माझा पुनवंचा चांद

Submitted by निवडुंग on 16 May, 2011 - 12:10

सखे निजली ही रात
व्यर्थ पुन्हा जोजवून.

तुझी भुललेली साद
मंद निशिगंधी श्वास
माझा पुनवंचा चांद
भेगाळून जाई आज.

तुझे स्वप्नील नयन
जागी मीलनाची आस
माझा पुनवंचा चांद
त्याच्या काळजाला काच.

तुझ्या प्रेमाचा बहर
लावी सागरी भरात
माझा पुनवंचा चांद
अजाणतं बळ यात.

तुझी आभाळाची शेज
त्यास चांदण्यांची रास
माझा पुनवंचा चांद
आज आमुशाचा दास.

तुझ्या ह्रुदयी अपार
प्रीतझरा हा खळाळ
माझा पुनवंचा चांद
त्याच्या नशिबी गिर्‍हान.

सखे निजली ही रात
व्यर्थ पुन्हा जोजवून
माझा पुनवंचा चांद
नभी एकला गुमान.

गुलमोहर: