विपू करण्याबाबत काही नवीन नियम.

Submitted by जीएस on 23 May, 2011 - 18:06

सध्या नव्या नियमांचा मोसम आहे, त्यामुळे सगळ्यांनाच उपयोगी पडतील असे काही नियम बनवले आहेत. जाणकारांनी कृपया भर घालावी.

(१) खालील नियम सर्व विपुकर्त्यांवर बंधनकारक असून त्यांचे उल्लंघन केल्यास आमचे आंतरजालीम कायदा सल्लागार श्री. चिनूक्ष हे विश्वात कुठेही आपल्यावर 'पुणे मनपा माहिती तंत्रज्ञान अधिनियम १८५०' नुसार फायदेशीर कारवाई करू शकतील.

(२) वेळ अमूल्य आहे. आपली विपू थोडक्यात व नेमकेपणाने करा.

(३) एकदा विपू करून उत्तर न आल्यास, पुन्हा विपू करा.
(३)(अ) पुन्हा विपू करून उत्तर न आल्यास, पुन्हा कधीही विपू करू नका.

(४) विपू म्हणजे भोचकपणा नव्हे. या ( किंवा कुठल्याही) दोन शब्दामधला फरक समजून घेण्यासाठी शब्दार्थ बीबी ला भेट द्या.

(५) सर्वांचेच नवे लेखन नवीन लेखन मध्ये दिसते. सबब येथे रिक्षा फिरवू नका.
(५) (अ) अजिबात फिरवू नका.
(५) (ब) 'एकदाच' सुद्धा नाही.
(५) (क) "हे जरा वाचणार / बघणार का? " असे म्हणून पण नाही.
(५) (ड) "ही माझी रिक्षा" असे म्हणत म्हणत पण नाही.
(५)(इ) "ही मा़ही रिक्षा" असे म्हणून त्यापुढे स्मायली दिला असेल तरी सुद्धा नाही.
(५)(फ) तरीही रिक्षा फिरवल्यास अपमान होईल.

(६) महिलांबद्दल अथवा कुठल्याही स्त्रीलिंगी सजीव अथवा निर्जीव वस्तूबद्दल अपमानास्पद अथवा मध्ययुगीन मानसिकतेसह लिहिण्यास सक्त मनाई आहे. असे करणार्‍यास ताबडतोब पार्ल्याक्का ब्रिगेड (पुरोगामी गट) च्या तावडीत देण्यात येईल.

(७) फ्रेंडशिप मिळणार नाही.
(७)(अ) अजिबात नाही.
(७)(ब) 'जस्ट फ्रेंडशिप' सुद्धा नाही.
(७)(क) तुमच्या माझ्या आवडी निवडी जुळत असल्या तरीही नाही.
(७)(ड) तरीही फ्रेंडशिप मागितल्यास अपमान होईल.

(८) कृपया ज्यामुळे परराष्ट्रांशी संबंध बिघडतील, अणुयुद्धाचा धोका निर्माण होईल, परग्रहवासीयांच्या भावना दुखावल्या जातील अथवा परमेश्वरी कोप होईल अशी कुठलीही विपू मला करू नये.

(८)(अ) एखाद्या विपुमुळे परग्रहवासीयांच्या भावना दुखावल्या जातील किंवा नाही याबद्दल श्री. आस्चिग यांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
(८)(ब) सर्व प्रकारच्या परमेश्वरांच्या कोपाबद्दल श्री. विकु निवाडा करतील.

(९) हिंदू वगळता इतर कुठल्याही जातिधर्मांची निंदा करणे हे प्रतिगामीपणाचे व भावना दुखावणारे असल्याने त्यास सक्त मनाई आहे.

(१०) घासून गुळगुळीत झालेले असले तरी हे सांगणे आवश्यक आहे की दुपारी एक ते चार विपू बंद राहील.

(११) लेख, कविता, प्रचि आवडल्यास तिकडेच प्रतिसादात तसे लिहावे, तिकडे न लिहिता विपू लिहून तिकडचा टीआरपी कमी करू नये. केल्यास जशास तसे अवलंबण्यात येईल.

(१२) आपण मला विपू लिहायला आला होतात हे विसरून, मला इतरांनी केलेल्या विपू वाचत बसू नये.
(१२)(अ) वाचल्याच तर मी त्यावर त्या इतरांना केलेल्या विपू वाचायला जाउ नये.
(१२)(ब) तेही केलेत ( तुम्ही अशक्य आहात!) तर त्याबद्दल फाजील चौकशा करू नये.
(१२)(क) केल्यास अपमान होईल.

(१३) विपुत धन्स, धन्यू असले आंग्लाळलेले मराठी शब्द वापरल्यास, अपराध्यास सत्वर झक्कींच्या तोंडी दिले जाईल.

(१४) तुम्ही एकाच्या विपुतून दुसर्‍याच्या, तिथुन पुढे तिसर्‍याच्या असे करत माझ्या विपुत पोहोचला असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. ताबडतोब, मंदार जोशी यांचा 'व्यसन' हा लेख वाचावा आणि मुक्तांगण गाठावे ही नम्र विनंती.

(१५) आणि हो, माझ्या विपुत आपले स्वागत आहे Happy

गुलमोहर: 

Lol
अजुन एक ,आपापली विपु दर १-२ महिन्यांनी साबणाने स्वच्छ धुवावी.
स्वच्छ विपु पारितोषिक यंदा श्री. उदय यांना देण्यात येत आहे.

हा हा हा..
<<लेख, कविता, प्रचि आवडल्यास तिकडेच प्रतिसादात तसे लिहावे, तिकडे न लिहिता विपु लिहून तिकडचा टीआरपी कमी करू नये. केल्यास जशास तसे अवलंबण्यात येईल.
हे आवडलं.

यावर माझे मत मी तुमच्या विपुत कळवले आहे. शिवाय ते वरील सर्वांना कळावे म्हणून त्यांच्याहि विपूत लिहीले आहे. यानंतर इथे जे लिहीतील त्यांना पण त्यांच्या विपूत लिहीन.
मग त्यावर तुमचे मत माझ्या विपूतच कळवा.
वि. सू. माझी विपू मी वाचत नाही. काय वाट्टेल ते लिहा, एक दिवस अ‍ॅडमिन आपोआप पुसून टाकतील!

Lol

पोईंट्स ५, १०, ११, १२ लै म्हणजे लैच भारी Lol

हे पण अ‍ॅडा :

१५) 'मेल चेक कर प्लिज' असे विपु त लिहायची आवश्यकता नसते...
१५) अ) जेव्हा जमेल तेव्हाच चेक केली जाइल. परत परत या त्या बीबीवर, विपुत आठवण करुन देऊ नये.
१५) ब) तुम्च्या मेलचा रिप्लाय मेल नेच दिला जाईल. तुमच्या विपुत 'बघितली' असे कळवणार नाही.
१५) ब) 'मेल' लिहु नये - 'इमेल' लिहावे प्लिजच्च Proud

मस्तच की रुल्स एकदम
माझ्यासारख्या विपुदुर्बळ लोकांनी विपूचा ( आपापल्या ) टी आर पी वाढवायला काय करावे ?

Happy

मायबोलीच्या पॉप्युलॅरिटीमुळे आता मायबोली आणी विपू ज्ञात विश्वात सर्वत्र वाचता येते. त्यामुळे परग्रहवासीयांचे नियम पण येथे लागु होतात हे लक्षात घ्यावे . त्यांचा भावना कशाकशामुळे दुखावु शकतात याची यादी खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे:

♈♊♊♉://☼☾☽.☻☻.♅

सर्वांना धन्यवाद ! तुम्ही हसताय याची खात्री करून लेखन विनोदी मध्ये हलवले आहे...

>>> १५) 'मेल चेक कर प्लिज' असे विपु त लिहायची आवश्यकता नसते...
हाहा, हे पण जोडतो कलम...

तुमच्या 'अ‍ॅडा' वरून आठवल..

१६) विपुत धन्स, धन्यू असले आंग्लाळलेले मराठी शब्द वापरल्यास, अपराध्यास सत्वर झक्कींच्या तोंडी दिले जाईल.

Happy

एखाद्या व्यक्तीला विपु केल्यावर 'तुझी विपु पहा' असे ती व्यक्ती सापडेल त्या बीबीवर जाऊन लिहू नये.

विपु मधला पु दीर्घ हवा ना?

जीएस, विपू पहा.

Rofl

दोन वेगवेगळया सजीवांच्या दोन आयडींची विचारपूस वाचू नये हे ठीक आहे. पण या शब्दरचनेला अपवाद असेल तर काय करायचं याचे नियम कुठैत ? Proud

अनावशयक टीप : मी तसलेच विपू वाचतो. जाम टाईमपास होतो Biggrin
उपटीप : बरेच जण असं करतात. काही मूकआनंद घेतात
तळटीप : सर्व टीपा संपल्या

Pages