कोकण - नदीची नजाकत - २

Submitted by भाऊ नमसकर on 10 May, 2011 - 08:45

सकाळी सातची नदीपलीकडून सुटणारी एसटी पकडायची होती. थंडीचे दिवस तरीही पहाटे आंघोळ उरकून माझी लाडकी, माडाना हुलकावणी देत, मुरडत जाऊन तरीवर पोचवणारी वाट धरली. बाजूच्या विस्तीर्ण मळ्यातल्या विरळ धुक्याच्या हलक्या ओलाव्याची चाहूल माडांच्या झापांतून ठिबकत होतीच. दंवाच्या थेंबानी ओथंबलेली वाटेवरच्या गवताचीं पातीं पायावर अभिषेक करतच होती. मऊशार पण कांहीशा निसरड्या झालेल्या त्या वाटेने मग गर्रकन वळण घेऊन मला नदीच्या कांठावरच आणून सोडलं. तरीची होडी जागेवर आहेना हे पहायला नदीकडे नजर टाकली आणि.... जागीच थिजून गेलो.
tareecheevaaT.JPG

मला धुकं तसं नवीन नव्हतं. दाट धुक्याने इतर वस्तुंचं अस्तित्व झांकलेलं मी पाहिलंही होतं. पण केवळ नदीच नाही तर पलीकडची सर्व सृष्टीच गायब करून टाकणारं अनादि-अनंताचं सोंग पांघरलेलं असं दाट धुकं मी आजच बघत होतो - नदीच्या कांठावरचं गवत जणूं चराचर सृष्टीची सीमारेषाच असल्यासारखं वाटायला लावणारं. इतर धुक्यात कांही पुसटशा खुणा, हलकेसे आवाज तुम्हाला तिथल्या झांकलेल्या अस्तित्वाचा, ओळखीचा दिलासा तरी देत असतात; इथं होतं फक्त एका धूसरशा विवरात अचानक सारंच गडप करणारं अन तुम्हालाही त्यात खेचूं पाहाणारं असं कांहीतरी अनामिक, अकल्पित व अघोरसं ! मी थिजून, अवाक उभाच !!
alldew.JPG

" काय रे, थंडीन गारठलस कीं काय ?", घरून येवून पहिल्या शीफ्टला ड्यूटीवर हजर होत असलेल्या तरवाल्या धाकूच्या भवानीच्या प्यासिंजरला केलेल्या या 'गुड मॉर्निंग"नेच मी भानावर आलो. " तरीची होडी दिसता की नाय तां बघी होतंय", माझी सारवासारव. "रे , तरीक काय धाड भरलीहा. चल , चल,येस्टी येवक झाली" म्हणत तो नदीकडे वळला. मी त्याच्या पुढे असूनही नकळत थांबून मी त्यालाच पुढे जायला दिलं; पँट गुडघ्यावर खेचून घेऊन खोचताना माझी नजर मात्र त्या गूढ अस्तित्वहीन पोकळीत बेधडक शिरणार्‍या धाकूवर खिळून होती. क्षणभर तोही त्या आभासी गुढतेत विरून गेला कीं काय असं वाटलं; अन इतक्यात माझ्या खूप परिचयाचा पण दूर, खोलवरून आल्यासारखा आवाज माझ्या कानांना व थिजलेल्या चित्तवृत्तीला सुखावता झाला; 'ख..ळ्ळ...ळ्ळ... प..च..क ".. पाण्यात टाकलेल्या पावलांचं नदीनं खळखळीत हंसत केलेलं स्वागतच होतं तें ! नेहमीचंच . पाठोपाठ अदृश्य झालेला धाकू दावणीला धरून म्हशीला खेचत आणावं तसं तरीच्या होडीला घेऊन पुन्हा अवतरला. एव्हाना मलाही एस्टीची घाई जाणवायला लागली होती. पटकन चपला काढून घेऊन मी पाण्यातला एकेक पाय झटकून सराईतासारखा होडीच्या दृश्य भागात अलगद चढलो. होडीला हलकसं ढकलून, टुणकन उडी मारून धाकूही सुकाणूकडच्या फळीवर चढला व रवळनाथाचं नाव घेऊन लांब काठी टेकत माझ्यासकट त्याने होडीला त्या संवेदनशून्य अदृश्यात लोटलं.

होडीतला ओलावा जाणवत होता म्हणून नव्हे पण मला फळीवर बसावंसच वाटलं नाही ; जणूं मी उभा राहिल्यानेच पैलतीर - असलाच तर - लवकर गाठणं शक्य होणार होतं ! पाण्यावर होडीची हलकीशी वर-खाली होणारी हालचाल मला जाणवत होती पण गतीची चाहूल मात्र अजिबात लागत नव्हती. त्या नि:शब्द निश्चलतेतून भेडसावणारा आत्यंतिक एकाकीपणा असह्य होऊन मी संवादाचा अश्रय घेतला. धाकूला म्हटलं, " रे, दुसर्‍या खंयच्या होडीवर आदळली ही होडी तरी कळांचा नाय असल्या धुक्यात ".
" एक धर्मा गाबीत [ मच्छीमार ] सोडलो तर कोण मरांक येताहा हंयसर ह्या वेळाक ! " लांबून आकाशवाणी व्हावी तसा मागून कुठूनतरी धाकूचा आवाज आला.
" तो तरी ख्येका येतलो ? पागूंक [ मासे पकडायला] मासे तर दिसांक होये त्येकां ", मी माझी रास्त शंका मांडली.
" जाळां नाय टाकणां तो अशा वेळाक; काठीक आठ-दहा गळ बांधून पाण्यात सोडता आणि बसता आरामात. मुडदुश्ये [ खाडीतला एक चविष्ट मासा] सहसा जाळ्यात नाय गावनत पण गळाक मात्र नेमके अडाकतत ", धाकूने माझ्या ज्ञानात भर टाकली.
" असल्या धुक्यात इतक्या फाटफटी [ पहांटे] एकट्यान होडीत असां निवांत बसणां जमता तरी कसा ह्या धर्माक ! " ही देखील माझी समयोचित रास्त शंकाच.
" जन्मापासून चाळीस वर्सां कर्लीच्याच अंगा-खांद्यावर खेळताहा तो ; जमीनच उलट टोचता त्येच्या पायांक ! ", धाकूनं माझ्या आणि धर्मातला जमीन- अस्मानाचा - व पाण्याचा देखील - फरक एका वाक्यात स्पष्ट केला होता !

हे संभाषण चालू असतान माझी नजर मात्र आतुरतेने समोर टक लावूनच होती. कुठंतरी एक तांबूस ठिपका डोळ्यासमोर चमकल्यासारखा वाटला. मग कांठावर रेंगाळणार्‍या पाण्याची एक शुभ्र,पुसटशी, तुटकीशी रेषा मधेच दिलासा देऊं लागली. धाकूने आता काठी टेकायचं बंद करून होडी अलगद कांठाला लागण्याची तो वाट पहात होता हे जाणवलं. आधी दिसलेला तो तांबडा ठिपका मग बांधावरच्या जास्वंदीचं फूल झालं व ती पुसटशी रेषा कांठावर लोळण घेणार्‍या हलक्या लहरी झाल्या. एसटीच्या स्टॉपवर जाणारी वाटही आता खुणवत होती. मी हलकेच होडीतून उतरलो व चप्पल तसंच हातात घेऊन धावत सुटलो; नेहमीप्रमाणे मागे वळून एकदा तरी डोळे भरून नदीकडे पहायची आज इच्छाच झाली नाही.

[क्रमशः]
नदीची नजाकत ; प्रस्तावना - http://www.maayboli.com/node/25588

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अफाट!

दुसरं चित्र पाहून गलबललं भाऊसाहेब!

अनंत ढवळेंनि एका हायकूचा अनुवाद केलेला होता. तो सेम होता.

शिशिराची पहाट

धुक्यातील वाट

आणि मी एकटाच चालतोय

अप्रतिम चित्रे!

सलाम!

-'बेफिकीर'!

धन्यवाद.
बेफिकीर, चातक - सध्या सचिनशिवाय इतराना 'साहेब' नाही शोभून दिसत ! मला तर कधीच नाही !! Wink

अप्रतिम... अप्रतिम.. अप्रतिम....!!!!

धुक्याचा स्पर्श जाणवुन गेला वाचता वाचता..! व्वा...!

लेखमालिका रंगत जाणार आहे नक्कीच.. Happy खूप शुभेच्छा..!

निव्वळ अप्रतिम! तुमच्या कुंचल्याक आणि लेखणेक मुजरो. तो सगळो प्रसंग तस्सोच डोळ्यासमोर उभो केल्यास तुम्ही. Happy

भाऊंनूं...
खरोखर अप्रतीम...

साधारणपणे ८० च्या दशका पर्यन्तच्या कर्ली नदिच्या तरी वरचा जीवन, बरोब्बर ऊभ्यां केलात... माका आमचां लहानपण आठावलां...

<< साधारणपणे ८० च्या दशका पर्यन्तच्या कर्ली नदिच्या तरी वरचा जीवन, बरोब्बर ऊभ्यां केलात... माका आमचां लहानपण आठावलां... >> विवेक, पूर्वी कोकणातल्या शांत, संथ जीवनात कुठंतरी हताशपणाची, अगतिकतेची मरगळही जाणवायची, असं नाही वाटत ? संगणकाचा प्रसार,कोकण रेल्वे, पर्यटन इ.मुळे ती मरगळ कोकण झटकून टाकतंय असं वाटतं. कदाचित, मुंबईतलं जीवन अधिकाधिक ओंगळ होत चालल्याने कोकणी माणसाची गावाकडची ओढ खूपच वाढलेली असावी [ व गांवी जाणंही ] ; त्यामुळे, स्थानिकाना पूर्वी जाणवणार्‍या तुटलेपणाची तीव्रता कमी झाली असावी. कांहीही असो, कोकणाच्या जीवनपद्धतिचा मूळ ढाचा न तोडता होणारे बदल स्विकारणं अपरिहार्य !
सर्वांना धन्यवाद.

ती मरगळ कोकण झटकून टाकतंय असं वाटतं. >> त्यात कोकणातील लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांचा सहभाग अधिक प्रमाणात दिसतोय.पण होणारे बदल स्विकारणं अपरिहार्य ! >>

>>संगणकाचा प्रसार,कोकण रेल्वे, पर्यटन इ.मुळे ती मरगळ कोकण झटकून टाकतंय असं वाटतं.
असं असेल तर चांगलंच आहे Happy

>>जन्मापासून चाळीस वर्सां कर्लीच्याच अंगा-खांद्यावर खेळताहा तो ; जमीनच उलट टोचता त्येच्या पायांक
हे वाक्य खूपच आवडलं.

पुढच्या लेखाची वाट पहात आहे.

भाऊ...
पूर्वी कोकणातल्या शांत, संथ जीवनात कुठंतरी हताशपणाची, अगतिकतेची मरगळही जाणवायची, असं नाही वाटत ???...>>>... गोष्ट खरी आसा...

पूर्वी कोकणात मोठ्या प्रामाणात 'एकत्र कुटुंब पद्धती' होती (आजुन देखिल लहान प्रमाणात का होयना, पण नावापूरती तरी टीकान आसा...), पण उत्पन्नाची साधनां खूपच मर्यादीत होती, ईकॉनॉमी मोठ्या प्रमाणात मुंबयतल्या 'गिरीणीं'वर अवलंबुन होती... शिक्षणाची साधनां खूपच मर्यादीत, त्यामूळे नावा पुरती 'अक्षर्-ओळख' देखिल बराचसां काम भागवन नेय... माझ्या मते, ह्या सगळ्या 'निराश जनक' वातावरणाचो तो परीणाम होतो...

भाऊ, एप्रीलमधे आम्ही अरोंदा येथे गेलो होतो. त्यावेळी असेच सकाळी लवकर ऊठून आम्ही फि रायला गेलो होतो, तेव्हा अगदी असेच द्रुश्य दिसले. काय अप्रतिम!

वा मस्त.
पहिल्या चित्रातली डेफ्थ खुपच आवडली. खरच दुर धुक्यात अस्पष्ट होत जाणारा रस्ता आणी झाडं. मस्त!
ते दुसरं चित्रही सुंदर आहे.

वा वा भाऊसाहेब - काय सुंदर वर्णन व चित्रे ही....... बरं झालं तुम्ही ही लिंक दिलीत ते - नाहीतर एवढं सुरेखसं मी मिसलंच असतं - शब्द अपुरे पडताहेत तुमच्या लेखाचे वर्णन करायला.......

फारच सुंदर लेखन आणि चित्रे!
रवळनाथाचं नाव घेऊन लांब काठी टेकत माझ्यासकट त्याने होडीला त्या संवेदनशून्य अदृश्यात लोटलं. वा! अगदी नेमके....

Pages