आनंदवनासाठी 'समाज प्रगती सहयोग निधी' - जाहीर आवाहन

Submitted by चिनूक्स on 8 August, 2011 - 07:40

बाबा आणि साधनाताईंनी आनंदवनाची स्थापना केली, त्याला आता बासष्ट वर्षं पूर्ण झाली. चौदा रुपये, सहा कुष्ठरुग्ण, एक लंगडी गाय आणि दुर्दम्य इच्छाशक्ती एवढीच संपत्ती या दोघांकडे तेव्हा होती. ’येथे सेवेचे रामायण लिहिले जाईल’ असा आशीर्वाद विनोबा भाव्यांनी बाबांना आणि साधनाताईंना आनंदवनाच्या पायाभरणीच्या वेळी दिला होता. आज सहा दशकांनंतर विनोबांचं आशीर्वचन किती खरं ठरलं, याचा प्रत्यय येतो.

Picture1.jpg

१९४९ साली पडीक जमिनीच्या तुकड्यावर कुष्ठरुग्णांचं हे उपचार-प्रशिक्षण-पुनर्वसन केंद्र सुरू झालं. पुढे अंध, अपंग, मूकबधिर यांनाही आनंदवनानं सामावून घेतलं. इतकंच नव्हे, तर अनाथ, ज्येष्ठ नागरीक, आदिवासी अशा समाजातल्या गरजू, पण दुर्लक्षित घटकांसाठीही अनेक प्रकल्प उभे राहिले. आनंदवनवासीय स्वावलंबी, स्वयंपूर्ण असावेत, यासाठी बाबांनी ’श्रम ही है श्रीराम हमारा’ हा नारा दिला. स्वावलंबी समाजव्यवस्था रूजावी म्हणून बाबांनी, विकासकाकांनी अनेक अभिनव प्रकल्प सुरू केले. आज केवळ आनंदवनच नव्हे, तर सोमनाथ, हेमलकसा आणि इतर अनेक छोटे प्रकल्प सामाजिक आणि रचनात्मक कार्यात नवनवीन मापदंड प्रस्थापित करत आहेत. आनंदवनामुळं प्रेरित होऊन आज अनेक कार्यकर्ते देशाच्या कानाकोपर्‍यांत दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहेत.

’महारोगी सेवा समिती’ अनेक संकटांना तोंड देत कुष्ठरुग्णांच्या, अपंगांच्या सशक्तीकरणासाठी अव्याहतपणे झटत आहे. समाज कुष्ठरुग्णांना, अपंगांना सामावून घेत नाही, ही मुख्य अडचण. शरीराला झालेला कुष्ठरोग बरा करता येतो, मनाला झालेल्या कुष्ठरोगाचं काय? बरे झालेले कुष्ठरोगी, सक्षम झालेले अपंग समाज सामावून घेत नाही, हे दुर्दैव आहे. शिवाय सरकारी आकडेवारीनुसार कुष्ठरोग आता जवळपास नाहीसाच झाला आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरून कुष्ठरुग्णांसाठी संशोधन, पुनर्वसन यांपैकी काहीच होत नाही. नवे कुष्ठरुग्ण मात्र आनंदवनात उपचारांसाठी येतच असतात. शासनाकडून मिळणारं अनुदानही अतिशय अपुरं आहे. उदाहरणार्थ, आनंदवनातल्या १२०० पुनर्वसित कुष्ठरुग्णांसाठी प्रति माणशी दररोज मिळणारं अनुदान आहे रुपये १५ फक्त. या पंधरा रुपयांत दोन वेळचं जेवण, चहा, औषधं, शिवाय कपडे, प्रवासखर्च, घरांची डागडुजी एवढं संस्थेनं करणं अपेक्षित आहे! आज पंधरा रुपयांत एक वेळचं जेवणसुद्धा होऊ शकत नाही. याशिवाय संस्थेतील इतर पुनर्वसित कुष्ठरुग्ण आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या इतर ११०० व्यक्तींना कुठलंच शासकीय अनुदान मिळत नाही. कोणत्याही इतर योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही. हे झालं आनंदवनाबद्दल. सोमनाथ, मूळगव्हाण इथल्या प्रकल्पांचे खर्च वेगळे. 'महारोगी सेवा समितीला' प्रत्येक महिन्याला साधारण सत्तर लाख रुपयांचा निधी लागतो. औषधं, जेवण हे खर्च भागवणं सर्वांत महत्त्वाचं. ही रक्कम दर महिन्याला उभी करणं खूप कठीण असतं. कार्यकर्त्यांचा प्रचंड वेळ हा निधी उभा करण्यातच जातो.

आजवर हा खर्चाचा मोठा डोलारा सांभाळणं हे सामाजिक सद्भावना आणि आनंदवनाच्या उत्पादनानुगामी अर्थव्यवस्थेमुळं बर्‍याच प्रमाणात शक्य होत गेलं. परंतु आसर्‍याला येणार्‍यांचा वाढता ओघ, महागाई, अनुदानातली अनियमितता, सततचा दुष्काळ यांमुळे खर्च भागवणं हे खूपच अवघड होतं. साडेतीन हजार निवासी व्यक्तींचं हे कुटुंब किती आघाड्यांवर रोज लढत असेल, याची कल्पनाही करवत नाही.

संस्थेत अजूनही रोज नव्या सदस्यांची भर पडते. कोणालाही प्रवेश नाकारायचा नाही, हे व्रत संस्थेनं पाळलं आहे. या सततच्या आर्थिक काळजीमुळं अनेक नव्या योजना तयार असूनही त्या कृतीत आणणं शक्य होत नाही. खरं म्हणजे आज अशा संस्थांची, योजनांची आपल्या देशाला नितांत आवश्यकता आहे. दुर्बल घटकांना स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करणं, गरजेचं आहे. लोकसशक्तीकरण करत असलेल्या या संस्था किती कार्यक्षम, प्रयोगशील आहेत, यावर देशातल्या मोठ्या बदलांचं भवितव्य अवलंबून आहे, आणि त्यासाठी समाजानं हातभार लावणं अत्यावश्यक आहे.

आज 'महारोगी सेवा समिती'च्या कार्यास शाश्वत स्वरूपाचं आर्थिक स्थैर्य लाभावं, यासाठी ५५ कोटी रुपयांचा एक निधी सामूहिक प्रयत्नांतून उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा निधी ३१ मार्च, २०१२ पर्यंतच उभा करता येणार आहे. रोजचे अनेक खर्च या निधीतून मिळणार्‍या व्याजाद्वारे भागू शकतील, शिवाय संस्थेचं भविष्यातलं आत्मनिर्भरतेचं स्वप्न तर पूर्ण होईलच, आणि केवळ आर्थिक समस्यांमुळं न पेलू शकणारी समाजातली अनेकविध नवी आव्हानं स्वीकारण्यास संस्थेला बळ मिळेल. उदाहरणार्थ, संस्थेत दरवर्षी होणार्‍या मोफत १५०० मोतिबिंदू शस्त्रक्रियांची संख्या ९०००पर्यंत वाढवता येईल, दरवर्षी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांच्या जमिनींवर होणारं जल आणि मृदसंधारणाचं काम शंभर कुटुंबांपर्यंत मर्यादित न ठेवता बाराशे कुटुंबांपर्यंत विस्तारता येईल, युवाग्राम प्रकल्पामार्फत शंभर बेरोजगार तरुणांना दिला जाणारा व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ पाचपटीनं वाढवता येईल.

आजवर ’महारोगी सेवा समिती’नं समाजाच्या आशीर्वादाच्या पाठिंब्यामुळंच इथवर मजल गाठली आहे. हा निधी उभा करण्याच्या कामीही समाज खंबीरपणे उभा राहील, अशी खात्री आहे. पंचावन्न कोटी रुपयांचा हा निधी ५५,००० व्यक्तींनी प्रत्येकी १०,००० रुपयांची मदत जरी पाठवली तरी उभा करणं सहज शक्य आहे. अर्थात अमुक इतकी रक्कमच आपण द्यावी, अशी काही अट नाही. आपण दिलेला एक रुपयासुद्धा संस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे. या निधीस दिलेल्या योगदानाला आयकर खात्याकडून कलम ३५ AC अंतर्गत १००% सूट मिळाली आहे. या निधीस दिलेल्या रकमेमुळं तुमचं आनंदवनाशी कायमचं नातं जुळणार आहे. तुम्ही दिलेल्या रकमेच्या व्याजाचा दरवर्षी वापर होणार आहे.

’महारोगी सेवा समिती’च्या पाठीशी आपण उभं राहाल, या विश्वासानं ’समाज प्रगती सहयोग निधी’च्या उभारणीस आपण हातभार लावावा, अशी आपल्याला विनंती करत आहोत.

आपल्या देणगीचे धनादेश ’महारोगी सेवा समिती, वरोरा’ या नावानं आपलं संपूर्ण नाव, पत्ता, ईमेल पत्ता आणि PAN (Permanent Account Number)सह कृपया खालील पत्त्यावर पाठवावेत -

सचिव,
महारोगी सेवा समिती, वरोरा
मु. पो. आनंदवन, ता, वरोरा, जि. चंद्रपूर
महाराष्ट्र
पिन - ४४२ ९१४

दूरध्वनी क्र - (०७१७६) २८२०३४
मोबाइल - ९०११० ९४६२३
ईमेल - vikasamte@anandwan.in

अधिक माहितीसाठी कृपया http://anandwan.in/help-needed.html हा दुवा पाहा.

तसंच धनादेशाचं विवरण आपलं पूर्ण नाव, पत्ता आणि PANसहीत वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर / मोबाइल क्रमांकावर कृपया कळवावे. या निधीची पावती धनादेश मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत आपल्याला मिळेल. या निधीचा सदुपयोग कसा होतो आहे, याबद्दल आनंदवन परिवार वेळोवेळी आपल्याला कळवेलच.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आत्ता (फार उशिरा) वाचला.
माझा वाटा निश्चीतच उचलेन , कारण मी तर त्यांच देणं लागतो.
माझे वडिल वर्ध्याला त्यांच्याच संस्थेत ( गांधी मेमोरिअल लेप्रसी फाउंडेशन) मध्ये काम करायचे,
त्या अर्थाने .

या निधीसाठी मदत पाठविणार्‍यांना पावती/ कर वजावटीसाठी प्रमाणपत्र मिळाले आहेत का?
मी पैसे शाश्वत निधीसाठी नाही , तर गमबुट/रेनकोट खरेदीसाठी NEFT ने पाठवले होते.

मला अजून मिळालेली नाही. पैसे जमा झाल्याची नोंद/खातरजमा इमेलने मिळाली तरी चालेल अशा आशयाचे इ-स्मरणपत्र पाठवूनही आठ दिवस उलटलेत. त्या इमेलची नोंद घेतल्याचे तेवढे कळले आहे.

प्रिय भरत जी,

आपली पावती आम्ही 10.8.2011 लाच बनवून नंतर पोस्टाने पाठवली होती. आपणास ती मिळाली नाही का? पोस्टाने पाठविल्याने आम्ही इमेल वर कळविले नाही. सध्याच्या इमेल चे उत्तर द्यायला थोडा उशीर लागला त्याबद्दल क्षमस्व. आमच्याकडे प्रत्येक छोट्या देणगीची पावती पाठविण्याची पद्धत आहे. एक मनुष्य बंगाल वरून गेल्या तीस वर्षांपासून ११ रुपये पाठवतो. आम्ही दर महिन्याला ५ रुपये खर्च करून त्यांना पावती पाठवितो. दर वर्षी हजारो लोकांच्या छोट्या छोट्या देणग्या येतात. त्या process करायला थोडा उशीर लागू शकतो. परंतु तुमची पावती वेळेवरच गेलेली आहे. त्याची स्कॅन आपल्याला tax साठी ( duplicate) हवी असल्यास इमेल वर कळवावे.

नमस्कार डॉ शीतल.
पोस्टाने पाठवलेली पावती मला मिळालेली नाही.
रक्कम योग्य खात्यात जमा झाली आहे हे इमेलने कळवावे असे रक्कम पाठवल्याचे कळवणार्‍या(दि ९ ऑगस्ट २०११) आणि आताच्या (४ एप्रिल २०१२) इमेलमध्येही मी लिहिले आहे. आपल्या उत्तराने ही खातरजमा झाली आहे. त्यामुळे डुप्लिकेट पावती स्कॅन परून पाठवायची गरज नाही.
धन्यवाद आणि शुभेच्छा.

Pages