समोसे

Submitted by वर्षू. on 23 May, 2011 - 03:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

चार मोठे बटाटे
हिरवे मटर- दीड ते दोन वाट्या
जिरे
हळद
मीठ
आलं-लसूण पेस्ट- दोन टीस्पून
अमचूर,भाजलेल्या जिर्‍याची पूड,धने पावडर,तिखट,चाट मसाला,गरम मसाला-स्वादानुसार
कसूरी मेथी- १/४ वाटी
कोथिंबीर,कढीपत्ता,हिरव्या मिरच्या.
तूप / बटर(अमूल) = २ टेबल स्पून
तेल= २ टेबल स्पून
तेल- तळण्याकरता.
मैदा- ३ कप्स भरून
ओवा- दीड टी स्पून

क्रमवार पाककृती: 

समोश्यात भरण्यासाठी बटाट्याची भाजी
बटाटे उकडून, सालं काढून बारीक चिरून घ्यावे.
बटाट्याच्या तुकड्यांना मीठ लावून,हाताने एकसारखे करून घ्यावे.
हिरवे मटर उकडून घेऊन, सर्व पाणी निथळून घ्यावे.
तोन,तीन टी स्पून तेल ,कढईत गरम करून, जिरे अ‍ॅड करावे.
जिरे तडतडल्यावर हळद, आलं लसूण पेस्ट,भाजलेल्या जिर्‍याची पूड,अमचूर,धन्याची पूड,तिखट घालून ,थोडं परतून उकडलेले मटर आणी बटाट्याचे तुकडे टाकावे.
चांगलं परतावे.परतताना बटाटे किंचीत कुस्करावेत.
आता बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने ,बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या,भाजीत मिक्स कराव्या
कसूरी मेथी ,हाताने क्रश करून ती ही अ‍ॅड करावी.
सर्व नीट मिक्स होईस्तो छान परतावे. बटाटे फार मोडू देऊ नका.
गॅस बन्द करून वरून चाट मसाला आणी गरम मसाला भुरभुरावा. तो ही नीट मिक्स करावा.

ही झाली भाजी तयार

समोश्याच्या कव्हरिंग करता
२ टेबलस्पून तेल व दोन टेबलस्पून तूप्/बटर (अमूल) ,एकत्र गरम करून घ्या.
परातीत ,३ कप मैदा चाळून घ्या.
यात तेल् आणी तुपाचे वार्म मिश्रण ओता,पुरेसे मीठ आणी थोडा ओवा घालून मऊसर भिजवा. फार घट्ट आणी दगडी नको. पण पोळीच्या कणकेपेक्षा थोडा घट्ट हवा.

मैदा नीट मळून घ्या. लगेचच लहान गोळे करून ,ओब्लाँग शेप मधे लाटा. सुरीने एका पोळीचे दोन आडवे तुकडे करा

नेहमीप्रमाणे त्रिकोणी वाटी करून आत सारण भरा. कोरडा मैदा भुरभुरलेल्या ताटात तयार झालेले समोसे ठेवा.

डीप फ्रीज मधे स्टोअर करण्याकरता
गरम तेलात एकदाच तळून ,पांढर्‍या रंगावर बाहेर काढा.

दोन्हीकडून आलटून पालटून, पांढरा,फिकट गुलाबीसर रंगावर बाहेर काढून चाळणीत ठेवा

मग बाहेर काढून ,एकेक समोसा फ्रिजमधे स्टोअर करण्याच्या झिप लॉक बॅगेत स्टोअर करून ,आत हवा न राहील या बेताने बॅग सील करून डीप फ्रिझ मधे ठेवून द्यावी.
नंतर लागतील तितके समोसे तळायपूर्वी दोन तास बाहेर काढून ठेवावे. लगेच तळायचे असल्यास मायक्रो मधे दोन्,तीन मिनिटे डीफ्रॉस्ट करून ,तेल गरम करून ,अगदी मंद आचेवर कुरकुरीत होईस्तोवर खरपूस तळावे.

वाढणी/प्रमाण: 
३ कप मैदा आणी ४ मोठे बटाटे या प्रमाणाने अंदाजे ३०,३५ समोसे होतात.
अधिक टिपा: 

अश्या रीतीने स्टोअर केलेले समोसे तीन महीने टिकतात. लगेच करून खायचे असतील तर ,गरम तेल थोडंस थंड करून ,अतिशय मन्द गॅस वर , सुंदर लाल/ब्राऊन रंगावर क्रिस्पी होईस्तोवर तळावे.पुदिन्याच्या चटणीबरोबर छान लागतात.

माहितीचा स्रोत: 
राजस्थानी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज या पद्धतीने केले आणि कमाल सुंदर झाले. दुपारी २ वाजता बटाटे उकडत ठेवले आणि १ वाटी मैदा आणि २ चमचे रवा (मला आवडतो म्हणून), तेल-तुपाचं वर सांगितल्याप्रमाणे मोहन घालून भिजवला. ओवा, मीठ, किंचित तीळ आणि अर्धवट भाजून भरडलेलं थोडं जिरं पण घातलं. मग आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, नीट भाजून धने-जिरे, कोथिंबीर, कढिलिंबाची पानं आणि मीठ अर्धबोबडं वाटून घेतलं. एव्हाना कुकर सुटला होता. मग बटाटे सोलून फोडी करून हा वाटलेला मसाला, गरम मसाला, आमचूर पूड आणि कसूरी मेथी हाताने चुरून सगळं त्या फोडींना नीट चोळलं. मग लेकीचा बराच वेळ अभ्यास घेतला आणि पावसाळी हवेमुळे मला झोप लागली. (डोळा मारणारी स्मायली)
यामुळे एकूण हे मिश्रण चांगलं २-३ तास मुरलं. मग कढईत तेल तापवून फक्त हिंग आणि हळद घालून भाजी नीट परतून घेतली. सामोसे झकास झाले.

मस्त, मला पण करून बघायचेत
मागच्या वेळी कव्हर कडक झालं होतं.
ऑस्ट्रेलियन पंप्र सुंदर सामोसे करतात.आपल्याला जमायलाच हवेत.नाहीतर उद्या पुरणपोळी किंवा उकडीचे मोदक करून अजून कॉम्प्लेक्स देतील.

Pages