पूर्वग्रह

Submitted by dr.sunil_ahirrao on 7 July, 2011 - 02:09

पूर्वग्रह
by डॉ.सुनील अहिरराव on Saturday, March 12, 2011 at 9:50am

एखाद्या व्यक्तीविषयी आपण एखादा समज वा गैरसमज करून 'घेतो' ,किंवा आपला तसा तो समज 'होतो' ;त्याला पूर्वग्रह म्हणतात.पूर्वग्रह होणे हे व्यक्ती,परिस्थिती ,आणि कालसापेक्ष असते.एखाद्या व्यक्तीविषयी झालेला पूर्वग्रह दूर होणे ही फारच 'दूरची' गोष्ट असते.
आकाशातील तमाम ग्रहांपेक्षा पूर्वग्रह अधिक भंडावतात.एखाद्या व्यक्तीबद्दल आपला पूर्वग्रह झालेला असेल आणि अशी व्यक्ती आपल्याशी आता कितीही चांगली वागत असेल तरी (आपण त्या व्यक्तीकडे पूर्वग्रहदुषित नजरेने बघत असल्याने ) त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकत नाही.आपण आपल्याही नकळत त्या व्यक्तीवर अन्याय करत असतो.फारच कमी प्रकारचे पूर्वग्रह या उभ्या आयुष्यात दूर होतात.कारण त्यांची महादशा बरीच वर्षे असते,एकवेळ 'साडेसाती' परवडते.

मुळात पूर्वग्रह घडतातच का? तर त्याला काही कारण असतेच ,असे नाही! घडतात ते. कधी अगदी योगायोगाने घडतात.त्याची शास्त्रशुध्द व्याख्या याप्रमाणे करता येईल-
" एखाद्या व्यक्तीकडून विशिष्ट परिस्थितीत कळत-नकळत झालेल्या वर्तनाचा दुसऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर दीर्घ कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी जो ठसा उमटतो,आणि जो त्या पहिल्या व्यक्तीच्या नंतरच्या बऱ्या-वाईट वर्तणुकीने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत अधिकच गडद होत जातो,आणि ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे पहिल्या व्यक्तीशी आचरण दीर्घ कालावधीसाठी वा कायमचे दुषित होते,त्यास पूर्वग्रह म्हणतात!"

गुलमोहर: 

Prejudice Meaning and Definition

1. (n.) An opinion or judgment formed without due examination; prejudgment; a leaning toward one side of a question from other considerations than those belonging to it; an unreasonable predilection for, or objection against, anything; especially, an opinion or leaning adverse to anything, without just grounds, or before sufficient knowledge.

पूर्वग्रह बाळगण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अनुभव यायची गरज नसते.
रादर एखाद्या गोष्टीचा अनुभव येण्यापूर्वी बनलेले मत म्हणजे पूर्वग्रह.

@भरत मयेकर,पूर्वग्रह बाळगण्यासाठी त्या त्या व्यक्तीशी किमान अप्रत्यक्ष संबंध आवश्यक असतो.मग तो वर्तनाचा असो,त्या व्यक्तीबद्दल ऐकीव माहिती असो,चित्रे असोत,चित्रपट असो ,वा वाचन असो!पूर्वग्रह होण्यासाठी हे आवश्यक घटक असतात.(केवळ) उदा. एम.एफ.हुसेन हे नाव उच्चारल्यावर कुणी त्याकडे एक महान कलाकार म्हणून पाहील.तर कुणी हिंदू देवतांची विटंबना करणारा चित्रकार म्हणून पाहील(सापेक्षता). याच ठिकाणी जर आपण 'क्ष' व्यक्तीचं नाव उच्चारलं तर कोणताच अर्थबोध होत नाही.फार फार तर हा कोण बुवा? अशी उत्सुकता निर्माण होऊ शकते.याला पूर्वग्रह म्हणता येणार नाही.म्हणूनच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनुभव मग तो कोणत्याही माध्यमातून असो,आवश्यक ठरतो.

प्रत्यक्ष अनुभव याचा परिणाम नक्कीच होतो पूर्वग्रह तयार होण्यामधे. पण किती अनुभव? एकाच प्रसंगातून, एकाच वाक्यातून, एकतर्फी मते ऐकून, अंदाज बांधणे, व्यक्तीबद्दल कायमची समजूत करून घेणे, याला पूर्वग्रह म्हणता येईल.

जरा जास्त ओळख झाली, इतर प्रसंगी त्यांचे वागणे, बोलणे पाहिले, त्यांच्याशी जास्त संबंध आले तर कदाचित् पूर्वग्रह बदलतील. नव्हे बदलतात असा अनुभव आहे.

उदा. हुसेनबद्दल माझा असाच तीव्र पूर्वग्रह झाला होता. आताहि मला त्यांची चित्रे आवडत नाहीत, पण त्यांच्याबद्दल एव्हढा तिरस्कार, ते मेले ते बरे झाले, असले अघोरी विचार आता येत नाहीत, कारण जास्त माहिती मिळाली.

जरा जास्त ओळख झाली, इतर प्रसंगी त्यांचे वागणे, बोलणे पाहिले, त्यांच्याशी जास्त संबंध आले तर कदाचित् पूर्वग्रह बदलतील. नव्हे बदलतात असा अनुभव आहे.

बरोबर आहे.सहमत आहे.

पण कधी कधी असेही घडू शकते: म्हणजे कोणतेही समज, गैरसमज ,पूर्वग्रह नसलेल्या लोकांमध्ये ओळखीनंतर,आचार,विचार,पाहिल्यावर नवीन (पूर्व) ग्रह निर्माण होऊ शकतात.वरकरणी मनुष्य जसा दिसतो तसा असत नाही.काही लोक अत्यंत दु:खी असतात.पण इतरांना ते जाणवू देत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरून लोकांना वाटते- खरोखर "काय सुखी प्राणी आहे हा! नाहीतर आपण.." किंवा एखादी परिचित व्यक्ती आपल्या भल्याचं काही सांगत असेल,तर आपल्याला वाटते: "यात याचा काही स्वार्थ तर नाही ना"?

विचार असे तेच ते मनात जमा होत राहतात आणि मग पूर्वग्रह बनून जातात.यात पूर्वग्रह करून घेणाऱ्यांच्या मनोविशेषाचा दोष असतो,असे मानण्यास हरकत नाही.कारण आपले मन एका विशिष्ट विचाराला धरून बसलं की सत्य अगदी डोळ्यांसमोर असलं तरी मनापर्यंत पोचत नाही.

जो पर्यन्त माणूस आहे तो पर्यन्त आपल्याला समाजात पु्र्वग्रहांना तोंड देत रहावे लागणार. आपल्या जिवनातला काही काळ इतरांचे पुर्वग्रह काढून टाकण्यात जातो, त्या निमित्ताने दुस-या माणसाची पारख होते, अनुभव मिळतो कधी कधी कटू अनुभव येतात कधी कधी फायदाही होतो. समाजात रहायचे म्हणजे हे सगळे आलेच. चालायचेच. कितीही माणूस शिकला तरी असले ग्रह जाणार नाहीत. त्या मुळे हिरमुसले न होता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे नाहीतर उगाचच मनाला हुरहूर लावून घेतली जाईल. असे मला वाटते. डॉ साहेब छान विषयाला हात घातला आहेत.

आपली मुद्देसूदता आवडली

आपल्या जिवनातला काही काळ इतरांचे पुर्वग्रह काढून टाकण्यात जातो!
फार महत्वाचे वाक्य बोललात !! अक्षरशः खरे आहे.प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हे म्हणजे इतर लोकांच्या(मनमानी) न्यायालयात आपण स्वतःच स्वतःवरचे आरोप घेऊन स्वतःचा खटला लढवून स्वतःची बाजू मांडून स्वतःचीच उलटतपासणी घेऊन स्वतःला सिध्द करण्यासारखे कठीण काम असते!

मला समजत नाही. माझे पूर्वग्रह आहेत का पश्चाद्ग्रह आहेत?

कारण मला लहानपणी पूर्वग्रह नव्हते. फक्त मुसलमान वाईट, असे वाटायचे! १०, १२ वर्षाचा असेपर्यंत. कारण इतक्या वर्षांपूर्वी पुण्यात, (तेहि सदाशिव पेठेत!) रहात असताना, फक्त मुसलमानांनी कसे अत्याचार केले हिंदूंवर एव्हढेच सगळीकडे ऐकू येई. ('बुडाला औरंग्या पापी!' 'मुसलमानांनी देवळे फोडली!')
सुदैवाने आजकाल तसे काही वाटत नाही. अतिरेकी मुसलमान असले तरी सगळेच मुसलमान तसे नाहीत हे माहित आहे, नि पटते.

पण आजकाल एव्हढ्या वर्षांनंतर माझे पूर्वग्रह (prejudice, bigotry) कमालीच्या बाहेर वाढले आहेत, नि ते माझ्या बोलण्यातून स्पष्ट दिसतात असे नवीन पिढीचे मत आहे. ते तसे व्हायचे कारण 'माझा अनुभवच तसा आहे' असे मी सांगतो, पण मनाशी विचार केला असता लक्षात येते, की ते अनुभव केवळ प्रासंगिक होते, त्यावरून सरसकट मत बनवणे हे बरोबर नाही.

तर ही जाण येइस्तवर आपण आपल्या पूर्वग्रहांचे समर्थन करत बसतो. फक्त अनुभवाने 'शहाणे होणे' याचा अर्थ काय?
इतर माणसे नेहेमी तुम्हाला हवे तसे वागणार नाहीत, तुम्हाला जसे अमुक म्हणणे, करणे हे समर्थनीय वाटते, तसेच त्यालाहि. शिवाय तुम्ही हिंदू देवता पूज्य मानता, मूर्ति करून त्यांची पूजा करता, कारण तुम्हाला तसे सांगितले होते लहानपणापासून. पण इतरांना त्याच्या विरुद्ध शिकवले असेल तर?
या गोष्टी समजणे महत्वाचे.तेंव्हा परिस्थिती काय होती, तुमची, त्याची, त्या प्रसंगात तुम्हाला वेगळे काय करता येईल, ज्यायोगे तुमचे नुकसान होणार नाही, तुम्हाला वाईट वाटणार नाही, याचा विचार केलात, तर अनुभवाने शहाणे.
पण त्यावरून एकूण समूहालाच नावे ठेवणे हे बरोबर नाही (समूह म्हणजे, राजकारणी, विशिष्ठ धर्माचे, जातीचे, देशातले, प्रांतातले, वयोगटातले लोक, स्त्री, पुरुष, इ.)

शहाणे होणे' याचा अर्थ काय?

कदाचित सर्व पूर्वग्रह टाकून देऊन नव्याने जीवनाचा अर्थ लावणे !

पण हे आपल्याला आख्या आयुष्यात जमते का? बहुधा नाहीच जमत! आपण ज्या परिस्थितीत,समाजात,संस्कारात,देशात,मित्रांत वाढलो,ज्या मनोवृत्तीत जगलो ते सारं बरोबर होतं की चूक? हे आपण आख्या आयुष्यात समजू शकत नाही.त्यातलं सारंच बरोबर किंवा चूक हे शेवटपर्यंत ठरवता येत नाही.एकंदरीत आयुष्याचा अर्थ लावण्याला पूर्ण आयुष्यही अपुरं पडावं,इतकं हे सारं तसा विचार केला तर गूढ गहन वाटू लागतं...

कदाचित ज्यांना जमलं ते मग कशाला या मायावी दुनियेत थांबत असतील? ते कदाचित स्वतःच्या निरंतर शोधासाठी योगी,संन्यासी बनून जात असावेत.

चांगली चर्चा आहे.
मयेकरांनी लिहिलेलेही मला काही अंशी पटते आहे. 'पूर्व'ग्रह असतील तर ते अनुभवानंतर एकतर दूर किंवा पक्के व्हायला हवेत.

सुनील,
आपले मन एका विशिष्ट विचाराला धरून बसलं की सत्य अगदी डोळ्यांसमोर असलं तरी मनापर्यंत पोचत नाही.
तुम्ही हे जे म्हणताय हा denial चा प्रकार आहे.

शेवटी पूर्वग्रहांना किती महत्त्व द्यायचं किंवा दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे का हे त्या व्यक्ती/समूह कोण आहेत. त्यांनी तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो यावर अवलंबून आहे. पडत नसेल तर मुळात असे ग्रह करुन घेण्याचीच आवश्यकता नाही. Happy

परिस्थितीत,समाजात,संस्कारात,देशात,मित्रांत वाढलो,ज्या मनोवृत्तीत जगलो ते सारं बरोबर होतं की चूक?
चूक नाही.
त्यातून तुम्ही काय शिकलात? त्यातच असे हि सांगितले नाही का की अतिराग, अतिलोभ या गोष्टी टाळाव्या. किती राग म्हणजे वाजवी नि किती राग म्हणजे अतिराग? हे कसे ओळखावे? किती अभिमान म्हणजे स्वाभिमान नि किती म्हणजे 'गर्व' हे कसे ओळखावे?
तर हे सगळे वैयक्तिक असते. मला जो अभिमान वाटतो तो कुणाला गर्व वाटेल. हे तर मला कळते, मग मी काय करावे?
काय प्रसंग आहे, कुणाशी प्रसंग आहे, आपल्याला अपेक्षा काय आहेत? आपण या प्रसंगी या व्यक्तीशी कसे वागले असता आपल्या अपेक्षा पूर्ण होतील? हे ज्ञान तुम्ही अनुभव, समाज, संस्कार, मित्र यातून शिकलात का? का ती व्यक्तीच वाईट आहे असे 'शिकलात'? (म्हणजे अजाणतेपणी पूर्वग्रहहि असेल).
मग एक तर त्यांच्याशी संबंध टाळा, नि शक्य नसेल तर तात्पुरते सहन करा, नि पुनः तसे करावे लागणार नाही याच्याबद्दल काही मार्ग शोधून काढा!
विचारशक्ति ही मनुष्याला मिळालेली मोठी शक्ति आहे. शस्त्रात्रे, शारीरिक बळ या गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत. बलाढ्य असे हिंदू राजे धुळीला मिळाले. हजाराहून जास्त वर्षे परकीय आक्रमण, बाटवा बाटवी, बुद्धिभेद, सगळे सहन करावे लागले. पण हिंदू तत्वज्ञान शिल्लक आहे, कारण ते विचार आहेत. आता रोजचे जीवन जगण्यासाठी त्यातून काय शिकायचे? तिथेच सगळे घोडे पेंड खाते, असो.

एकंदरीत आयुष्याचा अर्थ लावण्याला पूर्ण आयुष्यही अपुरं पडावं,इतकं हे सारं तसा विचार केला तर गूढ गहन वाटू लागतं...

अर्थातच! पण
'कदाचित ज्यांना जमलं ते मग कशाला या मायावी दुनियेत थांबत असतील? ते कदाचित स्वतःच्या निरंतर शोधासाठी योगी,संन्यासी बनून जात असावेत.'
हा फक्त एक मार्ग आहे. सगळेच तसेच करतात किंवा करावे असे नाही.
आता ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या हे पटूनहि या जगात, समाजात कसे रहायचे? इ-प्रसारण या साईटवर श्री वामनराव पै यांची अनेक प्रवचने आहेत. त्यातून मला समजले ते असे की ज्ञान मिळवणे, विचार करणे, नि त्याप्रमाणे योग्य कृति काय ती करणे अत्यंत महत्वाचे! तर पूर्वग्रह, इतर लोक, परिस्थिती इ. कसेहि काहीहि असोत. त्यापासून सुख, आनंद कसे मिळवायचे नि दुसर्‍याला द्यायचे? हा विचार मह्त्वाचा.

सध्या तरी माझे विचार असेच आहेत. आता यात गैर, चुकीचे असणारच. मला माहित असते तर मी चुकीचे कशाला लिहीले असते? तर ते काम दुसर्‍यांचे. पण सन्यास घेण्याइतकी माझी परिस्थिती वाईट नाहीये!! अजूनहि 'गर्व' आहे की मी यातून सुख, आनंद कसे मिळवायचे नि दुसर्‍याला द्यायचे हे करू शकीन. मग कशाला पळून जायचे?
असो. फार लांबण लावली.
या धाग्यामुळे हे सगळे लिहायची संधि मिळाली. त्याबद्दल डॉक्टर तुमचे नि मायबोलीचे आभार.

@लालू,प्रतिसादाबद्दल आभार.

तुम्ही हे जे म्हणताय हा denial चा प्रकार आहे.

असू शकतो.पण हा आहे ते स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा प्रकार किंवा सत्यापासून पळण्याचा प्रकार जाणिवपूर्वक होत नसावा,असे मला वाटते. कारण पूर्वग्रह/समज/गैरसमज इत्यादींचा इतका जबरदस्त पगडा त्याक्षणी मनावर असतो.की आपले मन आहे तो अर्थ घेण्याच्या बाबतीत अक्षम असतं.म्हणूनच शहानिशा न करता आपण लगेच एखादा निष्कर्ष काढून मोकळे होतो.

कदाचित मनाची अगतिकता,असहायता मेंदूला तसे करण्यास भाग पाडत असावी. कदाचित एखादे बरे किंवा वाईट मत/निष्कर्ष/ग्रह बनवून सुप्त मनाला मोकळे मोकळे वाटत असावे...

@झक्कीजी,
आपण खूप सुंदर,उत्स्फूर्त तरीही सुव्यवस्थितपणे लिहिलं आहे.विचारातील सकारात्मकता आवडली.आपण लिहिलेले अत्यंत योग्य आहे. मीच थोडे नकारात्मक लिहिले होते.इतरांना आपला उपद्रव न होऊ देता आपले आणि इतरांचे जीवन सुखी करता येते,हा संदेश फार महत्वाचा आहे.

(अगदीच पळून जाणे म्हणता येणार नाही,पण) जे सन्यासी असतात;तसे होणे आपल्याला जमणार नाही,हेही खरेच आहे.कारण जसे आपले जगण्याकडे पाहण्याचे कोन आहेत,तसेच त्यांचेही असणारच.त्यामुळे तो त्यांचा मार्ग त्यांच्यापुरता श्रेष्ठच आहे.
चर्चेत सहभागी होऊन चर्चेत रंगत आणल्याबद्दल धन्यवाद.

मला वाटतं पूर्वग्रहाच्या आधीच्या पायरीकडे पाहिलं तर 'पूर्वग्रह' समजणं सोपं जावं. समाजात वावरताना ज्यांच्याशीं आपला संबंध येण्याची शक्यता असते त्यांच्याबद्दल मनात एक ढोबळ कल्पना तयार होतच असते. ही कल्पना बव्हंशी त्या व्यक्तीच्या बाह्य वागणूकीवरून, त्याच्या/तिच्याबद्दलबद्दल जें ऐकायला येतं त्यावरूनच तयार होते. प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी संबंध येईल तेंव्हा सुरवातीला आपण काय भुमिका ठेवावी, यापुरती ही ढोबळ कल्पना उपयुक्त व आवश्यकही असावी. जसजसा त्या व्यक्तीशी अधिकाधीक संबंध येतो किंवा त्या व्यक्तीचं जवळून निरिक्षण करायला मिळतं , तसतशी ही ढोबळ कल्पना सोडून आपल्या अनुभवावरून वा निरिक्षणावरून त्या व्यक्तीचं खरं रूप समजून घेण्याची प्रक्रिया सुरूं होते. ही प्रक्रिया सुरूं न होणं किंवा पुढे ढकलत रहाणं - म्हणजेच, सुरवातीच्या ढोबळ कल्पनेलाच चिकटून रहाणं - हा अस्सल 'पूर्वग्रह' असावा.
"खरं रूप समजून घेण्याची प्रक्रिया" ही संकल्पना मात्र वाटते तेवढी सरळ सोपी नसावी कारण त्यात ज्याने समजून घ्यायचं व ज्याला समजून घ्यायचं त्या दोघांच्याही बौद्धीक पातळीचा, मानसिक घडणीचा, संस्कारांचा इत्यादी अनेक व्यक्तीनिष्ठ गोष्टींचा संबंध येतो. पण जितक्या प्रामाणिकपणे व खुलेपणाने दुसर्‍याला समजून घेण्याचा प्रयत्न असेल तितक्या प्रमाणात या व्य्क्तीनिष्ठ गोष्टींचा प्रभाव कमी होईल; पण तो अजिबात असणारच नाही, हें जरा असंभवच !
फारच क्लिष्ट झालं का माझं वरचं तथाकथित विश्लेषण ? मलाच तसं जाणवतंय !!

>> खरं रूप समजून घेण्याची प्रक्रिया" ही संकल्पना मात्र वाटते तेवढी सरळ सोपी नसावी कारण त्यात ज्याने समजून घ्यायचं व ज्याला समजून घ्यायचं त्या दोघांच्याही बौद्धीक पातळीचा, मानसिक घडणीचा, संस्कारांचा इत्यादी अनेक व्यक्तीनिष्ठ गोष्टींचा संबंध येतो.

हो. शिवाय ते दोघेही क्षणोक्षणी बदलत असतात. आत्ताच्या क्षणी दुसर्‍या व्यक्तीबद्दल पूर्णज्ञान होणे शक्य आहे असे गृहित धरले तरी पुढल्या क्षणी ती व्यक्ती थोडीशी निराळी झालेली असते. तेव्हा ते मघाचे पूर्णज्ञान हा आताचा पूर्वग्रहच! Happy

त्याच्या/तिच्याबद्दलबद्दल जें ऐकायला येतं त्यावरूनच तयार होते. प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी संबंध येईल तेंव्हा सुरवातीला आपण काय भुमिका ठेवावी, यापुरती ही ढोबळ कल्पना उपयुक्त व आवश्यकही असावी. जसजसा त्या व्यक्तीशी अधिकाधीक संबंध येतो किंवा त्या व्यक्तीचं जवळून निरिक्षण करायला मिळतं , तसतशी ही ढोबळ कल्पना सोडून आपल्या अनुभवावरून वा निरिक्षणावरून त्या व्यक्तीचं खरं रूप समजून घेण्याची प्रक्रिया सुरूं होते. ही प्रक्रिया सुरूं न होणं किंवा पुढे ढकलत रहाणं - म्हणजेच, सुरवातीच्या ढोबळ कल्पनेलाच चिकटून रहाणं - हा अस्सल 'पूर्वग्रह' असावा.>>>>>>>>>>>. १०० % अनुमोदन... अगदी सोप्या शब्दात मांडलत.

उदा. एखाद्या मा बो कर आय. डी. च्या निव्वळ काही प्रतिसादावरुन मत बनवणे आणि त्याला प्रत्यक्ष भॅटताना त्याच द्रूष्टीने बघणे (समजुन चालुया कि ती व्यक्ती तशी नाहिय), म्हण्जे पूर्वग्रह . Happy बर्याच जणांचे असे पूर्वग्रह नाहिसे झाले... बदलले.. असे कुठेतरी वाचनात आले होते.... Happy

<< हो. शिवाय ते दोघेही क्षणोक्षणी बदलत असतात. आत्ताच्या क्षणी दुसर्‍या व्यक्तीबद्दल पूर्णज्ञान होणे शक्य आहे असे गृहित धरले तरी पुढल्या क्षणी ती व्यक्ती थोडीशी निराळी झालेली असते. तेव्हा ते मघाचे पूर्णज्ञान हा आताचा पूर्वग्रहच! >> करेक्ट ! समजून घेण्याच्या प्रक्रियेनंतर प्रत्येकाचं एखाद्याबद्दलचं मत भिन्न होऊं शकतं, बदलूंही शकतं; पण तें त्याचं "मत" असेल, पूर्वग्रह नव्हे, हें महत्वाचं.

"बांडुंग शहरात जायला मे अजिबात उत्सुक नव्हतो. काही मुळाक्षरे एकत्र आली की मन कलुषित करतात. बांडुंग म्हटल्यावर देखणे असे कही डोळ्यांपुढे उभेच राहु शकत नाही. कुमारी दगडी शिदोबा बेडकीहळ्ळीकर असे नाव धारण करणारी तरुणी सुंदर असू शकेल असे नुसते नाव वाचून ज्याला वाटेल तो भवसागर तरून गेलेलाच सत्पुरुष असला पाहिजे. बांडुंग या केवळ नावामुळे बांडुंग परिषद यशस्वी होणे शक्य नाही असे मला ठामपणे वाटत होते" - पु. ल. देशपांडे- पूर्वरंग.
यापेक्षा चांगले पूर्वग्रहाचे उदहरण मिळायचे नाही.

खुल्या मनाने कोणत्याही नव्या विषयाकडे पाहायला शिकणे हा पूर्वग्रह सोडायचा मार्ग.

<< यापेक्षा चांगले पूर्वग्रहाचे उदहरण मिळायचे नाही. >> याच्या उलट, विचारपूर्वक बनवलेल्या एखाद्याबद्दलचं चांगलं मत त्याच्या आपल्या विरुद्धच्या एखाद्या आत्यंतिक कृतिनेही बदलत नाही, याचं हें बोलकं उदाहरण -
ज्याच्याबद्दल सिझरला आत्यंतिक आदर असतो त्याच ब्रूटसला आपल्याला मारायला आलेल्यात पाहून मरतानाही सिझर म्हणूनच म्हणतो " ब्रूटस, तू पण ! मग सिझरनं मरणंच योग्य !!"; सिझरची हत्त्या करणार्‍या कटकर्‍याना अद्दल घडवायला निघालेला अँटनीसुद्धा ब्रूटसच्या मृतदेहाला मानवंदना देऊन म्हणूनच म्हणतो " हा एक खरा माणूस होता ! " .

,@झक्की,भाऊ,लालू ,भरत, स्वाती,निवांत,रणजित, मला वाटते पूर्वग्रहाची प्रक्रिया खालील टप्प्यांतून जात असावी.

डॉक्टरसाहेब, तीव्र कुतूहल असूनही तुमची वरील पोस्ट मला कां वाचतां येत नाहिय ? दोष माझ्या संगणकाचा कीं आपल्या ? कीं इतर कुठला ?

मित्रहो,तीन तास परिश्रम घेऊन खूप काही लिहिलं होतं,पण त्यात एका ठिकाणी एक शब्द दोनदा आल्याने मी माझी पोस्ट मोबाईलवरून एडीट करण्याचा प्रयत्न केला.आणि सारी मराठी अक्षरे जाऊन ही विचित्र लिपी उमटली.थोडक्यात काय,की ल्यापटॉपवरून लिहिलेल्या पोस्ट्स मोबाईलवर एडीट केल्यास वरीलप्रमाणे अक्षरे उमटतात असे माझे 'मत' बनले आहे.आपल्या सर्वांच्या प्रतीसादांतील आशय लक्षात घेऊन आता मी या संदर्भात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझे सारेच बरोबर असेल ,असे मला म्हणावयाचे नाही.कृपया आपण आणखी एखाद्या मुद्द्याविषयी काही सांगावयाचे असल्यास जरूर मोकळेपणाने लिहावे आणि मार्गदर्शन करावे.

*येथिल पोस्ट खाली देत आहे.तसदीबद्दल क्षमस्व!

डॉ. सुनिल अहीर राव आणि भाऊ नमसकर, आणि अन्य मित्रहो,

वरील धागाच्या निमित्ताने एका मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून दुखऱ्या मानवी मनाची बाजू सादर केलेल्या बद्दल सुनिलजींचे धन्यवाद. त्यावर भाऊंनी केलेले पुर्वग्रहाचे वर्णन मला भावले.

ते म्हणतात, 'समाजात वावरताना ज्यांच्याशीं आपला संबंध येण्याची शक्यता असते त्यांच्याबद्दल मनात एक ढोबळ कल्पना तयार होतच असते. ही कल्पना बव्हंशी त्या व्यक्तीच्या बाह्य वागणूकीवरून, त्याच्या/तिच्याबद्दलबद्दल जें ऐकायला येतं त्यावरूनच तयार होते. प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी संबंध येईल तेंव्हा सुरवातीला आपण काय भुमिका ठेवावी, यापुरती ही ढोबळ कल्पना उपयुक्त व आवश्यकही असावी. जसजसा त्या व्यक्तीशी अधिकाधीक संबंध येतो किंवा त्या व्यक्तीचं जवळून निरिक्षण करायला मिळतं, तसतशी ही ढोबळ कल्पना सोडून आपल्या अनुभवावरून वा निरिक्षणावरून त्या व्यक्तीचं खरं रूप समजून घेण्याची प्रक्रिया सुरूं होते. ही प्रक्रिया सुरू न होणं किंवा पुढे ढकलत रहाणं - म्हणजेच, सुरवातीच्या ढोबळ कल्पनेलाच चिकटून रहाणं - हा अस्सल 'पूर्वग्रह' असावा."

-ढोबळ कल्पनेच्या पुढे जाऊन डोळे उघडून अनुभव व निरीक्षण करून व्यक्तीचे वा गोष्टीचे खरे स्वरून शोधून मग आपले मत ठरवणे म्हणजे पुर्व ग्रहाची झापडे दूर करणे.
मला आजवर अनेकदा असे अनुभव आले की त्यात प्रत्यक्ष अनुभव वा अभ्यास न करता वा तसे करायचे फक्त तोंड देखले आश्वासन देऊन पुन्हा सुरवातीच्या कल्पनेला कवटाळून असेल त्याला अस्सल पुर्वग्रहधारी अंध म्हणावे लागेल. नाही का?

आपला (पूर्वग्रह) एका सामान्यीकरणाच्या (जनरलायजेशन) प्रक्रियेचा परिणाम आहे.म्हणजे कसे--तो दाक्षिणात्य आहे म्हणजे तो गोळे करत भात खाणार्,तो उत्तरेतला आहे म्हणजे फार रफ असणार्--बरं याची सुरुवात कुठून होते,--मर्यादित ऐकण्यातून अथवा एखाद्या निरिक्षणातून्--दोन अथवा तीन उदाहरणावर अवलंबून अथवा दुसरे कुठले पूर्वदूषीत वाचून किंवा चर्चा करून आपण आपले मत त्या व्यक्तिबद्दल अथवा समूहाबद्दल करून घेतो.सरकारी माणूस म्हणजे कामचोर्,डॉक्टर म्हणजे हल्ली नुसते पैशाच्या मागे लागलेले इ. पण हा पूर्वग्रह दूरही होवू शकतो .जसे- मी कानपूरच्या वीज नियंत्रण ऑफिसात वाढीव वीजेचा अर्ज दाखल करताना लाच द्यावीच लागेल या पूर्वग्रहाने गेलो.कारण्-यू पी वर राज्य वीज बोर्ड - पण १५ मिनिटात एकही पैसा न देता त्यांच्याच कडून त्यांच्या कँटीन मध्ये सन्मानाने व आदर्तिथ्याने जेवून आलो.काम एवढे निर्विघ्न झाले.
डोळस पणे व विवेक पूर्ण जाग्रुत ठेवून जर स्वतः अनुभव घेतल-व तो पर्यंत मन पूर्णतः उघडे ठेवले तर या प्राण्याला शिरकाव नाही.मनाची किवाडे-उघडी-पूर्वग्रह नाही.ती बंद की हा प्राणी प्रवेश करतो-असे हे उफराटे समीकरण आहे.
स्वतः अनुभवल्याशिवाय मत बनवायचे नाही असे ठरवले की मार्ग सुकर होतो

@shashikant oak aani revhyu, pratisadabaddal dhanyvad. mi busy asalyamule post purn karu shakalo nahi, pan udyaparyant tee purn hoil ase watate. kadachit aapanala purvgrahachya prakriyetun kahi nishkarsh nakkich kadhta yetil.

आपल्या सर्वांच्या प्रतीसादांतील आशय लक्षात घेऊन आता मी या संदर्भात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझे सारेच बरोबर असेल ,असे मला म्हणावयाचे नाही.कृपया आपण आणखी एखाद्या मुद्द्याविषयी काही सांगावयाचे असल्यास जरूर मोकळेपणाने लिहावे आणि मार्गदर्शन करावे.

पूर्वग्रह ह्या संकल्पनेचे ४ टप्पे पडतात.
१)इंद्रियविषयसंयोग : म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रिये आणि मन यांच्याशी पूर्वग्रह-विषयवस्तूचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध येणे.
यात हे आवश्यक नाही की पूर्वग्रह केवळ हाडामांसाच्या व्यक्तींबद्दलच असतात. त्यात अनेक निर्जीव वस्तू,ठिकाणे यंत्रे,इत्यादी गोष्टी/पदार्थ यात येतात.
उदा. कुणी म्हणतात'मला माझी गाडी लकी आहे'
नैसर्गिक आपत्ती: भूतकाळातील अनुभवावरून वर्तमानात/भविष्यात घडू शकणाऱ्या गोष्टींविषयी पूर्वग्रह असतात. इतकेच नव्हे तर अस्तित्वात नसलेल्या गोष्टींविषयी सुध्दा पूर्वग्रह असतात. उदा. भूत,पिशाच्चे आदी अंधश्रद्धा.

२)तात्पुरता मानसिक परिणाम: अशा विषयवस्तूशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आल्यास मनावर एक तात्पुरता परिणाम होतो,उत्सुकता निर्माण होते किंवा एक 'मत' बनते (वरील न दिसणारी पोस्ट पाहून आपले जसे जे काय झाले असेल तसे)

३)संबंधाचे सातत्य: माझ्या मते आपले पूर्वग्रह 'मतापासून' पूर्वग्रहात किंवा पूर्वग्रहातून पूर्वग्रह "नाहीसा" करण्यात हा घटक फार महत्वाचा असतो.एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सतत संबंध(प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष ) येणे!
हा घटक तात्पुरते मत बदलून भावी काळातील पूर्वग्रह रोखू शकतो आणि हाच घटक पूर्वी नसलेले पूर्वग्रह नंतर निर्माणही करू शकतो.

माझी साहित्यिक दैवते जी कोणी आहेत, त्यांच्याव्यतिरिक्त इतर कवी/लेखक मंडळी अत्यंत टुकार लिहितात असे माझे मत होते. याशिवाय काव्यस्पर्धा/काव्यसंमेलने इथे निव्वळ ओळखीच्या आणि वशिल्याच्या लोकांना चान्स आणि बक्षीसे वाटली जातात असाही माझा समज होता.पण हे समज आता काळाच्या ओघात नाहीसे झाले आहेत.

४) पूर्वग्रह: वरील तीन टप्पे(संबंध,तात्पुरता परिणाम,त्यातील सातत्य) ओलांडून आल्यावर जो समज दीर्घ कालावधीसाठी/कायमस्वरूपी टिकतो,त्याला पूर्वग्रह म्हणतात.ही रीव्हरसीबल प्रक्रिया असली तरी ती नक्कीच किचकट असते. पूर्वग्रह घालविण्यासाठी व्यक्तीविषयाशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंधातील "सातत्य"हा घटक त्या त्या व्यक्तीची पूर्ण ओळख होण्यास आवश्यक असतो.अन्यथा पूर्वग्रह कायम तसेच राहतात.

निष्कर्ष:
१)पूर्वग्रह होण्यातील ४ टप्पे आहेत- संबंध,तात्पुरता मानसिक परिणाम/मत/उत्सुकता,सातत्य आणि पूर्वग्रह.
२)"सातत्य" या घटकामुळे मतपरिवर्तन होऊन पूर्वग्रह टळू शकतात.किंवा मते आणखी पक्की होऊन पूर्वग्रहात रुपांतरीत होतात.त्यामुळे सातत्य हा टप्पा या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा आहे.
पूर्वग्रह हे निर्जीव वस्तूंविषयी सुध्दा होतात.
३)पूर्वग्रह हे परिवर्तनीय असतात.मात्र हे परिवर्तन होणे/न होणे हे व्यक्ती,परिस्थिती,काल सापेक्ष असतात.
४)एका अनुभवावरून इतर व्यक्तींच्या बाबतीत पूर्वग्रह करून घेणे चुकीचे असते(कारण:सापेक्षता).इतर ठिकाणी तुम्हाला वेगळा अनुभव येऊ शकतो.त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा हा प्रकार पूर्वग्रहांना लागू होत नाही.

धन्यवाद.

डॉ. सुनिल अहीर रावजी,
नाडीग्रंथांची आपल्याला ओळख असावी असे समजून हे लिखाण करत आहे
आपला निश्कर्ष ४ एका अनुभवावरून इतर व्यक्तींच्या बाबतीत पूर्वग्रह करून घेणे चुकीचे असते..(कारण:सापेक्षता).इतर ठिकाणी तुम्हाला वेगळा अनुभव येऊ शकतो.त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा हा .प्रकार पूर्वग्रहांना लागू होत नाही.
अतीशय योग्य निश्कर्ष.
माझ्यावर अनेकदा पूर्वग्रह करून देण्याचा आरोप नाडी ग्रंथांच्या सत्यतेवरून केला जातो. कारण मी इतरांना नाडीग्रथांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा व बोला असे सुचवतो. कारण माझ्या एकाच्या अनुभवाने मी म्हणतो म्हणून ते माना असे म्हणणे चुकीचे आहे.कारण शितावरून भाताची परीक्षा असे सिद्ध होत नाही असे माझे म्हणणे नेहमी असते.

पूर्वग्रह हे परिवर्तनीय असतात.मात्र हे परिवर्तन होणे/न होणे हे व्यक्ती,परिस्थिती,काल सापेक्ष असतात..

याबाबतचा माझा अनुभव तेच सांगतो कि नाडीग्रंथांचे सत्य काय हे जाणून घ्यायचे असेल तर विरोधकांनी आपले आधी पासून पाळलेले पुर्वग्रह बाजूला सारायला हवेत. पण तसे होताना दिसत नाही. रेकॉर्डची सुई तेथल्या तेथे अडकल्याप्रमाणे विरोधकांना अनुभवाच्या नादाला न लागणे पसंत करून आपली मते दामटवण्याचा प्रयत्न करावा लागतो. असो.

Pages