बेल्जियममधलं ग्लास हाउस (टोमॅटोचं शेत)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

बेल्जियममध्ये आल्यापासून इथल्या एखाद्या शेतावर जाउन बेल्जियन शेती बघायची खूप इच्छा होती. क्लायंटकडं थोडी चौकशी केल्यावर कळालं की एका कलीगच्या वडिलांची टोमॅटोची शेती आहे. मग तिच्याशी बोलून तिच्या आई-वडिलांची वेळ मागून घेतली आणि एका शनिवारी त्यांच्या शेतावर जाउन आलो. एकूण १.५ एकरमध्ये त्यांचं शेत आहे. इथं हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते त्यामुळं बहुतेक सगळी शेतं म्हणजे ग्लास हाउस असतात. इथं मुख्यतः टोमॅटो, ढबू मिरची (सिमला मिरची, पापरिका), बटाटे आणि फळं हेच पिकवलं जातं. त्या ग्लास हाउसची काही प्रकाशचित्रं आणि जी काही माहिती घेउ शकलो ती खाली देत आहे.

टोमॅटोची तयार छोटी रोपं हॉलंडमधून आणली जातात. साधारण फेब्रुवारीमध्ये नवीन रोपं लावली जातात. ही रोपं एप्रिलपासून टोमॅटो द्यायला चालू करतात ते साधारण ऑक्टोबर पर्यंत. पण ही रोपं जमिनीत लावली जात नाहित. या ग्लास हाउस मधली पूर्ण जमीन प्लॅस्टिकनं आच्छादली होती. रोपं श्रीलंकेतून मागवलेल्या मातीत (पॉटिंग सॉइल) लावली जातात. माझ्या कलीगनं सांगितल्याप्रमाणं ही श्रीलंकेतली माती सगळ्यात चांगली असते.

Farm6.jpg

हॉलंडमधून आणलेलं रोप खाली दाखवल्याप्रमाणं श्रीलंकेतून आणलेल्या मातीच्या ब्लॉकवर लावलं जातं.

Farm5.jpg

ही रोपं एका ओळित ठरावीक अंतरावर लावली जातात. रोप जसंजसं वाढेल तसं त्याला आधार दिला जातो. रोपांच्या २ ओळित एक लोखंडाची पाइप लावलेली असते. थंडीत या पाइपचा हीटिंगसाठीही वापर केला जातो. हीटिंगसाठी अजून एक वेगळी छोटी पाइपपण वापरली जाते.

Farm1.jpg

शिवाय औषधं आणि काही संप्रेरकं फवारण्यासाठीचं मशीन याच पाइपचा ट्रॅकसारखा वापर करून सगळ्या शेतात फिरवलं जातं.

Farm9.jpg

टोमॅटोच्या फुलांचं परागीभवन करण्यासाठी त्यांनी मधमाश्यापण पाळल्या आहेत. या माश्या दिवसभर झाडांवर फिरतात आणि रात्री त्यांच्या खोक्यात Happy परत येतात.

Farm_Bees.jpg

टोमॅटोंच्या वजनानं देठ तुटु नयेत म्हणून त्यांना देठाच्या इथं आधार दिला जातो.
Farm8.jpg

सर्व झाडांना दिवसातून पन्नासवेळा पाणी दिलं जातं. पाणी द्यायच्या वेळा संगणकाच्या मदतीनं ठरवल्या जातात आणि संगणकाच्या सहाय्यानंच पाणी ठिबकसिंचन पद्धतीनं दिलं जातं. पाण्यातूनच खतं आणि इतर सप्लिमेंटस (जर लागत असतील तर) दिली जातात. खतं आणि इतर सप्लिमेंटसच्या मिश्रणाचं मशीन पाण्याच्या लाइनला जोडलं आहे. महिन्यातून दोनदा, एक सल्लागार येउन सर्व पिकाची पाहणी करून जर पाण्याच्या पद्धतीत किंवा खताच्या प्रमाणात बदल करायचा असेल तर तसा सल्ला देउन जातो. पूर्ण ग्लास हाउसला हीटिंग यंत्रणा लावली आहे. कधी कधी वीज जाते त्यामुळं जनरेटरचीपण सोय आहे. शेजारीच यांनी एक शेततळं बांधलं आहे. त्याच तळ्यातलं पाणी शेतीसाठी वापरलं जातं. त्यांना मदतीसाठी २ पोर्तुगीज कुटुंबं आहेत. ते या शेतावरच राहतात.

टोमॅटोनं लगडलेल्या वेली...

Farm2.jpg

रोज सकाळी तयार लाल टोमॅटो ४-५ किलोच्या क्रेटस मध्ये घालून कलीगची आई वायदा बाजारात (ऑक्शन हाउस) लिलावाला घेउन जाते. १ स्क्वेअर मीटर मध्ये वर्षभरात जवळजवळ ५० किलो टोमॅटो निघतात.

Farm7.jpg

इथला वायदा बाजार सहकारी तत्वावर चालवला जातो. त्याच्या सभासदांना या बाजाराच्या बाहेर टोमॅटो विकता येत नाहीत. माझ्या कलीगचा नवरा स्वतः त्याच वायदा बाजारतून टोमॅटो आणि इतर भाज्या खरेदी करतो. पण तो थेट कलीगच्या पालकांकडून टोमॅटो खरेदी करू शकत नाही. बर्‍याचदा असेही झाले आहे की त्याने लिलावात खरेदी केलेले टोमॅटो यांच्याच शेतातले असतात. Happy

डिसेंबरमध्ये सर्वं रोपं काढून टाकली जातात. २-३ वर्षातून एकदा शेतातलं प्लॅस्टीक बदलतात. त्याचवेळी लागलंच तर माती पण बदलून आणि नांगरून घेतात.

कलीगशी बोलताना तिनं सांगितलं की आता शेतीत फारसं काही राहिलं नाही. पुर्वी जेवढा फायदा मिळायचा तेवढा आता मिळत नाही. तिचे वडील दुसरा एखादा पूरक व्यवसाय चालू करायच्या विचारात आहेत. एकूण काय तर भारतातल्या आणि इथल्या छोट्या शेतकर्‍यांची बहुतेक सारखीच अवस्था आहे. Happy

तिच्या आई-वडिलांना आम्ही शेत बघायला आलो याचं खूप आश्चर्य आणि अप्रूप वाटत होतं. दोघांनी आमच्या सगळ्या प्रश्नांची यथाशक्ती उत्तरं दिली (अर्थातच कलीगला डच - इंग्लीश भाषांतराचं काम करावं लागलं). तिथून निघताना त्यांनी मस्त पिशवीभरून ताजेताजे टोमॅटो आणि ऊर्वीला एक छानसं गिफ्ट दिलं.

असलंच एखादं छोटसं ग्लास हाउस आपण भारतात करूया अशी स्वप्नं रंगवत आम्ही तिथून बाहेर पडलो Happy

प्रकार: 

कलीगशी बोलताना तिनं सांगितलं की आता शेतीत फारसं काही राहिलं नाही

सगळे शेतकरी असेच बोलतात. तुम्ही शेती पूरक व्यवसाय म्हनून चालू करता की काय अशी त्याना भीती वाटत असणार. पण असली शेती प्रथमच पाहिली.. बाकी पिकांच्या शेतीबाबतही लिहा.

मनीष
एकदम मस्त माहिती. लिहीण्याची पद्धत आवडली. एवढीशी शेती पण किती शिस्तबद्ध प्रकारे केली जाते याच कौतुक वाटले. .

इतकी पण सुंदर शेती असते . ते लाल टप्पोरे टमेटो पाहून अगदी एखाद्या मासिका करता फोटोजेनिक पोझ दिल्या सारखे आहेत.

मस्त फोटो आणि वर्णन. टोमॅटोने लगडलेल्या वेली आणि देठाला दिलेला आधार - हे फोटो खूप आवडले. Happy
(असं काही वाचलं-पाहिलं की वाटतं - या जगात आपल्याला अजून ठाऊक नसलेल्या किती अगणित गोष्टी आहेत!! आणि आपण आयुष्याला एकसुरी म्हणतो...)

कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बद्दल अजुन आल असत तर बर झाल असत. आज नव्याने कोणी शेतीत करायला येत असेल तर त्याला शेत्/ग्लास हाऊस मधे किती गुंतवणुक करावी लागेल ?

मस्त. मागे मिताननेही बेल्जियममधल्या 'गोठ्या' बद्दल लिहिलं होतं Happy आपल्याकडची शेती पाहिल्यावर अशी 'मेकनाईज्ड' शेती असू शकते हे झटकन पचनी पडत नाही, पण अर्थातच यातही कष्ट, अनिश्चितता वगैरे आहेतच. त्यांच्या पद्धती निराळ्या, इतकंच!

फोटो आणि एकूण वर्णन खूपच छान....

पण व्यावसायिक दृष्ट्या विचार केला तर याचा उत्पादन खर्च आणि आणि एकूण उत्पादन यातून कितीसा फायदा मिळत असेल हा एक संशोधनाचा विषय ठरु शकतो.......

एकूण काय तर भारतात आणि इतर देशात शेतक-यांची स्थिती सारखीच आहे.......
अशी शेती भारतात करावयाची झाल्यास आपल्या इकडे ५० पैसे किलोने टोमॅटो विकूण शेवटी
शेतक-याला काय मिळणार........हा त्याही पुढचा संशोधनाच विषय आहे.......
(दर माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगतो आहे.)

धन्यवाद मंडळी..

कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बद्दल अजुन आल असत तर बर झाल असत >> हे त्यांचे वडिलोपार्जित शेत आहे त्यामुळं त्यांना शेत खरेदी नाही करावे लागले. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणं इथं साधारण एका एकराला ६०००० युरो इतका दर चालू आहे. मी माझ्या कलीगला ग्लास हाउसच्या एकूण खर्चाबद्दल विचारलं पण गप्पांच्या नादात तो प्रश्न बाजूलाच पडला.
भारतात मी ग्लास हाउसेस खूप कमी बघितलीत (जवळजवळ नाहिच). आपल्याकडं मुख्यतः पॉलि हाउस असतात जे वादळ-वार्‍यात कुचकामी ठरतात. इथे पण जर मोठ्या गारांचा पाउस पडला तर ग्लास हाउसचे नुकसान होतेच.

मी मगाशी प्रतीक्रिया दिली होती कुठे गायब झाली?
माहितीबद्दल धन्यवाद मनिष. टोमॅटो मस्त आहेत. अशी शेती करायला आवडेल. Happy

Pages