चेहरा

Submitted by ज्योती पाठक on 23 May, 2011 - 10:23

मागच्या महिन्यातील गोष्ट. मी जपानला गेले होते तेव्हाची. दिवसभराचे काम संपवून घरी निघाले होते.
स्टेशनवर ट्रेनची वाट पहात होते. का कुणास ठाउक पण मला खूप एकटे एकटे वाटत होते, तेव्हढ्यात ध्यानीमनी नसताना माझी एक college मधली मैत्रिण समोरुन येताना दिसली. मला प्रचंड आनंद झाला. परदेशात असताना माणसाला एकदम आपल्या देशातला ओळखीचा चेहरा दिसला की किती आनंद होतो ना...

तिने मला पाहिले नसावे बहुतेक, कारण तिच्या चेहर्‍यावर अनोळखी भाव होते. माझ्या मनात एकदम विचार आला की आपण सगळे दोन दोन चेहरे घेवून जगात वावरत असतो, एक ओळखीच्या माणसाना दाखवायचा हसरा आणि अनेक भावनांनी परिपुर्ण असा ओळखिचा चेहरा आणि दुसरा अनोळखी माण्सांमधे वावरतानाचा कोर्‍या पाटीसारखा भावनाशुन्य चेहरा. आणि हे दोन्ही चेहरे आपल्या अगदि नकळत आपण बदलत असतो. असा विचार डोक्यात चालु असतानाच तिने मला पाहिले आणि एकदम ओळखीचे हसु तिच्या चेहर्‍यावर पसरले.माझ्याच विचारांचे मग मला हसु आले.

नंतर इकडे परत आल्यावर बालमुद्रा बघायला गेले होते. लहान मुलांच्या फोटोंचे हे प्रदर्शन म्हणजे तर निरागस, खट्याळ आणि गोंडस चेहर्‍यांशी संवाद साधण्याची संधीच असते अगदि. यावेळी तिथे काही आदिवासी चेहरे पण बघायला मिळाले. ते जणूकाहि मला सांगत होते कि शहरी सुखांपासुन आम्ही अनेक कोस दुर असलो तरीही खरे सुखी आणि समाधानी आम्हीच आहोत. म्हणजे त्यांच्या चेहर्‍यावरचे समाधान इतके ओसंडून वहात होते की तेच सारे काही सांगुन गेले. आणि मग मला असा प्रश्न पडला की इथे सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घेत असताना आपला चेहरा का असा दुःखी? आणि शहरी गर्दीत आपण एवढे डुबुन गेलो आहोत तरी आपण का असे एकाकी?खरं तर सगळी दुःख आणि काळज्या विसरुन जे चेहरे हसरे आणि आनंदी असतात ना तेच खरे समाधानि चेहरे. त्यांना कुठलेही खोटे आणि अनैसर्गिक भाव चेहर्‍यावर आणायची गरजच वाटत नाही. अशा चेहर्‍यांकडे बघुनच खरे समाधान मिळते माणसाला.

या चेहर्‍यांनी कविंनाहि अनेकदा भुरळ पाडली आहे. चंद्र, फुल अशा अनेक उपमा देताना तो कवि त्या निर्जीव वस्तुंमध्ये पण कोणाचातरी चेहराच पहात असतो, आणि मग त्या गोष्टींना त्या चेहर्‍याने जीवंतपणा येतो.
लहान मुलाचा झोपलेला निरागस चेहरा, आणि मस्ती करतानाचा खट्याळ चेहरा, त्याच्याकडे बघणार्‍या आईचा कौतुकाने तृप्त झालेला चेहरा, एखाद्या तरुणाचा प्रेमात पडल्यानंतरचा भावुक चेहरा, एखाद्या जखमी जवनाचा वेदनेने व्याकुळ झालेला पण तरीही मातृभूमीसाठी आपण जीवदान देणार या भावनेने अभिमानाने भारलेला चेहरा, एखाद्या कपटी माणसाचा क्रूर चेहरा, एखाद्या राजकारणी माणसाचा ढोंगी आणि बनेल चेहरा, कर्णाचा दान देत असतानाचा उदार चेहरा, ज्ञानेश्वरांचा ओवी लिहित असतानाचा कोवळा पण ज्ञानाने तेजःपुंज झालेला चेहरा असे कितीतरी चेहरे आठवले. मातृभूमी ला परत जण्याच्या ओढीने तळमळणार्‍र्या सावरकरांना दिवस रात्र फक्त आपल्या मातृभूमीचाच चेहरा डोळ्यापुढे दिसायचा असे म्हणतात. एकाच चेहर्‍यात अनेक भाव व्यक्त करण्याची ताकत आहे. ते भावना व्यक्त करण्याचे एक प्रभावि माध्यम आहे. म्हणुनच कदाचित माणसाने गणितासारख्या रुक्ष विषयात देखील त्यातील वेगवेगळी चेन्हे वापरुन अनेक भाव व्यक्त करणारे smileys तयार केले आहेत.प्रत्येक चेहर्‍र्यामधे अनेक भावना लपलेल्या असतात, अनेक अनुभव आणि सुख-दु:खाच्या गोष्टी घेवुन तो चेहरा शब्दांपलिकडचे काहितरी सांगत असतो.

प्रत्येक माणूस हा एकाचवेळी अनेक चेहरे घेवून वावरत असतो.याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी आई.
शाळेमध्ये कडक शिक्षिकेचा चेहरा घेवुन मिरवणारी माझी आई जेव्हा घरी येते ना तेव्हा तो कडक शिक्षिकेचा चेहरा अगदि typical प्रेमळ आईचा चेहरा कधी होतो हे तिचे तिलाही कळत नाही बहुतेक.
या चेहर्‍र्यांना जाणून घेण्याची खोड मला अगदि लहानपणापासून आहे.या बाबतीत मी माझा स्वतःचा चेहरा पण सोडलेला नाही.मी मुलगी असल्याने नटुन-थटुन आरशात स्वतःला बघण्याचा हक्क तर स्त्री जन्मानेच मिळवुन दिला आहे मला. पण त्यापुढे जावुन मी चेहरा आरशात बघत असताना, मझाच चेहरा माझ्याशी सुख-दु:खाच्या गोष्टी बोलु लागतो. अगदि आपले मन बोलणार नाही इतके सगळे तो चेहरा बोलुन जातो. आणि मग
कळेल मी पाहते कुणाला
कळेल हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसु आरशात आहे
अशीच माझी अवस्था होवुन जाते.
हा चेहराच आपण आपली identity म्हणुन सगळीकडे मिरवत असतो.आपलं आणि आपल्या स्वभावाचं प्रतिनिधीत्व करण्याची महत्वाची जवाबदारी असते आपल्या चेहर्‍र्यावर.
आणि जर हा चेहराच बदलला तर.....
अशी सुंदर कल्पना FACE OFF या चित्रपटामध्ये मांडली आहे. आपला चेहराच जर बदलला तर आयुष्यात काय काय घडू शकतं हे या चित्रपटात खूप छान मांडले आहे.

मला असे वाटते की ह्या चेहर्‍र्याला काळा-गोरा, श्रीमंत-गरीब, स्वकीय-परकीय अशा क्षुद्र वर्गात वाटण्यापेक्षा त्यातुन व्यक्त होणरे भाव समजुन घ्यावेत, आणि कदाचित श्ब्दांची गरजच लागणार नाही त्यासाठी. कारण जर शब्द आणि भाषा यांच्यातच वक्तव्य करण्याची ताकत असती तर मग देवाने पक्षी, मनुष्येतर प्राणी किंवा निर्जीव वस्तु या सर्वांनाच मग बोलण्याची क्षमता दिली असती.

अता मला मान्य आहे की हे सगळं माझा चेहरा न दखवता मांडते आहे मी तुमच्या समोर, पण मला माहित आहे की हे वाचत असताना माझा बडबडा चेहरा येतच असेल तुमच्या डोळ्यासमोर Happy
आणि हे सगळे वाचत असताना आता किती बडबड करते ही मुलगी असे भाव तुमच्या चेहर्‍र्यावर आलेले स्पष्ट दिसत आहेत मला. तेव्हा आता थांबायलाच हवे मला इथे, कारण संपली ही वटवट एकदाची हे कळल्यानंतरचे तुमचे हसरे चेहरे पण बघायचे आहेत ना मला Lol

गुलमोहर: 
शब्दखुणा: