येरे येरे पावसा!

Submitted by -शाम on 5 June, 2011 - 12:53

कोण जाणे त्याला,पाऊस का आवडतो?
थेंब पडू लागले, की दाराआड दडतो

होडी करत नाही, की बांधत नाही किल्ला
सरीत भिजणं सोडा, तो सोडत नाही मला

टक लावून बघत राहतो ऊंच करून टाच
अंगणात जेंव्हा सुरू होतो थेंबांचा नाच

अशात पाऊस थांबला की जोरात ओरडतो
का येत नाही पुन्हा म्हणून रड रडतो

पहिली फिट आली तेंव्हा डॉक्टर बोलला होता
हळूहळू समज येईल जसा होईल मोठा

डॉक्टर कुठे देव असतो म्हणतो तसं व्हायला
दिवस्,महिने,वर्ष गेली गुण नाही आला

कधी वाटतं उद्या नक्की 'बाबा' म्हणेल मला
पुस्तक हवं, गाडी हवी, त्रास देईल चांगला

अजून तरी तसा उद्या आला नाही
रोज नवा प्रश्न्न घेऊन दिवस उभा राही

कसं समजवावं त्याला मोठ्ठं कोडं पडतं
त्याच्या पावसासाठी मग अख्खं घर रडतं

कुशीत घेऊन त्याला मग मीच अंगणात येतो
आभाळ भरल्या डोळ्यांनी पावसाला बोलावतो

"येरे येरे पावसा तुला देतो पैसा
येरे येरे पावसा तुला देतो पैसा "
--शाम

गुलमोहर: 

>>कसं समजवावं त्याला मोठ्ठं कोडं पडतं
त्याच्या पावसासाठी मग अख्खं घर रडतं

नि:शब्द.. काय लिहावे सुचतच नाहिये.. Sad