आमच्या खोलीत....

Submitted by -शाम on 18 May, 2011 - 01:33

आमच्या खोलीत तेंव्हा राणी मुखर्जी रहायची
भाडं बीडं देत नसे स्वप्नात एखादी पप्पी द्यायची

भिंतीवर बसुन कधी कंटाळली नाही बिचारी
रोज हसुन बघायची, आमची फाटकी बनियन नि मळक्या विजारी

आमची दाढी, आमची अंघोळ, उघड्या डोळ्यांनी बघायची
आम्हां पोरांत एकटीच पण बिन्धास जगायची

खोडी कुणी काढली तरी राणी कधी चिडली नाही
आमच्या कुठल्याच भांडणात राणी कधी पडली नाही

आमच्या मैत्रिणींना ही राणी हसुन भेटायची
आमचं काही सांगते की काय? उगाच भीती वाटायची

आम्ही पाळलेल्या पाली तिच्या सोबत खेळायच्या
आमच्या सारखंच तिच्याही अंगा-खांद्यावर लोळायच्या

आमच्या जमिनीवर तिने पाय कधी ठेवला नाही
आमच्या अंथरुन-पांघरुनाला हात कधी लावला नाही

जेव्हा आम्ही बायकां सारखी कपडे,भांडी धुवायचो
काय बघतेस्? म्हणून तिला उगाच शिव्या द्यायचो

आमच्या सोबत राणी कधी डबा खात नव्हती
घे म्हटलं तरी सुध्दा घास घेत नव्हती

तिला सारं माहित होतं,आई पहाटे उठली असेल
धूर भरल्या डोळ्यांनी भाकरी तिने कुटली असेल

डबा घेऊन बाप माझा एस्.टी मागे धावला असेल
फर्लांगभर धावल्यावर ड्रायव्हरने ब्रेक लावला असेल

मळालेली एखादी नोट भाकरी खाली असायची
भाकरचं तेंव्हा जणू आई सारखी दिसायची

राणीला तो भाकरीचा प्रवास माहित होता
शिळ्या विटल्या ड्ब्याचा सुवास माहित होता

त्याच पोस्टरची ती जीवनाची गोष्ट
"यशासाठी मित्रांनो करा खरे कष्ट

आपलं भविष्य आपल्यालाच कसता यायला हवं
दु;खालाही मिठीत घेऊन हासता यायला हवं"

कळतं नकळतं सांगुन गेली कला खरी जगायची
आमच्या खोलीत तेंव्हा राणी मुखर्जी रहायची....

-- शाम

गुलमोहर: 

मुक्ता , स्मिता, भुषणजी,आणि आभास्..सर्वांचा आभारी आहे!
..............स्मिताताई, होस्टेल किंवा भाड्याने रुम घेणार्‍या कॉलेजीअन्सच्या खोलीतलं हे वास्तव अगदी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न होता..कुठे खटकलं ते नि का ते विस्ताराने कळवा.

तिला सारं माहित होतं,आई पहाटे उठली असेल
धूर भरल्या डोळ्यांनी भाकरी तिने कुटली असेल

डबा घेऊन बाप माझा एस्.टी मागे धावला असेल
फर्लांगभर धावल्यावर ड्रायव्हरने ब्रेक लावला असेल

मळालेली एखादी नोट भाकरी खाली असायची
भाकरचं तेंव्हा जणू आई सारखी दिसायची

काय लिहिलंय खास!

मस्त

हाय्य गेले ते दिवस...राहिल्या फक्त्त आठवणी..........
आवडली रे भाऊ ही पण !!
आमच्या खोलीत मात्र तेव्हा रेखाबाई होत्या, आता मातुर फकस्त मनात ! (भिंतीवर लावायची सोय नाही राहिली Wink )

<<जगायची खरी कला विनोदातून गांभिर्याकडे छान खुलवली . सुंदर !<< +१

हॉस्टेलच्या आठवणी जागवल्यात हो! जबरदस्त कविता.
आमच्या खोलीत तेव्हा हा असायचा. अगदी हेच पोस्टर.

bollywood-actor-aamir-khan-india-rare-old-post-card-postcard-no-reserve-b794455619cfddaf83e527ded7393c7d.jpg