सापशिडी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

'अमरेन्द्रा, ही बातमी पाहिलीस का'?, सिरीअल तोंडात ढकलत संगणकावरील बातम्यांवर दररोजप्रमाणे नजर फिरवीत युवराजने विचारले.
'कोणती, ती माकडचेष्टांची'?, त्याला पुर्ण बोलु न देताच पटावरील सोंगट्यांवरुन नजर न काढता अमरेंद्र बोलला.
'तुला कसे कळले की मी त्याच बातमीबद्दल बोलतोय म्हणुन'?, युवराज आश्चर्यचकीत होऊन म्हणाला.
'आम्हाला डिटेक्टीव्ह मांजरेकर उगीचच म्हणतात का लोक'?
'तेही खरेच म्हणा, पण तरीही'?
'अरे, सोपे आहे. लक्ष वेधुन घेणारी तीच एक बातमी आहे आज'.
'गम्मतच आहे - इतर वेळी सरळसोट असलेले लोक अक्षरश: माकडचेष्टा करु लागले - हे पळव, धसमुसळेपणामुळे ते तोड, उड्या मार वगैरे. आणि हे एकमेकांशी संबंध नसलेले'.
'हो, पण नुसते गमतीवारी नेण्यासारखा हा प्रकार नाही. जेंव्हापासुन जेनेटीक्सच्या सहाय्याने आम जनता सरसकट नैतीक बनली आहे तेंव्हापासुन आपली White Elephant Detective Agency खरोखरच पांढरा हत्ती बनली आहे. अशा केसेस मधुनच आपला उदरनिर्वाह होऊ शकेल'.
यावर पहिल्यांदाच त्याच्याकडे वळुन पाहुन युवराजने विचारले, 'पण लोकांच्या परिस्थीतीचा असा उपयोग करुन घ्यायचा नाही असे आपले ठरले आहे ना? आणि हे बुद्धीबळाऐवजी आज चेकर्स काय खेळतो आहेस'? सखेद स्वरात सुरु झालेला प्रश्न संपला मात्र केवळ आश्चर्याने.
चेकर्स बद्दलच्या प्रश्नाला बगल देऊन अमरेन्द्र म्हणाला, 'मी आपले तत्व विसरलो नाही. पण हा प्रकार त्यापेक्षा क्लिष्ट आहे. तु साखरझोपेत असतांना इन्स्पेक्टर समर आले होते. त्यांनी सांगीतले की हा प्रकार समाजाच्या वरच्या समजल्या जाणाऱ्या थरातही सुरु आहे, पण ते बाहेर येऊ दिले गेले नाही. ती गुप्तता फार काळ ठेवता येणार नसल्यामुळे काही लोकांच्या वतीने ते आपल्याकडे आले होते'.
'पुढे बोल'.
'पुढे खास काही नाही - बाकी तपशील नेहमीचाच. फक्त येवढेच की हा प्रकार जास्त पसरलेला आहे. मी त्यासंबंधीत गोष्टींचा डेटा शासकीय व पब्लीक डेटासेंटर्स मधुन एकत्र करणे सुरु केले आहे. प्रभावीत झालेल्या लोकांचे बॅकग्राऊंड, त्यांचा डी.एन.ए. डेटा वगैरे. पण इतर अनेक सहजी प्राप्त न होऊ शकणारे फॅक्टर्स आहेत आणि योग्य कारण सापडेपर्यंत त्यापैकी काहीही कारणीभुत असु शकते असे समजुन चालायला हवे', एक पांढरी गोटी दोन घरे सरकवत अमरेंद्र म्हणाला.
'आणि अर्थातच आपल्या या परस्परसंबंध दाखवु शकण्याच्या कौशल्याकरताच इन्स्पेक्टर समर आले असणार'.
'हो, तर. नेहमीप्रमाणेच तसे बोलले मात्र नाहीत'.
'आणि तु सर्व कामे सोडुन त्या मागे एकटाच लागला असणार', इति युवराज.
'मागे लागलो खरा, पण तुझ्याकरताही काही कामे तयार आहेत. मी ते सर्व लोक कोणाला भेटले, कुठे गेले वगैरे माहिती तयार ठेवली आहे पण त्यात जरा जास्तच कॉमन गोष्टी निघाल्या उदा. सिनेमागृहे, कार्यालये, मार्केट्स वगैरे', अमरेंद्रच्या बोलण्यातला रोष पटावरील एक गोटी कॅरम प्रमाणे उडवण्यात प्रकटला.
'अरे हो, आणि तु आज चेकर्सवर कसा काय घसरला? निकालाचे पुर्ण भाकीत करता येते म्हणुन चेकर्स खेळण्यात अर्थ नाही असे तूच म्हणतोस ना?'
राग प्रकटपणे दर्शविल्यामुळे खजिल झालेला अमरेंद्र म्हणाला, 'एका पॉसिबल दुव्याबद्दल मी तुला सांगितले नाही अजुन. तो संबंधीत आहे की नाही ते ही नक्की नाही. केवळ आपल्या सर्व गोष्टी जुळवुन पहायच्या नेहमीच्या अट्टाहासामुळे समरने त्याबद्दल सांगीतले'.
'अरे, असे हे आहे तरी काय'?, त्याचा छोटा पॉज सहन न होऊन युवराजने विचारले.
'एक वेअरवुल्‍फची केस आहे', थोडे आखडतच अमरेंद्र म्हणाला.
'काऽय'? युवराज जवळजवळ किंचाळलाच, आणि त्या आवेशात सांडलेले सिरीअल गोळा करत हसु लागला, 'आणि ही एक अशक्य गोष्ट चेकर्सरुपी दूसरी अशक्य गोष्ट खेळुन तु नष्ट करु पाहतोयस होय?'
'चेष्टा नको करु, पण मी तुला वेअरवुल्‍फची केस म्हणजे नेमके काय ते सांगीतले नाही. माकडचेष्टांचा रोग - सध्या रोगच म्हणुया या प्रकाराला - झालेल्या एका माणसाच्या शेजाऱ्याच्या सर्व शरीरावर जास्त केस येऊ लागले. एका दिवसात इंचभर'.
'म्हणजे वेअरमाकड झाले की ते'.
'हो तेच ते. जास्त केस असणे ही उत्क्रांतीतील मागची पायरी होती. त्याबद्दल काही सुप्त दूवा मिळतो का हे पहायला मी चेकर्सचा डाव मांडला'.
'असे आहे होय चेकर्सचे गुपीत! मग, कळले काही'?
'अजुन नाही. आणि इथेच तुझे डेटाबेस स्क्रीप्टींगचे कौशल्य उपयोगी पडणार आहे. त्या लोकांनी या दरम्यान कोणते सिनेमे पाहिले, कधी पाहिले इतकेच नाही तर कोणत्या सीट वर बसुन पाहिले ही सर्व माहिती मिळवली आहे. त्याचप्रमाणे कोणत्या सुपरमार्केट मधुन काय, कधी घेतले व कोणत्या काऊंटर वर पैसे भरले, कसे भरले हे देखिल आहे. अॉफिसेस मध्ये कोणाला कधी भेटले ते पण. त्याप्रमाणे इतर बारीक-सारीक दुव्यांची माहिती पण. आता "पुरेसा डेटा दिलात तर कोणताही प्रश्न सोडवु" या आपल्या ब्रीदवाक्याचे रक्षण करणे तुझ्या हाती आहे'.
ते वाक्य संपायच्या आधीच युवराज संगणकासमोर नीट स्थानापन्न झाला होता व त्याच्या दाही बोटांचे किबोर्ड वर वेगवान तांडव सुरु होते.
५ मिनिट तो संगणकाचा आवाज व अमरेंद्राने त्या दरम्यान लावलेले हळुवार फ्युजन संगीत येवढेच ऐकु येत होते.
अचानक युवराज ओरडला,'दारु!'
'अरे, सकाळी सकाळी दारु काय प्यायची'?
'बोकॉल स्लॉसर', आपल्याच धुंदीत युवराज पुढे बोलला.
'आत्ता'?
'हो, तो संगणक घे आणि आत्ता माहिती मिळव त्यांच्या डिस्टीलरीज कुठे आहेत ते'.
त्याचा प्रफुल्ल आविर्भाव पाहुन पेडगावचा रस्ता सोडुन अमरेंद्रने 'ठीक आहे' येवढेच म्हणत बाजुच्या संगणकाकडे मोर्चा वळवला.
पुढील काही मिनिटात डिस्टीलरीज, डिस्ट्रीब्युटर्स, दुकाने, द्राक्षे यांचे अनेक डेटा टेबल्स त्या दोन संगणकांच्या हार्ड ड्राईव्ह्जवर विराजमान होत होते व अनेक छोट्या-मोठ्या प्रोग्राम्स मधुन उसांप्रमाणे पिळुन निघत त्यांचे द्राक्षासव युवराजच्या मेंदुपर्यंत पोचत होते.
'छ्या, तीन नंबरच्या डिस्टीलरीत बनलेली बोकॉल स्लॉसर दारुच या प्रकाराला कारणीभुत असली तरी पुढे मात्र डेड एंड वाटतोय. ती पिणारे सर्व प्रभावीत होत नाहीत. एखादीच बॅच असावी ज्यामुळे हे सर्व होते आहे. का हा तर प्रश्न अजुनच दूर'.
'युवराजा, असा हताश होऊ नकोस. मी या सर्व फॅक्टर्सशी संलग्न इतरही माहिती गोळा करतो आहे. सेमॅंटीक वेब मुळे आजकाल एका गोष्टीवरुन दूसरी शोधणे खूपच सोपे झाले आहे'.
'हताश नाही, पण उतावीळ नक्कीच. अशा प्रश्नांचे लगेच उत्तर नाही मिळाले की खूप अस्वस्थ होते'.
'अरेच्चा, हे काय? तीन वर्षांपुर्वी ती तीन नंबरची डिस्टीलरी १५ दिवस बंद होती'.
'का काही अॅक्सीडेंट झाला होता का'?, अॅक्सीडेंट बद्दल बोलत असुनही उत्तेजीत झालेला युवराज म्हणाला.
'नाही, द्राक्ष पुरवठा बंद असल्यामुळे काम बंद होते'.
'आणि द्राक्ष पुरवठा का बंद होता'?
'हँ, हे कुतुहलजनक आहे. ती द्राक्षे जेथुन येतात त्या जवळील एका केमीकल कारखान्यात वायुगळती झाली होती. त्याभागात फार कोणी रहात नाहीच पण सावधानता म्हणुन आजुबाजुचा परीसर निर्मनुष्य केला गेला होता. तेंव्हापासुन तो कारखाना बंदच आहे. त्या वायुचा प्रभाव झाला असेल द्राक्षांवर?'
'तीन वर्षे. तीन वर्षांपुर्वीची बॅच. नाही. एक कोरिलेशन आहे ते दोन वर्षांपुर्वीच्या बॅचशी आहे. सुटले कसे ते माझ्या नजरेतुन?'
'डिलेड रिअॅक्शन. एका वर्षाची. कशामुळे होऊ शकेल? वायुमुळे नाही. पाणी, येस्स, दॅट मस्ट बी इट.'
'हम्म, तिथल्या पाण्याबद्दलचा डेटा मात्र उपलब्ध नाही'.
'पण तेच कारण आहे यात मला शंका नाही. अर्थात त्या पाण्यात असे काय आहे हा प्रश्न राहतोच. लाव समरला फोन व दोन गोष्टी करायला सांग: (१) दोन वर्षांपुर्वीच्या बोकॉल स्लॉसरवर तात्पुरती बंदी, व (२) त्या बॅचचे, तसेच मळ्यांच्या जमिनीचे व जमिनीखालील पाण्याचे पुथ:करण. ते मिळेपर्यंत आपण करु शकतो ते केले आहे. मी माझा मोर्चा वेअरवुल्फकडे वळवतो'.
'अरे हो, ते तर मी विसरूनच गेलो होतो. पण करतो आधी फोन'.

तासाभरात खुद्द इन्स्पेक्टर समर हजर होते.
'प्रकरण कंट्रोल मध्ये आहे'.
'म्हणजे समुळ सुटले नाही'? इति युवराज.
'जमिनीत काही सापडले नाही. दारु मध्ये मात्र नेहमीच्या स्टॅंडर्ड्सना चालतील इतक्या प्रमाणात हॉर्मोन्सचे अंश सापडले. इतर बॅचेस मध्ये ते अंश नव्हते. नेमके कशाचे याचे पुथ:करण व्हायचे आहे.'
हे असेच होणार हे जणु माहीत असल्याप्रमाणे त्यांच्याकडे अमरेंद्रने साफ दुर्लक्ष केले होते. पण हॉर्मोन्सचा उल्लेख ऐकताच खडबडुन जागा झाल्याप्रमाणे तो म्हणाला,'बाय अॅक्सलट्ल! नक्कीच त्या अॅंटीमॉर्फोसीस हॉर्मोन्स असणार. पहा, सांगत होतो ना मी'.
'अरे जरा आम्हाला समजेल अशा भाषेत बोल.'
'वेअरवुल्फचा प्रश्न पण सुटतो या प्रकारे. अॅक्सलट्ल्स हे मेक्सीकोत सापडणारे पाण्यात राहणारे सालमंदर सारखे जीव असतात. सालमंदर प्रमाणेच ते आपले तुटलेले अवयव पुन्हा वाढवु शकतात. पण त्यांनी उत्क्रांतीची एक पुढची पायरी गाठली आहे. ते त्यांचं पुर्ण आयुष्य - आणि त्यात प्रजोत्पादन देखिल आले - पाण्यात घालवतात. सुरवंटांचे जसे मेटामॉर्फोसीस द्वारे फुलपाखरु होते, व टॅडपोलचा बेडुक होतो, तसे न होता हे टॅडपोलचे टॅडपोलच राहतात. त्यांना थायरॉइड एक्स्ट्रॅक्ट दिल्यास मात्र ते जणु उत्क्रांतीची ती एक पायरी मागे जाऊन मेटामॉर्फोज होतात. मग ते पाण्याबाहेर येऊ शकतात आणि तुटलेले अवयव वाढवु शकण्याच्या जादुस मुकतात'.
'अरे पण त्याचा इथे काय संबंध? आणि वेअरवुल्फ कुठे आला मधेच'?
'अनेक वर्षे असा कयास केल्या जातो आहे की मानवांना पण याचप्रमाणे लागु होणारे काही हॉर्मोन्स असु शकतील जेणेकरुन मानव देखिल उत्क्रांतीत मागे जाईल. माकडचेष्टांच्याबाबत इथे तसे होते आहे असे मला वाटते. त्याचमुळे शरीरावर जास्त केस वगैरे सारखे प्रकार होणार'.
'ओह, ते म्हणतोस होय? तुला सांगायलाच विसरलो - त्याचे केस अजुन वाढणे थांबले'.
'त्याने घेतलेल्या हॉर्मोन्सचे प्रमाण त्याच्या वजनाच्या तुलनेत खूप कमी असणार. त्यामुळे हॉर्मोन्सचा प्रभाव पण तात्पुरता असणार'.
'तु म्हणतोस तर ठीक आहे - असेलही तसे. आता ती केस तरबेज वैज्ञानीकांच्या हाती आहे. ते काढतीलच शोधुन. तुझा कयास त्यांच्या कानावर टाकायचे काम मात्र मी नक्कीच करीन. आणि हो, तुमचा चेक तुमच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यावेळचा आकडा नेहमीपेक्षा मोठा आहे. त्याप्रित्यर्थ चल होऊन जाऊदे एक बुद्धिबळाचा डाव. अरे हे काय? चेकर्स कोण खेळत होते'?
-------------------------------------------------------------------

(व्ही रामचंद्रन यांच्या Tell-tale Brain या पुस्तकातील प्रस्तावनेच्या एका वाक्यावर आधारीत).
LAMAL April 2011 विषयः 'बदल'

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मराठी विज्ञानकथा... Happy
मस्त लिहिली आहे.... आणि एका वाक्याचा एव्हडा शास्त्रशुद्ध विस्तार... मानलं तुम्हाला...

मस्त आहे. आवडली कथा. Happy
सुरुवातीला फ्रिंज सिरियलचा भाग वाचतेय का काय असे वाटले. ( हे तुझ्या लिखाणाबद्दल वाईट मत वगैरे नसुन तसच थ्रिलिंग काहीतरी वाचायला मिळणार हे फिलिंग होतं Happy )
<< टॅडपोलचे टॅडपोलच राहतात. त्यांना थायरॉइड एक्स्ट्रॅक्ट दिल्यास मात्र ते जणु उत्क्रांतीची ती एक पायरी मागे जाऊन मेटामॉर्फोज >> हे नक्की असेच म्हणायचेय की टायपो आहे? म्हणजे बेडुकचे बेडुकच रहातात आणि त्यांना थायरॉइड एक्स्ट्रॅक्ट दिल्यास मात्र ते जणु उत्क्रांतीची ती एक पायरी मागे जाऊन टॅडपोल होतात?

बेडुक टॅडपोल असतांना रीप्रोड्युस करु शकत नाहीत. त्याकरता त्यांना बेडुक बनावे लागते व पाण्याबाहेर यावे लागते. रीप्रॉडक्शन हेच उत्क्रंतीचे ध्येय मानल्यास अ‍ॅक्सलट्ल्सनी ते पाण्यातच टॅडपोलची स्थिती न सोडता साध्य केले आहे. म्हणजेच ते जास्त उत्क्रांत आहेत. पण थायरॉईड एक्स्ट्रॅक्ट दिल्यास ते एक पायरी जणु मागे जातात. त्यांच्या जीवनचक्रातुन नाहीसे झालेले मेटामॉर्फोसीस होते.

क्रोमोसोम ६ खूपच आधी वाचली आहे - फार काही आठवत नाही.