सगे सोयरे - श्री. वसंत चिंचाळकर

Submitted by चिनूक्स on 20 May, 2011 - 02:57

सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वसंत चिंचाळकर यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भेटलेल्या व्यक्तींची शब्दचित्रं 'सगे सोयरे' या पुस्तकात संकलित केली आहेत. यांपैकी काही शब्दचित्रं चरित्रात्मक आहेत. या व्यक्तींमध्ये वसंत सोमण, आलमेलकर, पद्मजा फेणाणी, उ. झाकीर हुसेन यांसारखे कलाकार आहेत, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. व्ही. गिरी यांसारखे राजकारणी आहेत, बाबा आमटे, डॉ. विकास महात्मे, गाडगेबाबा, शाहू महाराज आहेत. बापूंची कुटी आहे आणि पाऊस, उन्हाळाही आहे.

'सगे सोयरे' या नचिकेत प्रकाशनाच्या पुस्तकातील 'तुळसा काकी' हे शब्दचित्र..

हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे
- http://kharedi.maayboli.com/shop/Sagesoyare.html

IMG_6595.JPG

तुळसा काकी

पाय उंचावले. सवयीने सैंपाकघरातील त्या भिंतीपलीकडे ओणवून पाहिले. तांदूळ निवडीत असतानाच, आई तिच्या शेजारी बसलेल्या वृद्धेशी बोलण्यात दंग होती. पसारा फारसा आवरला नव्हता. समोरच चार-सहा पुड्यात बांधलेले काहीतरी ठेवले होते. ती म्हातारीबाई, खूप महत्त्वाचे असे आपल्या गेंगाण्या आवाजात आईला सांगत होती. तीही मन:पूर्वक ऐकण्यात गुंतलेली. नेहेमीसारखे, चाहूल येताच, लक्ष जावे असे काही नव्हते. ती अगदीच ठेंगणी-ठुसकी, गच्च काळा रंग असलेली, जाडे भरडे जांभळे लुगडे असलेली खेडवळ बाई मात्र तिला गुंतवून होती. त्या बाईच्या खांद्यावरून पदर ओघळलेला. माथा पार पिकून गेला होता. सुटलेल्या पोटावर मारलेली, चोळीची तटतटणारी स्वच्छ गाठही दिसायची. पिवळसर खोलगट डोळ्यातून सतत काहीतरी वाहत आहे, असे वाटायचे. बोलताना ती कधी डोळ्याला पदर लावायची. कानात कुड्या नव्हत्या, की गळ्यात मंगळसूत्र. नाकावर असलेल्या मोचेतून चार-दोन केस बाहेर आले होते. त्वचेला कुठे कुठे वळ्या पडल्या होत्या. त्या बाईनं तंबाखू लावून हातावर चुना मळला आणि त्याची चिमूट करून दाढेखाली ठेवून दिली. पुन्हा बोबडे बोलायला सुरूवात केली.

अजूनही आईचे लक्षच नव्हते.
शाळा संपल्यावर घरी परतलो की सैंपाकघरात डोकवून पाहायचा माझा नियम होता. दप्तर कोनाड्यात भिरकावले की पाच-दहा मिनिटे तिच्या पुढे बसायला मन उत्सुक असे. शाळेतील गोष्टी ऐकताना काही खायला देई. आणि सवयीनं तीही यावेळी तिथे असायची. आजही होती. पण तिचे बोलण्यात लक्ष होते. पुड्यांच्या भेंडोळ्यात कुठेतरी ताटली होती. गुळदाण्याच्या चार-सहा थोरल्या पापड्या तिथं ठेवल्या होत्या. आईचं लक्ष वेधायला, मुद्दाम तोंडानं कसलातरी आवाज केला. ती हसली.
"आलास रे--ये--"
ताटलीतील गुळदाण्याच्या वड्यांकडे पहात आईच्या पदराशी धुसमुसपणे सुरू होते. पाठीवरून हलका हात फिरवीत म्हणाली, "काकी, हा मधला-- आता शाळेत जातो"
"व्हय? साजरा आहे वो." आणि मग माझ्याकडे नजर वळवीत म्हणाली, "माहा सार्‍या, सारेत जातो-- ओळखलं का नाही?" आणि तिचा खरखरीत हात चेहर्‍यावर फिरला. ताटलीतील पापडी हातात देत म्हणाली, "खा-- गोड हाये--"
संकोचून बसून राहिलो. एकवार संमतीसाठी आईकडे पाहिले. ती मंद हसून म्हणाली, "घे. काकी आहे आपली, शेवगावाची--"
कौतुकानं कितीतरी वेळ काकी माझ्या हालचालींकडे पहात होती. खाऊन संपले. उठून जाताना आई म्हणाली, "अरे, काकीला नमस्कार कर."
काकीचा खरखरीत हात पाठीवरून फिरला. उत्साह अंगात संचारल्यासारखा उंडारत पळालो.

दिवेलागण झाली म्हणून घरी परतलो. आता काकी जायला निघाली होती. तिला निरोप द्यायला आई ओसरीपर्यंत आली. वेगवेगळ्या सामानांचं कडबोळं असलेला हारा ओसरीच्या दगडी कट्ट्यावर होता. काकी वाकली. हार्‍याला हात घातला. आईनेही हात लावला. ओझे डोक्यावर नीट ठेवून झाल्यावर ती हसली. तुरूतुरू चालायला लागली. ओसरीच्या पायर्‍या उतरताना क्षणभर थांबून म्हणाली,
"अन गावी येत जा माय बहिणी--"

उत्तरादाखल आई मात्र काही बोलली नाही. हरवल्यासारखी ओसरीतच स्तब्ध उभी राहिली. सावकाश माजघरात आली. नंतर देवघरात. तिथें देवाजवळ दिवा लावून क्षणभर थांबली. जेवणे झाली आणि झोपाळ्यावर जाऊन बसलो. पश्चिमेकडील खिडकीतून येणारा वारा अंगावर घेत आणि झोपाळ्याच्या संथ कर्रऽ कर्रऽ असा आवाज ऐकीत पडून राहिलो. कधीतरी झोप लागली असावी. मध्येच जाग आली, तेव्हा थोरला, आई आणि दादा बोलतच होते.
"प्रत्येक आठवड्यात यायची आहे म्हणे बाजाराला?"
"वय आहे तोवर ठीक आहे. थकली की कोण सांभाळणार?"
"आणि मसाला-मिरची, धने-हळद, गुळपापडी आणि चिवडा विकून कितीसे पैसे साठणार? पुढं केवढंतरी आयुष्य आहे--"
"शेतीवाडी नव्हती तिची? पण दिरानं हडपली. आता अशी दारोदार फिरते. गावातील घर आहे तेही गिळायला निघाला आहे म्हणे. सारखा भांडतो. इथल्या घराचं तर रीठच व्हायला आलं आहे. डुगडुगणार्‍या खोलीची माडी किती तग धरणार?"
"पोटी-पाटी काही असतं तर ठीक! आसरा तरी झाला असता. दीर किती सांभाळणार?"
"चार घरी हेमगर्भांच्या गोळ्या उगाळल्या की वैद्यकीचा धंदा चालतो का? गंगाराम म्हणजे गंगाराम-- कधी गावात चक्कर मारीत नाही की कोणाची विचारपूस नसते. डॉक्टरांचे दिवस आहेत. गाववैद्याला कोण विचारतो?"
"आता सारं तुळसाकाकीच्याच धंद्यावर! बिच्चारी--"
"रडाय-भेकायला तासभर टेकली. तेवढ्यात मसाला-मिरचीच्या चार पुड्या बांधून ठेवल्या. हात देताळू आहे--"
गावाच्या आठवडी बाजाराचा दिवस अजून स्वच्छ स्मरणात आहे.

सकाळ झाली की गाडी-खाचरांची रांग घरापुढील रस्ता तुडवीत जायची. ताज्या भाजीपाल्याचे हारेच्या हारे भरून जात. त्यातील फळभाज्यांचे रंग आणि तकाकी डोळ्याना सुखावे. मग कामकर्‍यांच्या रांगा. धिवरांच्या टोळ्या आणि पुढे उन्हं कडक झाले की लमाणांचा तांडा येई. पाच-दहांच्या टोळीने मागे-पुढे चाले. डोक्यावर लाल पटका, अंगावर बाराबंदी, मळकट पांढरे आखूड धोतर असा त्यांचा वेष. पण लमाण स्त्रीया रंगीत दिसत. जाडसर चांदीचे हातापायात दागिने, कानात थोरली कुडलं, खरखरीत केसांची वळलेली वेणी, डोक्यावरचा पदर तोलून धरणारा शिंगाचा अडसर आणि अंग झाकून असलेला घागरा. दाट लाल-निळ्या रंगाचा. डोकीवर जाड ओढणीचा पदर आणि त्यावर काचेच्या जागोजाग लावलेल्या टिकल्या. उन्हाची तिरीप त्यातून निसटली की गंमत वाटे. नेमक्या याच वेळी, काकी मागेपुढे लगबगीने जात असायची. जाताना रस्त्यातूनच हाळी द्यायची,
"अवो अनु, हाय का घरात--"
उड्या मारीत, माजघर ओलांडून ओसरीत येईतो ती पुढे सरकली असायची. अंगणातून ओणवून पाहिलं की मागेपुढे पाहत ती समोर सरकत असायची, लक्ष जाताच रस्त्यातूनच ओरडून सांगायची,
"येईन संध्याकारी येईन--- आईले सांगजो--"
आणि झपझप निघून जायची. काकीच्या अशा रस्त्यावरूनच आवाज देण्याच्या पद्धतीविषयी आईजवळ थोरला नापसंती व्यक्त करी. त्याची समजूत काढीत आई म्हणे, "अरे, सकाळी घाई असते तिला. बाजारात मोकळी जागा मिळाली की चारदोन आण्याचा माल अधिक खपतो. वेळ झाला तर पाय फिरवायला जागा नसते बाजारात. एकटी म्हातारी, कुणाकुणाशी भांडणार?"

"तरीपण रस्त्यातून जातांना असा आवाज देणे--"

अशावेळी आई नुसतीच हसे. "तुला नाही कळायचं ते ----" असं सारं त्या हसण्यात असे.

उन्हं उलटली की दादांच्या सोबत बहुधा बाजारात जाई. आठवड्याचा सारा माल खरेदी करून झाला की काकीच्या दुकानाकडे चलण्याचा हट्ट धरी. दादा दटावत. "आता नको---तिची धंद्याची वेळ आहे." पण हिरमुसला होतो असे दिसले की घेऊन जात.

कुठल्याशा झाडाखाली नाहीतर फवार्‍याच्या भोवती असलेल्या ओळीत तिचे दुकान असे. समोर तरट पसरलेले. त्यावर मिरची-मसाला, धणे-हळद आणि इतर सटरफटर गोष्टी सजवून ठेवलेल्या. थोरल्या कोपरात गुळदाण्याची पापडी.

दादा येताना दिसले की ती डोक्यावर पदर घेई. सावरून बसे. मिरची-मसाल्याच्या दोन-चार पुड्या बांधून हाती देई. त्यात वाजवीपेक्षा एखादे माप अधिक असे. पैसे देऊन पुढे सरकायला लागलो की काकी खरखरीत हातात माझा हात धरी. गुपचुप गुळदाण्याच्या वड्या हाती कोंबे. दादांना सारे पसंत नसावे. पण ते मनाईही करीत नसत. संध्याकाळ झाली की तासा-अर्ध्यातासासाठी काकीचा आमच्या घरी मुक्काम असे. तिची रामकहाणी आलटून पालटून सांगून झाली की ती उठे. आईलाही ते सारे ऐकायला कंटाळा नव्हता. नियमाने ती काकीला ओसरीपर्यंत पोहचवे. तशी काकी जायला लागली की अंधारात तेजाची हलकी रेषा लांबवर हलत राही. ती पुसून जाईतो आई उभी राही. सावकाश परतून सैंपाकघरातील वस्तू आवरे. त्यात भेटीदाखल दिलेले असे काकीचे काहीतरी असेच. ते सारे फडताळात ठेवतांना तिचा जीव उलघलत राही.

आठवडी बाजार न चुकता भरत होता. सकाळपासून सुरू असलेले गाडी बैलांचे आवाज, धिवरांच्या झपझप चालण्यातील लय, लमाणणींच्या तांड्यांचा झम्मक्---झम्मक् आवाज---सारे सुरळीत सुरू होते. यात काकीची हाळी तेवढी कधी कधी नसायची. मग बाजारात जायचा हट्टही मी दादांजवळ फारसा धरीत नसे. संध्याकाळ झाली की आई ओसरीत डोकावून जाई. देवघरातील दत्ताच्या तसबिरी जवळ दिवा उजळताना ती हाक देई. देवाला नमस्कार करुन झाला की ती विचारी,"कारे, काकी नाही दिसली तुला - -"

मी नकाराची मान हलविली की काळजीत पडल्यासारखी दूरवर पाहत राही. "तब्येत ठीक आहे की नाही कुणाला ठाऊक " तिला बरे वाटावे म्हणून म्हणे, "असेल गं"
"असती तर बाजाराला नसती का आली? वय झालं. थकायला आली ती-"
"मग इथेच का राहत नाही?"
"कुठे राहील इथं - - इथलं घर तर दिरानं बळकावलं- -"
"मग मुलाकडे का जात नाही?"
"कर्म फुटलंय तिचं - - एकच पोर होती - - - तीही गेली."

प्रश्नार्थक नजरेनं पाहत राहिलो. आठवल्यासारखे आई स्वतःशीच बोलायला लागली.
"एकतर होती कलावती. न्हाऊ-माखू घालायची, लाड - कौतुक करायची. वयात आली. कावीळ झाली आणि पाहता पाहता उचलून नेली. असती तर आधार नसता झाला - -"
"मग आपल्याकडे का नाही ठेवीत? मी करीन सारं - -"
"अरे, कशी राहणार आपल्याकडे? ती वेगळ्या रजपूत जातीची. झिजेल पण वाकणार नाही. आणि तिची नातेवाईक माणसं नावं ठेवतील"

आईचे मला काही कळेना. मात्र काकीसाठे तिचा जीव तुटायचा, पण तिला घरी ठेवण्याचे तिला बळ नव्हते.
देवघरातून उठून ती सैंपाकाला गेली तरी तिचे काकीपुराण सुरूच असे. काकीचे म्हणे, ती तिच्या आईच्या गर्भात असतानाच लग्न ठरले. तिचे वडील आणि मामा यांनी तसा एक दुसर्‍याला शब्द दिला होता. जगातील वेगळे रंग
कळण्याआधीच तिचे लग्न झाले. आणि सुखाचा पेला ओठाशी लागला असतानाच तो निखळून पडला. काकीची परवड त्या दिवसापासून जी सुरु आहे, ती आजतागायत कायमच.

काकीचे जीवन आठवता आठवता आईच सुन्न झाली. मला डोके चेपायला सांगून ती अंथरुणात पडून राहिली. ती सांगत होती - माझ्या आजारात काकीनं केलेला नवस. गावाच्या सटवाईपुढे घातलेली लोटांगणं. जागून काढलेल्या रात्री. उकाड्यानं तळमळाट झाला तेव्हा तिच्या खरखरीत पदरानं घातलेला वारा. आराम पडल्यावर
सोडलेला नवस --- त्यावेळी तिची वाकलेली काया. गाव काय काय बोलला, पण काकीनं मला ओटीत घेतलं होत. सारे सारे आठवीत राहिली.

पुढे काकी गावातच राहायला आली. अंधार्‍या खोल्यांच्या घरात दिराशेजारी तिचा नवा संसार सुरू झाला. सकाळ झाली की गावातली चार घरं ती फिरून यायची. कुणाच्या घरी दळणाला हात लाव तर कुणाचे कांडण करून दे. कुठे मंगळागौरीसाठी आलेल्या पोरींची थट्टामस्करी कर, कुणाकडे सत्यनारायणासाठी केळीचं पानं पोहचव. गौरीगणपती असो नाहीतर लग्नमौंजी, काकी दृश्य-अदृश्य स्वरूपात तिथे असायचीच. इतके असले तरी ती आईजवळच निवांत असे. तिच्या अंगात ताप भरला आणि तोंड बेचव झाले की आईच लिंबाच्या फोडीचं लोणचे केळीच्या पानात देई. चुनभात आणि लोणचे खाऊन झाले की चार दिवस टणक होऊन ती फ़िरत राही. मॅट्रिक परीक्षा होऊन गाव सोडला तेव्हा काकीचे काही बरे नव्हते. शरीर थकत आलेले. दळण कांडणही होत नव्हते. उपासमार, नातेवाईकांची हिडीसफिडीस, दिराची मारझोड असे. सारे विपरीत सहन करीत ती जगत होती. घरातील भांडीकुंडीही रस्त्यावर आलेली, पण आईची आणि तिची माया काही आटली नव्हती.

शहरात जायला निघालो त्यादिवशी आईच्या पाठीशी काकीच उभी होती. ओसरी उतरून पुढे निघताच काकी समोर आली. गुळदाण्याची पापडी तिनं हातावर ठेवली. तिच्याकडं पाहिलं तिच्या केसांच्या रुपेरी भुरभुर बटा झाल्या होत्या. डोळ्यांनी उन्हाळ्यातील विहिरींसारखा तळ गाठला होता. त्वचेच्या घड्या पडायला लागलेल्या. शरीर झोकांडत होते. तिच्या पायावर हात ठेवला तशी ती गद्गद्ली,

"बापू, सहरात जातोस, पण माय-बापाले इसरू नगंस. नोकरी करजो. सुखी ठेवजो."
"काकी, तुलाही भेटायला येईल ना इथं."
"येजो, माहं सरणावरचं लुगडं तूज घेजो."

मी काकीची समज कशी काय काढणार ! संथपणं पावलं टाकीत स्टॅंड गाठला. सरणावर तिचा अचेतन देह चढला, तेव्हाचं लुगडे काही मला नेसवता आले नाही. खरे म्हणजे गावात काय होते आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा उरली नव्हती. थोड्याच दिवसात बर्‍यापैकी नोकर्‍या आम्हा भावंडांना लागल्या आणि गावातील ’घर’च शहरात येऊन गेले. शहरातील वेगवान जीवन, वागणे-बोलणे, रीतीरिवाज अधिक परिचयाचे होऊन गेलेत. गावच्या असण्याचे अंश, शहरी बांडगुळांनी गिळून टाकले. शैशवातील गावसंदर्भातील, टोकदारपणही
बोथट झालेले. कधी चुलत्याचे पत्र आले तर जाणे-येणे व्हायचे. असाच जाउन आलो तो, योगायोगाने तो बाजाराचाच दिवस होता. सरकारी कामही आटोपले. दिवस मोकळाच होता. म्हणून बाजार फिरायला निघालो. पण आता काही दादा सोबत नव्हते. त्यामुळे मन मानेल तसा फ़िरत राहिलो. आणि उशीर झाला तर काळजी
करायला आईही नव्हतीच. हटकायला ओळखीचे कुणी नव्हते. आठवणींच्या निरुंद बोळातून फिरताना त्या जुन्या फव्वार्‍याजवळ आलो.

अजूनही लहानसर दुकानांची ओळ होती. त्यात काकीसारखाच लहानसा व्यवसाय करणार्‍यांची दुकाने. त्यातील एकीने विचारले,
"काय पाहिजे साहेब? मसाला, मिरची, धने पावडर-हळद"
पिवळे खोलगट डोळे.
गालावरच्या सुरकुत्या.
डोक्याचे कोरडे भुरभुरणारे केस. असाच केव्हासा आलो होतो. सवयीनं काकीच्या भेटीला गेलो. तिनं आतुरतेनं विचारलं, "कशी आहे माही लेक?"
"ठीक आहे. पण मागे अपघात झाला. आता काही होत नाही तिच्याने"
"थकली असंन .. पण सांगजो काकी भेटली म्हून---"
तिनं घाईघाईनं तीन-चार कागदांच्या पुड्या बांधल्या. "घेऊन जा, कामधाम होत नसंन तिच्याच्यानं."

मी अळंटळं केली तेव्हा काकी नाराज झाली. इलाज नव्हता. पुड्या कशातरी सांभाळत जाणार तोच थांबवून ती म्हणाली, "अन् तुह्यासाठी गुळदाण्याची पापडी..."

चांगला बाप्पा झालो होतो तरी गावातील ती आगळी चव चघळीत. शहरात दिवस निघून गेले होते.

समोरची दुकानदार बाई हटकीत होती,
"साहेब, काय पाह्यजे?"
अनायसे विचारले, "गुळदाण्याची पापडी आहे?"
"आता अशी वडी कोन खातं साहेब." ओशाळलो. त्यांचे आपसातले हसू कानावर आले, पण काही ऐकले नाही असेच चालायला लागलो.
संध्याकाळ झाली.

सरत्या श्रावणातील गुलबट निळे आकाश न्याहाळीत होतो. ओळखीचे सारे फिरून झाले आमच्या वेटाळातील शमीचे झाड, गणपती देऊळ, देशमुखांचा वाडा अधिकाधिक उदास होता. गणुबग्यांच्या अंगणातील डाळींब तर केव्हाच वाळून खराटा झालेला. पण काकीचे घर कसे असेल?
कुणी दुसर्‍याने विकत घेतले असेल?
नवा महाल झाला असावा?

शहरात कितीतरी नवी माणसे राहायला येतात. छान सुबक बांधणीचे साधे घर तर असेल? झपझप मुलींच्या शाळेचे आवार ओलांडले आणि काकीच्या राहत्या घराच्या गल्लीत आलो. आजूबाजूला एकदोन घरे नवीच झाली होती. वळण घेतले आणि दाराशी आलो. मधला दरवाजा उद्ध्वस्त झाला होता. भिंती पडल्यामुळे तिथे खिंडार झाले होते. आणि पुढे विस्तारलेले थोरले बेचिराख खंडहर आणि त्यावर एकटे एक ऐसपैस वाढलेले करंजीचे झाड.

***

सगे सोयरे

श्री. वसंत चिंचाळकर
नचिकेत प्रकाशन
किंमत - रुपये २००
पृष्ठसंख्या - २४०

***

टंकलेखन साहाय्य - नंद्या, पौर्णिमा, अनीशा, श्रद्धा

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सुरेख शब्द चित्र.. वाचताना संपूच नयेसं वाटलं
चायनातून पुस्तकं ऑर्डर केली तरी पोचत नाहीत.. भारतातूनच कुणी येणार असल्यास मागवून घेईनच.. पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्स

हम्म, कुसुमावती देशपांड्यांच्या 'दमडी ' कथेची आठवण झाली. त्यातील शेवटचे वाक्य काळजात रुतून बसले आहे.
"दीड दमडीचा जीव तो, असाच पुढच्या बाजारी येईल, त्याच्या पुढच्या बाजारी, त्याच्या पुढच्याही बाजारी..."

(त्यातील दमडी ही आई सोबत बाजारला येणारी छोटी मुलगी असते)