रसग्रहण स्पर्धा - २०११ - घोषणा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

दरवर्षी पुस्तक प्रदर्शनं, ग्रंथजत्रा, पुस्तकांची दुकानं, ऑनलाईन पुस्तकविक्री करणारी (मायबोलीसारखी) संकेतस्थळं अशा अनेक वाटांनी नवनवीन पुस्तकं आपल्या भेटीला येतात. वाचायची आवड असेल तर आपण नियमितपणे दुकानं-प्रदर्शनांना भेटी देतो, पुस्तकं चाळून पाहतो. कधीतरी वर्तमानपत्र अथवा नियतकालिकात आलेला एखाद्या पुस्तकाचा परिचय लक्ष वेधून घेतो. वेगवेगळी पुस्तकं मग यथावकाश आपल्या पुस्तकसंग्रहात, वाचनयादीत दाखल होतात. पुस्तकं घेण्यापर्यंतचा कुठल्याही दोन व्यक्तींचा प्रवास हा साधारण असाच असतो.

पण एकदा पुस्तक हाती आलं की, एकाच पुस्तकाबरोबर होणारा प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा! कुणी एका बैठकीत एखादं पुस्तक संपवेल, तर कुणाकडून पहिली दहा पानंही वर्षानुवर्षं उलटली जाणार नाहीत. कुणी वाचून संपवलं की, पुस्तक शेल्फात ठेवून देईल, मग त्याची त्याला पुढे कधी आठवणही येणार नाही. तर तेच पुस्तक कुणाच्यातरी मनात अधूनमधून डोकावून जाईल. एखादं पुस्तक मात्र वाचून संपवलं तरी आपली पाठ सोडत नाही. त्यासंबंधी आपण विचार करत राहतो, कधी चार लोकांबरोबर त्याची चर्चा करतो. कधी त्याबद्दल आपल्याला लिहावंसं वाटतं. लिहिताना कधी पुस्तकाचे काही पैलू नव्याने सामोरे येतात, तर कधी आधी वाचताना पडलेल्या प्रश्नांची उकल नंतर आपोआप होते. चर्चेतून कधी आपल्याला एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाल्यासारखा वाटतो, एखाद्या विषयाबद्दलच्या आपल्या आकलनात भर पडते. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकागणिक असे विविध अनुभव प्रत्येकाच्या पोतडीत जमा होतात. आपला विचारप्रवास त्या पुस्तकाबरोबरीनं चालू राहतो.

तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी 'मायबोली.कॉम' आयोजित करत आहे रसग्रहण स्पर्धा. या स्पर्धेनिमित्त तुम्ही अशाच एखाद्या आवडत्या पुस्तकाबद्दलचे तुमचे विचार शब्दबद्ध करायचे आहेत, त्या पुस्तकाचं रसग्रहण करायचं आहे. कविता, कथा, कादंबरी, ललितलेख, अनुभवकथन, आत्मकथन, प्रवासवर्णन, समीक्षा, संपादित साहित्य असा कुठलाही साहित्यप्रकार या स्पर्धेसाठी वर्ज्य नाही. मात्र, कोणत्या पुस्तकांचं रसग्रहण केलं जावं, याबाबतची एक लहानशी अट मात्र आहे. या स्पर्धेसाठी १ जानेवारी २००८नंतर प्रकाशित झालेली मराठी पुस्तकंच विचारात घ्यायची आहेत.

मायबोलीवर नेहमीच पुस्तकांबद्दल चर्चा रंगते, हिरीरीनं मतं मांडली जातात, खोडली जातात. त्यामुळे मायबोलीकर आपल्या आवडत्या पुस्तकांबद्दल भरभरून लिहितील, याबद्दल शंकाच नाही.

स्पर्धेचं स्वरूप -

१. १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट, २०११, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रुपात नवीन लेखनाचा धागा उघडून रसग्रहण लिहू शकता. स्पर्धेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर केला जाईल.
२. धाग्याच्या शीर्षकात पुस्तकाच्या आणि लेखक/लेखिकेच्या नावाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, भालचंद्र नेमाड्यांच्या 'हिंदू' या कादंबरीचं रसग्रहण करणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - रसग्रहण स्पर्धा - 'हिंदू' - ले. भालचंद्र नेमाडे - असं असावं.

नियम व अटी -

१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे.
२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी Happy ) जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.
३. फक्त मराठी पुस्तके या रसग्रहणासाठी स्वीकारली जातील.
४. रसग्रहणासाठी निवडलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ जानेवारी, २००८नंतर प्रकाशित झालेली असावी.
५. रसग्रहणासाठी विषयाचं व साहित्यप्रकाराचं बंधन नाही. फक्त अनुवादित साहित्याचं रसग्रहण स्वीकारलं जाणार नाही.
६. एखाद्या काव्यसंग्रहातल्या एकाच कवितेचं, कथासंग्रहातल्या एकाच कथेचं, किंवा पुस्तकातल्या एका प्रकरणाचं / वेच्याचं रसग्रहण ग्राह्य धरलं जाणार नाही. रसग्रहण संपूर्ण पुस्तकाचंच असावं.
७. रसग्रहणासाठी शब्दमर्यादा - किमान ७५० शब्द आणि जास्तीत जास्त १५०० शब्द.
८. रसग्रहणासोबत पुस्तकाचं, लेखकाचं व प्रकाशकाचं नाव, तसंच प्रकाशनाची तारीख देणं आवश्यक आहे.
९. रसग्रहणात संपूर्ण कविता अथवा एखाद्या कवितेचा / कथेचा मोठा भाग असू नये.
१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

या स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील भरघोस रकमेची बक्षिसं! स्पर्धेचे प्रायोजक आणि परीक्षक लवकरच जाहीर केले जातील. तुम्हांला स्पर्धेसाठी तयारी करायला पुरेसा वेळ मिळावा, म्हणून ही घोषणा.

विषय: 
प्रकार: 

जबरदस्त संकल्पना. वाचक चळवळ अशाच संकल्पनांनी अधिकाधिक प्रभावी होत रहाणार आहे.

या स्पर्धेसाठी माझा सहभाग आहेच. Happy

प्रयत्न करायला हवा. Happy चांगला उपक्रम. पहिल्यांदाच अशी स्पर्धा होतेय बहुतेक. त्यामुळे स्पर्धा चांगलीच रंगणार आणि घरबसल्या बर्‍याच पुस्तकांची ओळख होणार. या स्पर्धेच्या आयोजना बद्दल अ‍ॅडमिन टिमचे आभार आणि अभिनंदन सुद्धा.

खूपच छान उपक्रम. वेळही अगदी पुरेसा दिला आहे. भरभरुन प्रतिसादांसाठी शुभेच्छा!

एखाद्या पुस्तकावर आधीच रसग्रहण येऊन गेलं असेल तरीही त्याच पुस्तकासाठी केलेल्या रसग्रहणाची प्रवेशिका ग्राह्य धरण्यात येईल का? असं एकाच पुस्तकावर कितीजणांना लिहिता येईल?

मस्त उपक्रम अ‍ॅडमीन टीम !
स्पर्धेचे प्रायोजक आणि परीक्षक लवकरच जाहीर केले जातील >>>> हे चांगल आहे. Happy

शर्मिला फडके,
एकाच पुस्तकावर जरी जास्त रसग्रहणं आली तरी ती ग्राह्य धरण्यात येतील. अर्थात कुठली प्रवेशिका कधी प्रकाशीत झाली आहे हे परिक्षकांना कळवण्यात येईल. त्यावर परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

स्पर्धा छान आहे. बघु आता पुस्तकं शोधायला हवीत.

एक शंका, जे परीक्षक असतील त्यांनी हे पुस्तक वाचलेले असेलच ना? की ते फक्त रसग्रहण कसे झालेय ते वाचून त्यावरून निर्णय घेणार?

Pages