ती गेली तेव्हा.....

Submitted by मोहना on 25 May, 2011 - 19:43

पेटन,
"मी तुझी आई. खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी. बर्‍याच गोष्टी, बरेच विषय, क्रमवार कोणत्या कोणत्या विषयांबद्दल बोलायचं आहे ते लिहून ठेवलंय मी. फार वेळ नाही उरलेला. उद्या शस्त्रक्रिया. त्यानंतर किती वर्ष, किती दिवस....तीन तास नुसती बसून आहे मी. कल्लोळ उडालाय मनात विचारांचा. नाही सोडून जाता येणार मला हे जग असं. तू इतकी छोटी असताना तर नाहीच नाही. माझं प्रेम मी शब्दांनी नाही व्यक्त केलं आज तर कदाचित तुला ते कधीच समजणार नाही. काही गोष्टी ज्या बाबा तुला नाही शिकवू शकत, बोलू शकत नाहीत तुझ्याशी त्याबद्दल सांगायचं आहे. मी इथे असले तर तुला जवळ बसवून सांगेन पण नसले तरी..... आहेच मी तुझ्याबरोबर, तुझ्या लग्नाच्या दिवशी, तुला मुलं होतील तेव्हा. माझं तुझ्याजवळ असणं जाणवेल तुला. सतत." छत्तीस वर्षाच्या एरनने स्तनाचा कर्करोग झाल्यावर तिच्या चिमुकलीसाठी ध्वनिमुद्रित केलेला हा एक संदेश... आणि असे कितीतरी, जवळजवळ १०० व्हिडिओ टेप्स.
"भावनाविवश असताना केस नको कापूस कधी. मेकअप असा कर की तो केलाय असं वाटायला नको."
"तुला मोठं होवून जे काही बनायचं ते तू ठरव, मला वाटतं म्हणून किंवा बाबाला वाटतं म्हणून तुझं क्षेत्र निवडू नकोस."
"शाळेत कुणाच्या दबावाला बळी पडू नकोस."

कर्करोगाला तोंड देताना हातात राहिलेल्या चार पाच वर्षात एरनच्या मनात फक्त पेटन होती. पेटनसाठी तिने काय नाही केलं? वेदनेला तोंड देत, औषधांच्या मा‍र्‍याला, त्यांच्या परिणामांना प्रतिकार करत एरनने पेटनसाठी भेटवस्तू खरेदी करण्याचा चंग बांधला. पेटन १६ वर्षाची होईपर्यंतच्या वाढदिवसांसाठी, प्रत्येक ख्रिसमससाठी, इतकंच नाही तर पेटनच्या लग्नप्रसंगी तिला द्यायची भेटही तयार आहे.

डग आणी एरन दोघंही उच्चशिक्षित. आपापल्या कार्यक्षेत्रात स्थिरावलेली. सात वर्षाच्या संसारात पेटनचा प्रवेश झाला आणि दोन वर्षानी तिशी पार केलेल्या एरनच्या सुखी संसाराचं चित्र स्तनातल्या एका गाठीने, निदानाने बदललं. त्या क्षणाने तीही आमूलाग्र बदलली. मृत्यूच्या हाकेने तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. रोजच्या जीवनातले छोटे क्षण किती अमूल्य असतात ते कळण्याची ती हाक. नाकारणं हातात नसलेली, तरीही ती लढली. उणीपुरी पाच वर्ष कर्करोगाशी सामना करता करता आपण इथे नाही हे गृहीत धरून पोटतिडकीने आपलं म्हणणं ध्वनिमुद्रित करणं सोपं नाहीच गेलं एरनला. आता दोन वर्षाची असलेली पेटन ध्वनिमुद्रण ऐकेल तेव्हा किती वर्षाची असेल, हातात किती वर्ष आहेत...सगळंच अंधातरी. फार थोड्या काळात एरनला तिच्या चिमुकलीचं १६ वर्षापर्यंतचं आयुष्य कल्पनेनं मनात साकारायचं होतं. त्या त्या वेळेस उद्भवणारे प्रश्न, शारीरिक बदल, मित्र मैत्रिणी, छंद, अभ्यास.....असे कितीतरी मुद्दे. भावनावेग अनिवार होऊन तीन चार वेळा थांबून थांबून केलेलं पहिलं ध्वनिमुद्रण. पण नंतर सरावाने एरनने मुलीशी असा संवाद साधण्याचं तंत्र अवगत केलं. स्वत:च्या वेदनेला विसरून पेटनच्या भवितव्यावर तिला लक्ष केंद्रित करायचं होतं. आता फक्त पेटन हेच लक्ष्य होतं तिचं आणि तिच्यावर आत्यंतिक प्रेम करणार्‍या डगचं.

मुलीसाठी सल्ला, मायेची पाखरण घालणार्‍या या संदेशातून एरनचं व्यक्तिमत्त्वंही उलगडत जातं, आपल्याला गुंतवून टाकतं. कर्करोगाचं निदान झालं आणि आयुष्य ढवळून निघालेल्या या दिवसांमध्ये कधीतरी डग आणि एरनने पुस्तक लिहायचाही निर्णय घेतला. ’लिव्हींग विथ द एंड इन माईंड’ हे त्या पुस्तकाचं नाव. मरणाआधी करायच्या गोष्टींची यादी कशी तयार हवी हेच सूत्र आहे या मागे. क्षणभंगुर जीवनात मरणाचं नियोजन आपण विसरू नये ही त्यामागची धडपड. या निमित्ताने एरन प्रसारमाध्यमांपुढे आली आणि तिच्या आगळ्यावेगळ्या निश्चयाने अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.

१९९८ मध्ये एरन गेली, पण आपल्या मुलीसाठी कायमची इथेच राहिली ती असंख्य संदेश आणि आवाजाच्या रूपात. ओप्राच्या स्मरणात राहिलेले पाहुणे या कार्यक्रमात गेल्या आठवड्यात एरनवर कार्यक्रम झाला आणि पुन्हा एकदा एरनच्या स्मृतींना उजाळा मिळाला. यावेळेला एरनची महाविद्यालयात शिकत असलेली पेटन प्रेक्षकांसमोर होती. एरनच्या निधनानंतर साडेचार वर्षांनी पुनर्विवाह केलेले तिचे बाबा आणि नवी आईदेखील.

या कार्यक्रमात आईच्या स्मृतींना उजाळा देताना पेटन सांगते,
"लहान असताना खूप वेळा आईचं ध्वनिमुद्रण ऐकायचे मी. पण जसजसं कळायला लागलं तसं आता भावनिकदृष्ट्या खूप कठीण जातं पाहणं." आता महिन्यातून एकदाच ती ध्वनिमुद्रण पाहते. एरनला आईच्या स्पर्शाची उणीव भासतेच, तिच्याबरोबर वेळ घालवू शकत नाही याचं दु:ख होतंच. पण ती इथे नाही हे सत्य नाकारता येत नसलं तरी तिला तिचा आवाज ऐकता येतो. कधी काही प्रश्न पडला की उत्तर आईच्या आवाजातून मिळेल याची तिला खात्री आहे. आपल्याला वाटतात तसेच एखाद्या विषयावर आईचेही विचार असतील का ते अजमावायला आवडतं पेटनला.

बाबांनी पुन्हा लग्न करावं, माझ्या आयुष्यात आई असावी, स्त्री असावी हा देखील तिचाच आग्रह हे पेटन आवर्जून सांगते. पेटनला हे मान्य होणं, स्वीकार करणं जड जाईल ह्याची अर्थातच एरनला कल्पना होती. एरनने केलेल्या ध्वनिमुद्रणात तिने म्हटलं आहे,
"बाबांनी लग्न करायला हवं पुन्हा, पेटन. मला माहित आहे अशी वेळ आली तर तुझ्या मनात अनेक प्रश्न डोकावणार, बाबांच्या नवीन जोडीदाराला आई म्हणणं तुला जड जाणार, स्वीकारता येणार नाही आणि मुख्य म्हणजे मला काय वाटेल ह्या विचाराने तुझा जीव कासावीस होणार. पण तू हे स्वीकारायला हवंसं. तू तिला आई म्हटलस तरी चालेल गं. शेवटी तुझी खरी आई मीच नाही का? "

आतापर्यंत ऐकलेल्या असंख्य संदेशातून आणि उर्वरित संदेशात पेटनला दिसतो तो एकच संदेश, आईचं प्रेम.

एरनचा शेवटचा म्हणजे तिच्या मृत्यूअगोदरचा संदेश पेटनने हल्लीच ऐकला.
"फार सुंदर प्रवास होता हा. प्रेम, स्वत:चा शोध, कशाच्याच बदल्यात हे नाही बदलू शकत. हा प्रवास अनमोल होता. एकच विनंती आहे माझी आठवण ठेवा. मला जशी मानसिक शांतता लाभली तशी सर्वांना मिळावी. स्वर्गात मी तुमची वाट पाहीन. त्या वाटेवरचा माझा प्रवास जसा तुम्ही सुलभ केलात तसंच मीही तुमच्यासाठी आशेचा किरण होईन. तुम्ही सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रेम आणि जिव्हाळ्याबद्दल मी पेटन आणि डग ऋणी आहोत."

एरन आणि पेटनची कहाणी लिहिताना मला आठवतात, डोळ्यासमोर येतात माझ्या दोन मैत्रिणी. नुकत्याच कर्करोगाशी लढता लढता हरलेल्या. एक भारतात, एक इथे अमेरिकेत. माझ्याच गावात. आपापल्या परीने, पद्धतीने तोंड देत होत्या दोघीही. मीच का, माझ्याच वाट्याला हे का ह्या अनुत्तरित प्रश्नाने त्यांना वेढलं असणारच. माझं नशीबच वाईट म्हणणारी माझी भारतातली मैत्रीण, एकाच महाविद्यालयात शिकलेलो आम्ही, काही करता येत नाही या निराश भावनेने सोबतीला आली ती असाहाय्य हतबलता. वाटत राहतं त्याही एरनसारख्याच भोवर्‍यात अडकलेल्या मनस्थितीतून गेल्या असणारच, त्यांची मुलं, आई वडील, नवरा प्रत्येकाचं दु:ख, वेदना कल्पनातीत. कुणास ठाऊक त्या दोघींना माहित होती का एरन आणि पेटनची गोष्ट? कदाचित भरल्या संसाराचा अवेळी निरोप घेताना मुलांसाठी कायमचा जवळ राहण्याचा एक अभिनव मार्ग म्हणून त्यांनीही उचललं असेल असं पाऊल, किंवा सुचलीही असेल त्या दोघींना काहीतरी अगदी निराळी कल्पना.

गुलमोहर: 

काय विचित्र योगायोग!!! आत्ताच दहा मिनिटांपूर्वी मुलीने सांगितलं की तिच्या गेल्या वर्षीच्या टिचरची ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी आहे शुक्रवारी.
मला वाटलं काल्पनिक गोष्ट आहे ही. Sad

हम्म्म. माझी इथली एक मैत्रीण ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायव्हर आहे तर जवळच्या नात्यातली अगदी २६-२७ वर्षाची मुलगी ब्रेस्ट कॅन्सरने गेली मागच्यावर्षी. Sad
मला आधी वाटलेले करण जोहरचा कुठला सिनेमा आहे त्यात राणी मुखर्जी मरतांना मुलीसाठी खूप पत्र लिहून ठेवते प्रत्येक वाढदिवसाचे त्याबद्दल आहे हे.

चांगला लेख. बादवे - ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण एपीडेमीक म्हणावं इतकं वाढलय, आणि रिसर्च मधे अजूनही कांही ब्रेकथ्रु नाहीये. खूप फ्रस्ट्रेतींग आहे खरच.
On related note: कार्नेगी मेलनचे एक प्रोफेसर Dr. Randy Pausch यांचे The last lecture पण असेच आहे.
याच मनस्थितीत त्यांनी हे लेक्चर दिले. खूप इन्पायरिंग आहे.
जुलै २००८ मधे पॅन्क्रियस कॅन्सरने ते गेले.
http://www.thelastlecture.com/

वंदना - हो तो कार्यक्रम पाहिला होता मी. ओप्रावर का कुठे ते नाही आठवत. लोकसत्तेत एक लेखही आला होता त्यावर. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजल्यावर माणूस किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे परिस्थिती हाताळतो ते मी माझ्या दोन्ही मैत्रीणींच्या बाबतीत पाहिलं आहे. आपल्या आकलनशक्तीच्या बाहेरचं असते ते. ज्याला त्याच्यातून जावं लागतं.....ते किती तंतोतत खरं आहे याचा पडताळा येतो.

त्रास होतो असे काही वाचले की.... माझ्या दीक्षित काकू अश्याच गेल्या.... खुपदा लिहून काढायचा प्रयत्न करतो पण अजूनही नाही जमत.... Sad

मोहना, मला हे वाचताना त्रास झाला.
सध्या माझी मावस वहिनी या उपचारातून जातेय. ती सध्या आमच्याच घरी राहते. तिचे योग्य वेळी निदान झाले आणि उपचार चालूच आहेत. तिने ज्या धैर्याने या सगळ्याला तोंड दिले, त्याबद्दल तिचे करावे तेवढे कौतूक थोडेच आहे.
ती या सगळ्या दिव्यातून यशस्वीरित्या बाहेर पडणार आहे, याबद्दल आम्हा सर्वांना खात्री आहे. ती शेतकी विषयातली प्राध्यापिका आहे.

जाईजुई, मी_मुक्ता, रणजित, रैना, स्वाती२, सांजसंध्या घन्यवाद
पक्का भटक्या - मला लिहतानाही त्रास झाला खूप. ती मुलाखत पाहताना तर रडरड रडले. दोन मैत्रीणी मी या रोगानेच या आठदहा महिन्यात गमावल्या आहेत. पण वाटलं "लिव्हींग विथ द एंड इन माईंड" आपणही मनात ठेवून काही गोष्टी वेळीच करायला हव्यात. वयाचा काही संबधच नसतो नाही इथून जाण्याशी म्हटलं तर? वर लिहलेलं पुस्तक वाचतेय त्यात एरन तेच म्हणतेआज निदान मला माझ्या हातात नक्की किती काळ आहे हे तरी माहित आहे. ही देवाने दिलेली अनमोल भेटच. पण उद्या समजा माझा नवरा गेला अचानक अपघतात तर? ....त्या पुस्तकाबद्दल लिहीन लवकरच.
दिनेशदा- खूप बरं वाटलं तुमची मावस वहिनी बरी होतेय हे वाचून. पण कुणीतरी खूप लिहायला हवं या विषयावर कारण मला जी पत्र येताहेत त्यावरून सर्वांना कर्करोग हा बरा होतोच आजकाल असं वाटल्याचं म्हटलं आहे. पण स्तनाच्या किंवा इतर कर्करोगातही प्रकार आणि पातळ्या आहेत हे फार कुणाला माहितीही नाही असं वाटलं आलेल्या पत्रावरुन.

मोहना, रुणुझुणु ला विनंति करणार का ? ती लिहू शकेल. माझी वहिनी केवळ ३५ ची आहे. तिच्या आईलापण होता, त्यामूळे तिची मानसिक तयारी होती, पण इतक्या लवकर होईल, याची कल्पना नव्हती.
माझ्या सख्ख्या वहिनीच्या आईला पण होता. पण त्या ऑपरेशन नंतर योग्य ती काळजी घेऊन, नोकरी संभाळून दिर्घायूष्यी ठरल्या. आम्ही सगळ्यांना त्यांचे उदाहरण देतो.

माझी मामी आणि एक दुरची मावशी दोघी कॅन्सर सरव्हायवर.

माझ्या आईचे नुकतेच लग्न झाले होते. योगायोगाने तिची ही दुरची बहिण त्याच गावात रहात असल्याने दोघींचे अगदी सख्ख्या बहिणींप्रमाणे येणे जाणे सुरु झाले. असेच ३-४ महिने गेले आणि या मावशीचा डावा हात काखेत ओढ लागल्या सारखा अधून मधून दुखू लागला. माझे आजोबा वैद्य. त्यामुळे आई आणि मावशी लगेच माहेरी धावल्या. आजोबांनी तपासले आणि लगेच चिठ्ठी देऊन टाटाला पाठवले. लिंफ नोड ना सुरुवात होती. स्तनातील गाठ इतकी बारीक की नुसते हाताने तपासुन कळणार नाही. डबल मॅसेक्टोमी केली. या गोष्टीला आता ४०+ वर्ष उलटून गेली.

माझ्या मामीच्या बाबतीत तिला सेल्फ एक्झाम मधे जाणवले म्हणून ती नेहमीच्या डॉककडे गेली तर त्याने फॅटची गाठ आहे म्हणून उडवून लावले. Angry मग ती मुलीच्या पेडिआककडे गेली. या डॉकने मात्र लगेच पुढची पावले भराभर उचलली. आता १७ वर्ष होतील. माझी मामी रोज एक कप गाजराचा रस पिते.

कॅन्सर संबंधी बोलताना मला जाणवलेली महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सर बद्दलचे असलेले अज्ञान. हा कॅन्सर मॅमोग्राम मधे सहसा पकडला जात नाही. http://www.ibcresearch.org/ येथे या बद्दल माहिती आहे.

दिनेशदा <<<<<<<मोहना, रुणुझुणु ला विनंति करणार का ? ती लिहू शकेल. >>>>>>>>>>>> रुणुझुणु म्हणजे कोण? मी मायबोलीकरांच्या सुचीत शोधलं नाव, सापडलं नाही.

लेख फारच हृदयस्पर्शी आहे. एरन आणि पेटनची गोष्ट अनेक कॅन्सर सर्व्हायव्हर्सना प्रेरणा ठरावी.. किती कमी उरलंय त्यापेक्षा जे उरलंय त्यात काहीतरी प्राईसलेस करून जाऊ शकतो याची जाणिव, मृत्यू अधिक आनंददायी करेल...

मोहना, लेख वाचून डोळ्यात पाणी आलं.
ब्रेस्ट कॅन्सरचं निदान जितक्या उशीरा होईल तितका प्रोग्नॉसिस वाईट. ह्यातही स्टेजेस, ग्रेडस् असतात. लवकर निदान होऊन उपचार झालेल्या स्त्रियांचा 5- year OR 10-year survival rate चांगला असतो. स्वाती२ च्या उदाहरणात असलेल्या २० वर्षांहून अधिक काळ जगलेल्या स्त्रियासुद्धा असतात,पण प्रमाण कमी आहे.
Breast self examination, मॅमोग्राम सारख्या उपयुक्त तपासण्यांबद्दल भारतातील स्त्रियांमध्ये जागरुकतेचं प्रमाण वाढायची गरज आहे.