स्वप्न..

Submitted by निवडुंग on 14 June, 2011 - 13:13

धुक्याची दुलई पांघरून,
साखरझोपेत पहूडलेल्या शिखरांना,
हळूच स्पर्शत जाणारा,
शिरशिरी भरवणारा वारा,
अन् सोबतीला पर्जन्यधारा.

अर्धोन्मिलीत पहाटेच्या,
किलकिल्या डोळ्यातून,
टपटप पडणार्‍या गारा वेचण्याची,
तुझी अल्लड कसरत.

ओंजळभर गारा जमवून दमल्यावर,
दूरवर दिसलेला तुला एकटाच तो,
अन् तिथेच जायचंय मला,
म्हणून अडून बसलेली तू.

तू असा लडिवाळ हट्ट केला की,
नाही हा शब्दच नाहीसा होतो बघ.
त्या शुभ्र ढगाच्या,
पिंजलेल्या मखमलीवर,
अलगद झेपावून,
मनमुराद हुंदडतो आपण,
त्याचा सगळा पाऊस संपवेपर्यंत.

तुझा एकुलता एक ढग,
बिचारा बरसून थकून गेला की,
हळूच त्याच्या एका सरीला धरून,
उतरतो उंच देवदार वृक्षाच्या शेंड्यावर.

तुझी खोडी काढण्याची सवय,
अजून जात नाही बघ.
तुझ्या चंद्राच्या नाजूक गालावर,
हळूच एक टिचकी मारून,
बिचार्‍याला खडबडून जागं केलं की,
सुळकन उतरत जातो आपण,
तुझ्या इवलुश्या कौलारू घराच्या चिमणीत.

तुझा चंद्र पण एव्हाना,
तुझ्या खोडीस दाद देत,
हसत असतो छानशी खळी पाडत.

पावसात चिंब भिजून,
तू कडकडून हुडहुडली असतेस.
तुझी कंपणारी सुबक काया,
विरघळून टाकते अंतर्बाह्य.
माझं सगळं शरीर एकवटलेलं असतं,
तुला सामवयाला डोळ्यात.

मस्त फायरप्लेस पेटवून देतो मग,
अन् तुझ्या आवडीची गझल रेकॉर्ड.
फायरप्लेसच्या तडकत राहणार्‍या ज्वाळेबरोबर,
हृदयातही वाढलेली असते,
थोडी थोडी धडधड.

स्कॉचचे दोन पेग भरून,
चियर्स! म्हणत,
पाहत राहतो फक्त तुझ्या डोळ्यांत.
स्कॉच जास्त धुंद की तुझे डोळे?
कठीण प्रश्न आहे खरंच!

नकळत ओठ खोडी करायचा प्रयत्न करतात,
तुझ्या गालावरची लाली टिपण्याचा.
तू वेडा आहेस म्हणत,
लटकेच वळतेस,
अन अलगद सोफ्यावर रेंगाळतेस.
शुभ्रशी चादर ओढून.

स्कॉचचा एक घोट घेत,
तुझ्या मोहक तनूच्या धुंदीत,
शांत पहुडून राहतो मग मी,
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून.
तुही अलगद कुरवाळत असतेस,
माझ्या चेहर्‍यावरची फितुर बट.

उष्णगरम श्वास मिसळत राहतात एकमेकात,
संथ गझलेच्या लयीत.
गुलाबी स्वप्न पडेपर्यंत..

ह्मम्म्म..
समजतंय आज,
काही स्वप्नं फक्त स्वप्नंच राहतात.
आपल्या हातात फक्त "पाहणं"च असतं.
आयुष्यभर..

गुलमोहर: 

अरे निवडुंगा काय रे हे...एवढे लांब लचक स्वप्न्....सुरुवातीचे ३-४ कडवे छान आहेत बाकी उद्या सकाळी वाचतो...अता निघतो.. Lol

ह्मम्म्म..
समजतंय आज,
काही स्वप्नं फक्त स्वप्नंच राहतात.
आपल्या हातात फक्त "पाहणं"च असतं.
आयुष्यभर.. >>>>> छान ! आवडलं!

Happy
<ह्मम्म्म..
समजतंय आज,
काही स्वप्नं फक्त स्वप्नंच राहतात.
आपल्या हातात फक्त "पाहणं"च असतं.
आयुष्यभर.. >

आवडलं!