चांदण्या राती... गोरखगडाच्या माथी...

Submitted by रोहित ..एक मावळा on 17 May, 2011 - 03:14

मागच्या पावसाळ्यात सिध्धगडाला धो-धो पावसात अंघोळ करताना पाहिला होता.तेथे धबधब्यांची जत्रा अनुभवली होती.तो नजारा अजुन डोळ्यात तसाच जिवंत आहे.आता त्याच डोंगररांगेतल्या गोरखडाला भेटायच ठरल होत.पण उन्हाळ्यात दिवसा धबधबे नाही तर घामाच्या जलधारा नक्कीच वाहतील म्हणून चांदण्या राती पोर्णिमेच्या दोन दिवस आधीची मोहीम ठरली.शनिवारी (१६ एप्रिल)रात्री साडे-दहा वाजता कल्याण स्टेशनवर पोहोचण्यासाठी माबोकर दगडसम्राट योचा समस आला होता.पण मुळात घरातुनच उशीरा निघाल्यामुळे वेळेवर पोहोचेल याची खात्री नव्हती.ठाणे स्टेशनला पोहोचलो तेव्हा साडे-दहा वाजले होते.कल्याणहुन मुरबाडला जाणारी अकराची एस.टी भेटेल की नाही याची शास्वती नव्हती. "अरे येऊ का घरी जाऊ ?. मला उशीर झालाय .. आताशी ठाण्याला आहे." इति मी.
तिकडून यो "@#$%%!" अस कायतरी बरळला.सव्वाअकराची एस.टी आहे अस कळल.मला थोड हायस वाटल.फास्ट ट्रेन तर नव्हती मग स्लो लोकल पकडुन कल्याणला पोहोचलो.धावत धावतच एस.टी पकडली.मुरबाडला जाण्यार्‍या यसटीत आम्ही अकरा माबोकर मावळे (यो,इंद्रा,गिरीविहार,नविन,नविनचा भाऊ ,दिपक डी,दिपक एम,प्रगो उर्फ पंत,संदिप,गिरिश जोशी उर्फ ज्यो अन म्या) रात्रीच्या सामन्याकरता सज्ज झालो.खजिनदार गिरिविहारने प्रतिमाणसी २२ रु.ची तिकिटा फाडली.डुगुडुगु करत एस.टी साडे-बाराला मुरबाडला पोहोचली.तेथुन लगेचच देहरी गावाला जाण्यार्‍या शेवटच्या एस.टी त (मुरबाड ते देहरी (पायथ्याचे गाव) १७ रु. तिकिट) आम्ही घुसलो.पण आधीच ट्रेकमेटच्या ग्रुपने सगळ्या सिटवर कब्जा केला होता.मग उभ्यानेच आमचा प्रवास सुरु झाला.ट्रेकमेटचा ग्रुप सुद्धा गोरखगडावर चढाई करुन जाणार होते.जशी आमावस्येला सगळी भुत बाहेर पडतात तशी आम्ही सर्व भटकी भुत चांदण्या राती बाहेर पडलो होतो.

दिडच्या सुमारास आम्ही देहरी गावात पोहोचलो.मस्त टिपुर चांदण पडल होत.हवेत गारवा बिलकुल नव्हता.झाडावरची पानसुद्धा हालत नव्हती.पण चंद्राच्या मंद प्रकाशात शांत वाटत होत.

रात्रीचे हत्यार म्हणजे बॅटरी ( टॉर्च ) म्यानातुन बाहेर काढल्या अन आमची रात्रीची सफर सुरु झाली.
रस्त्याच्या डावीकडे गोरखगड आणि मश्चिंद्रगडाचे सुळके माना वर काढुन आमच्याकडे बघत होते असे भासले.पुढे मुख्य रस्त्याने विहिर ओलांडुन एका देवळापाशी आलो.गडाकडे जाणारी वाट देऊळाच्या मागुन जाणारी होती.आता खरी चढण सुरु झाली.मध्येच वाटेला अनेक धुमारे फुटत होते.कुठे-कुठे दोन पायवाटा दिसत होत्या.पण तीच वाट पुढे जाऊन एक होत होती.डोंगराची एक चढण चढुन वरती आलो.खाली गाढ झोपलेल देहरी गाव दिसल.आता सगळ्यांच्या अंगातुन घामाच्या जलधारा वाहु लागल्या.थोडास आराम करुन परत पुढची चढाई चालु केली.
खर म्हणजे चंद्राचा उजेड पुरेसा होता अन आता अंधाराला सरावलो होतो.म्हणुन बॅटरी म्यान करुन चालु लागलो.

पुढे पठारावरुन चालुन गेल्यावर वाट खाली दरीत गेली.अन तेथुन परत वरती घसरगुंडीची अवघड वाट सुरु झाली.या वाटेने चांगलीच दमछाक केली.पण न थांबता आम्ही तो चढ पार केला.मागाहुन ट्रेकमेटस ची कोल्हेकुई ऐकु येत होती.ते येऊन आपल्याला गाठणार अन त्यांचा ग्रुप मोठा होता.म्हणुन गुहेत जागा पकडायला ताज्या दमाचे नविन ,नविनचा भाऊ अन ज्यो पुढे गेले.थोडासा आराम करुन आम्ही सुद्धा पुढे कुच केले.

डाव्या बाजुला गोरखगड अन उजव्या बाजुला राकट,उंच धमधम्या डोंगर यांच्या घळीत येऊन पोहोचलो.तेथल दृष्य पाहुन आम्ही जागीच थिजलो.धुक होत की ढग माहीत नाही.पण अस वाटत होत की दिवसभर खेळुन,बागडुन दमलेल ढग त्या काळ्या पहाडाच्या कुशीत विसावले होते.धमधम्याच्या बाजुला असलेल्या सिध्धगडाच्या माचीवर वणवा पेटलेला दिसला.

आता पुढे दाट झाडी लागली.आमचे पुढे गेलेले म्होरके दिसेनासे झाले.वाट आता गोरखगडाच्या मागे सरकत होती.साद देऊन सुद्धा प्रतिसाद कानी ऐकु येत नव्हता.रस्ता चुकला की काय असे क्षणभर वाटले म्हणुन पळत जाऊन पुढे बघितले तेव्हा त्यांच्या बॅटर्‍या (टॉर्च) अंधारात वरती गडाच्या वाटेवर चमकल्या.
"थोडं पुढे गेल्यावर एक झोपडी दिसेल तेथुन डावीकडच्या वाटेने वळा " असा वरतुन त्यांनी आवाज टाकला.

त्या गर्द झाडीतुन पुढे गेल्यावर एक झोपडी दिसली.खर म्हणजे ती झोपडी नसुन पडक देऊळ होत.त्या देऊळासमोरच एक पाण्याची टाकी होती.सुकलेला घसा पाण्याने ओला करुन पुढे कुच केले.आता खड्या चढणीच्या कातळात कोरलेल्या सरळसोट पायर्‍या लागल्या.

त्या पायर्‍या चढुन वरती आलो.छोटा दरवाजा सामोरी आला.भुयारासारख्या भासणार्‍या त्या दरवाजातुन वरती आलो.या टप्प्यावर आता दोन वाटा दिसत होत्या.एक डावीकडे वळते अन एक उजवीकडे.गुहा नक्की कुठल्या बाजुला आहे ? अन आपले संवगडी कुठे गेले ? पुन्हा एकदा साद देत होतो पण आवाज काळोखात विरुन जात होता.डाविकडच्या वाटेने थोडे पुढे गेलो तेथ एक छोट सुकलेल पाण्याच टाक होत.अन पुढचा रस्ता दगडधोंड्याचा होता.पण नकाशात दाखवल्याप्रमाने गुहेकडे जाणारी वाट उजव्या बाजुने होती.उजव्या बाजुला गेले असता एक छोटी गुहा आढळली.त्या गुहेच्या पुढे अजुन एक पाण्याच टाक दिसल.अन एक पडलेल झाड सुद्धा होत.तेथुन छोटीशी निमुळती वाट होती.पण ती गुहेकडे जाणारी नसणार म्हणुन तेथेच थोडे घुटमळलो.

शेवटी यो ने आधुनिक संदेशवहन यंत्राचा (मोबईलचा )वापर करून पुढे गेलेल्या मावळ्यांशी संपर्क साधला.ते लोक गुहेत पोहोचले होते.गुहेकडे जाणारी वाट त्या छोट्या गुहेच्या वरतुन जाणारी होती.कातळात कोरलेल्या पायर्‍या आम्हाला अंधारात दिसल्या नव्हत्या.त्यातल्याच एका पायर्‍यावर शिलालेख कोरलेला होता.या पायर्‍यासुद्धा सरळसोट होत्या.खाली खोल दरी होती.पण अंधारामुळे दिसत नव्हती.त्यामुळे उंचीचा अंदाज येत नव्हता.

पायर्‍या चढुन वरच्या टप्प्यावर आलो.चंद्राला डोळे भरुन बघुन घेतले.कारण गुहा गोरखगडाच्या मागच्या बाजुला होती अन तेथुन चंद्रदर्शन होणार नव्हते.पण गुहेच्या समोर असलेल्या मच्छिंद्रगड चांदण्यात न्हावुन निघालेला दिसत होता.गुहेच्या या वाटेवर हे झाड दिसल.त्याच्यावर एक अमानवीय चंद्र लटकलेला दिसला.

गुहा प्रशस्त आहे.जवळ-जवळ ४०-५० जण आरामात राहु शकतील.घामाने अंग ओलेचिंब झाले होते.म्हणुन गुहेच्या बाहेर थोडा वेळ हवा खात बसलो.गुहेत भिंतीवर गोरखनाथ आणि दत्त गुरूंची प्रतिमा चितारलेली दिसली.गुहेत दोन-चार सुकी लाकड होती.पण अजुन काही मिळतात का ? ते बघायला मी अन प्रगो गुहेच्या उजवीकडे गेलो.या वाटेवर दोन सुकलेली पाण्याची टाकी आढळली.सगळीकडे काळा कातळ पसरलेला दिसला.काही झाडे दिसली पण ती दरीत झुकलेली होती.सुकलेली चार-पाच काटकी अन थोड गवत .. बस्स एव्हढच आमच्या हाती लागल.

आम्ही न चुकता पोहोचलो होतो.याची जाणीव न आलेल्या टांगारुंना (आनंदयात्री,जिप्सी,बाजीराव्_अवि) करुन दिली.रात्रीच्या पावने-चार वाजता त्यांना साखरझोपेतुन उठवुन आम्ही झोपेसाठी तयार झालो.पण अजुनपर्यंत ट्रेकमेटचे भटके गुहेत आले नव्हते.त्यांचा म्होरक्या थोड्यावेळाने आला.त्यांच्या ग्रुपमधले दोन-तीन सभासद अंधारात त्या कातळातल्या खड्या पायर्‍या चढुन यायला तयार नव्हते.म्हणुन ते खालीच थांबले होते.

येथे गुहेत आता आमच्या टिममधल्या बर्‍याच जणांच्या विकेट पडल्या होत्या.पण आम्हाला झोप काही लागत नव्हती.कारण गुहेत वेगळच संगीत वाजु लागल होत.प्रत्येकजण वेगवेगळ्या आवाजात (घोरण्याच)आलाप घेत होते.या सांग्रसंगीताला कंटाळुन आम्ही म्हणजे यो,दिपक एम अन मी गुहेच्या बाहेर पायर्‍यांवरती येऊन बसलो.

रात्रीचा निसर्ग अनुभवत बसलो.रात्रीची एक वेगळीच नशा असते ना....जसजशी रात्र चढत जाते तशी ती अजुन खुलते.चंद्र दिसत नव्हता पण समोर चंद्राच्या प्रकाशात मच्छिंद्रगड झळाळुन निघाला होता.आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या.जस काय आमच्याशी त्या मुक संवाद करत होत्या.बाजुला लांबवर धुक्यात हरविलेली सह्याद्रीची लकेर दिसत होती.चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने जशी समुद्राला भरती येते.तस धुक हळूहळू वरती उठत होत.तो अद्भुत नजारा आम्ही डोळ्यांनी पीत बसलो होते.त्याची अनोखी धुंदी मनावर पसरली होती.माझ्याकडे आंतरजाळावरुन गोळा केलेल्या गडाच्या माहितीचा कागद होता.मग काय ...तो वाचत बसलो.कारण कुठल्याही गडावर गेल्यावर त्या गडाच,ठिकाणाच स्थानमाहत्म्य माहित पाहिजे.

गोरखगड आणि मच्छिंद्रगडाला तसा फारसा ऐतिहासिक वारसा नाही.शहाजी राजांच्या काळात या गडाला महत्व होते.पण कुठल्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख नाही.शिवकालात या गडाचा वापर आजुबाजुच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी केला जाई.पुर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा राहण्यासाठी वापर करत.गडावर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते.या मोठ्या गुहेच्या बाजुलाच एक पाण्याच टाक आहे त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.पाण्याची एकुण चौदा खोदिव टाकी गडावर आहेत.
गडावर अजुन छोट्या तीन-चार गुहा आहेत.या गुहेच्या समोरच दोन चाफ्याची झाडे दरीत झुकलेली आढळतात.त्यातलच एक झाड(अमानवीय लटकेला चंद्र) आम्हाला गुहेच्या वाटेवर येताना दिसल होत.
गोरक्षनाथांच्या साधनेच हे ठिकाण म्हणुन या गडाचे नाव गोरखगड पडले.

पावने-पाच वाजले जोते. हवेत थोडा गारवा आता जाणवायला लागला होता.समोरचा गोरखगड अंधारात दिसेनासा होऊ लागला.कारण चंद्र मावळला होता.धुक्याची ओहोटी सुरु झाली. हळूहळू धुक खाली बसु लागल.तस राकट सह्याद्रीची लांबवर पसरलेली डोंगररांग धुसर दिसु लागली.थोडावेळ झोपुया म्हणुन आम्ही गुहेकडे वळलो.साडेपाचचा गजर लावुन पाठ टेकविली.जवळ-जवळ सगळेच आता गाढ निद्रेत होते.पण मला काय झोप येत नव्हती.
खाली कुठेतरी देवळातल्या भजनाचा आवाज कानी पडत होता.साडे-पाच वाजुन गेले होते.अंधारावर मात करत पहाटेने शिरकाव केला होता.आता सुर्योदय पाहण्यासाठी गडाच्या माथ्यावर जायला आमची फौज सज्ज झाली.माहितीप्रमाणे गुहेच्या बाजुला पाण्याच टाक दिसल.पण त्यात थोड शैवाळ साचल होत अन पाणी सुद्धा थोड खाली होत.त्यामुळे नाश्ता गुहेत न करता खाली वाटेत दिसलेल्या देवळापाशी करण्याचा निर्णय घेतला.

माथ्यावर जायला गुहेच्या डावीकडे थोडे चालत जावे लागले.वाटेत दोन सुकलेली छोटी पाण्याची टाकी नजरेस पडली.जी आम्हाला रात्री सुकी लाकड गोळा करताना दिसली होती.माथ्यावर जायला खडकात कोरलेल्या पन्नास पायर्‍या चढुन जाव्या लागतात.पण गमंत म्हणजे या चढाच्या सुरुवातीला पायर्‍याच नाहीत.दहा-बारा फुटांचा हा रॉक पॅच दगडात पडलेल्या खोबणीत हात ठेवुन चढावा लागतो.हा रॉक पॅच चढुन आम्ही वरती जाणार्‍या पायर्‍याकडे वळलो.खडकात कोरलेल्या या पायर्‍या उंच आणी सरळ आहेत.या खड्या चढणीच्या पायर्‍या फार काळजीपुर्वक चढाव्या लागतात.पायर्‍यांमध्ये पकडायला खोबण करुन ठेवलेय.गोल फिरणारे जिने कशे असतात तशा या पायर्‍या गोल फिरत माथ्यावर घेऊन जातात.फक्त कुठे-कुठे बाजुला कठडे नाहीत.तेव्हा सांभाळून जावे लागते.

गडाच्या माथ्यावर आलो.माथ्याचा विस्तार तसा लहान आहे.महादेवाच मंदिर आणि त्याच्या समोर एक नंदी स्थानापन्न झालेला दिसला.पहाटेची ताजी हवा उरात भरुन घेतली.एकदम प्रसन्न वाटल.

बर्‍यापैकी उजाडल होत.पण क्षितिजावरुन होणारा सुर्योदय आम्हाला दिसणार नव्हता.कारण मध्येच सह्याद्रीची रांग पसरली होती.आज डोंगराआडुन प्रभाकर आम्हाला भेटायला येणार होते.त्यांचे फोटोसेशन करण्याआधी आम्ही आमचे फोटोसेशन उरकुन घेतले.

माबोकर मावळे....

मागे राकट धमधम्या अन त्याच्या उजव्या बाजुला सिध्धगड डौलाने उभे होते.आता राकट भासणार्‍या या रांगा पावसाळ्यात हिरवाईने खुलुन जातात.पावसाळ्यात त्यांच्या अंगावरुन धावणार्‍या जलधारांचे चित्र क्षणभर डोळ्यात उभे राहिले.

नंतर उड्या मारण्याचा कार्यक्रम सुरु झाला.आमच्या इकडे उड्या पडत होत्या अन तिकडे सुर्यनारायणाला आम्हाला भेटायची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.डोंगरामागे हळूहळु लाली फुटु लागली होती.धमधम्याच्या डाव्या बाजुला आहुपे घाट पसरलेला आता स्पष्ट दिसत होता.

लाल गोळा जसजसा डोंगराआडुन वरती सरकत होता.तसे क्षणाक्षणाला आकाशाचे रंग पालटत होते.

अहुपे घाट ते जीवधन,ढाकोबा,नाणेघाटापर्यंत पसरलेली सह्याद्रीची रांग,त्या रांगेच्या आडुन होणारा सुर्योदय अन या घाटाच्या खाली पसरलेला धुक्याचा सागर असे मनोहरी दृष्य पाहुन डोळ्याचे पारणे फिटले.

देहरी गाव ,मंदिर आणि ज्या वाटेने आम्ही रात्री गड चढलो त्या वाटा माथ्यावरुन दिसल्या.त्या वाटेवरच बरचस जंगल जाळलेल होत का वणवा पेटुन तस झाल.. माहित नाही.पण पावसाळ्यात हा परिसर हिरवाईने नटुन जातो.पावसाळ्यातल्या दाट झाडीमुळे खुप लोक या गडावर येताना रस्ता चुकतात.
आम्ही मात्र रात्री न चुकता गड सर केला होता.
सकाळच्या या आल्हादायक वातावरणाचा मनोसक्त आस्वाद घेतल्यानंतर आता माथ्यावरुन खाली उतरायला लागलो.
या पायर्‍यावरुन अंदाज आला असेलच.

थोडा जरी पाय चुकला तर खाली दरी आ वासुन होतीच.

त्या पायर्‍या उतरुन रॉक पॅचपाशी आलो.खर म्हनजे हा पॅच चढताना काही वाटल नव्हत पण उतरताना थोडी धास्ती वाटत होती.दगडाच्या खोबणीत हात ठेवुन कसाबसा तो पॅच आम्ही उतरलो. नविन मास्टर सगळ्यांना तो पॅच कसा उतरायचा याचा प्रात्यक्षिक करुन दाखवत होता.त्याप्रमाणे गिरि,पंत खाली उतरले.
हाच तो रॉक पॅच अन लीलया उतरणारा यो ...

यो अन नविनच्या मकर्टलीला संपवुन गुहेपाशी आलो.तर गुहेच्या समोर बरीचशी माकडे जमा झाली होती.
त्यातलाच हा एक टग्या...

आणि हा तर लांब झाडावरती जाऊन बसला होता.

नाही दिसला ... जरा जवळुन बघा..

हा मच्छिंद्रगडाचा सुळका,दरीत झुकलेल चाफ्याचे झाड अन धुक्याचा महासागर...

हिच ती प्रशस्त गुहा...

आतुन

बाहेरुन..

या सुळक्याला मागच्या बाजुलासुद्धा एक छोटी गुहा दिसली.सुळक्याच्या भोवतीने एक प्रदिक्षिणा घालु शकतो अशी वाट आहे.पण तेव्हढा वेळ आमच्याकडे नव्हता.सुर्य माथ्यावर यायच्या आधी गड उतरायचा होता.

गुहेजवळच्या टाक्यांमध्ये हि रानफुल उमललेली दिसली.

सह्याद्रीच्या या डोंगररांगा साद घालत होत्या.

पोटात कावळे ओरडायला लागल्यामुळे आता गड उतराया लागलो.
याच त्या खड्या सरळसोट पायर्‍या ज्या आम्ही रात्रीच्या अंधारात चढुन आलो होतो.

दगडी दरवाजा....

पायर्‍या उतरुन झोपडीवजा मंदिरापाशी आलो.त्या मंदिराच्या समोर पाण्याची टाकी होतीच.झाडी असल्यामुळे बर्‍यापैकी सावली होती.बाजुला मांडलेली एक आयती चुलसुद्धा भेटली.

मग काय गिलगिले बंधु कामाला लागले.

मस्तपैकी मॅगी ओरपली.नंतर गिरीकडुन चहाची फर्माईश आली.मग लोकाग्राहास्तव इंद्राने चहा उकळायला ठेवला.त्यात पण कोणी पेले (ग्लास) आणले नव्हते.मग मी आणलेल्या प्लेटमध्ये सगळ्यांनी चहा ओतुन पिला.सुररर...के पिओ ची मजा अनुभवली. आता पायथा खुणावत होता म्हणुन झपाझप पाऊले टाकीत गड उतरायला लागलो.

मधेच करवंदाची जाळी लागली.पण करवंद अजुन कच्ची होती.तरीपण गिलगिले बंधु लोणच्यासाठी होतील म्हणुन गोळा करत बसले.उन्हाचा तडाका हळुहळु जाणवु लागला होता.मग मात्र आम्ही अकरा नंबरची गाडी भुंगाट सोडली.
थोड्या वेळाने मागे वळून बघितले.

सगळा उतारच होता.मध्येच दोन-तीन वाटा दिसत होत्या.जशा वाटर पार्क मध्ये राईड असतात ना.. तशा या नागमोडी वाटेवर सुस्साट सुटलो ते खाली पायथ्याशी असलेल्या मंदिरापाशीच येऊन थांबलो.अंगातुन घामाच्या धारा वाहत होत्या.पण मंदिराच्या समोर असलेल्या आंब्याच्या गर्द सावलीत बसुन थोडस हायस वाटल.

विठ्ठल मंदिर...

उन्हाळ्यात ट्रेक करायचे म्हणजे तहान खुप लागते.घसा सारखा कोरडा पडतो.अन सारख पाणी पिऊनसुध्धा तहान भागत नाही.त्याच्यावर चांगला उपाय म्हनजे फळ खाणे. हो आम्ही पाण्याच्या बाटलीबरोबर फळसुध्धा (चिकु,काकडी,जाम, ... तत्सम) नेली होती.त्याचा फायदा या ट्रेकदरम्यान आम्हाला झाला.

अकराच्या सुमारास आम्ही पायथ्याशी पोहोचलो होतो.थोडावेळ आराम करुन एस.टी पकडण्यासाठी देहरी गावाकडे कुच केले.वाटेवरची विहिर लागली अन गिरिला अंघोळ करायची हुक्की आली.पण त्या विहिरीतील पाणी पार तळाशी गेल होत.

गावात आल्यावर कळल की मुरबाडला जाणारी एस.टी १ वाजताची आहे.अन अजुन दोन तास बाकी होते.
"खाली गावातल्या नाक्यावर १२ ची एस.टी भेटेल पण ती येईलच याची खात्री नाही " असही एका दुकानदाराकडुन कळल.मग आमची वरात त्या नाक्यावर चालत निघाली.

गावातल कौलारु घर ...

एका खाजगी जीपवाल्याची बोलणी करुन पाहिली.पहिले ७०० रुपडे अन नंतर चारशे रुपड्यावर ठराव झाला.पण तो जीपवाला जेवायच कारण सांगुन दुसर भाड आमच्या डोळ्यासमोरुन घेऊन गेला.बारा वाजुन गेले होते तरी एस.टी चा पत्ता नव्हता.
तिथल्या एका दुकानदाराने शनिवार- रविवार एस-टी गावात येतच नाही अस सांगुन आमच्या उरल्यासुरल्या आकांक्षाना सुरुंग लावला.मग परत दुसरा कुठला जिपवाला मिळतोय का याची शोधाशोध सुरु झाली.त्याच दुकानदाराने फोनवरुन ३०० रुपड्याच्या बोलीवर (मुरबाडला जाण्यासाठी) एका जीपवाल्याशी सौदा ठरवुन दिला.तो पण पंधरा मिनिटानंतर येणार होता.

एस.टी च्या प्रतिक्षेत गावकरी अन माबोकर....

बैलगाडी तरी नेईल का आम्हाला ...

गावातुन दिसणारे गोरखगड आणि मच्छिंद्रगडाचे सु़ळके...

' जाईन तर एस.टीने च जाईन ' या नविनच्या उक्तीला जागुन साडे-बाराच्या दरम्यान एस.टी आली.अन तो जीपवालासुद्धा...... जो आम्हाला पहिले कबुल करुन गेला होता.
खडखड करत जाणार्‍या लाल डब्याचा पर्याय आम्ही निवडला.कारण त्या जीपवाल्याने पाऊनतास आम्हाला थांबवुन ठेवले होते.
येताना आम्ही नारीवली मार्गे देहरीला पोहोचलो होतो.आता जाताना दुसर्‍या रस्त्याने मुरबाडच्या वाटेला लागलो.पण या वाटेने जात असताना एस.टी तुन गोरखगड आणि मच्छिंद्रगड,धमधम्या,सिध्धगड या डोंगररांगाना कॅमेरात कैद करता आले.

ही एक नदिसुद्धा दिसली.

या नदीच्या प्रवाहाप्रमाणे घराकडे आमचा प्रवास सुरु झाला.एस.टी ने मुरबाड अन तेथुन कल्याणला पोहोचलो.नंतर लोकलने सर्व माबोकर आपआपल्या वाटेला लागले.

चांदण्या राती केलेली ट्रेकिंग,डोंगराच्या कुशीत अनुभवलेला रात्रीचा निसर्ग,रांगडा सह्याद्री,डोंगराआडुन भेटलेले सुर्यनारायण,धुक्याचा सागर.... अन निसर्गाशी नाते जपणारे आम्ही वेडे माबोकर मावळे..

एव्हढ्यात ही ओढ संपणार नाही....

पुन्हा भेटूच..
अशाच एका चांदण्या राती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहित...
मस्त झाला ट्रेक... गोरखगड करावा तर रात्रीच असे काहीसे समीकरण काही वर्षात बनून गेले आहे. अगदी पौर्णिमा नसेल तरी चालते पण असेल तर अजूनच उत्तम.. मी आत्तापर्यंत तीनही वेळा गोरखगड रात्रीच सर केला आहे. शेवटच्या गाडीने देहरीला पोचायचे. हमीदकडे जेवण उरकायचे आणि पहाटे १ ला चढायला सुरवात करायची... ३-४ पर्यंत आरामात गप्पा टाकत गुहेत पोचता येते.

गुहेत ४०-५० लोक राहू शकत असली तरी ती बरीच ओबड-धोबड आहे तेंव्हा उजव्या बाजूचा थोडा भाग सोडला तर झोपायला जरा अवघडच. शिवाय डाव्याबाजूला नवनाथ पंथीय नाथांची स्थापना केलेली आहे तेंव्हा तिथे झोपता येत नाही... गुहेत आपण झोपलो असू आणि बाहेर कोणी बसून बोलत असेल तर आवाज आत इतका घुमतो की झोप लागणे अशक्य... Happy

बाकी तू एक पहिले आहेस का.. गावातून गोरखगड हा सुळका आणि मच्छिंद्रगड हा किल्ला वाटत राहतो.. पण प्रत्यक्षात उलटे आहे. शिवाय गडाकडे जाणारी वाट ही बरोबर मागच्या बाजूने आहे त्यामुळे नव्याने जाणाऱ्या लोकांना आपण वाट चुकलो आहे की काय असेच वाटत राहते. त्यात रात्र असेल तर काय बघायलाच नको... Happy

हा माझा झब्बू... Happy

रोहित __/\__ जबरद्स्त ट्रेक ,वाचतानाच दमछाक झाली Happy
तो 'आहट' मधला चंद्र आणी उगवतीचा सूर्य- तर धमाल दृष्ये टिपलीयेस.
सलाम आहे तुम्हा सर्वांच्या हिमतीला आणी चिकाटी ला.
आमच्यापर्यन्त पोचवल्याबद्दल आभार.

धन्यवाद ईनमीन तीन,दिनेशदा,प भ ,जुयी, वर्षुतै .... Happy आभारी आहे.

यो घाबरलेला दिसतोय >> नाही रे ईनमीन तीन .. नाटक्या आहे तो.. Wink

बाकी तू एक पहिले आहेस का.. गावातून गोरखगड हा सुळका आणि मच्छिंद्रगड हा किल्ला वाटत राहतो पण प्रत्यक्षात उलटे आहे. >> हो रोहन अगदी अगदी Happy
अन तुझा पावसाळ्यातला झब्बुपण लय भारी..

बास मी हा शेवटचा ट्रेक मिसला .. ह्या पुढचा नाही... >>> Lol

रोहीत.. मस्तच लिहीलेस.. मस्त फोटोज.. नि तो दिपकचा झाडासोबत घेतलेला फोटो खास आवडला Happy

ईनमीन तीन.. डरके आगे जीत है ची जाहिरात करत होतो रे... Lol

वा..मस्तच ट्रेक
भारतातलं पहाटेचं वातावरण तसंही वेड लावणारं असतं आणि त्यात हे गड किल्ल्यांवर अनुभवायला तर अजून मजा येत असेल.
रानफुलं छान आहेत. पहिल्यांदा हिरवं फुल बघितलं
बाकी पण फोटु झ्याकच आहेत. कसले भारी भारी कॅमेरे असतात हो तुमच्याकडे? हिरवे, पिवळे, कितीही अंधारातले फोटो मस्त येतात. Happy
अमानवीय चंद्र.... हा हा हा
छान ट्रेक झाला तुमच्याबरोबरच आहोत असं वाटत होतं.

रोमा मस्त फोटो रे....
तो अंधारातला नाईट व्हिजन गॉगल लाऊन काढल्यासारखा फोटो तर कसला जबरी वाटतोय...
छ्या राव फार वाईट वाटतयं हा ट्रेक मिसल्याबद्दल....

धन्यवाद विनय,यो,मानुषी,इंद्रधनु,इंद्रधनुष्य्,अंजली१२,प्रज्ञा १२३,जिप्सी,आशुचँप,गौतम,भाऊ नमसकर... Happy धन्यवाद आभारी आहे.

यो घाबरलेला दिसतोय >> नाही रे ईनमीन तीन .. नाटक्या आहे तो.. Wink
ईनमीन तीन.. डरके आगे जीत है ची जाहिरात करत होतो रे... Lol

खोटं,खोटं,खोटं

फोटो नीट पहा, योच्या डोक्यावर सरळ वरती कड्यावरुन एक मानवी कवटी डोळे रोखुन योकडे रागाने
पहात आहे म्हणुन यो घाबरलेला आहे Biggrin

धन्यवाद बाजीराव,rrs ... Happy

हो रे ईनमीन तीन काही तरी अमानवीय आकार दिसतोय त्या कड्याचा .... Lol

.

अरे मस्त लिहिलं आहेस रे!!

जशी आमावस्येला सगळी भुत बाहेर पडतात तशी आम्ही सर्व भटकी भुत चांदण्या राती बाहेर पडलो होतो. अगदी!!

वाचायचं कसं राहून गेला हा लेख!! ह्याच गडावरून तुम्ही माझी झोपमोड केली होतीत!! Proud
आणि टांगारू म्हणणार्‍यांचा जाहीर निषेध!!! Lol
(दगडाला नेमका तोच शनिवार सापडला होता गोरखगडावर जायला!!! )

चांदण्या रात्री गडावरुन आसमंत पाहण्यात एक अपूर्व आनंद असतो. भुईवर ओसंडून वाहणार चांदिण..ध्यानस्थ बसलेली सह्यशिखर...डोंगरांच्या कुशीमधे निवांत झोपी गेलेली गावकुसे...त्यावर पांघरलेली दहिवराची दुलई... हे प्रसंग खरच आपण फक्त मनाच्या एका उन्मनावस्थेतच अनुभवू शकतो.... सह्यगिरीतल्या ह्या कोण्या काळच्या उभ्या असलेल्या दुर्गांवरून इतिहासाच्या पाउलखुणा शोधत असे क्षण, ती धुंदी,ते निसर्गाच्या ह्या विराट रुपातील हरखण अनुभवणे हे फक्त तुम्हा-आम्हा भटक्यांनाच माहित.. एक उत्तम शब्दचित्र आणि प्रकाशचित्रे जमलीयेत....

धन्यवाद नची,चिन्मय Happy

चांदण्या रात्री गडावरुन आसमंत पाहण्यात एक अपूर्व आनंद असतो. भुईवर ओसंडून वाहणार चांदिण..ध्यानस्थ बसलेली सह्यशिखर...डोंगरांच्या कुशीमधे निवांत झोपी गेलेली गावकुसे...त्यावर पांघरलेली दहिवराची दुलई... हे प्रसंग खरच आपण फक्त मनाच्या एका उन्मनावस्थेतच अनुभवू शकतो.... सह्यगिरीतल्या ह्या कोण्या काळच्या उभ्या असलेल्या दुर्गांवरून इतिहासाच्या पाउलखुणा शोधत असे क्षण, ती धुंदी,ते निसर्गाच्या ह्या विराट रुपातील हरखण अनुभवणे हे फक्त तुम्हा-आम्हा भटक्यांनाच माहित >> चिन्मया..... अगदी अगदी Happy

Pages