पालकभेट - शिक्षकाच्या नजरेतून

Submitted by लसावि on 12 July, 2011 - 13:37

गावाकडच्या माझ्या शाळेत पालकभेट हा प्रकारच नव्हता. वर्षाच्या शेवटी १ मे ला आम्हाला एक छोटे, तांबडे प्रगतीपुस्तक मिळे. त्यामागे पालकांची सही घेउन ते शाळेत लगेच परत करायचे असे. संपूर्ण वर्गात त्यावर सही करु शकणारे ४-५ पालक असत, बाकी सगळे आंगठे. मला विद्यार्थी म्हणून पालकभेटीला कधीच सामोरे जावे लागले नाही. मात्र शिक्षक झाल्यापासून मात्र पालकभेट हा व्यवसायातील एक महत्वाचा ’इव्हेंट’ बनला आहे. त्यातही मी बहुतांश वेळा निवासी शाळेतच काम केले आहे आणि अशा शाळेत पालकभेटीचे महत्व अर्थातच डे-स्कूल्सपे़क्षा कितीतरी जास्त असते.

कोणत्याही पालकभेटीत चार घटक कार्यरत असतात; शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. या प्रत्येकाची या दिवसाकडे पाहण्याची वेगळी नजर, पालकभेटीला निराळीच रंगत आणते. व्यवस्थापनाचा उद्देश एकदम सरळ असतो, पालकांनी कमीतकमी तक्रारी करुन आमच्या हो ला हो म्हणावे आणि हे घडून येण्यासाठी शि़क्षकांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे. त्यासाठीच्या सरळ आणि छुप्या सुचना पालकभेटीच्या आदल्या दिवशी होणार्‍या मिटींगमधे मिळतात. उदा.शाळेने घेतलेल्या एखाद्या वादग्रस्त निर्णयावर पालकांनी प्रश्न विचारल्यास काय स्ट्रॅटेजी अपेक्षीत आहे, कोण्या एका तापदायक पालकाशी कसे डील करायचे इ.इ.

पालकांचेही अनेक प्रकार असतात. शाळेला संपूर्ण सहकार्य देणारे आणि फार कटकट न करणारे आणि त्यामुळे सर्वांचेच लाडके हा एक प्रकार. यातही दोन उपगट आहेत, एक ते पालक ज्यांना कसलेच घेणेदेणे नसते. त्यांच्या लेखी शाळा म्हणजे भरपूर पैसे देऊन मुलाला/मुलीला घरापासून दूर ठेवण्याची जागा. दुसरे ते पालक ज्यांचा शाळा करेल ते योग्यच असा अफाट विश्वास असतो. अर्थातच सगळे पालक असे असत नाहीत, तसे असूही नयेत. दुसरा प्रकार अर्थात 'जागरुक पालकांचा'. यात तर अनेक उपप्रकार असतात. फक्त आपल्या मुलापुरते जागरुक, फक्त दुसर्‍याच्या मुलापुरते जागरुक, शिक्षकाच्या प्रतिमेबद्द्ल जागरुक, एखाद्याच विषयापुरते जागरुक, शाळांतर्गत राजकारणाबद्द्ल जागरुक इ.इ.इ. शाळेच्या आणि आपल्या पाल्याच्या एकंदरीत प्रगतीबद्द्ल प्रामाणिक काळजी असणारे, विधायक सूचना करणारे, व्यवस्थापनाला दांडगाई न दाखवणारे, खर्‍या अर्थाने जागरुक पालक फारच थोडे असतात.

माझ्या विद्यार्थ्यांच्या नजरेत पालकभेटीचे अनेक अर्थ असू शकतात. मुळात घरातले कोणी असणार आहे का फ़क्त ड्रायव्हरबरोबर गाडीच येणार आहे इथून, ते आख्ख्या जॉईंट फॅमिलीला बोलवून पिकनीक करणारे; इतकी प्रचंड व्हरायटी बघायला मिळते! पण बहुतेकांसाठी हा घरी परत जायचा आणि म्हणून आनंदाचा दिवस असतो, परिक्षेत पडलेले मार्क कळणे हा त्यांच्या दृष्टीने या दिवशीचा केवळ साईडइफ़ेक्ट!

पालकभेटीदिवशीचा खरा नायक मात्र शिक्षकच असतो. अनेक प्रकारचे पालक आणि विद्यार्थी आणि त्यांचे अगणित प्रश्न. या प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळावे लागते हे स्पष्टच आहे आणि याचमुळे पालकभेट हा शिक्षकांना संवादकौशल्य, व्यवस्थापन, अभिनय, सायकॉलॉजी, डिप्लोमसी, राजकारण अशा अनेकविध गोष्टी एकाच दिवशी शिकण्याचा दिवस असतो.

तर आज आज शाळेत पालकभेट आहे. याची तयारी गेला आठवडाभरापासून चालली आहे. पेपर तपासले जाताहेत, रि़झल्ट बनतोय, सत्राशेसाठ प्रकारचे रिमार्क्स आणि कॉमेंट्स भरताहेत, वर्ग सजत आहेत आणि आज कधी नव्हे ते टाय घालावा लागतोय! थोडक्यात काय तर या दिवशी शाळा जशी दिसते तशी नेहमीच नसते!

ते पहा एकएक पालक यायला सुरु झाले. नेहमीप्रमाणे १०वीतली प्रिया आणि तिची आई सर्वात आधी पोचतात. जिनिअस म्हणावी अशी ही मुलगी आणि अत्यंत समजूतदार पालक. चला सुरुवात तर चांगली झाली, मी मनात म्हणतो. सुट्टीत करायच्या असाईनमेंट्वर चर्चा होते काही अवांतर गप्पा होतात आणि ते पुढच्या शिक्षकाकडे जातात. अशी पालक-विद्यार्थी जोडी हा सगळ्यात दुर्मिळ आणि सर्वात सोपा प्रकार. ही पोरं अभ्यासात आणि वागणुकीत उत्तम असतात, निदान वागायला तरी चांगली असतात. यांच्या पालकांना आपल्या पोराची लायकी पूर्ण माहिती असते आणि ते अवास्तव अपेक्षा करित नाहीत. हे लोक मुद्द्याचे बोलतात आणि पटकन निघतात, शिक्षकावर डोळस विश्वास हे यांचे मुख्य लक्षण.

मी अजून काही पालकांशी बोलतोय एवढ्यात ११वीतल्या ॠतिकचे वडील अत्यंत उद्धट ’एक्सक्य़ूज मी’ फ़ेकत त्या पालकाला जवळजवळ हूसकावूनच लावतात. त्यांच्या मागोमाग अगदी बिचारा दिसणारा ॠतिक पाय ओढीत येतो. हा एक सिन्सिअर मुलगा, बर्‍यापैकी मार्क पाडतो पण याच्या बापाचे कधी समाधानच होत नाही. 'भला उसकी कमिज मेरी कमिज से सफेद कैसे?' हा त्यांचा ताल असतो. तुलना करायला त्याने दुसर्‍याच कोणत्यातरी पोराची उत्तरपत्रिका आणि प्रगतीपुस्तक आणलेले असतेच. त्याची समजूत काढता काढता बराच वेळ जातो तरीही शिक्षक योग्य तितके लक्ष देत नाही, 'एक्स्ट्रा' काही करत नाही, ही त्यांची सततची तक्रार चालूच असते. मुलाबद्दलच्या अवास्तव अपेक्षा हा अशा पालकांचा स्थायिभाव असतो. थोडक्यात काय तर हे लोक विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही छळतात.

आदल्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांबद्दल आम्हाला विषेश सूचना देण्यात आल्या त्यापैकी एक प्रिती तिच्या वडीलांबरोबर येते. ही मुलगी गेल्यावर्षी आमच्याकडे आली तेंव्हा ती अभ्यासात प्रचंड मंद होती. आता हळूहळू वेग घेते आहे. ती डिसलेक्सिक आहे हे लक्षात आल्यावर आम्ही तिच्यासाठी स्पेशल काँसेलिंग सेशन्स सुरु केली. तिचे वडील तिला मार्क मिळवण्यासाठी प्रचंड दबाव आणतात आणि घरी गेल्यावर मारहाण करतात ही माहिती या सेशन्समधेच मिळाली. त्यामुळे तिच्या वडीलांपुढे तिच्या विरोधात फ़ारसे काही बोलायचे नाही उलट तिच्या प्रयत्नांचे कौतूकच करायचे असे आमचे आधीच ठरले असते. अशा अनेक केसेसमधे आमची जबाबदारी केवळ एक शिक्षक एवढी न राहता पालकाचीच बनते. अभ्यास, वर्तन किंवा दोन्हीत प्रॉब्लेमॅटीक असणारी अशी अनेक मुले आमच्याकडे आहेत. याची कारणे अनेक असू शकतात. डिसलेक्सिआ, अटेंशन डिऑर्डर अशा मूलभूत कारणांपासून पौगंडावस्थातील नैसर्गिक बदलांमुळे येणारी बंडखोरी अशा वेगवेगळ्या पातळीवरती हे प्रश्न असू शकतात. मुलांचे अचूक निरि़क्षण आणि त्यांच्याशी सतत संवाद ठेवणे या जोरावर शिक्षकाला हे प्रश्न लक्षात येउ शकतात आणि नशिबाने जर पालकही सूज्ञ असतील तर ते दोघे मिळून मुलांना अत्यंत आवश्यक अशी मदत करु शकतात. अशा केसेसमधे या पालकांशी फ़क्त पालकभेटीपुरता संवाद न ठेवता जेंव्हा, जशी गरज पडेल तसे त्यांना मुलाबद्द्ल माहिती देणे महत्वाचे असते.

पण या जागरुकतेचे रुपांतर ’ओव्हरअवेअरनेस’मधे होतानाही आम्ही शिक्षक अलीकडे पहात आहोत. तिकडे गणिताच्या शिक्षकाबरोबर अमर आणि त्याचे वडील वाद घालत आहेत. अमरला ’डिसकॅल्क्युला’ आहे असे त्यांचे कोणतीही टेस्ट न करताच ठाम मत आहे. गणितात कमी पडणार्‍या मार्कांचे अमरनेच शोधून काढलेले हे नामी कारण आहे आणि मुलाला घरी ठेवू न शकण्याचा ’गिल्ट’ जोपासणारे त्याचे वडील त्याच्या कोणात्याही गोष्टीला विरोध करायला तयार नाहीत. एका पालकभेटीत सुटणारा हा तिढा नाही.

हळूहळू पालकभेट संपायची वेळ येते आणि १२ वीतली रिचा तिच्या हेवी एक्सेंट्मधे ’सर, कॅन आय हॅव माय रिपोर्टकार्ड’ अशी विचारणा करत येते. या मुलीला मी गेली दोन वर्षे शिकवतोय आजतागायत एकाही पालकभेटीला हिच्या घरुन कोणीही आलेले नाही. हिच्या आईला काही कारणाने भारताचा व्हिसा मिळत नाही आणि वडिलांबद्दल मला काही माहिती नाही. रिचाची सावत्र बहिण गेल्यावर्षी आमच्याच शाळेतून पासआउट झाली. दोन्ही हुशार मुली, आता त्यांची एकंदरीत पार्श्वभूमी पाहता रिचा नॉर्मल वागते ह्याचेच मला अप्रूप वाटते.

आपल्या निम्म्या वयाच्या बॉयफ़्रेंडला बरोबर घेउन येणारी आई, एका पालकभेटीला आई आणि नवे बाबा तर पुढच्या वेळी खरे बाबा, नव्या आईबरोबर अशी वाटणी झालेल्या तुटलेल्या, दुभंगलेल्या घरातील अनेक मुले माझ्या शाळेत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्याची संगती लावताना माझी वैयक्तिक नितीमूल्ये फ़ुटपट्टीसारखी वापरण्यात काही अर्थ नाही त्याने कोणतेच प्रश्न सुट्णार नाहीत याची परत एकदा जाणिव करुन देणारा हा दिवस. ’या मुलांनीं काय आयुष्य बघीतले आहे?’ असा तुच्छतापूर्ण प्रश्न मनात येत नाहीच असे नाही, पण त्यांनीं पाहिलेले आयुष्य मी पाहिलेले नाही हे सतत लक्षात ठेवणे आणि त्यांच्या परस्पेक्टिव्हचा मान राखणे हे करावेच लागते. हे सगळे चालले असतानाच आपला विषय शक्य तितक्या रोचक पद्धतीने शिकवणे आणि चांगला रिझल्ट लावणे हे तर आहेच. हे सर्व अवघड आहे पण यातच तर या कामाचे खरे चॅलेंज आहे, खरी मजा आहे. मला माझा व्यवसाय प्रिय आहे तो याचसाठी.

प्रत्येक पालकभेट हा अनेकार्थाने एक ’लर्निंग एक्सपिरिअन्स’ असतो यात शंकाच नाही. ’डोंट टीच सब्जेक्ट, टीच स्टुडंट्स’ हे माझ्या व्यवसायातील एक अत्यंत महत्वाचे सूत्र. तुमच्या पुढे बसलेली मुले ही केवळ एखाद्या विषयाचे ज्ञान भरायची जाग नाही. विद्यार्थी ही भाव-भावना असलेली, जिवंत माणसे आहेत हे लक्षात ठेवत त्यांच्याशी संवाद साधणे हीच शिक्षकाची पहिली प्रार्थमिकता असली पाहिजे. या दृष्टीने प्रत्येक शिक्षकाला रिओरिएंट करणारा प्रसंग म्हणजे अशी प्रत्येक पालकभेट.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
टीप - लेखातील सर्व उदाहरणे खरी आहेत, नावे फक्त बदलली आहेत.

गुलमोहर: 

आगाऊ, फारच सुरेख लिहिलय. एका लोलकातून पीटीएम. लोलक हलला की वेगळा रंग. पण अजून वेगवेगळी उदाहरणं दिली असतीस तरी चाललं असतं. लवकर आटोपतं घेतलयस असं वाटलं.

तुझे इतर अनुभवही वाचायला आवडतील.

आवडलं. मी शाळेत असताना पालक-शिक्षक भेट कशी होती हे नक्की आठवत नाही पण आमच्या इथे वर्षातून दोनदा पेरेंट टिचर कॉन्फरन्स असते आणि one on one असते. प्रत्येक पालकाला १५ मिनिटाचा वेळ मिळतो शिक्षकांशी बोलायला. मुलं बरोबर आणायला अलाऊड नसतं. मुलांच्या वर्गात शिक्षकांबरोबर बसून अकॅडेमिक, सोशल, आर्ट, बिहेव्हिअर सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होते. प्रश्नांची उत्तरं दिली जातात.

छान मांडली आहे शिक्षकाच्या दुष्टीकोनातून पालकभेट. काळानुसार झालेले बदल, शिक्षणपध्द्ती चांगली लिहीली आहे. शिक्षकम्हणून तुम्हाला आलेले अनुभव वाचायला आवडतील.

छान लिहिलय. आवडलं.

आमच्या लहानपणी अशी काही भेट नव्हती. पाचवी प्रवेशासाठी वडिल आले होते शाळेत ते थेट दहावी झाल्यावर गुणी (?) विद्यार्थ्यांचा सत्कार होता तेव्हा आले Happy

सायो, बरोबर. आमच्या शाळेत या भेटी जवळजवळ रोज व्हायच्या. विद्यार्थी, शिक्षक, पालक केवळ शाळेत न भेटता, (आजूबाजूलाच रहात असल्याने) वेगवेगळ्या स्थळी भेटायचे. आया भाजीबाजारात, डॉक्टरकडे, पिठाच्या गिरणीत अशा आमच्या बाईंना भेटायच्या. त्यावेळी अतिशय अनौपचारीकपणे माहितीची देवाणघेवाण होत असणार. Happy

ढ मुलांचे पालक शाळेत येऊन शिक्षकांना " आमचा बाब्या / बनी शिकत नसेल तर द्या दोन धपाटे" अशा टाईपच्या सुचना द्यायचे आणि त्या सुचनेचा यथायोग्य आदर केलाही जायचा. ढ विद्यार्थी हा ढ च असायचा. त्याला डीसलेक्सिया वा तत्सम कोणताही आजार झालेला नसायचा. मार खाऊनही अशा विद्यार्थ्यांच्या बालमनावर कधी फारसा परिणाम झाल्याचे ऐकीवात यायचे नाही. सगळे सुमडीत असायचे. असं साधं सोपं जीवन होतं.

हो खरंय मामी. मुलांचं मानसशास्त्र वगरे चोचले नव्हते. आईवडिलांनी, शिक्षकांनी एक थोबाडीत लावून दिली, वर्गाबाहेर उभं करुन शिक्षा दिली तरी 'आय हेट यू' म्हणण्याची अक्कल आमच्यात नव्हती.

आमच्यावेळी तर मुलाची मानसिकता वगैरे बघितली जायचीच नाही. एकदा "ढ" चा शिक्का बसला की बसला. शिक्षकाने त्याच्याकडे दुर्लक्ष करणं वगैरे असायच. कसं त्या मुलांना अभ्यास करावा असं वाटणार? आमच्या शाळेत एक मुलगी होती. गणितात नापास व्हायची. मग गणिताच्या शिक्षकांच तिच्याकडे दुर्लक्ष. शेवटी तिने शाळा बदलली. गणितात चांगले मार्क मिळवायला लागली आणि COEP मधून इंजिनिअर झाली. आता अगदी यशस्वी झाली आहे. अजूनही भेटली तरी म्हणते आईवडिलांनी शाळा बदलू दिली म्हणून. त्यावेळी तुकड्यापण मार्कानुसार असायच्या. मुलंपण कमी मार्काच्या तुकडीतल्या मुलांकडे वेगळ्या नजरेनी पहायची. कोवळ्या वयात केवढे परीणाम होत असतील ह्याकडे बघितलच जायच नाही.

खूप आवडले. मी शाळेत असताना असे काही नव्हते. ४थी पर्यंत आई न्यायला यायची त्यामुळे बाई सगळे आईच्या कानावर घालायच्या. ५वी पासून आईचे शाळेत येणे बंद झाले तरी शाळेतल्या एक बाई शेजारीच असल्याने त्यांच्याकडे लगेच रिपोर्ट जायचा. मी रमत गमत घरी येइपर्यंत घरी बातमी पोहोचलेली असायची. Happy
माझ्या मुलाच्या शाळेत मात्र मिंटिंग विद्यार्थी स्वतःच करतात (student led conference). या मुळे शिक्षक आपल्याबद्दल काय सांगतायत याऐवजी आपण शाळेत काय करतो, कसे वागतो याबद्दल मुलेच आई वडिलांना सांगतात. काही प्रॉब्लेम असेल तर सोडवायच कसा याबद्द्ल विचार करतानाही विद्यार्थ्याला सामिल करुन घेतले जाते.

त्यावेळी तुकड्यापण मार्कानुसार असायच्या. मुलंपण कमी मार्काच्या तुकडीतल्या मुलांकडे वेगळ्या नजरेनी पहायची.>>> अगदी. आमच्या शाळेत 'अ' तुकडी कायम हुशार मुलांचीच.

मामी अनुमोदन..

मी लहान शाळेत केलेले प्रताप आईला बहुदा रेखा बाईंकडून मासळी बाजारात कळले.. Wink किशोरवयात मला बहुदा कुठच्या ना कुठच्या बाई आत्तेकडे सोडायच्या शाळा सुटली की! Wink

आर्च तुलाही अनुमोदन.. आम्हाला ब वर्गात पाठवून देईन ही भयंकर धमकी होती एकेकाळी.. पण आमच्या शाळेत २००२पर्यंत तरी अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना, मूकबधीरांनाही सामावून घ्यायचे नीट.. रवीवारी बॅचेस होत्या हुशार मुलांसाठी नि आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी पोळी भाजी फंडही होता (आहे).

आगाऊ कोणत्या शाळेत शिकवता सध्या आपण?

जाईजुई अगं हुषार मुलांच्यापेक्षा जे अभ्यासात कच्चे आहेत त्यांच्यासाठी हव्या न रविवारी बॅचेस. आमच्या शाळेत बोर्डात येण्यासाठी तयार करून घ्यायचे रविवारच्या किंवा शाळेच्या आधीच्या किंवा नंतरच्या वेळेत बॅचेस करून. मग ते अगरवाल क्लासेस सारख झालं न, आमच्या क्लासेसचे विद्यार्थी नेहेमी पहिले येतात म्हणून. घ्यायचेच ९०% वरचे विद्यार्थी क्लासमध्ये मग नाही येतील पहिले तर काय?

माझ्या बहिणीच्या मैत्रीणीने मुंबईत शाळा काढली आहे नापासांची शाळा म्हणून. नापास होतात म्हणून जी मुलं शाळा सोडून देतात न त्यांच्यासाठी.

माझ्या बहिणीच्या मैत्रीणीने मुंबईत शाळा काढली आहे नापासांची शाळा म्हणून. नापास होतात म्हणून जी मुलं शाळा सोडून देतात न त्यांच्यासाठी.>>> अभिनव आयडिया.

आगाउ: तुमचा लेख आवडला...अजून वाचायला आवडेल.

छान आहे लेख.

माझ्या मुलाच्या शाळेत मात्र मिंटिंग विद्यार्थी स्वतःच करतात (student led conference). >> माझ्या मुलाच्या शाळेतपण हीच पद्धत आहे. २ मीटींग्स पैकी १ पॅरेंट्-टीचर वन ऑन वन असते. आणि वर्ष संपायच्या आसपास मुलं, पालक, टीचर असतात.

लेख खूप आवडला. निष्पक्षपातीपणे लेखाजोखा मांडला आहे.
'त्यांनी काय आयुष्य पाहिले आहे' हे आपल्या दृष्टीने त्यांना लागू आणि त्यांच्या दृष्टीने आपल्यालासुद्धा Happy
शेवटच्या दोन्ही परिच्छेदांना तर अधोरेखित अनुमोदन Happy

अरभाट, >>> निष्पक्षपातीपणे>>> नव्हे, नि:पक्षपातीपणे.

आगाऊ, मांडलेला अनुभव आवडला. आणखी वाचायला आवडेल. प्रस्थापित दर्जाच्या निवासी शाळेत पूर्णवेळ शिक्षक म्हणून काम करत असतानाची आव्हाने, अनुभव, सर्वसामान्य समीकरणांच्या बाहेरचे किंवा त्यांना चॅलेंज करणारे अनुभव यांबद्दल आणखी लिहिले तर वाचायला निश्चित आवडेल.

आमच्या शाळेत वसतिगृहातील मुलींना शाळेतील शेवटचा दिवस म्हणजे गंगायमुनांचा दिवस असायचा. अनेकजणी पालक घरी न्यायला आल्यावर अक्षरशः मुसमुसत गळ्यात पडायच्या. (अगदी दोन-तीन आठवड्यांपूर्वी भेट झाली असली तरी!) वेगवेगळ्या खेडेगावांतून / शहरांतून आलेल्या या मुलींना तेव्हा शाळेच्या व वसतिगृहाच्या कडक शिस्तीत वावरावे लागायचे. घरून फोन येण्यावर वा घरी फोन करण्यावर देखील बंधने होती. ती पाळूनच पालक / मुली एकमेकांना फोन करत असत. बाहेरगावावरून कोणी नातेवाईक / घरचे भेटायला आले तरी त्यांच्यासाठी ठराविक वार, ठराविक वेळ असे. त्यातही रेक्टरना चिठ्ठी देऊन, आपली ओळख पटवून मगच त्या मुलीला भेटता येत असे. इमेल्सची / मोबाईलची सुविधा नसल्यामुळे घरी पत्र पाठवायचे आणि घरून येणार्‍या पत्राची वाट बघायची हाही मुलींचा आवडता उद्योग असे. मनीऑर्डरचीही वाट बघावी लागे. शिवाय कोणी नातेवाईक भेटायला आले की रिकाम्या हाताने सहसा येत नसत. सोबत काहीतरी खाऊ असे. त्या खाऊला रूमवर नेऊन जीवापाड जपले जाई. इतर कोण्या मुलीने न विचारता तो खाऊ खाल्ला तर त्यावरून जागतिक युध्द होण्याइतपत वातावरण तंग होई!!

अर्थात तिथेही अशा काही मुली होत्या ज्यांच्या घरी आर्थिक सुबत्ता होती, पण अन्य काही समस्या होत्या. त्या मुली अनेकदा सुट्टीच्या काळातही वसतिगृहातच थांबत. ह्या मुलींचे पालक शिक्षकांना कधी भेटायचे की नाही हे मला एक कोडेच आहे. कारण घरी चिठ्ठी पाठवून शिक्षकांनी खास भेटायला बोलावल्या खेरीज अनेकजण तिकडे फिरकायचे नाहीत. रेक्टरबाईच बर्‍याचदा पालकांना त्या त्या मुलीच्या शालेय प्रगतीचा व वसतिगृहातील वर्तनाचा सारा वृत्तांत द्यायच्या. अनेक मुलींच्या प्रत्यक्ष पालकांऐवजी थोरला भाऊ/ बहीण/ मामा/ चुलता असे लोक पालक म्हणून भेटायचे. किंवा लोकल गार्डियनना ते काम असायचे.

शाळेचा रिझल्ट लागला की प्रगती-पुस्तक या मुलींना बहुतेक पोस्टानेच पाठविले जाई. आमच्या वर्गात एकमेव मुलगी होती वसतिगृहात राहणारी, आणि तीही माझ्या शेजारी बसणारी. त्यामुळे किमान एवढ्या गोष्टी तरी माहिती झाल्या.

छानच लिहिले आहे.
याबद्दल विचार केला नव्हता फारसा.
अजुन लिहिलेत तर वाचायला खुप आवडेल.

आर्च , नापासांची शाळेबद्दल प्लिज अजुन लिहा ना.

<<माझ्या मुलाच्या शाळेत मात्र मिंटिंग विद्यार्थी स्वतःच करतात>> हे ही छान आहे. कुठे?

मस्तच. काहीसा निराळाच विषय. खूप आवडलं. Happy
:आपण पालक म्हणून कुठल्या क्याटेगरीत मोडतो या विचारात पडलेली बाहुली:

अजून काही सविस्तर उदाहरणं वाचायला आवडली असती. आता पुढच्या सभेची वाट पहावी लागणार Wink

आपल्या निम्म्या वयाच्या बॉयफ़्रेंडला बरोबर घेउन येणारी आई, एका पालकभेटीला आई आणि नवे बाबा तर पुढच्या वेळी खरे बाबा, नव्या आईबरोबर अशी वाटणी झालेल्या तुटलेल्या, दुभंगलेल्या घरातील अनेक मुले माझ्या शाळेत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्याची संगती लावताना माझी वैयक्तिक नितीमूल्ये फ़ुटपट्टीसारखी वापरण्यात काही अर्थ नाही त्याने कोणतेच प्रश्न सुट्णार नाहीत याची परत एकदा जाणिव करुन देणारा हा दिवस. >>> बाप रे!

छान लिहिल आहेस आगाऊ.
आताच एक शिक्षक-पालक भेट उरकुन आले आहे तेंव्हा अनुभव ताजाच आहे अजुन. प्रत्येकवेळी पालकांच्याच नजरेतुन या मिटींगकडे पाहिलं, आता नाण्याची दुसरी बाजुही विचारात घेता येइल.

आगाऊ खुप चांगली माहिती. अजुन लिहिता आले तर लिहाल का?
नापासांची शाळा >> अजुन लिहा त्याबद्दल.
मुले मिटींग घेतात>> हेही छान , अजुन डिटेल्स लिहिणार का?

यांच्या पालकांना आपल्या पोराची लायकी पूर्ण माहिती असते आणि ते अवास्तव अपेक्षा करित नाहीत. हे लोक मुद्द्याचे बोलतात आणि पटकन निघतात, शिक्षकावर डोळस विश्वास हे यांचे मुख्य लक्षण.>>> पण अशाने त्या मुलांकडे दुर्लक्ष होत नाही का? सगळेच शिक्षक समजदार नसतात ना. काहिजण असेही म्हणुन शकतात की हे पालक जास्त किटकिट करत नाही तर चालु द्या. असे होते का?

Pages