पालकभेट - शिक्षकाच्या नजरेतून

Submitted by लसावि on 12 July, 2011 - 13:37

गावाकडच्या माझ्या शाळेत पालकभेट हा प्रकारच नव्हता. वर्षाच्या शेवटी १ मे ला आम्हाला एक छोटे, तांबडे प्रगतीपुस्तक मिळे. त्यामागे पालकांची सही घेउन ते शाळेत लगेच परत करायचे असे. संपूर्ण वर्गात त्यावर सही करु शकणारे ४-५ पालक असत, बाकी सगळे आंगठे. मला विद्यार्थी म्हणून पालकभेटीला कधीच सामोरे जावे लागले नाही. मात्र शिक्षक झाल्यापासून मात्र पालकभेट हा व्यवसायातील एक महत्वाचा ’इव्हेंट’ बनला आहे. त्यातही मी बहुतांश वेळा निवासी शाळेतच काम केले आहे आणि अशा शाळेत पालकभेटीचे महत्व अर्थातच डे-स्कूल्सपे़क्षा कितीतरी जास्त असते.

कोणत्याही पालकभेटीत चार घटक कार्यरत असतात; शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. या प्रत्येकाची या दिवसाकडे पाहण्याची वेगळी नजर, पालकभेटीला निराळीच रंगत आणते. व्यवस्थापनाचा उद्देश एकदम सरळ असतो, पालकांनी कमीतकमी तक्रारी करुन आमच्या हो ला हो म्हणावे आणि हे घडून येण्यासाठी शि़क्षकांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे. त्यासाठीच्या सरळ आणि छुप्या सुचना पालकभेटीच्या आदल्या दिवशी होणार्‍या मिटींगमधे मिळतात. उदा.शाळेने घेतलेल्या एखाद्या वादग्रस्त निर्णयावर पालकांनी प्रश्न विचारल्यास काय स्ट्रॅटेजी अपेक्षीत आहे, कोण्या एका तापदायक पालकाशी कसे डील करायचे इ.इ.

पालकांचेही अनेक प्रकार असतात. शाळेला संपूर्ण सहकार्य देणारे आणि फार कटकट न करणारे आणि त्यामुळे सर्वांचेच लाडके हा एक प्रकार. यातही दोन उपगट आहेत, एक ते पालक ज्यांना कसलेच घेणेदेणे नसते. त्यांच्या लेखी शाळा म्हणजे भरपूर पैसे देऊन मुलाला/मुलीला घरापासून दूर ठेवण्याची जागा. दुसरे ते पालक ज्यांचा शाळा करेल ते योग्यच असा अफाट विश्वास असतो. अर्थातच सगळे पालक असे असत नाहीत, तसे असूही नयेत. दुसरा प्रकार अर्थात 'जागरुक पालकांचा'. यात तर अनेक उपप्रकार असतात. फक्त आपल्या मुलापुरते जागरुक, फक्त दुसर्‍याच्या मुलापुरते जागरुक, शिक्षकाच्या प्रतिमेबद्द्ल जागरुक, एखाद्याच विषयापुरते जागरुक, शाळांतर्गत राजकारणाबद्द्ल जागरुक इ.इ.इ. शाळेच्या आणि आपल्या पाल्याच्या एकंदरीत प्रगतीबद्द्ल प्रामाणिक काळजी असणारे, विधायक सूचना करणारे, व्यवस्थापनाला दांडगाई न दाखवणारे, खर्‍या अर्थाने जागरुक पालक फारच थोडे असतात.

माझ्या विद्यार्थ्यांच्या नजरेत पालकभेटीचे अनेक अर्थ असू शकतात. मुळात घरातले कोणी असणार आहे का फ़क्त ड्रायव्हरबरोबर गाडीच येणार आहे इथून, ते आख्ख्या जॉईंट फॅमिलीला बोलवून पिकनीक करणारे; इतकी प्रचंड व्हरायटी बघायला मिळते! पण बहुतेकांसाठी हा घरी परत जायचा आणि म्हणून आनंदाचा दिवस असतो, परिक्षेत पडलेले मार्क कळणे हा त्यांच्या दृष्टीने या दिवशीचा केवळ साईडइफ़ेक्ट!

पालकभेटीदिवशीचा खरा नायक मात्र शिक्षकच असतो. अनेक प्रकारचे पालक आणि विद्यार्थी आणि त्यांचे अगणित प्रश्न. या प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळावे लागते हे स्पष्टच आहे आणि याचमुळे पालकभेट हा शिक्षकांना संवादकौशल्य, व्यवस्थापन, अभिनय, सायकॉलॉजी, डिप्लोमसी, राजकारण अशा अनेकविध गोष्टी एकाच दिवशी शिकण्याचा दिवस असतो.

तर आज आज शाळेत पालकभेट आहे. याची तयारी गेला आठवडाभरापासून चालली आहे. पेपर तपासले जाताहेत, रि़झल्ट बनतोय, सत्राशेसाठ प्रकारचे रिमार्क्स आणि कॉमेंट्स भरताहेत, वर्ग सजत आहेत आणि आज कधी नव्हे ते टाय घालावा लागतोय! थोडक्यात काय तर या दिवशी शाळा जशी दिसते तशी नेहमीच नसते!

ते पहा एकएक पालक यायला सुरु झाले. नेहमीप्रमाणे १०वीतली प्रिया आणि तिची आई सर्वात आधी पोचतात. जिनिअस म्हणावी अशी ही मुलगी आणि अत्यंत समजूतदार पालक. चला सुरुवात तर चांगली झाली, मी मनात म्हणतो. सुट्टीत करायच्या असाईनमेंट्वर चर्चा होते काही अवांतर गप्पा होतात आणि ते पुढच्या शिक्षकाकडे जातात. अशी पालक-विद्यार्थी जोडी हा सगळ्यात दुर्मिळ आणि सर्वात सोपा प्रकार. ही पोरं अभ्यासात आणि वागणुकीत उत्तम असतात, निदान वागायला तरी चांगली असतात. यांच्या पालकांना आपल्या पोराची लायकी पूर्ण माहिती असते आणि ते अवास्तव अपेक्षा करित नाहीत. हे लोक मुद्द्याचे बोलतात आणि पटकन निघतात, शिक्षकावर डोळस विश्वास हे यांचे मुख्य लक्षण.

मी अजून काही पालकांशी बोलतोय एवढ्यात ११वीतल्या ॠतिकचे वडील अत्यंत उद्धट ’एक्सक्य़ूज मी’ फ़ेकत त्या पालकाला जवळजवळ हूसकावूनच लावतात. त्यांच्या मागोमाग अगदी बिचारा दिसणारा ॠतिक पाय ओढीत येतो. हा एक सिन्सिअर मुलगा, बर्‍यापैकी मार्क पाडतो पण याच्या बापाचे कधी समाधानच होत नाही. 'भला उसकी कमिज मेरी कमिज से सफेद कैसे?' हा त्यांचा ताल असतो. तुलना करायला त्याने दुसर्‍याच कोणत्यातरी पोराची उत्तरपत्रिका आणि प्रगतीपुस्तक आणलेले असतेच. त्याची समजूत काढता काढता बराच वेळ जातो तरीही शिक्षक योग्य तितके लक्ष देत नाही, 'एक्स्ट्रा' काही करत नाही, ही त्यांची सततची तक्रार चालूच असते. मुलाबद्दलच्या अवास्तव अपेक्षा हा अशा पालकांचा स्थायिभाव असतो. थोडक्यात काय तर हे लोक विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही छळतात.

आदल्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांबद्दल आम्हाला विषेश सूचना देण्यात आल्या त्यापैकी एक प्रिती तिच्या वडीलांबरोबर येते. ही मुलगी गेल्यावर्षी आमच्याकडे आली तेंव्हा ती अभ्यासात प्रचंड मंद होती. आता हळूहळू वेग घेते आहे. ती डिसलेक्सिक आहे हे लक्षात आल्यावर आम्ही तिच्यासाठी स्पेशल काँसेलिंग सेशन्स सुरु केली. तिचे वडील तिला मार्क मिळवण्यासाठी प्रचंड दबाव आणतात आणि घरी गेल्यावर मारहाण करतात ही माहिती या सेशन्समधेच मिळाली. त्यामुळे तिच्या वडीलांपुढे तिच्या विरोधात फ़ारसे काही बोलायचे नाही उलट तिच्या प्रयत्नांचे कौतूकच करायचे असे आमचे आधीच ठरले असते. अशा अनेक केसेसमधे आमची जबाबदारी केवळ एक शिक्षक एवढी न राहता पालकाचीच बनते. अभ्यास, वर्तन किंवा दोन्हीत प्रॉब्लेमॅटीक असणारी अशी अनेक मुले आमच्याकडे आहेत. याची कारणे अनेक असू शकतात. डिसलेक्सिआ, अटेंशन डिऑर्डर अशा मूलभूत कारणांपासून पौगंडावस्थातील नैसर्गिक बदलांमुळे येणारी बंडखोरी अशा वेगवेगळ्या पातळीवरती हे प्रश्न असू शकतात. मुलांचे अचूक निरि़क्षण आणि त्यांच्याशी सतत संवाद ठेवणे या जोरावर शिक्षकाला हे प्रश्न लक्षात येउ शकतात आणि नशिबाने जर पालकही सूज्ञ असतील तर ते दोघे मिळून मुलांना अत्यंत आवश्यक अशी मदत करु शकतात. अशा केसेसमधे या पालकांशी फ़क्त पालकभेटीपुरता संवाद न ठेवता जेंव्हा, जशी गरज पडेल तसे त्यांना मुलाबद्द्ल माहिती देणे महत्वाचे असते.

पण या जागरुकतेचे रुपांतर ’ओव्हरअवेअरनेस’मधे होतानाही आम्ही शिक्षक अलीकडे पहात आहोत. तिकडे गणिताच्या शिक्षकाबरोबर अमर आणि त्याचे वडील वाद घालत आहेत. अमरला ’डिसकॅल्क्युला’ आहे असे त्यांचे कोणतीही टेस्ट न करताच ठाम मत आहे. गणितात कमी पडणार्‍या मार्कांचे अमरनेच शोधून काढलेले हे नामी कारण आहे आणि मुलाला घरी ठेवू न शकण्याचा ’गिल्ट’ जोपासणारे त्याचे वडील त्याच्या कोणात्याही गोष्टीला विरोध करायला तयार नाहीत. एका पालकभेटीत सुटणारा हा तिढा नाही.

हळूहळू पालकभेट संपायची वेळ येते आणि १२ वीतली रिचा तिच्या हेवी एक्सेंट्मधे ’सर, कॅन आय हॅव माय रिपोर्टकार्ड’ अशी विचारणा करत येते. या मुलीला मी गेली दोन वर्षे शिकवतोय आजतागायत एकाही पालकभेटीला हिच्या घरुन कोणीही आलेले नाही. हिच्या आईला काही कारणाने भारताचा व्हिसा मिळत नाही आणि वडिलांबद्दल मला काही माहिती नाही. रिचाची सावत्र बहिण गेल्यावर्षी आमच्याच शाळेतून पासआउट झाली. दोन्ही हुशार मुली, आता त्यांची एकंदरीत पार्श्वभूमी पाहता रिचा नॉर्मल वागते ह्याचेच मला अप्रूप वाटते.

आपल्या निम्म्या वयाच्या बॉयफ़्रेंडला बरोबर घेउन येणारी आई, एका पालकभेटीला आई आणि नवे बाबा तर पुढच्या वेळी खरे बाबा, नव्या आईबरोबर अशी वाटणी झालेल्या तुटलेल्या, दुभंगलेल्या घरातील अनेक मुले माझ्या शाळेत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्याची संगती लावताना माझी वैयक्तिक नितीमूल्ये फ़ुटपट्टीसारखी वापरण्यात काही अर्थ नाही त्याने कोणतेच प्रश्न सुट्णार नाहीत याची परत एकदा जाणिव करुन देणारा हा दिवस. ’या मुलांनीं काय आयुष्य बघीतले आहे?’ असा तुच्छतापूर्ण प्रश्न मनात येत नाहीच असे नाही, पण त्यांनीं पाहिलेले आयुष्य मी पाहिलेले नाही हे सतत लक्षात ठेवणे आणि त्यांच्या परस्पेक्टिव्हचा मान राखणे हे करावेच लागते. हे सगळे चालले असतानाच आपला विषय शक्य तितक्या रोचक पद्धतीने शिकवणे आणि चांगला रिझल्ट लावणे हे तर आहेच. हे सर्व अवघड आहे पण यातच तर या कामाचे खरे चॅलेंज आहे, खरी मजा आहे. मला माझा व्यवसाय प्रिय आहे तो याचसाठी.

प्रत्येक पालकभेट हा अनेकार्थाने एक ’लर्निंग एक्सपिरिअन्स’ असतो यात शंकाच नाही. ’डोंट टीच सब्जेक्ट, टीच स्टुडंट्स’ हे माझ्या व्यवसायातील एक अत्यंत महत्वाचे सूत्र. तुमच्या पुढे बसलेली मुले ही केवळ एखाद्या विषयाचे ज्ञान भरायची जाग नाही. विद्यार्थी ही भाव-भावना असलेली, जिवंत माणसे आहेत हे लक्षात ठेवत त्यांच्याशी संवाद साधणे हीच शिक्षकाची पहिली प्रार्थमिकता असली पाहिजे. या दृष्टीने प्रत्येक शिक्षकाला रिओरिएंट करणारा प्रसंग म्हणजे अशी प्रत्येक पालकभेट.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
टीप - लेखातील सर्व उदाहरणे खरी आहेत, नावे फक्त बदलली आहेत.

गुलमोहर: 

छान लेख. आवडला.

आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमधे मुलं खूप कमी वयात खूप जास्त अनुभवतात. सावत्र पालक, दुरचित्रवाणी वर दाखवल्या जाणार्‍या गोष्टी, व्हिडियो गेम्स आणि कॉम्प्युटर ह्या सगळ्यामुळे मुलांची मानसिकता आणि त्यातुन येणारे प्रश्न व्यवस्थित हाताळायला तुमच्यासारखे जागरुक आणि समजूतदार शिक्षक गरजेचे आहेत.

छान लिहिलेय.

शाळेतल्या पालकांच्या त-हा बघुन आश्चर्य वाटले. पालक आहेत की चित्रपटातले तारे?
माझी मुलगी त्या मानाने एकदम मवाळ शाळेत होती असे म्हणायला हवे Happy

एखादे मूल सर्वच विषयांत बर्‍यापैकी चांगले असेल, वर्गातली वागणूकही चांगली असेल, आज्ञाधारक असेल, तर त्या मुलाकडे शिक्षक केवळ एक निरुपद्रवी विद्यार्थी म्हणून बघतात की...>>> हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

आमच्या शाळेतही वार्षिक मीटींग होत असे. तेथे काय होइ कोणास ठाऊक?

हे मात्र अगदी खरे की जर योग्य वळणावर चांगला शिक्षक मिळाला तर आयुष्य बदलू शकते.

मी लहान असताना , म्हणजे अगदी पहिली दुसरीत ... माझ्या शिक्षकांनी माझा असा ठाम समज करून दिला होता की मी ढ आहे. तेव्हा माझ्या बरोबरीच्या बर्‍याच जणांना ९८, ९५ % असे ट्क्के पडत. मला पडत ८५ %.( हो.. तरी मी महा ढ असा शिक्का होता.)
नंतर मात्र चौथी मध्ये माझ्या वर्गशि़क्षिकेने माझा आत्मविश्वास कमालिने वाढ्विला. मला सतत सांगितले की तू हुशार आहेस आणि तुझा पहिला नंबर सुद्धा येउ शकतो. आणि तसेच झाले, माझा दुसरा नंबर आला. पाचवीत गेलो आणि अभ्यासाचे स्वरूप बदलले. आमचे ९५ % वाले जोरदार घसरले, मी मात्र माझा नंबर कायम ठेऊ शकले.
त्याचे कारण त्या शिक्षिकेने दिलेला सल्ला जो आज मी सगळ्यांना सांगू इच्छिते " स्पर्धा फक्त स्वत: शी करायची , माझा अभ्यास झाला आहे का? हे प्रामाणिकपणे ठरवायचे. नसेल झाला तर स्वतः शी स्पर्धा करून तो संपवावा. आणि मग काय होइल ते होइल. "

फारच मस्त लेख.. अजुन लिहा..शक्य असेल तर सध्याची नवीन पद्धत आणि पालकांचा या शिक्शण पद्धतीत कितपत आणि कसा सहभाग असावा यावर शिक्षकाच्या नजरेतुन काही मांडता येईल का?
कारण मुलाच्या शाळेत असे जाणवत की काही पालक सदैव मुल ,त्याचा अभ्यास आणि ईतर अ‍ॅक्टिविटी याच विचारात आणि या सगळ्यात ईतके सक्रीय असतात की मुलाची स्वतःची विचारशक्तीच खुंटवल्या सारखी वाटते.. आणि काही ठिकाणी मात्र प्रचंड अनास्था.. म्हणजे मुलाला सर्व साधने (ट्युशन, क्लासेस, कम्प्युटर ) आणुन दिली की आपले काम संपले असा दृष्टीकोन...या सर्वाचा सुवर्णमध्य कसा असावा?

आगाऊ, छानच लिहिलाय लेख. खूप आवडला. तुमचे अनुभव,व अजून लेखही वाचायला आवडतील.

<<<आपल्या निम्म्या वयाच्या बॉयफ़्रेंडला बरोबर घेउन येणारी आई, एका पालकभेटीला आई आणि नवे बाबा तर पुढच्या वेळी खरे बाबा, नव्या आईबरोबर अशी वाटणी झालेल्या तुटलेल्या, दुभंगलेल्या घरातील अनेक मुले माझ्या शाळेत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्याची संगती लावताना माझी वैयक्तिक नितीमूल्ये फ़ुटपट्टीसारखी वापरण्यात काही अर्थ नाही त्याने कोणतेच प्रश्न सुट्णार नाहीत याची परत एकदा जाणिव करुन देणारा हा दिवस. ’या मुलांनीं काय आयुष्य बघीतले आहे?’ असा तुच्छतापूर्ण प्रश्न मनात येत नाहीच असे नाही, पण त्यांनीं पाहिलेले आयुष्य मी पाहिलेले नाही हे सतत लक्षात ठेवणे आणि त्यांच्या परस्पेक्टिव्हचा मान राखणे हे करावेच लागते. हे सगळे चालले असतानाच आपला विषय शक्य तितक्या रोचक पद्धतीने शिकवणे आणि चांगला रिझल्ट लावणे हे तर आहेच. हे सर्व अवघड आहे पण यातच तर या कामाचे खरे चॅलेंज आहे, खरी मजा आहे. मला माझा व्यवसाय प्रिय आहे तो याचसाठी>>>>यालाच म्हणतात हाडाचा शिक्षक.
<<<’डोंट टीच सब्जेक्ट, टीच स्टुडंट्स’ हे माझ्या व्यवसायातील एक अत्यंत महत्वाचे सूत्र. तुमच्या पुढे बसलेली मुले ही केवळ एखाद्या विषयाचे ज्ञान भरायची जाग नाही. विद्यार्थी ही भाव-भावना असलेली, जिवंत माणसे आहेत हे लक्षात ठेवत त्यांच्याशी संवाद साधणे हीच शिक्षकाची पहिली प्रार्थमिकता असली पाहिजे. या दृष्टीने प्रत्येक शिक्षकाला रिओरिएंट करणारा प्रसंग म्हणजे अशी प्रत्येक पालकभेट.>>>हेच फार महात्त्वाच आहे. तुमच्या सारखे शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना लाभले, ते विद्यार्थी भाग्यवानच.

छान लिहिलंय . Happy
माझ्या शाळेतही व्हायचेच पालक शिक्षक मेळावे.
सुदैवाने अभ्यास ह्या विषयात मला फारसा त्रास कधी नव्हता ... म्हणून माझ्या डोक्याला मेळाव्यांचा त्रास नसायचा.
पण ते मेळावे होऊ नये असे मात्र वाटायचेच !
काही शिक्षक लोक आई बाबांसमोर किती तरी वेगळे वागायचे. आणि त्यावेळीही डोळ्यांमध्ये "पालक गेल्यावर बेट्या तू आहेस आणि मी आहे !" वाली झाक असायची.
तिडीक यायची डोक्यात
दुसऱ्या दिवशीच वर्गात मार बसण्याची शक्यता तिथेच वाढायची ना ! Sad

शेवटचा परिच्छेद खूपच आवडला.
सलाम तुम्हाला आणि तुमच्यातल्या संवेदनशील शिक्षकाला!

तुमचा विद्यार्थ्यांप्रती असणारा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. विशेषतः डिस्लेक्सिक मुलीचे हाल कमी व्हावेत म्हणून केलेले प्रयत्न विशेष आवडले.

शाळेत असतानाचा एक मित्र, बऱ्यापैकी हुशार होता पण फारसा इतरांत मिसळत नसे, बोलणे फारच कमी. या वर्तनात सुधारणा म्हणून आमच्या वर्गशिक्षिकेने त्याला एकट्यास मुलींच्या कोंडाळ्यात जबरदस्तीने बसवले, ते ही सलग वर्षभर. शारीरिक शिक्षा ती वेगळीच , केवळ तो इतरांत मिसळत नाही म्हणून. Angry
त्याच्या त्यावेळच्या मनस्थितीची कल्पनाही करवत नाही. Sad

अजूनही असले भयंकर प्रकार काही शाळांत चालतात असे ऐकून आहे.

तुमच्या सारख्या काही शिक्षकांमुळेच शिक्षकी पेशाबद्दलचा आदर दुणावतो. अशा विलग राहणाऱ्या मुलांचे संवादकौशल्य वाढावे, यासंदर्भातआपला एखादा अनुभव असल्यास वाचायला नक्की आवडेल.

Pages