तुम्हे याद हो के न याद हो - ४

Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2011 - 03:47

"कुठल्या कॉलेजलाय गं ती?"

"निवेदिता?"

"हं?"

"गरवारे"

"काय करते?"

"कॉमर्स.. एफ वाय"

"......."

"दादा... तिचे वडील सब इन्स्पेक्टर आहेत.. वाटत नाहीत नाही?"

"त्यात काय वाटायचंय?... तू तरी कुठे वाटतेस यडचाप असशील असे?"

"गप्प बस.. "

"वरून तरी तशी शहाणीच वाटतेस.."

"तू वरूनही यडचाप दिसतोस आणि खराही यडचापच आहेस..."

"मोठ्या भावाला असे बोलू नये.."

"मोठ्या भावाने स्वतःचा आदर ठेवून घ्यायला शिकावा आधी.. चल मला उशीर होतोय.."

पहाटे पाचची वेळ! रविवार! क्षमा तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर सिंहगडला निघाली होती. संध्याकाळी परत! तिला बसस्टॉपपर्यंत सोडायला उमेश चालला होता. आई आणि बाबा उठलेले होते. पण ते त्यांच्या त्यांच्या व्यापात होते. आजोबाही जागेच होते पण ते पडून होते. क्षमा कालपासून उमेशलाही म्हणत होती की तूही चल आमच्याबरोबर! पण तो म्हणत होता की तुम्ही सगळे माझ्यापेक्षा लहान आणि खूप बावळट आहात. मी असल्या ग्रूपबरोबर सिंहगडला येण्यासाठी रविवारी सकाळी लवकर उठणे शक्य नाही. त्यामुळे फुरंगटून क्षमा रात्री दहापर्यंत त्याच्याशी बोलतच नव्हती. आणि नंतर तिने इतकेच विचारले होते की सोडायला तरी येणार आहेस की नाही! त्यावर तो 'जमणार नाही' असे म्हणाल्यावर आईने त्याला झापल्यामुळे त्याला तयारी दाखवावीच लागली व क्षमा हासली होती.

त्यामुळे आत्ता तो सकाळी लवकर उठल्यापासूनच वैतागलेला होता आणि क्षमाला यडचाप म्हणून मोकळाही झालेला होता. शेवटी दोघे घराच्या बाहेर पडले आणि वाड्याच्या दाराबाहेरही! तर उमेश चार पावले चालून पुढे गेला तर क्षमा दारातच उभी!

उमेश - आता त्या बाबूराव सणसांच्या पुतळ्यासारखी उभी काय राहिलीयस??

क्षमा - ती येतीय नं बया..

उमेश - कोण??

क्षमा - निवेदिता..

ठण्ण! खट्ट! ढॉम्म्म्म्म्ब!

तिच्यायला??? निवेदिता येतीय???? या बावळटने आपल्याला हे आत्ता सांगावं??

आता एकदम भूमिका कशी काय बदलायची आपली? आपल्याहून लहान असली तरी क्षमालाही कळेल की आपण का यायला तयार झालो आहोत अचानक??

उमेश - याचसाठी... याचसाठी मी तुमच्याबरोबर येत नाही...

क्षमा - का???

उमेश - सगळ्या मुली... मी येऊन काय करणार??

क्षमा - ई मुलं आहेत की तीन??

उमेश - कोण मुलं आहेत??

क्षमा - राजेश आहे... सुमेध आहे.. पक्या आहे..

उमेश - हे कोण आहेत पक्या बिक्या??

क्षमा - आमच्या वर्गातलेत..

उमेश - अन हे तू मला आत्ता सांगतीयस.. मला काय सिंहगड आवडत नाही??

क्षमा - दादा तुला म्हणलेवते हं?? मुलंही आहेत म्हणून..

उमेश - जाउदे आता.. आता माझं आवरूनही व्हायचं नाही..

क्षमा - तू काय नववधू आहेस आवरायला?? येत असलास तर चल पटकन... आम्ही थांबतो दोघी..

अत्यंत वैतागल्यासारखा आणि 'ऐन वेळी सांगता तुम्ही हे सगळं' असा चेहरा करून उमेश पुन्हा घरात गेला.

आई - हे काय??

उमेश - बावळट आहे ती... मला वाटलं फक्त मुली चालल्यात..

आई - मग??

उमेश - मुलंही आहेत..

आई - मग??

उमेश - मग मला काय प्रॉब्लेम आहे जायला??

आई - मग??

उमेश - अगं मग मग काय?? आता मीही चाललोय....

आई -मग जा की?? ती कालपासून तेच म्हणत होती की?

उमेश - हो पण दहा मुलींमध्ये मी एकट्याने जायचं का??

आई - मुलं आहेत ना? मग जा आता...

उमेश - तुला तर कधी एकदा मी जातोय असंच झालेलं असतं..

आई - नाही रे बाळा.. हे घे चहा.. आईला कधी वाटेल का आपला मुलगा बाहेर जावा सारखा?

उमेश - पाणी तापलंय का?

बाबा - तुझी आंघोळ म्हणजे काय मुघल बादशहाचे स्नान आहे का? स्वतः लाव गीझर!

उमेश - जाऊदेत गार पाण्यानीच करतो..

आई - अरे काय हे उमेश???

उमेश - एक तर आधीच उशीर झालाय.. आलोच आंघोळ करून..

बारा मिनिटे सत्तावीस सेकंद!

आंघोळ, कधी नव्हे ती मिळेल ती पावडर फासणे, भांग पाडणे, त्यातल्यात्यात बरा टीशर्ट आणि जीन्स चढवणे आणि शूज घालणे! या क्रियांना एवढा वेळ लावून उमेश उत्साहाच्या सर्वोच्च शिखरावरून वाड्याच्या दाराबाहेर आला तर...

क्षमा - ती नाही येत आहे... बरं नाहीये... चल लवकर आता..

उमेश - आSSSSSSSSSSS

क्षमा - काय झा.. क.. अरे काय झालं????? आं??? दादाSSSSS

उमेश - लच... कला... पाय लचकला..

क्षमा - आई??? ए आई... दादाचा पाय लचकला... लवकर ये..

आईला ते ऐकूच गेलं नाही. क्षमा उमेशच्या पायावरून हात फिरवत होती. तो वेदनांनी विव्हळल्यासारखे करत होता. तेवढ्यात मागून आवाज आला..

"काय झालं?? लागलं?? कसं काय???"

हे काय??? आली??? ही आली?? च्यायला आली की राव ही!

आता पाय बरा होणं अत्यावश्यक आहे..

निवेदिता तयार होऊन आली होती.

क्षमा - काय गं?? काकू म्हणाल्या बरं नाहीये..

निवेदिता - बरंय गं.. मी जाऊ नये म्हणून काहीतरी सांगत असते ती... याला काय झालं??

क्षमा - पाय मुरगळलाय..

उमेश - आहाहाहाहाहाहाहा.. काय नस नसेवर चढलीवती.. बाप रे.. हं... चला आता...

क्षमा - हे काय?? पाय थांबला दुखायचा???

उमेश - नसेवर नस चढली की तेवढ्याचपुरत दुखतं... चल आता.. बघत बसू नकोस..

निवेदिता - चढता येईल का?? डोंगर??

उमेश - आता वेदना कमी होतायत... चला चला...

आनंदाचे डोंगर मनात घेऊन उमेश पुढे! चक्रावलेली क्षमा मागे! आणि मिश्कीलपणे हासणारी निवेदिता तिच्याबरोबर!

असं त्रिकुट निघालं भल्या पहाटे!

निवेदिता - तू गेलीयस कधी? सिंहगडावर??

क्षमा - दोनदा.. तू??

निवेदिता - मी आज पहिल्यांदाच..

उमेश मागे वळून कर्त्या पुरुषाप्रमाणे बोलला..

उमेश - काही विशेष नाहीये.. कुणालाही चढता येतो सिंहगड!

फारच धीर बीर आल्यासारखा चेहरा करून मुली निघाल्या मागोमाग!

तेवढ्यात याज्ञवल्क्य आश्रमापासचं कुत्रं भुंकलं! त्याचा आवेश पाहून उम्याही हादरलेला होता. पण इज्जतीचा सवाल वगैरे असल्यामुळे त्याने एक दगड उचलल्याची अ‍ॅक्शन केली. तर ते जास्तच भुंकलं! मग खरच एक दगड उचलून फेकला उम्याने! मग घाबरून पळालं कुत्रं! विजेत्याच्या थाटात उम्या मागे पाहू लागला. दोघींच्या चेहर्‍यावर अंधुक प्रकाशात त्याला कौतुकाची झलक दिसली असावी.

उमेश - या भागात हल्ली फार कुत्री झालीयत..

कॉर्पोरेशनचा कर्मचारी असल्याच्या थाटात म्हणाला उमेश!

चालत चालत भिकारदास मारुतीपाशी आले तर... एक म्हणजे एकही जण नाही..

निवेदिता - हे काय????

उमेश - आजचंच ठरलवतं ना??

क्षमा - म्हणजे काय!

उमेश - मग गेले कुठे सगळे??

क्षमा - मला काय माहीत??

एटीजी उपहार गृह! पाटी वाचून सगळे तिथे गेले. गगन चहा करत होता. वसंता गल्यावर बसून देवापुढे उदबत्ती लावत होता.

उमेश - काका? आत्ता एक बस गेली का हो सिंहगडला?

वसता - हो.. दहा मिनिटे झाली...

उमेश - आता पुढची??

वसंता - एक तासाने!

वैतागलेच सगळे!

क्षमा - तुझ्यामुळे उशीर झाला... कालच हो म्हणाला असतास तर??

उमेश - मला काय माहीत मुलंही येणार आहेत म्हणून.. ते तू मला आज सांगीतलंस..

क्षमा - मग मुलींमध्ये आलास तर काय धाड भरणार होती का तुला??

उमेश - बघा.. आहे का? सहा मुली अन मी एकटा?? वेड लागलंय का मला??

निवेदिता - पण आता काय करायचंय काय??

उमेश - काय करणार?? बसायचं एक तास इथेच..

क्षमा - आता काय बसण्यात अर्थ आहे इथे?? आपण पोचेपर्यंत ते सिंहगडावरही पोचलेले असतील..

उमेश - मग म्हणणं काय आहे तुझं?

क्षमा - जाऊ आता घरी... इथे एक तास थांबायचं अन उन्हात चढायचा होय गड??

उमेश - मग चला...

सगळेच वैतागले होते.

निघाले परत!

उमेश - अजून ऐका माझं... एक तास म्हणजे काही फार नाही.. सहज जाईल एक तास.. मस्तपैकी गडावर जाऊन येऊ... काय गं??

निवेदिता - मला चालेल...

क्षमा - मग काय करायचंय?? थांबायचंय का??

उमेश - थांबूSSSS नाहीतरी घरी बसून काय करणार आहोत..

पुन्हा आले सगळे! यावेळेस एटीजीमध्येच बसले. एकेक मिसळ झाली. मग चहा आला. गगनचा अफाट आवाका आणि अती परिपक्व बोलणे यामुळे करमणूक होतच होती. पंधरा मिनिटांनी क्षमा अचानक ओरडली.

दोघे दचकून तिच्याकडे पाहायला लागले..

उमेश - काय गं??????

क्षमा - अय्या माझा क्लास आहे आज.. विसरलेच काय होते मी बावळटासारखी..

निवेदिता - मग??

क्षमा - आई जाम झापेल बुडला तर.. आज स्पेशल शिकवणार होते... रविवारी कधीच क्लास नसल्यामुळे लक्षातच राहिले नव्हते..

निवेदिता - मग चला घरी..

उमेश - चक्रमच आहे..

क्षमा - अरे चक्रम काय?? रविवारी सुट्टी असते क्लासला.. आत्ता आठवलं मला आज सुट्टी नाहीये ते..

उमेश - पहाटे मिसळ खायला गेलोवतो असं सांगू आता वाड्यात..

निवेदिता तोंडावर हात ठेवून हासली. नुकतेच उजाडत असणार्‍या सकाळी तिचे ते खळखळून हासणे फारच विलोभनीय वाटले उम्याला! क्षणभर तो तिची ती मोहक अदा पाहातच बसला. तिला जाणीव झाली तसे तिने हासणे थांबवले.. हाही विभ्रम भारीच होता.

क्षमा - मी काय म्हणते.. तुम्ही जा की दोघं?? पक्याला तू ओळखत नसलास तरी स्वप्नाला ओळखतोस ना?? स्वप्ना ज्या ग्रूपमध्ये आहे तोच ग्रूप!

निवेदिता - नाही.. जाऊ की सगळेच घरी..

निवेदिताचे ते शरमून उच्चारलेले वाक्य ऐकून आणि तिच्या चेहर्‍यावरचे ते काहीसे बावरलेले भाव पाहून उम्याच्या मुठभर हृदयात कळाबिळा आल्या.

उमेश - तसं खरं.. काही हरकत नाही म्हणा.. नाहीतरी पहाटे उठलोच आहोत.. आता सिंहगडचा बेत फसला यावॠन वाड्यात टोमणे ऐकण्यापेक्षा एक तास उशीरा गेलेलं परवडलं..

निवेदिता - हो पण ... क्षमा बिचारी एकटीच..

उमेश - ती बिचारी वगैरे नाहीये.. तिचा क्लास आहे म्हणून चाललीय घरी.. काय गं??

क्षम - तशी बिचारीच आहे मी..

उमेश - कसली आलीयस बिचारी?? चांगली विचारी आहेस.. काय करायचंय आता??

क्षमा - तुम्ही जा दोघं.. तुम्ही कशाला परत येताय?? मी जाते घरी..

उमेश - इतक्या सकाळी एकटी??

क्षमा - सकाळ म्हणजे काय रात्रंय?? चल.. बाय गं नितू..

'नितू'! निवेदिता या नावाचा शॉटफॉर्म! अत्यंत आवडला उम्याला!

निवेदिता - ए नकोSSSS... सगळेच घरी जाऊयात..

क्षमा - दादा काय खाणारे का तुला??

निवेदिताच्या मुळच्याच गोर्‍यागुलाबी चेहर्‍यावर त्या प्रश्नाने आलेली लाललाल छटा पाहून उमेश पुन्हा हरखला.

निवेदिता - बाबांना पटायचं नाही..

क्षमा - त्यात काय पटायचंय??? माझ्या ग्रूपबरोबर गेलात म्हणून सांगणार ना मी?? नाहीतरी ग्रूपबरोबरच जाणार आहात की??

निवेदिता - तुमच्य ग्रूपमधल्या कुणाचा कसा काय क्लास नाही मग आज??

निवेदिताने अत्यंत महत्वाचा प्रश्न ऐन वेळेस टाकल्यामुळे उमेश वैतागलाच होता. पण प्रश्न खरच महत्वाचा होता.

क्षमा - अगं हा कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रूप आहे.. क्लासला त्यातलं कुणीच नाहीये..

एक स्तब्ध शांतता! अनेक प्रश्न विचारणारी! आणि कोणत्याच प्रश्नाचं उत्तर निदान त्या क्षणात तरी न देणारी!

आता उमेशला थोडातरी मानभावीपणा करायलाच लागणार होता.

उमेश - हिला सगळं ऐन वेळेला आठवतं! हेच काल आठवलं असतं तर तिघांना आज हा त्रास झाला असता का? पहाटे उठा.. तयार व्हा.. इथे या.. मिसळ खा.. चहा प्या... आणि सिंहगड नाहीच एवढं करून..

क्षमा - तुला जा म्हणतीय ना मी?? उगाच काय तणतणतोयस??

उमेश - चल ग निवेदिता... आपण जाऊ आपले..

अत्यंत त्राग्याने उच्चारावे तसे ते वाक्य उम्याने उच्चारले.

निवेदिता - मला कसंतरीच वाटतंय.... क्षमामुळे सगळं ठरलं आणि तिचंच कॅन्सल झालं आणि आपणच जायचं.. कसं दिसेल हे??

उमेश - बघतंय कोण दिसायला??.. हिच्या क्लासची आठवण हिला आत्ता झाली त्याला आपण काय करणार?? हिच्यामुळे जरी ठरलेलं असलं तरी आपण आपल्याच पायांनी सिंहगड चढणार होतो ना?

या वाक्यावर मात्र दोघीही माफक हासल्या.

क्षमा - बसा तुम्ही... मी निघते.. बाSSSSय..

असे बोलून क्षमा तरातरा निघालीही! निवेदिताला काही करताच येईना!

अक्षरशः श्वास घेतला तरी ऐकू जाईल इतकी शांतता होती दोघांच्या मनात आत्ता! एक सुखद थिजलेपण! एक सुखद हुरहूर, नांव नसलेली जाणीव.. दुसर्‍याचं हवहवंसं अस्तित्व नकोनकोसेही असण्याची जाणीव.. तीही केवळ शरमेखातर!

उमेश तर रस्त्याकडेच पाहात बसला होता.

निवेदिता आवडायला लागल्याच्या केवळ चौथ्या दिवशी एका सुखद आणि धक्कादयक योगायोगाने ती आणि आपण इतक्या समीप?? तेही दिवसभर?? तेही ट्रीपला??

नाचावं का उड्या माराव्यात का लाज वाटल्यामुळे नुसतं बसून राहावं हेच त्याला कळत नव्हतं! असंही नव्हतं की निवेदिता यायला तयार नव्हती. ती तयार असल्याचे तर तिच्या चेहर्‍यावरूनच जाणवत होते. पण तरी तिचं तयार असणं हे उमेशला पराकोटीचा ताण देणारं वाटत होतं! कारण आजच्यासारखा दिवस पुन्हा येईलच असे नाही. आजच... आजच तिला आपल्याबद्दल 'तसे' वाटायला लागलेच पाहिजे. त्यासाठी आपले वागणे अत्यंत व्यवस्थित असायला हवे.

आणि निवेदिता????

अत्यंत अवघडलेपण संपूर्ण शरीरावर पांघरून घेऊन तटस्थ बसलेली होती. नजर जमीनीकडे! लज्जेने आणि अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने हृदयातून निर्माण झालेले रोमांच अंगाच्या प्रत्येक बिंदूवर पसरलेले! गाल जमेल तितके लाल झालेले! ओठांना पकडून ठेवायची दातांना झालेली घाई! बोटांचा ओढणीशी अव्याहत चालू असलेला चाळा! नजरेच्या कोपर्‍यातूनचुमेशचे मन आणि विचार वाचण्याची नव्यानेच लाभलेली हातोटी!

थंड गार वारा! एक शुभ्रधवल सकाळ!

त्या सकाळीला अत्यंत मिश्कील, हसरे आणि लाजरे बनवणारे तेरा वर्षाच्या गगनचे ऐकू आलेले वाक्य..

"देखा साब.. क्या जमाना आया है.. कबाबमे जो हड्डी थी उसे वापस भेजदिया इन लोगोंने.."

चटकन निवेदिताने फिरवलेली मान! जणू ते वाक्य ऐकलंच नाही अशी! आणि आणखीन असे कोणतेही वाक्य ऐकू येऊ नये अशी इच्छा! वसंताने गगनला मारलेला धपाटा!

'महकणे' म्हणजे काय याचा निवेदिता पहिल्यांदाच अनुभव घेत होती... संपूर्ण शरीर.. स्वतःचेच शरीर तिला आता गुलाबाच्या फुलासारखे वाटू लागले होते..

आणि गगनचे ते वाक्य ऐकून झटकन निवेदिताकडे बघताना उमेश एका स्वर्गीय, अनोख्या विश्वात केवळ निमिषार्धातच हारवलेला होता.

एक संपूर्ण आयुष्य कुर्बान करावे अशी ही सकाळ संपूच नये असे दोघांना वाटत असतानाच...

... टिंग टिंग... टिंग टिंग..

भिमा ते खानापूर..

लाल डबा रुजू झालेला होता.. ड्रायव्हर आणि कंडक्टर चहा घ्यायला एटीजीमध्ये आले...

उमेशने बस निघण्याची वेळ विचारल्यावर म्हणाले... "पाच मिनिटात निघंल... बस्सा"

आणि... बसच्या एका मागच्या सीटवर दोघेच... एकमेकांच्या शेजारी बसले ... तेव्हा बसमध्ये एक म्हणजे एकही पॅसेंजर नव्हता...

आणि पाच मिनिटांनी खरच बस निघाली... तेव्हा उमेशने दोन फुल्ल खानापूर अशी तिकीटे घेतल्यानंतर कंडक्टर पुढच्या सीटवर जाऊन ड्रायव्हरशी गप्पा मारू लागला तेव्हा...

खिडकीत बसलेल्या निवेदिताच्या चेहर्‍याची लाली चोरत चोरत पुर्वेला सूर्यराजा उगवत होता... पण त्याला तू चोरताच येत नव्हती पूर्णपणे.. कारण निवेदिताच्या चेहर्‍याची लाली तर कमी झाल्यासारखी वाटतच नव्हती... मग नुकसान भरपाई म्हणून सूर्य तिच्या भुरभुर उडणार्‍या काळ्याभोर केसांना स्वतःचा सोनेरी रंग प्रदान करत होता...

आणि व्यवहार ठीकठाक झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ निवेदिताच्या ओठांवर अत्यंत हलकेसे हसू फुटले तेव्हा...

.... तिच्या केसांनी होणार्‍या सुखद गुदगुल्या अधिक तीव्रतेने व्हाव्यात या अभिलाषेने उमेश किंचितसा तिच्याकडे सरकत होता....

एका अनामिक... अनसंग.. परंतु... अत्यंत गुलाबी प्रेमकथेचा ...

... आज आरंभ झाला होता...

गुलमोहर: 

सही झाला हा पण भाग !!!!!!
छान चालली आहे.....
छान छान....

पण एक सांगा हो
तुम्ही कशाला निघुन जाणार हो
चाफ्या सारखीच भुत बित मागे लागलीत का?
अहो घाबरु नका हो. तिच तुम्हाला घाबरलेली असतील.
तुमचे लिखान बिनधास्त चालु ठेवा.

हा सगळा मिक्स मसाला आहे असं वाट्तं. दास्ताने एवजी रास्ते वाडा. तेच ओल्ड मंक चे चार मित्र. तीच काजल सारखि निवेदिता. तोच तो बस चा एकांत प्रवास. हा प्रसंग तर सेम टु सेम हाफ राईस मधुन. आणि कमतरता नको म्हणुन वसंता आणि गगन पण. वा बेफिकिर राव. तेच ते तेच ते तेच ते आणि तेच ते.

जरा स्टोरी मधे "हाफ राईस चा.." फ्लेवर होत आहे तेवढे संभाळा .. म्हणजे परत तेच तेच कथानक नको (काजल सारखे Happy ) अशी विनंती
बाकी लिखान नेहमी प्रमाणे ऊत्तम..
वाचत आहे

@ए म्यान Lol

एवढा घिसापीटा विषय....
तुम्हाल काहीच वाटत नाही का बेफकीर ?

कशाला तंक्ण्याचे कष्ट घेता, आता थांबवा हि कादंबरी , पुरे आता हा छापीलपणा
जमल्यास काही वेगळे लिवा
तुकार्गिरी

बेफिकीरजी, मला असे वाट्ते कि, एखाद्या शिल्पकाराचे जसे प्रत्येक शिल्प वेगळे असते, एकात आणी दुसर्यामध्ये काही साम्य असेल पण फरक पण असतो, बघणार्याच्या द्रुष्टी वर असते. तसेच मला स्वताला हे पटल नाही, कि कोणत्या एका कथेचि दुसरी बरोबर तुलना व्हावी. प्रत्येक कला तसेच प्रत्येक कथा ही स्वतंत्र असते.
हा माझा view झाला. इथे प्रत्येकाने आपापले मत दिलेले आहेच. पण आपण हे लिखान थांबवु नये. नेहमिप्रमाणे शेवट नक्किच वेगळा असेल अशी आशा नाही, खात्रीच आहे.

थांबवलीय की मग? >>> सर, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, पण या आधी सुद्धा अश्या प्रतिक्रिया आल्या आहेत आणि येतच राहतील पण त्यांच्यामुळे तुम्ही थांबणार आहात का?
उद्या नवीन भाग आला की हेच लोक (थांबवा सांगणारे) वाचतील,नाही आवडलं म्हणुन वाचायच थांबणार नाहीत आणि खोचक प्रतिक्रिया देतीलच.... पण तुम्हाला लिहायच आहे की नाही हे महत्वाचं, मी नवीन भागाची वाट बघतेय थोडा दिपु-काजलचा फील येतोय तेवढं जरा सांभाळा....

थांबवलीय की मग? >> का? .. माझ्यासारख्या नविन वाचकासाटी तुमचि सावट ही नविन विषयावर होती आणि हि पण नविन विषयावर आहे. मला दिपु-काजल ,ओल्ड मंक , हाफ राईस अजुन माहित नाहि. so please continue.. waiting for your next part Happy

काही लोकांना स्वताला काही जमत नाही पण तरिही खोचक सुचना करत राहातात. २ ओळी स्वता लिहुन दाखवा की? आश्या लोकांच्या सुचना घाला चुलीत.

बेफिकीर तुम्ही लिहीत राहा.

अरे त्यांचा ऊदोऊदो करणे थांबवा आतातरी. लेखकांना अश्या सवयी लावु नये.

फळांनी बहरलेले झाड जमीनीकडे नत होत जाते त्यांचा आदर्श साहित्यिकांनी ठेवावा

जे खरे लेखक असतात, ते फक्त लिहीत असतात, कोणी सांगीतले की थांबवले कोणी सांगीतले की लिहायला सुरूवात केली, असली नाटके खरे लेखक करत नाही.

बेफिकीरांचे लिखाण मी ही वाचतो, काही आवडते, काही आवडत नाही, तशी मी स्पष्ट प्रतिक्रीया देत असतो, परंतु कोणाच्याही नाकदूर्या काढण्याच्या मी विरूद्द आहे.

जो लेखक टिका झेलु शकत नाही, त्याने लि़खाण करू नये ह्या मताचा मी आहे आणि मायबोलीकर ह्या नात्याने माझे मत प्रामाणिकपणे व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे, भले कोणाला पटो अथवा ना पटो.

पु.ले.शु.

लोकाच्या प्रतिक्रिया या येनारच परन्न्तु लिखान थाम्बवने हे तितके योग्य नाहि.........नविन भाग येउ दे

आता काय वाचायचे.... तुमच्याच जुन्या कादंबर्या परत परत वाचून झाल्या आता... काय करावे?
आपण दुसरी कडे कुठे लिहीता काय?

बेफी.......हाथी चले अपनी चाल्......या फालतू comments कडे लक्श देऊ नका प्लीज्...........वाचणे किन्वा नाही हा choice या लोकान्ना आहे......so dont bother about them.......वाचणारे पण आहेत्....and we appreciate ur work.......so आमच्यावर अन्याय होउ देउ नका .......पु ले शू......

इतक्या खोचक टिप्पणी नंतरही आपण कमालीची संयमता राखली आहे भुषणराव्....व्वाह!
ज्यावर टिका नाही झाली तो लेखकच कसला म्हणा......

भुषणराव काय विचार करताय मग.......? तशी नकारात्मक प्रतिसादांची संख्या नगण्य दिसतेय... Happy

आपल्या चाहत्यांबद्द्ल आपला काय दृष्टीकोन आहे...तर?

हा..हा...हा... भुषणराव, आपल्याला वरील प्रश्नाला उत्तर देणे जरुरी भासले तरच.. द्या...! अन्यथा आपल्याला इथे स्पष्टीकरणाची काही गरजच नाहीय.

काही वाचक आपले मन जाणुन आहेत. Happy

बरं आता या आधीचे भाग वाचुन येतो....इतक्या दिवसांनी लॉगइन झाल्यामुळे हाच भाग दिसला वर्..डोकावलो तर्....हे..हे नेहमीचे रडगाणे....
छ्या...तिच्यायला सगळा मुड खराब करुन टाकतात.

आपल्यात काहीतरी 'लोभस' आहे.
धन्यवाद!*

Pages