चांदणे आहे खरे की भास नुसता? (तरही)

Submitted by बागेश्री on 11 August, 2011 - 02:03

डॉक्टर सर, माझा सहभाग!! आनंदयात्री, तुझे मनापासून आभार!! Happy
_______________________________

चांद सजला, आसमंती खास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता?

दरवळ तुझा, वेड लावी, चित्त चोरी
भान हरते, मात्र चाले, श्वास नुसता....

गोड हसणे, रुसुन बसणे, लाजणेही
सत्य-मिथ्ये, काय जाणू, त्रास नुसता....!!

जाग यावी मज शबनमी आठवांनी
का ठरावे, वेड हे, आभास नुसता?

पाश माझे भोवती आता नकोसे?
बेगडी जगणे असे, उपहास नुसता...!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जाग यावी मज शबनमी आठवांनी
का ठरावे, वेड हे, आभास नुसता?............ व्वा !!

महिल्या मिसर्‍यात जाग यावी शबनमी मज आठवांनी असं केल्यास जास्त लयीत होतंय. अर्थात हे सुद्धा छानच. Happy

हळुवार्,तरल गझल. अभिनंदन. Happy

प्रयत्न बरा आहे...

डॉक, तुम्ही म्हणताय तसे केले तरच लयीत होतंय...

दरवळ ह्या शेरातही वृत्त चुकले आहे...आपण सहज दुरुस्त करू शकाल बागेश्री... दोन वेगवेगळ्या शब्दांतील दोन लघु एक गुरू म्हणून योजू नयेत कधी Happy

शुभेच्छा!!

शबनमी आठवांनी - लय भारी! Happy
शेवटचा मस्त!
शुभेच्छा! Happy

दरवळ ह्या शेरातही वृत्त चुकले आहे.. >> ते कसे काय बुआ??
उच्चाराची सहजता नाहीये, पण वृत्त बरोबर आहे (हेमाम.).

मला सगळीच गझल खूप आवडली.
विशेष आवडत्या ओळी:

>>दरवळ तुझा, वेड लावी, चित्त चोरी
भान हरते, मात्र चाले, श्वास नुसता....

बागेश्री - गझल या प्रकाराचा मूड समजून घ्या. प्रणय कविता किंवा शबनमी आठव या सारखे शब्द दिशाभूल करतात गझलकाराचीच!

प्रयत्नाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा! Happy

जाग यावी मज शबनमी आठवांनी
का ठरावे, वेड हे, आभास नुसता?

>>>>>>>>>>>>>

"जाग यावी आठवांनी शबनमी अन" असं केलेस तर जास्त छान वाटतेय वाचताना Light 1

बाकी काही शेर एकदम मस्त झालेत. झकास..... Happy

बागेश्री,
गजल मस्त जमलीय. वाचतान मजा आली. ३/४ वेळेस वाचली . दरवळ शेराबाबत तज्ञांनी मते दिलीच आहेत. मी काय सांगणार? इतकेच सांगू शकतो की मी विगळ्या प्रकारे शेर लिहिला असता. पुलेशु

आवडेश Happy

मनापासून आभार, प्रतिसादांसाठी !!

कणखरजी, आपल्या मार्गदर्शानासाठी आभार... मी लक्षात ठेवेन आणि दोन वेगवेगळ्या शब्दांतील दोन लघु एक गुरू म्हणून योजणार नाही पुन्हा Happy !!

निशीजी, आभार!
मी आत्ता अगदी पहिल्या पायरीवरच आहे, गझलेच्या, अनुभवांतून सहजपणा येत जाईल अशी आशा आहे
लोभ असावा...

कणखरजी,
"दोन वेगवेगळ्या शब्दांतील दोन लघु एक गुरू म्हणून योजू नयेत कधी"
आनंदयात्रीजी,
"दोन वेगवेगळ्या शब्दांतील दोन लघु एक गुरू म्हणून योजू नयेत कधी >> हम्म्म... सहमत."

वरील नियमासंबंधात सुरेश भटांचा एक प्रसिध्द शेर खाली देत आहे.

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

वरील शेराच्या पहिल्या मिस-यात इतकेच मधील "च" आणी मला मधील "म" या दोन वेगवेगळ्या शब्दातील दोन -हस्वांना मिळवून एक गुरू झाला आहे.हे बघता गजलेतील शेर योग्य वाटतो.
खरे काय आहे याबद्दल मंथन व्हावे.

<<<<वरील नियमासंबंधात सुरेश भटांचा एक प्रसिध्द शेर खाली देत आहे.

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

वरील शेराच्या पहिल्या मिस-यात इतकेच मधील "च" आणी मला मधील "म" या दोन वेगवेगळ्या शब्दातील दोन -हस्वांना मिळवून एक गुरू झाला आहे.
खरे काय आहे याबद्दल मंथन व्हावे. >>>>
=======================================

निशिकांतजी, आपण त्या मतल्यातील लघु गुरू क्रम पाहिलात तर लक्षात येईल की ते मात्रा वृत्त आहे. Happy

कणखर व नचिकेत अक्षरगणवृत्ताबाबत म्हणत आहेत. Happy

अर्थात, कुणी असेही म्हणेल की '१४ वेळा गा' असलेले ते वृत्त आहे.

मात्र त्या गझलेची ही खालील ओळ पाहिल्यास ते मात्रावृत्तच असल्याचे पुन्हा सिद्ध होईल.

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो

Happy

कणखर व नचिकेत अक्षरगणवृत्ताबाबत म्हणत आहेत. >>> हेच खरे आहे निशिकंतजी Happy

अरे वा..

गोड हसणे, रुसुन बसणे, लाजणेही
सत्य-मिथ्ये, काय जाणू, त्रास नुसता....!! ------- हेही मस्त !!!