'आऊट ऑफ द बॉक्स' - हर्षा भोगले

Submitted by चिनूक्स on 9 August, 2011 - 13:40

भारतीय क्रिकेटचा चेहरा आणि आवाज म्हणून जगन्मान्य असलेल्या हर्षा भोगलेनं पहिल्यांदा क्रिकेट सामन्यांचं धावतं समालोचन केलं, त्याला आता एकवीस वर्षं होतील. उणीपुरी पाच वर्षं हर्षानं रेडिओवर समालोचन केलं. मग भारतात उपग्रह वाहिन्यांनी पाय पसरायला सुरुवात केली, आणि ’भारतीय क्रिकेटचा चेहरा’ अशी नवी ओळख हर्षाला मिळाली. टीव्हीवरची त्याची समालोचनं गाजलीच, शिवाय ’हर्षा की खोज’ हा त्याचा कार्यक्रम, त्याचे प्रश्नमंजूषेचे कार्यक्रमही प्रेक्षकांनी उचलून धरले. क्रिकइन्फोनं २००८ साली त्याला ’सर्वोत्तम समालोचक’ हा किताब बहाल केला. त्यामुळे खेळाडू नसलेला हा क्रिकेटमधला तसं पाहिलं तर पहिला सेलिब्रिटी. मात्र हर्षानं स्वत:ला रेडिओ किंवा दूरचित्रवाणीपुरतंच मर्यादित ठेवलं नाही. क्रिकेटवरचं प्रेम त्यानं वृत्तपत्रांतल्या स्तंभांद्वारे सामान्यांपर्यंत पोहोचवलं. टीव्हीच्या पडद्यावर जे दिसतं, त्यापेक्षा खूप वेगळं चित्र त्यानं आपल्या लेखांद्वारे वाचकांना दाखवलं. कॆमेर्‍यानं दाखवलेला खेळ अधिक प्रभावीपणे लेखणीच्या मदतीनं पोहोचवण्याची अद्भुत किमया त्यानं सहज साध्य केली.

’आऊट ऑफ द बॉक्स’ हे हर्षाच्या इंडियन एक्सप्रेसमधल्या स्तंभाचं नाव. कॉमेण्ट्री बॉक्समध्ये बसून पाहिलेला खेळ हर्षानं या स्तंभाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला. क्रिकेटच्या खेळात झालेले बदल, वाढलेला वेग त्याच्या अभिजात लेखणीनं अचूक टिपले. त्यावर संयत भाष्यही केलं. हे बदल कसे आवश्यक आणि अपरिहार्य, हे वाचकांना समजावून सांगितलं. त्याबरोबर खेळातली उत्कंठा, आवेशही त्यांच्यापर्यंत पोहोचवला. धोनी, सेहवाग यांच्या खेळाच्या समीक्षेपासून ते भारतीय कोचांच्या मूल्यांकनापर्यंत, बीसीसीआयच्या अर्थकारणापासून आयपीएलमधल्या अटीतटीच्या लढतींपर्यंत, वादग्रस्त रोटेशन पॉलिसीपासून संशयास्पद बोलिंग अ‍ॅक्शनीपर्यंत त्यानं क्रिकेटच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. लारा, इंझमाम, जयसूर्या, गांगुली, द्रविड, सेहवाग आणि सचिन या आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंबद्दल जिव्हाळ्यानं लिहिलं. क्रिकेट या खेळाबद्दलची समज वाढवण्याचं काम हर्षाच्या लेखांनी केलं.

गेल्या पाच-सहा वर्षांत इंडियन एक्स्प्रेसमध्ये लिहिलेल्या लेखांचा संग्रह पुस्तकरूपानं गेल्या वर्षी प्रसिद्ध झाला. यावर्षी रोहन प्रकाशनानं या पुस्तकाचं मराठी भाषांतर प्रसिद्ध केलं आहे. टी-२० सामने, एक दिवसीय सामने, कसोटी सामने, असामान्य क्रिकेटपटू आणि काही मतं...क्रिकेटच्या भल्याविषयी अशा पाच विभागांत हे पुस्तक आहे. प्रत्येक लेख जास्तीत जास्त दोन किंवा तीन पानांचा, आणि प्रत्येक लेखाखाली संदर्भ आणि काही घटनांचं स्पष्टीकरण आहे.

नेव्हिल काडस, सीएलआर जेम्सपासून वूडहाऊस, डिकन्सपर्यंत अनेकांनी क्रिकेटबद्दल अतिशय प्रेमानं लिहिलं. हर्षानंही आपल्या सुरेख लेखांमुळे या थोर लेखकांच्या मांदियाळीत जागा मिळवली आहे. भारतीय उपखंडात क्रिकेटवर लिहिल्या गेलेल्या सर्वोत्तम पुस्तकाचं प्रास्ताविक सचिन तेंडुलकरच्या शब्दांत आणि पुस्तकातले दोन लेख...

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Out-Of-The-Box-Cricket.html

OutOftheBox_Cover.jpg

प्रास्ताविक

'...मग हलकेच तुम्ही हे जग हलवू शकता!'

- मोहनदास करमचंद गांधी

पहिल्यांदा मी जेव्हा हर्षाला भेटलो, तेव्हा तो एका क्रीडा पाक्षिकासाठी माझी मुलाखत घेत होता. मी चौदा वर्षांचा होतो तेव्हा. ती संध्याकाळ मला अंधूक अंधूक अजूनही आठवते. शिवाजी पार्क मैदानाच्या खेळपट्टीवर आम्ही मांडी ठोकून बसलो होतो. एका मुलाखतीचं रूपांतर बोलता बोलता क्रिकेटविषयक चर्चेत कधी झालं, कळलंसुद्धा नव्हतं! एक कसलेला समालोचक आणि सूत्रधार म्हणून हर्षानं मोठा पल्ला मारला आहे. त्याचा हा प्रवास जवळून पाहत आल्यानं ही प्रस्तावना लिहिताना माझ्या मनात उचंबळून आलं आहे.

आपल्या या देशात अक्षरशः लाखो लोक क्रिकेट नावाच्या खेळानं वेडावलेले आहेत आणि अशा वेड लावणार्‍या खेळाच्या प्रेमाचंच करिअर करण्याचा अनोखा मार्ग चोखाळणार्‍या एका व्यक्तीची भेट पुढच्या पानांमध्ये होणार आहे. अशी कारकीर्द घडू शकते, हे काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी कुणाच्या गावी नव्हतं. एखाद्या गोष्टीत तनामनानं सर्वस्व ओतलं, तर शिखर गाठता येतं, या उक्तीचा चालताबोलता धडा म्हणजे हर्षा असं मला वाटतं. भारतासाठी खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं, पण ते साकार झालं नाही, तसं त्यानंच जाहीर सांगितलं आहे. पण तरीही क्रिकेटच्या खेळाशी त्यानं आपलं घट्ट नातं शाबूत राखलं. इतकंच नव्हे, तर या खेळाच्या वाढीत स्वतःची अशी भर टाकली. खेळाबद्दलची एकंदर समज वाढवण्यातही हर्षाचा मोठा वाटा आहे.

हर्षाला भेटल्यावर पहिल्यांदा नजरेत भरते ती त्याची अफलातून विनोदबुद्धी आणि अत्यंत बारकाईनं तपशील हुडकणारे डोळे. आणि हो, त्याचं ते कमालीचं संसर्गजन्य खेळकर हास्य! गंभीरपणे बोलायचं झालं तर, त्याच्याशी बोलताना कधीकधी अचानक असा काही वेगळाच दृष्टिकोन मिळून जातो, की वाटतं, हे आपल्याला आधी कसं सुचलं नाही? किंवा आपलाच दृष्टिकोन तो अधिक व्यापकही करून जातो. त्याची क्रिकेटची जाण केवळ असामान्य अशी आहे आणि याच गुणाच्या जोरावर, समालोचनाच्या क्षेत्रातील भल्याभल्यांच्या रांगेत हर्षानं अल्पावधीत मानाचं स्थान मिळवलं.

स्वतःचं स्वप्न साकार करू पाहणार्‍या काही वाचकांना या पुस्तकातून निश्चितच एक दिशा आणि प्रेरणा मिळेल, याची मला खात्री आहेच, पण आपापल्या क्षेत्रात नेतृत्व कसं करावं आणि व्यावसायिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय दर्जा अंगी कसा बाणवावा, याचेही काही मंत्र मिळून जातील.

त्याला मन:पूर्वक खूप शुभेच्छा!

- सचिन तेंडुलकर

*****

निरोप एका थोर लढवय्या भारतीय सेनापतीला!

अस्तंगत होणार्‍या सूर्याकडे टक लावून पाहता येतं पण तोही सूर्यच असतो. तेजस्वी, तरीही त्याचं मावळतीचं रूप उबदार अन् लोभस असतं. आंतरराष्ट्रीय क्षितिजावरून मावळतीकडे झुकण्यासाठी सौरव गांगुलीने एक चांगला दिवस निवडला. निवृत्तीचा सोपान चढणं त्या क्षणी त्याच्यासाठी अपरिहार्य नव्हतं. यापूर्वीही त्याने स्वतःसाठी संधी निर्माण केली होती. अशी संधी त्याने हातातून निसटू दिली नव्हती. या वेळीही त्याने तेच केलं. निवृत्तीसाठीच्या संधीचा क्षण नेमका पकडला. बॅटमधून रन्सचा ओघ आटलेला नसतानाही हा दादा बॅट्समन सूर्यास्ताकडे निग्रहाने पावलं टाकत गेला.

महान माणसाच्या थडग्यावरही लेख लिहिले जातात. पण जेमतेम पस्तिशीच्या खेळाडूच्या बाबतीत तो लिहिला जावा, यापरते क्रौर्य कोणते? तरीही खेळातून आकंठ समाधान मिळतं असं आपण मानतोच ना! अर्थात कॅप्टन म्हणून त्याने जे स्थान मिळवलं, तेवढंच स्थान त्याने ऑफ साइडला देवाशी स्पर्धा करताना फलंदाज म्हणूनही मिळवलं, यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. 'ऑफ साइडला आधी देव आहे आणि त्याच्यानंतर मात्र सौरव गांगुली आहे' - राहुल द्रवीड उवाच... अर्थात हे अटळ होतं. तेच त्याचं विधिलिखित होतं. तळपणार्‍या बॅटमुळे, विशेषतः वन-डेतल्या त्याच्या नजाकतभर्‍या फटक्यांमुळे तो दादा बॅट्समन तर ठरलाच पण कॅप्टन म्हणून त्याने निर्माण केलेला वारसा त्यापेक्षाही मोठा ठरला.

सदासर्वदा क्रिकेटवर मन:पूत प्रेम करणार्‍यांसाठी २००० सालातील भारतीय क्रिकेटची अवस्था विचित्र होती. आठ-एक वर्षांपूर्वीपर्यंत क्रिकेटकडे न वळलेल्यांना कदाचित त्याची कल्पना नसेल. तेव्हा विजय दुष्प्राप्य होता. एकेका विजयासाठी कमालीचं झगडावं लागत होतं. संघर्ष निष्फळ ठरत होता. इतकंच कशाला, मॅचच्या निकालावरचा अनेकांचा विश्वास उडाला. तशात सचिनने कॅप्टनची राजवस्त्रं उतरवून ठेवली. ऑस्ट्रेलियात भारताचा चोळामोळा झाला. दक्षिण अफ्रिकेने आपल्याच मातीत आपल्याला चारीमुंड्या चीत केलं. परिणाम म्हणून भारतीय क्रिकेटवर जीव ओवाळून टाकणारे जणू वनवासात किंवा अज्ञातवासात गेले. चाहत्यांची ही मानसिकता हेरून त्यांना पुन्हा क्रिकेटच्या मैदानाकडे खेचून आणणार्‍या कुणाची तरी तेव्हा अफाट गरज होती. नेमक्या त्याच काळात भारतीय स्घाचं सेनापतीपद सौरव गांगुलीकडे आलं आणि नंतरच्या चार वर्षांत कायापालट झाला. भारतीय संघ बलवान आणि अभिमानी बनला. हा चमत्कार ज्याने घडवला, त्याच्याशी एक अतूट संबंध तयार झाला. टिकलाही. या काळात अनेकांनी तुफानी, चिरस्मरणीय बॅटिंग केली. काही बोलर्सचे भन्नाट स्पेल्स संस्मरणीय ठरले. पण या पराक्रमाच्या चर्चेचा अंतिम बिंदू मात्र या संघाचा सेनापतीच असायचा. गांगुली हा मैदानातल्या युद्धाचं नेतृत्व करणारा थोर सेनानी होता.

त्याच्या या काळात आपण काही मॅचेस गमावल्या. कित्येक जिंकल्या. त्याच्या या कारकिर्दीचं वर्णन करणं, तिला व्याख्येचं कोंदण देणं खरंच अवघड आहे. पण ते काम गांगुलीच्या एका कृतीने केलं. नॅटवेस्टची फायनल तीनशेचा पल्ला पार करुन जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या गॅलरीत येऊन गांगुलीने अंगातला टी-शर्ट काढला अन् विजयोन्मादात तो गरागरा फिरवला अन् प्रेक्षकांत भिरकावून दिला. मुंबईत भारतावर विजय मिळवल्यानंतर इंग्लंडच्या अ‍ॅण्ड्र्यू फ्लिन्टॉफने काही महिन्यांपूर्वी जे केलं त्याची ती बोलकी प्रतिक्रिया मानली गेली! त्याच्या हुकूमतीचं ते प्रतीक होतं. त्याच्या विजीगीषु वृत्तीचा तो पुरावा होता. गंमत म्हणजे टी-शर्ट काढण्याच्या कृतीने त्याला नंतर ओशाळवाणं वाटलं अशी अजब कबुली त्यानेच मागाहून देऊन टाकली! खरं तर ती कृती उत्स्फूर्त होती. नव्या पिढीच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी होती. तो क्षण अनुभवणार्‍या तरुणांचे बाहू तेव्हा फुरफुरले असणार. त्यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये 'यस्स'चा एल्गार केला असणार. 'यस्स्!'चा हा हुंकार त्या कृतीपुरता मर्यादित नाही. क्रिकेटच्या पंढरीत त्या दिवशी जे घडलं ते घडवणार्‍यावर विश्वास असलेल्या पिढीचे ते प्रतिनिधी असल्याचा तो हुंकार होता. उघड्या छातीने लॉर्डसच्या बाल्कनीत आलेला सेनानी गांगुली विजयाचं प्रतीक बनला...'लगान' सारखाच. त्या कृतीने गांगुलीच्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवलं. ते दर्शन औद्धत्याचं किंवा अनादराचं नव्हतं, तर झुगारून देणार्‍या आक्रमकतेचं आणि झोकून दिल्याने वाढणार्‍या आत्मविश्वासाचं ते प्रतीक होतं.

काळाच्या ओघात गांगुलीविषयी एक मत तयार होऊ लागलं आणि त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्नही झाला. ते म्हणजे, तो बुद्धीने विचार करण्याऐवजी मनाचा कौल मानतो. खरं तर मूर्खाच्या मनाने दिलेला कौल निरर्थक असतो. पात्र माणूसच 'आतल्या आवाजा'ला बुद्धीच्या निकषावर तोलून निर्णय करु शकतो. मनाचा कौल कारणी लावू शकतो. तसं पाहिलं तर अभ्यासातूनच मनाचा कौल तयार होत असतो. तपश्चर्या आणि अभ्यास ही अशा अंतःप्रेरणेची मूलभूत बैठक असते. अर्थात गांगुलीची बैठक अंतःप्रेरणेची नव्हे, तर वैचारिक आहे, हे 'सीएनबीसी'च्या बिझनेस शोचं माझं निमंत्रण त्याने स्वीकारल्यानंतर - त्या कार्यक्रमानंतर पुरेसं स्पष्ट झालं. टाटा स्टीलचे प्रमुख बी. मुथुरामन त्या शोमध्ये गांगुलीबरोबर होते. त्या बॅट्समन आणि कॅप्टन यांच्या भूमिकांमधलं अंतर समजणं, ते राखणं, तरुण खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची ज्योत जागवणं आणि एक सेनानी काय, किती आणि कशा चुका करू शकतो, याचं त्या शोमध्ये गांगुलीने केलेलं विश्लेषण अप्रतिम होतं.

गांगुली म्हणतो, "बेस्ट कॅप्टनच्या बाबतीत दहापैकी सातवेळा त्याचा निर्णय फळतो. माझ्या बाबतीत ते दहापैकी पाचवेळा घडायचं. पण माझा आडाखा किंवा निर्णय चुकला तरी माझंच बरोबर आहे किंवा मी चुकीची दुरुस्ती योग्य पद्धतीने करतोय यावर माझ्या संघ सहकार्‍यांची श्रद्धा असायची". २००४ साली गांगुली हा जणू भारतीय क्रिकेटचा सर्वोत्तम सेनानी बनला होता. एखादा सेनापती मैदानात काय करू शकतो, याचा विचार मी तोवर गांभीर्याने करायला लागलो होतो. एखाद्याचं नेतृत्व किती मनःपूर्वक स्वीकारलं जाऊ शकतं आणि त्यातून ते काय मिळवू शकतं, याचे पुरावे गांगुलीच्या नेतृत्वाने दिले. आपल्या सेनानीने केलेली चूक ही योग्य ते मिळविण्यासाठीच केलेली असणार, या विश्वासापोटी अख्ख्या संघाने त्याला प्रमादमाफीचा परवानाच दिला होता, जणू!

सौरव गांगुलीने आणखी खेळायला हवं होतं, त्याने अजून काही काळ मैदान सोडायला नको होतं असा युक्तिवाद करण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे. पण क्रिकेटमधलं करिअर शेअर बाजारासारखं आहे. कधी वधारेल आणि कधी कोसळून गाळात जाईल, याचा काय भरवसा? क्रिकेटच्या मैदानातल्या माणसांचंही तेच आहे. अप्रतिम खेळी ही अचाट होती, अद्भुत होती, याचा साक्षात्कार नंतर होतो, घसरत जाणार्‍या कामगिरीचंही नेमकं तसंच असतं. त्या क्षणी ते कळत नाही. कुणास ठाऊक गांगुलीच्या भविष्यात काय वाढून ठेवलं होतं? तसंही त्याचं आयुष्य अंदाजांना हुलकावण्या देणारंच होतं की!

अर्थात पायउतार होण्यासाठी गांगुलीने योग्य क्षण निवडला. म्हणून तर भविष्यात त्याच्या आठवणींना उबदारपणाची झालर असेल अन् त्यावर खिन्नतेची पडछाया तर बिलकुल नसेल!

*****


कसोटी क्रिकेटची चिंता नको, त्याची प्रकृती उत्तम आहे!

फाजिल काळजीपोटी अकारण विषण्णता आलेल्या आपल्यातल्या काही जणांना दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी मूर्ख ठरवलंय. आपण कसोटी क्रिकेटला दूषणं दिली, त्याचं विच्छेदन केलं आणि ते आजारी असल्याचं सिद्ध करण्यासाठी सूक्ष्मशी खूण शोधत राहिलो. पण पुन्हा एकदा आपण मूर्ख ठरलो आहोत.

कसोटी क्रिकेट धडधाकट आहे आणि त्याची प्रकृतीही उत्तम आहे. आपल्याला त्याचं रक्षण करण्याची गरजच नाही. केवळ नव्या पिढीला तिची ओळख करुन देणं आवश्यक आहे. आपण उगीचच खूप काळजी करतो.

होय, काही टीव्ही कंपन्याचे मालक तुम्हाला सांगू शकतील की, काही प्रमाणात ट्रेंडस् असतातच. होय, टी-२० क्रिकेटचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. हे खरं आहे. पण बेलबॉटम आल्या, गेल्या आणि फिरुन एकवार परत आल्या. कसोटी क्रिकेटची टी-२०शी तुलनाच होऊ शकत नाही. आपण एखाद्या बड्या भोजनसमारंभातल्या पंचपक्वानांची तुलना हॅम्बर्गरसोबत करु शकत नाही. मुलं अजूनही शास्त्रीय संगीत शिकतच आहेत. एका महिन्यापेक्षा कमी अवधीत आपल्याला तीन उत्कृष्ट सामने बघायला मिळाले आहेत. व्यक्तिमत्त्व, कौशल्य आणि शौर्य यांची चित्ताकर्षक प्रचिती या काळात आली. काही जण क्रिकेटच्या सुवर्णकाळाबद्दल बोलत असतात. जर तो काळ या महिन्यापेक्षा चांगला असेल, तर त्या काळात लिहिणारे लेखक सिद्धहस्त होते, असंच मी म्हणेन.

सिडनीच्या मैदानातल्या एक चेंडू दबवणार्‍या आणि लगेच दुसरा उसळवणार्‍या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या दहाव्या आणि अकराव्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दीड तास झुंजवलं. कौशल्य आणि क्षमता एकाकी आल्या तर त्यांचा काहीच प्रभाव नसतो, पण त्यांची युती झाली तर त्या गोष्टी करारीपणा आणि निग्रह यांच्यासारख्या भव्य वाटू लागतात. डेल स्टाईन आणि मखाया एन्टीनी एवढ्या वेळेत दोनदोनदा बाद झाले असते, तरी त्यांना कुणी बोललं नसतं. पण विजय मिळवणं अशक्य असलं, तरी तो प्रतिस्पर्ध्यांना इतक्या सहजपण मिळू द्यायचा नसतो आणि स्टाईन - एन्टीनीने तो विजय ऑस्ट्रेलियाला दीड तास नाकारला. असं करताना प्रत्येक खेळाडूकडे दुसरं कुठलं तरी कसब असतंच हे त्यांनी दाखवून दिलं. ते कितीही छोटं असलं, तरी त्याचा स्फोटकांसारखा वापर होऊ शकतो, हेदेखील त्यांनी सिद्ध केलं.

त्यानंतर ग्रॅमी स्मिथ मैदानात उतरला. एक स्वाभिमानी, कणखर पण दिवसेंदिवस सौम्य होत चाललेला माणूस... खरं त्याला तशी व्हायची गरज नाही, पण खेळ अशी व्यक्तिमत्त्वं घडवत असतो. दुखावलेलं कोपर आणि मोडलेला डावा हात शौचाला जायला त्रास देण्यासाठी पुरेसे आहेत. अशा वेळी ग्लव्हज चढवून फलंदाजीला येणं हे दुष्करच. पण ताशी १४० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या दोघांची गोलंदाजी झेलायला तो तयार झाला. तुमचे दोन्ही हात धडधाकट असताना आणि तुमचं सगळं कौशल्य वापरूनही हे आव्हानच आहे आणि मग तो चेंडू अडवत राहिला... अडवत राहिला...त्याच्या बॅटला चुकवून एक चेंडू मागे जाईपर्यंत तो त्यांना अडवत राहिला. अखेरीस ऑस्ट्रेलियाचा विजय झाला, तसाच तो दक्षिण आफ्रिकेचाही झाला. आयुष्य वगळता अन्य कुठल्याही खेळात एक दिवस वाचवणं ही गोष्ट इतकी शौर्याची मानली गेलेलं मी तरी पाहिलेलं नाही.

स्टाईन, एन्टीनी आणि स्मिथ यांनी ज्या प्रकारे लढा दिला, त्यावरुन त्यांच्या व्यक्तित्त्वाचा पोत सहज लक्षात येऊ शकतो. प्रवाहाच्या दिशेने सगळेच छान पोहू शकतात पण जेव्हा परिस्थिती प्रतिकूल होते, तेव्हाच तुमचं व्यक्तित्त्व बहरत असतं किंवा वॉरेन बफे म्हणतात तसं, नागडं कोण पोहतंय ते लाट ओसरल्यावर समजतं.. स्मिथचा फलंदाजीला येण्याचा निर्णय शूर, धाडसी होता किंवा तो काही जणांना वेडसर वाटण्याचीही शक्यता आहे. पण त्यानंतर आपण जे जे शक्य होतं ते आपल्या संघाला दिलं, या समाधानातून तो रात्री शांत झोपू शकला असेल आणि आता तो आपल्या सहकार्‍याकडून अशीच अपेक्षा करु शकतो. राजकारण आणि खोटेपणा, क्षेपणास्त्रं आणि स्फोटकं, हत्यासत्रं आणि व्यापारी चढाओढ या काळात ही गोष्ट फारच उदात्त आहे.

लवकरच हे दोन्ही संघ दुसर्‍या खंडात एकमेकांशी दोन हात करणार आहेत. परदेशात खेळणं हे आणखी मोठं आव्हान असतं आणि आपण त्यासाठी सज्ज आहोत, हे ऑस्ट्रेलियानं दाखवायला हवं. ही खूप चांगली कल्पना आहे आणि असं वारंवार व्हायला हवं. सहा कसोटी सामन्यानंतर प्रत्येक संघाने घरच्या मैदानात तीन व परदेशात तीन सामने खेळलेले असतील आणि त्यातला चांगला संघ कोणता याची नीट पारख करता येईल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या मूर्खपणापेक्षा हा प्रकार खरंच चांगला आणि आव्हानात्मक असल्याचं दिसतंय.

त्यानंतर आपण भारतात टी-२० क्रिकेटच्या कह्यात गेलेले असू. आधी आयपीएल आणि त्यानंतर विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी अन्य देश येऊन थडकतील, हे पाहायला खूप मजा येईल. कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या दिवशी शेपटाकडल्या फलंदाजांना जलदगती गोलंदाज हवी तितकी षटकं टाकू शकतात. इथे अशा आव्हानांचा मुकाबला करणार्‍या लढवय्यांची फारशी गरज असणार नाही आणि चेंडू अडवून ठेवण्यात धम्माल असणार नाही. ज्यातून वेगळ्या प्रकारचं नाट्य निर्माण होईल अशी वेगळी कौशल्यं, वेगळ्या गुणांची इथे गरज असेल. पण या दोन्ही प्रकारांची तुलना करणं गैरच आहे. आपल्याला हे दोघंही हवे आहेत.

*****

ऑट ऑफ द बॉक्स
क्रिकेट : भावलेलं, दिसलेलं आणि त्या पलीकडचं

हर्षा भोगले
अनुवाद - चंद्रशेखर कुलकर्णी

रोहन प्रकाशन
पृष्ठसंख्या - २४७
किंमत - रुपये १९५


*****

टंकलेखन साहाय्य - अश्विनी के, श्रद्धा, अनीशा


*****
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिस्टमधे टाकले. मूळ पुस्तक जास्त चांगले वाटेल का वाचायला ? कधी कधी क्रिकेटमधले मराठीकरण खटकत राहते.

जबरी !! नक्की घेणार हे पुस्तक. मूळच पण वाचेन..
गांगुलीबद्दलचा लेख मस्त !

धन्यवाद चिन्मय..

चांगला परिचय. परवाच दुकानात पाहिले होते पण अनुवाद आहे कळल्यावर मूळच वाचावे म्हणून घेतले नाही. नक्कीच वाचणार.

त्याचे नाव खरेच "हर्षा" आहे का? की ते इंग्रजीत तसे म्हणतात व प्रत्यक्षात "हर्ष" आहे? काही ठिकाणी ते "हर्ष" असे लिहीलेले पाहिले आहे (मराठीत).

फार छान! गांगूली तसंच <स्टाईन, एन्टीनी आणि स्मिथ> ची लढवय्या वृत्तीबद्दल वाचून फार भारी वाटलं!
नक्की घेणार.

गांगुलीवरचा लेख जास्त आवडला... Happy

"त्या बॅट्समन आणि कॅप्टन यांच्या भूमिकांमधलं अंतर समजणं... " इथे पहिला शब्द "त्या"चं प्रयोजन काय?

माझ्याकडे मूळ पुस्तक आहे.
क्रिकेटबद्दल मी वाचलेल्या सर्व प्रकारच्या साहित्यात ह्या पुस्तकाची गुणवत्ता खूपच वर आहे.
क्रिकेटप्रेमींनी आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे.

धन्यवाद चिनुक्स. नक्की घेणार. मूळच पण वाचेनच...
गांगुलीबद्दलचा लेख मस्त ! लढाउ व्रुत्तिच वर्णन एकदम झक्कास.

<<आयुष्य वगळता अन्य कुठल्याही खेळात एक दिवस वाचवणं ही गोष्ट इतकी शौर्याची मानली गेलेलं मी तरी पाहिलेलं नाही. >> हे तर अप्रतिम!

चांगल्या पुस्तकाची छान तोंडओळख !
<< नेव्हिल काडस, सीएलआर जेम्सपासून वूडहाऊस, डिकन्सपर्यंत अनेकांनी क्रिकेटबद्दल अतिशय प्रेमानं लिहिलं >> तुलना नाही, पण आपले ए.एफ.एस.तल्यारखान व के.एन. प्रभु इ. हेही छान व प्रेमानं लिहीत क्रिकेटवर .
<<आयुष्य वगळता अन्य कुठल्याही खेळात एक दिवस वाचवणं ही गोष्ट इतकी शौर्याची मानली गेलेलं मी तरी पाहिलेलं नाही. >> राजकारणाच्या खेळात मात्र खूप अशी उदाहरणं असावीत. कृष्ण मेनन यांचं १९५७चं 'युनो'मधील ८ तासांच भाषण [ जो अजूनही न मोडलेला विक्रम आहे !] बहुधा यात बसत असावं ! Wink

मूळ पुस्तक मिळवून वाचेन. भाषांतर काही ठिकाणी फारच कृत्रिम वाटतय.

अक्षरवार्ता चमुस पुन्हा एकदा धन्यवाद Happy