मातृ देवो भव, पितृ देवो भव.
'गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु,
गुरुर्देवो महेश्वरः,
गुरु: साक्षात परब्रम्ह
'तस्मै श्री गुरुवे नमः'
आज गुरुपौर्णिमा. म्हणूनच माझा पहिला नमस्कार माझ्या आई-दादांना. हो माझे पाहिले गुरु तेच आहेत!
जिने अनंत यातना सहन करून, मला या सुंदर पृथ्वीवर जन्म दिला, ती आई, आणि अनेक काबाड-कष्ट करून मला वाढवल, त्या दादांना (माझे वडील) माझा नमस्कार.
माझी आई विमल (माहेरची). अतिशय तापट वडील (आईच्या शब्दात जहाल) आणि अतिशय गरीब आई यांचे दुसरे अपत्य! वडील (माझे आजोबा) रागीट असल्यामुळे, शेजारयांशी तर नाहीच पण घरात सुद्धा बोलायला खेळायला बंदी होती. कळायला लागल्या पासून माझ्या आईची (आजीला) मदत करायला सुरुवात झाली. हळू हळू घरातील सर्वच कामे करायला सुरुवात झाली. कारण घरात दर दीड-दोन वर्षाने होणारे बाळाचे आगमन (पूर्वीचा जमाना! :)) आणि ही घरातील मोठी मुलगी. त्यामुळे कामे करावीच लागत. म्हणूनच हुशार असूनही, शिक्षणाची आवड असूनही, तिला शाळेत जाता येत नव्हते. पहाटे चारलाच हीचा दिवस सुरू होई. केर काढणे, सडा घालणे,रांगोळि काढणे, दळणे, चहा करणे, विहीरीवरून पाणी आणणे, भांडी घासणे, कपडे धूणॆ, लहान मुलाना आंघोळ घालणे, स्वयंपाक करणे, ही सगळी कामे तीच करत असे. पण हिची जिद्दीच अशी होती की, ती भराभर कामे आवरून शाळत जात असे. आणि कधी कधी जेवणाच्या सुट्टीची घंटा देऊन घरी येत असे. तेही आनंदाने. असच कामे करत करत ती सातवी पर्य़ंत शिकली. त्याचबरोबर, विणकाम, शिवणकाम, अशाही कला तिने आत्मसात केल्या. एकदा एका मुलीने, भरतकाम केलेला रुमाल कसा केला हे सांगेना. तर माझी आई आपल्या दारात बसली होती आणि ती मुलगी तिच्या दारात बसली होती. हिने तिच्याशी बोलता बोलता, ती मुलगी किती खिडक्या, खांब (भरतकमातील मोजमापे ) घेते ते मोजून , अगदी तस्साच रुमाल तयार केला. तर अशा ह्या हुशार, जिद्दी मुलीच लग्न, खेडेगावातील एका शिक्षकाशी झाले.
माझे वडील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांचा स्वभाव अतिशय साधा. साधा म्हणजे इतका साधा, त्यांच्या ताटातील एखादा पदार्थ कोणी घेतला तरी ते बोलणार नाहीत. त्यानी शेती करता करता, आपले शिक्षण पूर्ण केले.राजापूरला वेदपाठशाळेत वैदिक शिक्षण घेतले. पुण्यातही काही दिवस शिक्षण घेत होते. नंतर ते प्राथमिक शिक्षक झाले. आणि माझ्या आईशी विवाहबद्ध झाले.
वडिलांची बदली झाली की आईसुधा त्यांच्याबरोबर जात असे. कोकणात तेव्हा काहीच सुविधा नव्हत्या. येइल त्या पारिस्थितीला तोंड देत देत संसार चालू झाला.
आईला जास्त शिकता आले नाही तरी तिने असे ठरवले की मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना शहरात आणायचे. म्हणून तिने आमच्या शिक्षणाकडे पूर्ण लक्ष दिले. २ ते ३० पर्यंत पाढे, सरळ, उलट, आडवे, आणि परत मागे असे आई-दादांचे तोंडपाठ होतेच. पण पावकी, निमकी, ते दिडकी-अडीचकी पर्यंत त्याना येत होत. माझी आई पाणी आणायला जाताना, माझ्या मोठया भावाना, एखादा पाढा पाठ करायला देत असे. आणि स्वत: अडीचकीच्या पुढची तयारी, पाणी आणता आणता करीत असे. मला कळायला लागल्यापासून, मी आई-दादाना नेहमी कष्ट करतानाच पाहिले. घरातील सगळी कामे करताना आईला दिवस पूरत नसे. आईचे, देव-धर्म, उपास-तापास बरेच असायचे. आणि ती नेहमी आनंदी दिसायची.
नोकरी करून घर सावरताना, दादाना वेळच मिळत नसे. दादांचे अक्षर छान वळणदार! दादांना बागबगीचा , भाज्या लावणे हे फार आवडायचे. ते झाडांची काळजी तर मुलांपेक्षा जास्त घेत.
दादा प्राथमिक शिक्षक असल्यामुळे, खेडेगावात बदली व्हायची. घरापासून किराणा मालाचे दुकानही ४-५ किलोमीटर अंतर डोंगर-दरया ओलांडून पायी जावे लागे. दादा शाळेतून आल्यावर म्हणजे संध्याकाळी ६ वाजल्या नंतर, घरात लागणारया वस्तूंची यादी करून जात असत. आणि रात्री उशीरा १०-११ वाजता अंधारातून डोक्यावर भलं मोठ्ठ ओझ, दोन्ही खांद्याना भरलेल्या पिशव्या, एका हातात कंदील/बॆटरी, असे दमून-भागून घरी येत. कधी कंदील विझला तर, तसेच अडखळत अडखळत नदीपर्य़ंत येत असत. आणि नदीपलिकडून कुकारा देत.(कुकारा-खुणेचा विशिष्ट आवाज) कारण नदीकाठावर काजरयाची मोठी झाडे होती. जिथे खूप पालापाचोळा व अंधार होता. साप व इतर श्वापदांची भीती होती. मग माझी आई, आम्हा मुलांना कुलूपबंद करून कंदील घेऊन कितीतरी अंतर एकटीच चालत दादाना आणायला जायची. आई खरतर खूप भित्री होती पण, मागे एकटी असलेली मुले, पुढे अंधरात, सामान घेऊन दमून आलेले पतिराज, यापुढे तिची भिती यायचीच नाही. आजही ते दृश्य़ जसच्या तसं माझ्या डोळ्यासमोर उभ आहे.
एकदा असेच संध्याकाळी ते सामान आणायला निघाले. शेजारच्या लोकानी सांगितले."गुरुजी एवढ्या संद्याकाळी जाऊ नका, यायला रात्र होईल. घाटीत वाघ आलाय, अस ऐकलय." पण दादाना जाण्यावाचून पर्याय नव्हता. परत येताना रात्र झाली. आणि घाटीतून येताना दादाना खरच हळू आवाजात गुरगरल्याचा आवाज आला. त्यांच्या तोंडच पाणी पळाले. आता वाघ आपल्याला पोटात घेणार. याची त्याना खात्री वाटू लागली. त्यानी मनातल्या मनात राम्,राम,राम, राम म्हणायला सुरुवात केली. त्यांची चाल फार वेगात होती. त्यामुळे थोड्याच वेळात ते बरेच अंतर चालून आले. जरा हुश्श वाटलं, तोपर्यंत परत गुरगुरल्याचा आवाज आला. आणि ते हसतच सुटले. (त्यांच्या पोटात भुकेने गुरगुरत होते.)
असे एक ना अनेक प्रसंग.
त्याची, चूल पेटवण्यासाठी, लाकडे फ़ोडणे, फ़ुलझाडे लावणे, भाजीपाला लावणे, झाडाना पाणी आणून घालणे, अशी त्यांची कामे सतत चालू असत. आणि आई त्याना मदत करत असे. त्यावेळी आमची घरे खूप लांब असत व नोकर वगैरे तेव्हा परवडणारेच नव्हते !
आई-दादानी आमच्यावर खूप छान संस्कार केले. (माझ्या वडिलाना व आम्हाला कोणालाच कसलेही व्यसन नाही. यचे सर्व श्रेय त्यानाच आहे.) आईने आम्हला लहानपणापासून सगळी कामे करायला शिकवले. ती नेहमी आम्हाला सांगत असे."तुमचे वडील तुमच्यासाठी दिवस रात्र राबातायत. तुम्ही पण जमेल तेवढी मदत केली पाहीजे." तिने आम्हाला स्वावलंबी बनवले. आईने आम्हा सगळ्या भावंडाना स्वयंपाक शिकवला. म्हणून वडिल आजारी असताना आई त्याना आणि आम्हा दोघी बहीणीना घेऊन पुण्याला आली. तर माझ्या दोन्ही भावानी (तेव्हा वय वर्षे १२ आणि १४) स्वत: स्वयंपाक करून, शाळेत जाणे, रेशनचे सामान आणणे, व घरातील सर्व कामे केली होती. आम्ही परत गेलो तेव्हा दादांची रजा बिनपगारी झाली होती. (मुळात पगार दोन आकडी होता.) थोड़े दिवसानी अन्न-धान्य संपत आले. तर माझ्या आईने स्वत: फ़क्त भाज्या (शिजवून) खाल्या. जेव्हा वडिलाना कळल तेव्हा त्यानीही, त्याना भाजीच वाढायला सांगितले. आम्हाला मात्र क्वचितच कधीतरी भाज्या खाव्या लागल्या. असे हे माझे प्रेमळ आई-दादा. तो कालखंड आमच्या कुटुंबाची अगदी सत्त्वपरिक्षा घेणारा ठरला. पण माझ्या आई-दादांनी न डगमगता खंबीरपणे सर्व प्रसंगाना तोंड दिले.
आईची अनेक रुपे मला आजही डोळ्यासमोर दिसतात. त्यातील एक म्हणजे मी १९८१ साली बारामतीला शेवटच्या घटका मोजत होते. आई माझ्या शेजारी बसून मला गोष्ट सांगत होती. नेत्रातून संतत धार चालू होती. मनातल्या मनात देवाची करूणा भाकत होती. मुद्दाम गोष्ट चुकवत होती. नेहमी प्रमाणे मी बरोबर करून सांगेन म्हणून. पण मला ऐकू येत होत, दिसत होत, पण शब्द बाहेर पडत नव्हते. तेव्हाची तिची अगतिक मुद्रा मला अजुनही आठवते. एकदा माझी बहीण कोरड्या विहिरीत पडली. तेव्हा मला ओळखीच्या आजींच्या हातात देऊन, वेड्यासारखी बहीणीला शोधत भिरी भिरी फ़िरणारी आई आज ही आठवते.
माझ्याबाबतीतला एक किस्सा मला सांगावासा वाटतो. माझ्या जन्मानंतर आईने जेव्हा मला प्रथम पाहिले तेव्हा तिला, हे आपल बाळ नाही , कुणीतरी बदलल आहे अस वाटल होते. (माझी सर्व भावंडे, गोरी, सुदृढ़ होती. . आणि मी काळी, आणि हडकुली होते
पण जेव्हा डॊक्टरानी हे बाळ तुमचेच आहे अस तेव्हा पासून तिने मला जवळ घेऊन, मला घरी औषधे देऊन बरे केले. व आजपण ती माझी जरा जास्तच काळजी घेते 
आज आमच्या घरातील सर्वाना या दोघांबद्दल नितांत प्रेम व आदर आहे. (आमच्या नातलगाना सुद्धा)ते दोघेही आपले जीवन शांतपणे व आनंदात जगत आहेत. सर्वत्र आनंदी आनंद आहे.
रक्ताचे पाणी करून आम्हा भावंडासाठी सुखाची पखरण करणार्या अशा या माझ्या वंदनीय आई-दादांना कोटीकोटी प्रणाम!
दक्षे, वैबु. धन्यवाद.
दक्षे, वैबु. धन्यवाद.
छान लिहल आहे..... खरच आपले आई
छान लिहल आहे.....
खरच आपले आई वडील आपल्या साठी खुप काही करत असतात..
धन्यवाद किश्या.
धन्यवाद किश्या.
शोभा ताई, खरा गे. तुया जाण
शोभा ताई, खरा गे. तुया जाण ठेऊन लिहिलस ह्या बरा केलस. आई - काकांक माझो नमस्कार गे.
माझ्या बाबांनी आपल्या भावंडांक व्हयेत पण पैसेय वाचाक व्हयेत (नव्हतेच तसेय) म्हणान गोणी भरून नारळ आंबेरेत्सून स्वतः आणल्यानी वालावलेपर्यंत. माझ्या आत्त्येनय खूप कष्ट केलेन शिक्षक म्हणान.
आमच्या साठीय आईबाबांनी खूप कष्ट केल्यानी.. आपला मन मारून आमका दिल्यानी.
कशाक प्राधान्य देवचा ताय तेंच्या कृतीवरसून दाखौन देईत आई - बाबा.. आईन कधी नविन नविन साडीये, लिप्स्टीकी घेऔक नाय पण आमका सगळी फळा, सुको मेवो खाऔक घाली. बाबा दिवाळेक वर्षानु वर्ष नवे कपडे घेऔक नाय पण पुस्तका मात्र भरपूर आणल्यानी आमच्यासाठी.
ते आसत म्हणान आम्ही जय आसव थय आसव.
जाईजुई, खरा असा. आमका
जाईजुई, खरा असा. आमका त्यांच्या इतको काय येक करुक नाय लागता, तरी कंटाळो येता हा. कसा इतका केल्यानी त्यांकाक म्हायेत. आणि त्यांका कदी कंटाळो येणा नाय. सदा आनंदी असतत.
अगो वालवलाक माझे दादा पण जावचे. कदीमदी सांगतत लहापणचे किस्से. मजा येता ऐकाक. येवढा त्रास सोसून पण, आमका सदा सुखच दिला. एकेक आठवण इली की भरून येता बघ.
आमच्या साठीय आईबाबांनी खूप कष्ट केल्यानी.. आपला मन मारून आमका दिल्यानी.>>> अगदी खरा बघ.
गो तुज्या आत्तेचो नाव काय? कदाचीत दादा वळखतले. म्हणून इचारलय हा. राग मानू नको.
मला वाटते की आपल्या पैकी
मला वाटते की आपल्या पैकी बहुतेकान्च्या आईवडिलांना आयुष्यात खूप कष्ट करावे लागले आहेत. आजही त्यांच्या आठवणींनी डोळे भरुन येतात. मातृदेवो भव पितृदेवो भव हे मला वाटते आपल्याच संस्कृतीत आहे. शोभा तुझ्या आईवडिलांना माझाही नमस्कार.
खरंच आईवडिलांचे आपल्यावर किती
खरंच आईवडिलांचे आपल्यावर किती अनंत उपकार असतात. ते फेडण्यासाठी नसतात पण या आठवणींतून तुम्ही एक ओंजळ त्यांच्या पायाशी वाहिली आहे. अतिशय सुरेख शब्दांत फारच यथार्थ वर्णन. डोळ्यापुढे सगळं उभं केलय. खरंच खुपच कष्ट केले तुमच्या आईवडिलांनी. आता त्यांचा आनंद तुमच्याच हातात आहे. शुभेच्छा!
शोभा१२३ आणि प्रज्ञा१२३... आज
शोभा१२३ आणि प्रज्ञा१२३...
आज वाचलं हे लिखाण... उशीर झाला असं म्हणत नाही, पण योग्य वेळी वाचनात आलं...
वाचताना आमच्या आई-वडिलांनी आम्हाला लहानाची मोठी करताना परक्या मुलुखात आणी बे-भरवशी वातावरणात राहून उपसलेले कष्ट, घेतलेले परीश्रम आठवत होते... तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत आहे...
प्रतिसाद उशिरा देतोय, त्या बद्दल क्षमस्व...
समई, मामी, विवेक, धन्यवाद.
समई, मामी, विवेक, धन्यवाद.
हा माझ्या आई-बाबांचा फोटो
हा माझ्या आई-बाबांचा फोटो
खूपच छान लेख. पु ले शु
खूपच छान लेख. पु ले शु
धन्यवाद, प्रज्ञा, किंकर.
धन्यवाद, प्रज्ञा,
किंकर.
खूप छान लेख लिहिलाय. तुमच्या
खूप छान लेख लिहिलाय. तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार सांगा.
शोभा, एवढ हसायला काय झाल ग?
शोभा, एवढ हसायला काय झाल ग?
Pages