मुक्काम..

Submitted by निवडुंग on 31 July, 2011 - 13:40

अपनी मर्जीसे, कहाँ अपने सफर के हम हैं,
रुख हवाओंका जिधर का है, उधर के हम हैं..

वारं बदललं. आयुष्याचे मार्गही बदलायला लागलेत. आणि मुक्काम?

मुक्काम.. हं..

आज नको उद्या करू म्हणत कितीही लांबणीवर टाकत राहिलं तरी तो दिवस उजाडलाच. शेवटचा दिवस, मुक्काम हलवावाच लागणार म्हणून नाइलाजाने का होईना तो उठला. अनिच्छेनेच सर्व काही पसारा गोळा करायला सुरूवात केली. स्वत:च्या नकळत आवराआवर. मन कुठेतरी दूर भरकटलेलं, आणि हात यांत्रिकपणे चालत राहिलेले..

एक एक शर्ट गोळा करत त्याच्या सोबतच्या कित्येक आठवणी मनभर गोळा होत राहिल्या. ह्म्म्म्म.. हा हिरवा शर्ट आणि तो चेक्सचा, किती आवडीने तिने तुझ्यासाठी निवडला होता. अख्खं दुकान पालथं घालून, शंभर एक शर्ट ट्राय करून झाल्यावर कुठे मनासारखा मिळालेला. आणि मग दमून भागून कॉफी पिताना तिच्या चेहर्‍यावरचं समाधान. हं.. व्यवस्थित घडी घालून ठेवताना, त्या आठवणीही तशाच अलवारतेने मनाच्या कोपर्‍यात सांभाळून ठेवत..

हा शर्ट तर अजूनही तसाच आहे, कडक इस्त्रीसहीत. इतके दिवस लक्ष कसं गेलं नाही आपलं? वर्ष होऊन गेलं असेल, कधीच घातला कसा नाही? ह्मम्म्म.. तसाच घडी ना मोडत बॅगेत, आणि हे काय, किती जुने शर्ट आहेत हे? तसेच ठेवलेले. सहा सात वर्ष होऊन गेली असतील ना? दर वेळी फेकून द्यायचा विचार मनात आलेला, पण मन धजावलंच नाही कधी. कसं फेकून द्यावंसं वाटेल? आपल्या शरीराबरोबर मनाशीही एकरूप झालेली ही वस्त्रं. कित्येक कडूगोड आठवणी पाहिलेले, जगलेले. आज ही नकोच वाटतंय फेकून द्यायला. पण नाही, शेवटचा हात फिरवून त्यांना अलविदा करावाच. कधी ना कधी करावाच लागणार आहे ना. जीवनातली काही वर्ष तुम्ही सोबत जगलात माझ्या, आता सोबत नसाल, पण तुमची जागा मनात अजून तशीच आहे. तशीच राहील..

सर्व कपडे पॅक तर झालेत. पुस्तकं पण गोळा करून भरलीत हळूहळू. सामानच असतं किती तुझ्याकडे असं? विंचवाचं बिर्‍हाड पाठीवर. कधी काही पसारा वाढवलाच नाही मुद्दामहून. फक्त कपडे आणि पुस्तकं. नाही होय करत झालंय की जवळजवळ सगळं पॅक.

"खरंच झालंय सगळं पॅक? खरंच का?"
"अरे हो, तेवढा कोपर्‍यात एक बॉक्स आहे, ते सामान फक्त राहिलंय. बाकी सगळं तर झालंच आहे की."
"मग पॅकिंग झालंय असं काय म्हणतोस? पॅकिंग तर अजून सुरू व्हायचंय. खरं सांग मला, सकाळपासून तुला तो बॉक्स दिसत होता, पण तू बाकीच्या गोष्टीच का पॅक करत बसलास? मुद्दाम दुर्लक्ष का करत होतास, का टाळत होतास? का सगळ्यात शेवटी ठेवलास तो?"
"अरे असं काही नाही, तो पण पॅक करणारच आहे ना आता. सगळं झाल्यावर करावा म्हटलं, एवढंच काय ते."
"खरंच..?"
"ह्ंम्म्म्म...."
"कुणाशी खोटं बोलशील? स्वत:शीच?"
"........."
"आणि इथल्या आठवणींचं काय? त्या कधी पॅक करणार आहेस? आणि कश्या?"
"ह्म्म्म्म....तुला खरं सांगू? मन धजावतच नाही रे अजिबात. तो बॉक्स उघडायला आणि इथल्या सगळ्या आठवणी गोळा करायला. सहन नाही होणार ते.."
"म्हणून तुला म्हणत होतो, पॅकिंग तर अजून चालू व्हायचंय तुझं. आता खरी सुरुवात आहे. सगळं तुझंच आहे, घेवून तर जावं लागणारंच.."
"........"

मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है..
सावन के कुछ भीगे दिन रखे हैं
और मेरे एक ख़त में लिपटी रात पडी हैं..

धडधडत्या हृदयानंच त्याने बॉक्स उघडला. काय काय आणि किती सारं आहे आत. इतके दिवस मुद्दामहून बाजूला सारून ठेवलेलं. पहिलीच हाताला लागली ती तुझी फोटोफ्रेम. किती गोड हसतेस ना त्यात.. सहजच हात फिरवला तर पण हे काय धूळ साचून राहिलीय यावर? पुसता पुसता तुझी प्रतिमाही पुसटशी होत राहिली, धूसर.. ह्म्म्म्म.. चालायचंच.. खूप सारी ग्रीटींग्ज, कित्येकशी पत्रं.. किती सार्‍या आठवणी सामावलेली.. कॉफीची बिलं, मूव्हीची तिकीटं, बसची तिकीटं, सगळं सगळं आहे तसंच, किती दिवसांपासून जपून ठेवलेलं.. सगळंच धूसर झालंय ना पण आता? आपल्या नात्यासारखंच.. विरून चाललंय कुठेतरी..

एक सौ सोलह चाँद की रातें, एक तुम्हारे काँधे का तील
गीली मेहंदी की खुशबू, झूठमूठ के शिकवे कुछ
झूठमूठ के वादे भी..

आजूबाजूला पाहिलं तर चार भिंती त्याच्यासारख्याच केविलवाण्या झालेल्या.. त्यांनाही काय सांगू आणि काय नको असं झालेलं.. रात्र रात्रभर मारलेल्या गप्पा, तिचा आवाज ऐकण्यासाठी युगासारखा घालवलेला एक एक क्षण.. तिचं बोलणं, तिचं चालणं, तिचं हसणं, आणि काय काय.. बोलत नाही म्हणून आलेला राग, भिंतीवर आपटलेला फोन, आणि नंतर तिच्यासोबत बोलताना कधीच नाहीसा झालेला राग.. कसल्या कसल्या गप्पा, कसले प्लानिंग, आणि अजून किती काही.. तिच्या विरहात झिंगलेल्या कित्येक रात्री, सिगरेटच्या धुरात गुदमरून गेलेल्या या भिंती सगळं काही सांगत राहिल्या त्याला.. त्याच्याबरोबर आसवांचे कढ पचवत राहिल्या..

आता घरात थांबणं शक्यच नव्हतं, तसाच तो गॅलरीत आला.. पायर्‍यांवर बसला. तिच्यावर चिडून, खूप सारं भांडून, एवढा अबोला धरून, आणि मग हसून खेळून बोललेलं सर्व काही त्यांनी पाहिलेलं.. त्याही त्याच्यासारख्याच कुठेतरी शून्यात पाहत राहिल्या..

पतझड़ में कुछ पत्तों के गिराने की आहट,
कानों में एक बार पहन के लौट आई थी..
पतझड़ की वो शांख अभी तक काँप रही हैं,
वो शांख गिरा दो..

तिच्यासोबत बोलताना कायम त्या समोरच्या झाडाची पानं सळसळायची.. मधुर संगीताची साथ द्यायची.. आज सगळं काही शांत आहे पण.. आणि बाजूची ती दोन नारळाची झाडं, अगदी एकमेकांत गुरफटून गेलेली, जणू तोरण बांधल्यासारखी. त्यांच्या झावळ्यांतून दिसणारा चंद्र पाहिला की, त्याला हमखास ती हळूच चेहर्‍यावरचा पदर बाजूला सारत आहे असं वाटत राहायचं..

हम्म्म.. इथल्या प्रत्येक गोष्टीत किती सजीव आठवणी भरून राहिल्यात ना? कसं गोळा करणार हे सगळं? आणि किती? अजिबात राहवेना म्हणून परत आत येवून दार धाडकन आपटून दिलं त्याने..

"कुठेयस तू? झालं तुझं समाधान? हेच पाहिजे होतं ना तुला?"
"ह्म्म्म्म.. तसं नाहीये काही. तुझंच आहे ते सगळं, तुला घेवून जायचंय सोबत ना.."
"हं.... एवढं ओझं सहन नाही होणार आता मला.. सहन करण्याच्या पलीकडे गेलंय सगळं.."
"इसी को जिंदगी कहते हैं दोस्त! ये बोझ भी उठाना ही होगा तुम्हें.."
"........"

--------------------------------------------------------------------------------------------

"काय करतोयस?"
"काही नाही गं.. काय करणार आहे? बसलोय.."
"हो का? आज सामान शिफ्ट करणार होतास ना? नुसता बसलाय की बसला बसलायेस?"
"करायचंय ना.. सामान पॅक करताना, ब्रेक घेतला मध्येच.. आणि तुला काय वाटतं, आज गटारी आहे ना?"
"थोडीफार तरी शरम तुला?"
"शरम काय त्यात? हे ऐक.. जगजीत काय गायलाय अरे..

ठुकराओ.. ठुकराओ अब के प्यार करो,
मैं नशे में हूँ,
जो चाहो मेरे यार करो,
मैं नशे में हूँ.."

"झालं? झालं बोलून?"
"ह्म्म्म्म्म...."
"तुला फक्त कारणं पाहिजे असतात ना? आज काय तर गटारी, काल काय तर हे, उद्या काय तर ते, नाही का? काहीतरी कारण पाहिजे ना फक्त?"
"........."
"कधी बंद करणार आहेस हे सगळं?"
"माहीत नाही, तसं ही कोणत्या साल्याला जास्त जगायचंय?"
"शहाणपणा पुरे झाला.. कधी सुधारणार आहेस?"
"माहीत नाही.."
"कधी स्वतःच्या भविष्याबद्दल विचार केलायेस?"
"नाही.."
"जीवनात काय करायचंय पुढे हे ठरवलयंस?"
"माहीत नाही.."
"किती दिवस असे पुढे ढकलत राहणार आहेस?"
"आय डोंट नो.."
"तुला कधी आनंदी जीवन जगावसंच वाटत नाही का रे?"
"अरे, आनंदी जीवन? हेहे.. ते काय असतं आणि? मला तर माहीत नाही बुवा.. पण त्याच्यावरून हे आठवलं बघ.. लक्ष देवून ऐक..

मैने दिल से कहाँ, ढूँढ लाना खुशी,
नासमझ लाया गम, तो ये गम ही सही..
बेचारा कहाँ जानता हैं, खलीश है ये क्या खला है?
शहर भर की खुशी से, ये दर्द मेरा भला हैं,
जश्न ये रास ना आये, मजा तो बस गम में आया हैं.."

"तू कित्ती वेडा आहेस रे? तुला कळतंय का काय बोलतोय तू? नेहमी सरळ प्रश्न केले की असले काही फिल्मी गाणे नाहितर वाक्यं फेकतोस.. "
"ह्म्म्म्म्म्म.."
"तुला एक सांगते, तुझ्यासारख्या मूर्ख लोकांनी खरं तर प्रेमातच नाही पडलं पाहिजे, तुमच्यासाठी नाहीये ते.."
"खरंय तुझं म्हणणं.. म्हणून तर मी इथून पुढे कुणाच्याच प्रेमात नाही पडायचं असं ठरवलंय.. गम्मत आहे ना?"
"खड्ड्यात जा तू.. "
"......"
"कसा रे तू? काय म्हणू मी तरी? कधी तरी ऐकत जा.. कधी तरी.. तुझी एवढी जीवाभावाची मैत्रीण म्हणून तरी.."
"ह्म्म्म्म्म्म.. जाऊदे ना.. सोड.. मी असाच आहे.. विचित्र.. तू नको वाईट वाटून घेवूस.."
"तुला फक्त चांगला पाहायचंय रे मला, असं सध्या चालू आहे तसा नाही.."
"ह्म्म्म्म.. सगळंच आपल्याला वाटतं तसं होत नसतं आयुष्यात.. सच इज लाईफ.."
"परत तेच. तुला समजावणं अशक्य आहे बाबा.. हात टेकले मी तुझ्यासमोर.."
"हं...."
"काळजी घे रे प्लीज.. नीट राहा.. आणि आयुष्यात खूप काही घडत असतं. मुक्काम बदलत राहतात, जे चांगलं ते घेवून पुढे चालत राहायचं असतं फक्त.."
"हं.... बोलू नंतर.. बाय.."
"बाय.. टेक केअर..."

---------------------------------------------------------------------------------------------------

"साले, तीन बार तुझे फोन किया? किधर रखा है? उठाता क्यूं नहीं भोसडीके?"
"अं.... तू फोन केला होतास? नाही कळालं.."
"नीचे टेंपो खडा है, सामान शिफ्ट करना है के नहीं?"
"अरे हो.. करायचंय ना.. पण सामान सगळं पॅक नाही झालं वाटतं अजून.."
"नाही झालं? सगळं पॅक झालंय.. सगळे बॉक्स एकावर एक रचून झालेत.. रूम ओस पडलीये. कुठेच काही उरलं नाहीये."
"खरंच?"
"मग काय तर? काही राहिलं नाहिये इथे आता तुझं.."
"अरे पण, खरंच सगळं नाही पॅक झालं अजून.. काहितरी राहिल्यासारखं वाटतंय.. काहितरी जवळचं.. खूप आतलं.."
"तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? सगळं तर पॅक झालंय.. उचल ते, आणि खाली चल आधी.."
"हं......"

कसल्याश्या तंद्रीत सगळं सामान गाडीत चढवलं गेलं. मित्रही पुढे जावून बसला.

"चल रे, बैस. निघायचंय आता."
"अं.... फक्त दोनच मिनिटं हा. मी परत वरती जावून शेवटचं पाहून येतो काही राहिलंय का?"
"पागल है तू.. कुछ नहीं बचा, बोल रहा हूं ना. ठीक है फिर भी, जाके आजा जल्दी. मैं इधर ही वेट करता हूं.."

---------------------------------------------------------------------------------------------------

रूमचा दरवाजा उघडून आत पाऊल टाकलं, तर सगळं ओस पडलेलं. एखाद्या भग्न वास्तूसारख्या अस्पष्टशा खाणाखुणा उरलेल्या. त्याला एकदम गलबलून आलं, तसाच मटकन खाली बसला तो..

"निघालास?"
"हं.... निघावं तर लागणारच ना? संपला मुक्काम इथला आता. सगळं गोळा करून घेवून जायचंय. पुढच्या प्रवासासाठी. इथल्या मुक्कामाचं गणित सोडवत. जमेचं सोबत घेवून, उण्याची वजावट करून. हाती काय उरलं असेल ते.."
"ह्म्म्म्म.. "
"एक शेवटची गोष्ट राहिलीये रे.. एक काम होतं तुझ्याकडे. करशील तेवढं?"
"जमण्यासारखं असलं तर करेन ना.. बोल.."
"ह्म्म्म्म.. वाट बदलली माझी आता, आयुष्यात परत हा मुक्काम कधीच येणार नाही. हा रस्ता फक्त पुढे जातो, मागे नाही येता येत इथे. पण मी जरी इथे नसलो तरी तू तरी कधीतरी येत राहशील ना इथे?"
"कदाचित हो.. म्हणजे खरं सांगायचं तर एखादी वेडी रात्र नक्कीच घेवून येईल इथे.. काय म्हणायचंय तुला?"
"मी म्हणतो ते कदाचित कधीच शक्य नाही, पण जर ती चुकून तुला इथे दिसली तर एक शेवटचा निरोप देशील तिला?"
"ह्म्म्म्म्म्...."
"मला स्वतःला काय वाटतंय हेच नीट कळत नाही, पण साहिरच्या या ओळींसारखं वाटतंय नक्कीच. ऐकवशील तिला?"
"हं...."

कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है,
की ज़िंदगी तेरी जुल्फों कि नर्म छांव में गुजरने पाती,
तो शादाब हो भी सकती थी.
यह रंज-ओ-ग़म की सियाही जो दिल पे छाई हैं,
तेरी नज़र की शुआओंमे खो भी सकती थी.
मगर यह हो न सका,
मगर यह हो न सका, और अब ये आलम है,
की तू नहीं, तेरा ग़म, तेरी जुस्तजू भी नहीं.
गुज़र रही है कुछ इस तरह ज़िंदगी जैसे,
इसे किसी के सहारे की आरजू भी नहीं.
न कोई राह, न मंजिल, न रौशनी का सुराग,
भटक रहीं है अंधेरों में ज़िंदगी मेरी,
इन्ही अंधेरों में रह जाऊँगा कभी खो कर,
मैं जानता हूँ मेरी हम-नफस, मगर यूंही,
कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है..

कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है..

गुलमोहर: 

तू इतका रुक्ष आयडी घेतला आहेस, त्याच्या तंतोतंत विरूद्ध तुझं मन संवेदनशील आहे!
छान व्यक्त केलं आहेस.. Happy

तू इतका रुक्ष आयडी घेतला आहेस, त्याच्या तंतोतंत विरूद्ध तुझं मन संवेदनशील आहे!
छान व्यक्त केलं आहेस.. >> मला पण असच वाटतय...

चैत्रा, वर्षू, सावली, चिमुरी, साक्षी, मुक्ता, सुरश, अवनी,
खूप आभार..

बागेश्री, चिऊ,
धन्यवाद..
शेक्सपिअरनेच म्हटलं नाही का?
"What's in a name? That which we call a rose
By any other name would smell as sweet."

शेक्सपिअरनेच म्हटलं नाही का?
"What's in a name? That which we call a rose
By any other name would smell as sweet.">>

हम्म.. बरोबर!
पण नावात बरच काही असतं बरं, किमान व्हर्च्युअल नेटवर्क वर तरी!! Wink

त्यांच्या झावळ्यांतून दिसणारा चंद्र पाहिला की, त्याला हमखास ती हळूच चेहर्‍यावरचा पदर बाजूला सारत आहे असं वाटत राहायचं....!

___^___!