भाषा चित्रांची : अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्टची तोंडओळख ..

Submitted by Kiran.. on 13 June, 2011 - 12:56

डिसक्लेमर : लेखक या विषयातील जाणकार नाही. श्री गूगळे यांच्या सहकार्याने जे काही इथे लिहीले आहे त्याचा मूळ स्त्रोत देण्यात येत आहे. धाग्याचा हेतू विषयाबद्दल चर्चा घडवून आणणे आणि या विषयाबाबत असलेल्या गैरसमजांचे निराकरण करणे हा आहे. धागा वाचून जाणकार आपले मत देतीलच हा ही एक हेतू आहेच.
------------------------------------------------------------------------------------

चित्र कसं वाचावं हे मुळातच व्यवस्थितपणे कुणी माहीत करून दिलेलं नव्हतं. ऑर्कूटवर एकदा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पोएट्रीवर चर्चा झाली तेव्हां एका कमेंट ने माझे लक्ष वेधून घेतले. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग असू शकते तर पोएट्री का नाही असा तो प्रश्न होता.

उत्सुकता चाळवली आणि शोध घेतला तेव्हां प्रतिमांच्या माध्यमातून जसं ग्रेसजी किंवा जुने गूढ कवी व्यक्त होतात तसाच काहीसा प्रकार इथं असावा असं वाटलं. पण या क्षेत्रातले दिग्गज जसे पिकासो, व्हॅन गॉग्ज यांच्या प्रतिमा आणि त्यांचे संदर्भ पाश्चात्य जगातले. मग कशाला डोकं शिणवा म्हणून तो नाद सोडून दिला होता.

योगायोगाने कवितेतल्या प्रतिमांशी जुळणारी काही चित्रे पाहण्यात आली आणि भारतीय संकल्पना घेऊन केलेले अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग थोडेफार उलगडून पाहण्याचा प्रयत्न करता आला. अर्थात या पाठीमागे गूढ किंवा कोडं सोडवण्याची असलेली उत्सुकता इतकाच भाग होता. ज्ञान असं नाहीच.

कुणाला प्रश्न पडेलही. सरळ सरळ चित्र काढता येत असताना हे असं उफराट्या पद्धतीने काढण्याची गरज काय ? तर त्याचं उत्तर असं आहे, व्यक्त होण्याची, अभिव्यक्तीची प्रत्येकाची शैली त्याच्या स्वभावविशेषावरून ठरत असते. समोर दिसतंय त्याचं जसंच्या तसं चित्र काढण्याला कारागिरी म्हणता येईल, त्यात सृजनात्मकता काय आहे असा प्रश्न काही बुद्धिमान कलाकारांना पडला आणि त्यांनी चित्रातून बोलायला सुरूवात केली.

व्यक्तिचित्रणाच्या, चित्रकारांच्या देखील शैली असतात. लता मंगेशकर यांचं ब्रशच्या फक्त तीन ते चार स्ट्रोकमधे बनलेलं एक अप्रतिम पोर्ट्रेट पाहण्यात आलं होतं तर जोधपूरच्या उम्मीद भवन मधे जुन्या महाराजांची तैलचित्र पाहीली त्यात वारीकसारीक तपशील भरण्यात आलेले.

अर्थात तैलचित्रांमधेही रंगांचा पोत, बॅकग्राउंड, सावल्या हे घेण्याची पद्धत, ब्रशचे फटकारे, रेषांचा ठळकपणा यात फरक असूनही प्रत्येक चित्रं हे सुंदरच भासतं. थोडक्यात काय तर दोन चित्रकारांच्या एकच वस्तूच्या पोर्ट्रेटमधेही फरक येणारच.

हाच धागा पकडून पुढे चित्रातून चित्रकार संवाद साधू लागले. त्यांनी रंगांची आणि रेषांची भाषा जाणली आणि त्यातून निर्माण झालं आजचं मॉडर्न आर्ट. या कलेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जालावर हा लेख मिळाला.

http://www.harley.com/art/abstract-art/index.html
(मूळ लेखातील चित्रं इथे देऊन माबो प्रशासनाला अडचणीत आणू इच्छित नाही सबब लिंक दिलीय).

वरील लेखात लेखक म्हणतो त्याप्रमाणे काळ, वेळ, स्थळ आणि संस्कृती याप्रमाणे अभिव्यक्तीत किती फरक पडतोय. लेखकाने उदाहरणं खूपच छान दिलीत. अर्थात तरीही अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्टची व्याख्या कशी करायची हे समजत नव्हतं.

ते मला खाली दिलेल्या लिंकवर उलगडलं...

http://www.art-is-fun.com/abstract-art.html#whatisabstractart

कविता जशी मुक्त झाली. छंद, बंध यापासून फारकत घेत नवी मुक्तकविता जन्माला आली तसंच आहे हे... पण पॅसिव्ह आहे ! यात बहुधा जीवनविषयक दृष्टिकोण, मानवी भावभावनांचे उमटणारे तरंग किंवा अध्यात्मिक गुढत्वाबद्दलचं भाष्य दिसून येतं. फक्त चित्रं काढणं यात हे भाष्य शक्य नाही. आकारांमधे, वक्रतेमधे असलेल्या शक्यतांमधून ते व्यक्त केलं जातं.

( याच भागाबद्दल जास्त उत्सुकता आहे खरी. अर्थात ती तपस्या आहे, अभ्यास आहे. आपला इथपर्यंतचा उद्देश हा तोंडओळख असा होता. माहीती देणं हा होता. ज्ञानासाठी तर गुरूच लागेल म्हणा... म्हणूनच या क्षेत्रातल्या जाणकारांनी लिहीतं व्हावं ही अपेक्षा आहे. )

सृजनशील व्यक्तींसाठी हे एक आव्हानच आहे. मला तर नेहमी वाटतं, कविता सुचणं, एखादी संगीत रचना सुचणं हे त्या व्यक्तीच्याही हातात नसतं. हे सर्व जाणिवांच्या पलिकडलं काम आहे. संगीतकाराची एखादी रचना तयार होते, त्यात शब्द येतात, वाद्य येतात आणि त्यांनी आपल्या भावना उद्दीपित होतात. हे संगीत कागदावर उतरवून काढलं तर ?

तर मग एक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कलासूक्त जन्माला येईल. तोच आनंद पाहणा-याला मिळणार असेल तर ते यशस्वी म्हणता येईल. अर्थात जसं शास्त्रीय संगीत समजायला किंवा कवित समजायला प्रतिभा लागते तसच इथंही आहे.

आपल्यालाही हा प्रकार शिकता येईल का ? असा प्रश्न आतापर्यंत मनात येणं साहजिकच होतं. तर काय गूगळे तयारच होते. त्यांनी लगेच माहीती हजर केली.

http://www.art-is-fun.com/how-to-paint-abstract-art.html

या चित्रांचा जसजसा अभ्यास करावा तसं आपलं ज्ञान किती तोकडं आहे हेच समजलं फक्त....
आणखी काही चित्र खालील दुव्यावर

http://www.artbylt.com/

जिज्ञासूंसाठीही श्री. गूगळे हजर आहेतच. या विषयाबद्दलची उत्सुकता जागॄत करण्याचं काम या लेखाने केलं असेल तर उद्दिष्ट सफल झालं इतकंच म्हणेन.. !

http://www.google.co.in/search?tbm=isch&hl=en&source=hp&biw=1600&bih=783...

- किरण

गुलमोहर: 

लेखात ब-याचशा त्रुटी राहून गेलेल्या असणं हे लेखकाच्या मर्यादेमुळे सहजशक्य आहे. जाणकारांनी त्यावर प्रकाश टाकून अद्ययावत माहीती द्यावी ही विनंती. Happy

टीप : मला या प्रकारच्या लेखाची माहीती शोध घेतला असता सापडली नाही. ही माहीती इतरत्र किंवा जुन्या लेखात आधीपासून असल्यास या लेखाचं प्रयोजन उरत नाही. अशा वेळी धागा उडवण्यात यावा.

.

किरण्यकेजी, प्रथम माझ्यासारख्या सामान्य चित्ररसिकाना एका गहन, गूढ व अनाकलनीय वाटणार्‍या विषयाच्या वाटेवर बोट धरून नेऊन सोडल्याबद्दल आपल्याला धन्यवाद.
कांही वर्षांपूर्वी मुंबईच्या 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट' मधे पिकासोच्या अमूर्त शैलीतील मूळ चित्रांचं खास प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रथम गेलो तेंव्हा निराश होऊनच परत आलो. पण पिकासो मला समजूं व आवडूं नये हे स्वीकारायला अहंभाव मधे आला व परत गेलो. यावेळी मात्र गॅलरीच्या प्रत्येक भागात चित्र 'समजावून' सांगायला मार्गदर्शक ठेवण्यात आले होते. पिकासोच्या आयुष्यातील घटनांचे, त्याच्या बदलत्या शैलीचे, त्याच्या आवडत्या प्रतिमांचे इ.संदर्भ देऊन मार्गदर्शकानी मदत केली त्यावेळी तीं चित्रं कांहीशी समजली व उमजली पण तरीही खास भावली नाहीतच. अजूनही 'अ‍ॅबस्ट्रॅक्ट'बद्दलचं आकर्षण कुतूहलाच्या रुपातच आहे पण ते खर्‍या अर्थाने समजावं व आवडावं म्हणून प्रयत्न चालूच आहेत; आपल्या लेखामुळे कांही 'शॉर्टकटस' मिळाल्या आहेत, त्यामुळे खूपच मदत होईल. [ मराठीतलं ' कोरा कॅनव्हास'ही खूप मदत करूं शकतं ]

भाऊ

धन्यवाद. खरंतर तुमचं नाव डोळ्यासमोर होतंच. जमेल तशी तुमच्याकडून भर अपेक्षित आहेच. Happy

( इतर : या प्रकाराबद्दल अनास्था आहे कि लेख बालिश आहे हे कुणी सांगेल का ?)

मी वाचते आहे. अधिक चर्चा वाचायला खरच आवडेल.
मलाही मुर्त शैलीतली चित्र जास्त आवडतात. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट जास्त बघायचा प्रयत्न केलाच नाहीये.
पण मुर्त शैली आखीव रेखीव, योग्य, नक्की असा शेवट असलेल्या कथे सारख्या वाटतात.
आणि अ‍ॅब्स्ट्रक्ट म्हणजे ओपन एंडेड कथे सारखे वाटतात. ज्याला जो हवा तो शेवट करावा.
शेवट नसलेल्या कथा मला आवडतात पण अशी चित्र अजुन का भावत नाहीत याचं उत्तर माझ्याकडे अजुनतरी नाहिये.

मात्र एक गोष्ट जी मला जाणवते ती अशी.
निसर्गात जो रंग जसा दिसतोय तशाच्या तसा तो कागदा/ कॅनव्हास वर उतरवणारी, किंवा समोर दिसणारं दृश्य नक्की कोणत्या प्रकारे बघितलं तर परिणाम कारक असेल याचा विचार करणारी, कॅनव्हास सारख्या द्विमित माध्यमातुनही टेक्स्चर , त्रिमिती दाखवणारी सृजनशीलता मुर्त शैलीचे रुप घेते.

आणि जे दिसलं ते कसं मनाला भावलं किंवा कसं मनात उतरलं हे दाखवणारी सृजनशीलता अमुर्तशैली धारण करते.

<< ( इतर : या प्रकाराबद्दल अनास्था आहे कि लेख बालिश आहे हे कुणी सांगेल का ?) >>
किरण्यकेजी, कांही व्यासंगपूर्ण अप्रतिम लेख [ म्हणजेच, माझे नव्हेत !] माबोच्या पहिल्या पानावरून सरळ गडगडत जाऊन विस्मृतित गडप झालेले मी पाहिले आहेत ; लेख पोस्ट करताना मुहूर्त पहाणं कदाचित आवश्यक असावं !

१. कविता व चित्रकला यांची तुलना करून मुद्दे मांडल्याबद्दल अभिनंदन व सुंदर विवेचन!
===========================================================

२. उत्सुकता चाळवली आणि शोध घेतला तेव्हां प्रतिमांच्या माध्यमातून जसं ग्रेसजी किंवा जुने गूढ कवी व्यक्त होतात तसाच काहीसा प्रकार इथं असावा असं वाटलं>>

हे पटत नाही. प्रतिमांचा वापर हा समाजमन व शासनप्रणाली यांच्यावर अवलंबून असलेला घटक असावा असे माझे मत! उदाहरणः

दी सादगीसे जान पडू कोहकनके पांव
हैहात क्युं न टूट गये पीरजन के पांव

- गालिब!

कोहकन म्हणजे पहाड खोदणारा (फरहाद)! पीरजन म्हणजे एक म्हातारी जिने फरहादला शिरीन मेली असे खोटे सांगीतले होते.

येथे असे म्हणायचे आहे (असावे / असणार हे गालिब यांचे आयुष्य वाचल्यावर पटावे) की पेन्शन मला एकट्याला मिळायला हवी असताना त्यात आणखीन एक शेअर होल्डर आला. त्याने इंग्रजांना खोटेच सांगीतले की तोही त्या पेन्शनचा उत्तराधिकारी आहे. तो मेला का नाही? मी आयुष्यभर त्या पेन्शनची वाट पाहून मरायला का टेकलो.

आता हे स्पष्ट शब्दात सांगीतले असते तर इंग्रजांनी अटक केली असती किंवा त्या मधे घुसलेल्या सरदाराने गालिबची मान उतरवली असती. अशा वेळेस हजारो प्रतिमांचा वापर करून कवी काव्य लिहायचे.

भारतात लोकशाही शासनप्रणाली आल्यानंतर वाचास्वातंत्र्य व विचार स्वातंत्र्य आले. या प्रणालीत प्रतिमांचा वापर करण्याची गरज जवळपास नगण्य आहे असे 'पुन्हा' माझे'च' (वैयक्तीक) मत! बालकवींनीही फुलराणीमधील वार्‍याला तिचा भाऊ असल्याप्रमाणे वागवले होते कारण बालविवाह ही त्या वेळेस रुढी होती व त्या विरुद्ध स्पष्टपणे बोलल्यास विरोध होऊ'ही' शकेल असा'ही' विचार असावा.

यावरून मला तरी असे वाटते की काही वेळा 'इंप्रेशन मारणे' हाही अशा कलेतील घटक असू शकेल काय? (म्हणजे चित्रकलेतील वा कवितेतीलही) (अवांतर - सध्या आंतरजालावर क्रान्ती व फुल्या यांच्या कविता प्रतिमांमधून बोलताना दिसतात व त्या प्रतिमा खर्‍या व समर्थनीय वाटतात. आता पुन्हा 'वाटणे' हे वैयक्तीक आहेच म्हणा )

=============================================================

३. कुणाला प्रश्न पडेलही. सरळ सरळ चित्र काढता येत असताना हे असं उफराट्या पद्धतीने काढण्याची गरज काय ? तर त्याचं उत्तर असं आहे, व्यक्त होण्याची, अभिव्यक्तीची प्रत्येकाची शैली त्याच्या स्वभावविशेषावरून ठरत असते. समोर दिसतंय त्याचं जसंच्या तसं चित्र काढण्याला कारागिरी म्हणता येईल, त्यात सृजनात्मकता काय आहे असा प्रश्न काही बुद्धिमान कलाकारांना पडला आणि त्यांनी चित्रातून बोलायला सुरूवात केली.>>>

मग असं फक्त चित्रकला आणि कविता याच कलाप्रकारांमध्ये का होते? नृत्य, गायन, वादन या कलांमध्ये का होत नाही? बेसूरपणे एखादे वाद्य वाजवले जात नाही असे का? पिढ्यानपिढ्या गायले गेलेलेच राग पुढच्याही पिढीतला गायक गातो असे का? मग तो नवनिर्मीती करतच नसतो का? इत्यादी प्रश्न!

======================================================

हुसेन यांच्यावर निघालेल्या धाग्यांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचा ठरावा असा लेख !

-'बेफिकीर'!

चांगलं लिहिलंय. आता माहितीत अधिक भर पडेल त्याची वाट बघतोय.

<<भारतात लोकशाही शासनप्रणाली आल्यानंतर वाचास्वातंत्र्य व विचार स्वातंत्र्य आले>> विचारांतली मोकळीक इंग्रजी शिक्षणातून आली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस. उलट अलीकडे 'स्वतंत्र लोकशाही' भारतात विचार स्वातंत्र्यावर बंधने वाढताहेत असेच दिसते.

केके.. क्या बात है.. छान विषय निवडलास रे आणी लिन्क्स फारच कामाच्या आहेत..
पर्सनली मला अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स फारच गुंतागुंतीची वाटतात आणी तितकीशी समजत पण नाहीत.. ( अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स काढताही येत नाहीत्..आणी तसा प्रयत्न ही नाही केला कधी.. )
आता कुणी समजावून देणारे असेल असेल तर आवडतील कदाचित!!!

छान लिहिले आहे. 'How-to' प्रकारात मोडणारे बरेच मुद्दे आले आहेत. पण 'Why' बद्दल खूप नाही लिहिलेले.
अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्ट हे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट गणिता प्रमाणे असते. तुम्ही एखाद्या कल्पनेचा संक्षेप करु पाहता . तसे केल्याने पुढे त्यावर इमले बांधणे सोपे जाते. त्या करता एक रिप्रेझेन्टेशन ठरविता - गणिताची भाषा एकच, पण तुम्ही आणि मी सिम्बॉल्स वेगवेगळे वापरु शकतो. त्याचप्रमाणे येथे वेगवेगळे रंग किंवा आर्टच्या इतर इलेमेंट्स वापरता येणार. काय दाखवायचे आहे त्यातही विविधता जास्त असल्याने भाषा/डायलेक्ट्स जास्त. मेंदुत सतत आकडेमोड सुरु असते - वेगवेगळे पॅटर्न्स. ते ही थेट कॅनव्हास वर क्लिष्ट रुपात उतरवता येऊ शकतात.

Mandelbrot set, Lyapunov spaces सारखे अतिशय अ‍ॅब्स्ट्रॅक्ट गणिती प्राणी त्याच वेळी अतिशय सुंदर पण असतात.
मँडेलब्रॉट सेटचा जनक गेल्या वर्षी ८६ या परिपक्व वयाचा होऊन परीराज्यात (की फ्रॅक्टल लँड मध्ये) रवान झाला.
http://en.wikipedia.org/wiki/Benoit_Mandelbrot
http://en.wikipedia.org/wiki/Mandelbrot_set

http://www.google.com/search?q=mandelbrot&hl=en&prmd=ivnseb&tbm=isch&tbo...

http://www.google.com/search?hl=en&biw=1412&bih=728&tbm=isch&sa=1&q=lyap...

मला अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स फारच गुंतागुंतीची वाटतात आणी तितकीशी समजत पण नाहीत. पण जाणून घ्यायला फार आवडेल.

सर्वांचे धन्यवाद.
आस्चिग छान पोस्ट.

बेफिकीर - तुमच्या पोस्टमधल्या शंकांबद्दल लिहीतो. लेख लिहीताना मोघम लिहीण्याचं कारण माझ्या स्वतःच्या मर्यादा याच होतं त्यामुळं जरा भीत भीतच या विषयाला हात घातलाय. पण चर्चा पुढे जाण्यासाठी तुम्ही बरेच रस्ते करून दिलेत तेव्हां आता लिहीणे भाग आहे Happy . धन्यवाद

बेफिजी

टप्प्याटप्प्याने प्रतिसाद देतो.

हे पटत नाही. प्रतिमांचा वापर हा समाजमन व शासनप्रणाली यांच्यावर अवलंबून असलेला घटक असावा असे माझे मत! उदाहरणः

माझ्या मते कवितेच्या बाबतीत तुम्ही माझ्यापेक्षा अधिकारी व्यक्ती आहात. तेव्हा माझं मत हा आगाऊपणा न समजता मी जे काही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ते शेअर करतोय इतकंच समजावं ही नम्र विनंती. ( नम्र वगैरे ..हल्ली सवयच सुटलीय. Happy )

मा़झ्या मते अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंगपेक्षा कविता हे जास्त प्रभावी माध्यम आहे.

ग्रेसजींच्या या प्रसिद्ध ओळी पहा.

ती गेली तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे, तो हा सूर्य सोडवित होता.

या ओळी कशाचं वर्णन करतात. तर ते एका मानसिक अवस्थेचं आहे. या कडव्यात भावना चितारल्या आहेत. भावना मनात उमटण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यांचे इन्पुटस दृश्य, श्राव्य अथवा घडामोडी या स्वरूपात असू शकतात. पण दु:ख, आनंद या भावनामधे त्यांचं रूपांतर होतं. त्या भावनांची तीव्रता कमी अधिक असू शकते. त्यांचं वर्णन करताना प्रतिमांचा आधार घ्यावा लागतो. या प्रतिमा पाहताना त्या मानसिक अवस्थेतून गेलेल्या प्रत्येकाला त्या जाणिवांची अनुभूती येणं हे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट वर्क असावं असा माझा अंदाज आहे.

ग्रेसजींच्या ओळी सांगतात ती गेली तेव्हा पावसाचं वातावरण असल्याने ढग होते. त्यात सूर्याचे किरण अडकले होते. इथं सूर्य हे पराक्रमाचं प्रतिक आहे. ढग हे अनेक शक्यतांचे आकार. फसवे आकार. त्यात सूर्याची किरणे अर्थात त्याची शक्ती अडकून पडली होती आणि ति सोडवण्यातच तो गुंतला होता.

हे आत्यंतिक असहायतेचं वर्णन आहे. ही असहाय्यता कवीच्या वाट्याला का आली हे पाहणं मूर्खपणाचं आहे. कारण काहीही असोत फसवणुकीच्या माध्यमातून कुणातरी तेजस्वी पुरूषाच्या वाटेला ती गेली तेव्हां असहाय्यतेचा सामना करावा लागला होता. त्यातून आलेली निराशा या कडव्यातून इतकी ठळक होत गेली कि अशा प्रकारच्या अस्वस्थेतून मी केव्हां गेलो असेल त्याची आठवण मला होऊन या प्रतिमांशी मी रिलेट होऊ शकतो.

हाच प्रकार चित्रांतून व्यक्त होतांना व्हायला हवा.

जस लाल रंग. मानवाला नेहमीच हा रंग अस्वस्थ करतो. धोक्याचा इशारा देतो. तीव्र वळणं असलेल्या रेषा डोळ्याला त्रास देतात. मानसिक खळबळ उडवून देतात. तेव्हां मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांच वर्णन या अशा पद्धतीने करण्यात येत असावं.

नृत्य आदि कलाप्रकारांबद्दल लिहीलं नाही कारण त्याबद्दल फारशी माहीती नाही.

वाचतोय, लिंक्सबद्दल धन्यवाद
की फ्रॅक्टल लँड मध्ये>>> जॅक्सन पॉलॉकच्या 'अ‍ॅक्शन पेंटींग' मधे नंतर फ्रॅक्टल पॅटर्न्स सापडले हा शास्त्र-कलेच्या सांध्याचा अजून एक आविष्कार.

किरण्यके,

मी असे ऐकलेले होते की सौंदर्यशास्त्राच्या तत्वांवर आधारीत प्रकटीकरण असावे. म्हणजे एखादी गोष्ट सांगायची असेल आणि ती (त्या त्या समाजापुरती, संस्कृतीपुरती) अ-उल्लेखनीय, बीभत्स, अश्लील, घृणास्पद, संतापजनक इत्यादीपैकी किंवा तत्सम असेल तर ती सांगताना सौंदर्यशास्त्राच्या तत्वांनुसार 'स्वीकारार्ह' होण्यासाठी वेगळ्या प्रकारे म्हंटली जावी. यात प्रतिमा, रुपकांना अधिक वाव मिळत असावा हे जसे पटावे तसेच प्रतिमा, रुपके यांचा अंतर्भाव 'अशाच' व्यक्तीकरणांसाठी असावा हेही पटावे. आता तो फक्त तशा'च' व्यक्तीकरणांसाठी असावा असे सौंदर्यशास्त्र म्हणत नसले तरी सौंदर्यशास्त्र तुम्हाला इतर प्रकारचे मुद्दे स्पष्ट भाषेत मांडायला आडकाठी आणत नाही.

तरीही, ग्रेस यांच्यासारखे महाकवी लिहिताना काही इतका विचार करत नसणारच! ग्रेसच काय, आपल्या मायबोलीवरचे कवीही करत नाहीतच की? ते तंद्रीत लिहितात, एका झटक्यात कविता लिहून मोकळे होतात, कविता माझ्यात आपोआप आली असे नंतर सांगतात, अर्थ विचारल्यावर 'आता मला नाही सांगता येणार' म्हणतात वगैरे!

तेव्हा तात्पुरते असे मानले की कवीला कोणत्याही शास्त्राशी (साहित्यविषयक शास्त्र, जसे मानवता, जीवनसूत्रे, सौंदर्यशास्त्र, तत्वज्ञाव व शेवटी अध्यात्म) घेणेदेणे नसले आणि तो कविता रचत असला तरीही प्रतिमांचा वापर करण्याची अगतिकता त्याच्यवर किती वेळा यावी?

आता महाकवी ग्रेस यांच्याच याच ओळी घेऊ!

ती गेली तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे, तो हा सूर्य सोडवित होता.

या ओळींबाबत आपले म्हणणे:

या ओळी कशाचं वर्णन करतात. तर ते एका मानसिक अवस्थेचं आहे. >>>

कवीच्या मानसिक अवस्थेतूनच कविता होते याबाबत दुमत नसावे.

या कडव्यात भावना चितारल्या आहेत>>>

कवितेत भावनाच चितारल्या जातात याहीबाबत दुमत नसावे.

. भावना मनात उमटण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात.>>>

अर्थातच सहमत आहेच.

त्यांचे इन्पुटस दृश्य, श्राव्य अथवा घडामोडी या स्वरूपात असू शकतात. पण दु:ख, आनंद या भावनामधे त्यांचं रूपांतर होतं. >>>>

खरे आहे. याला काही जाणकार समीक्षक प्रतिभाशक्ती जागृत होण्यासाठी घडलेले आघात असे म्हणतात. म्हणजे बाह्य जगातील कोणतीही अशी बाब जिच्यामुळे कवीच्या कवीमनावर आघात होऊन त्याची प्रतिभाशक्ती जिवंत होते व ती नियमीत आवर्तनांच्या माध्यमातून त्याला भाष्य करायलारप्रवृत्त करते असे त्यांचे मत! बाह्य जगातील बाब म्हणजे कोणत्याही माध्यमातून झालेले ज्ञान!

त्या भावनांची तीव्रता कमी अधिक असू शकते. त्यांचं वर्णन करताना प्रतिमांचा आधार घ्यावा लागतो. >>>>

माझा पहिल्या प्रतिसादापासून नेमका 'हाच' विषय आहे. प्रतिमांचा आधार 'का' घ्यावा लागतो हा! जे म्हणायचे आहे ते म्हणता येत असेल तर का प्रतिमांच्या भाषेत बोलायचे? केवळ एक परंपरा म्हणून? काही गाजलेल्या कवींनी प्रतिमा वापरल्या म्हणून ? आमच्या कवितेत शब्द वेगळे असतात व आशय वेगळा असतो व तो फक्त क्लासलाच समजू शकेल असे सांगायचे असते म्हणून? पोपट मेला आहे या विधानाला शिक्षाच नाही तर बाकीचे का सांगायचे? असे करून कवितेला डायल्यूट का करायचे?

या प्रतिमा पाहताना त्या मानसिक अवस्थेतून गेलेल्या प्रत्येकाला त्या जाणिवांची अनुभूती येणं हे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट वर्क असावं असा माझा अंदाज आहे. >>>

पण त्या जाणिवांची अनुभुती आली नाही तर?? महाकवी ग्रेस यांच्या त्या ओळींमध्ये सूर्य हे पराक्रमाचे प्रतीक आहे हे आपल्याला कोणी सांगीतले? ग्रेस यांनी? ग्रेस काहीही सांगतील. एखादा म्हणेल त्या दोन ओळी वेगवेगळ्य कवितेतील आहेत. मला तर सूर्य हा रुग्ण वाटत आहे. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी आलेली अ‍ॅम्ब्यूलन्स तो न सापडल्यामुळे पुढे निघून गेली तेव्हा पाऊस होता. म्हणूनच सूर्य दिसला नाही. आणि आपण तिला दिसावे म्हणून बिचारा सूर्य आपली किरणे सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होता. नंतर मला 'ती' म्हणजे सोलर डिस्क वाटली. सूर्याच्या किरणांमधील एनर्जी फुक्कट वापरत होती. तिला ती एनर्जी मिळू नये म्हणून सूर्य ढगांमधून जमतील तेवढी किरणे सोडवून घेत होता. सूर्य हे पराक्रमाचे प्रतीक आहे हे खुद्द कवीने सांगीतल्याशिवाय तसे कुणीही म्हणणे अर्थहीन ठरेल. आणि स्वतः कवीच तसे म्हणत असेल तर सरळ सरळ पराक्रमी पुरुषाचा किंवा पराक्रम या शब्दाचा उल्लेक करायला भारत सरकारची परवानगी नव्हती की वृत्तात बसत नव्हते?

हे आत्यंतिक असहायतेचं वर्णन आहे.>>>>

हे कुणाच्या असहाय्यतेचं वर्णन आहे असे आपले म्हणने आहे? सूर्याच्या?

ही असहाय्यता कवीच्या वाट्याला का आली हे पाहणं मूर्खपणाचं आहे. >>>>

नक्कीच मूर्खपणाचं आहे. पण कवीच्या वाट्याला असहाय्यता आली आहे की सूर्याच्या? सूर्य हे पराक्रमाचं प्रतीक आहे की कवीचं? कारण सुरेश भट साहेबांनीही 'माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी' असे म्हंटलेले आहे. कवीने असे म्हणणे शक्य आहेच. पण भटांनी प्रतिमा न वापरता रोखठोक म्हंटलेले आहे.

कारण काहीही असोत फसवणुकीच्या माध्यमातून कुणातरी तेजस्वी पुरूषाच्या वाटेला ती गेली तेव्हां असहाय्यतेचा सामना करावा लागला होता.>>>

फसवणूक?? काही समजले नाही. आता यात असहाय्यतेचा सामना कुणी केला असे आपण म्हणत आहात?

त्यातून आलेली निराशा या कडव्यातून इतकी ठळक होत गेली कि अशा प्रकारच्या अस्वस्थेतून मी केव्हां गेलो असेल त्याची आठवण मला होऊन या प्रतिमांशी मी रिलेट होऊ शकतो.>>>

अगदी कबूल! पण प्रतिमा न वापरता सरळ सरळ ती परिस्थिती (समजा कविता न करता गद्यात मांडली तरी काय हरकत आहे? कविताच करायला पाहिजे असा काही कवीवर शिक्का नसतोच) गद्यात किंवा पद्यात पण रोखठोक मांडली तर आपण रिलेट झाला'च' नसतात का? की आम्हा रसिकांना प्रतिमा, रुपके यांच्याशीच रिलेट होण्याची सवय झालेली आहे?

चित्रकलेत तरी हे प्रतिमांचे धुडगूस हवेत'च' अशी भूमिका काही कलाकार सातत्याने का घेतात? खजुराहोच्या शिल्पकलेत प्रतिमा का वापरल्या गेल्या नसतील?? त्या वेळेसच्या शासनप्रणालीला त्यात काही हरकत नव्हती म्हणूनच ना?

(अवांतर - कुणीही कुणापेक्षाही अधिकारी वगैरे नसतो. तेव्हा कृपया आपण ते वाक्य मागे घ्यावत अशी विनंती!)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिजी
मी आधीच म्हटल्याप्रमाणे मी माझं अंडरस्टँडिंग शेअर केलं फक्त. पण तुमचे मुद्दे समजून घेऊन इतकंच म्हणेन कि गेल्या पिढीतील एका कवीने म्हटल्याप्रमाणे कवितेचा अर्थ वाचकाला समजेल तोच !! कविता एकदा कवीने सादर केली कि ती त्याची राहत नाही. इथपासून ती वाचकांची होते. मग तिला वाचक भिकार म्हणतील, टुकार म्हणतील किंवा डोक्यावर घेऊन नाचतील. कवीचं काम त्याने केलय आता वाचकांनी त्यांचं करावं. हेच थोड्याबहुत फरकाने प्रत्येक कलाकृतीला लागू व्हायला हवं.

मला ग्रेसजींच्या कवितेचा अर्थ प्रतिमांमधून जसा समजला तसा तो इतरांना भावला पाहीजे अशी सक्ती नाही. प्रतिमांचे अर्थ कोण कसा लावतो त्यावरून त्याने तसं ठरवावं म्हणूनच त्याच्यापुरता तो अर्थ खरा. वर दिलेल्या ओळी वाचल्यानंतर मला दु:खाची तीव्रता जाणवली त्याचवेळी तुम्हाला रूग्णाच्या वेदना जाणवत असतील तर तुमच्यापुरते ते खरे आहे. म्हणूनच कवीने आपल्या कवितेचा अर्थ न सांगण्याची परंपरा मागच्या पिढीतल्या कवींनी सांभाळली आहे. पुन्हा ती तशी जपावी असं बंधनही नाही. हे त्यांनी स्वतःपुरतं केलेलं आहे.

आता रोखठोक शब्दांबद्दल

आधीच म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची शैली असते. व्यक्त होण्याची पद्धत असते. हे नैसर्गिक असतं. प्रतिमांचा वापर हा सरावाने सहजसाध्य होऊ शकतो हे माझं अनुभवावरून झालेलं मत आहे. कुणाला हास्यकथा लिहायला आवडतं, कुणाला धार्मिक कथा लिहायला आवडतं, कुणाला चिंतनात्मक लिहायला आवडतं , तर कुणाला तमोगुणाच्या गूढ आणि भयकथा लिहायला आवडतं. हा मुद्दा वेगळा आहे पण आवड निवड ही भिन्न असते हेच सांगायचं होतं.

सुरेश भटांनी रोखठोक लिहीलं. ते जसं भावतं तसच ग्रेसजींची कविता उलगडतानाही भावतेच. मग कवीने कुठल्या हेतूने लिहीलं याला फारसं महत्व उरत नाही हे माझं मत.

धन्यवाद

( अधिकारी व्यक्तीवरची नोट वाचनात आली नव्हती. क्षमस्व !)

मागे एका सायकॉलॉजिस्ट मित्राशी गप्पा मारताना प्रतिमांचा ते कसा वापर करतात ते कळालं.

उदा : तुम्हाला समुद्राचं कुठलं रूप जास्त भावतं ..

अ) उधाणलेला, भरतीचा
ब) ओहोटीचा
क) शांत, स्थिर

अशा प्रकारची प्रश्नावली देऊन त्यातल्या उत्तरावरून ते पेशंटबद्दल आडाखे बांधतात म्हणे..

आगाऊ ने उल्लेखलेल्या जॅकसन पोलक वर या महिन्याच्या फिजिक्स टुडे मधे लेख आहे. त्याच्या पेंटींग्स मागील विज्ञानाबद्दल. तो फ्लुईड डायनॅमिस्ट्सना पण आपल्या चित्रांमधे भागिदारी द्यायचा.

http://ptonline.aip.org/journals/doc/PHTOAD-ft/vol_64/iss_6/31_1.shtml

<< व्हॅन गॉग चं स्टारी नाईटस गाजतय सध्या माबोवर.. >> खरंय; पण तिथंही << बाकी कलाकाराची कला हिच त्याची ओळख. त्यासाठी त्याच्या खाजगी आयुष्याचे संदर्भ जोडण्याची गरज नसते हे माझं वैयक्तिक मत >> हा मुद्दा उपस्थित झालाच आहे ! Wink

<< तुमचं काय मत आहे ? >> "अ‍ॅबस्ट्रॅक्ट'मधील अभिव्यक्ती इतकी व्य्क्तीनिष्ठ [ subjective ] असते कीं कलाकाराची नुसती ओळखच नाही तर त्याने विशिष्ठ चित्र काढलं तेंव्हाचा त्याच्या आयुष्याचा कालखंड व त्याची मनःस्थिती हेही ते चित्र समजण्याकरता आवश्यक ठरतं. चित्र पहाणार्‍यांच्या दृष्टीने हें कितपत योग्य आहे, याबाबत मात्र अनेक मतं असूं शकतात.

जे पी मॉर्गन बँकेच्या कलिना च्या ऑफिसच्या रीसेप्शन ला हे चित्र पाहिले आणि हा धागा आठवला.
उत्सुकता म्हणून (अभ्यास म्हणून नव्हे) ह्या चित्राचा अर्थ जाणून घ्यायला आवडेल.
मला तर काहीच बोध झाला नाही. Sad

untitled2.JPG

^^^^
चित्राचा अर्थ समजेलच असं नाही. पण चित्र पाहील्यावर काय वाटतं हा उत्सुकतेचा विषय आहे माझ्या. या चित्रात ग्रे रंगाच्या वापराने रेषा समजून येत नाहीत. चित्रं अंधूक वाटतंय. नेटवर ओरिजिनल मिळालं तर पहायला हवं.

चित्र समजणे आणि अनुभवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनुभवण्यासाठी समजण्याची म्हणजे एकास एक असे समजण्याची गरज असतेच असे नाही. प्रत्येक गोष्ट 'समजणे किंवा कळणे' हे महत्वाचे नाही. अनुभव महत्वाचा. मात्र हे वेगळे काढता येण्यासाठी खूप चित्रे बघायला हवीत.

चित्रात अगदी खाली एका सरपटणा-या प्राण्यावर बसलेली मानवी आकृती दिसतेय. सरपटणारे जीव हे हताश, नैराश्याचं प्रतीक वाटतंय. त्या आकृतीच्या मागेच दोन पाठमो-या आकृत्या दिसताहेत. मध्यभागी असलेले सर्व आकार हे नकारात्मक भावना उत्पन्न करताहेत. त्यात गुरफटलेला एक मानवी चेहरा दिसतो आहे. सरपटणा-या आकृतीला पाठमो-या स्त्रिया दिसताहेत. या कदाचित दुर्लक्ष करून आपल्या मार्गाने चाललेल्या असाव्यात. सध्या इतपर्यंत पोहोचू शकलो. चु.भू. दे. घे.

मात्र हे वेगळे काढता येण्यासाठी खूप चित्रे बघायला हवीत.

अनुमोदन.

नीधप - अनुमोदन

किरण छान आहे लेख, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्टबद्द्ल मलाही जाणुन घ्यायचे आहे.....

निंबुडा Proud

Pages