आयुष्य

Submitted by यःकश्चित on 8 August, 2011 - 09:08

आयुष्याचा नेमका अर्थ काय असतो...?
शब्दकोशातील एक किरकोळ शब्द असतो,
का जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास असतो...
की एक एक क्षण जगण्याचा हव्यास असतो...!

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं
रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं
शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं
मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं,
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं.

आयुष्य हा एका शाळेतून जाणारा मार्ग असतो,
तिथे प्रत्येकासाठीच एक स्वतंत्र वर्ग असतो.
आयुष्याचा हा रस्ता कधीच सरळ नसतो,
पण खडतर आहे म्हणून कधी विरळ नसतो.
लाखों लोकांना पाठीवरून रोज तो वहात असतो,
तितकीच गर्दी तितकीच झुंबड रोजच पहात असतो,
व्यर्थचि पळापळ पाहून मनातल्या मनात खुदकन् हसतो,
फुका-फुकाच्या प्रलोभनाला मनुष्यप्राणी फुकाच फसतो,
कारण या रस्त्याचा शेवट नेहमी काळाच्या खोल खाईत असतो,
तरीही मार्ग हा मनुपुत्रांच्या गळ्यातील ताईत असतो...!

आयुष्याचे मंजुळ गाणे प्रत्येकजण रोजच गातो
आयुष्याच्या वाटेवरती चिंब चिंब भिजून जातो
आयुष्य ना कुठेच जाते इथेच त्याचे वास्तव्य असते
आम्ही जातो आमुच्या गावा हेच खरे वास्तव असते

कविता झाली इथेच संपली
प्रकाशकाकडे मी ती नेली,
काय सांगू माझी दैना
काय हि माझी दशा झाली,
प्रकाशक होता भलता अरसिक
कशी काय त्याने ही फॅक्टरी काढली...
काही-बाही प्रश्न विचारून
कवितेची पूर्ण कळाच काढली...
"काय राव..! आयुष्यावर कविता
लिहिण्याची ही काय वेळ आहे...?
तुमच्या कवितेच न् खऱ्या आयुष्याचा
किंचीतसा तरी ताळमेळ आहे....?"
दुःख झाले वाईट वाटले
परत माघारी फिरलो
त्याला वाटले तो जिंकला
अन् मी मात्र मुकाट हरलो
डोळ्यांतील अश्रू पडून
कविता माझी हातातच फाटली
प्रकाशकाला वळून म्हणालो ,
"मित्रा ! एक गोष्ट सांगावीशी वाटली..
आयुष्याच्या कवितेची हीच खरी काळ-वेळ आहे
आयुष्याचा न् कवितेचा अनाकलनीय ताळमेळ आहे
आयुष्य हा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे
भावनांचा अन् आत्म्याचा सुरेख असा मेळ आहे..
भावनांचा अन् आत्म्याचा सुरेख असा मेळ आहे...!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कविता झाली इथेच संपली
प्रकाशकाकडे मी ती नेली,
काय सांगू माझी दैना
काय हि माझी दशा झाली,
प्रकाशक होता भलता अरसिक
कशी काय त्याने ही फॅक्टरी काढली...
काही-बाही प्रश्न विचारून
कवितेची पूर्ण कळाच काढली...
"काय राव..! आयुष्यावर कविता
लिहिण्याची ही काय वेळ आहे...?
तुमच्या कवितेच न् खऱ्या आयुष्याचा
किंचीतसा तरी ताळमेळ आहे....?"
दुःख झाले वाईट वाटले
परत माघारी फिरलो
त्याला वाटले तो जिंकला
अन् मी मात्र मुकाट हरलो
डोळ्यांतील अश्रू पडून
कविता माझी हातातच फाटली
प्रकाशकाला वळून म्हणालो ,
"मित्रा ! एक गोष्ट सांगावीशी वाटली..
आयुष्याच्या कवितेची हीच खरी काळ-वेळ आहे
आयुष्याचा न् कवितेचा अनाकलनीय ताळमेळ आहे
आयुष्य हा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे
भावनांचा अन् आत्म्याचा सुरेख असा मेळ आहे..
भावनांचा अन् आत्म्याचा सुरेख असा मेळ आहे...!

याची काही गरज होती का?वरच पुरेस होत्.छान.