व्हॅन गॉग.. स्टारी नाइटस्..

Submitted by मी मुक्ता.. on 31 May, 2011 - 02:24

(व्हॅन गॉग.. पोस्ट इंप्रेशनिस्ट कलाकारांमधलं खूप महत्वाचं नाव. त्याच्या रंग, रेषा जशा भुरळ घालतात तसाच त्याच्या आयुष्याचा प्रवासही. स्टारी नाईट्स नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या ३ कलाकृती. Starry Night Over the Rhone, Cafe Terrace at Night आणि The Starry Night)
------------------------------------------------------------------------------------
1.JPG
निळेपणाच्या छटा नवीन नव्हत्याच मला कधी,
आठवणी येतात त्याच्या कितीतरी आधीपासून वाहतेय निळाई श्वासात..
पण तू अंधार रंगवायला काढलास तेव्हा
कोणाला वाटलं होतं अंधार पण असा..
इतका रंगीत असेल?
खरंच, ती कोणती वेळ होती,
जेव्हा तुझ्या मनातल्या अंधाराचं लखलखीत प्रतिबिंब पडलेलं आकाशात?
घनगर्द निळा आणि गूढ हिरवाईच्या छटा लेऊन आभाळ डोकावत राहिलं पाण्यात..
कोणालाही कळू न देता तूच रुजवलीस ना स्वप्नं त्यांच्या डोळ्यांत..
आणि मग त्यातली काही तूच उधळूनही लावलीस आभाळात
अंगभूत लहरीपणानुसार...
वेडे लोक त्यालाच चांदण्या म्हणतात अजूनही..
जग कधीच नव्हतं तुझ्यासाठी..
तुलाही सोसलंच नसतं ते..
पण सारंकाही तसंच राहिलय तुझ्यानंतर..
अजूनही रात्री सगळं गाव शांत झोपलेलं असतं..
एखाद्या कॉफीशॉपमधली तुरळकशी वर्दळ सोडता,
जर्द पिवळ्या प्रकाशाला शोषत असतो गूढ अंबर..
परमेश्वरही दुसर्‍या दिवसापर्यंत निश्चिंत झालेला असतो..
पण त्या स्वप्नांचं काय?
तुला माहितेय?
अजूनही त्या स्वप्नांचे ढीग पेटत असतात आकाशात
डोळे कितीही मिटून घेतले तरी आभाळ येतच अंगावर..
जगाला तेव्हाही कोणाशी घेणंदेणं नव्हतं...
आताही नसतेच..
गावकुसाबाहेर कुठल्या वेदनेचं पातं,
कुठल्या प्रतीक्षेत आभाळ तोलून उभं आहे आज परत,
याची तशीही कुणाला कल्पना असते?

3.JPG2.JPG

गुलमोहर: 

फारच सुंदर मांडलस मुक्ता.. किती मस्त टिपलयस त्याच्या कलेसकट या कलाकाराला... खरच हे जग कधिच नव्हत त्याचं.. त्याचं मनाचं..कलेचं विश्व फक्त त्याचं.. त्याच्या वेडेपणाच्या गोष्टी आजही लोक चघळतात पण त्यातल एक तरी कलंदर वेड जगुन दाखवेल का कोणी? प्रेयसिला फक्त एक नजर तेही दुरुन बघण्यासाठी रेल्वेचे ४ तासाचे अंतर (तेव्हचे) म्हणजे एक दीड दिवस.. उपाशीपोटी,थंडी पावसात चालत जायचे (पैसे नसल्याने)अन परत यायचे तितकेच अंतर.. ही कमाल त्याच्या सारखा कलंदर वेडा ,खरा प्रेमीच करू जाणे..

मुक्ता माफ कर.. कविता मी वाचलीच नाही. ती नंतर बघणारच आहे..पण या चित्रांनी भुरळ घातली. विशेषतः शेवटचं चित्र !!
ते नुसतं चित्रं नाही खास... चित्रकार काहीतरी सांगतोय नि ते समजत नाही तोवर नजर तिथेच फसत जातेय.... वेड लावणारं आहे हे !!!

व्हॅन गॉघ बरोबर त्याच्या भावाचा पण उल्लेख करते. आपला हा वेडा भाउ उत्क्रुष्ठ कलाकार आहे ह्यावर त्याचा कायम विश्वास होता आणि त्याची चित्रे प्रसिद्ध करण्यासाठी त्याने जिवाचे रान केले पण आयुश्यात दोघांना दरिद्र्य आणि अपयश कायम राहिले. बटाटे गोळा करणारे मजुर वा टेबलाभोवती जेवण जेवणारे गरिब कुटुम्ब, अत्यंत साधे स्वस्त रंग वापरुन पण अशी अप्रतिम चित्रे आणि भाव कसे जिवंत व्यक्त झाले.
आजकाल तर काय इम्प्रेशनिस्ट बनन्यासाठी इम्प्रेशनिस्ट चित्र काढतात, या चित्रकारांची चित्र काढणे हीच गरज होती वेदना आपोआप प्रकट झाली.

सांजसंध्या हे थोडेसे तिसर्या चित्राबद्दल.
http://en.wikipedia.org/wiki/The_Starry_Night
तिन्ही चित्रात हेच सर्वात जास्त प्रसिद्ध आहे पण मला पहिली दोन पण आवडतात विशेषतः पहिल्यात
दगडाजवळ किनार्याला लावलेली अर्धवट दिसणारी नाव आणि तिथुन परतणारे जोडपे.
व्हॅन गॉघच्या तिसर्या चित्राचे वैशिष्ठ्य की जरी इम्प्रेशनिस्ट असले तरी ज्या दिवशी ज्या जागेवरुन त्याने आकाश काढले त्या वेळेच्या तार्यांच्या जागा अचुक आहेत.
ह्या तिसर्या चित्रात त्याने रात्री आकाशातले वेग्वेगळे पट्टे पकड्ण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यातिल रंगात फारसा फरक नाही म्हणुन निळ्या आणि हिरव्या रंगाचे (exaggeration) वापरले.

मुजरा मॅडम!!!
दंडवत सुद्धा!
अशक्य लिहिलंय...
(मला कळेल तेव्हा कळेल... Happy )

पण तू अंधार रंगवायला काढलास तेव्हा
कोणाला वाटलं होतं अंधारपण असा..
इतका रंगीत असेल?

अजूनही त्या स्वप्नांचे ढीग पेटत असतात आकाशात
डोळे कितीही मिटून घेतले तरी आभाळ येतच अंगावर..
जगाला तेव्हाही कोणाशी घेणंदेणं नव्हतं...
आताही नसतेच..
गावकुसाबाहेर कुठल्या वेदनेचं पातं,
कुठल्या प्रतिक्षेत आभाळ तोलून उभं आहे आज परत..
- खास मुक्ता टच!! Happy

thats it from me!!

btw, तुझ्या माध्यम किंवा एका चंद्रासाठी किंवा ता.क. वाचून व्हॅन गॉग ने कुठलं चित्र काढलं असतं बरं?? Happy

आणि आता तुझ्या कवितेबद्दल

जितकी ही चित्रं अफाट आहेत तितकंच तुझं लिखाण.. त्या तिस-या चित्राने जो अद्भुतरम्य फील आला तोच तुझं लिखाण वाचतानाही आला.. सुपर्ब !!

सर्वांचे खूप खूप आभार.. Happy

चेतना, निलीमा, Happy त्याच्याविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे. नंतर कधीतरी त्याच्याविषयी सविस्तर..

आनंदयात्री, माझ्या कविता आणि त्याची चित्रं? स्वप्न पण बघवत नाही एवढं मोठं.. Happy

शाम, नशीबवान..? ह्म्म... वाचा त्याच्याविषयी थोडसं... Happy

व्हॅन गॉग आणि मुक्ताबाई..

तुमची कविता आणि या मनस्वी कलाकाराच्या या महान कलाकृती या दोन्हीतून आम्हाला कल्पनाचमत्कृती या अलंकाराचा विलक्षण अनुभव मिळाला.

कविता आवडली. Happy

या डच चित्रकाराच्या नावाचा योग्य उच्चार फिन्सन्ट फॅन होख असा आहे.

क्रीएटीव्ह Happy

व्हँगोच्या पिवळ्या रंगाच्या अनियमीत वापरामुळे तो रंगांध असावा का असा प्रश्न बरेचदा विचारल्या जातो.
त्याबद्दल थोडे: http://www.answerbag.com/q_view/995756

अप्रतिम !
आपण काढलेलं गॉघच्या अंतरंगाचं शब्दचित्रही तितकंच प्रभावी !
<< व्हॅन गॉघ बरोबर त्याच्या भावाचा पण उल्लेख करते. >> निलीमाजी, खरं तर हे आवश्यकही आहे; गॉघच्या पत्रव्यवहाराचे खंड प्रकाशित झाले आहेत व त्यात आपल्या वादळी, स्फोटक व आत्यंतिक संवेदनाक्षम अशा विचारी अंतरंगाचं खरं 'शेअरींग' त्याने या भावाबरोबरच केलंय, असं माझा एक व्यासंगी मित्र मला सांगतो. [ मी फक्त त्यातली कांही पत्रं चाळली आणि नुसत्या चित्रांवरच नाही तर जीवनाच्या अनेक पैलूविषयीं गॉघ किती खोल विचार करत असे, हे पाहून अवाक झालो ]

ते नुसतं चित्रं नाही खास... चित्रकार काहीतरी सांगतोय नि ते समजत नाही तोवर नजर तिथेच फसत जातेय..>>>
बरोबर ओळखलस सांजसंध्या... वेड्याच्या हॉस्पिटल मधे असताना.. अन शेवटी त्याचे भ्रमाची तिव्रता वाढत असण्याच्या काळात काढलय त्याने हे तिसरं चित्र.. अटॅक यायच्या आधी काहीतरी त्याच्या आतलं व्यक्त होत असावं..
पिवळ्या रंगाचा वापर.. नीट नावा नुसार डिटेल्स नाही आठवत.. पण पहिल्यांदा जेव्हा तो भरपुर कडक ऊन असलेल्या प्रदेशात गेला (तो नेहमिच भटकत राहिला अन मनला वाटेल तिथे रहायचा ) अन तेथिल सुर्य अन सुर्यफुलाचा पिवळा रंग यांच्या प्रेमात पडला.. अन ते रंग उतरवु लागला कॅनव्हास वर अधाशा सारखा.. अन मनासारखा रंग जमे पर्यंत खुप प्रयोग केले..
@ शाम.. त्याचं जिवन खरच वाचा मग कोणी त्याला नशिबवान म्हणुच शकणार नाही.. आपण नशिबवान त्याच्या कलेचा आस्वाद घेतोय..
मुक्ता खरच लिहि छानसा लेख..

अजूनही त्या स्वप्नांचे ढीग पेटत असतात आकाशात
डोळे कितीही मिटून घेतले तरी आभाळ येतच अंगावर..>>> अप्रतिम!
व्हॅन गॉच्या कुठल्याही चित्रात हजारो कथा लपल्या आहेत असे नेहमीच वाटते, आपल्या अनुभवाची, संवेदनेची झेप जेवढी तिथली कथा आपल्याला दिसू लागते आणि मग वाटतं की नाही, यापलिकडेही काही आहे!
मुक्ता, 'लस्ट फॉर लाईफ' वाचले नसशील तर.....वाच!

<< त्याचं जिवन खरच वाचा मग कोणी त्याला नशिबवान म्हणुच शकणार नाही.. >> १००% अनुमोदन. आणि सहज जमलं तर "लस्ट फॉर लाईफ"मधे कर्क डग्लसने अचूक साकारलेला गॉघ पण जरूर बघा. [ खालील गॉघच्या 'सेल्फ पोर्ट्रेट' बरोबर काढलेला कर्क डग्लसचा फोटो 'विकेपिडीया'तून घेतला आहे ] -

642px-Kirk_Douglas_Lust_for_Life.jpg

मुक्ता .................. शब्दच नाहीत.............
>>>अजूनही त्या स्वप्नांचे ढीग पेटत असतात आकाशात
डोळे कितीही मिटून घेतले तरी आभाळ येतच अंगावर..
जगाला तेव्हाही कोणाशी घेणंदेणं नव्हतं...
आताही नसतेच..
गावकुसाबाहेर कुठल्या वेदनेचं पातं,
कुठल्या प्रतिक्षेत आभाळ तोलून उभं आहे आज परत,
याची तशीही कुणाला कल्पना असते?<<<
खल्लास..................

पहिलं चित्र चेटूक करतंय, तिसरं अंगावर येतंय.
अशात मनात उमटलेलं काही शब्दांत इतकं छान उतवरलंत तुम्ही!

कविता लिहिताना चित्रात बुडून गेला होतात, की किंचित मागे येऊन बघायचं भान उरलं होतं?

गावकुसाबाहेर कुठल्या वेदनेचं पातं,
कुठल्या प्रतिक्षेत आभाळ तोलून उभं आहे आज परत,
याची तशीही कुणाला कल्पना असते?

आणि अंधार 'रंगवायची' कल्पना भारीच! चित्रांना शोभेलसी.

तुझी कलासक्तता, हा प्रश्नच नव्ह्ता कधीच माझ्यासाठी!!
पण
लि़खाण, काव्य, कला, नाट्य...अजुन बरच काही...आता चित्रं ही!!
बाई हा झरा असाच, वाहत राहुदे !!

शब्द त्रोटक वाटतायेत आता!
काय म्हणु??!!
चित्रभर विखुरलेली,स्टारी नाइट...आपल्याच निराळ्या द्रुष्टीत दाखवलीस..
चित्रांचा क्रमही...क्रम बदलतो तसा अर्थही...हा सहीच!

when i met u
starry nights had few blues...
moving ahead wid d road i knew
burning sky had starry hues...
For once u said,
for once it blew...
starry nights soaked up..all i had too!

कविता काय किंवा चित्र काय, अभिव्यक्तिची माध्यमं...
शब्दांचे अर्थही व्यक्तिपरत्वे बदलतात आणि रंगरेषांचे सुध्दा..
कवितेवरुन चित्र काढणारे खूप पाहीलेत, पण चित्राची कविता प्रथमच...
या कवितेच्यारुपानं त्याच्या सुंदर चित्राला तितक्याच सुंदर शब्दांत व्यक्त होण्याचं भाग्य मिळालं
म्हणून तो नशीबवान म्हटलं...
बाकी कलाकाराची कला हिच त्याची ओळख. त्यासाठी त्याच्या खाजगी आयुष्याचे संदर्भ जोडण्याची गरज नसते हे माझं वैयक्तिक मत. कलाकार त्याची कला जगत असतो हे ही मान्यच.
कलाकारांच्या व्यथेची खूप उदाहरणं आपल्याकडेही आहेत.
(उदा. ताजमहाल) एक धागा सुरु करुन बघा, हजारो मिळतील. गॉघचं काय कौतुक?

मला वाचनसल्ला देणार्‍या भाऊ, मुक्ता नि चेतना यांचे आभार.
मी फक्त भेट मिळालेली पुस्तकं वाचू शकतो कारण ग्रंथालय ६० कि.मी आहे
त्यात तुमचा हा 'गॉघ' सापडला तर बरं!

मुक्ताईच्या स्टारी नाईटच्या या कवितेने खरच वेड लावलय... मी शोध घेतला तेव्हा काही जणांनी या वर कविता लिहीलेल्या आढळल्या. या चित्रांनी सर्वांनाच वेडं केलय तर !

Pages