|| रेशीमगाठी ||

Submitted by शांतीसुधा on 28 June, 2011 - 14:44

रेशीमगाठी, म्हंटलं तरी करकचून आवळता येत नाहीत आणि जर खरंच मनाचे बंध जुळलेले असतील तर गाठ सैल असली तरी सुटत नाहीत. मग त्या रेशीमगाठी लग्नाआधीच्या परिचयातून, प्रेमातून निर्माण झाल्या असोत किंवा अगदी व्यवस्थित कांदेपोहे खाऊन बांधलेल्या असोत.... आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या रेशीमगाठी बर्‍याचवेळा इतक्या करकचून आवळलेल्या असतात की त्यात दोघांपैकी एकाचा किंवा काहीवेळा दोघांचाही आणि पर्यायाने त्या पूर्ण कुटुंबाचा बळी दिला-घेतला जातो.

लग्नबंधनात अडकलेली अनेक जोडपी असंही म्हणताना आढळतात की लग्नाआधीच बरं होतं, लग्नं करून पस्तावलोय/पस्तावलेय इ.इ. जेव्हा एकत्र रहाणं अशक्यच होतं तेव्हा काहीजण कायद्याचा आधार घेवून वेगळे होतातही.....पण असं करून (खरं पाह्यला गेलं तर) त्यांचे प्रश्न कितपत सुटलेले असतात किंवा वाढलेले असतात हे त्यांच त्यांनाच ठावुक.

लग्न न केलेले किंवा चहा-पोह्यांच्या कार्यक्रमातून फारसं यश न लाभलेले, स्वत:चं स्वत:च न जमवता आलेले अनेक जण आजूबाजूला दिसतात. काही जणांची गाडी ही नको-ती/ हा नको तो असं करत करत लग्न करण्याच्या/जमवण्याच्या वयाच्या स्टेशन वरून कधीच सुटलेली असते. कारणं काहीही असोत हे सगळं आपल्याला आपल्या समाजात पहावयास मिळतं.

वधुवर-सूचक मंडळांच्या नोंदवह्या आणि मॅटर्निटी नर्सिंग होम्स मधील नोंदी (खर्‍या दाखवल्या तर) ह्या तर समाजाच्या खर्‍या प्रगतीचा आरसाच असतो. कारण संपूर्ण समाज जीवन वैयक्तिक जीवनाशी सांगड घालत तिथेच गुरफटलेलं असतं. वधू-वर सूचक मंडळांमधील नोंदवल्या गेलेल्या उपवर वधु-वरांसाठीच्या (अवाजवी) अपेक्षा असोत किंवा गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या असोत हे सगळंच एकमेकांत बांधलं गेलं आहे. कितीही वैयक्तिक असा म्हटला तरी अतिशय सामाजिक आणि तितकाच ज्वलंत विषय.

आपल्या सगळ्यांनाच उपवर अशा वधू आणि वर या दोघांच्या आणि त्यांच्या आई-वडीलांच्या वाजवी-अवाजवी अपेक्षा माहिती आहेत त्यामुळे त्या इथे लिहीणे हा या लेखाचा हेतू अजिबात नाही. खरंतर अशा पद्धतीच्या अपेक्षा, त्यानंतर येणारा फोलपणा, लग्न करायच्या आधी त्या उपवर मुला-मुलींची लग्न म्हणजे काय आणि ते कशासाठी करतात किंबहुना ते का करायचं? किंवा करायचंच की नाही? ह्या सगळ्या बाबतीत पुरेसा विचार झालेला असतो का? हा एक मोठा प्रश्न आहे.

काही जणांना लग्न म्हणजे उत्तमोत्तम दाग-दागिने, कपडे घालून विविध प्रकारच्या केशरचना करून स्टेजवर मिरवणे असंच वाटत असतं. उपवर मुला-मुलींच्या पालकांना त्यांच्या स्वत:च्या वैवाहिक आयुष्यातून मिळालेला बहुमूल्य शहाणपणा (??) आपल्या मुला-मुलींबरोबर वाटून घ्यावा, त्यांच्याशी याबाबतीत अतिशय मोकळेपणाने बोलावं असंच वाटत नाही. त्यामुळेच तर खरं ९९% प्रश्न निर्माण होतात/झालेले असतात.

मागे काही वर्षांपूर्वी मला एका नेट-मित्राची इ-मेल आली होती. मला म्हणजे ती त्याने सगळ्यांनाच ग्रुपवर पाठवली होती. इ-मेलचं शीर्षक होतं अ‍ॅलीस इन वंडरलॅन्ड आणि तशीच काही अंशी कथाही जुळवली होती. पण मला यातली अ‍ॅलीस कोण आणि वंडरलॅन्ड काय हे लक्षात आल्याने त्याला प्रतिसादाची मेल लिहिली......"आखूड शिंगी बहुदुधी अशी गाय मिळणं अवघडच. आपल्या प्राथमिकता आपणच ठरवायच्या (अगदी आई-वडीलांना थोडं बाजूला ठेवावं लागलं तरी) त्या प्राथमिकतां प्रमाणे निर्णय आपला आपणच घ्यायचा. जेव्हा एखादा निर्णय आपणच घेतलेला असतो तेव्हा आपसूकच त्याची जबाबदारी आपणच उचलतो आणि जर आपण तेवढे समजुतदार असू तर घेतलेल्या निर्णयाशी प्रामाणिक राहून तो टिकवण्याच्या दृष्टीने स्वत:हून अधिक प्रयत्न करतो. यातच आपण मोठं (ग्रो) होत असतो." मला ताबडतोब त्याचं उत्तर आलं, "माझ्या इतक्या सगळ्या संपर्कां मधुन, मित्र-मैत्रिणीं मधुन फक्त तूच माझी इ-मेल खर्‍याअर्थाने वाचलीस आणि समजून घेतलीस. मला उत्तर आवडलं". व्यक्ती विचारी असेल तर बर्‍याचवेळी हा सगळा विचार चालू असतो फक्त निर्णय घेण्यासाठी दोन शब्दांचं पाठबळ कुठलाही निर्णय न-सुचवता दिलेलं (हे महत्त्वाचं) लागतं. पण बहुतांशी उपवर मुलं-मुली या सगळ्याचा विचार करताना दिसत नाहीत. साहजिकच लग्न होवून आणि न होवून सुद्धा प्रश्न सुटत नाहीतच.

पुण्यात साथ-साथ म्हणून परिचयोत्तर विवाह जुळवणारी एक संस्था आहे. वर संशोधनाची अपेक्षा कमी पण संस्थेविषयी कुतुहल अधिक म्हणून मी सुद्धा कधीतरी त्या संस्थेची पायरी चढले होते. मला तिथे दिला जाणारा एक फॉर्म बर्‍यापैकी भावला. म्हणजे त्याने वधु-वर शोधायला प्रत्यक्षपणे कितपत मदत होते ते माहीत नाही (कारण यात कितीही गणित आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग नसतो., आवडी-निवडी जुळणे, विचार जुळणे याची मोजदाद करून हिशेब करून लग्न जुळवता येत असतं तर चहापोहे काय वाईट?) पण स्वत:चे विचार स्वत:लाच समजायला, ते पक्के व्ह्यायला मदत होते हे नक्की. मला तर वाटतं सगळ्या उपवर मुला-मुलींनी अगदी पूर्णपणे साथ-साथ स्टाईल मध्ये फॉर्म भरण्यापेक्षा एकदा स्वत:चा खुंटा बळकट करण्यासाठी स्वत:च एक स्वाध्याय करावा. त्यात पहिल्या टप्प्यात स्वत:च्या, इतरांच्या, आई-वडीलांच्या अपेक्षा लिहून काढाव्यात. (हा प्रयोग प्रामाणिकपणाने आणि स्वत:च एकट्याने करावा). मग त्यातील महत्त्वाच्या अशा दहा अपेक्षा शॉर्टलिस्ट कराव्यात. त्यांची पुन्हा एकमेकांशी तुलना करून पहावी म्हणजे एक असेल आणि एक नसेल तर काय वाटेल? इ. अशाप्रकारे तुलना केल्यावर त्या दहा अपेक्षा उतरत्या क्रमाने मांडाव्यात. त्यातील पहिल्या पाच अपेक्षा (म्हणजे याशिवाय चालूच शकणार नाही) पहाव्यात. त्यावर पुन्हा विचार करावा आणि मगच पुढे काय ते ठरवावं. मग अपेक्षां मध्ये अगदी काळ्या-गोर्‍या रंगा पासून ते घरची आर्थिक परिस्थिती, करीअर नोकरी ते बौद्धिक पातळी, सवयी, आवडी-निवडी (या सगळ्यां मध्ये केवळ नुसत्या अपेक्षाच ठेवून उपयोग नसतो तर स्वत: कडे सुद्धा तेवढ्याच चिकित्सेने आणि तटस्थपणे पहायला जमलं पाहीजे.......नाहीतर बर्‍याचवेळा अनेकजण नुसत्याच अपेक्षा करतात)याचा समावेश असावा.

आता चष्मा नको ही एक महत्त्वाची (?) अट असते. मग एखाद्याला/एखादीला लग्नानंतर चष्मा लागला तर काय घटस्फोट घेणार? गंमतच आहे. चोखोबांच्या "ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा" ह्या शिकवणुकीचा पार बोर्‍या वाजवत लोकांना कायम बाह्य रंगाने काळी मुलगी नको असते.......मग एखाद्या गोर्‍या मुलीचं अंतरंग कितीही काळं असलं तरी......पत्रिका बघणे आणि त्यातून मंगळ आहे म्हणून नकार तर कांदेपोह्यांपर्यंतचा प्रवासच दुर्धर करून टाकतो तर काही जण मुलगी पाहिल्यानंतर मंगळ आहे असे कारण पुढे करतात. अगदी दोन एकाच जाती मधल्या कुटुंबांत सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असू शकतात म्हणून मुलगा/मुलगी विशिष्ट जातीतीलच पाहीजे यासाठी हट्ट धरण्यात मतलब आहे की नाही हे आपणच ठरवावे. आहार हा काही जणांना कळीचा मुद्दा वाटू शकतो कारण शाकाहारी व्यक्तींना मांसाहार अजिबात चालतच नसेल (म्हणजे समोर सुद्धा पहावत नसेल) तर अवघड होवून बसतं. खरंतर पत्रिका पहाणे, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शहरं [पुण्यासारख्या शहरात (अमुकच पेठेत किंवा भागात), मुंबईत अमुक एकाच लाईनवर (वेस्टर्न दादर वगैरे उत्तमच पण बोरीवली, अंधेरी वेस्ट, चांगलं, मालाड ठाणा डोंबिवली चालेल शिवडी, सायन, चुनाभट्टी नकोच. पनवेल खूपच लांब आहे], परदेशातील स्थळे यांसारख्या इतर अनेक उपविषयांची अपेक्षा या अंतर्गत चर्चा करायची असल्यास प्रत्येकी एक एक प्रकरण सहज लिहीता येईल.

१) कांदेपोहे पद्धतीत काहीच मुद्दे एखाद्या व्यक्तीचे दिसू शकतात. उदा. बाह्यगोष्टी, शिक्षण, नोकरी (खरी माहिती दिल्यास), घरची पार्श्वभूमी (जुजबी........प्रत्यक्ष लग्न करून घरात गेल्याशिवाय कोणाचेच खरे स्वभाव कळत नाहीत)
२) प्रेमविवाहात सुद्धा प्रेमाने आंधळे झाल्यामुळे काही गोष्टी दिसत असून न-दिसल्या सारख्या होतात आणि मग लग्नानंतर डोळे उघडू शकतात.
३) परिचयोत्तर विवाहात यातील काही धोके कमी असतात. आपल्याला व्यक्तीशी बोलता येतं (व्यक्ती प्रामाणिक असेल तर अनेक गोष्टी बोलून ताडता येऊ शकतात), व्यक्तीच्या देहबोलीवरून डोळ्यांच्या हालचालीवरून व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही हे समजू शकते.
४) रंग, रूप, नोकरी, पैसा, स्टेट्स, पत्रिका, राहण्याचे विशिष्ट ठिकाण, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शिक्षण, सिनेमातील विशिष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री सारखेच दिसणे, एखादा खेळ येणे, एखादी कला येणे, स्वयंपाक करता येणे, पैसे भरपूर कमवून आणावेत, अती शिकलेली आणि करिअरिस्टिक मुलगी नको, श्रीमंत आई-बापांची एकुलती एक असली तर चांगलं आहे, एकच भाऊ असेल तर आदर्श स्थळ, एक बहीण चालेल पण जास्त बहिणीच आणि भाऊ नाही म्हणजे त्या मुलीची घोड चूक आहे (हे मुलींच्या बाबतीतले) तर मुलावर कोणाची जबाबदारी नको, स्वतंत्र फ्लॅट असल्यास प्राधान्य, स्वत:ची गाडी हवी, एकुलता एक मुलगा सोन्याहून पिवळं, एक बहीण उत्तम, एक भाऊ चालेल, जास्त भाऊ नकोतच (हे मुलांच्या बाबतीतले) यासगळ्या भाऊगर्दीत आरोग्य, स्वभाव, चारित्र्य ह्या गोष्टी हरवलेल्या असतात. आपण वरील गोष्टींचा विचार नक्की का करतो? लग्न हे कशासाठी करतात? म्हणजे आपल्याला सर्वार्थाने जोडीदार हवा असतो, त्याच्याबरोबर आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं असतं. वरील मुद्दे हे विचार करण्यासारखे नक्कीच आहेत पण प्राधान्य क्रम नक्की कोणता असावा हे आपलं आपणच ठरवा. जो काही निर्णय घ्याल तो कुठल्याही फॅन्टसीमधे घेऊ नका. आयुष्याची सत्य खूप वेगळी असतात.

वरील अधिकाधिक मुद्द्यांमध्ये फारसा दम नसला तरी याच गोष्टीं मध्ये रेशीमगाठी अडकलेल्या असतात. एक मात्रं खरं की जो निर्णय घेतला तो व्यवस्थित (दोघांनीही) निभावून नेण्यात आणि एकत्र ग्रो होण्यात यशस्वी सहजीवनाचं यश दडलेलं आहे. त्यात एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम (केवळ शारीरिक आकर्षण नाही) हे सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. त्यात दोघांनी मिळून सर्व जबाबदार्‍या पार पाडणे, घरातील कामं वाटून घेणे या गोष्टी ओघाने आल्याच. त्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते. ताणण्याने काहीच साध्य होत नसतं पण जोडून सामोपचाराने राहण्यातच खरी कसोटी आणि यश दडलेलं असतं हे महत्त्वाचं. दोघांनीही आपापल्या आणि एकमेकांच्या घरच्यांना समजून घेऊन (घरच्यांनी सुद्धा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं) दोन घरं खर्‍या अर्थाने जोडावीत. या सगळ्याचा अधिक विचार व्हावा असं मला वाटतं. उपवर मुला-मुलींनी अतिशय वस्तुनिष्ठपणे या सगळ्याचा विचार केला पाहीजे आणि आपल्या रेशीमगाठी करकचून न-बांधल्या जाता घट्ट आपोआप कशा होतील यावर भर दिला पाहीजे. स्वत:च्या प्राथमिकता स्वत:च ठरवून जबाबदारी घेण्यास शिकलं पाहीजे येवढंच मनापासून सुचवावंसं वाटतं.

गुलमोहर: 

शांतीसुधा, खरच चांगले विचार मांडलेत. मी सुधा माझ्या friend circle मध्ये तुम्ही मांडलेले विचार नकीच share करेन. तुमच्या विचारांशी मी सहमत आहे, पण मला कधी कधी असं वाटत की काही मुली ह्या मुळात आळशी सुधा असतात.
त्यांना फक्त लग्न करून आरामात राहायचं असत. त्यांची स्वतः कोणतेच कष्ट करायची तयारी नसते. नाही त्यांना शिक्षण पूर्ण करावस वाटत की नाही त्यांना थोडे कष्ट करून नोकरी करून आर्थिक भार उचलावा असं वाटत. त्यांना फक्त नवऱ्याच्या आणि सासरकडच्या पैश्यावर मज्जा करायची असते.
म्हणून मला कधी कधी वाटत की काही मुली ह्या लग्न करताना खूप स्वार्थी विचार करतात आणि म्हणूनच ह्या अश्या मुली हा सगळा तुमच्या इतका सारासार विचार करताना तुम्हाला दिसणार नाहीत.
अश्या मुली काही फक्त कमी शिकलेल्या किवा गावा कडे राहणाऱ्याच नसतात भारतातल्या मुंबई आणि पुणे ह्या शहरात सुधा दिसतात. (भारतात मला फक्त मुंबई आणि पुणे हीच शहरे माहीत आहेत कृपा करून गैर समज नको). मला तर अगदी इथे सुधा माझ्या undergrad and grad school मध्ये पाहायला मिळाल्या आहेत.
तुम्हाला त्रास होईल असं काही माझ्या कडून लिहीलं गेल असेल तर आधीच माफी मागते, पण मी मला जे अगदी सहज वाटल ते share केल.

@ अनन्या, प्रतिक्रीयेबद्धल आणि तुझे विचार शेअर केल्याबद्धल धन्यवाद. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. काही मुलींना लग्न फक्त नवरा आणि सासरचे यांच्या पैशावर मज्जा मारण्यासाठी करायचं असतं. त्यांना कोणतीच जबाबदारी नको असते.

खरंतर जितके मनुष्य स्वभाव तितकी विविध प्रकारची माणसं (मुलगा असो वा मुलगी) दिसतात. मला लेखातून येवढंच सुचवायचंय की आंधळेपणाने आणि विचार न करता करण्यासारखी लग्न ही गोष्ट नाही. तसंच विचार करताना बरेच मुद्दे असल्याने गोंधळ होऊ नये, स्वतःलाच आपल्याला नक्की काय हवे आहे याची स्पष्टता यावी यासाठी वस्तुनिष्ठपणे काय करावे असं सुचवलं आहे. हे काही फक्त मुलींच्या बाजूने लिहीणे आणि सगळी मुलं आणि मुलांकडचे वाईट याअर्थी कृपया घेऊ नये.

>>पण मला कधी कधी असं वाटत की काही मुली ह्या मुळात आळशी सुधा असतात. त्यांना फक्त लग्न करून आरामात राहायचं असत. त्यांची स्वतः कोणतेच कष्ट करायची तयारी नसते. नाही त्यांना शिक्षण पूर्ण करावस वाटत की नाही त्यांना थोडे कष्ट करून नोकरी करून आर्थिक भार उचलावा असं वाटत. त्यांना फक्त नवऱ्याच्या आणि सासरकडच्या पैश्यावर मज्जा करायची असते.

अगदी, अगदी. अश्या मुली मीही पाहिल्या आहेत. तसंच नात्यातली एक डॉक्टर झालेली, स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभी असलेली मुलगी 'कुंकवाला धनी पाहिजे' (हे तिचेच शब्द, माझे नाहीत) आणि लग्न होत नाही म्हणून आदळआपट करताना मी पाहिलेय. लग्नाच्या बाबतीत तडजोड सगळ्यांनाच करावी लागते पण कोणी कुठली, किती आणि कधी तडजोड करायची हा त्याचा/तिचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो सार्वजनिक झाला की तिथेच सारं संपतं. तडजोड करायची तयारी असूनही मनाजोगं स्थळ नाही मिळालं तर "नाही ना मनाजोगा/गी मुलगा/मुलगी मिळत, मग तो मिळेपर्यंत मी नाही करणार लग्न" ह्या मताशी ठाम रहायला हिंमत लागते, खूप हिंमत लागते.

Pages