दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २

Submitted by वेताळ_२५ on 26 July, 2011 - 12:13

300px-RaigadFort31-tile.jpg

दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग १
http://www.maayboli.com/node/27603

बाजीराव आणि किल्ले

पेशवेपदाच्या सामन्यात शेवटी दुसरा बाजीराव यशस्वी झाला. (डिसेंबर १७९६) दुसर्‍या बाजीरावला पेशवेपद मिळाल्यामुळे मराठ्यांची मध्यवर्ती सत्ता निस्तेज बनली. मराठे सरदारांमध्ये दुही व एकमेकांविषयी संशय व द्वेष निर्माण होऊन बजबजपुरी माजली. दुसर्‍या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतल्यामुळे यशवंतराव होळकरांसारख्या तडफदार सरदारांची घोर निराशा झाली. स्वत: यशवंतराव मराठा मंडळाचा ढासळू पहाणारा डोलारा सावरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. पंरतु बाजीरावाला मनातून यशवंतरावाची भीती वाटत होती. अशा अस्थिर राजकीय परस्थितीत दुसर्‍या बाजीरावाला शिवाजी महाराजांच्या राजधानीविषयी - रायगडाविषयी- विलक्षण प्रेम वाटू लागले. डोंगरी किल्ल्यांच्या सहाय्याने आपण सर्व संकटावर मात करू असा फाजील आत्मविश्वास त्याच्या ठायी निर्माण झाला. शिवाजीमहाराजांनी रायगडावरून राजकारण केले तसे आपल्यालाही करता येणे शक्य आहे असे त्याला वाटू लागले. परंतु बाजीरावाचे हे मनोरथ त्याच्या भयगंडातून निर्माण झाले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी डोंगरी किल्ल्यांचा उपयोग करून घेण्याचे शिवाजीमहाराजांचे असामन्य कर्तॄत्व बाजीरावाजवळ मुळीच नव्हते.

बाजीरावाची धडपड

दुसर्‍या बाजीरावाला डिसेंबर १७९६ मध्ये पेशवेपद मिळाले होते. पेशवेपदावर येताच बाजीरावाने दौलतराव शिंद्यांशी सख्य जोडले आणि नाना फडणीसास अटकेत टाकले. दौलतराव शिंदे आणि सर्जेराव घाटगे यांची पुण्यामध्ये दहशत निर्माण केली. बाजीराव नेहमी शिंद्याच्या वर्चस्वाखाली वागत होता. नाना फडणीसाची सुटका करून बाजीरावाने त्यांना पुन्हा कारभारी नेमले. परंतु नाना फडणीसाचा लवकरच मृत्यू झाल्यामुळे (मार्च १८००) बाजीरावाचा आधरच तुटला. त्यावेळेचा पुण्याचा इंग्रज वकील पामर याने लॉर्ड वेलस्लीला नाना फडणीसाच्या मृत्यूच्या संदर्भात कळविले होते. "नाना फडणीसाच्या मृत्यूबरोबर मराठेशाहीचे शहाणपण लयास गेले." वस्तुस्थिती तशीच होती. भेदरलेला बाजीराव स्वत: कोणतेही निर्णय घेण्यास असमर्थ होता.
एप्रिल १८०१ मध्ये बाजीरावने एक विचीत्र कृत्य केले. यशवंतराव होळकराचा भाऊ विठोजी होळकर याला पुण्यात आणून हत्तीच्या पायाखाली ठार मारले. या घटनने यशवंतराव प्रक्षुब्ध होणे स्वाभाविक होते. याच सुमारास बाजीरावाने रास्ते, पटवर्धन, प्रतिनीधी, होळकर इत्यादी मातब्बर सरदारांच्या जहागीर्‍या जप्त करण्याचे हुकूम काढले. ही विनाशकाले विपरीत बुद्धी होती. यशवंतराव होळकराने पुण्यावर हल्ला करण्याचे ठरविले. अशावेळी दुसर्‍या बाजीरावाला रायगडची आठवण झाली. आपल्या कुटुंबातील स्त्रीयांना सुरक्षिततेसाठी त्याने रायगडाकडे धाडले. सवाई माधवरावाची पत्नी यशोदाबाई हिलाही बंदोबस्तामध्ये रायगडला ठेवण्यात आले.

दरम्यान यशवंतराव होळकर झंझावाती वेगाने पुण्यापर्यंत आला. ऑक्टोबर १८०२ मधे त्याने बाजीराव व शिंदे यांच्या संयुक्त फौजांचा पराभव केला. बाजीरावाने रायगडच्या रोखाने पळ काढला. यशवंतरावाने त्याच्या पाठलागावर फौज पाठविली. बाजीरावाला पुण्यात आणून पुन:स्थिरस्थावर करण्याचा यशवंतरावाचा हेतु होता. परंतु बाजीरावाला यशवंतरावाची अतिशय भिती वाटत होती. रायगडच्या परिसरात होळकरांच्या फौजेने दहशत निर्माण केली. तेव्हां बाजीराव रायगड सोडून सुवर्णदुर्गाकडे गेला आणि तेथून ७ डिसेंबर १८०२ रोजी वसईला इंग्रजांच्या आश्रयास गेला. ३१ डिसेंबर १८०२ रोजी इंग्रजांबरोबर तह करून बाजीरावाने तैनाती फौज स्विकारली व मराठ्यांचे स्वातंत्र्य लिलावात काढले.
बाजीराव रायगडहून पळून गेल्याचे कळताच यशवंतराव हताश झाला. त्याने रायगडचा वेढा काढून घेतला. पण बाजीरावाची मात्र अशी समजूत झाली की रायगड अभेद्य असल्यामुळे यशवंतरावाला जिंकता आला नाही. या समजुती मुळे बाजीरावाला 'तख्ताच्या जागे' विषयी अधिकच प्रेम व विश्वास वाटू लागला. पुन: कधी संकट आल्यास रायगडचा आश्रय घेऊन प्रतिकार करता येईल याची खूणगाठ बाजीरावाने मनाशी बांधली.

रायगडाचे दुर्दैव

वसईचा तह झाल्यावरही बाजीरावाला सुरक्षितता वाटत नव्हती. सिंहगडावर असलेली रत्नशाला बाजीरावाने रायगडावर हलवली. आपले खास दागिने व जडजवाहीर त्याने रायगडच्या रत्नशालेत ठेवले. इंग्रजानी १८०५ पर्यंत शिंदे व होळकर यांच्याशी युद्ध करून त्यांन नामोहरण केले, यशवंतराव होळकर मात्र १८११ पर्यंत इंग्रजांबरोबर एकाकीपणे झुंज देत होता. बाजीरावाला यशवंतरावाची भीती कायम वाटत होती. १८११ मध्ये यशवंतराव जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणार होता. या बातमीने बाजीरावाचे धाबे दणाणले. त्याला पुन्हा रायगडची आठवण आली आणि त्याला थोडा धीर आला. यावेळी तर सातरच्या छत्रपतीनेही दुर्गम रायगडच्या आश्रयाला जावे असे बाजीरावाला वाटत होते.
बाजीरावाने १७ फेब्रुवारी १८११ रोजी सातारच्या छत्रपतींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की यशवंतराव जेजुरीच्या दर्शनाचे निमित्त करून येत असला तरी त्याचा अंत:स्थ हेतू वेगळा असावा. तेव्हां आपण रायगडच्या आश्रयास जावे हे उत्तम.
बाजीरावाच्या पत्रावरून त्याच्या संशयी व भेकड वृत्तीची कल्पना येण्यासारखी आहे. यशवंतराव सातार्‍याला जाऊन दुसर्‍या कुणासाठी पेशवाईची वस्त्र आणील याचा संशय बाजीरावाला येत होता म्हणून महाराजांनी रायगडावर जावे अशी त्याची घाई होती. स्वत: बाजीराव मात्र विजयदुर्गाला जाणार होता कारण तेथे टोपीकर इंग्रज त्याच्या संरक्षणासाठी तयार होते.
याच पत्रात आपल्या भित्रेपणाचे प्रदर्शन करताना बाजीराव शिवाजीमहाराजांनी रायगडावरून दौलती केल्याचा दाखला देतो.

रायगडासारख्या अद्वितीय किल्ल्याचा उपयोग बाजीरावाला लपण्यासाठी बिळाप्रमाणे करायचा होता. त्याच भित्रेपणामुळे त्याला जास्तीत जास्त दुर्गम व सुरक्षित जागा हवी होती. त्या पत्रातील उल्लेखाप्रमाणे यशवंतरावाचे जेजुरी दर्शन झालेच नाही. मराठेशाहीचा डोलारा सावरण्यासाठी पाण्याबाहेरील माशाप्रमाणे तळमळणारा हा झुंझार वीर शेवटी २८-१०-१८११ रोजी कालवश झाला. बाजीरावाची भीती संपली पण १८११ मध्ये बाजीरावाला नव्या भीतीला सामोरे जावे लागले. कर्नल क्लोजच्या जागी पुण्याचा रेसिडन्ट म्हणून एलफिस्टन याची नेमणूक झाली. त्याने पुण्यात येताच बाजीरावाच्या हलचालींवर कडक नियंत्रणे बसवली. गंगाधर शास्त्री पटवर्धन यांच्या खूनास त्रिंबकजी डेंगळे यास जबाबदार धरून एलफिस्टनने बाजीरावावर ही ठपका ठेवला आणि शेवटी जून १८१७ मध्ये बाजीरावर 'पुण्याचा तह' लादून एलफिस्टनने त्याचे उरलेसुरले स्वातंत्र्यही संपुष्टात आणले. अशाप्रकारे नरडीला नख लागल्यावर बाजीरावाला जाग आली. तेंव्हा पुन्हा त्या अभेद्य रायगडाचे स्मरण झाले असल्यास नवल नाही.
शेवटचा लढा देण्यासाठी बाजीरावाने तयारी सुरू केली. त्याच्या हलचाली लक्षात घेऊन इंग्रजानी सैन्याची जमवाजमव केली. युद्धाला तोंड फुटले. बाजीरावाची बाजू एवढी कमकुवत होती की त्याचा पराभव होणार हे सांगण्यासाठी जोतीष्याची गरज नव्हती. तरी पण रायगडावर बाजीरावाचा विलक्षण विश्वास. जणू काही इंग्रजांच्या सामर्थ्याची खच्ची करण्याची जबाबदारी एकट्या रायगडावर होती.
बाजीरावने रायगडच्या रक्षणासाठी अरबांची शिबंदी ठेवली होती. आपली पत्नी वाराणशीबाई हिलाही त्याने रायगडावर पाठविले होते. दागीने जडजवाहीर रायगडला सुरक्षित ठेवण्यात आले होते. पण किल्ला झुंझविण्याची ताकद बाजीरावामध्ये नव्हती. रायगडच्या नैसर्गिक तटबंदी किल्ल्याचे रक्षण करतील असेच त्याला वाटत होते.
युद्ध सुरू झाल्यावर कोकणात इंग्रजानी मराठ्यांचे गड घेण्यास सुरूवात केली,
बाजीराव अजूनही रायगडाबद्दल निर्धास्त होता. एका पत्रात तो लिहतो "कोकणात प्रसंग गुदरला आहे. पण किल्ले रायगड मजबूत असून तेथील संरजाम पोख्त आहे." रायगडावरील १००० ची शिबंदी किल्ला लढवू शकेल असा जबरदस्त आत्मविश्वास बाजीरावाला वाटत होता. स्वत: मात्र पुरंदर, सिंहगड, माहुली अशा किंल्ल्यांवरून पळत होता.

त्याचा सेनापती बापू गोखले याने जानेवारी १८१८ कोरेगावला इंग्रजांविरूद्ध विजय मिळवला परंतू फेब्रुवारी १८१८ मध्ये पंढरपूरजवळ अष्टी येथे जनरल स्मिथने बापू गोखलेचा पराभव केला. याच लढाईत गोखले मारला गेला. बाजीराव गर्भगळीत होऊन उत्तर भारताकडे पळत सुटला. रायगडचे रक्षण तेथील शिबंदी करू शकेल असा विश्वास यावेळी बाजीरावाला होता किंव्हा नाही कोण जाणे, कारण मेजर हॉल याने एप्रिल १८१८ मध्ये रायगडाला वेढा देऊन चारी बाजूंनी नाकेबंदी केली. रायगडाजवळ असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवण्यात इंग्राजानी यश मिळविले. तेथून भडीमार करून त्यांनी वास्तू उध्वस्त करण्यास प्रारंभ केला. रायगड हवालदील झाला.बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांना शरण आली.
अखेरीस १० मे १८१८ रोजी हिंदवी स्वराज्याचा झेंडा रायगडावरून उतरला गेला, आणि ट्रमपेट व बिगूल यांच्या आवाजात युनियनजॅक वर चढला.
रायगड इंग्रजांनी ताब्यात घेतला. मराठ्यांचे स्वातंत्र्य संपले. शिवाजीमहाराजांची तख्ताची जागा परक्यांच्या स्वाधीन झाली. अभेद्द रायगड शेवटी दुर्दैवी ठरला.

शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हाही डोंगरी किल्ल्यांचे महत्व कमी झालेले होते. तरी पण आपले ध्येय सिध्दिस नेण्यासाठी डोंगरी किल्ल्यांचा महाराजांनी योजनापूर्वक उपयोग करून घेतला.
दुसरा बाजीराव काही शिवाजीप्रमाणे युग पुरुष नव्हता. परंतु संरक्षणासाठी त्याला रायगडासारख्या किल्ल्यांचा उपयोग होऊ शकला असता. तेवढे धैर्यही त्याच्या जवळ नव्हते. लपून राहाण्यासाठी उत्तम जागा या दृष्टीने तो मावळ्-कोकणातील किल्ल्यांकडे वळला. हा लपंडाव केव्हा ना केव्हा तरी संपणारा होताच. या लपंडावात रायगडाचा उपयोग बाजीरावाने भोंज्याच्या दगडाप्रमाणे केला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.. पण 'शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हाही डोंगरी किल्ल्यांचे महत्व कमी झालेले होते.' हे वाक्य काही पटले नाही. जरा स्पष्ट कराल का?

महत्व संपले होते मग त्या युगपुरुषाने इतके धन किल्ल्यांच्या मागे का खर्च केले असावे? नव्याने किल्ले का बांधले असावेत? माझ्यामते दोणारी किल्ल्यांचे महत्व पेशवे काळातही अभाधित होते. आकाशात पहिले विमान उडाले तेंव्हा कुठे किल्ल्यांचे संरक्षणदृष्ट्या महत्व संपले.

भटक्या, तस लिहिण्यामागे,
१) शिवाजीमहाराजान्च्या जवळपास दोनशे वर्षे आधीच दौलताबादच्या किल्ल्याची हार - त्यामुळे गड अभेद्य असू शकतात या विश्वासाला तडा
२) नन्तरच्या कालखण्डात निरनिराळ्या पातशाह्यान्नी दूरवरुन तुलनेत "सपाटप्रदेशातून" केलेला केवळ उत्पन्नासाठीचा सत्ताकारभार
३) इन्ग्रजान्चे १८१८ नन्तर किल्ले उद्ध्वस्त करण्याचे जे धोरण सलग पाच वर्षेपर्यन्त राबवुन जवळपास यच्चयावत किल्ले / त्यान्च्या वाटा पुन्हा वस्ती न होण्याइतपत उध्वस्त केले होते त्याच धोरणासदृष्य पातशाह्यान्नी त्यान्चे काळात महाराष्ट्रात गडकिल्ले उभे राहू न देणे/न उभारणे याची सन्गत लावता येते.
४) शिवाजी महाराजान्नी मात्र गडकोटान्चे महत्व तत्कालिक युद्ध व शस्त्रादी परिस्थितीस अनुसरुन ओळखले व चिलखताप्रमाणे स्वराज्यात गडकोटान्ची रचना नव्याने/दुरुस्त करुन केली.
५) विमानाच्या शोधाचा अन किल्ल्यान्च्या/तटबन्दीचा सम्बन्ध फारसा लावता येणार नाही. कारण दुसर्‍या महायुद्धापूर्वी फ्रेन्चान्नी देखिल मॅजिनो तटबन्दी उभारली होती व तिचा नाश विमान्नान्मुळे नव्हे तर शत्रूने त्या तटबन्दीला बगल देऊन मागिल व पुढिल बाजुने कैचीत पकडल्यामुळे झाला हा नजिकचा इतिहास आहे.
६) स्वतन्त्र सत्तास्थाने पुन्हा निर्माण होऊ नयेत या करता गडकोट उद्ध्वस्त करण्याचे व ते केलेले पाप झाकण्यासाठी पुरातत्व खात्याच्या कायद्यान्च्या मार्फत किल्ल्यान्ची डागडुजी न होऊ देता स्थिती जैसे थे ठेवण्याचे इन्ग्रजान्चेच धोरण पुढे नेहेरूगान्धीन्च्या सरकारनेही राबवल्यामुळे स्वराज्याच्या असन्ख्य किल्ल्यान्ची दुरावस्था आजही अबाधीत आहे.

दुसर्या बाजीरावाबद्दल एक कादंबरी वाचनात आली (मंत्रावेगळा), परंतु त्यातील तपशील काही वेगळेच सांगतात.
हा पेशवा नादान होता व त्याने केलेल्या वसईच्या तहानेच स्वराज्याचे सार्वभौमत्व संपुष्टात आले यात शंका नाही परंतु त्याच्यावर पळपुटे पणाचा आरोप करणे योग्य वाटत नाही.
त्याने जाग आल्यावर का होईना पण थोडाफार प्रतिकार जीव लाऊन केलाच.
पण परिस्थिती तोपर्यंत हाताबाहेर गेलेली होती आणि त्याचा काही एक उपयोग झाला नाही.

वर उल्लेख केलेल्या पुस्तकात एकदा रायगड स्वत: बाजीरावाने इंग्रजांकडे गहाण ठेवल्याचा उल्लेख आहे. (त्रिंबकजी डेंगळे यांना पकडून देण्याच्या बदल्यात). परंतु इंग्रज फौज प्रत्यक्षात रायगडावर पोहोचू शकली नव्हती.

बाजीराव याचे रायगडावर एवढा विश्वास असता तो असे काही करेल असे वाटत नाही.

कुणाकडे अधिक तपशील असल्यास जाहीर करावा.

|| जय भारत |

वर उल्लेख केलेल्या पुस्तकात एकदा रायगड स्वत: बाजीरावाने इंग्रजांकडे गहाण ठेवल्याचा उल्लेख आहे. (त्रिंबकजी डेंगळे यांना पकडून देण्याच्या बदल्यात). परंतु इंग्रज फौज प्रत्यक्षात रायगडावर पोहोचू शकली नव्हती.<<<< '

प्रबोधनकार...
कादंबरी' लिहताना कादंबरीचा लेखक आपल्याला हवा तसा इतिहास लिहण्यास मोकळा असतो.
आणि अशाच कादंबरीकारांमुळे (अपवाद) मराठा इतिहास अनेक असत्य प्रकरण आली आहेत. जसे भवानी तलवार, सुबेदाराची सून, तानाजी प्रकरण, शंभुराजांच्या जिवनातील गोदावरी, सोयराबाईला भिंतीत चिणून मारणे असे अनेक प्रसंग आहेत ज्यांचा ऐतिहासिक कागद पत्रात कुठेही उल्लेख नाही.

दुसर्या बाजीरावाबद्दल एक कादंबरी वाचनात आली (मंत्रावेगळा) >>>> बरोबर

ना. स. इनामदारांची कादंबरी आहेही. खर तर ही लेख मालिका सुरु झाल्या पासूनच ही कादंबरी मनात घोळत होती.

त्रिंबकजी डेंगळे आणि दुसरे बाजीराव ह्या दोघांच्या कारकिर्दीवर आधारीत आहे. त्यामधील वर्णन आणि एकंदरीत कादंबरीचा सुर ..... स्वराज्य वाचवण्याची शेवट पर्यत झालेली ह्या दोघांची छुपी धडपड असे म्हणावे लागेल.

जसे दुसरया बाजीरावाने इग्रजांना दाखवलेला ... छानशौकी वरील खर्च हा खरतर सैन्य उभरणी साठी होता इ.

खर खोटे माहित नाही, जाणकार ह्या वरही प्रकाश टाकतीलच --- पण एवढे निश्चीत आहे की ज्याअर्थी कादंबरी झाली त्याअर्थी काही तरी दखल घेण्यासारखे नक्कीच आहे Happy

पण वेताळ तुमचे आभार ह्या आडवाटेच्या विषयाला हात घातल्या बद्द्ल Happy

मी पण एक कादंबरी वाचली आहे त्रिंबकजी डेंगळे यांच्या बद्दलची. तुम्ही म्हणता तीच आहे का ते आठवत नाहीये.
पण त्यामधे देखील बाजीराव कसा नाकर्ता होता आणि त्रिंबकजी, गोखले, पानसे, इ. लोकांनी राज्य राखण्याचे कसे शर्थीचे प्रयत्न केले होते ते दिले आहे.

कादंबरी' लिहताना कादंबरीचा लेखक आपल्याला हवा तसा इतिहास लिहण्यास मोकळा असतो.>>>>

सहमत, परंतु सामान्य वाचकांमध्ये इतिहासाची साधने शोधून अभ्यास करण्याची कुवत आणि वेळही नसतो. तेव्हा इतिहास लोकांसमोर ठेवण्याचे कार्य ह्या ऐतिहासिक कादंबर्याच करतात. ह्या कादंबर्यांचीही निरपेक्ष समीक्षा व टीका (अर्थातच कादंबरीकाराची जात व धर्म न पाहता) करणे गरजेचे होऊन बसले आहे.
नाहीतर अजून शंभर वर्षांनी 'मंत्रावेगळा' हे दुसर्या बाजीरावाचे आत्मचरित्र होते व त्यातील सर्व घटना खर्याच आहेत असा समज होण्याची शक्यता जास्त.

बाकी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद !!!!!!!!!

||जय भारत||

ह्या कादंबर्यांचीही निरपेक्ष समीक्षा व टीका (अर्थातच कादंबरीकाराची जात व धर्म न पाहता) करणे गरजेचे होऊन बसले आहे.

भटक्या तुला १०००० मोदक

मला माहीती अशी हवी होती की नानासाहेब (दुसरे) हे दुसर्या बाजीरावाचे दत्तक पुत्र ना. हे दत्तक विधान कधी झाले आणि नंतर इंग्रजांनी ते रद्दबातल कधी ठरवले.

कादंबरीकारांनी नुकसान केले हे खरेच आहे. यावर उपाय म्हणून संशोधकांनी
लोकाभिमुख होणे गरजेचे आहे. केवळ याच क्षेत्रात नाही तर अनेक क्षेत्रात
संशोधन कधी सामान्य जनतेसमोर आलेच नाही.
संशोधनकारांनी पण सामान्य लोकांना सहज समजेल इतकेच नव्हे तर
त्यांना ते वाचनीय वाटेल, असे लिहिले पाहिजे.

अतिशय माहितीपुर्ण लेख !
महेश तुम्ही म्हणता ती कादंबरी बहुदा ’झेप’ असावी. वाचतोय वेताळा, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत Happy

विशाल, झेप नाही, मी जी वाचली होती ती "त्रिंबकजी डेंगळे" यांच्या व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी होती. मोठी नाही, छोट्या पुस्तकाएवढी आहे. त्यामधे बडोद्याच्या गायकवाडांचे पटवर्धन वकील पुण्यात येतात, त्यांचा खुन होतो मग इंग्रज त्याचा आळ डेंगळे यांच्यावर घेऊन फितुरांच्या सहाय्याने त्यांना कैद करून नेतात, इ. उल्लेख होते.

पक्का भटक्या,

>>आकाशात पहिले विमान उडाले तेंव्हा कुठे किल्ल्यांचे संरक्षणदृष्ट्या महत्व संपले.

मी या विधानाशी पूर्णपणे असहमत आहे! आज द्रोणाचार्य वापरूनही नाटो अफगाणिस्तानातले युद्ध जिंकू शकत नाही. दीड दीड लाख सैन्य नक्की काय करतंय तिथे? फारसे किल्ले नाहीत त्या प्रदेशात. सह्यदुर्गांची तर बातच सोडा. असा काही हल्ला झालाच तर विमानवेधी तोफांनी आकाश भाजून काढले जाईल.

हे आपलं माझं मत.

आपला नम्र,
-गा.पै.

ह्या कादंबर्यांचीही निरपेक्ष समीक्षा व टीका (अर्थातच कादंबरीकाराची जात व धर्म न पाहता) करणे गरजेचे होऊन बसले आहे.
नाहीतर अजून शंभर वर्षांनी 'मंत्रावेगळा' हे दुसर्या बाजीरावाचे आत्मचरित्र होते व त्यातील सर्व घटना खर्याच आहेत असा समज होण्याची शक्यता जास्त. >>>>

सहमत. जे करतात त्यांना जनता नेहमीच जातीय चष्म्यातून पाहते. हे मात्र नाकारता येत नाही. आपल्याकडे एकदा तो माणूस मोठा ठरला की त्या माणसाच्या चुकाही लोक चुका आहेत असे माणायला तयार नसतात.

>>> ...तर विमानवेधी तोफांनी आकाश भाजून काढले जाईल.

कालंच अफगाणी तालिबान्यांनी नाटोचं एक चिनूक्स पाडलं. तेही विमानभेदी तोफा नसतांना. त्यात नाटोचे ३१ सैनिक आणि ७ अफगाणी लोक मेले. नाटोने सैन्य घुसवल्यापासून (इ.स. २००१) पासून अफगाणिस्थानातली एका हल्ल्यात झालेली नाटोची ही सर्वोच्च हानी आहे. भाकीत एव्हढ्या लवकर आणि इतक्या ढळढळीतपणे खरं होईलसं वाटलं नव्हतं!

हा एकवेळ काकतालीय न्याय धरला तरी किल्ल्यांच्या उपयुक्ततेचा मुद्दा ठळकपणे अधोरेखित होतो.

-गा.पै.

"त्याचा सेनापती बापू गोखले याने जानेवारी १८१८ कोरेगावला इंग्रजांविरूद्ध विजय मिळवला" -हे पटले नाही.माझ्या माहिती प्रमाणे १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा जवळ इंग्रजांच्या 6०० ते ७०० सैनिकांनी जे बहुत करून बहुजन समाजातील होते ,त्यांनी पेशावांच्या ३०००० सैन्याचा पराभव केला .
अजूनही हजारो नवबौद्ध १ जानेवारी हा दिवस कोरेगाव भीमाच्या विजय स्तंभापाशी जमून पेशव्यांवरचा विजय दिन म्हणून साजरा करतात.
कृपया स्पष्टीकरण करावे ही विनंती .....

आता बरेच दिवसांनी हा धागा वर आणण्याचे कारण म्हणजे मी 'मायबोली'चा आजच सदस्य झालो आहे आणि हा मूळ धागा आत्ताच पाहिला.

दुसरा बाजीराव, रायगड आणि बाजीरावच्या रायगडावर ठेवलेल्या संपत्तीचे पुढे काय झाले ह्यावरच बरीच नवी माहिती मला books.google.com येथील तत्कालीन पुस्तकांमधून आणि अन्य साहित्यातून मिळाली होती, जी मी "'नासक' नावाचा हिरा आणि दुसर्‍या बाजीरावाची संपत्ति" अशा शीर्षकाखाली http://mr.upakram.org/node/3380 येथे प्रकाशित केली आहे. बाजीरावच्या मालकीचा मोठा खजिना, जो त्याच्या नारो गोविंद औटी नावाच्या विश्वासू माणसाच्या ताब्यात होता आणि त्याच्याकडून इंग्रजांनी सिंहगड खाली करून घेतांना जप्त केला त्याची कथा, तसेच बाजीरावाची बरीच संपत्ति, 'नासक' नावाच्या हिर्‍यासह, जी इंग्रजांनी नशिकमध्ये एका वाड्याची खणती करून ताब्यात घेतली, तिची नंतर विल्हेवाट कशी लावली असे मनोरंजक तपशील त्या लेखनात जिज्ञासू वाचकांना वाचावयास मिळतील.