बखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे

Submitted by चिनूक्स on 21 June, 2011 - 11:37

जागतिकीकरणाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झाला, असा एक सर्वसाधारण समज आहे. भारतात यामुळे फार मोठे बदल झाले. आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले गेले. अर्थव्यवस्थेबरोबर मूल्यव्यवस्थाही काहीशी बदलली. हिंसाचार वाढला आणि असहिष्णुताही वाढली. नेमकं असंच काही शतकांपूर्वीही घडलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं फिरंगी भारतात आले, आणि इथे राज्य केलं. एतद्देशीय राजांनी कधी त्यांच्यासमोर नमतं घेतलं, तर कधी त्यांना विरोध केला. या विलक्षण संघर्षाच्या काळात कोणी एक अंताजी खरे महाराष्ट्रात होऊन गेला. या अंताजीनं पेशवेकालीन महाराष्ट्राची बखर लिहून ठेवली. अंताजीची शैली मोठी मस्त. आजूबाजूला घडणार्‍या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित टिपतो. स्त्रियांना सहज वश करणारा अंताजी अतिशय हुशार. मजा म्हणजे गरीब असला तरी अनेक महत्त्वाच्या प्रसंगी तो अचूक हजर असतो. मोठाल्या लढाया असोत, किंवा तह, अंताजी सगळ्या घडामोडी लिहून काढतो. बंगालावर ब्रिटिशांनी राज्य प्रस्थापित कसं केलं, मराठे अपयशी का ठरले, यांवर तो टिप्पणीही करतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की, फक्त इसवी सनं बदलली, व्यक्तींची नावं बदलली. पण कितीतरी गोष्टी अजूनही तशाच आहेत. माणसांचे स्वभाव तसेच, त्यांचे गंड तसेच. राज्यकर्तेही तसेच, आणि प्रजाही तशीच.

बरोब्बर वीस वर्षांपूर्वी श्री. नंदा खर्‍यांनी ’अंताजीची बखर’ लिहिली. यावर्षी या कादंबरीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. ’बखर अंतकाळाची’ या नावानं. मराठेशाहीच्या अंतकाळाची ही बखर आहे. मराठे कुठे चुकले, कुठे कमी पडले हे सांगणारी ही कादंबरी एका दुभंगलेल्या, गांजलेल्या समाजाचंही दर्शन घडवते. प्लासीची लढाई, नागपूरकर भोसल्यांच्या चढाया, नारायणराव पेशव्यांचा खून, सवाई माधवराव पेशव्यांचा मृत्यू, इंग्रज, फ्रेंच यांची कारस्थानं आणि लढाया इत्यादी अंताजी नोंदवतो, आणि आजही काहीच बदललं नाही, याची लख्ख जाणीव करून देतो.

’बखर अंतकाळाची’ या श्री. नंदा खरे लिखित कादंबरीची ही काही पानं...

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Bakhar-Antakalachi.html

BakharAntkalachi.jpg

ये क नि ष्ठा

पहिले भेटले ते दीडशाहाणे!

आज पाहाटें लवकरून जाग आली. सूर्योदयाचे प्रहरभर आधीच म्हणावें. उठतांच विचार, कीं कोठें आहे? प्रश्न पुरा होता उत्तर आलें, की अंबिवड्यास आहे! रोजचेंच हें असें होवों लागलें आहे. येथे आल्यास सालाभराचे वर काळ जाहला. आजूनही येथे रुजलो, रिझलो नाही. असे होत नसे. संवय अशी की स्वार्‍या, मुलूखगिर्‍या करीत चहूकडे उंडारावे. उसंत मिळता, कंटाळा येता, जेथें नाळ पुरली त्या या अंबिवड्यास यावें. राहावें. तवाने व्हावें. पुन्हा बाहेर पडावें. अखेर हें आजोळ. मातोश्रींचे मामा बरवे. त्यांचें गांव. मूळ नांव म्हणे बरव्याची वाडी. मग कोणा बरव्यानें आंबराया लावल्या. आजही येथला आंबा मधुर. तर नांव जालें आंब्याची वाडी. पुढे आंबेवाडी, आंबिवाडी होत आज अंबिवडे म्हणतात. अण्णा सांगत. माझे तीर्थरूप. तेही ऐकिलेलेच सांगत. बरव्यांकडील माहिती. आज खरेंखोटें करणेस मार्ग नाही.
खरें खोटें!
आश्चर्य वाटतें. आज हा वाडा आहे, ते जमिनीबाबत खरेंखोटें करणेस दिव्य करणेस तयार जालो होतो!

घडलें असें. जानोजी भोसल्यासवे निजामानें पुणें लुटलें तेसमई मी परागंदाच जालो, म्हणावें, कारण पांचसाहा साल परता अंबिवड्यास फिरकलोच नाही. आलो, तो राखमलब्याचे ढीग हटवोन नव्यानें वाडा उभारणेचे मनशेने. धनिक नव्हतो. पण निर्धनही नव्हे. काशीस, वामनास आणलें नव्हतें. त्यांस नागपुरीच ठेवोन आलो होतो. पण येथे येतो तों काय? जागा साफसूफ करोन कोणी एक खोपटें बांधलेलें. भंवताले बाग. पुढ्यांत एक तिशीची बाई, पुसले, "आणि तूं गे कोण?" तर म्हणे, "कुशाबा पाटलाची व्हय, पावनं."
बोललो, "पाहुणी तूं, कारण ही जमीन माझी होय!" लगबगीने गेली व पाटलाचे कुशास बलावून आणले. बोललो, "रे कुशा. हा काय प्रकार की माझे जागेवर हीस ठेवितोस?" चेहेरा पडला. पण मुजोरीने बोलला, "तुमी आले न्हाई, कैक साल. पंचाईत बसवोन म्यां जिमीन खालसा केली. गावकीस पांच रुपे देवून खरीदली. कागूद बी दर्ज केला शेहेरात."

जाले. कज्जा उभा राहिला! दामटोन, दुमटोन आईकेना. कागदाचे बोले, की गांवठाणांतील खालसा जमीन पांच रुपये मोलाने घेतली. म्हणालो, "चल, शहरीं चल." नाराजीनेंच आला. रामशास्त्री न्यायाधीश, प्रभुण्यांचे. त्यांजपुढें कथन करतां चवकशी केली. कागद तर होता. पण सारे आईकतां कंटाळले. बोलले, "मामलेदार देतो. ठिकाणी जावोन फैसला करील." दोचार रोजांत देतो, बोलले. त्याचे चार हप्ते जाहले. कुशा कंटाळोन तिसरेच रोजी परतला, तर मी पिर्‍या निंबाळकराकडे मुक्काम ठोकला. अखेर एक मामलेदार, नांव रामचंद्र भगवंत, कूळ बापटाचे, असा येणेस तयार जाला. पन्नाशीची उमर. तरी मामलेदारच असलेला. फार तल्लख नव्हे. पण फडाचे कामांत मुरब्बी. दऊत-वह्या सांभाळणेस कारकून, दवंडी देणेस महार, सारा लवाजमा घेवोन निघाला. बापट तट्टावर, तर इतर दोघे पायीं. गांव सोडतां त्यास घोड्यावर बसवोन आपण तट्टावर आलो. वाटेनें म्हणे, "खरे, म्हणजे आपणही चित्पावन." तर होकार दिला. "आणि हा पाटील म्हणजे?" तर सांगितले की खाशाबा कदमाचा पोर कुशाबा. शहाण्णव कुळी, परंतु कुणबावा करणारा. बोलले, "फिकीर करों नये." सांगितलें, कीं माजा पक्ष खराच. तर म्हणत, "असेलही. परंतु कागदाचें वजन असतें ना?" चमकलो. ह्या कारकुंड्याचे मनीं होते काय?

गांव गाठतां म्हणे, "चावडी कोठे?" तर सांगितलें कीं अंबिवड्यास मारुतीचे पारावरच चावडी भरते. महारास कुशास, गांवकर्‍यांस बलावणेस धाडिलें. मज म्हणे, "फिकीर करों नये. पण सोय पाहावी." उजवी पापणी लवविली. आतां मज प्रकार नवा नव्हे. परंतु स्वतःस प्रत्येक्ष अनुभवही नव्हे, तसले करणेचा.

गांव गोळा जाला. वादी मी, तर प्रतिवादी कुशा. अर्ज केला, की अंताजी बिन रघुनाथशास्त्री खरे, तो मी. हणमंतराव बरव्याने बक्षीसपत्राने जमीन रघुनाथशास्त्र्यांस दिली. ते मयत, तर वारस मी. एकुलता एक पुत्र.
कुशा म्हणे, "नाय! शास्त्रीबोवाची जिमीन. हे साऱ्यांस ठावूक. पर वारस येकलं अंताजी म्हनावं कसं?"
बापट म्हणे, "हणमंतराव बरव्याने दानपत्राने रघुनाथशास्त्री बिन महादेवभट खऱ्यास जमीन दिल्ही. हे कुशाबा कदम पाटलाने मान्य केले आहे. आता रघुनाथशास्त्र्याचे वारस अंताजी, हेच नाकारतात."
"नाकारत न्हाई, जी! ते तर शास्तरीबोवाचे मूल. पर इतर कोन वारस उभा ठाकला, तर पाटील म्हून म्या काय करावं?"
संतापलो. बोललो, "रे कुशा! तू कधी पाह्यलास कोणी दुसरा वारस? येवढी वर्षे गांवात आला कोणी तिसरा?'' तर म्हणे, "वारस शोधायचा काम माझा नोहे. पर न्हाईच म्हनावं कसं?"
मामलेदार म्हणे, "खरे तर तुम्ही जमीन खालसा केली तेव्हांच तुम्ही वारस नाही असें मानलें आहे. तरी आपण खातरजमा करूं शकतो." कुशा म्हणे, "तेंच म्या म्हंतो, की खातरी करवून घ्यावी."
बापट म्हणे, "तर मग दिव्ये करावयास हवी, तीही ज्याचे त्याचे मगदुराप्रमाणे." कुशाची आई म्हणे, "पांच साल थांबला, माजा कुशा. मंगच खालसा केली जिमीन!" तिजकडे रोखोन पाहात बापट म्हणे, "तर दिव्ये करावी, दोहोंनी. अंताजींस आपणच वारस हे शोधायचे. कुशाबास जमिनीच्या चतुःसीमा शोधायच्या."
कुशा म्हणे, "दिव्वे कशास? म्हाराची साक्ष काढा." तर गर्दीचे मागोन रायनाक महार म्हणे, "नाय, पाटला! मामला काळीचा न्हाय. गांवठानातला, पांढरीचा व्हय. काळीचं म्हनताल तर सारी साक्ष देतो. घरवाड्याच्या जिमिनीत माजा काम न्हाय!" मी बोललो, "दुरुस्त! वाद वाड्याचे जमिनीचा होय, तर म्हाराचें काम नोहे."
बापट, कारकून कुजबुजत, कागद वरखाले करत. तर बापट म्हणे, "शास्त्राधार असा कीं अंताजीस कोशदिव्य करावें लागणार, तर कुशाबा पाटलास नांगराचें दिव्य." कुशाची आई पुसे, "दिव्वे म्हंजे कराचं काय?" मामलेदार म्हणे कीं तें सोपें.

"गांवसीमेंत कोणी रुद्र, भैरव, दुर्गा यांची मूर्त होय काय?" तर बोललो, "टेकडीवर भैरवाची मूर्त होय." होतीही. हातीं खड्ग घेवोन कोणा वीर पुरुषाचें चित्र होतें. ""तर तीस तीनदा स्वच्छ जलानें धुवावें, की सारी रौद्रता विनाअवरोध उघडी होईल. असें करितां भैरवापुढे खोटें बोलेल, तो तात्काळ मरेल. मनीं खोट येवोन पाहेल तो आंधळा होईल.'' सारे गांवकरी माना डोलवीत. ""तर या मूर्तीची पूजा करो, धुवोन, अंताजीस तीर्थ प्यावयाचें आहे. चवदा रोज अंताजींस कांहीं जाले नाही, नातलगांस कोण आपत्ती गांठत नाही, तों अंताजी खरें. आपदा येतां अंताजींचा शोध विफल म्हणावा.''
बोललो, "कबूल!" आता शिळेचें पाणी पिवून कोण मेला? आणि नातलगावर आपदा म्हणावें, तर नातलगांची चवकशी करणेस नागपुरास जातो कोण? तर हें दिव्य सोपें, यांत शंका नव्हे.
"आन्‌ म्या काय करावं?'', कुशा पुसे, की वादीस इतकें सोपें, तर प्रतिवादीस काय असणार?"
"तूं? तूं नांगराचा फाळ हाती घेवोन जमिनीच्या चतुःसीमा चालावयाच्या. दरेक पावलास रामनाम घ्यावें. चतुःसीमा पार करिता... पण चुकलो! तुजे हात धुवोन, त्यांस सात आपट्याची पाने बांधोन सील करायाचे. आधी हातांवर तांदूळ रगडोन कांहीं जखमा नाहीत, ते नोंदावयाचे. सील करिता हातांवर पळीभर दही, पळीभर तांदूळ वाहायाचे. मग नांगर मी चिमट्याने उचलोन हातांत देईन." बापटाने हें सांगतां कुशा पुसे, "चिमटा कशाला?" तर म्हणे, "दिव्य करणेसाठी चिमटा हवाच. दिव्य संपता त्वां फाळ पुन्हा अग्नीस अर्पण करावा लागतो."
"पुन्हा म्हंजे?" असे कुशाची आई पुसे. बापट म्हणे, "मावशी! रात्रभर नांगराचा फाळ अग्नीत ठेवावा. तो लालभडक होणे असते. निखार्‍यासारखा. सूर्यबिंबासारखा. खदिरांगारासारखा. ठिणग्या उडतील इतका." दर शब्दासवे कुशाची आई हातानें नकारी, तर कुशा जास्तजास्त पांढुरका पडे. सारी उमर शेतांत कामें करोन कमाविलेला रंग राखाडी, उदी होवों लागला.

"आणि फाळ हातीं धरोन, दर पावलास रामाचे नांव घेत चतुःसीमांवरोन चालायचें, उगाच धावपळ दिव्यांस चालत नाहीं." कुशाची बायको, वाड्याचे जमिनीवर ठेवलेली कुळंबीण, टाहो फोडोन बेशुद्ध जाल्या. कुश्या चिंध्यांच्या बाहुल्यागत मलूल. एक त्याची आईच काय ती ठिकाणावर. पुसे, "इतर कोंतं दिव्वे न्हाय का?"
बापट जोरानें मान डोलावे. "आहे तर! फाळ तसाच तापवावा. दरेक दिशेच्या सीमेचे वर्णन करोन पाटलाने जिभेने फाळ चाटावा." कुशास उलटी जाली. घागरभर मळ पोटांतून उन्मळला, कमरेचे भिजले.
कुशाची आई म्हणे, "जावो द्या, मामलेदार! इतकुशी जिमीन ती काय? आणि शास्तऱ्याच्या पोरास दिव्वे काय करायाचं?" कुशास म्हणे, "जाव दे, पोरा. तुजं खरं, पर तेसाठी शास्तऱ्याच्या पोराला बहिरूबाचं तीरथ काय पाजायचं?"

कुशा धावत आला. माझेपुढे गुढघे टेकोन माझे पायांस मिठी घातली. "शास्तर्‍याचे उपकार भुलत न्हाई मी. पर म्यां पांच रुपये मोजले, ते तरी द्या."
"एक फद्या देणार नाही! तू गांवभर सांगत फिरशील की बामणाची जमीन बामणासच विकली."
कुशा गुडघ्यांवर चालत मामलेदाराकडे जाई, तर तो "अरे! अरे!" म्हणत पाय पारावर घेता जाहला.
बोललो, "रे कुशा! मामलेदारास हेलपाटा जाला. सारा लवाजमा घेवोन आले. घोड्यास चंदीचारा. माणसांस जेवणेंखाणें. तूं शोध तर घेतच नाहींस. उलटें झालें गेलें विसरोन जा म्हणतोस! अरे! अशानें गांवात कोणी मुलगी देणार नाही, की गांवातल्या मुलीस सून करोन घेणार नाही! आज खऱ्याचे अंबिवडे म्हणतात. उद्या चोरांच्या आळंदीसारखे खोट्याचें अंबिवडे म्हणतील. आहेस कोठें!" कुशा रडो, भेकों लागला.
"तुमीच वाट काढा, शास्तरीबोवा!" कुशाची आई म्हणे.
बापट मजकडे पाही. म्हणे, "तुम्ही म्हणाल तर कुशाबा पाटलास खोटें काम केल्याकारणें बेड्या ठोकोन गांवांतोन फिरवितो!"
म्हटलें, "असों द्यावें, न्यायाधीश बापटशास्त्री! चुकला तरी कुशा माझे गांवचाच पोर. पांच रुपये ते काय? आपणास हेलपाट्याचे, घांसदाण्याचे म्हणोन देतो. तो कागद मात्र फाडोन नव्यानें करावा!"
कुशास बोललो, "पाटील तूं का असेनास, गांव माझाच. गांवावरचें अरिष्ट, मजवरच नव्हे का? खोपटेही राहों दे. वाडा उभारणेस कारागीर येतील, त्यांस होईल. मीही चार दिवस राहातो. कोरडा शिधा पोहोचव. झाडलोटीस ती कुळंबीणही पाठव. मी साहेबांस शिवेपर्यंत निरोप देवोन येतो!" तो रडतच होता.

मामलेदारास पांच रुपये दिले. म्हणे, "हे नीटस जमले, हो, अंताजी! आपण एकमेकांस धरोन राहिलो नाहीं, तर ही कुणबटें डोईवर मिरीं वांटतील!"

घोडें परत घेतलें. त्यास निरोप दिला. मनीं मात्र अस्वस्थ जालो. एका कुग्रामाचा पाटील तो काय? आणि त्यास ठेचणेस बापट सांगतो कीं चित्पावनाने चित्पावनांस धरोन राहावें! तीसेक वर्षें चाकर्‍या केल्या. नागपूर, बंगाल, हिंदुस्तान पालथा घातला. स्वाऱ्या, मोहिमा, मुलूखगिर्‍यांवर. असें नव्हे की कोणी कोणाची जात मोजतो. ज्याचे त्याचे मगदुराप्रमाणे, लायकी पाहोन कामें दिली जात. पगार, तनखे दिले जात. अगदी पानपतावरील मोहिमेचे वेळींही मराठे, धनगर, म्हणत, "रे भटांनो, बामणांनो! तुमचे कारणे मोहीम सुस्तावते. चुस्ती, फुर्ती दाखवा." बरें, भाऊ, राघोबा, बाबासाहेब रघूजी कोणी मजसारखे पाखंडी नव्हेत. पण शिंदे, होळकर, पोवारांशी जें वागणें, तेंच बुंदेले, रास्ते, पटवर्धनांशी. फडावरील कारकून, मामलेदार जर हा मराठशाई शिरस्ता मोडतात, तर श्रीमंतदरबारी कांहीं पाठबळ लाभलें असणार.

आणि कुशा तो काय? बापटाने दरडावलें असतें तरी पुरतें. फार कशास? मी पांच रुपये देतो तरी मुकाट मानता. मग मुंगी मारावयास बंदुका, जेजाला कश्यास? वाटे, की घडतें तें बरें नव्हे.

पण हें सारें इ.स.१७७०-७१चें म्हणावें. मुळांत अण्णांस मारिलें, वाडा जाळला, तेसमई असा कांहीं विचारच नव्हे. विचार होता तो केवळ स्वतःची कींव करणेचा, की "अरेरे! कसा मी अभागा?" वर्षांमागोन वर्षें बंगाल्यांत, उत्तरेंत, हिंदुस्तानांत काढली. पानपतावरून परतलो, तर प्रेमाची बायको नाही. दीडदो साल जाते, तों एकुलता एक नातलग, तीर्थरूप अण्णा मारिले गेले. मन रिझवावें, ज्ञान कमावावे, तों ग्रंथ नाहीत. आराम करावा, तों डोईवर छत नाही. स्नेही म्हणावे, तों कोणी नाही. एक पुरचुंडी दागिन्यांची, एक घोडी, वस्त्रें, शस्त्रें. इतर कांहींही नाही.

आणि हें घडलें कशानें? कोणी केलें हें? निजाम, मोंगल तर मोंगलच. परंतु त्यांजसवे पुणें लुटणार जानोजी भोसला. माझे एकेकाळचे स्वामी बाबासाहेब रघोजी भोसले, त्यांचा पुत्र. त्याची काय कमी सेवा केली? त्याजतर्फे बंगाल्यांत जावोन पालाशीचे युद्धांत लढलो. तेथून परतल्यास करांडे सरदारांसवे निजामाशी लढलो. आज ज्या इभ्रामखान गाडद्याचें शौर्य व ईमानदारीचे पोवाडे गातात, त्या इभ्रामखानास हारविले.* फळ काय? जानोजी माझे घरदार नष्ट करणारांचा पक्षकार होतो! तर स्वतःचे दुःख मुरोन, आंबोन, कुजोन जानोजीवर वैरभाव उपजला! इच्छा बळावली, की त्याचें वाईट करावें.

आता हें सूड, बदला, द्वेष यांचें रसायन असतें तेजाबासारखें जहाल. ज्या पात्रांत घडतें, त्यासच खावून टाकतें. वेडाचाच प्रकार म्हणावा. तेसमई भ्रमिष्टासारखा होवोन कामें व मोबदला यांचे विसरोन गेलो.

परंतु ते काळी वेडावर उतारा पुरविणेस शाहाणेही प्राप्त जाले. आज पोवाड्यांत शाहीर लिहितो --

"सखोपंत देवराव विठ्ठल नाना काळ ।
शाहाण्यांत साडेतिन शाहाणे बुद्धिचे सबळ ।।"

तर यांपैकी दीड तर पुण्यांतच होते. उरले दोन, तर ते नंतरचे सालाभरात ओळखीचे झाले.

मी बारगिरी, शिलेदारी करीत खबर्‍या हरकार्‍याची कामें करणारा सामान्य माणूस. एरवी कोण्या शिलेदारास चार अर्धे, मुर्धे, पुरते मराठशाई शाहाणे भेटणेचें कारणच नव्हे. परंतु खबरेगिरी करता थोरामोठ्यांशी भेटीगाठी होतातच. बहुदा या भेटींमुळे थोरामोठ्यांचें क्षुद्रपणच मनी ठसते! पण तें असो!

***

* - डिसेंबर १७५७मध्ये रघूजी व बापूराव करांडे या नागपुरी सरदारांनी जळगाव जामोदला इब्राहीमखान गारद्याला हरवले.

बखर अंतकाळाची

श्री. नंदा खरे
मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या - २५४
किंमत - २५०

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या बखरीतली राजकीय टिप्पणी वाचायला आवडेल. मात्र ती विश्लेषणात्मक नसावी असा अंदाज आहे. काहीका असेना पुस्तक वाचण्याजोगं असावसं दिसतंय.

फारेंडा,
अंताजीची बखर आउटॉफप्रिंट आहे. Proud
स्लार्टीने सांगीतल्यापासुन शोधते आहे. मी, स्वाती, टण्या, मेघना अशा बर्‍याच जणांना हवे आहे ते पुस्तक. रांगेत या. रांगेचा फायदा सर्वांना. Happy
(तुला मिळाले तर आमच्यासाठीही घेच. रांग मोडलीस तरी चालेल) Lol

लोक्स -
नंदाखरेंची पुस्तकं एकुणात 'वाचू का' असे विचारू नका, वाचाच. Happy
Reality meets fiction अशा स्वरुपाचे खरोखरी ब्रिलियंट लिहीतात. विद्वत्तेचे अवडंबर नाही माजवत ते. हे मला तुफान आवडते.
त्यांचे एक वाक्य आहे कहाणी मानवप्राण्याचीच्या प्रस्तावनेत. ते टाकते नंतर. 'मी तुमचे बौद्धिक मनोरंजन करतो' अशा स्वरुपाचे.

धन्यवाद चिनूक्स.

वर्षांमागोन वर्षें बंगाल्यांत, उत्तरेंत, हिंदुस्तानांत काढली. पानपतावरून परतलो, तर प्रेमाची बायको नाही. दीडदो साल जाते, तों एकुलता एक नातलग, तीर्थरूप अण्णा मारिले गेले. मन रिझवावें, ज्ञान कमावावे, तों ग्रंथ नाहीत. आराम करावा, तों डोईवर छत नाही. स्नेही म्हणावे, तों कोणी नाही. एक पुरचुंडी दागिन्यांची, एक घोडी, वस्त्रें, शस्त्रें. इतर कांहींही नाही.>> आय अ‍ॅम सोल्ड. टोटली र्‍हाइम विथ धिस गाय.

अंताजीच्या बखरीची नवी आवृत्ती नुकतीच मनोविकास प्रकाशनाने काढली आहे. त्यामुळे ती कादंबरी अनेक वर्षांनंतर आता पुन्हा उपलब्ध झालेली आहे. 'अंताजीची बखर' आणि 'बखर अंतकाळाची' यांविषयी मी लिहिलेल्या लेखांचे दुवे:

अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी
बखर अंतकाळाची - कालातीत भारतीय जाणीवेचा रसाळ आविष्कार

'अंताजीची बखर'मधे एका 'ओरिजिनल' व खूपच प्रभावी शैलीचा आस्वाद घेता आला होता. आताची बखरही त्याच शैलीत असल्याने वाचणं क्रमप्राप्त ! ऐतिहासिक भाषेचा बाज चढवूनही दुर्गमता/दुर्बोधता टाळणं म्हणजे तारेवरची कसरत. इतिहासाच्या चौकटीत राहून बारीक चिमटे, टपल्या व खुलेपणा पेरणं -- मानलं लेखकाला !!!

ही दोन्ही पुस्तके अजून वाचायची आहेत... बरोबर ६ महिन्यांनी वाचीन अजून...

हा अंताजी म्हणजे 'अंताजी माणकेश्वर' का? दिल्लीच्या राजकारणाची उत्तम समज असलेला ह्या माणूस होता... असे कै. शेजवलकर यांनी नमूद करून ठेवले आहे.