बाराचा

Submitted by नितीनचंद्र on 2 June, 2011 - 03:22

कोण व्यक्ती राजकारणात जायला लायक यावर मी बरेच दिवस संशोधन करतो आहे.

राजकारणातला प्रत्येक माणुस हा टग्या असावाच लागतो अस नाही पण बाराचा असावा असा नियम असावा.

बारा हा शब्द अकरा नंतर येणारा बारा असा नसुन "बा" आणि "रा" पासुन सुरु होणार्‍या अनेक शब्दांशी नाते सांगणारा आहे. मराठीतला "बाराचा" हा शब्दप्रयोग इतका चपखलपणे राजकारणी लोकांशी संबंधीत आहे हे मला आत्ताच पटले आहे. "बारा" गावच पाणी पिलेला किंवा पाजलेला हे शब्द सुध्दा समानार्थी आहेत हे ही या कारणाने मला पटले.

बाराचा म्हणजे बारामतीचा किंवा १२ जन्मतारीख किंवा १२ वा महिन्यातला जन्म अस नव्हे पण यात काही अर्थ जरुर असावा. किंबहुना १२ तारीख व १२वा महिना ( डिसेंबर ) जन्माला आलेले सर्व राजकारणात महत्वाची भुमिका बजावतात हे पडताळुन पहाण्यासाठी आणखी काही अभ्यासाची गरज आहे.

( वरील सर्व मा. शरद पवार यांना व मा. गोपीनाथ मुंडे यांना लागु पडत असल्यास तो योगायोग समजावा )

राजकारणात लोक एकतर "बा" चे म्हनजे बाईला मानणारे असावे लागतात.

उदा. सोनीयाबाई, इंदिराबाई, ममताबाई, जयललिताबाई इ.....

किंवा "बा"बांना मानणारे असावे लागतात.

उदा. बाळासाहेब ठाकरे, बाजपेयी ( हिंदीत असाही उच्चार होतो),

धार्मिक बाबांना मानणारे अनेक राजकारणी पुरुष व स्त्रीयांचा यात समावेश आहे.

सत्यसाईबाबा यांचे अनेक शिष्य राजकारणात आहेत आणि धिरेंद्र ब्रम्हचारींच्या शिष्यांमध्ये इंदिरा गांधींचाही समावेश होता.

देव दुध पितो या अफवेने भल्या भल्या राजकारणी लोकांची गोची झाली होती. नाही म्हणाव तर जनता नाराज आणी हो म्हणाव तर पत्रकार नाराज. या अफवेमागे एक बाबाच होते म्हणे.

"बा" चा आणखी एक अर्थ होतो.

"बा"रकावे जाणणारा. राजकारणी माणसाच्या प्रत्येक कृतीत काहीतरी कावा असतोच त्यातही बारीक कावा जाणणारा हा सच्चा राजकारणी असतो.

उदा.

एकदा विलासराव देशमुख निवडणुकीच्या भाषणात म्हणाले की मी मामुली लोकांची पर्वा करत नाही. हे विधान साधे होते पण राजकारणी लोकांनी त्याचा बारीक अर्थ मातंग्,मुसलमान आणि लिंगायत असा लावला. परिणामी विलासराव त्या विधानसभा निवडणुकीत ५००० मतांनी पडले. ( हा संदर्भ जरी १५ वर्षांपुर्वीचा आहे. )

आणखी विचार केल्यानंतर "बा" चे अजुनही अर्थ लागले.

"बा"लबुध्दीचा ज्याला भाषण लिहुन दिले की जसेच्या तसे वाचणारा.
"बा"लब्रम्हचारी असल्याचा आव आणणारा.
( मी ब्रम्हचारी नाही, अविवाहीत आहे असे खुलेपणाने सांगणारा एखादाच )
"बा"दरायणी संबंध जोडणारा.
( आपल्या देशात राजेशाही संपली असली तरी त्याचा प्रभाव अजुन राजकारणात आहे. या राज घराण्याशी संबंधीत किंवा गांधी, नेहरु, असे आडनाव असलेला किंवा येणकेण प्रकारे स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्याशी बादरायणी संबंध जोडणारा )

"बा"ईलवेडा किंवा "बा"टलीवेडा हे शब्द फारसे लागु पडत नाही कारण राजकारणी होण्यासाठी हे क्लॉलोफिकेशन नाही. राजकरणात पडल्याचा तो आफ्टरइफेक्ट आहे.

अर्थात मुळच्या वृत्तीनुसार राजकारणात यशस्वी झाल्यानंतर ज्या कृती दिसतात त्या अश्या.

१) कोणी "बा"रबालांच्या भवितव्यासाठी झटतो.
२) कोणी "बा"ईलवेडा होऊन धर्म बदलुन, मंत्रीपद त्यागुन लग्न करतो.
३) कोणी संसदेत/विधानसभेत "बा"चा, "बा"ची करतो.
४) कोणी मंत्री झाल्यावर सर्वकाही आपल्याच "बा"चे असल्यासारखे वागतो.

काही राजाकारणी "रा" ला मानणारे असतात.

उदा. राजीव, राजसाहेब, राहुल, सर्व "रा"ष्ट्रीय पक्ष इ.

"रा" चा आणखी एक अर्थ होतो फक्त रात्री कार्यरत असणारे. उदा. चोर, दरोडेखोर

"रा" चा आणखी एक अर्थ राक्षसी महत्वाकांक्षा असाही घ्यावा लागतो.

सारा देश विकत घेण्याची असो किंवा सारा देश आपल्या फायद्यासाठी विकण्याची असो. राजकारणात महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणुस टिकत नाही आणि पुढेही जात नाही.

ज्यांना "रा" चा खरा अर्थ माहित असतो ते राजनितीज्ञ असतात. विदुरनीती कृष्णनीतीचे अभ्यासक असतात. अर्थातच वैयक्तीक स्वार्थाचा यात मागमुस नसतो. राजकारणात राहुन राजनीतीचे नवीन मापदंड निर्माण करणार्‍या मंडळीत फारच थोड्या लोकांचा आज समावेश होतो. उरलेले सर्व राजनितीच्या नावाखाली झुंड्शाही, पुंड्शाहीचा पुरस्कार करताना दिसतात.

नावात "रा" असेल म्हणजे ती व्यक्ती कुशल राजकारणी असेलच असे नाही. अन्यथा रामदास आठवलेंना सध्याचा वनवास भोगावा लागला नसता. कोकणचा वाघ असलेले रामदास कदम यांना विरोधीपक्ष नेतेपद मिळायला इतका उशीर लागला नसता.

"रा" पासुन सुरु होणार्‍यांमधे रामदास स्वामी येतात ज्यांचे वर्णन राजकीय गुरु असे करावे लागेल. आता ही जागा सध्याच्या काळात "रा"मदेवबाबा घेतील अस चित्र आज ४ जुन २०११ पासुन दिसु लागेल अशी चिन्ह दिसत आहेत.

गुलमोहर: 

मान गये उस्ताद !

गेला माधव कुणीकडे या नाटकाच्या नावातूनही काहींना माळी, धनगर, वंजारी हा भाजपाचा फॉर्म्युला दिसला होता Happy .

बा वरुन बापूजी राहिले की ! बा वरुन बांधिलकी पण. (तरी बरं खास "कोल्हापुरी" संदर्भ देत नाहिय्ये.)
बा वरुन बापु राहिले ? नाही हो, बादरायणी संबंध जोडलाय की. बापु असा शब्द नाही वापरला हे बरोबर आहे.

बांधिलकी ? कशाची विचारांची ? समाजवाद, हिंदुत्व किंवा गांधीवाद याच्याशी कोणाचीच बांधिलकी आज राहिली नाही. येण केण प्रकारेन सत्ता हस्तंगत करणे ह्या विचाराशी मात्र प्रत्येक राजकारणी व्यक्तीची बांधिलकी आहे.

कोल्हापुरी संदर्भ काही समजला नाही.

भारीच.. Proud

टग्यांवरून अजित दादांची आठवण झाली.. Wink

आणि बाई बद्दल म्हणता तर मायावती बाईंना कसे विसरलात? त्यांचे गुरू पण "बा"बासाहेब आंबेडकर.. अर्थात त्यांच्या बद्दल आदर आहे मला, "बा" हा इथे फक्त योगायोग समजावा..

"रा" वरून राघू आठवला, पोपटपंची.. शेवटी नेत्याला तेच करावं लागतं आयुष्यभर..

फक्त "रा" असून चालत नाही याचं अजून उदाहरण म्हणजे "रा"मविलास पासवान आणि ए. "रा"जा.. Happy

लेख मस्तच आहे, आपला रिसर्च आवडला.. Happy

नितीनजी,
लेख आवडला
तुमचा एकुण राजकारणाचा आणि लोकांचा अभ्यास किती दांडगा आहे हेच या लेखातुन स्पष्ट होतं..
तुमच्यासारख्यांमुळे आमच्यासारख्या नवशिक्यांना लिहायला नेहमीच स्फुर्ती मिळेल
Happy

राजकारणातला प्रत्येक माणुस हा टग्या असावाच लागतो अस नाही पण बाराचा असावा असा नियम असावा.
तस राजकारणात आता सभ्य,सज्जन आणि निश्कलंक नेत्यांना तसं नेहमीच टिकुन राहणं किंवा नव्यानं प्रवेश करणं खरच सोप राहिल नाही हे नक्कीच खरं आहे,मीही तसा एकुण राजकारणांबद्दल (फक्त एक मतदार्,नागरीक या नात्यानं) बहुतेकवेळा चांगल बोलत नाही,पण अशा या 'टग्यां'च्या साम्राज्यात हा वरील नियमाला काळ फासणारा,असे नियम धाब्यावर बसवणारा असा खा.राजु शेट्टी सारखा सामान्य शेतकरी माणुस यावर विश्वास ठेवावा लागेल, जो जनतेंने वर्गणी काढुन निवडुन दिलेला,स्वतः पैशाने कंगाल असलेला, निष्कलंक,निर्व्यसनी,भ्रष्ट नसलेला,अजुनही अगदी साध्या सामान्य माणसांसारखे जीवन जगणारा,लोकांच्या वर्गणीतुन मिळालेल्या गाडीतुन आणि कर्ज काढुन घेतलेल्या गाडीतुन फिरणारा, आपल्यासाठी राबलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना कधी धाब्यावर जेवण (दारु म्हणा) इत्यादी द्यायला पैसे नसलेला, गेल्या कित्येक वर्षात एक गुंठाही जमीन न घेता,स्वतःसाठी घर/बंगला देखील न बांधणारा, आपली जुनी मालमत्ता वाढु न दिलेला (महाराष्ट्रात तरी बहुतेक एकमेवच !) असा अजब आणि अशक्य 'खासदार' या देशाच्या मातीत नक्कीच आहे.देशात काही इतरही असतीलही.यावर या जमान्यात अनेकांचा विश्वासही बसणार नाही पण असे लोक आजही आपल्या देशाच्या संसदेत आहेत,याचा आणि म्हणुन या देशाचाही खुप अभिमान वाटतो.
तसं बहुतेकवेळा आजकालच्या राजकारणाबद्दल,त्यातल्या नेत्यांबद्दल खुप चांगल ऐकायला मिळत नाही,
टीका,आरोप (बहुतेकवेळा ऐकीव माहितीवर) आपण सहजच करतो, पण सत्यता तपासल्याशिवाय असं करण हे बरोबर नाही अस मला वाटत.
Happy

बाराच्या भाषेत बोलायचं झाल तर आतापर्यंत या अशा 'बारा' नेत्यांच्या विरोधाला,शेवटी चक्क 'बारा'मतीच्या बलाढ्य (असे इतरत्र लोक म्हणतात म्हणून) नेत्यांला, त्यांनी रचलेल्या नाना प्रकारच्या डावपेचांना,असंख्य प्रयत्नांना धुळ चारत,त्यांच्या ताकतीला टक्कर देत, त्यांनी केलेल्या बदनामीला उलथवुन टा़कुन 'एकहाती' पुरुन उरलेला अशी माणसं याच राजकारणात आजही आहेत हा चमत्कारच म्हणायला हवा.

छान स्पष्टीकरण.....ह्म्म्म...

सावरी

नितिन, कोल्हापुरी शिव्या तर मी इथे देऊ शकत नाही. पण त्यांचा सभ्य भाषेतला अर्थ, बारा आयांचा / बारा बापांचा असा होतो.

कोल्हापुरी शिव्या तर मी इथे देऊ शकत नाही. पण त्यांचा सभ्य भाषेतला अर्थ, बारा आयांचा / बारा बापांचा असा होतो.:हहगलो:

दिनेशदा, 'सभ्यता' Rofl

वा , मस्तच लिखाण.तुमचा अभ्यास दांडगा दिसतोय .त्यामुळे राजकारणात गेलात तरि बाराच्या भावात नक्कि जाणार नाहित.

झकास्स नितीनभाऊ , तुम्ही पुण्याचे म्हणजे महा बाराचे ना

नाय राव मी चिंचवडचा. आमच्या मातोश्रींना माझ्या जन्माच्या वेळी नाईलाजास्तव पुण्याला यावे लागले कारण चिंचवडला मॅटेर्निटी होम नव्हते.

चिंचवड मागच्या निवडणुकी पर्यंत बारामती लोकसभा मतदार संघात येत होते हा केवळ योगायोग आहे.

चिंचवड मागच्या निवडणुकी पर्यंत बारामती लोकसभा मतदार संघात येत होते हा केवळ योगायोग आहे.>>>>>>> Lol

चिंचवड मागच्या निवडणुकी पर्यंत बारामती लोकसभा मतदार संघात येत होते हा केवळ योगायोग आहे.>>
कोथरुडही देखील याच मतदारसंघात आहे अस समजलं, चिंचवड देखील यातच हे कस काय ?

आमच्या मातोश्रींना माझ्या जन्माच्या वेळी नाईलाजास्तव पुण्याला यावे लागले कारण चिंचवडला मॅटेर्निटी होम नव्हते.>>>>

बरोबर आहे, बाराच्या लोकांसाठी देव सगळी सोय करून ठेवतो, योग्य ठिकाण, योग्य वेळ Wink ह.घे.

Pages