व्यसन

Submitted by मंदार-जोशी on 3 May, 2011 - 00:28

एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.

"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.

"तीनशे साठ."

"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."

"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."

"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."

"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो."
ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.

लेखाचं नाव बघितल्यानंतर हा संवाद वाचून कदाचित तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. नाही, हा संवाद एखाद्या दारूच्या गुत्त्यावरचा किंवा परमिट रूमबाहेरचा नाही (अर्थात तिथे उधारी चालत असावी असं मला तरी वाटत नाही - अनुभव नाही), किंवा किराणामालाच्या थकलेल्या बिलांबाबतही नाही. हा संवाद आहे एका सायबर कॅफे बाहेरचा. शेजारी एका दवाखान्यात आलो असता कानावर पडलेला. सहज रिसेपशनिस्टला विचारलं तर हे असले प्रेमळ(!) संवाद रोजचेच आहेत असं समजलं. ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थीदशेतील मुलांचे आणि सायबर कॅफेच्या गल्ल्यावर बसलेल्यांचे. "अहो काय सांगू, अनेक वेळा समजावून झालं, पेशंट आहेत त्रास होतो, काहीही परिणाम नाही".

असेल अपवादात्मक ठिकाण म्हणून फार विचार केला नाही. असंच एकदा प्रिंटाआउट काढायला अन्य एका सायबर कॅफे मध्ये जावं लागलं. तिथे शालेय गणवेशातली अनेक मुलं दिसली. ही मुलं करताहेत तरी काय पहावं म्हणून एकाच्या नकळत सहज डोकावलो तर कसलासा ऑनलाईन युद्धाचा गेम तो खेळत होता. शेजारीच त्याचा मित्र त्याला कसं खेळायचं याचं मार्गदर्शन करताना दिसला. माझं काम झाल्यावर सायबर कॅफेच्या मालकाला विचारलं, "काय हो, दोघांना कसं काय बसून देता तुम्ही एका पी.सी. वर?"

"अहो शेट, लय भारी गिर्‍हाईकं आहेत ही. रोज येत्यात. बराच वेळ बसत्यात, लई खेळत्यात. बक्कळ कमाई यांच्यामुळं", मालक उत्तरले.

निराशेने मान हलवून बाहेर पडलो, तर मागोमाग वरच्यासारखाच संवाद कानावर पडला. उधारी बाकी असल्याचा. फक्त ह्या वेळी रक्कम कमी होती.

मित्रमंडळी आणि अन्य काही सायबर कॅफेचे मालक यांच्याशी चर्चा करता समजलं की ही परिस्थिती धक्कादायकरित्या सर्वसामान्य आहे. कोपर्‍याकोपर्‍यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उघडलेले सायबर कॅफे यांमुळे घरी इंटरनेटची जोडणी नसलेले किंवा इतर काही कारणांमुळे घरी गेमींग न करू शकणारे यांची चांगलीच सोय झाली आहे. शिवाय नजिकच्या भूतकाळात जितक्या झपाट्याने तुरडाळीचे दर वाढले त्यापेक्षाही वेगाने घसरलेले सर्फिंगचे दर ही ऑनलाईन गेम्सचं वेड फोफावण्यासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरली आहे. दुर्दैवाने अधिकाधिक लोक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडत आहेत.

vyasan01_cafe.jpgvyasan02.jpg

समुपदेशन करणारे अनेक तज्ञ म्हणतात की इंटरनेट सहज उपलब्ध असणं या व्यतिरिक्त ऑनलाईन खेळ यांचे अतिशय वेगाने लागू शकणारे व्यसन ही प्रामुख्याने चिंतेची बाब आहे. वैयत्तिक/प्रत्यक्ष आयुष्यात छटाकभर सत्ताही नसलेल्यांकडे ऑनलाईन खेळात मोठ्या सैन्याचे अधिपत्य किंवा एका शहराचे नेतृत्व येऊ शकते. इंग्रजीत असलेल्या ''Power corrupts, and absolute power corrupts absolutely' या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ही नशा ऑनलाईन असली, तरी ही सत्ता मनाचा झपाट्याने ताबा घेते, आणि मग शाळा, शिकवणीची फी, खाऊचे पैसे इत्यादीतला एक मोठा हिस्सा या खेळांवर खर्च होऊ लागतो.

माझा एक प्रोग्रामर मित्र ऑनलाईन खेळ बनवतो. त्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली. ऑनलाईन खेळ बनवणारे मानसशास्त्राचा उत्तमरित्या उपयोग करुन घेतात. प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याचे किंवा मानसिक कणखरतेची कसोटी प्रसंग पाहणारे प्रसंग आले की अशा ऑनलाईन खेळांच्या नादी लागलेल्या लोकांना खेळातल्या विजयाचे प्रसंग आठवून त्यांची पाऊले आपोआप गेमिंगकडे वळतात. मानसशास्त्रात हा प्रकार 'क्लासिकल कंडिशनिंग' या नावाने ओळखला जातो.

हे खेळ काही वेळ खेळून सोडून देण्यासारखे निश्चित नाहीत. ते खेळायचे असतील तर बराच वेळ द्यावा लागतो. खेळात एखाद्या जागी माघार घ्यावी लागणं आणि एखाद्या प्रसंगी जिंकणं यात अशा प्रकारे समतोल साधला जातो की खेळणार्‍यापुढे जिंकण्याचं गाजर सतत नाचवलं गेल्याने त्याला पुढे खेळत राहण्याशिवाय पर्याय नसतो. खेळताना आपण नक्की कधी जिंकणार हे सांगता येत नाही. विजय हा अगदी पुढच्या क्षणाला मिळू शकतो, पुढच्या तासात तुम्ही जिंकू शकता, किंवा जिंकायला अगदी दिवसभरही लागू शकतो. पण बराच वेळ हरतोय म्हणून आपण खेळ खेळणं थांबवलं तर तो जिंकण्याचा क्षण गमावू ह्या भीतीने खेळणारे अमर्याद काळ खेळतच राहतात. सतत अनेक तास असे खेळ खेळल्याने ताणामुळे काहींनी आपला जीव गमावल्याचीही उदाहरणं आहेत.

किशोरावस्थेत असलेल्या मुलांत या व्यसनाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव असला तरी लहान मुलेही याला अपवाद नाहीत. माझ्या एका मित्राची प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलगी त्यांच्या घरातल्या संगणकावर बार्बी हा खेळ खेळते. त्याबद्दल हटकलं असता चिडचिडी होते आणि हट्टीपणा करते. जी मुले बंदुका, तोफा आणि तत्सम गोष्टी असणारे खेळ खेळतात त्यांना राग लवकर येतो आणि अशी मुले हिंसक होण्याची शक्यता असतेच असते.

vyasan03.jpg

ही बाब आता फक्त ऑनलाईन खेळांपुरती मर्यादित नाही तर अश्लील मजकूर, चित्रे आणि चलतचित्रे असलेली संकेतस्थळे, चॅटींग आणि सोशल नेटवर्किंग यांनीही या व्यसनाचा मोठा भाग व्यापला आहे. आंतरजालीय जुगार, समभाग खरेदी-विक्री, पोर्नोग्राफी, आणि सेक्स चॅट हे या ई-व्यसनाचे काही घटक.

इंटरनेट उर्फ आंतरजालाचे व्यसन ह्या गोष्टीने आता इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे. संस्थेत या नवीन व्याधीवर उपचार घेणार्‍यांमधे बहुतांश शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले आहेत. उपरोल्लेखित अनेक समस्यांबरोबरच 'सायबर रिलेशनशिप अ‍ॅडिक्शन' हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग, आंतरजालावरचे मित्र अशा गोष्टींमुळे वेळ-काळाचे भान न राहिल्याने घरी पालकांशी आणि इतर घरच्यांशी अगदी तुटक किंवा उद्धटपणे संभाषण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष, वाचन-लेखन-मनन आणि मैदानी खेळ खेळण्यास अनुत्सुक असणे यासारख्या बाबींकडे घरातल्या मोठ्यांचे एक तर वेळेवर लक्ष जात नाही, किंवा अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. शेवटी सहामाही/वार्षिक परीक्षेत दिवे लागल्यावर प्रगती पुस्तकात दिसणारी अधोगती हा पालकांसाठी एक मोठा धक्का असतो. मग सुरवातीला आपली मुलं संगणक लिलया हाताळतात हा अभिमान गळून पडतो आणि पालकांच्या जीवाला नवीन घोर लागतो. इतर व्यसनग्रस्तांप्रामाणेच आपल्याला व्यसन आहे हेच मुळात या मुलांच्या गावी नसते. मुक्तांगण संस्थेतले समुपदेशक अशा मुलांना हीच गोष्ट आधी पटवून देतात.

उपचारांच्या दुसर्‍या टप्प्यात मग त्यांच्या भावी प्रगती बाबत बोलून त्यांना प्रोत्साहित केले जाते. समुपदेशनाबरोबरच ध्यानधारणा, वाचनास उद्युक्त करणे, वेगवेगळे मैदानी आणि घरगुती खेळ खेळायला लावणे, अशा विविध प्रकारे 'बरे' केले जाते. अडनिडं वय आणि या आजाराचे विचित्र स्वरूप यामुळे या मुलांना ई-व्यसनमुक्त करण्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि लागणारा वेळ हा अर्थातच इतर व्यसनाधीन लोकांपेक्षा अधिक असतो. मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन केलं जातं. कारण फक्त मुलांचंच नव्हे तर संपूर्ण घराचं सौख्य आणि शांती अशा गोष्टींमुळे हिरावली जाते. मुलं संगणक वापरत असताना त्यांना विचित्र वाटणार नाही अशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवावे असा सल्ला पालकांना दिला जातो.

सद्ध्या मुक्तांगणमधे ई-व्यसनांवर उपचार घेणार्‍यांमधे मुलं आणि तरुणांचे प्रमाण जास्त असलं तरी भविष्यात संस्थेत उपचारासाठी दाखल होणार्‍यांमधे मोठ्यांची संख्या वाढू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या नात्यांवर परिणाम होण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातल्या असमाधानकारक नात्यांमुळे अनेक जण ऑनलाईन नात्यांमधे गुंतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. आर्थिक नुकसान, दैनंदिन वेळेचा अपव्यय याबरोबरच ऑफिसमधल्या कामावर परिणाम होणे याही गोष्टी लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. यापायी अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्याचीही उदारहणे आहेत. समविचारी लोकांशी संपर्कात राहणे आणि स्वतःला रचनात्मक पद्धतीने व्यक्त करणे या उद्देशाने आपण अनेक सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो खरे, पण मग त्याच बरोबर अनेक अनावश्यक गोष्टींमधे आपला सहभाग वाढतो आणि इतर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या मेंदूत प्रवेश करतात. आंतरजाल हे साधन आहे, साध्य नव्हे याचा वेगाने विसर पडतो.

मी आत्ता ज्या आस्थापनात काम करतो तिथे एकेकाळी कर्मचार्‍यांना आंतरजाल मुक्तपणे उपलब्ध होतं. जीमेल, याहू, ऑर्कुट, फेसबुक, विविध चॅट संकेतस्थळे, युट्युब आणि इतर सगळ्या संकेतस्थळांवर दिवसातल्या कुठल्याही वेळी सगळयांचा मुक्त वावर असायचा. पण प्रमाणाबाहेर वापर वाढला आणि कामावर परिणाम होऊ लागला तसा हा वेळ नियमबद्ध करुन फक्त दिवसातला अर्धा तास असा केला गेला. आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो. अनेक आस्थापनांत हाच वेळ एक तास असला तरी एका वेळी फक्त दहा मिनिटं अशा प्रकारे तो वापरावा लागतो. याचाच अर्थ आंतरजालाचा वापर कसा आणि किती करावा यासंबंधात मोठ्यांनीही आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

इतर काही नाही म्हणून करमणुकीसाठी आंतरजालावर फेरफटका मारायचा याला काही अर्थ नाही. आंतरजाल की करमणुकीची जागा आहे हा समज निखालस चुकीचा आहे. कारण आंतरजाल हे टीव्ही सारखं इडीअट बॉक्स नव्हे. नेटवर बसल्यावर सतत माणसाचा मेंदू जागृत असतो, त्याला आराम मिळत नाही. सतत 'अ‍ॅलर्ट' रहावं लागत असल्याने मग थकवा येणं हे ओघाने आलंच.

vyasan04.jpg

मुळात आपल्याला आंतरजालाचे व्यसन लागले आहे ह्याची जाणीव होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एखादे महत्वाचे काम करण्यासाठी आपण लॉग-इन केले, आणि काही क्षणांच्या कामासाठी आलेलो असताना आपण अर्धा-एक तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन आहोत असे लक्षात आले आहे का कधी? आंतरजालावर सोशल नेटवर्किंगमधे किंवा इतर गोष्टींमधे गुंतल्याने ऑफिसची काही अर्थातच महत्वाची असलेली पण बिनतातडीची कामे पुढे ढकलायची सवय लागली आहे का? वैयत्तिक आयुष्यातले वैफल्य किंवा ते निर्माण करणार्‍या समस्या सहन होत नसल्याने त्यापासून पळण्यासाठी तुम्ही आंतरजालावर येता का? या आणि तत्सम अनेक प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर "हो" असले तरी सावध व्हा. एखाद्या संस्थेत जाऊन ई-व्यसनमुक्ती कार्यक्रमात सहभागी व्हायला कमीपणा वाटत असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हेच सूत्र इथेही उपयोगी पडते. एकदा निग्रह करा, मग वास्तवाशी सामना करणे ही बाब ई-व्यसनांच्या विस्तवाशी खेळ करण्यापेक्षा नक्कीच सोपे वाटू लागेल.

मग करताय ना निश्चय?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित

सर्व छायाचित्रे: स्वतः काढायला आवडली असती पण सायबर कॅफेत परवानगी मिळाली नाही त्यामुळे नाईलाजास्तव आंतरजालावरून साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 

लिंबुकाका, नेहमीप्रमाणेच उत्तम पोस्ट Happy
तुमच्या पोस्टींतून खूप काही शिकण्यासारखे असते.
खरं तर हा लेख म्हणजे माझा स्वतःशीच चाललेला संवाद म्हणायला हवा.

>>> खरं तर हा लेख म्हणजे माझा स्वतःशीच चाललेला संवाद म्हणायला हवा.
बाबारे, माझ्या पोस्टीन्मधे देखिल किमान ९०% स्वगते, नि जास्तीतजास्त १०% इतरान्करताचा उल्लेख असतो. Proud (अनुल्लेखावर मात करण्यामुळे लागलेली सवय आहे ही, अशी सहजासहजी जायची नाही कै Wink )

मंदार, फारच उत्तम लेख.

खरच आजकाल मुलांना मोकळ्यावर खेळण्यापेक्षा घरात बसुन ऑनलाईन गेम्स, चॅटिंग यात जास्त इंटरेस्ट असतो असं बघितलयं. यामुळे मानसिक हानी तर होतेच पण शरीराला आवश्यक व्यायाम, स्वच्छ (मुंबई-पुण्यात कुठे म्हणा Sad ) हवा न मिळाल्यामुळे आणि एका जागी बसणे अबरचबर खाणे यामुळे शारिरीक हानीही होतेच की. देशात हल्ली लहान मुलांच्यात ओबेसिटीचे प्रमाण अचानक वाढलय... हा अजुन एक फार महत्वाचा चर्चेचा विषय ठरु शकतो....

हे व्यसन कमी करणे बर्‍यापैकी पालकांच्याच हातात आहे असे मला तरी वाटते. बरेच वेळेला पालकच...'बसलेत ना शांत.. खेळु देत.. माझी कामं तरी होतिल'अश्या स्वार्थी वृत्तीने मुलाम्च्या व्यसनाला खतपाणीच घालत असतात.

लेख खुप आवडला..

मंदार

खूपच चांगला लेख आहे. खरतर आभारच मानायला हवेत यासाठी. मध्यंतरी सम्राट फडणीस आणि अभिजीत कुंटे यांनी ऑर्कूटवर यासंबंधी चर्चा घडवून आणली होती. त्या चर्चेचं फलित म्हणून सकाळ मधे एक पानभर या विषयाला वाहीलेले लेखच छापले होते. शोधता आला लेख तर उत्तमच. कुणाकडे असेल लिंक तर प्लीज द्या..

नेटचं व्यसन लागण्याची कारणं माझ्या निरीक्षणाप्रमाणे लिहीतो...

बुद्धीजीवी : व्यक्त व्हायची संधी मिळणे. आपलं लिखाण वाचलं जातं ही भावना निर्माण होणे. मग लिखाणाला किती नि कसे प्रतिसाद मिळतात यासाठी नेटवर वेळ घालवणे. या प्रतिसादांपायीच मग वेळ जाऊ लागतो.

टीन एजर्स : मित्र / मैत्रिणी जोडणे. (शक्यतो भिन्नलिंगी). मग प्रोफाईल्स शोधणे. माहीती वाचणे. स्रॅप्सची आदानप्रदान. चॅट वगैरे... आणि पुढे तो / ती ऑनलाईन असेल का, मला उत्तर दिले असेल का या काळजीने पडीक राहणे.

अतृप्त : वपुंची सज्जनपणाची एक व्याख्या आहे. काही करता न आलं म्हणून सज्जन. अशा मारून मुटकून सज्जन मंडळींना इतरांना जे करता आलं ते आपली ओळख लपवून करायची संधी चालून आल्यासारखी वाटते. मग नकली व्यक्तिमत्व उभारून त्याद्वारे आपल्या अनेक इच्छा आभासी दुनियेत पूर्ण केल्याचं आभासी समाधान मिळवणे. हा दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार झाला पण आहे त्या परिस्थितीत नाईलाज असतो.

पुढे आपणच निर्माण केलेल्या व्यक्तिमत्वांच्या प्रेमात पडून त्यांना लार्जर दॅन लाईफ करण्याचे उद्योग सुरू होतात. या खटाटोपात इतरांच्या काहीच लक्षात येत नाही असे समजून जवळजवळ एखादी ऑनलाईन संहिताच लिहीली जाते.. यात बराच वेळ जाऊ शकतो. जागरणं होतात, आजार जडतात. यातून एकच व्यक्ती संबंधितांना सोडवू शकते आणि ती म्हणजे स्वतःच

विचारसरणीचे पाईक : ऑनलाईन जोरदार भांडणं करणारे लोक ही यांची ओळख. अत्यंत एकांगी मतं असणारे असे लोक सुरूवातीला नेटकडे आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे माध्यम म्हणून पाहतात. शक्यतो अशा लोकांना फील्डमधे काम नको असतं. शॉर्टकट म्हणून त्यांना नेट जवळची वाटते. शक्यतो सीनिअर्सनी शिकवलेलं ज्ञान हे त्यांच बलस्थान असतं. त्यावर अपार श्रद्धा असते. नेटवर ही शिदोरी ओतली कि काय रिअ‍ॅक्शन येतात हे पाहणं जरूरीचं असतं. एखादं मत विरूद्धार्थी आलं कि मग खरी मजा सुरू होते. बरं ते मत यांच्या मताला खोडून काढणारं असेल तर मग संताप, आक्रस्ताळेपणा सुरू होतो. मग ते मत खोडून काढणं आलं कि नाही. मग हे वाच ते वाच, सर्च दे, याला विचार , फोनाफोनी हे उद्योग सुरू होतात..

आणि हे पलिकडूनही सुरूच राहतं.. हे व्यसन बेकार. त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील वगैरे भानच नसतं. फक्त त म्हणायचा अवकाश कि तिरसिंगराव युद्धात मेले कि त्यांना घरातच मारलं वगैरे वगैरे सुरूच होतं

आवरतो. चन्स मिळाला कि असं सुरू होतं बघा हल्ली

मंदार चांगला विषय मांडला आहेस, या व्यसनापायी ही पिढी स्वतःचे लहानपण गमवून बसत आहेत.
पालकांनीच विचार केला पाहिजे त्यात या लहान मुलांची काही चुक नाही

लिंबुटींबुशी सहमत
पण आजची परिस्थीती अशी आहे की, हम दो हमारे दो, किंवा १ तर या परिस्थीत आईवडील मुले घरीच रहावीत म्हणुन त्यांना टीव्ही, नेट उपलब्ध करुन देतात, शिवाय फ्लॅट सस्कृती, अगदी समोरच्याचेही दार बंद मग मुलगा/मुलगी कोणाशी खेळणार. यातुन अशा व्यसनाचा उदय झाला.

उत्तम लेख
अनिल सोनवणेंचे विश्लेषण उत्तम.
थोडे अंतर्मुखही झालो.सदोदित नेटच्या शोधात असलेला मी अन माझी बोटे-त्यात फेबु व माबो सामील.
सीरियसली लिहितोय.

सुंदर लेख लिहला आहे मंदार.. आवडला.
पण सगळ वाचून मन सुन्न झाल. या सगळ्याला जेवढी मुल जबाबदार तेवढीच पालकही जबाबदार आहेत. Sad

अनिल सोनवणेंचे विश्लेषण खरोखर उत्तम आहे... अंतर्मुख करणारे..... आत्मपरिक्षण करते आहे... मी 'विचारसरणीचे पाईक' ह्या कॅटेगरीत बसते की काय??? Uhoh
माझ्या 'मायबोलीकरांची वर्गवारी' ह्या लेखावरुन आणि त्यावर मी प्रतिसादांना दिलेल्या प्रत्युत्तरांवरुन तरी मला आता स्वतःविषयी तसंच वाटायला लागलं आहे! Sad Uhoh

सुंदर लेख !
मी एकदा स्वतःवर प्रयोग करुन पाहावा म्हणून स्वतःचे ऑर्कुटचे अकाऊंट डिलीट करुन टाकले. आता लक्षात येतय की त्यामुळे काहिही बिघडलेले नाहिये. अजुनहि मी फेसबुकवर नाही. ऑनलाईन जगात मी अस्तीत्वातच नाहिये असे सांगीतल्यावर बरेच जण मा़झ्याकडे भूत पाहिल्यासारखे करतात.

राजधर्म
अभिन,न्दन
अजून एक अनुभव
माझे कित्येक दिवसात न भेटलेले मित्र फेसबुकात सापडलें. नमस्कार चमत्कार झाला----संपले
आता प्रश्न आहे की मनोमन स्नेह वाढवायची इच्छा असती तर फेसबुकाशिवाय ही हे घडले असते.
प्रामाणिकपणे फेसबुक अन माबो हे व्यसन झाले आहे.
याचा आत्मनिरिक्षणाचा परिणाम इथे व्हॅल्यू अ‍ॅडेड काही लिहिण्यात होईल का?की व्यसन म्हणूनच भेट होईल?

आता प्रश्न आहे की मनोमन स्नेह वाढवायची इच्छा असती तर फेसबुकाशिवाय ही हे घडले असते.>>>

रेव्यु़ यांच्या मायबोलीवरील कुठल्याही कवितेपेक्षा, लेखापेक्षा, ललितापेक्ष, कथेपेक्षा, हे वाक्य अत्यंत डेंजर आहे.

जियो

तो Counter Strike - Black Ops तर डेंजर गेम आहे.
त्याच्या points चा तर चक्क काळाबाजारही होतो.
आणि कॅफेजवर तर काहीच्या काही ओरडत लोक खेळतात.
मला आठवते ... दोन वर्षांपूर्वी असाच त्या रिलायंसच्या कॅफेत होतो. Counter Strike वेडे तर कामच करू देईनात.
मग काय.... तीन दिवस नेटवर्क डाऊन ! बसले बोंबलत Proud

सायबर कॅफे मधे खेळता खेळता अचानक? समोर उघडण्यार्‍या पॉर्न साईट्स पाहून यांची मनं विचलीत नाही झालीत तरंच नवल काय ते. यातूनच मग पुढे सायबर क्रिमिनल्स उभ राहतात. >>> काय राव स्मितहास्य ... सायबर क्राईम हा प्रकार तुम्हाला पोर्न पाहण्याएवढा निर्बुद्ध वाटतो की काय ? (खोट्या सोशल नेटवर्किंग प्रोफाईल्स बनवणे सोडून )

गेमिंगच व्यसन आणि सायबर क्राईम हे पूर्णतः भिन्न प्रकार आहेत. कृपया ह्यांची गल्लत करू नये.
जगभरात धिंगाणा घालणारे झेउस बॉटनेट ... इराणच्या आण्विक असेट्स वर हल्ला करणारे स्टक्सनेट आणि त्यामागचे लोक काय गेमर्स नाहीत.

मंदार चिंतनात्मक लेख आहे.
माझा मुलगा ९वीत गेलाय. घरी दिवसभर टीवी आणि कॉम्प. मी फक्त आठवड्यातुन एकदा नेट कॅफेत जायला परवानगी दिली होती... पण सध्या रोज पैसे मागतो. अर्थात ह्याला फक्त तिथले ते वाय सिटी /इंटरनेटवरचे गेम्स खेळायचे असतात. पण माझ्याच मनात सतत धाकधुक.. न जाणो नको ते कधी दृष्टीस पडले तर!! हे ही आहे आणि मैदानी खेळ खेळण्यास खरच इतका उत्सुक नसतो. इकडे आमच्याकडे नेहमी येणारा माझ्याच चुलतबहिणीचा मुलगा सातवीत गेलाय पण फेबुवर अकाउंट ओपन केलंय, आणि ते जिजाजी मोठ्या कौतुकाने सांगतात की माझ्या मुलाचं फेबुवर प्रोफाईल आहे. आपण पालक दिवसभर ऑफीस मधे असतो.. सध्या त्याला दिवसभर बिझी कसं ठेवायचं हीच चिंता आहे! Sad

Pages