण्याअगोदर.. आशा पारेखबरोबर चार पाच वाक्यापाठोपाठ 'पिछे पिछे' त्याने ज्या प्रकारे म्हटलय त्याला तोड नाही.
'तारीफ करु क्या उसकी' मध्ये शिकार्‍यामध्ये त्याने केलेली धमाल.. फक्त आणि फक्त शम्मीच हवा तिथे.

ट्यु, आपले अंताक्षरी दिवस आठवले. Happy
शम्मीची गाणी अगदी भरभरून लिहायचो.. Happy

ओ मेरे सोना रे सोना रे (या गाण्यात शम्मी कपूर त्या बॅगेसोबत जे काय करतो ते दुसर्‍या कुणाला सुचणार पण नाही. आशाइतकीच ती बॅग पण गाण्याची हिरॉइन आहे >>> अगदी, अगदी! परफेक्ट! मी ही एकदा ते गाणं केवळ त्या बॅगेसाठी पाहिलं होतं. मग समाधान झालं नाही म्हणून संपूर्ण पिक्चर पुन्हा एकदा पाहिला होता.

झक्की, मस्त आठवण आहे तुमची. Happy

लालू, किरु,
पाहिलं रे ते गाणं... Happy

गाण्याच्या शेवटी आशा पारेख रडायला का लागते ते ही आठवत नाहीये. श्या! आता सिनेमा पहावा लागणार परत...

खूप छान वाटलं ही लिन्क वाचून चिनूक्स. अभिमानच वाटतो शम्मीजींचा. इतकं स्टारी, लोकप्रिय आयुष्य इंडस्ट्रीत काढल्यावर जेव्हा ते मेनस्ट्रीममधून बाजूला झाले तेव्हा इतर स्टार्ससारखं जुन्या दिवसांमधेच फक्त रमून न जाता इतक्या सर्वस्वी वेगळ्या, तांत्रिक क्षेत्रात त्यांनी आपला वेळ सत्कारणी लावला. तरुण पिढीशी नात जोडून ते कायम तरुण हृदयाचेच राहीले.

शम्मीजींच्या स्टारी वागण्याच्या, नखर्‍यांच्या, उद्धटपणाच्या जितक्या अफवा फिल्म इंडस्ट्रीत पसरल्या होत्या तितक्या कुणाच्याच नसतील. त्यात तथ्य असेल किंवा नसेल पण इंडस्ट्रीतले नव्या जुन्या सगळ्या पिढीतले लोक त्यांच्या प्रत्यक्षातल्या मोकळ्या, आपुलकीच्या, तेहझिबने परिपूर्ण वागण्याची कायम स्तुतीच करत आले आहेत.

आठवणी रसाळपणे सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. मग ते रेडिओ मिर्चीवरचं पुरानी जीन्स मधे असो, परागने दिल्यात त्या लिन्क्स असोत, त्यांनी स्वतः केलेले शम्मी कपूर अनप्ल्ग्ड व्हिडिओज असोत किंवा वेगवेगळ्या चॅनल्सच्या मुलाखती. ते भरभरुन बोलत. त्यांच्या आणि गीता बालीच्या लग्नाचा किस्सा कितीही वेळा ऐकला तरी मन भरत नाही.

शम्मीजी पृथ्वी थिएटर्सच्या कामातही मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. शशी कपूरच्या 'पृथ्वीवालाज' पुस्तकात खूप छान उल्लेख आहेत त्याचे. (हे एक पुस्तक सर्वांनी वाचलच पाहीजे असं आहे. अप्रतिम.)

शम्मीजींच्या निधनाची बातमी ऐकून खूप खिन्न, उदास वाटत राहीलं. रात्री दहा नंतर मस्ती चॅनलवर हमखास त्यांच्या फिल्म्समधली गाणी लागत. ती बघणं हा अतीव आनंदाचा अनुभव होता. गाणी अजूनही लागत रहातील पण आता त्यातला शम्मीही रफी प्रमाणेच 'होता' कॅटेगरीत गेला याचं दु:ख काळजात कळ निश्चित उमटवून जाईल.

कॉलेजात असताना मुंबईतल्या काही (हमखास भंगार) थिएटर्समधे शम्मी कपूरचे (आणि जेम्स बॉन्डचेही) मॅटिनी लागायचे. प्रॅक्टिकल्स बुडवून आम्ही कुठे कुठे ते सिनेमे बघायला जायचो. टिव्हीवरच शम्मीचे सिनेमे बघण्यात समाधान मानायला लागलेली आमची पिढी. जन्मही झाला नव्हता तेव्हा त्याचे सुपरहिट सिनेमे येऊन गेलेले. पण आई-बाबा, काका सगळेच घरातले त्याचे फॅन्स. ( आता रात्री त्याची गाणी बघत असताना मुलीही प्रचंड आवडीने गाणी एंजॉय करतात हे फक्त शम्मीच्याच बाबतीत शक्य.) त्यामुळे असे मॅटिनीला मोठ्या पडद्यावर शम्मी कपूरला बघणे ही पर्वणीच होती. क्वचितच अशी संधी यायची.
एकुण तीन सिनेमे पाहीले त्याचे बिग स्क्रीनवर. काश्मिर की कली, प्रोफेसर आणि अ‍ॅन एव्हिनिंग इन पॅरिस. जंगली पहायचा होता पण तो रिरनला कधी लागलाच नाही.
दादरच्या शारदा थिएटरमधे काश्मिर की कली पाहिला तेव्हा ये चांद सा रोशन चेहरा सुरु झालं आणि आख्खं थिएटर उभं राहून टाळ्या वाजवत गाणं म्हणायला लागलं तो अनुभव थरारक होता. त्यानंतरही प्रत्येक गाण्याला सगळे उभे आणि शिट्ट्या, टाळ्या. शम्मीचं गारुड अजब होतं.

काल शम्मी कपूरची गाणी बघत असताना वाटलं की आता वर स्वर्गात गीता बालीला तो भेटला असेल. शिवाय किती छान मेहफिल भरेल यारदोस्तांची वर. रफी, गोल्डी, आरडी, शम्मी, नासिर हुसेन मिळून तीसरी मंझिलचा सिक्वेल प्लॅन करतील. हिरॉईन म्हणून गीताला घेतील. हे म्हणजे सोन्याच्या चषकात शम्मीजींची आवडती अ‍ॅन्टिक्विटी भरल्यासारखेच होणार Proud

शिवाय किती छान मेहफिल भरेल यारदोस्तांची वर. रफी, गोल्डी, आरडी, शम्मी, नासिर हुसेन मिळून तीसरी मंझिलचा सिक्वेल प्लॅन करतील. >>> Happy

>>रात्री दहा नंतर मस्ती चॅनलवर हमखास त्यांच्या फिल्म्समधली गाणी लागत.
सोडवत नाही हे चॅनेल अगदी. 'उशीर होतोय, झोपायला जाऊ यात" म्हणून टीव्ही बंद करायला जावं तर नेमकं शम्मीचं एखादं गाणं लागतं. मग कसलं उठवतंय टीव्हीसमोरून. Happy

शम्मी गेल्याचं वाचून वाईटच वाटलं पण सगळ्यात पहिली कुणाची आठवण आली असेल तर ती तुझीच ट्यु.
काल पेपरात त्याच्याबद्दल माहित नसलेली गोष्टह कळली ती म्हणजे तो किती नेट सॅव्ही होता हे. सगळ्या सोशल साईट्सची त्याला भयंकर आवड होती.

आता त्याचे सगळे पिक्चर बघितल्यावर तो आता नाही ह्याचं वाईट वाटतच रहाणार.

मी टाईम्स नाऊ चॅनेलवरच्या प्रोग्रॅममध्ये पाहिलं की शम्मीला एरॉनॉटिकल इंजिनियर व्हायचं होतं. बरं झालं नाही झाला ते Happy

तुम मुझे यूं भुला ना पाओगे...गेले दोन दिवस त्याच्याविषयी वाचून, लंपनच्या भाषेत सांगायचं तर घसा सारखा दुखत होता. तो एवढा आवडत होता हे माहितच नव्हतं Sad खुपच वाईट वाटतय आणि आता त्याच्याविषयी एवढी माहिती वाचून जास्तच कारण तो असताना तो असणारचं आहे हे गृहितच धरुन कधी जास्त काही जाणूनच घेतलं नव्हतं. हातचं गमावल्याशिवाय त्याची किम्मत कळत नाही हेच खरं.

तुम मुझे यु भुला ना पाओगे आणि एहसान तेरा होगा मुझपर ही दोन गाणी माझ्या पप्पाची जाम फेवरेट. (तसा शम्मी कपूरच त्याच्या फार आवडीचा.) तो गेल्याची बातमी त्याना कुणीतरी सांगितल्यावर त्यानी त्याच्या एका ज्युनिअरला बोलावून कंपनीच्या अनाऊन्समेंट सिस्टीमवर शम्मीची ही दोन गाणी लावायला लावली. लहानपणी आजोबा त्याना शम्मी कपूरचे पिक्चर असतील तरच पिक्चरला जायला पैसे द्यायचे. त्याच्या पिक्चरमधे बालमनावर विपरित परिणाम होतील असे काही नस्तं यावर आजोबाचा ठाम विश्वास होता म्हणे.

ट्यु, शम्मीचे आणि राज कपूरचे दोघाचे डोळे (करिश्मा कपूर पण.... नकोच पण इथे) दिसायला सारखेच. फरक तोफक्त एक्स्प्रेशन्समधेच!! इंटेन्स, मस्तीभरी, रोमँटिक, नजर म्हणजे काय याचा ट्युटोरीअल म्हणजे शम्मी.

शम्मीजी पृथ्वी थिएटर्सच्या कामातही मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. शशी कपूरच्या 'पृथ्वीवालाज' पुस्तकात खूप छान उल्लेख आहेत त्याचे. (हे एक पुस्तक सर्वांनी वाचलच पाहीजे असं आहे. अप्रतिम.)

>>> शर्मिला, अनुमोदन.

शर्मिला, तू लिहीलेले खूप आवडले. बाकी लिन्क्स पाहिल्या नाहीत अजून, पाहून सांगतो.

एक दोन ऑफ बीट गाणी देतोय त्याची

हे नव्या परवरिश मधले. शम्मी च्या सेकंड इनिंग मधले. बच्चन आणि विनोद पुढे तो तेवढाच "भारी व्यक्तिमत्त्व" वाटतो. येथे त्याला शैलेन्द्र सिंग चा आवाज आहे, ते ही जरा वेगळे.
http://www.youtube.com/watch?v=xqXZ1kkyqbo

आणि ही दुसरी लिन्क. शम्मीला क्वचितच किशोर चा आवाज दिला गेला होता. हे तसे एक
http://www.youtube.com/watch?v=EXGC_-jZtWk

अजुनही खुप वाईट वाटतय, म्हणुन वरील कोणत्याच लिंका पाहिल्या नाहीयेत. Sad .. नंतरच केव्हातरी पाहणार.

सर्वांनी खुप छान आठवणी लिहिल्यात शम्मीच्या.
शम्मीच्या कलाकारीबद्दल , दिसण्याबद्दल, नाचाबद्दल सर्वांना पुर्ण पुर्ण अनुमोदन..

ट्युलीप, दु:खात सहभागी आहे. Sad

शम्मी तो गया यार! एकेक सांधे तुटत चालले आहेत. रफी, किशोर, संजीवकुमार, दादामुनी इन किस्मत अ‍ॅन्ड महल!

काहीच बोलायचे नाही आहे आता!

छान लिहीलत शर्मिला तुम्ही. त्याच्या बाबतीत भरभरुन लिहावंसं वाटतं पण नेमके शब्द सुचत नाहीत. बातमी कळल्यापासून एकदम भकास वाटतय नुसतं. मला तर शम्मी खुप उशिरा आवडायला लागला. लहान असताना फक्त अ‍ॅक्शन सिनेमांचे आकर्षण जास्त असल्यामुळे शम्मीचे सिनेमे कधी पाहणं झाले नाही. गाण्यांचे ही तसेच, रफी वगैरे लहान असताना खुप ऐकला पण ऐकला म्हणजे वडिल लावायचे आणि माझ्या खेळता खेळता कानावर पडायचे येवढच. जसा रफीच्या आवाजात काय जादू आहे हे उशिरा कळायला लागलं तसच शम्मी काय चीज आहे ते ही जरा उशिराच लक्षात आलं. त्याची एनर्जी लेवल आणि एक वेगळाच, बघता क्षणी प्रसन्न करणारा स्क्रीन प्रेजेन्स जाणवल्या शिवाय राहत नाही. त्यानी केलेला दंगा हा त्यालाच शोभून दिसणार.
माणसाचे रुप काही त्याच्या हातात नसतं पण ज्यांना त्याची देणगी मिळाली अशा किती लोकांनी त्यातून अशी वेगळीच जादू विणली?
त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल पण माहिती मिळत राहायची. शम्मीचे आधीचे (गीता बाली जाऊ पर्यंतचे) आयुष्य अगदी चार्म्ड असावे असच वाटतं आणि त्याचमुळे नंतर त्याला लागलेलं गालबोट बघता अजून आश्चर्य वाटतं. आश्चर्य ह्या करता की येवढं दु:ख भोगून सुद्धा त्याची "नो कंप्लेंट्स" अ‍ॅटिट्युड आजिबात बदलली नाही.
मी त्याला प्रत्यक्ष कधीच बघितला नाही त्यामुळे तो आता गेल्याने खरच कितपत फरक पडतो पण तरी कधीतरी तो भेटेल ही अंधुकशी आशा होती ती ही आता गेली.

janam janam ka saath hai nibhane ko - tumse achha kaun hai so beautiful song........

माझा सगळ्यात आवडता हिरो - शम्मी कपूर
काल कुठेतरी काश्मीर की कली लागला होता..
किती धमाल करतो हा माणूस.. नुसता धसमुसळा, देखणा कल्लोळ, त्याच्या 'जाण्याची' बातमी वाचून इतके वाईट वाटले. ती सगळी मस्त मस्त गाणी आठवली. त्यातली शम्मीची पेशल अदाकारी, ते स्टाईलबाज कपडे, पडद्यावरचा मुक्त संचार, उड्या काय, हसणे काय, नुसता उत्साहाचा झंझावात होता तो.
गेल्या काही वर्षांमधे आन्तर्जलावर, टीवी वर त्याच्या मुलखती बघितल्या.. एक स्वत:च्या लोकप्रियतेची पूर्ण खात्री असलेला आणि आता उतारवयाचा हल्ला सहजी स्विकारणारा खरा सुपरस्टार वाटला मला.
- खरच तुमसा नही देखा...

Pages