पुणं तिथं सगळंच उणं!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 08:49

मी जेव्हा जेव्हा पुण्याला जाते तेव्हा तेव्हा मला रीक्षाचा वापर करावाच लागतो. कारण पुण्यात हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली किंवा मुंबई सारखी लोकल ट्रान्सपोर्ट सेवा नाही. आता पुणे स्टेशन ते आमचं घर हे अंतर गेली अनेक वर्षे किलोमीटर मध्ये एकसारखंच आहे. किंबहुना आता मार्केट यार्ड कडून पुणे स्टेशनकडे रस्ता अतिक्रमणं हटवून मोकळा आणि मोठा केल्याने लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत पाच मिनीटांनी कमी झाला आहे. पण दरवेळी रीक्षाच्या मीटर मध्ये याच किलोमीटरचं प्रमाण नेहमी वाढतं असतं. रेल्वे स्टेशनमधुन बाहेर आलेला प्रत्येक माणूस हा पुण्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवतो आहे अशाच थाटात पुण्यातील रीक्षावाले वागत असतात. एकतर पहिल्यांदा मीटरप्रमाणे जायला कोणी तयार नसतं. डायरेक्ट ९० रूपये मागून मोकळे होतात. मीटरप्रमाणे (अगदी भाडेवाढ गृहीत धरली तरी) ३६ रूपयाच्या वर भाडं होत नाही. मग एखादा मीटरप्रमाणे जायला तयार झालाच तर माझ्या बरोबर अश्वमित्रला (गोर्‍या फॉरीनरला) बघुन आम्ही रीक्षात बसतानाच मीटरचा कान चार-पाच वेळा पिळून मीटर फास्ट करून ठेवतात. मला अजुनही हे मीटरचा कान पीळण्यामागचं गौडबंगाल समजलेलं नाहीये. मी तर सरळ एकदा रीक्षावाल्यांना म्हणाले की आहो तुमचा मीटर फास्ट आहे. रीक्षाच्या भाड्यांमध्ये जरी वाध होत असली तरी आमच्या घरापासूनचं स्टेशनचं अंतर गेली अनेक वर्षे बदलेलं नाहीये. त्यामुळे मीटर मध्ये येणारे किलोमीटर रीडींग तर सारखंच असायला हवं. तरी त्या रीक्षावाल्याने मान्य केलं नाही. मग एकदा मी एका रीक्षावाल्याला पोलीस चौकी जवळ आल्यावर म्हंटलं, "चला आपण रीक्षा पोलीस चौकीत नेऊयात. तुमच्या रीक्षाचा मीटर फास्ट आहे." झालं रीक्षावाला एकदम नरमाईत, "कशाला ताई? तुमच्या हिशोबाने किती होतात ते सांगा. मग माझ्या मीटरप्रमाणे कीती होतात ते बघु आणि मग ठरवू किती पैसे घ्यायचे ते." आता इतरांना प्रश्न पडला असेल की जर रीक्षाच्या अशा भानगडी आहेत हे माहीती आहे तर रीक्षाने जायचं कशाला? पण पुण्यात पीएमपीच्या बसेसची सेवा भयंकर या कॅटेगरीत मोडणारी आहे. बस अतिशय जुन्या, अस्वच्छ, प्रवाशांना बसायलाच जेमतेम जागा तर त्यात परगावहून आलेल्या लोकांना सामान ठेवायला स्वतंत्र अशी जागेची सोय नाही, बसची असलेली कमी संख्या, कमी वारंवारीता त्यामुळे प्रत्येक रूटवर प्रचंड गर्दी. यासगळ्यातच लांबचा प्रवास करून आलेल्या व्यक्तींना कधी एकदा पटकन घरी पोहोचतोय असं होतं म्हणून सद्य स्थितीत बस घेणं शक्यच नाहीये.

पुण्यात एकूणच शासनकर्ते, पीएमपीएम वाले आणि रीक्षावाले यांची इतकी छान भट्टी जमली आहे. शासनाने दर पंधरा दिवसांनी पेट्रोल दरात आडीच ते तीन रूपयांनी वाढ करायची. त्यामुळे सगळेच भाव गगनाला भिडतात. कारण पेट्रोल-डिझेल शिवाय साधा भाजीपाला सुद्धा वाहून आणला जात नाही. मग याच महागाईच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ झाली की पुण्यातील रीक्षावाले बेसीक फेअर वाढवण्याची मागणी करतात. बरं या रीक्षावाल्यांमध्ये प्रामाणिकपणा फारच कमी आढळतो. भाडेवाढ करतानाच इलेक्ट्रॉनीक मीटर बसवण्याची सक्ती केली आहे पण इलेक्ट्रॉनीक मीटर या लोकांना बसवायचा नसतो. पुणे स्टेशनला एशीयाड बस स्टॅंड्च्या बाहेर प्रीपेड रीक्षाचा एकच काऊंटर आहे आणि बहुतांशवेळा तो बंदच असतो. ९०% रीक्षावाले भाडे दर्शवणारं कार्ड दाखवत नाहीत. मनाला येईल ती रक्कम झालेलं भाडं म्हणून सांगतात. मग आपण कार्ड बघायला मागीतलं की ४-५ रूपयाचा फरक दिसतोच. एकदा तर पुण्यात रीक्षाचं बेसीक भाडं वाढून पुन्हा कमी झालं होतं. तर हे रीक्षावाले स्वत:च्या सोयीप्रमाणे आधीचं भाडेवाढ असलेलं कार्ड दाखवून पैसे घ्यायचे. नेहमी पुण्यात रीक्षाने प्रवास करणार्‍याला हा फरक समजू शकतो पण दर काही महिन्यांनी येणार्‍याला हा फरक समजत नाही. पुण्यातील ९०% रीक्षाचालक प्रचंड उद्धट आहेत. खरंतर रीक्षा चालवण्यासाठी म्हणून तुम्ही रस्त्यावर आणलीत की कितीही अंतरा पर्यंतचं भाडं असू देत (जवळ किंवा लांब) रीक्षावाल्यांनी प्रवाशाला नाही म्हणायचं नाही असा कायदाच आहे. पुण्यातील रीक्षावाले हमखास हा नियम धाब्यावर बसवतात. संपूर्ण देशात पुण्यातील पेट्रोलचे दर हे सर्वात जास्त आहेत.

पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असण्यालागचं कारणही हेच आहे. ज्यांच्याकडे चारचाकी आहे अशांना प्रत्येक ठीकाणी चारचाकी घेऊन जाणं शक्य नसतं. पुण्यातील रस्ते हे पादचार्‍यांना आजीबात अनुकुल नाहीत. पदपथांवर एकतर पथारी पसरून विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेलं असतं नाहीतर दुचाकीस्वार दुचाकी चालवताना आढळतात. पुण्यात म्हणे दोन वर्षांपूर्वी कुठलेतरी गेम्स झाले त्यावेळी प्रचंड खर्च करून पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. बीआरटी प्रकरण तर औरच आहे. बीआरटी असलेल्या कोणत्याही रस्त्यावर आपण गेलो तर प्रचंड विनोदी चित्र पहायला मिळतं. सायकल ट्रॅक मध्ये चारचाकी गाड्यांनी पार्कींग केलेलं असतं. सायकल्स्वार स्वत:ची सायकल आणि जीव दोन्ही सांभाळत दुचाकी आणि चारचाकी यांच्या ताफ्यातून वाट काढत असतात. दुचाकीस्वार पदपथांवरून दुचाकी चालवत असतात. बीआरटी मार्गावरून केवळ पीएमपी आणि बीआरटीच्याच बस न धावता इतर वाहने सुद्धा धावत असतात. यासगळ्या वाहत्या रस्त्यांवर रस्ता क्रॉसकरणे म्हणजे एक मोठं दिव्यच आहे.

म्हणजे एकूणच पुण्याच्या सर्व पायाभूत सुविधांचा शक्यतेवढा बट्याबोळ करून ठेवून "पुणं तिथं काय उणं" च्या ऐवजी "पुणं तिथं सगळंच उणं" अशी उक्ती प्रचलीत करण्याचा प्रघात चालू झाला आहे.

पुण्याची अशी स्थिती का आहे याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की पुण्यात अतिशय अयोग्य आणि कमकुवत राजकीय प्रतिनीधी आहेत. अयोग्य याअर्थी की ते पुण्याच्या विकासाचा, पुण्यातील नागरीकांचा विचार करत नाहीत आणि कमकुवत याअर्थी की भ्रष्ट राजकारण्यांना खाली खेचण्याची ताकद अस्लेल्या नेतृत्त्वाचा सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभाव. पुण्यात कॉंग्रेस सोडलं तर इतर राजकीय पक्षांमध्ये नेतृत्त्वाचा अभाव आहे. कॉंग्रेसचे नेतृत्त्व म्हणजे गेली बरीच वर्षे निवडुन येणारे भ्रष्ट खासदार आणि राष्ट्रकुल सकट क्रिडा क्षेत्रातील इतर घोटाळ्यांचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी. इतका भ्रष्टाचार करूनही ही व्यक्ती पुण्यातून निवडुन येण्यामागे पुण्यातील निष्क्रीय राजकीय पक्षांचे लोक तसेच पुण्यातील मतदान न करणारे, स्वत:च्याच आयुष्यात मशगुल असलेले मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय लोक जबाबदार आहेत. सर्वच राजकीय पक्षांत तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांत भविष्यवेध आणि नियोजन याचा प्रचंड अभाव आहे. एक रस्ता महापालीकेने नविन बनवला असेल तर तीसर्‍याच दिवशी ड्रेनेज लाईन साठी म्हणून किंवा टेलीफोन लाईनच्या दुरूस्तीसाठी म्हणून नविन तयार केलेला रस्ता खणला जातो. रस्ता खणण्याचं या लोकांना माहीती. मग नंतर तो नीट एकसारखा करून दुरूस्त करणं म्हणजे काय असतं ते ह्या लोकांना आजतागायत माहीती नाही.

पुण्यात आज कोणत्याही पक्षाकडे असं नेतृत्त्व नाहीये की ज्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या चारीएत्र्याकडे तसेच काम करण्याच्या क्षमतेकडे बघुन लोक त्यांना मतदान करतील. कॉंग्रे-राष्ट्रवादी केवळ भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या बळावर सत्तेत येत आहेत. शिवसेना आणि मनसे एकमेकांच्या लाथाळ्यात आणि एकमेकांना शह-काटशह देण्यात गुंतलेले आहेत. भाजपामध्ये राष्ट्रीयस्तरावर नेत्यांमध्ये चालू असलेल्या वादामुळे स्थानीक नेतृत्त्व निवड आणि क्षमता वाढ याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मग आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी जरी पंतप्रधान पदाचे उमेद्वार म्हणून प्रोजेक्ट केले तरी काहीही उपयोग होणार नाही. एक व्यक्ती निस्पृह असून चालत नाही. त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोकही त्या व्यक्तीला साथ देणारे लागतात. गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जो करीष्मा करून दाखवला आहे तो इतर ठीकाणी दाखवणं खरंच शक्य आहे.......सध्याच्या स्थितीमध्ये?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अहो पण रिक्षावाले कोणत्याही गावात गेलात तरी असेच असतात. फार काही फरक नसतो त्यांच्या प्रवृत्तीत. बाकीचे मुद्दे बरोबर आहेत.

@ महेश, पण मी बाकीच्या ठीकाणी गेल्यावर रिक्षा वापरत नाही ना! मग मला कसं समजणार ते? बरं झालं सांगीतलंत ते. म्हणजे पुणेकरांच्या जोडीला अजुनही लोक आहेत याचं समाधान. Happy

पुणं तिथं सगळंच उणं!! >>> मी एक निवासी पुणेकर म्हणून या शिर्षकाचा निषेध करतो. बाकी लेख बहुतांशी पटण्यासारखा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही पण म्हणजे मी तसे म्हणतोच आहे असे कुणीही समजू नये.

एसटी स्टँडवर दोन रुपयाला रिक्षा भाड्याचे कार्ड मिळते. जवळ ठेवा. रात्री बारा नंतर पहाटे पाच-सहा पर्यंतच दिडपट भाडे असते बाकी सगळे रेट कार्ड नुसार चालते. रिक्षावाल्याशी हुज्जत घालायची तयारी नसेल तर रिक्षाचा प्रवास टाळावा. वचावचा बोलल्यास रिक्षावाले चावत नाहीत. तुमची बाजू योग्य असेल तर रिक्षावालाच काय पण विमानवालाही तुम्हाला गंडवू शकत नाही.

प्रत्येक गाव नाहीतर शहर यात काही ना काही कमी-जास्त हे असतंच... पण पुण्यातले लोक 'आम्ही कसे सर्वच बाबतीत पर्फेक्ट' असं उगाच सर्वांना सांगत असतात... आता तो सारेगमपच्या नवीन पर्वातला नवीन मुलगा धवल चांदवडकर चांगला गातो, चांगला दिसतो, म्हणून त्याचं परिक्षकांनी कौतुक केलं आणि गंमतीने प्रिया बापट म्हणाली, 'हा सारखा आरशात बघतो असं कळलं', तर याचं उत्तरः मी पुण्याचा असल्यामुळे आरशात बघतो. मला जाज्वल्य अभिमान वाटतो त्याचा आणि जितकं मॅक्झिमम एक्सलन्स अ‍ॅचिव्ह करता येईल, तितकं मी बघतो. (व्हिडिओ पहा: http://www.youtube.com/user/zeemarathi#p/u/37/18y4ZHOaub0 यात ८ व्या मिनिटाला हे संवाद आहेत.) आता त्याच्या ह्या परफेक्शनचा पुण्याशी काहीतरी संबंध आहे का? त्याचे हे बोलणे वाचून पुणेकर सुखावले असतीलही... पण हा कार्यक्रम जगभरात दिसतो आणि सगळेच प्रेक्षक काही पुणेकर नाहीत... त्यामुळे हे असले वाक्य अगदीच अस्थानी वाटले ह्या कार्यक्रमाला आणि त्यातल्या वातावरणाला...

हे असं बरेचदा होतं... विषय असतो काही वेगळाच पण पुणेकर उगीच त्यात पुण्याला ओढतात. "पुणे तिथे काय उणे" ह्या वाक्याला तर काहीच अर्थ नाही... मग ते असं काही बोललं की तिथे काय काय उणे आहे, ते शोधण्याचा आणि ते पॉईंट आऊट करण्याचा पुणेतरांना मोह नाही झाला, तरच नवल!

बाकी शांतीसुधा ताई, पुणे असो नाहीतर नाशिक, मुंबई, सगळीकडे रस्त्यांची दुरावस्था, विकासाच्या नावाने बोंबाबोंब, राजकारण्यांच्या भ्रष्ट वागणूकीचा सामान्य नागरिकांना त्रास हे सगळं थोड्याफार फरकाने सारखंच आहे. फरक इतकाच की आम्ही म्हणजे परफेक्शनिस्ट असा फुकाचा आव इतर गावातले नागरिक आणत नाहीत....

पुण्यात जर रस्ते आणि गल्ल्या बरोबर माहित असतील तर सहसा रिक्षावाला फसवू शकत नाही. कोणीतरी नवं पाखरू आहे गावात हे त्यांना कळलं तर मात्र मस्त चुना लावतात. गोल गोल फिरवून. पण अर्थात ही वृत्ती मुंबईतल्या रिक्षावाल्यातही आहे.
आमचे एक पुण्याचे नातेवाईक गेल्या आठवड्यात मुंबईत आले. पार्ले ईस्टहून गोरेगाव वेस्टला येताना रिक्षावाल्याने त्यांना अंधेरी, लोखंडवाला, ओशिवरा अशी मस्त रपेट करून आणली. बायका असल्याने आणि मुंबईत नवीन त्यामुळे त्यांना कळलंच नाही आपण नाहक फिरतोय आणि मीटर वाढतोय. Sad

मला जेंव्हा पुण्यात सगळीकडे दिवसभर रिक्षाने फिरावं लागतं.... तेंव्हा पैसे देताना (मुंबईच्या तुलनेत) अरे इतकं फिरलो आणि एवढंच बिल (कमी) असं वाटून जातं. Happy

मी एरवी पुणेकरांवर शेरेबाजी करत असलो तरी सगळंच काही उणं नाहिये पुण्यात एवढं मात्र खरं... Wink

हबा म्हणतो त्याप्रमाणे शीर्षक मी मुंबईकर असूनही मला खटकलं..... Happy

फरक इतकाच की आम्ही म्हणजे परफेक्शनिस्ट असा फुकाचा आव इतर गावातले नागरिक आणत नाहीत....

>>>>>>>>>>>

रान पेटणार...... Proud

पुणे तिथे जरासे उणे

पुणे तिथेही असतेच काहितरी उणे

पुणे तिथे सगळेच नाही उणे

असे शिर्षक निषेधाला पात्र ठरले नसते. पण तो लेखकाचा निर्णय असल्याने त्याचा आदर राखून निषेध नोंदविणेच योग्य.

आम्ही म्हणजे परफेक्शनिस्ट असा फुकाचा आव इतर गावातले नागरिक आणत नाहीत.... >>> असं काही नाही. प्रत्येकाचा मुद्दा वेगळा आहे. कोल्हापुरात सगळेच पैलवान! सातार्‍यात सगळेच विचारवंत! कोकणात सगळेच शहाळे! इ. इ. इ.

असं काही नाही. प्रत्येकाचा मुद्दा वेगळा आहे. कोल्हापुरात सगळेच पैलवान! सातार्‍यात सगळेच विचारवंत! कोकणात सगळेच शहाळे! इ. इ. इ.>>> हो का? मग ते ही चुकच.... ह्या अशा वल्गना करणार्‍या लोकांमुळेच आपल्या देशात एकात्मता, प्रेम नाही... आधीच जाती, भाषा, संस्कृतींमधले भेद आणि वैर आणि वरुन हे गावांवरुन उगाचच्या उगाच ओढून ताणून आणलेले वैर वाटते...

असं काही नाही. प्रत्येकाचा मुद्दा वेगळा आहे. कोल्हापुरात सगळेच पैलवान! सातार्‍यात सगळेच विचारवंत! कोकणात सगळेच शहाळे! इ. इ. इ.>>> हो का? मग ते ही चुकच.... ह्या अशा वल्गना करणार्‍या लोकांमुळेच आपल्या देशात एकात्मता, प्रेम नाही... आधीच जाती, भाषा, संस्कृतींमधले भेद आणि वैर आणि वरुन हे गावांवरुन उगाचच्या उगाच ओढून ताणून आणलेले वैर वाटते...>>>>

जरा जाग्या व्हा.... भारतभरच काय... जगभर लोक आपापल्या शहराचा अभिमान बाळगून त्याबद्दल बोलत असतात.....

जरा जाग्या व्हा.... भारतभरच काय... जगभर लोक आपापल्या शहराचा अभिमान बाळगून त्याबद्दल बोलत असतात.....>>> मग ते योग्य आहे का?

आणि वरुन हे गावांवरुन उगाचच्या उगाच ओढून ताणून आणलेले वैर वाटते...>>> असेही काही नाही... मी सातार्‍याचा पण मला पुण्याविषयी प्रेम वाटते. कोल्हापुरात शिक्षण झाल्याने त्याचीही ओढ वाटते. सातार्‍याचा आभिमान वाटतो. मराठी गोजिरी आवडते तशी हींदी काजोल आवडते. आपला सचिन आवडतो त्याहून कोलकत्याचा गांगूली आवडतो. हा लेख लिहीला म्हणजे काय पुण्यात सगळे उणेच आहे हे सिध्द होत नाही तसेच कुणी आम्ही सगळ्याच बाबतीत हुश्शार म्हटले म्हणून तेही तसेच असते असे नाही. बोलणे वेगळे वास्तवात वागणे वेगेळे.

आत्ता! अहो पुरे ना पुण्याबद्दल बोलणं! झाले की सगळे बोलून इतकी वर्षे! आता जगभर हिंडून आलेली माणसे तुम्ही, जगात याहून वेगळे काही घडते का? प्रामाणिकपणे विचार करून सांगा.
तिथे रिक्षा तरी आहे, अमेरिकेत काय कराल? तिथे कुठे रिक्षा नाही की बस नाही (आहे असे म्हणतात, पण कधी दिसत नाहीत!)

बरे बसलात टॅक्सीत, तरी भाडे काय पडेल माहित आहे? तेव्हढ्या डॉ. चे रुपये केलेत तर तेव्हढ्या पैशात शंभरदा पुण्यात हिंडून याल!

नका तक्रारी करू भारताच्या! एव्हढे काही वाईट नाहीये तिथे. आता सगळ्यांना चांगले पैसे मिळताहेत, चैन करा, आनंदी रहा! तक्रारी करू नका.

काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!

मग ते योग्य आहे का?>>> योग्य का नाही???? प्रत्येकाला आपण ज्या शहरात रहातोय, वाढलोय त्याबद्दल अभिमान बाळगून त्याबद्दल बोलण्यात अयोग्य काय आहे...

काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!>>> मान्य. अनुमोदन!

मग ते योग्य आहे का?>>> योग्य का नाही???? प्रत्येकाला आपण ज्या शहरात रहातोय, वाढलोय त्याबद्दल अभिमान बाळगून त्याबद्दल बोलण्यात अयोग्य काय आहे...>>> इतरांना कमी लेखत तो अभिमान बाळगणे, हे अयोग्य आहे. सगळेच असं करतात असं मी म्हणत नाहीये, पण असं करणारे लोक आहेत, हे ही नक्की! आणि त्यामुळे व्यक्ती-व्यक्तींच्या परस्परसंबंधात फार कडवटपणा येतो. हेच अयोग्य आहे. माणसाची पारख त्याच्या गुणांवरुन व्हावी, तो राहत असलेल्या गावावरुन नाही, हेच मला सुचवायचे आहे. आशा आहे तुम्हाला ते आता तरी समजले असेल.

काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!>>> मान्य. अनुमोदन!>>> याला काही संख्याशास्त्रीय आधार आहे का? की ही पण पुणं तिथं काय उणं अशीच एक वल्गना आहे?

सगळेच असं करतात असं मी म्हणत नाहीये, पण असं करणारे लोक आहेत, हे ही नक्की! >>> याचाच अर्थ या लेखाचे शिर्षक अयोग्य असण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे. "सगळेच" नाही पण "काही" महत्वाचे.

काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!
>>>>>>>>>>>>>>

कैच्याकै Proud Rofl

Pages