तुझ्यासोबतचे क्षण..

Submitted by मी मुक्ता.. on 12 May, 2011 - 01:42

अजून मला आठवतात तुझ्यासोबतचे क्षण..
परत एकदा प्रेमात पडल्यासारखं काहीतरी झालेलं..
मनात म्हटलं हे काय भलतच,
आणि आयुष्याच्या अशा वळणावर...?
बरं.. तू असा जगमित्र,
मला अजून माझाही शोध नीटसा नाही लागलेला..
अनंत विस्तारलेली क्षितिजं समोर घेवुन तू उभा,
आणि मी परतीच्या वाटा बंद झालेल्या वळणावर..
प्रश्न तुझ्या वार्‍यालाही फिरकत नाहीत,
आणि माझ्यासमोर उत्तरांचीच कोडी..

अजून आठवतात ते क्षण.. वेडावलेले..
युगांनंतर जिवंत झाल्यासारखं वाटलेलं..
गुलमोहराच्या झाडाखाली,
अमलताशाला कवेत घेवुन येणारं वारं,
स्पर्शून जात होतं तुझ्या-माझ्यातील पोकळीला..
तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या चेहर्‍यावर
अष्टमीचा चंद्र वितळत चाललेला...
तुला खूप काही सांगायचं असताना,
न सुचलेले अर्धे-अधिक शब्द,
आपल्या त्या खळाळत्या हास्यात वळते करुन घेत होतास तू..
आणि तुला शहाणा म्हणू की वेडा ह्या संभ्रमात
मी अधिकाधिक रुतत चाललेली...

अजूनही आठवतात ते सगळे क्षण..
अशावेळी माझीच नजर लागू नये तुला चुकून,
म्हणुन लपवुन टाकते तुला
माझ्या मनाच्या घनगर्द अंधारात..
आणि मग कधी एका क्षणी,
तुझं अस्तित्व विसरुन, स्वतःतच गुंग होऊन,
खोल उतरत रहाते त्या अंधारात..
आत.. आत.. खूप खोल..
आता वर पाहिलं तर आभाळही दिसत नाही..
खालच्या खोलीचा अंदाजही येत नाही..
अशा वेळी मला मग सोडावेच लागतात,
जिवाच्या आकांताने तुझ्या प्रतिमेचे घट्ट धरुन ठेवलेले हात..
हा तळ माझ्या एकटीचा..
ही वाटही माझ्या एकटीचीच..
पण आता व्याख्येत अडकुन रहायचा कंटाळा आलाय रे..
कशाला नसते अट्टहास..
हे जे काही आहे
त्यासकट मला आठवतात अजूनही..
तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण...

गुलमोहर: 

मुक्ता,
काय जबरदस्त लिहिलय तुम्ही ! मनाचा ठाव घेणारं लिखाण ते हेच असावं. अमूक अमूक ओळी आवडल्या असा प्रतिसाद देण्यासाठी पुनर्वाचन केलं आणी लक्षात आलं की प्रत्येक शब्द खास आहे. अतिशय भावनोत्कट. पुढील लिखाणासाठी शुभेच्छांची अवश्यकता आहे का? जीते रहो.

.....आणि माझ्यासमोर उत्तरांचीच कोडी......
~ उत्तर हेदेखील एक कोडे होऊ शकते आणि ते किती प्रत्ययकारी असू शकते म्हणजे मुक्ता तुमची ही कविता. एक नाही तिनदा वाचल्यानंतरही अजून एकदा वाचावी आणि प्रतिसाद द्यावा असे वाटू लागले. तरीही या कवितेची नस अखंडपणे पकडायची झाल्यास 'त्या सम' अनुभव घेतलेल्या व्यक्तीशी थेट संवाद साधणे अगत्याचे होईल.

"आता वर पाहिलं तर आभाळही दिसत नाही..
खालच्या खोलीचा अंदाजही येत नाही...."

या कवितेतील हा एक महत्वाचा भाग आहे. या दोन ओळीत जो एक संभ्रमावस्थेतील चिंतनाचा भाग जाणवू लागतो, वा चिंतनाची भाववृत्ती जाणवते तेथे कवितेतील आशयाला वाड्मयाचे मोल प्राप्त होते. कवितेतील नायिका वरवर म्हटले तर पराभूत मनोवृत्तीची चितारलेली दिसत्ये. उदा. "मला अजून माझाही शोध नीटसा नाही लागलेला..." ही ओळ. झोकून तर सर्वस्व तिने दिलेच आहे, पण तो बेदरकार (कदाचित बेफिकिरही) आहे, वा असल्याचे जाणिवल्यामुळे तिची असहायता प्रकर्षाने समोर आली आहे. पण म्हणून ती त्याला दूषण देत नाही, हे तिच्या प्रेमाचे ओथंबलेपण आहे, हे नि:संशय. कारण सर्वस्वी हरवून गेल्यानंतरदेखील कवयित्री म्हणतेच ना "आणि मग माझीच नजर लागू नये तुला चुकून,...". येथील 'चुकून' वा वापर चुकून आलेला नसून तो फार नैसर्गिकरित्या प्रकटला आहे. तिची ही सरळसोट कबुलीच दर्शविते की तिच्या नशिबी आलेल्या (वा येऊ घातलेल्या) भोगाला ती एकटीच तोंड देणार असून त्या उद्वस्थावस्थेतही ओल्या वयातील हळव्या प्रेमाला ती विसरू शकणार नाही. मात्र आता एका चटकाक्षणी तिला भोवतालच्या परिस्थितीची वा प्रखरतेची जाण झाल्याने ती उदगारली आहे, "ही वाटही माझ्या एकटीचीच....."

"खोल उतरत रहाते त्या अंधारात......" या ओळीला एक गतिमानता आहे, आणि अंधारपोकळी म्हटल्यावर भविष्यात समोर काय येईल याचा अंदाजही नाही, पण तरीही तोही अनुभव घेण्यास नायिका तयार आहे, ही एक प्रकारे तिची जीवनावरील श्रद्धा अजूनही टिकून आहे, हेच दर्शविते (असे मला वाटते....)

भूतकाळात घडून गेलेल्या जीवनातील त्या असीम ओढीच्या झोक्याचे तिने हळुवारपणे जपलेले हे चित्र वाचकाला स्तिमित करून तर सोडतेच पण अनुभवाला कवितेत बद्ध करताना त्यात मढवलेले भाषेचे सौंदर्यही वेधक ठरते.

सुंदरच !!

सर्वांचे खूप खूप आभार..

क्रांति.. आपल्या आवडत्या दहात..!! कविता धन्य झाली माझी.. Happy धन्यवाद...

छान .... हृदयस्पर्शी
“तुला खूप काही सांगायचं असताना,…..
………..
मी अधिकाधिक रुतत चाललेली...”
हे जास्त आवडलं
--------------------------------------------------------------

‘जिवाच्या आकंताने’
इथली एक छोटीशी टायपिंग मिस्टेक मात्र कृपया सुधारावी.
‘आकांताने’ असं असायला हवं ना ??

व्वा ! अप्रतिम..... झक्कास......

कविता पुन्हा पुन्हा वाचुनहि आजुन एखदा वाचण्याचा मोह आवरत नाहीये......
प्रत्येक ओळ आणि मनाचे वेध घेणारे प्रत्येक शब्द अप्रतिम.... निवडक १० त. Happy
Hats-Off-Dnn.jpg Hat’s Off To You…

UlhasBhide,
धन्यवाद.. करते दुरुस्त.. टायपो होता...

धनेष नंबियार, निवडुंग,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि
निवडक दहाबद्दल खूप खूप आभार.. Happy

बागुलबुवा,
धन्यवाद..! Happy

क्या बात है ! छा गये तुस्सी ....
अवांतर : झेबा बख्तीयारचा एक मस्त शेर आहे...
" तेरे गम़मे मरनेका इरादा तो नही है..
है इश्क मगर इतना ज्यादाभी नही है !...."

पण आता व्याख्येत अडकुन रहायचा कंटाळा आलाय रे..
कशाला नसते अट्टहास..
हे जे काही आहे
त्यासकट मला आठवतात अजूनही..
तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण.>>>>

हे आवडले.

धन्यवाद!

सर्वांचे खूप आभार.. Happy

गिरीशजी, हा शेर बाकी माहिती होता.. Happy नेहमीप्रमाणे अचूकच लिहिता प्रतिसाद तुम्ही.. Happy

विशालजी, Happy धन्यवाद..

प्रतिसाद देताना पण 'व्याखेत अडकून' लिहायला मन तयारच नाही.
जे काही आहे ते इतके आतून आणि काळजाचा ठाव घेणारे उतरले
आहे कि व्यक्त होण्याचा पण अट्टहास करूच नये असे वाटतेय.
एकटीच्या काव्य प्रवासास मनपूर्वक शुभेच्छा !

सर्वांशी सहमत..........तरी

आणि मग माझीच नजर लागू नये तुला चुकून,
म्हणुन मग लपवुन टाकते तुला
माझ्या मनाच्या घनगर्द अंधारात..
आणि मग कधी एका क्षणी,........आणि मग , म्हणून मग...ह्या मग ने गंमत घालवली?

लई भारी... वाह...वाह...वाह...वाह...वाह...वाह...!!!!!

सर्वांचे खूप खूप आभार.. Happy

शाम अन् गझल, भ्रमर,
जशी बोलते, जसं मनात आलं तसंच लिहिलं. बोलणच सुधारायला हवं कदाचित.. म्हणजे मग इथेही या चुका नाही होणार.. Happy
धन्यवाद..!

किंकर, शाम अन् गझल,
निवडक १० चा मान दिल्याबद्दल आभार.. Happy

Pages