मंदीचा काळ आणि मुलाचं भावविश्व

Submitted by मोहना on 27 July, 2011 - 10:48

दर महिन्याला अमेरिकेतल्या बेरोजगारीचा वरखाली जाणारा दर दूरदर्शनवर सांगतात तेव्हा आशा निराशेच्या खेळात अडकायला होतं. त्या आकड्यामागे दडलेल्या चेहर्‍यांचा आणि संघर्षाचा विचार करायला भाग पाडतं. नजरेसमोर येतात पालकांबरोबर बेघर झालेली मुलं, दप्तराच्या ओझ्याबरोबर पालकांच्या केविलवाण्या परिस्थितीचं ओझं पाठीवर बाळगलेले कोवळे जीव. कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशी वाटणारी ही परिस्थिती तसं म्हटलं तर प्रत्येकाच्या दारापाशी येऊन ठाकली होती. काही बचावले, काही होरपळून निघाले. ज्यानी नोकर्‍या गमावल्या त्यांना आकडेवारीच्या फसव्या मुखवट्यांनी बेचैन व्हायला होतं. ज्यांना अशा परिस्थितीत घर विकावं लागलं, गमवावं लागलं त्यांना मुळात घर घेतलं याचाच पश्चाताप व्हावा अशी वेळ आली. गेल्या दोन वर्षातल्या या परिस्थितीतून गेलेल्या या काही मुलांच्या मनस्थितीचा वेध घेणार्‍या प्रातिनिधिक कहाण्या.

मंदीची झळ सर्वाधिक जाणवत असलेल्या भागातील अमेरिकेतील एक हायस्कूल... या लहान गावात पाचातील एक नोकरीच्या शोधात. मुलांच्या वागण्या-बोलण्यात डोकावणारी अनिश्चित भविष्याची चिंता पाहून बारा-चौदा वर्षांच्या मुलांना त्यांच्या भाषेच्या शिक्षिकेनं बोलतं करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कुणी बोलायलाच तयार नव्हतं. पण शिक्षिकेचा निर्धार पक्का होता. मुलं सगळ्यासमोर मोकळी होत नाहीत हे लक्षात आल्यावर बंद खोलीतल्या कॅमेऱ्यासमोर त्यांनी मनमोकळं करावं अशी कल्पना तिला सुचली. ही कल्पना मुलांच्या गळी उतरलीही. पाणावलेल्या डोळ्यांनी, हुंदके लपवीत मुलांनी कॅमेऱ्यासमोर आपल्या भावनांचा निचरा अडखळत्या शब्द आणि अश्रुनी केला. शाळेच्या कॅमेर्‍याने प्रत्येकांची कहाणी टिपली. कॅमेऱ्यासमोर दिसणाऱ्या प्रत्येक नावात, चेहऱ्यात कितीतरी संघर्षांच्या हृदयद्रावक कहाण्या लपलेल्या आहेत. ही मुलं त्या संघर्षाचं, परिस्थितीचं प्रतिनिधित्व करतात.

एमी घराबद्दल तुटक तुटक बोलते. ‘घरी आम्ही तिघी. आई आणि लहान बहीण, आई वेट्रेस. मिळणाऱ्या ‘टिप्स्’वर तिचं आणि आमचं जगणं अवलंबून आहे. पण गावात किती तरी लोकांना नोकऱ्याच नाहीत तर कोण कसं येणार सारखं बाहेर जेवायला?’ ती कॅमेऱ्याकडे रोखून पाहत आपल्याला विचारते. ‘ रेस्टॉरंटमध्ये पूर्वीसारख्या ’टिप्स’ मिळत नाहीत. आम्ही दोघी बहिणी बेबी सिटींग करून थोडे फार पैसे मिळवतो पण ते तसे फार नाहीत. रोजचे खर्च, घराचं कर्ज, पाणी, विजेचं बिल.. सगळं घर मेटाकुटीला आलं आहे. घरातल्या टेबलावर आईला तोच तोच हिशेब परत परत करताना पाहिलं की काय करावं ते समजत नाही.’ कॅमेऱ्यासमोर नजर रोखून धीटपणे आपल्याला पेचात पाडणारी एमी अचानक चेहरा झाकते आणि आईची चिंता दूर करता येत नाही म्हणून कॅमेऱ्यासमोर हमसाहमशी रडते.

अकाऊंटंट असलेले क्रिसचे वडील गेले सहा महिने नोकरी शोधत आहेत. आई पाळणाघरात नोकरी करते. महिन्याला जेमतेम हातात पडणाऱ्या १००० डॉलर्समधे सगळं घर अवलंबून . घरात मतिमंद भाऊ. क्रिसच्या घरातला रिकामा फ्रिज त्याला शाळेत जायला भाग पाडतो. कारण कमी उत्पन्न असलेल्या मुलांना शाळा मोफत जेवण पुरवितात. ‘एक वेळच्या जेवणाची सोय शाळेतच होते ना म्हणून रोजच्या रोज मी शाळेत येतो.’ खिन्न हसत तो अश्रू लपवायचे प्रयत्न करता करता ते कधी वाहू लागतात ते त्यालाही कळत नाही. क्रिसला निदान हा मार्ग सुचला. लुईसने आपली भुक लपविण्याचा वेगळाच मार्ग स्विकारलेला आहे. झोपणे. तो म्हणतो,
’झोपलं की भुकेची जाणीव विसरायला होते. मी सारखा झोपून राहायचा प्रयत्न करतो.’

मायकलचं अभ्यासात लक्ष लागत नाही कारण त्याला आई वडिलांना परत नोकरी मिळाली नाही तर काय या चितेंने घेरलं आहे. मोटेलमधली एक खोली म्हणजे त्याचं घर आहे आणि कधी ना कधी आधीसारखंच निश्चिंत मनाने खेळता येईल एवढं एकच स्वप्न आहे त्याचं आहे या परिस्थितीत.

अ‍ॅनाचं सर्वच कुटुंब शेल्टरमध्ये राहायला गेलेलं. बाबा कार विक्रेते. आई मॉर्टगेज कलेक्टर. ‘लोकं घरच सोडून चालले आहेत तर आई हप्ते गोळा करण्याचं काम कसं करणार? आणि गाडय़ा विकणं सोपं राहिलं आहे का?’ अ‍ॅना बोलायची थांबते. तिथल्या खुर्चीवर बसकण मारते. कॅमेऱ्यासमोर बराच वेळ खोलीतली भिंत दिसत राहते.
अस्वस्थ मनाने आपण अ‍ॅनाची समजूत कशी घालता येईल याचा विचार करायला लागतो. तेवढय़ात डोळे चोळत ती उभी राहते. आपलं बोलणं पुढे चालू ठेवते. ‘तरी सात महिने आम्ही कसंबसं भागवीत होतो पण घरात लाइट नाही, पाणी नाही. काय करणार? शेल्टरमधली एक खोली आता आमचं घर आहे. तिथे बाहेर फिरताना मी आमच्या घराच्या आसपास आहे, अशी कल्पना करते. किती तरी वेळा आम्ही सगळे सोडून आलेलं घर नुसतं दृष्टीखालून घालायला घरापाशी जातो. ते तसंच उभं आहे, पडीक. बाबांना आणि आईला परत नोकरी मिळाली की कदाचित जाऊ तिथे राहायला. विजेचं बिल आणि खाणं-पिणं एवढा खर्च तरी करता यायला हवा नं.’

सर्वच मुलांना काय आणि किती बोलू असं होऊन गेलेलं. प्रत्येकाची कहाणी मुलं नंतर वर्गात एकत्र बसून पाहतात. गळ्यात गळे घालून रडतात. शाळा आणि मुलांना यातूनच एक अभिनव कल्पना सुचते. आपली कहाणी ‘यू टय़ूब’वर प्रसिद्ध करायची. शीर्षक ‘इज एनीबडी लिसनिंग?’ आणि खरंच या मुलांची हाक ऐकली गेली. वादळानंतर प्रकाश दिसतो हे क्रिसचे उद्गार सार्थ ठरले. कुणा अनामिकाने शाळेला पंधरा हजार डॉलर्सची देणगी दिली. एका शेतकऱ्याने तर २००० डॉलर्सबरोबरच ४०० पौंड अ‍ॅव्होकाडो शाळेला दिले. मुलांच्या आई-वडिलांना नोकऱ्या देण्याची आश्वासनं मिळाली.

लोरी आणि इझाबेल, दहा आणि पाच वर्षाच्या. प्राध्यापक आणि अकाउंटट असलेल्या पालकांची नोकरी गेली, तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या आणि काही काळातच या कुटुंबाला रस्त्यावर यावं लागलं. शिकागोच्या रस्त्यावर पाच महिने रस्त्यावर, रेल्वेमध्ये काढावे लागले. पाच वर्षाच्या पाय सुजलेल्या इझाबेलला रेल्वेस्टेशनवर पोलिसांनी पाहिली. अशावेळेस ही मुलं सरकारच्या ताब्यात जातात आणि नंतर फॉस्टर केअर मध्ये. पण शिकागो आणि अशाच इतर पाच राज्यात सध्या ’सेफ फॅमिलीज’ नावाची संस्था कार्यरत आहे. यात आहेत तात्पुरते पालकत्वं निभावणारे नागरिक. पालक जोपर्यंत स्वत:च्या पायावर पुन्हा उभे राहात नाहीत तोपर्यंत ही मुलं त्यांच्याकडे राहातात. सध्याच्या परिस्थितीत वर्षभर ही मुलं अशा पालकाकडे राहिल्याची उदाहरणं आहेत. लोरी आणि इझाबेललाही असेच पालक त्या पोलिसांनी मिळवून दिले.
पाच आणि दोन वर्षाच्या मुलांना शनलने दत्तक देण्याचा निर्णय नाईलाजाने घेतला. कॅन्सरचं निदान झालं त्यातच नोकरी गेलेली. शेवटी ती घरही गमावून बसली. मुलं दत्तक गेली तर निदान त्याचं भलं हा विचार चालू असतानाच ’सेफ फॅमिलीने’ मदतीचा हात पुढे केला. या संस्थेने तिला त्यांच्याकडेच कामाची सोय करुन दिली. आता लहानशी नोकरी असलेल्या शनलला मुलं आपल्याकडेच राहिल्याचं समाधान आहे.

प्रश्न असा पडतो की या लोकांना मदत करणारं कुणीच नाही का? आई, वडील, भावंडं, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी? पण बरेच लोक याच संकटाचून जात असताना कोण कुणाला आधार देणार हे कटू सत्य त्यात दडलेलं आहे.

भारतीयांच्या माथी काही वेगळं नशीब रेखाटलेलं नाही. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक कहाण्या. जवळपास चाळीस लाख भारतीय या देशात आहेत. आजूबाजूला कुणी ना कुणीतरी नोकरीच्या शोधात असलेलं नजरेला पडतंच. काहींना दुसरी नोकरी मिळेलच याची खात्री आहे तर काही जण नुसत्या खात्रीवर न थांबता त्या व्यतिरिक्त काही मार्ग चाचपडताना दिसतात. पालकांवर अवलंबून असलेल्या मुलांचं भावविश्व जाणता अजाणता दोलायमान होत जातं अशा परिस्थितीत. त्यांच्यावर नकळत किती दडपण आलेलं आहे ते त्यांच्या कृतीतून व्यक्त होतं.

‘युवर लास्ट डेट विल बी २० जुलै २०१०.’
ई-मेल वाचताना विक्रम कानडेला उगाचच समाधान वाटलं. खरं तर असं व्हायला नको होतं. अस्वस्थपणा यायला हवा होता. पण तसं झालं नाही. ग्लॅक्सोमध्ये गेली अकरा वर्ष दिवसाचे चौदा-पंधरा तास आणि रात्री-अपरात्री केलेलं काम. यातून मिळणाऱ्या विश्रांतीचा आनंद पुढल्या अशाश्वत भविष्यापेक्षाही अधिक होता. थोडासा आराम आणि घरातल्या लोकांचा सहवास हाच विचार मनात आधी डोकावला. नंतर मिळेलच नोकरी, फार तर प्रवास करावा लागेल. पण ते तर ग्लोबलायझेशनच्या जमान्यात प्रत्येकाच्याच माथी मारलेलं. मनात खूप गोष्टी घोळायला लागल्या होत्या. सुरुवातीचे दोन-तीन महिने खूपच चांगले गेले. मनातल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरत होत्या. त्यातही वेळ मिळाला तेव्हा रेझ्युमे अपडेट करून मॉनस्टर, करिअर लिंक, डाइस अशा कितीतरी संकेत स्थळांवर त्याने टाकला. नेहमीच्या अनुभवाप्रमाणे लगेचच फोन खणखणणं नको होतं. बघता बघता यालाही वर्ष होऊन गेलं. आता विक्रम अधीरपणे कधी काम सुरू होईल याची वाट पाहतोय. परिस्थिती सुधारते म्हणतात पण जे यातून जातायत त्यांना भविष्याचं चित्र फारसं रम्य दिसत नाही. हा कडू घोट पचवायला फार प्रयास पडतात, हे सांगताना विक्रमच्या आवाजातली निराशा लपत नाही. बाजूला बसलेली मालती हसते. ‘विक्रमची नोकरी गेल्यानंतर मी तीन-चार महिन्यांनी बँकेत काम करणं सुरू केलं. पण माझीही नोकरी गेली आहे गेल्या महिन्यात. पुढे काय माहीत नाही. पण एक बरं आहे की आम्ही अपार्टमेंटमध्येच राहतोय त्यामुळे घर, कर्जाचे हप्ते, घरासंदर्भात सतत निघणारी कामं, दुरुस्त्या असल्या खर्चाची काळजी नाही. मुलं नाहीत हेही समाधानच वाटतंय या स्थितीत. गाशा गुंडाळून कधीही जिथे नोकरी मिळेल तिथे जाता येईल. ज्यांनी घरं घेतली आहेत आणि नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांची फारच पंचाईत, घर विकलं जाणं, भाडय़ाने जाणं या काळात शक्यच नाही. हप्ते भरता येत नाहीत म्हणून बँकेने घर ताब्यात घेतलेलं पाहण्याचं नको यायला नशिबात.’
प्रत्येकाच्या मनातलं मालती बोलते आणि ते खरंही आहे. त्यात शाळेत जाणारी मुलं असतील तर खूपच अवघड होतं. घरात नाहीतर मित्रमंडळींशी फोनवर, चर्चेत सतत तीच होणारी चर्चा मुलांना अस्वस्थ करून टाकते. बारीकसारीक बदल मुलं टिपत आहेत हे लक्षात येतं, जेव्हा घरातील खर्च कसे वाचविता येतील याचे वेगवेगळे मार्ग ती सुचवितात तेव्हा. मुलांच्या मनात भीती दडलेली असते ती नोकरीसाठी शहर सोडावं लागलं तर शाळा, मित्र-मैत्रिणी यांना सोडून जावं लागणार. घराचे हप्ते फेडणं जमलं नाही तर बँक घर ताब्यात घेईल याची.

आई वडिलाची नोकरी गेल्यानंतर बॅलेचा वर्ग चालूच ठेवण्यासाठी अभिनव मार्ग सानिकाने शोधला. स्टुडिओच्या स्वच्छतेचं काम तिने स्वत:हून अंगावर घेतलं. त्यातून मालकाने तिला वर्ग चालू ठेवायला परवानगी दिलीच पण कधीही येऊन बॅलेचा सराव करण्याची मुभाही. यातूनच तिच्या आई-बाबांनाही अधिक उत्पन्नाचा एक मार्ग सुचला. घरातली खोली भाडय़ानं देणं! इतके दिवस ते मुलांना त्यांच्या लहानपणी मुंबईत दोन खोल्यात कशी किती जणं राहत, इथल्या बाथरूम म्हणजे त्यांच्या दोन खोल्या अशा गोष्टी रंगवून सांगत. महालासारख्या घरात इथली मुलं वाढतात. त्यांना हे कळणं कठीणच. पण आता एका दगडात दोन पक्षी. अधिक उत्पन्नाचा एक मार्ग आणि मुलांसाठी तडजोडीचं प्रात्यक्षिक. त्या दोघांनी लगेचच क्रेग्स लिस्ट (स्थानिक जाहिरातीचं संकेतस्थळ) मध्ये जाहिरात दिली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरातील खोली गेलीदेखील. त्या खोलीचा वापर फारसा होत नव्हताच. त्यांच्याकडच्या एका खोलीत राहणाऱ्या भाडेकरूला मार्थाला ही कल्पना खूपच नावीन्यपूर्ण वाटली. ती एकटीच. जेमतेम पंचविशीची. शाळेच्या जवळ असलेल्या अपार्टमेंटचं सहाशे डॉलर्सचं भाडं एकटय़ासाठी तिला जास्तच होत होतं. या घरातली ही एक खोली फक्त साडे-तीनशे डॉलर्सला तिने क्रेग्स लिस्टवर पाहिली आणि डोळे झाकून इथे राहायचं ठरवलं. पुन्हा भारतीय म्हणजे सुरक्षितपणाची खात्रीही. कधी तरी आवडती इंडियन करी चाखायला मिळेल ही देखील आशा आहे, असं ती हसत हसत सांगते.

खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रघात या देशात आता पडू पाहत आहे तोही नावीन्यपूर्ण म्हणून. नवलच नाही का? मुलं त्यांचे पालक यांचा विचार करताना वयस्कर लोकांच्या हालाची कल्पनाही करवत नाही. ४०१ के (सेवानिवृत्तीसाठी पैसा, पेन्शन फंड) मध्ये असलेला पैसा पुन्हा नजरेला पडेल की नाही हे त्यांना सांगता येत नाही. सध्या बहुतेकांच्या पेन्शनचा आकडा तळाला गेलेला आहे. हा पैसा पुन्हा वर यायला जेवढी वर्ष लागतील तोपर्यंत या वृद्धांच्या आयुष्याची शाश्वतीही नाही. वयामुळे लहानसहान नोकरी मिळवणंही कठीण होऊन बसलेलं. बरीच वयस्कर मंडळी प्रकृतीचा धोका अधिक वाढतो हे समजत असूनही अमेरिकेत नेहमीच महागडी मिळणारी औषधं घेणं टाळतात. हीटरचं बिल येऊ नये म्हणून थंडीत कुडकुडत दिवस काढतात.

आहे हे असं आहे. सद्य परिस्थितीतून मार्ग काढताना चित्र बदलंत चाललय म्हणतानाच जे यातून भरडून निघत आहेत त्यांच्या मनात बदलत्या चित्राचा आशावाद अंधुक आहे आणि तो भाबडा तर ठरणार नाही ना, ही काळजीही.

(हा लेख मी लोकसत्तासाठी लिहीला होता. त्यावेळेस लेखात अनएम्पॉलयमेंट ऑल्मिपिंक बद्दल लिहिलं होतं. ते बहुधा बंद पडलं असावं कारण त्याचा उल्लेख कुठे सापडला नाही या विषयाची माहिती पुन्हा शोधताना. बाकी परिस्थिती फार बदललेली नाही. )

गुलमोहर: 

अशीच परीस्थिती किंबहुना यापेक्षा विदारक परिस्थिती आणि त्याची जाणिव असलेली मुलं भारतातही नाहीत का? कुठल्याही लहान गावातल्या बसस्टँडवर किंवा रस्त्याच्या कडेला असलेली लहान लहान हॉटेलं आणि तिथे काम करणारी अगदी ५-६ वर्षांची मुलं हे चित्र सर्रास दिसतं. भारतातही खेडेगावात मुलं शाळेत जेवायला / खिचडी खायला मिळते म्हणून जातात. आईवडिलांना मिळणारा रोजगार वाढत्या कुटूंबाला पुरत नाही म्हणून लहानग्या भावंडांना संभाळत दगड फोडणारी ७-८ वर्षाची मुलगी, झेपत नसताना वयापेक्षा जास्त वजनाचं ओझं वाहून नेणारी कोवळी मुलं, आयांबरोबर धुण्याभंड्यांच्या कामाला जाणार्‍या मुली... किती उदाहरणं आहेत...
अमेरीकेत अशा लोकांची निदान सरकार थोडीफार काळजीही घेते. भारतातलं काय? का अमेरीकेतल्या संपन्न देशात असं चित्र थोड्याफार प्रमाणात आढळतं म्हणून त्याबद्दल विशेष वाटतं?

अंजली<<<अमेरीकेतल्या संपन्न देशात असं चित्र थोड्याफार प्रमाणात आढळतं म्हणून त्याबद्दल विशेष वाटतं?>>> संपन्न देशात असं चित्रही असतं हे तरी किती लोकांना माहित असतं? आणि भारतातल्या अशा परिस्थितीबद्दल लिहीत असतातच की लेखक लोक.

अंजली तुझा मुद्दा नाहि कळला नि जो कळला तो नाहि पटला. "भारतामधे प्रॉब्लेम आहे (का) ?" हा ह्या लेखाचा विषय नाहि. "अमेरिकेमधे मंदीमूळे मुलांचे ढवळलेले भावविश्व" एव्ह्ढ्याच परिघामधे बघता नाहि का येणार ? त्याच्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्नही लेखात नाहिये हे लक्षात घे.

का अमेरीकेतल्या संपन्न देशात असं चित्र थोड्याफार प्रमाणात आढळतं म्हणून त्याबद्दल विशेष वाटतं?>>IMHO this is cruel statement. प्रत्येकाला आपला काहि तरी issue असतो नि तो त्यांच्यासाठि जीवनमरणाचा प्रश्न असतो. त्याची इतरांशी तुलना का ?

मोहना लेख आवडला. काहि महिन्यांपूर्वी bloomberg अशाच्याच विषयावर आलेला लेख वाचूनही असच अस्वस्थ व्हायला झाले होते.

भारतामधे प्रॉब्लेम आहे (का) ?" हे हा ह्या लेखाचा विषय नाहि.>>> म्हणून मी भारतातही हा प्रॉब्लेम आहे असं मांडायचं नाही?

अमेरिकेमधे मंदीमूळे मुलांचे ढवळलेले भावविश्व" एव्ह्ढ्याच परिघामधे बघता नाहि का येणार >>> माझ्या दृष्टीने हा वैश्विक प्रॉब्लेम आहे. जगातल्या अगदी संपन्न देशापासून ते अगदी 'third world countries' पर्यंत याची व्याप्ती आहे. मग त्याबद्दल बोलायचं नाही का? मी इथे उपाय सुचवण्याबद्दल काय लिहीलं आहे?

त्येकाला आपला काहि तरी issue असतो नि तो त्यांच्यासाठि जीवनमरणाचा प्रश्न असतो. त्याची इतरांशी तुलना का ?>>> यात तुलना काय आली बुवा? आणि त्यात cruel statement काय आहे? यापेक्षा अधिक so called cruelty वर इथेच झडझड चर्चा होत नाहीत का? तुझं जसं 'opinion' आहे तसं माझं असू नये का? Uhoh

मीपण अगदी नुकताच या अनुभवांवर एक कार्यक्रम बघितला होता. भारतातल्या मुलांचं भावविश्व त्यात दाखवलं होतं. मला फार फार अस्वस्थ वाटलं ते पाहुन. माझ्या मुलीनंही तो कार्यक्रम पाहिला. नंतरच्या तिच्या प्रश्नांना माझ्याजवळ उत्तरं नव्हती. तो अनुभव ताजाच असल्यानं मी प्रतिक्रीया दिली तर ती cruelty होते?

अंजली मी एव्हढेच म्हणेन कि तुला जे अभिप्रेत आहे (असे तुझ्या वरच्या पोस्ट्मधून तू म्हणते आहेस) ते पहिल्या पोस्टमधून वाटत नाहि (मला तरी वाटले नाहि) तुझ्या दुसर्‍या पोस्ट्नंतर पहिल्या पोस्टचा अर्थ बदलतोय पण मी माझे पोस्ट त्या आधी लिहिलेले आहे.

"तू लिहू नये" असे मी कुठेही सुचवलेले नाहि हे क्रुपया लक्षात घे.

Candy,

तुमचे मत आहे आणि I respect your opinion.
जसं तुमचं मत आहे तसंच माझं मत असू शकत नाही का? जर तुमच्यापेक्षा वेगळं मत असलं तर ते 'अस्थानी' होतं का? मी मला जे वाटं ते प्रामाणिकपणे मांडलं तर 'पूर्वग्रहदूषित मत' होतं का?

साधी गोष्ट आहे. मोहनाने हा प्रॉब्लेम अमेरीकेतला म्हणून मांडला. माझ्या दृष्टीने हा प्रॉब्लेम वैश्विक आहे. भारतात तर जास्तच. हे माझं मत चुकीच असेल तर तसं जरूर सांगा. आपण त्यावर चर्चा करू.

तुमचे आत्तापर्यंत पाहाण्यात आलेले लेख अमेरिकेची फक्त निगेटिव्ह बाजु दाखवणारे वाटले. अर्थात सत्य परिस्थिती आहेच, पण एक पॅटर्न जाणवला. काहि खास कारण? एखाद दुसरा लेख चांगल्या गोष्टींवरहि लिहुन बघा; विषय बरेच आहेत.

शीर्षक वाचुन जरा गोंधळातच पडलो, वाटलं हा काहि "बेबी बुमर्स" सारखा प्रकार तर नाहिना... Happy

अवांतराबद्धल दिलगीर.

राज: नाही हो, मी सगळ्या बाजू लिहल्या आहेत अमेरिकेच्या :-). आणि अमेरिकेच्या चांगल्या गोष्टी तर जगजाहिर आहेत.
तुम्ही विनोदी लेख वाचले नाहीत का मी लिहीलेले?
मला वाटतं शीर्षक बदलावं या लेखाचं.

मला पटले अंजलीचे म्हणणे.

मोहना मला आपल्या लेखा मागची भूमिकाच व्यवस्थित कळली नाही. अमेरिकेसारख्या संपन्न देशातही गरीब लोकं असतात असे म्हणायचे होते का?
बर्‍याचदा अमेरिकेतील टॉकशो कसे असतात तसे आपले लेख वाटतात.म्हणजे एकीकडे मला आपण अमेरिकेची वेगळी बाजू मराठीत मांडता ते खूप आवडते आणि एकीकडे याचा सोर्स/ संदर्भ काय असावा असे वाटते. उदाहरणार्थ हा माहितीपट आहे का? तो आपण कुठे आणि कसाकाय पाहिला? की आपणच ती शिक्षीका आहात आणि आपण त्या मुलांना बोलते केलेत?

रैना<<< बर्‍याचदा अमेरिकेतील टॉकशो कसे असतात तसे आपले लेख वाटतात>>>म्हणजे?

हो हा माहितीपट होता पण आता त्याची लिंक उपल्ब्ध नाही, नाहीतर मी दिली असती.

<<मला आपल्या लेखा मागची भूमिकाच कळली ना>>> लहान मुलं अशा परिस्थितीत काय विचार करत असतात हे मांडणं एवढीच या मागची भूमिका आहे.

रैना, हे मंदीची झळ लागलेल्या लहान मुलांबद्दल आहे, अमेरिका किंवा भारताविषयी किंवा गेला बाजार अजून कुठल्या देशाबद्दल नाही.

हे मंदीची झळ लागलेल्या लहान मुलांबद्दल आहे>>> मीपण माझ्या मुद्द्यात तेच मांडलं आहे. मंदीची झळ लागलेली लहान मुलं भारतातही आहेत ना?

ओह ओके. थँक्स मोहना / सिंडी.

मोहना,
किंचीत वेगळी शैली नाहीतर थोडासा अजून अभ्यास/ नेमके संदर्भ /आकडेवारी, इतर देशातील आकडेवारी, आपला वैयक्तिक अनुभव अथवा निरीक्षण, स्वत: साधलेले अमेरिकन व्यक्तिंशी संवाद असे काहीतरी टाकलेत तर कदाचित लेख अजून परिपूर्ण होईल. मग तो'पॅटर्न' वाटणार नाही कदाचित. पुस्तकही काढता येईल पुरेसे संशोधन असले तर.
याबाबतीत अवचटांचे 'अमेरिका' कदाचित मार्गदर्शक ठरु शकेल.
आगाऊपणा वाटत असेल तर माफी मागते. एक वाचक म्हणून सहज सांगीतले. कारण आपले लेख कॅज्युअल ब्लॉग पोस्ट पेक्षा खूप चांगले वाटतात, तरीही थोडीशी उणीव वाटते.
कृपया गैरसमज नसावा. अमेरिकेतील ही बाजू आपण सातत्याने मांडताय हे खरोखर कौतुकास्पद वाटते म्हणून न राहवून सांगीतले. आणि मुळात आपल्याला ही बाजू दिसते, जाणवते, त्याबद्दल लिहावेसे वाटते याचे मनापासून खूप कौतुक.

रैना <<<किंचीत वेगळी शैली नाहीतर थोडासा अजून अभ्यास/ नेमके संदर्भ /आकडेवारी, इतर देशातील आकडेवारी, आपला वैयक्तिक अनुभव अथवा निरीक्षण, स्वत: साधलेले अमेरिकन व्यक्तिंशी संवाद असे काहीतरी टाकलेत तर कदाचित लेख अजून परिपूर्ण होईल. मग तो'पॅटर्न' वाटणार नाही कदाचित. पुस्तकही काढता येईल पुरेसे संशोधन असले तर.
>>>> राग नक्कीच नाही. वाचकांचा तो हक्क आहेच. त्यातून काय सुधारता येईल ते लक्षात येतं ना. मी त्या त्या विषयाची माहिती मिळवते बरीच लेख लिहण्याआधी. पण हा अभ्यास करुनही लेखात लिहित नाही याचं कारण म्हणजे मला तरी असे लेख आकडेवारीने भरलेले वाटतात आणि त्यातल्या भावना नष्ट झाल्यासारखं. अर्थांत प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असणार.
'पॅटर्न' - राजच्या प्रतिक्रियेवरुन तुम्ही म्हणताय का? मा. बो. वर जे लेख मी टाकले ते अमेरिकेची निगेटिव्ह बाजू दाखविणारे आहेत असं ते म्हणतायत. म्हणूनच त्यांना मी म्ह्टलं की माझे विनोदी लेख वाचले नाहित का?
लेखाचं पुस्तक हा विचार नाही केला मी. पण माझा 'मेल्टिंग पॉट' हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. जरुर वाचा.

मग ?>>> Uhoh >>>> कुठल्या देशातली उदाहरणं दिलीत ह्याने काय फरक पडतो ? पुन्हा एकदा म्हणेन हा लेख मंदीची झळ लागलेल्या लहान मुलांबद्दल आहे, अमेरिका किंवा भारताविषयी किंवा गेला बाजार अजून कुठल्या देशाविषयी नाही

रच्याकने, दुसर्‍या एखाद्या देशातली उदाहरणं दिली असती तर मग 'अमेरिकेत सुद्धा परिस्थिती वेगळी नाही. इथे पण मंदीची झळ बसलेली अशी शाळकरी मुलं आहेत.' अशी प्रतिक्रिया आली असती का हा प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाही.

रच्याकने, दुसर्‍या एखाद्या देशातली उदाहरणं दिली असती तर मग 'अमेरिकेत सुद्धा परिस्थिती वेगळी नाही. इथे पण मंदीची झळ बसलेली अशी शाळकरी मुलं आहेत.' अशी प्रतिक्रिया आली असती का हा प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाही.>>> हो कदाचित आली असती. आणि ही समस्या सगळीकडे आहे म्हटल्यावर त्यात अमेरीकापण आलीच.

तू जो मुद्दा मांडते आहेस, तेच माझं म्हणणं आहे इतकंच. माझाही दृष्टीने ही "वैश्विक" समस्या आहे हे मी वर लिहीलं आहे.

मंदीच नाही तर कुठलेही छोटे मोठे बदल कुठल्याही देशातल्या, परिस्थितीतल्या नि वयाच्या मुलांवर आघात करून जातात. मोहना, लेख छान आहे.

असा अनुभव एका सूखवस्तू कुटुंबासंदर्भात ५० - ६० वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे एका माझ्याही मागच्या पीढीतल्या मुलांनी वडिलांना धंद्यात फसवल्याने उत्पन्न अगदीच शून्य झाले तेंव्हा केलेल्या तडजोडीचा! त्या काळात तर अणी नाही तर कणीही नाही, शिक्षण नाही अशी वेळ. वेगवेगळ्या वयोगटातल्या भावंडांवर आर्थिक परिस्थितीतल्या बदलाचे खूप वेगवेगळे परीणाम झालेले मी पहीले आहेत.
दुसर्‍या महायुद्धात ज्यू मुलांच्या भावविश्वातले असे बदल लोकांनी लिहून ठेवले आहेत.

चांगला लेख आहे. Happy

सिंड्रेलाला अनुमोदन. फक्त अमेरिकेतल्या मुलांच्या परिस्थिती बद्दल जर लेख आहे तर मग भारतात सुद्धा मुलं ह्यातून किंवा ह्या पेक्षा जास्त त्रासातून जात असतील ह्या गोष्टीचा इथे काय संबंध?

आणि एक मिनीट हा लेख आणि मोहना ह्यांचे बाकी लेख अमेरिकेच्या काही नेगेटिव्ह बाजू दाखवणारे असले तर काय फरक पडतो? जे त्यांना वाटलं ते लिहीलं. आता जरा चांगल्या बाजूंबद्दल ही लिहा ह्या सल्ल्याचे सुद्धा काय प्रयोजन?

आकडेवारी बद्दल तुमचं मत पटलं मोहना. मलाही खुप जास्त आकडेवारी असलेले लेख जरा अवघड जातात "रिलेट" करायला.

फक्त अमेरिकेतल्या मुलांच्या परिस्थिती बद्दल जर लेख आहे तर मग भारतात सुद्धा मुलं ह्यातून किंवा ह्या पेक्षा जास्त त्रासातून जात असतील ह्या गोष्टीचा इथे काय संबंध?>>> सिंड्रेला म्हणत आहे ना की जगभरात ही समस्या आहे म्हणून?

आणि अशी किंवा हीच परीस्थिती बाकीच्या देशांमधेपण आहे हेच मांडलं आहे. यात काय चूक आहे?
कमाल आहे Uhoh

किंचीत वेगळी शैली नाहीतर थोडासा अजून अभ्यास/ नेमके संदर्भ /आकडेवारी, इतर देशातील आकडेवारी, आपला वैयक्तिक अनुभव अथवा निरीक्षण, स्वत: साधलेले अमेरिकन व्यक्तिंशी संवाद असे काहीतरी टाकलेत तर कदाचित लेख अजून परिपूर्ण होईल. मग तो'पॅटर्न' वाटणार नाही कदाचित. पुस्तकही काढता येईल पुरेसे संशोधन असले तर.>> रैने वेगळ्या पद्धतीने बघ. तू म्हणतेस तसे न केल्याने ह्यातली intensity पोहोचत नाहिये असे झालय का ?

रच्याकने, दुसर्‍या एखाद्या देशातली उदाहरणं दिली असती तर मग 'अमेरिकेत सुद्धा परिस्थिती वेगळी नाही. इथे पण मंदीची झळ बसलेली अशी शाळकरी मुलं आहेत.' अशी प्रतिक्रिया आली असती का हा प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाही>> कळीचा प्रश्न सिंडी. मला नाहि वाटत.

कळीचा प्रश्न सिंडी. मला नाहि वाटत >>> नाही हं, प्रत्येक जण इथे आपले अनुभव लिहितोच.. मग ते इतर देशातले असोत की अमेरिकेतले.

वैश्विक प्रश्न आहे ते सगळ्यांनाच माहित आहे. पोस्ट बघून तरी "अमेरिकेत आहे तर काय? भारतात तर त्याहून वाईट परिस्थिती आहे" (मग ह्यात काय नवल) असा अविर्भाव स्पष्ट जाणवतो.

Pages