प्रचीती

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

प्रचीती

पहिली भेट आणि पहिला स्पर्श..
आठवणींच्या गाभार्‍यात अजूनही तेवत आहे, स्पष्ट.
देवत्वाची अनामिक प्रचितीच जणू.
अनेक आयुष्यांची ओळख असल्यागत
तुझे मला पहाणे, माझ्या कुशीत बिलगणे.
मुलायम शहाराच पण निशःब्द करणारा, समाधिस्त करणारा.

आपण त्या आधी कधी पूर्वीही भेटलो होतो- स्वप्नात, कल्पनेत, कुठेतरी नक्कीच.
तुझे ते हसणे आणि खळी, कायमची हृदयपटलावर कोरलेली.

आणि मग सुरू झाला ऊत्कट प्रवास-
पावलागणीक माझ्या आधारावर,
वेळी अवेळी जागण्यावर,
छोट्या छोट्या गोष्टींत जगण्यावर,
एकही शब्द न बोलता खूप काही गप्पांवर,
व्यावहारीक चौकट्या मोडून, स्त्री पुरूष भेद सोडून निव्वळ सोबतीवर,
वयाचे, मनाचे अंतर भेदून जाणिवांवर,
किती काळ, किती योजने,
असेच एकत्र चाललो नाही.. ?

हळू हळू एखाद्या वेलीसारखी फुलत गेलीस.. माझ्या भोवती, मला धरून.
तुझे ते फुलणे किती लोभस, सुखदायक, परीपूर्ण करणारे.
तु बहरत राहिलीस.. मी बुंध्यासारखा आधार होवून पहात राहिलो..
किती काळ, किती योजने,
असेच एकत्र राहिलो नाही..?

पण असे अफाट बहरताना, त्या बहरात झुलताना, झुलवताना,
मला घातलेले रेशमी पीळ मात्र तसेच होते, तुझ्याही नकळत!

काल,
त्याच्या अलगद हिसक्यानेच भानावर आलो-
पहातोय, अताशा वेलीनेच एका नव्या बुंध्याला जन्म दिलाय.
निर्मितीच्या ऊत्कटबींदूवर सृजनाची पुन्हा एकदा झालेली ती गाठभेट.

माझे बुंधेपण तिथेच आहे.. त्याच मुलायम शहार्‍यासकट.

तू मात्र नव्याने समर्थ.. संपूर्ण..
देवत्वाची अनामिक प्रचीती आता तुलाही.

-तुझा बाबा.

प्रकार: 
शब्दखुणा: 

छान !!