खमंग भेंडी

Submitted by प्रज्ञा९ on 13 June, 2011 - 10:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. भेंडी पाव किलो- नीट कोरडी करून काचर्‍या केलेली
२. बारीक चिरलेला कांदा भेंडीच्या अर्धा होईल इतका
३. शेंगदाणेकूट पाव वाटी
४. ४-५ लसूण पाकळ्या तुकडे करून (अमेरिकेतल्या मोठ्या लसणीच्या २ पाकळ्या पुरतील)
५. २ आमसुले.
६. चिमूटभर चाटमसाला/ आमचूर पावडर (ऑप्शनल)
७. फोडणीचे सामान, तेल.
८. लाल तिखट १ टीस्पून, धने-जिरे पूड १ टीस्पून, गोडा मसाला १ टीस्पून. मीठ, साखर चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

१. कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा.
२. फोडणीतच आमसूल, लसूण तुकडे, कांदा घाला.
३. कांदा परतून गुलाबी होत आला की त्यात दाण्याचंकूट घाला. चमचाभर कूट बाजूला ठेवा.
४. कूट नीट परतून घ्या. बाजूने थोडं तेल सुटायला लागलं की भेंडी घाला.
५. मोठ्या आंचेवर भेंडी हळूहळू परता, आणि उरलेलं कूट घाला.
६. भेंडी थोडी परतून झाली की मग तिखट, धने-जिरे पूड, गोडा मसाला आणि साखर घाला. चाट मसाला/ आमचूर पावडर घाला.
७. सर्वांत शेवटी मीठ घालून, झाकण न ठेवता भाजी खरपूस परतून शिजवून घ्या.

आणि सोबत फेटलेलं दही आणि लिंबू लोणच्याचा खार! Happy

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी.
अधिक टिपा: 

खरं तर भेंडीच्या भाजीची पाकृ ती काय द्यायची असा विचार करत होते. पण भारतात जशी छान भेंडी मिळते तशी इथे प्रत्येकच वेळी मिळेल असं नाही. पूर्वी ३-४ वेळा मी केली ती फारच गोळा भाजी झाली होती. Sad
एकदा पटेलमधून भाजी घेताना इंटरनॅशनल हॉटेलमधे असलेला एक देसी शेफ भेटला आणि त्याने मला एक रेसिपी सांगितली भेंडीची. त्यात मी माझी भर घालून हा प्रयोग केला. इतर वेळी भेंडी खमंग व्हायला फोडाणीत तेल जरा जास्त घालावं लागतं, पण या भाजीत नेहेमीसारखं तेल पुरतं. दाण्याचं कूट फोडणीत घातल्यामुळे कमी तेल + खमंगपणा हे दोन्ही होऊन जातं. हा माझा शोध. Happy

यात तिखटाच्या आवडीनुसार धने-जिरे/ तिखट कमी-जास्त करता येईल.

माहितीचा स्रोत: 
पटेलमधे भेटलेले शेफ महाशय, स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपास सोडायला किंवा श्रावणात वगैरे कांदा-लसूण विरहीत भाजी करायची म्हणून काल मीच या भाजीत बदल केला. १ चमचा खसखस, २ चमचे तीळ आणि पाव वाटी सुक्या खोबर्‍याचे काप वेगवेगळे भाजून, मिक्सरवर एकत्र कोरडेच वाटून ते भाजीच्या फोडणीत ढकललं! Proud
(फोटो नाहिये.)

वेगळीच आहे पा.कृ., करुन बघायला हवी.

मी भेंडी,कांदा उभा चिरुन करते, गोल गोल चिरुन दाण्याचा कुट गोडा मसाला घालुन पण करते पण असे सगळे एकत्र आणि लसुण + आमचुन कधी केली नाही.

प्रज्ञा, आज केली मी ही भाजी. भेंडी चुकुन ऊभी चिरली आणि कांदा चुकुन (आळस केला) कमी झाला. पण मस्त झाली! भरुन भेंडीला झटपट आणि चवदार पर्‍याय आहे.

Pages