सौरकुंडी खिंड(शेवट)

Submitted by मंजूताई on 3 July, 2011 - 08:01

227819_214081491946840_100000349725125_730373_1404143_n[1]_0.jpg230115_167852076608386_100001507841768_398767_366476_n[1].jpg230828_10150185502754539_632934538_6783233_7136735_n.jpg227819_214081491946840_100000349725125_730373_1404143_n[1].jpg
६ मे - (लुंगा) आज लवकर सकाळी साडेसातलाच निघायचं होतं. कसाबसा नाश्ता केला. रस्त्यातला जेवणाचा डबा (एक मठरी, एक तुकडा चिक्की व एक फ्रुटी) बघून 'इससे मेरा क्या होगा? ' असे वाटले पण तेवढही पूर्ण खाऊ शकलो नाही. आज आमच्याबरोबर दोन वाटाडे होते. हिरव्या - हिरव्या कुरणावरून चालत निघालो. काल बर्फाच्या घसरगुंडीवरून मजेत भरपूर सराव केला होता. आता घसरगुंड्या कधी येतात वाट पाहू लागलो. दोनेक किमी चढून जात नाही तो समोर विस्तीर्ण बर्फाचे डोंगर. सुरुवातीला चढण खूप नव्हते पण जसजसे पुढे गेलो तसतशी उंची वाढत जात होती. आज जवळपास तेराहजार फुट उंच चढायचे होते. नऊ दिशेला बर्फच बर्फ होता. हिमवृष्टीमुळे दशदिशा बर्फमय झाल्या! आता चढणं कठीण जाऊ लागलं. बर्फात पाय रुतू लागले. बर्फात कितीदा फतकल मारली देव जाणे. बर्फावरून पटकन उठताही यायचे नाही. मागे-पुढे असणारा कोणीतरी मदतीचा हात देऊन पुढे चालू लागायचा. प्रत्येकजण आपापल्या शारिरीक ताकदीनुसार चालायचा. दोन्ही वाटाडे
गटनेता लाडे सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत होते. 'काकी आधी टाच टेकवा, म्हणजे चालायला सोपं जातं', हर्षदची प्रेमळ सूचना, 'काकू, छोटी - छोटी पावलं टाका, व्हेरी गुड काकू' अशी आशयची शाबासकी, 'मी गड्डा केलाय त्याच्यावरुनच चाला काकू' अशी केतनने करून दिलेली वाट, एका अवघड वळणावर 'फक्त दोरीची पकड सोडू नका, सावकाश जा', असा निनादचा सावधगिरीचा इशारा ह्या सगळ्यांच्या मदतीने मी हा ट्रेक करू शकले. मदत करण्यात गुज्जुगटही मागे नव्हता. आता ते जरा खुलू लागले होते. उंच डोंगररांगांवर 'दऱ्या' मिटून जातात, आपापसातल्या. जात-पात, गरीब-श्रीमंत, मराठी - गुजराती - कानडी भेदभाव उरतच नाही. टपरीवर पंचवीस रुपयाची कॉफी मिळायची. पाच रुपयाचा कट पिणाऱ्या गटाला ही किंमत पाचपट होती तर बॅरिस्ता-सीसीडीत पिणाऱ्याकरिता एकपंचमांश एवढी तफावत असली तरी तुम्ही असता एकाच संप्रदयातले तो म्हणजे 'ट्रेककरी संप्रदाय'.
एका छोट्याश्या टापूवर फक्त पाच मिनिट जेवण/विश्रांतीसाठी थांबलो. आता पुढे कंटाळा येईल इतक्या बर्फावरच्या घसरगुंड्याच घसरगुंड्याच होत्या. किती अंतर पार केलं किती उरलं कळत नव्हतं. चालतोय, घसरतोय चालतोय असे मार्गक्रमण चालू होते. बर्फाचे डोंगर पार झाले. अखेर बाजीप्रभुप्रमाणे आम्ही पण खिंड लढवली - सौरकुंडी खिंड, निसर्गाशी झुंजत. निसर्ग आपला मित्र खरा पण कधी पाठ फिरवेल सांगता येत नाही. एका प्रसिद्ध महानगिर्यारोहक म्हणतो, 'you do not conquer mountain but conquer yourself'. पण अजून बराच पल्ला गाठायचा होता तोही चिखलमय निसरड्या डोंगरावरून. मी पाय घसरून आपटण्यापेक्षा घसरगुंडीचा पर्याय निवडला. जेवढ्या बर्फावरच्या घासरगुंड्या केल्या तेवढ्या चिखल्यावरच्या. बर्फ व चिखलावरून घसरून बुड बधीर झालं होतं. अंगात प्रचंड थंडी भरली होती. कॅंप एका डोंगर उतारावर बर्फ साफ करून लावलेला होता. पोचल्याबरोबर आधी चुलीजवळबसून शेक घेतला व गरमा - गरम दोन - तीन कप चहा प्यायल्यावर बरं वाटलं. एक अंगदुखीवरची गोळी घेऊन जे झोपले ते दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले.

७ मे - (लेखनी) सकाळ उजाडली ते प्रचंड पायदुखीने. आदल्यादिवशी रात्रीपण न जेवल्यामुळे भूक लागली होती. चहा बिस्कीट खाल्ल्यावर तरतरी आली. आज नऊ वाजता कॅंप सोडायचा होता आणि चिखलाने माखलेले कपडे आवरणं एक मोठ्ठ काम होतं. आदल्या दिवशी कॅंप पोचल्यावर कोणी एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रत्येकाजवळ सांगण्यासारखे अनेक किस्से (धडपडण्याचे)होते. गप्पांना व हसण्या खिदळण्याला ऊत आला होता न कॅंप व ग्रुप लीडर आवरायची घाई करत होते. नाश्ता व डबे भरून दहा वाजता उतरायला सुरुवात केली. आज सगळ्यांचीच गती मंदावली होती . उतार खोल होता. एकच वाटाड्या होता. आम्हाला एक स्थानिक सोबत करत होता. त्याने मला उतरायला निरपेक्षभावनेने केलेली मदत आजन्म माझ्या स्मरणात राहिल. काही अंतरानंतर उतार कमी झाल्यावर, मी आता स्वतंत्र उतरू शकेन, हे बघून तो मॅगीचे पाकीट आणायला खालच्या गावात गेला. आम्ही जेवणाच्या थांब्यावर पोचेपर्यंत तो व त्याचा मित्र व अंडी व मॅगी आले. आजूबाजुच्या काटक्या गोळा करून आणल्या, तीन दगड लावले न हॉटेल थाटलं. हर्षद, हर्षा व आशाने चुलीवरच्या स्वयंपाकाची हौस भागवून घेतली. आज प्रत्येकाने गरमा-गरम ऑम्लेट/मॅगीवर ताव मारला. एरवी अश्या टपरीवरचे कायम गिऱ्हाईक होते बेंगलोरचा 'संजय ग्रुप'. संजय, बायको आशा, मुलगी रिया उर्फ मोगली, भाई आशिष व त्याची अतिशय गोड, नाजुक होऊ घातलेली गोल्फ खेळाडू पत्नी शिवानी. संजय एक अवलिया. एक उद्योगपती. कार रेसिंग शौकीन. सुसंस्कृत, उत्साही बडबड्या, चेष्टेखोर, सगळ्यांत मिळून-मिसळून राहणारा.... अखंड खळाळता चैतन्याचा झरा! आज कुणालाही विचारलं, वजा 'संजय'? तर प्रत्येकाचं उत्तर असेल.. ... ओह नो, हॉउ बोअरींग!

आजचा मुक्काम सगळ्यात उत्तम जागी मोहोरलेल्या सफरचंदाच्या बागेमध्ये होता. महिलांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना

अन्याय सहन करावा लागला, तंबूत राहावं लागलं. पुरुषांना मात्र छान टुमदार लाकडी बंगली होती. उद्या संगत-सोबत संपणार होती. आजचा कॅंप फायर जरा जास्तच रंगला गुज्जुकंपुच्या सक्रीय सहभागामुळे. गुज्जुकंपूने मोदींच गुजरात खास करून कच्छ बघण्याचं आमंत्रण दिलं. मोदींनी भूकंपानंतरचं कच्छचं रुपंच पालटून टाकलंय. तुमच्या महाराष्ट्रात सहा-सहा तास वीजकपात असते आमच्या इथे सहा मिनिटपण वीज गायब होत नाही. रस्ते, वीज, पाणी ह्या मूलभूत गरजा खूपच चांगल्या आहे. भविष्यात मोदी पंतप्रधान नक्की होतील पण त्यांनी गुजरात सोडून जाऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा होती. हे सगळं ऐकून व त्यांचं गुजरात व मोदीप्रेम बघून, गुजरातला एकदा नक्की भेट द्यायची, ठरवून टाकलं.

८ मे - आज जरा सगळे सुस्तावले होते. निघायची धावपळ नव्हती. जेवणाच्या वेळेपर्यंत बबेलीला पोचायचे होते. आरामात थोडेसे अंतर पायी व सव्वीस किमी बसने प्रवास करायचा होता. आज नाश्ताही खास होता-नुडल्स. आज जरा जास्तच जोषात 'येनगुडगुडे नाडगुडगुडे, ढीशक्याँव ढीशक्याँव' नारा दिल्या गेला. वारकऱ्याला वारी संपत नाही तो दुसऱ्या वारीचे वेध लागतात तीच अवस्था ट्रेककरीची असते. पुढच्या ट्रेकचे मनसुबे रचतच परतीची वाट धरली

Group content visibility: 
Public - accessible to all site users