मुंबईवरील अतिरेकी हल्ला आणि "आम्ही"

Submitted by dr.sunil_ahirrao on 14 July, 2011 - 02:27

पुन्हा एकदा मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन २१ जणांचा बळी गेला.१५ दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी तशी पूर्वसूचना दिली होती.आता "माहिती मिळूनही सुरक्षा यंत्रणा पुनः एकदा निष्पापांच्या हत्या रोखण्यात अपयशी ठरली आहे.हे वारंवार होणारे बॉम्बस्फोट आमची सुरक्षा व्यवस्था किती कुचकामी आहे,आणि भारतावर हल्ला करणे किती सोपे आहे,तेच साऱ्या जगाला दाखवून देत आहेत".असे आरोप आमच्यावर होतच असतात त्यात काय विशेष? निषेध व्यक्त करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?बदला घेण्यासाठी आम्ही काही अमेरिका वगैरे थोडेच आहोत !

आम्ही गांधीजींच्या अहिंसेआड लपून स्वत:च्या चुकांचे समर्थन करतो.आता आहे ती आमची जुनी सवय-."अरे त्या महात्म्याला का उगाच ढाल बनवता"? असेही प्रश्न आम्हाला लोक विचारत असतात.पण काय करणार,त्याचे या देशावर असोत,नसोत;आमच्यावर मात्र कायमचे उपकार आहेत.कारण 'तुम्ही कृती का करत नाही?' असा प्रश्न आला की आम्हाला अश्या महापुरुषांचा खूप उपयोग होतो."त्याचा जगण्याचा साचाच वेगळा होता.तो वेगळ्याच मुशीत बनलेला होता.तो मूर्तिमंत सत्य होता,त्याग होता,अहिंसा होता!!!ते फक्त तोच करू जाणे; ते तुम्हाला आम्हाला कैक पिढ्या जमणार नाही"-असेही कुणी म्हणतात.म्हणोत बिचारे;आता हे का आम्हाला कळत नाही?.त्यामुळे आम्हाला काय फरक पडतो?आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांची सोय लावण्यात मग्न आहोत.त्यामुळे आमचे सामान्य नागरिक जगले/मेले,त्याच्याने आम्हाला काय फरक पडतो? आम्ही आमच्या जगात सुखी आहोत.आमचा थाट बघुनच तुम्ही दंग व्हा!लाल दिव्याच्या गाड्या,पंचतारांकित सुविधा,सिक्युरिटी वगैरे.

लोकांना मुर्ख बनविण्यात आमचा कोण हात धरू शकेल? अशी काही घटना घडण्याची अधुनमधून शक्यता असतेच.त्यामुळे अधुनमधून आम्ही 'हाय अलर्ट' घोषित करत असतोच. 'हाय अलर्ट' किती विनोदी शब्द आहेत! पण हं,उद्या कुणी म्हणायला नको,उगाच आमचं पद धोक्यात का म्हणून घालायचं?देश धोक्यात आला तर ते चालतं! असो.

.... तर पुन्हा एकदा मुंबईवर नव्हे तर भारतावर अतिरेकी हल्ला झालेला आहे.आमच्या संवेदना आम्ही त्याप्रती जाहिर करतो.तपास चालू आहे.घटनास्थळी आमची पथके पाहणी करत आहेत.अमुकतमुक संघटनेचा यात हात असल्याचा संशय आहे.आम्ही अतिरेक्यांना लवकरच पकडण्यात यशस्वी होऊ याबद्दल खात्री बाळगा.अफवांवर विश्वास ठेवू नका.गरज असल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका.आणि आमच्या सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करा.धन्यवाद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आधी एक लेख आहे ना तुमचा. पुन्हा ?

एनीवे
@ सगळे
राग व्यक्त करा एकदाचा आणि शांतपणे कामाला लागा.

डॉक

कालपासून प्रतिक्रिया व्यक्त करतोय. आता काही वाटेनासं झालंय.
सरकार तरी काय करणार ? ते म्हणजे कुणी सुपरपॉवर नाहीत. समाजात खदखद इतकी आहे कि अतिरेकी विचारांच्या लोकांना आश्रय मिळतो. शत्रू छुपा आहे हे पण चूक आहे. समाजातला असंतोष आपण उघड्या नजरेने पाहत नाही. नक्षलवादी का तयार होतात ? दहशतवादी कारवायांना का आश्रय मिळतो या प्रश्नांकडे सुरेश खोपडे म्हणतात तसं पहायला हवं..

वरवर सनसनाटी प्रतिक्रिया व्यक्त करून काही होणार नाही.

@किरण्यके

आता काही वाटेनासं झालंय.

आता मुंबई तुमच्याचप्रमाणे सावरली पण असेल कदाचित; नाही का? नेहमीचाच अनुभव..त्यामुळे मुंबईकरांच्या धैर्याची जशी तारिफ केली जाते,तसाच एक आरोपही केला जातो- संवेदनशून्यतेचा!
मुंबईकरांच्या संवेदना बोथट झाल्या असतील का खरोखर?
की सगळीकडेच सारखी माणसे आहेत-(आणि फक्त मुंबईवर जास्त हल्ले झालेत म्हणून केवळ मुंबईकरांवर असा आरोप होतो?)पुणे,मुंबई,चेन्नई,कोलकाता सगळीकडेच असे धैर्यवान/किंवा काहींच्या भाषेत संवेदनशून्य लोक सारखेच असतील?
की
एकंदरीत सर्व समाजाच्याच संवेदना बोथट झाल्या आहेत?
ज्यांचे नातेवाईक दगावले त्यांचाच फक्त आक्रोश चालू असतो? इतरांना जर त्याचे काहीच वाटत नसेल तर"आम्ही" आणि आमच्यात काय फरक आहे? की असा काही फरक नसतोच अस्तित्वात? म्हणजे उद्या आम्ही राजकारणात पडलो तर कदाचित असेच होणार? किंवा आजचे राजकारणी नेते केवळ मुंबईतील सामान्य लोक असते,तर ते सुध्दा असेच धैर्यशील/बोथट झाले असते?
परदु:ख शीतलम्....?

या विषयावर एक धागा अहे तितेह्च तुमचाही प्रतिसाद हलवलाअ आहे. क्रृप्या पुन्हा नवीन धागा चालू करा.